संभाजीनगर येथील सनातनचे ९७ वे संत पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर यांचा साधनाप्रवास

अनुक्रमणिका

‘आयुष्याच्या उतारवयात ध्यानीमनी नसतांना ‘सनातन संस्थे’सारख्या आध्यात्मिक प्रसार आणि प्रचार करणार्‍या संस्थेशी कधी काळी माझा संबंध येईल’, असे मला वाटले नव्हते. या लेखामध्ये माझा ‘मी काही विशेष केले आहे’, असे सांगण्याचा अभिनिवेश मुळीच नाही.

(पू.) निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर

 

१. जन्म आणि बालपण

१ अ. हैद्राबाद संस्थान भारतात विलीन होण्यासाठी झालेल्या संग्रामात वडिलांचा पूर्ण सहभाग असणे

२७ मे १९४५ या दिवशी माझा जन्म जिल्हा बीड येथे झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात, त्यातही भारत स्वतंत्र होऊनही आमचे हैद्राबाद संस्थान भारतीय संघराज्यात सामील झाले नव्हते. स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिक घरादाराचा त्याग करून आपापल्या परीने निजाम शासनाला विरोध करत होते. त्यात माझे वडील श्री. पुरुषोत्तमराव चपळगावकर यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. मला बालपणी वडिलांचा सहवास मिळालाच नाही; कारण हैद्राबाद संस्थान १७ सप्टेंबर १९४८ या दिवशी स्वतंत्र झाल्यानंतर काही काळाने त्यांना कारागृहातून सोडण्यात आले. तोपर्यंत त्यांनी स्वतःला भाषणे, अटक, शिक्षा आणि कारागृह यांतच अडकवून घेतले होते.

पुढे १५.८.१९७२ या दिवशी त्यांचा देहली येथे तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या शुभहस्ते ताम्रपट आणि चांदीचे कडे देऊन सत्कार करण्यात आला अन् त्यांना निवृत्तीवेतन देण्यात आले.

१ आ. घरामध्ये धार्मिक कर्मकांड फारसे नसले, तरी घरात सर्व धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम व्यवस्थित पार पाडले जाणे

या कौटुंबिक पार्श्वभूमीत मी वाढत गेलो. वडील अत्यंत न्यायप्रिय असल्याने साहजिकच माझा स्वभावही तसाच होत गेला, हे साहजिक आहे. माझे वडील हे कडवे गांधीवादी विचारांचे होते. घरामध्ये धार्मिक कर्मकांड फारसे नसले, तरी सर्व धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम घरात व्यवस्थित पार पाडले जात. वडील मला वेळोवेळी अनेक सणांचे महत्त्व पटवून देत असत.

२. प्रसंगावधान राखून तत्परतेने कृती केल्यामुळे दुर्घटना टळणे आणि ती घटना वडिलांच्या स्मरणात रहाणे

त्या वेळची एक गोष्ट मला आठवत आहे, ‘घरातील एका मोठ्या दालनामध्ये माझे वडील आणि ज्येष्ठ बंधू असतांना माझ्या बंधूंचा हात ‘टेबललॅम्प’ला चिकटला. माझे बंधू आणि वडीलही मोठ्याने ओरडले. मी बाहेरून पळत आलो आणि हे पाहिले. तेव्हा मी माझ्या हातापाशी असलेले ‘मेन स्विच’ बंद केले आणि धावत जाऊन बंधूंना सावरले. माझे वडील त्यापुढच्या ३५ वर्षांच्या आयुष्यात ही घटना कधीही विसरू शकले नाहीत. ‘‘तू नसतास, तर काय झाले असते ?’’, असा प्रश्न ते मला नेहमी विचारत असत. तेव्हा मी त्यांना शांतपणे उत्तर देत असे, ‘‘मी नसतो, तर ही घटनाच घडली नसती.’’

 

३. ‘ज्यांना साहाय्याला कुणी नाही’, अशा पक्षकारांना कायदा आणि नियम यांच्या चौकटीत राहून न्यायदान करणे

पुढे माझे वडील, थोरले बंधू (श्री. नरेंद्र चपळगावकर (वय ८४ वर्षे), ते पुढे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले) आणि मी असे तीन अधिवक्ते एकाच घरात काम करू लागलो. ‘मी न्यायाधीश व्हावे’, अशी माझे वडील आणि माझी पत्नी यांची इच्छा होती. वर्ष १९७६ मध्ये सुदैवाने पहिल्याच प्रयत्नात मी न्यायाधीश झालो. काम करतांना ‘ज्यांना कोणी नाही’, अशा पक्षकारांना ते आरोपी असले, तरी मी कायदा आणि नियम यांच्या चौकटीत राहून न्याय देत राहिलो. यात विशेषतः जन्मतः टाकून दिलेली बाळे, बालसुधारगृह, कारागृह, तसेच वेड्यांचे इस्पितळ यांत मी विशेष लक्ष घालत असे.

 

४. स्वेच्छानिवृत्ती आणि सनातन संस्थेशी झालेला संपर्क !

४ अ. स्वेच्छानिवृत्ती घेऊन वकिली व्यवसायाला प्रारंभ करणे

निवृत्तीवेतनपात्र सेवा झाल्यानंतर मी स्वेच्छानिवृत्तीसाठी केलेली विनंती शासनाने मान्य केली; पण त्यासाठी मला संघर्ष करावा लागला. त्यानंतर वर्ष १९९७ मध्ये मी संभाजीनगरच्या (औरंगाबादच्या) मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठात वकिली व्यवसायाला प्रारंभ केला. त्यासाठी मला पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांचे मिळालेले प्राथमिक मार्गदर्शन मोलाचे होते. ते माझ्या ज्येष्ठ बंधूंच्या सोबत वकिली व्यवसायात होते. रोजच्या भेटीत त्यांच्याकडून मला सनातन संस्थेच्या निरनिराळ्या क्षेत्रांतील कार्याची माहिती मिळत होती.

४ आ. निवृत्तीनंतर समाजकार्य करण्याची इच्छा असणे

निवृत्तीनंतर ‘परमेश्वराने जन्मतःच आपल्यासोबत जे काही दिले आहे, त्याचा उपयोग समाजासाठी (सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक) करावा’, अशी माझी इच्छा होती. त्याचबरोबर ‘आपला कोणी वापर करून घेऊ नये’, याचीही जाण मला सोबत होती.

 

५. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने चालवलेल्या ‘वैज्ञानिक जाणिवा’ चळवळीच्या विरोधात केलेले काम !

५ अ. अंधश्रद्धा निर्मूलन समिती ‘वैज्ञानिक जाणिवा’ या गोंडस नावाखाली व्याख्याने देऊन त्यात भारतीय संस्कृती, साधू आणि संत इत्यादींचा अनादर करत असणे, त्याविषयी एका धर्मप्रेमीने न्यायालयात दाखल केलेला खटला चालवणे

अशाच वेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती ‘वैज्ञानिक जाणिवा’ या गोंडस नावाखाली शैक्षणिक संस्थांसह इतर ठिकाणी शासनाच्या आर्थिक साहाय्याने व्याख्याने देत असे. त्या व्याख्यानात ते भारतीय संस्कृती, साधू, संत, रितीरिवाज अशा आदरणीय आणि श्रद्धेय विषयांचा अनुदारतेने उल्लेख करत असत. एका संस्थेमध्ये झालेल्या अशाच कार्यक्रमाबाबत एका धर्मप्रेमीने त्या ठिकाणच्या न्यायालयात दाखल केलेल्या फिर्यादीविरुद्ध उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली.

५ अ १. धर्मप्रेमीचे न्यायालयीन काम पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांच्याकडे येणे, ती कागदपत्रे वाचतांना ‘तो खटला स्वतःच चालवावा’, असे वाटणे

साहजिकच धर्मप्रेमीचे न्यायालयीन काम पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांच्याकडे आले. या प्रकरणातील कागदपत्रे पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी पहात असतांना मी त्यांच्या हातून ती कागदपत्रे काढून घेतली आणि स्वतः चाळून पाहिली. तेव्हा ‘हे प्रकरण स्वतःच चालवावे’, अशी मला तीव्रतेने आंतरिक इच्छा उफाळून आली.

५ अ २. ‘अध्यात्म’ ही संकल्पना श्रीमद्भगवद्गीतेमध्ये कुठे कुठे वापरली आहे ?’, हे न्यायालयात सांगितल्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हाध्यक्षांच्या विरोधातील खटला पुढे चालू रहाणे

त्या काळी मी नियमित श्रीमद्भगवद्गीता वाचत असे. न्यायालयासमोर ते प्रकरण चालवतांना ‘अध्यात्म’ ही संकल्पना ‘श्रीमद्भगवद्गीतेमध्ये कुठे कुठे वापरली आहे ?’, हे मला न्यायालयात सांगता आले. साहजिकच ‘अशी भाषणे करणार्‍या त्या जिल्हाध्यक्षांच्या विरुद्ध खटला पुढे चालू ठेवावा’, असा आदेश न्यायालयाने दिला.

त्यानंतर ‘अशी काही प्रकरणे असल्यास ती मी चालवणार’, असे मी पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांना सांगितले.

५ आ. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने श्री गणेशमूर्तींविषयी दाखल केलेल्या याचिकेच्या विरोधातील पुरावे पाहून न्यायालयाने याचिका निकाली काढणे

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एक याचिका (औरंगाबाद) संभाजीनगर खंडपिठात दाखल केली होती. त्यात ‘गणपतीची मूर्ती ६ इंचांपेक्षा मोठी असू नये’, अशी मागणी करण्यात आली होती. ‘गणपतीच्या मूर्तीसाठी वापरण्यात येणारे रंग हे विषारी असल्यामुळे गणपति विसर्जनानंतर पाण्यात पसरलेल्या विषामुळे मासे मरतात आणि मूर्ती विसर्जनामुळे धरणामध्ये माती साचून धरणे निकामी होतात’, अशी कारणे देण्यात आली होती. पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांनी भरपूर कष्ट घेऊन याबाबतची सर्व माहिती पुराव्यानिशी गोळा केली होती. माननीय न्यायालयाने आम्हा दोघांचेही (पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी आणि मी) म्हणणे ऐकून घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीची याचिका निकाली काढली.’

 

६. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये एका साधिकेला मार्गदर्शन करतांना पाहून ‘स्वतःला सर्वांसमोर बोलायला जमू शकेल’, असे वाटणे आणि पेण येथील मूर्तीकारांसमोर बोलणे

याच काळामध्ये मी संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये होमिओपॅथी वैद्या (सुश्री (कु.)) आरती तिवारी यांना मार्गदर्शन करतांना पाहिले. ‘ही मुलगी इतकी व्यवस्थित बोलू शकते, तर आपल्याला ते का जमणार नाही ?’, असा प्रश्न माझ्या मनात आला. त्यानंतर मी आणि इतर साधक यांनी पेण येथे जाऊन मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मूर्तीकारांसमोर भाषणे केली.’

 

७. सनातन संस्थेवर बंदी येणार असल्याची वार्ता पसरली असतांना साधकांना त्या कायद्याविषयी माहिती दिल्यावर त्यांच्या तोंडवळ्यावरचा आत्मविश्वास एक वेगळाच आनंद देऊन जाणे

त्या काळात ‘सनातन संस्थेवर बंदी येणार’, अशी दाट आवई पसरली होती. तेव्हा मी संबंधित कायद्याचे पुरेसे वाचन करून, ठिकठिकाणी जाऊन तो कायदा सनातन संस्थेच्या साधकांना समजावून सांगायला सुरुवात केली. तेव्हा साधकांच्या चेहर्‍यावर दिसून येणारा आत्मविश्वास मला एक वेगळाच आनंद देऊन जात असे.

 

८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट होऊन ६० टक्के आध्यात्मिक पातळी घोषित होणे

८ अ. रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात जाणे

एवढे होईपर्यंत आश्रम किंवा अध्यात्म वगैरे विषय माझ्या मनातसुद्धा आले नव्हते. केवळ न्यायप्रियता आणि अन्याय होत असलेल्यांच्या मदतीला जाण्याच्या स्वभावामुळे मी येथपर्यंत आलो होतो. अचानक मला सांगण्यात आले, ‘मला आणि पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात बोलावण्यात आले आहे.’ त्यानुसार आम्ही दोघेही संभाजीनगरहून बसने गोव्याला आश्रमात आलो.

८ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट होणे आणि तेथून खर्‍या अर्थाने आध्यात्मिक प्रवासाला आरंभ होणे

आम्ही आश्रमात आल्यावर सायंकाळी आमची डॉ. आठवले (त्यांचा उल्लेख अतीव श्रद्धेने ‘परात्पर गुरु’ असा करण्यात येतो. मीही यापुढे तसाच उल्लेख करणार आहे.) यांच्याशी भेट झाली. काही वेळ आमची चर्चा झाल्यानंतर त्यांनी इतरांना उद्देशून माझ्याबद्दल काही सांगितले आणि तेथून माझा ६० टक्क्यांसह आध्यात्मिक प्रवास चालू झाला.

 

९. कर्नाटक भेटीच्या वेळी ‘एका निवृत्त मुख्य न्यायाधिशांची भेट होणे’, ही एका दृष्टीने मोठी अनुभूती असणे

त्यानंतर पुढे ‘कर्नाटक राज्यात जाऊन मी तेथील ठिकठिकाणच्या अधिवक्त्यांशी याविषयी चर्चा करावी’, असे मला सुचवण्यात आले. कदाचित् माझ्या पूर्वजांच्या कर्नाटक पार्श्वभूमीचे ते कारण असावे. तेव्हा संभाजीनगर येथील तरुण अधिवक्ते चारुदत्त जोशी माझ्या बरोबर होते. वर्ष २०२० च्या कोरोनाच्या लाटेत त्यांचे अकाली निधन झाले. तोपर्यंत ते सनातन संस्थेच्या सर्व कार्यक्रमांत सतत माझ्या बरोबर रहात असत. कर्नाटकच्या भेटीच्या वेळी ध्यानीमनी नसतांना माझी एका विभूतीशी भेट झाली. ते एक निवृत्त मुख्य न्यायाधीश होते. ते काही काळ राज्यपालही होते. ती भेट माझे जे दायित्व होते, त्याच्याशी संबंधित असल्यामुळे माझ्या दृष्टीने ती एक मोठी अनुभूतीच होती.

 

१०. नामजप, परमेश्वर आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या स्मरणाने आजारपणातून सहज बाहेर पडता येणे

वर्ष २०११ च्या शेवटी माझ्या पोटात कर्करोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. त्यानंतरच्या काळात माझ्या दोन्ही डोळ्यांच्या मिळून ३ मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. या काळामध्ये कसलीही भीती न वाटता नामजप, परमेश्वर आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या स्मरणाच्या साहाय्याने त्यातून सहज बाहेर पडता आले.

 

११. ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त क्षमतेनुसार सहभाग

वर्ष २०१२ पासून मी गोवा येथे चालू झालेल्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त माझ्या क्षमतेनुसार भाग घेतला.

 

१२. ‘पर्सनल लॉ’ या गोंडस नावाखाली हिंदूंसाठी तसा कोणताच समांतर कायदा सिद्ध केला न जाणे

स्वातंत्र्यानंतर लगेचच ‘हिंदु कोड बिल’ तयार करायला सुरुवात झाली आणि नंतर लगेचच विवाह, वारसा, दत्तक, पोषण वगैरे कायदे हिंदूंसाठी तयार करण्यात आले; परंतु ‘पर्सनल लॉ’ या गोंडस नावाखाली हिंदूंसाठी तसा कोणताच समांतर कायदा तयार करण्यात आला नाही. या वेळी ‘हिंदूंचाही ‘पर्सनल लॉ’ असू शकतो’, याकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आले.

 

१३. ‘अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक’ हे सनातन धर्मावर आघात करणारे आहे’, असे लक्षात आल्यावर त्याच्या विरोधात लढण्यास आरंभ करणे आणि शेवटी या विधेयकातील तथाकथित पुरोगामी कलमे वगळण्यात यश मिळणे

साधारण वर्ष २०१३ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती तथाकथित ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या’चा धडाक्याने प्रचार करत होती. त्यावर सर्वत्र चर्चा चालू झाली होती. त्या विधेयकाचा साधारण अभ्यास केला असता हे संपूर्ण विधेयक सनातन धर्माच्या मुळावर असल्याचे माझ्या लक्षात आले. तोपर्यंत माझा धाकटा मुलगा चि. शैलेश हा वकिली व्यवसायामध्ये जोमाने पुढे येत होता. मी माझ्या परीने या तथाकथित पुरोगामी कायद्याला विरोध करायला सुरुवात केली. त्याच वेळी ‘सनातन संस्थे’च्या वतीनेही हाच कार्यक्रम विधायक मार्गाने हाती घेतला होता. अनेक संस्थांना भेटी देऊन या कायद्यातील फसवी शब्दरचना सर्वांच्या लक्षात आणून देण्यात आम्हाला पुरेसे यश आले. शेवटी डिसेंबर २०१३ मध्ये या तथाकथिक पुरोगामी कायद्यातील तथाकथित पुरोगामी कलमे वगळण्यात आली.

 

१४. आध्यात्मिक वाटचाल !

१४ अ. संतांच्या मार्गदर्शनाखाली साधना पुढे चालू रहाणे

एवढे होईपर्यंत माझी ‘आध्यात्मिक पातळी ६४ टक्के झाली आहे’, असे मला सांगण्यात आले. यानंतरच्या मार्गक्रमणासाठी ‘आध्यात्मिक मार्गदर्शन हवे’, हे माझ्या लक्षात आले. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माझी पुढील साधना चालू झाली.

१४ आ. आध्यात्मिक पातळी ६६ टक्के होणे, त्यानंतर ‘पुढची प्रगती कठीण आहे’, असे लक्षात येणे

मला वेळोवेळी सुचवण्यात आलेले अध्यात्मविषयक मार्गदर्शन दृष्टीसमोर ठेवून त्यानुसार माझा दिनक्रम चालू झाला. अशीच वाटचाल होत मी आध्यात्मिक पातळी ६६ टक्क्यांपर्यंत येऊन पोचलो. त्यानंतर मात्र ‘पुढची प्रगती कठीण आहे’, हे माझ्या लक्षात आले. आतापर्यंत मिळत असलेल्या आध्यात्मिक मार्गदर्शनाला पुढे जोड मिळत गेली.

१४ इ. बुद्धीच्या स्तरावरून भावाच्या स्तरावर येण्यासाठी पुष्कळ संघर्ष करावा लागणे

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी मी प्रत्येक ४ मासांनी रामनाथी आश्रमात येऊन १० दिवस निरनिराळ्या वर्गांतून मार्गदर्शन घेतले. मला बुद्धीच्या स्तरावरून भावाच्या स्तरावर येण्यासाठी अतीव संघर्ष करावा लागला; कारण यापूर्वी माझे सर्व आयुष्य बुद्धीच्या पातळीवर संघर्ष करण्यात गेले होते. ‘द्रौपदीने राजसभेमध्ये केलेला बुद्धीच्या पातळीवरील वाद आणि तो विफल झाल्यानंतर श्रीकृष्णाचा केलेला धावा’, या महाभारतातील उदाहरणाचा मला फार मोठा उपयोग झाला.

१४ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून मिळालेल्या बहुमूल्य मार्गदर्शनामुळे प्रगती होत रहाणे

साधारण वर्ष २०१० पासून वर्ष २०१९ मध्ये माझे संतपद घोषित होईपर्यंत मी रामनाथी आश्रमाला वेळोवेळी दिलेल्या भेटीतून आणि तेथे मला परात्पर गुरु डॉक्टरांकडून मिळालेल्या बहुमूल्य मार्गदर्शनामुळे मी साधनेत पुढे पुढे सरकत आलो आहे.

 

१५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा द्रष्टेपणा !

१५ अ. ‘हिंदु राष्ट्र’ या संकल्पनेच्या संवर्धनासाठी विधायक मार्गाने आणि भरीव रितीने कार्य पुढे नेण्यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा द्रष्टेपणा दिसून येणे अन् त्यांच्या निष्काम अलिप्तपणातून अनेक विचारवंत जोडले जाणे

‘हिंदु राष्ट्र’ ही संकल्पना स्वातंत्र्यानंतर जवळजवळ लोप पावली होती. ही संकल्पना संपूर्ण भारतात प्रथमच स्वातंत्र्योत्तर काळात त्याचे केवळ पुनरुज्जीवनच न करता त्या संकल्पनेच्या संवर्धनासाठी विधायक मार्गाने भरीव रीतीने पुढे नेण्यात परात्पर गुरूंचा द्रष्टेपणा दिसून येतो. या अभियानात जोडले गेलेले निरनिराळ्या राज्यांतील, निरनिराळ्या क्षेत्रांतील आणि निरनिराळ्या स्तरांवरील विचारवंत परात्पर गुरूंच्या निष्काम अलिप्तपणातून जोडले गेले आहेत.

हिंदु राष्ट्रासोबतच वैज्ञानिक कारणमीमांसेसह अध्यात्म हा एक अनोखा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून परात्पर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली राबवला जात आहे. या आणि अशा अनेक कारणांमुळे माझ्यासारखा रूढ अर्थाने धार्मिक नसलेलासुद्धा सनातन संस्थेच्या कार्यक्रमामध्ये हिरीरीने भाग घेत आहे. यापुढेही माझे माझ्या परीने यात योगदान रहाणारच !’

(टीप : लिखाण पूर्वीचे असल्यामुळे लिखाणात ‘सच्चिदानंद परब्र्रह्म डॉ. आठवले’ असा उल्लेख न करता ‘परात्पर गुरु डॉ. आठवले’ असा उल्लेख केला आहे. – पू. सुधाकर चपळगावकर)
– (पू.) निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर, संभाजीनगर (१८.६.२०२२)

Leave a Comment