अमरावती येथील सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर (वय ७२ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

अनुक्रमणिका

सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर यांचा साधनाप्रवास पाहूया.

पू. अशोक पात्रीकर

 

‘पू. अशोक पात्रीकर यांनी कोणताही संकोच न बाळगता ‘त्यांचे साधनेत येण्यापूर्वीचे जीवन कसे होते’, हे या लेखात दिले आहे. तेव्हा त्यांची असलेली नकारात्मक वैशिष्ट्ये वाचून ‘अशी व्यक्ती पुढे ‘संत’ होऊ शकते’, हे कुणाला खरे वाटणार नाही; पण त्यांनी ते खरे करून दाखवले आहे. असा आदर्श सर्वांपुढे ठेवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे, तेवढे थोडे ! त्यांची अनेक गुणवैशिष्ट्ये या लेखमालेतून प्रकाशित होणार आहेत. त्यांचा सर्वांना लाभ घेता येईल !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. जन्म ते ८ वर्षे

१ अ. जन्मनाव ‘पुरुषोत्तम’ असूनही वडिलांनी ‘अशोक’ हे नाव ठेवणे

‘फाल्गुन कृष्ण पक्ष द्वितीया, ६.३.१९५० या दिवशी माझा जन्म अमरावती येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. माझे जन्मनाव ‘पुरुषोत्तम’, असे पत्रिकेत नमूद केले आहे; पण माझ्या वडिलांनी ((कै.) वासुदेव नारायण पात्रीकर यांनी) माझे नाव ‘अशोक’ ठेवले. त्याचे कारण मी त्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘आपल्या कुटुंबात शोकाचे प्रसंग पुष्कळ अल्प आले आहेत. दुसरे कारण, म्हणजे अशोक नावाचा एक थोर राजा होऊन गेला.’’ त्यांनी माझे ‘अशोक’ हेच नाव शाळेत घातले आणि त्यामुळे मी व्यवहारासाठी तेच नाव वापरत आहे. त्यांनी स्वकष्टाने बांधलेल्या घराचे नावही ‘अशोक’, असे ठेवले होते. असे असले, तरी माझे घरातील लाडके नाव ‘श्याम’ असे आहे.

१ आ. ‘३ मुलींनंतर मुलगा व्हावा’, यासाठी आईने एका संतांकडून विभूती घेतल्यावर पू. अशोक पात्रीकर यांचा जन्म होणे आणि त्यानंतर त्यांचा विवाह होईपर्यंत त्यांनी आईच्या समवेत त्या संतांच्या दर्शनाला जाणे

मला तीन मोठ्या बहिणी ((कै.) श्रीमती उषा दत्तात्रय टेंभेकर, (कै.) सौ. निशा दत्तात्रय धनागरे आणि सौ. सुलभा भालचंद्र रुद्र) होत्या. त्यामुळे ‘मुलगा व्हावा’, यासाठी माझ्या आईने ((कै.) श्रीमती लीला वासुदेव पात्रीकर यांनी) समर्थ संप्रदायाचे संत पू. फणसाळकर महाराज (अमरावती) यांच्याकडून विभूती आणि प्रसाद घेतला होता. त्यानंतर माझा जन्म झाला.

त्यानंतर आई मला प्रतीवर्षी दासनवमीला त्यांच्या दर्शनासाठी घेऊन जात असे. त्या वेळी ‘अध्यात्म म्हणजे काय ?’, हे कळत नसल्याने ‘आईच्या समवेत महाराजांकडे जाणे आणि त्यांनी दिलेली विभूती अन् ओल्या नारळाच्या गोड वड्या हा प्रसाद घेऊन घरी परत येणे’, असे मी करत असे. माझ्या जन्मानंतर मला आणखी एक बहीण (सौ. स्वाती कमलनयन शिरोळकर) झाली. नोकरीसाठी अमरावतीला असेपर्यंत आणि माझा विवाह होईपर्यंत मी पू. फणसाळकर महाराज यांच्याकडे आईच्या समवेत प्रतीवर्षी जायचो.

१ इ. लहानपणापासून चारचाकी वाहनात बसण्याची आवड असणे आणि शेजारच्यांकडे जाऊन त्यांच्या बंद गाडीत बसणे

मी ४ – ५ वर्षांचा असल्यापासून मला चारचाकी वाहनात बसण्याची पुष्कळ आवड होती. (ती आवड मला आजही आहे.) त्या काळी चारचाकी फारच अल्प जणांकडे असायची. अमरावतीला आमच्या शेजारी रहाणार्‍या श्री. नाशिककर यांच्या घरी एक बंद स्थितीतील चारचाकी होती. मी प्रतिदिन तिच्यात जाऊन बसायचो. माझ्या बहिणी तेथे येऊन मला तेथून घरी घेऊन जायच्या. वर्ष २०१७ मध्ये मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी आलो असतांना एका अपरिचित वयस्कर महिलेने मला ‘तू श्याम पात्रीकर ना रे ?’, असे विचारले. त्यावर मी ‘हो’ म्हटल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘मी अमरावतीच्या नाशिककर यांची मुलगी आहे. तू लहानपणी आमच्या बंद चारचाकीत येऊन बसायचा.’’ साधारण ६५ वर्षांनंतरही त्या काकूंनी मला ओळखले. तेव्हा मला आश्चर्य वाटले. मला तर काहीच आठवत नव्हते.

१ ई. प्रतीवर्षी घरी श्रीरामनवमी साजरी होणे आणि वडिलांनी प्रतीवर्षी गुरुचरित्र वाचल्यावर दुसर्‍या दिवशी सत्यनारायणाची पूजा केली जाणे

माझे वडील दत्तभक्त होते आणि ‘श्रीराम’ हे आमचे कुलदैवत आहे. ते प्रतिदिन देवपूजा करायचे. प्रतीवर्षी आमच्या घरी श्रीरामनवमी साजरी केली जायची. दुपारी १२ वाजता श्रीरामजन्माच्या वेळी आरती व्हायची. नंतर पंजिरीचा (टीप) प्रसाद घेऊन जेवण करायचे. माझे वडील प्रतीवर्षी गुरुचरित्र वाचायचे आणि दुसर्‍या दिवशी घरी सत्यनारायणाची पूजा असायची. तेव्हा आम्ही परिसरातील सर्वांना तीर्थप्रसादासाठी बोलवायचो. एवढेच कर्मकांडातील सोहळे आमच्या घरी साजरे व्हायचे.

टीप – यात धन्याची पूड करून तिच्यामध्ये गूळ किंवा साखर घालून ते सर्व पदार्थ एकत्रित केले जातात.

१ उ. वडिलांचे स्थानांतर अमरावतीहून नागपूरला झाल्यावर इयत्ता तिसरीपर्यंतचे शिक्षण नागपूर येथे होणे

वडील शासनाच्या बांधकाम विभागात काही वर्षे ‘अभियंता’ या पदावर होते. नंतर काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी त्याच विभागात रेखाचित्र (drawing) शाखेत नोकरी केली. माझ्या जन्मानंतर वडिलांचे स्थानांतर (बदली) अमरावती येथून नागपूर येथे झाले. माझे इयत्ता तिसरीपर्यंतचे शिक्षण नागपूर येथे झाले. नागपूरला असतांना मी ८ वर्षांचा झाल्यावर माझी मुंज झाली.

१ ऊ. कुटुंबाच्या समवेत मुंबईला गेल्यावर मार्ग विसरणे आणि त्या वेळी लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे धीटपणे देता येणे

मी ८ वर्षांचा असतांना कुटुंबासहित मुंबई पहाण्यासाठी गेलो होतो. तिथे खेळायला गेल्यावर मी मार्ग विसरलो. त्या वेळी मी रडू लागल्यावर काही लोकांनी मला त्याविषयी विचारले. तेव्हा मी त्यांच्या प्रश्नांची धीटपणे उत्तरे दिली, तसेच आम्ही ज्या विश्रामालयात (हॉटेलमध्ये) उतरलो होतो, त्याचा पत्ता मी त्यांना सांगितला, ही देवाचीच कृपा ! नंतर घरचे सर्व जण तेथे येऊन मला घेऊन गेले.

 

२. वय ९ ते २० वर्षे

२ अ. आई-वडिलांनी चांगले संस्कार करणे

वडिलांचे नागपूरनंतर पुन्हा अमरावतीला स्थानांतर झाल्याने माझे इयत्ता चौथीपासून स्थापत्य शाखेतील पदविकेपर्यंतचे शिक्षण अमरावती येथे झाले. नोकरी लागल्यानंतर पुढील ९ वर्षे मी अमरावती येथेच होतो. मी १२ वर्षांचा होईपर्यंत आई-वडील आम्हा भावंडांकडून तिन्हीसांजेला शुभं करोती आणि रामरक्षा म्हणवून घ्यायचे, तसेच पाढ्यांचे पाठांतर करवून घ्यायचे.

२ आ. वडिलांनी श्राद्धपक्ष न करणे आणि सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केल्यावर आई-वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे श्राद्धपक्ष करणे

प्रतीवर्षी पितृपक्षात शेजार्‍यांकडे श्राद्ध होत असे. थोडे कळायला लागल्यावर मी वडिलांना विचारले, ‘‘आपल्या घरी श्राद्ध का करत नाहीत ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘आपले पूर्वज खाऊन-पिऊन सुखी होते. त्यामुळे आपण श्राद्ध करत नाही.’’ वडील पितृपक्षातील अमावास्येला केवळ एका ब्राह्मणाला घरी बोलावून त्यांना दही आणि पेढे यांचा नैवेद्य दाखवायचे.

मी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केल्यावर आणि आई-वडील यांच्या मृत्यूनंतर आम्ही त्यांचे श्राद्ध करत होतो. ‘साधनेत प्रगती झाल्यामुळे आता श्राद्ध करायची आवश्यकता नाही’, असे एका संतांनी सांगितल्यावर आम्ही ते बंद केले.

२ इ. घरी न सांगता चित्रपट पहायला गेल्याने आई-वडिलांनी मारणे आणि त्यानंतर चित्रपट पहाणे बंद करणे

मी १० वर्षांचा असतांना अमरावतीला एका परिचिताच्या समवेत घरी न सांगता चित्रपट पहायला गेलो होतो. आल्यानंतर आई-वडिलांनी मला पुष्कळ मारले. त्याचा परिणाम म्हणून की काय, त्यानंतर मी चित्रपट पहाणे बंद केले आणि तेव्हापासून आतापर्यंत मी चित्रपट पहायला गेलो नाही.

२ ई. निवासाच्या बाजूला एका कुटुंबाच्या घरी प्रत्येक गुरुवारी पंचपदी भजन असणे आणि तेथे भजनाला जात असल्याने भजनाची गोडी लागणे

वडिलांचे अमरावतीला स्थानांतर झाल्यावर आम्हाला निवासासाठी शासकीय निवासस्थान मिळाले होते. तेथे प्रतीवर्षी गणेशोत्सव साजरा केला जायचा. आमच्या निवासाजवळील एका कुटुंबाच्या घरी प्रत्येक गुरुवारी पंचपदी भजन असायचे. मी भजनाला जात असे आणि कधी कधी ते काका सांगतील, ते भजन त्यांच्या वहीत पाहून म्हणत असे. तेव्हापासून मला भजनाची थोडी गोडी लागली. माझ्या आईला भजनाची आवड होती.

२ उ. वडीलांचे निधन

वडील निवृत्तीनंतरही ‘इमारतीच्या बांधकामांचे नकाशे काढणे आणि प्रत्यक्ष बांधकामे करणे’, ही कामे वयाच्या ८२ व्या वर्षापर्यंत करत होते. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचे अल्पशा विकाराने निधन झाले.

२ ऊ. घराचे नाव ‘अशोक’ आणि परिसराचे नाव ‘श्यामनगर’ असल्याने दोन्ही नावांचा योग देवाच्या कृपेने जुळून येणे

माझा भाचा (श्री. हेमंत दत्तात्रेय टेंभेकर) काही दिवस आमच्याकडे शिकायला होता. तो मला ‘मामा’ म्हणायचा; म्हणून नगरातील सर्व मला ‘श्याममामा’ म्हणत. आमचे घर ज्या परिसरात होते, त्या भागात श्यामबाबा नावाचे एक साधू रहायचे. त्यामुळे त्या परिसराचे नावही ‘श्यामनगर’ असेच होते. त्यामुळे मी ‘नगरमामा’ झालो होतो; म्हणजे घराचे नाव ‘अशोक’ आणि नगराचे नाव ‘श्यामनगर’, अशा माझ्या दोन्ही नावांचा योग देवाच्या कृपेने जुळून आला होता.

२ ए. माध्यमिक शिक्षण घेतांना नावडत्या विषयात प्रवेश मिळाल्याने व्यसनी विद्यार्थ्यांशी मैत्री होऊन अभ्यासात मागे पडणे अन् अकराव्या इयत्तेत दुसर्‍या श्रेणीत उत्तीर्ण होणे

विद्यार्थीदशेत मी एक सामान्य विद्यार्थी होतो. सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शाळेने माझी ‘जीवशास्त्र’ (biology) या विषयासाठी निवड करून त्या शाखेत प्रवेश दिला. माझ्या वडिलांची ‘मी आधुनिक वैद्य (डॉक्टर) व्हावे’, अशी इच्छा नव्हती; कारण आधुनिक वैद्य असलेला माझा एक चुलत भाऊ लहान वयात मृत्यू पावला होता. त्यामुळे वडिलांनी शिक्षण विभागातील अधिकार्‍यांना भेटून मला गणित-विज्ञान शाखेत प्रवेश मिळवून दिला. मला गणित हा विषय कठीण वाटायचा; पण त्या काळी वडिलांच्या समोर बोलायचे धैर्य नसायचे. गणित या विषयात मन लागत नसल्याने मी काही व्यसनी विद्यार्थ्यांशी मैत्री केली. त्याचा वाईट परिणाम होत गेला आणि मी अभ्यासात मागे पडत गेलो. दहावीत असतांना मला अनुकृती (कॉपी) करतांना पकडले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी माझ्या घरी ही वार्ता कळवली आणि मला दहा रुपये दंड केला. त्या वार्तेने मी वडिलांच्या हातचा मार खाल्ला. नंतर मी थोडा सावरलो आणि अकराव्या इयत्तेत दुसर्‍या श्रेणीत उत्तीर्ण झालो. मी अकरावीत असतांना वडील निवृत्त झाल्याने आम्हाला शासकीय निवासस्थान सोडावे लागले. तोपर्यंत वडिलांनी स्वतःचे घर बांधले होते. त्या घरात आम्ही रहायला गेलो.

२ ऐ. तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेतल्यावर पान आणि तंबाखू खाण्याचे व्यसन लागणे अन् त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण-नागबळी हा विधी केल्यावर पत्नीने व्यसन सोडायला सांगितल्यावर देवाच्या कृपेने ते सोडू शकणे

मी अकरावी उत्तीर्ण होईपर्यंत वडील निवृत्त झाले होते. तेव्हा दोन बहिणींचे विवाह शेष असल्याने आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. ‘मी लवकर नोकरी करून आर्थिक भार उचलावा’, यासाठी त्यांनी मलाही स्थापत्य शाखेत पदविका अभ्यासक्रमासाठी तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घ्यायला लावला. घरापासून तंत्रनिकेतन ५ कि.मी. अंतरावर होते. पहिले वर्ष मी बसने जात असे. दुसर्‍या वर्षी वडिलांनी हप्त्याने पैसे देत मला सायकल घेऊन दिली. तंत्रनिकेतनमध्ये असतांना मला पान आणि तंबाखू खाण्याचे व्यसन लागले. ते व्यसन मी नोकरीत असेपर्यंत होते. नोकरीत खामगाव (जिल्हा बुलढाणा) येथे असतांना वर्ष १९८९ मध्ये आम्ही त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण-नागबळी हा विधी केल्यावर पत्नीने मला ते व्यसन सोडायला सांगितले आणि देवाच्या कृपेने मी ते सोडू शकलो.

२ ओ. अभ्यासासाठी जागरण होत असल्याने झोप न येण्याच्या गोळ्या घेणे, त्यामुळे शरिरातील उष्णता वाढणे आणि कर्मकांडातील उपायांच्या समवेत होमिओपॅथीचे औषध घेतल्याने तो त्रास पूर्णपणे न्यून होणे

मी तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेत असतांना अभ्यासासाठी मला रात्री जागरण करावे लागायचे. जागरण होत नसल्याने मी काही मित्रांच्या समादेशाने (सल्ल्याने) झोप न येण्याच्या गोळ्या घेऊ लागलो. पदविकेची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्या गोळ्यांचा दुष्परिणाम होऊन माझ्या शरिरातील उष्णता वाढून त्वचेवर फोड आले. बरीच औषधे घेऊनही मला गुण येत नव्हता. तेव्हा आईने कुणाला तरी विचारून कर्मकांडातील उपाय केले. त्या समवेत मी होमिओपॅथीचे औषध घेतल्याने माझा तो त्रास पूर्णपणे न्यून झाला.

२ औ. शिक्षण घेत असतांना व्यायामाचे महत्त्व समजल्यावर सूर्यनमस्कारादी व्यायामाला प्रारंभ करणे

त्याच काळात मला व्यायामाचे महत्त्व कळले आणि मी प्रतिदिन व्यायाम करू लागलो. माझ्या दुसर्‍या क्रमांकाच्या बहिणीचे पती श्री. दत्तात्रेय नारायण धनागरे हे प्रतिदिन अंघोळीपूर्वी व्यायाम करायचे. त्यामुळे मला प्रोत्साहन मिळून मीसुद्धा घरी सूर्यनमस्कारादी व्यायामाला आरंभ केला. विवाह झाल्यावरही काही दिवस ते प्रयत्न होत होते. नंतर नोकरीमुळे वेळ मिळत नसे. त्यामुळे माझा व्यायाम बंद झाला.

 

पू. अशोक पात्रीकर आणि सौ. शुभांगी पात्रीकर

 

३. वय २० ते ४६ वर्षे

३ अ. नोकरी

३ अ १. नागपूरजवळ असलेल्या पेंच (नदीचे नाव) प्रकल्पाच्या ठिकाणी नोकरी करणे आणि ते ठिकाण घरापासून लांब असल्याने वडिलांनी अमरावतीजवळ नोकरीला लावण्यासाठी प्रयत्न करणे

‘पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर मी नोकरीसाठी प्रयत्न चालू केले. वडील मला नोकरीसाठी विविध ठिकाणी अर्ज करायला लावायचे. त्या काळात अभियंत्याची नोकरी मिळणे फारसे कठीण नव्हते; पण ती मला मिळत नव्हती; म्हणून काही दिवस मी एका बांधकाम व्यावसायिकाकडे नोकरी केली. नंतर मी नागपूरजवळ असलेल्या पेंच प्रकल्पाच्या ठिकाणी ८ मास ‘तांत्रिक साहाय्यक’ या पदावर नोकरी केली. नोकरीचे ठिकाण घरापासून लांब असल्याने वडिलांचे मला अमरावतीजवळ नोकरीला लावण्याचे प्रयत्न चालू होते. मला एका ठिकाणच्या नोकरीसाठी मुलाखतीचे पत्र टपालाने (पोस्टाने) अमरावतीच्या पत्त्यावर आले. ‘त्या मुलाखतीसाठी मला कार्यालयाकडून सुटी मिळावी’, यासाठी वडिलांनी मला ‘आईची प्रकृती गंभीर आहे. लवकर ये’, अशी तार पाठवली. त्या पूर्वी त्यांनी मला पत्र पाठवले होते, ‘मी तुला आईच्या प्रकृतीविषयी तार करत आहे. त्यामुळे तुला सुटी मिळेल.’ माझे नोकरीचे ठिकाण शहरापासून लांब एका खेड्यात असल्याने ते पत्र मिळण्यापूर्वी मला तार मिळाली. त्यामुळे मी घाबरून धावत अमरावतीला गेलो आणि तिथे गेल्यावर सर्व खुलासा झाला.

३ अ २. पेंच प्रकल्पाच्या ठिकाणाहून नदीतून तराफ्यावरून परततांना तराफा उलटल्याने नदीत पडणे आणि देवाच्या कृपेने नावाड्याने बाहेर काढणे

पेंच प्रकल्पाच्या ठिकाणी प्रकल्पावर जायला पेंच नदी ओलांडावी लागायची. पावसाळ्यात नदीला पूर असतांना दोन रिकामी पिंपे जोडून केलेला तराफा वापरला जायचा. एकदा कामावरून परत निघतांना काही कर्मचारी घाईत आले आणि गर्दी करत आम्ही बसलेल्या तराफ्यावर चढले. त्यामुळे तराफा उलटला आणि बसलेले आम्ही सर्व कर्मचारी नदीत पडलो. मला पोहता येत नसल्याने मी पाण्यात एक डुबकी मारली. तेवढ्यात नावाड्याने मला बाहेर काढले. ही देवाचीच कृपा !

३ अ ३. ‘जीवन प्राधिकरण’ विभागाच्या अकोला कार्यालयात पर्यवेक्षक पदावर नोकरी मिळाल्याचे पत्र मिळणे; परंतु अधिकार्‍याच्या चुकीमुळे ती नाकारली जाणे आणि त्या अधिकार्‍याची भेट घेतल्यावर परत अमरावती कार्यालयात नेमणूक होणे

नंतर मला ‘जीवन प्राधिकरण’ या विभागाच्या अकोला कार्यालयात पर्यवेक्षक (ओव्हरसीअर) पदावर नोकरी मिळाल्याचे पत्र मिळाले. मी त्या पत्राप्रमाणे अकोला येथे गेल्यावर मला कळले की, मी वेळेत न आल्याने माझी नेमणूक रहित केली आहे. मी वेळेपूर्वी पोचलो होतो, तरी एका अधिकार्‍याच्या चुकीमुळे त्यांनी मला नाकारले. त्यानंतर शोध घेत वडिलांच्या समवेत जाऊन मी त्या अधिकार्‍यांची भेट घेतली आणि नंतर त्यांनी माझी नेमणूक अमरावती येथील कार्यालयात केली. काही दिवसांनी माझ्या पदाचे नाव ‘शाखा अभियंता’, असे झाले. नोकरीच्या काळात अमरावतीव्यतिरिक्त मोर्शी (जिल्हा अमरावती), अकोला, खामगाव (जिल्हा बुलढाणा) आणि यवतमाळ या ठिकाणी माझे स्थानांतर झाले.

३ अ ४. मूळव्याधीचा त्रास चालू झाल्याने तिखट पदार्थ खाणे न्यून होणे

नोकरीत असेपर्यंत मला पुष्कळ तिखट पदार्थ आवडायचे; पण त्याचा परिणाम म्हणून मला मूळव्याधीचा त्रास चालू झाला. वर्ष २००४ मध्ये माझे मूळव्याधीचे शस्त्रकर्म करावे लागले. त्यानंतर मी तिखट पदार्थ खाणे न्यून केले.

३ अ ५. सहलीला जायची पुष्कळ आवड असणे आणि अष्टविनायक, ज्योतिर्लिंग, अशा देवतांचे दर्शन होऊनही अध्यात्माचे ज्ञान नसल्याने दर्शनापेक्षा सहलीला जाण्याचा आनंद घेणे

नोकरीत असतांना मला सहलीला जायची पुष्कळ आवड होती. कार्यालयातील सहकार्‍यांच्या समवेत आणि विवाह झाल्यावर कुटुंबाच्या समवेत प्रत्येक वर्षी मी कुठेतरी दूर सहलीला जात असे. त्या सहलीत अष्टविनायक, ज्योतिर्लिंग, अशा देवतांचे दर्शनही होत असे; पण अध्यात्माचे काहीच ज्ञान नसल्याने दर्शनापेक्षा ‘सहलीला गेलो’, यातच मी आनंद मानत होतो.

नोकरी लागल्यावर सहकार्‍यांकडे असलेली दुचाकी वाहने मी चालवत असे. वर्ष १९७४ मध्ये वडिलांनी मला काही पैसे दिले आणि वापरलेली (second hand) दुचाकी घ्यायला लावली. त्या दुचाकी वाहनावर आणि अन्य दोन मित्रांच्या दुचाकी वाहनांवर मी आणि माझे ५ मित्र पचमढी (मध्यप्रदेश) येथे सहलीला गेलो होतो.

३ अ ६. एक घर सनातन संस्थेला सेवाकेंद्र म्हणून देण्याचे पुण्यकर्म गुरुकृपेने घडणे

या जन्मीच देवाण-घेवाण हिशोब पूर्ण व्हावा; म्हणून परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने माझ्याकडून अमरावती येथील एक घर सनातन संस्थेला सेवाकेंद्र म्हणून देण्याचे पुण्यकर्म घडले. त्यामुळे ‘माझ्या आध्यात्मिक प्रगतीतील मोठा अडथळा दूर झाला’, असे मला जाणवले. गुरूंनी केलेल्या या कृपेसाठी मी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

३ अ ७.‘देवाने, म्हणजेच परात्पर गुरु डॉक्टरांनी मला व्यसनापासून दूर ठेवले’, हे आता कळते.

३ अ ८. नोकरी करतांना मी मन लावून केलेल्या कामांसाठी माझ्या अधिकार्‍यांच्या प्रशस्तीपत्राप्रमाणे मला दोन वेळा आगाऊ वेतनवाढ मिळाली.

३ आ. वैवाहिक जीवन

३ आ १. पत्नीचा कर्मकांडाकडे पुष्कळ ओढा असणे आणि तिच्यामुळे अष्टविनायक अन् तिरुपति बालाजी यांचे दर्शन होणे

डिसेंबर १९७६ मध्ये माझा विवाह झाला. माझी पत्नी सौ. शुभांगी हिचा कर्मकांडाकडे पुष्कळ ओढा होता. तिच्या घरी महालक्ष्मीपूजन आणि अनेक सण साजरे केले जायचे. त्या तुलनेत आमच्या घरी सण-वार नसल्याने तिला आश्चर्य वाटायचे. तिच्यामुळेच मला अष्टविनायक आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठ ज्योतिर्लिंगे, तसेच तिरुपति बालाजी यांचे दर्शन झाले.

३ आ २. पुत्रप्राप्तीसाठी नारायण-नागबळी हा विधी करण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे जाणे आणि ‘तेथे पोचतांना आलेले अडथळे आध्यात्मिक कारणांमुळे होते’, हे साधनेत आल्यावर कळणे

आम्हाला दोन मुली (६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या संगीत विशारद (सुश्री.(कु.) तेजल पात्रीकर आणि ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अनघा जोशी) होत्या आणि ‘मुलगा व्हावा’, अशी पत्नीची इच्छा होती. त्यामुळे आम्ही खामगाव येथे असतांना तिने स्वामी समर्थ यांच्या संप्रदायानुसार साधनेला आरंभ केला. पत्नीच्या आग्रहानुसार मी स्वामी समर्थ संप्रदायानुसार थोडी थोडी साधना करायला लागलो. त्या वेळी ‘कामनापूर्तीसाठी नारायण-नागबळी करायला हवा’, असे तिला समजले. त्याविषयी तिने मला सांगितले आणि आम्ही तो विधी त्र्यंबकेश्वर येथे जाऊन करून आलो. त्र्यंबकेश्वर येथे हा विधी करायला जातांना पुष्कळ अडथळे आले. नाशिकला दूर पल्ल्याच्या गाडीने (रेल्वेने) रात्री उशिरा पोचलो. पुढे जायला बस नव्हती. दुसर्‍या दिवशी सकाळी विधी असल्याने तेथे रात्रीच पोचणे आवश्यक होते; म्हणून आम्ही ऑटोरिक्शा करून गेलो. उत्तररात्री भर पावसात समोरचे दिसत नसतांना रिक्शाचालकाने आम्हाला त्र्यंबकेश्वरला पोचवले. त्यामुळे नंतरच्या ३ दिवसांचे विधी सुलभपणे झाले. ‘हे अडथळे आध्यात्मिक कारणांमुळे आले होते’, हे आता माझ्या लक्षात येते.

३ आ ३. विधी पूर्ण झाल्यावर पत्नीने शिवशंकराच्या देवळाच्या कळसाकडे पाहून पुत्र होण्याची इच्छा बोलून दाखवणे आणि त्यानंतर मुलाचा जन्म होणे

तिथे तिसर्‍या दिवशी विधी पूर्ण झाल्यावर शिवशंकराच्या देवळात दर्शनासाठी जावे लागते. ‘शिवशंकराच्या देवळाच्या कळसाकडे पाहून मनातील इच्छा बोलून दाखवा. ती पूर्ण होते’, असे पुरोहितांनी सांगितल्यावर पत्नीने पुत्र होण्याची इच्छा बोलून दाखवली. मी मात्र काहीच मागितले नाही. त्यानंतर माझे स्थानांतर यवतमाळ येथे झाले. निखिलचा (मुलाचा) जन्म आम्ही यवतमाळ येथे असतांना झाला. त्यामुळे माझा अध्यात्मावरील विश्वास वाढत गेला.

३ आ ४. मुलगा ५ वर्षांचा होण्यापूर्वी त्याच्यासह त्र्यंबकेश्वरला जाऊन पुन्हा नारायण-नागबळी विधी करणे

‘कामनापूर्ती झाल्यावर ५ वर्षांच्या काळात पुन्हा एकदा नारायण-नागबळी विधी करावा लागतो’, असे आम्हाला पहिल्या वेळीच पुरोहितांनी सांगितले होते. त्यानुसार निखिल ५ वर्षांचा होण्यापूर्वी आम्ही पुन्हा निखिलसह त्र्यंबकेश्वरला जाऊन तो विधी केला.

३ आ ५. अक्कलकोट येथे जाऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेणे आणि स्वामींनीच सनातनच्या माध्यमातून साधना करण्याची प्रेरणा दिल्याचे लक्षात येणे

त्यानंतर कुटुंबासह सहलीला गेलो असतांना स्वामी समर्थांचे स्थान असलेल्या अक्कलकोट येथे जाऊन त्यांचे दर्शन घेतले आणि तेथील महाप्रसाद घेतला. ‘आम्हाला सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करण्याची प्रेरणा स्वामी समर्थांनीच दिली’, हे माझ्या नंतर लक्षात आले.’

३ इ. घरात सापाची लहान लहान पिल्ले निघणे, ज्योतिषाने वारूळाची पूजा करण्यास सांगितल्यावर पिल्ले निघणे आपोआप बंद होणे आणि तो पूर्वजांचा त्रास असल्याचे साधनेत आल्यावर लक्षात येणे

‘साधनेत येण्यापूर्वी आम्ही यवतमाळ येथे भाड्याच्या घरात रहात होतो. तेथे नेहमी सापाची लहान लहान पिल्ले निघायची. आधी मी त्यांना मारायचो; पण पत्नीने एका ज्योतिषाला विचारल्यावर त्याने नागपंचमीला वारूळाची पूजा करायला सांगितली. तसे केल्यावर सापाची पिल्ले निघणे आपोआप बंद झाले. त्यानंतर आम्हाला पूर्वजांच्या त्रासाची लक्षणे जाणवली नाहीत. त्यामागील कार्यकारणभाव मला त्या वेळी कळत नव्हता. ‘तो कदाचित् पूर्वजांचा त्रास असेल’, हे आता साधनेत आल्यावर कळते.

३ ई. काही छंद

३ ई १. विनोदी दिवाळी अंक वाचायला आणि विनोदी चित्रपट पहायला आवडणे

आधीपासूनच मला दुःख असलेल्या कथा-कादंबर्‍या वाचायची आवड नव्हती. मी चित्रपट न पहाण्याचे हेही एक कारण होते. मला विनोदी साहित्य (कथा-कादंबर्‍या) वाचायची आवड होती आणि आताही काही प्रमाणात आहे. दिवाळी अंकांपैकी मी केवळ विनोदी दिवाळी अंक घेऊन वाचत असे आणि काही विनोदी चित्रपट पहात असे. ‘भावनाशीलता’ या स्वभावदोषामुळे मला कुणाचेही दुःख अजूनही ऐकवत नाही आणि पहावतही नाही.

३ ई २. भजने आणि चित्रपट गीते म्हणायला अन् नाट्यगीते ऐकायला आवडणे

लहानपणी मला भजने म्हणायला आवडायचे; पण नंतर नोकरीतील व्यस्ततेमुळे माझे त्या छंदाकडे दुर्लक्ष झाले. नोकरीत माझ्या एका मित्राने त्याचा ग्रामोफोन आणि तबकड्या माझ्या अमरावतीच्या घरी ठेवल्या होत्या. तबकड्यांमध्ये नाट्यगीतांच्या काही तबकड्या होत्या. त्या मी कधी कधी ऐकायचो. त्यामुळे मला नाट्यपदे ऐकणे आवडू लागले. त्या काळात काही संगीत नाटके यायची. तीही मी पहात असे. मी चित्रपट पहात नसलो, तरी चित्रपटातील गाणी गुणगुणायला मला आजही आवडते. माझ्या वडिलांच्या काळातील के.एल्. सेहेगल या गायकाची गाणी वडिलांना आवडायची. नंतर त्यांची गीते मलाही आवडू लागली. त्यांच्या गाण्यांची एक ध्वनीफीत मी संग्रही ठेवली होती.

 

बसलेले डावीकडून पू. अशोक पात्रीकर आणि सौ. शुभांगी पात्रीकर मागे उभे असलेले डावीकडून कु. तेजल पात्रीकर, श्री. निखिल पात्रीकर, श्री. शशांक जोशी आणि सौ. अनघा शशांक जोशी

 

४. वय ४७ ते ७२ वर्षे

४ अ. सनातन संस्थेशी संपर्क आणि साधनेला आरंभ

सौ. नमिता निखिल पात्रीकर
४ अ १. परात्पर गुरु कालिदास देशपांडे यांनी घरी येऊन साधनेविषयी सांगणे आणि त्यांनी नामजपाच्या संदर्भात सांगितल्यावर कुलदेवाचा जप अधिकाधिक करू लागणे

मी नोकरीच्या काळात यवतमाळ येथे असतांना वर्ष १९९७ मध्ये माझा सनातन संस्थेशी संपर्क आला. त्या वेळी मी रहात होतो, त्या बालाजी वसाहतीच्या भागातच परात्पर गुरु कालिदास देशपांडेकाकांचे घर होते. माझ्या पत्नीच्या आग्रहामुळे ते आमच्या घरी येऊन मला साधनेविषयी सांगत. मी त्यांचे बोलणे ऐकून घेत असे; मात्र त्याप्रमाणे कृती करत नसे. ते मला ‘कुलदेवतेचा नामजप करा. नामजपाला स्थळ, काळ आणि वेळ यांचे बंधन नाही. बसमधून येता-जाता जप केला, तरी तुमची साधना होणार’, असे सांगत. तोपर्यंत मला ‘देवाचे काही करायचे, तर देवासमोर बसायलाच हवे’, असे वाटत असे. त्यामुळे सनातन संस्थेने सांगितलेली ही गोष्ट मला वैशिष्ट्यपूर्ण वाटली. त्यांनी कुलदेवतेच्या नामाचे महत्त्व सांगितल्यावर ‘आमचे कुलदैवत श्रीराम आहे’, हे ठाऊक असल्याने मी ‘श्रीरामाय नमः ।’ हा नामजप अधिकाधिक करण्याचा प्रयत्न केला.

४ अ २. एका नातेवाइकाने ‘पात्रीकरांची कुलदेवता ‘रेणुकादेवी’ आहे’, असे सांगणे आणि त्यानंतर सनातनच्या साधकांनी सांगितल्याप्रमाणे कुलदेवतेच्या दर्शनासाठी माहूरला जाणे

साधनेत आल्यावर ‘आपली कुलदेवताही असावी’, असे माझ्या पत्नीला वाटत असे. त्यानुसार तिने माझ्या आईला त्याविषयी विचारले; पण तिला ते ठाऊक नव्हते. माझे एक नातेवाईक आईला प्रथमच भेटायला आले होते. पत्नीने त्यांना कुलदेवतेविषयी विचारले. तेव्हा त्यांनी ‘पात्रीकरांची कुलदेवता ‘रेणुकादेवी’ आहे’, असे सांगितले. त्या वेळी आम्हा सर्वांना पुष्कळ आनंद झाला आणि आमचा अध्यात्मावरील विश्वास वाढला. त्यानंतर सनातनच्या साधकांनी सांगितल्यानुसार आम्ही कुलदेवतेच्या दर्शनासाठी माहूरला जाऊन आलो. त्या पूर्वी साधनेत नसतांना एकदा माझे आई-वडील यवतमाळला आले असतांना आम्ही त्यांना घेऊन माहूरला गेलो होतो; पण तेव्हा ‘हीच आमची कुलदेवता आहे’, हे आम्हाला ठाऊक नव्हते. त्यानंतर निखिलचा (मुलाचा) विवाह झाल्यावर त्याच्या पत्नीसह (सौ. नमिता निखिल पात्रीकर हिच्यासह) आम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला गेलो होतो.

४ अ ३. पत्नी आणि मुली यांनी सनातनच्या सत्संगाला जाणे; पण नोकरीतील व्यस्ततेमुळे सत्संगाला जायला मिळत नसणे

आमच्या शेजारच्या घरात सनातनचा साप्ताहिक सत्संग होत असे. त्या सत्संगाला माझी पत्नी सौ. शुभांगी, मुली कु. तेजल (कु. तेजल पात्रीकर, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) आणि कु. मीनल (आताच्या सौ. अनघा शशांक जोशी, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) जात असत. ‘मीही सत्संगाला यावे’, असा पत्नीचा आग्रह असायचा; पण नोकरीमुळे मला ते शक्य होत नसे.

४ अ ४. ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन आणि वैयक्तिक साधना’ हा ग्रंथ अन् साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ यांचे वाचन करणे

माझ्या पत्नीने सनातनचा ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन आणि वैयक्तिक साधना’ हा ग्रंथ विकत घेऊन मला वाचायला दिला. त्याच वेळी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ चालू झाले होते. मी वेळ मिळेल, तसे त्याचे वाचन करत असे. ‘साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करणे’, हा एक सत्संग होता’, हे मला नंतर कळले.

४ अ ५. यवतमाळहून अमरावती येथे स्थानांतर झाल्यावर बाहेरगावी जाऊन काम करण्याऐवजी कार्यालयीन कामकाज करण्याचा प्रस्ताव नकळत स्वीकारला जाणे आणि त्यामुळे ठराविक वेळी काम अन् उर्वरित वेळी साधना करता येणे

वर्ष १९९८ मध्ये यवतमाळ येथील माझ्या नोकरीचा ८ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे माझे स्थानांतर (बदली) होणे क्रमप्राप्त होते. यवतमाळ येथे असतांना माझ्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी (कार्यकारी अभियंत्यांनी) माझ्याकडून एक नाविन्यपूर्ण बांधकाम करवून घेतले होते. तशाच पद्धतीचे बांधकाम अमरावती जिल्ह्यात एका ठिकाणी करायचे निश्चित झाले. तेच वरिष्ठ अधिकारी अमरावती येथे ‘अधीक्षक अभियंता’ या पदावर रुजू झाल्याने त्यांनी ‘माझे स्थानांतर तेथे व्हावे’, असे वरिष्ठांना (मुख्य अभियंत्यांना) सांगितले. त्यानुसार माझे स्थानांतर अमरावती येथे त्यांच्या कार्यालयात करण्याचे ठरले. त्या कामासाठी पुन्हा मला बाहेरगावी जावे लागले असते. मला काम करायची आवड असल्याने मी त्यांचा निर्णय आनंदाने स्वीकारला. अकस्मात् अमरावती येथील मुख्य अभियंत्यांनी ‘त्यांच्या कार्यालयातील काम मी करावे’, असा प्रस्ताव मांडला. ‘या प्रस्तावाचा स्वीकार करायचा कि नाही ?’, हा निर्णय त्यांनी माझ्यावरच सोपवला. मी त्यांना प्रत्यक्ष भेटल्यावर त्यांनी माझी स्वीकृती विचारली आणि त्या क्षणी देवाने माझ्या मुखातून ‘होकार’ वदवून घेतला. हाच तो कलाटणीचा क्षण होता. त्या क्षणी मी नकार दिला असता, तर मी साधनेत येऊ शकलो नसतो. ‘मला साधनेत आणण्यासाठी देवाने हे सर्व घडवले’, हे माझ्या आता लक्षात येते. त्यासाठी मी देवाच्या, म्हणजेच परात्पर गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञ आहे. या कार्यालयात मी केवळ सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत उपस्थित रहाणे अपेक्षित होते. त्यामुळे उर्वरित वेळ मी साधनेसाठी देऊ शकलो.

४ आ. सेवेचा आरंभ आणि केलेल्या विविध सेवा

४ आ १. आरंभी कुटुंबातील सदस्यांना साहाय्य करता करता स्वतःही विविध सेवा करू लागणे आणि प्रत्येक सेवा करतांना अनुभूती आल्याने अध्यात्माकडील कल वाढणे

आरंभी ‘कुटुंबातील सदस्यांना सत्संगासाठी दुचाकीने पोचवणे आणि आणणे’, असे मी करायचो. नंतर मी स्वतः सत्संगाला जाऊ लागलो. असे करत करत मला जिल्ह्याच्या ग्रंथसाठ्याची सेवा मिळाली. आरंभी उत्तरदायी साधकांनी मला या सेवेविषयी विचारल्यावर मी त्यांना ‘नंतर सांगतो’, असे सांगितले. नंतर पत्नी आणि मुली यांनी मला सांगितले, ‘‘अध्यात्मात कोणत्याही सेवेला ‘नाही’ म्हणायचे नसते. तुम्ही ‘हो’ म्हणा. जेव्हा गुरु एखादी सेवा करायला सांगतात, तेव्हा ते ती सेवा करण्यासाठी आवश्यक ते ज्ञान आणि शक्तीही देतात. आम्ही तुम्हाला साहाय्य करू.’’ तेव्हा देवाने माझ्याकडून ‘हो’ म्हणवून घेतले. या काळात मी ‘साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार बनवणे, साप्ताहिकाच्या अंकांचे वितरण करणे, तसेच ग्रंथप्रदर्शन लावणे’ इत्यादी सेवाही करत होतो. याच कालावधीत संस्थेच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात लहान सभांचे आयोजन करण्यात येत होते. मला या सभांच्या ठिकाणी ग्रंथसाठा देण्याची सेवा करण्याची संधी मिळाली. ही सेवाही मी आनंदाने स्वीकारली. प्रत्येक सेवा करतांना मला अनुभूती येत होत्या आणि देवाच्या कृपेने हळूहळू माझा अध्यात्माकडील कल वाढत होता. वर्ष १९९८ मध्ये माझे स्थानांतर (बदली) अमरावती येथे झाले. त्यानंतर माझ्या साधनेला गती मिळत गेली.

४ आ २. प्रवचने, सत्संग आणि भाववृद्धी सत्संग घेण्याची सेवा करणे

मला लोकांसमोर बोलायची सवय नव्हती. साधनेत आल्यावर उत्तरदायी साधकांनी मला ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या प्रवचनातील काही भाग जिज्ञासूंसमोर मांडायला सांगितला आणि गुरुकृपेने मी तो विषय मांडला. त्यानंतर कधी कधी मी सत्संग घेत होतो. परात्पर गुरु देशपांडेकाकांनी मला भाववृद्धी सत्संग घ्यायला सांगितला. गुरुकृपेने तोही मला घेता आला.

४ आ ३. दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू झाल्यावर मुंबई आणि मिरज येथे राहून दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करणे

वर्ष १९९९ मध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू झाले आणि त्याची विदर्भ आवृत्ती चालू करण्याचेही निश्चित झाले. या सेवेसाठी विदर्भातील साधकांना विचारणा होत होती. मला चारचाकी वाहन चालवायला पुष्कळ आवडत असे. त्यामुळे मी ‘वाहनचालक’ या सेवेसाठी माझे नाव दिले. नंतर मला संपादकीय विभागात सेवा करण्यासाठी विचारल्यावर मी त्यालाही होकार दिला. मुंबई येथील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या आवृत्तीची सिद्धता चालू असतांना मला मुंबईला प्रशिक्षणासाठी जाण्याची संधी मिळाली. तिथे ४ मास सेवा केल्यानंतर मी काही दिवस अमरावतीला जाऊन आलो. नंतर मला मिरज येथील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या सेवेसाठी जाण्याची संधी मिळाली.

४ इ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या भेटीची ओढ वाटणे

श्री. प्रकाश जोशीकाका विदर्भात प्रसारासाठी यायचे आणि कधी कधी अमरावतीला आमच्या घरी थांबायचे. त्यांच्याकडून परात्पर गुरु डॉक्टरांविषयीची सूत्रे ऐकतांना मला पुष्कळ आनंद व्हायचा आणि ‘आपण परात्पर गुरु डॉक्टरांच्या भेटीला कधी जाणार ?’, असे मला वाटायचे.

४ ई. साधनेत आल्यावर त्याग आणि काटकसर यांचे महत्त्व कळल्याने मुलाची मुंज कारंजा येथील दत्ताच्या मंदिरात जाऊन साधेपणाने करणे

साधनेत आल्यावर त्याग आणि काटकसर यांचे महत्त्व कळल्याने निखिलची (मुलाची) मुंज आम्ही कारंजा (जिल्हा वाशिम) येथील दत्ताच्या मंदिरात जाऊन साधेपणाने केली आणि काही रक्कम गुरुचरणी अर्पण केली. त्या वेळी ‘सर्व बहिणींना बोलवावे’, अशी आईची इच्छा होती; पण मी तिचा विरोध पत्करून देवालयात मुंज केली.

४ उ. एकदा ‘ऐसी माझी भक्ती देवा…’ हे भजन म्हणणे आणि ‘आजही या भजनाप्रमाणेच आपली स्थिती आहे’, असे वाटणे

लहानपणापासून मला भजने गुणगुणायला आवडायची. साधनेत आल्यावर एकदा साधकांनी मला कोजागिरीच्या कार्यक्रमात भजन म्हणायला सांगितले. तेव्हा मी ‘ऐसी माझी भक्ती देवा…’ हे प.पू. भक्तराज महाराज यांचे भजन म्हटले होते. हे भजन मला अद्यापही आवडते आणि असे वाटते, ‘या भजनातील प्रत्येक कडव्यात वर्णन केल्याप्रमाणे आजही माझी स्थिती आहे.’

४ ऊ. गोवा येथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा मिळालेला अनमोल सत्संग !

४ ऊ १. गोवा येथील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात शिकण्यासाठी जाण्याची संधी मिळणे आणि लिखाण पडताळतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी व्याकरणाच्या किंवा वाक्यरचनेच्या चुका एका क्षणात दाखवणे

‘वर्ष १९९९ च्या शेवटी मी मिरज येथे असतांना मला गोवा येथील ‘सुखसागर’ येथे असलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात शिकण्यासाठी जाण्याची संधी मिळाली. दोन मास मी गोवा येथील दैनिक कार्यालयात सेवा केली. त्या वेळी मला प्रतिदिन दैनिकाच्या पृष्ठ ३ चे लिखाण परात्पर गुरु डॉक्टरांकडून पडताळून घेण्याची सेवा मिळाली होती. एकदा परात्पर गुरु डॉक्टर अन्य सेवांमध्ये व्यस्त होते; म्हणून मी त्यांना पृष्ठ ३ वरील वृत्ते दाखवायला उशीर केला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘मी कितीही व्यस्त असलो, तरी दैनिकाची पाने पडताळून घ्यायला तुम्ही केव्हाही येत जा.’’ दैनिकाच्या पानावरील लिखाण पडताळतांना माझ्याकडून झालेल्या व्याकरणाच्या किंवा वाक्यरचनेच्या चुका परात्पर गुरु डॉक्टर एका क्षणात दाखवत असत. तेथे प्रत्येक गुरुवारी परात्पर गुरु डॉक्टर आणि डॉ. (सौ.) कुंदाताई सर्व साधकांचा स्वभावदोष-निर्मूलन सत्संग घ्यायचे. त्यात परात्पर गुरु डॉक्टर साधकांच्या चुका सांगायचे, तसेच चांगली सेवा करणार्‍यांचे कौतुकही करायचे. मला मात्र माझ्यातील स्वभावदोषांमुळे ‘सत्संगात माझ्या चुका सांगतील का ?’, अशी भीती वाटायची.

४ ऊ २. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कक्षासमोर बसणार्‍या एका साधिकेने पटलावर परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र ठेवणे आणि त्यांचे अनेक वेळा दर्शन होत असूनही साधिकेच्या या कृतीमागील कारण न कळणे

‘सुखसागर’ येथे परात्पर गुरु डॉक्टरांच्या कक्षासमोर एक साधिका बसायच्या. त्यांच्या पटलावर परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र ठेवले होते. त्या प्रतिदिन छायाचित्राला ताजे फूल वहायच्या. तेव्हा मला आश्चर्य वाटायचे, ‘परात्पर गुरु डॉक्टरांचा कक्ष मागेच आहे. त्यांचे अनेक वेळा दर्शनही होते, तरी या छायाचित्र का ठेवतात ?’ त्या वेळी मला भाव इत्यादी काहीच ठाऊक नव्हते; पण माझ्यातील ‘शिकण्याच्या वृत्तीचा अभाव’ या स्वभावदोषामुळे मी त्यांना तसे करण्यामागील कारण विचारले नाही.

४ ऊ ३. कुणालाही न विचारता उच्च रक्तदाबाची गोळी घेणे बंद केल्याने त्याचा परिणाम प्रकृतीवर होणे आणि आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत यांनी सांगितल्यावर पुन्हा गोळी घेण्यास आरंभ करणे

मला ‘उच्च रक्तदाब’ हा विकार आहे आणि त्यासाठी मला प्रतिदिन एक गोळी घ्यावी लागते. गोवा येथे असतांना माझ्या मनात अहंयुक्त विचार आला, ‘आपण आता साधना करतो. आता गोळी घ्यायची आवश्यकता नाही’; म्हणून मी कुणालाही न विचारता गोळी घेणे बंद केले. त्याचा परिणाम माझ्या प्रकृतीवर झाला. आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत यांच्या ते लक्षात आले. त्यांनी मला सांगितले, ‘‘तुमची साधना तुमच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी न वापरता ते कार्य त्या गोळीला करू द्या; कारण हा विकार तुम्हाला आधीपासून आहे.’’ नंतर मी पुन्हा गोळी घ्यायला आरंभ केला.

४ ऊ ४. परात्पर गुरु डॉक्टरांची अनुभवलेली प्रीती !

मी ‘ट्रॅक्स’ हे चारचाकी वाहन घेऊन गोव्याहून अमरावतीला जायला निघणार होतो. ‘त्या वेळी विदर्भातील दैनिक ‘सनातन प्रभात’ अमरावती येथून प्रकाशित होणार’, असे ठरले होते. दैनिक कार्यालयासाठी लोखंडी मांडण्या आणि काही लाकडी साहित्य न्यायचे होते. ते साहित्य निवडतांना परात्पर गुरु डॉक्टर स्वतः तेथे आले आणि त्यांनी ‘काय काय आवश्यक आहे ?’, हे दाखवून ते साहित्य वाहनात भरायला सांगितले. विदर्भात पिकलेले फणस मिळत नाहीत; म्हणून त्यांनी विदर्भातील जिल्ह्यांतील साधकांसाठीच नव्हे, तर मार्गातील सांगली, पुणे, संभाजीनगर येथील साधकांसाठीही पिकलेले फणस न्यायला सांगितले होते, तसेच त्यांनी या सर्व जिल्ह्यांतील साधकांसाठी कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथून आंबे द्यायला सांगितले. या प्रसंगांतून परात्पर गुरु डॉक्टरांची साधकांवरील प्रीती अनुभवायला मिळाली.

४ ए. पूर्णवेळ साधना करण्यासाठी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेणे

४ ए १. स्वेच्छानिवृत्ती घेऊन पूर्णवेळ साधना करण्याच्या निर्णयाला कुटुंबियांनी पाठिंबा देणे

या कालावधीत मी स्वेच्छानिवृत्ती घेऊन पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला. ‘महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या कु. तेजल आणि मीनल अन् ७ वर्षांचा निखिल यांचे दायित्व आणि निवृत्तीवेतनाविना अन्य आर्थिक स्रोत नाही’, अशा अवस्थेतही घरचे सर्व सदस्य साधनेत असल्याने मला कुणाकडूनही विरोध झाला नाही. आईचा थोडा विरोध होता; पण मी निर्णय घेतल्यावर तिने काही म्हटले नाही.

४ ए २. स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेणे; परंतु पदोन्नती सूचीत नाव असल्याने ‘हा निर्णय मागे घ्यावा’, असा आग्रह वरिष्ठांनी करणे आणि गुरुकृपेने या निर्णयावर ठाम रहाता येणे

कुटुंबियांच्या सहमतीने वर्ष १९९९ च्या शेवटी मी स्वेच्छानिवृत्ती घेण्याचे पत्र कार्यालयात दिल्यानंतर माझे नाव पदोन्नती सूचीत असल्याचे मला सांगण्यात आले. ‘मी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा’, असा आग्रह माझ्या वरिष्ठ आणि सहकारी अभियंत्यांनी केला; पण गुरूंच्या कृपेने मला माझ्या निर्णयावर ठाम रहाता आले.

४ ए ३. कार्यालयातील सहकार्‍यांनी सांगितल्याप्रमाणे शेष असलेली सुटी घेऊन तो वेळ सेवेसाठी देणे

स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर माझी ७ – ८ मासांची अर्जित आणि वैद्यकीय सुटी शेष होती. कार्यालयातील सहकार्‍यांनी मला ती उपभोगण्यास सांगितले; कारण ती न घेण्याचा काहीच लाभ होणार नव्हता. त्यामुळे मी सलग ती सुटी घेत गेलो आणि मिरज अन् पनवेल येथे सेवेसाठी गेलो. माझी स्वेच्छानिवृत्ती मंजूर होऊन ‘भविष्य निर्वाह निधी’चा (प्रॉव्हिडंट फंडचा) धनादेश कार्यालयात आल्यावर कार्यालयाने मला मिरजहून बोलावले आणि मी अमरावतीला आल्यावर मला धनादेश दिला.

४ ए ४. स्वेच्छानिवृत्ती घेतांना मुख्य अभियंत्यांनी पूर्ण सहकार्य करणे आणि साधनेविषयी जाणून घेऊन साधनेसाठी प्रोत्साहित करणे

मी ३१.१२.२००० या दिवशी स्वेच्छानिवृत्ती घेतली. मी स्वेच्छानिवृत्ती घेतांना माझ्या मुख्य अभियंत्यांनी मला पूर्ण सहकार्य केले. त्यांनी मला त्यांच्या घरी बोलावून ‘मी कोणती साधना करतो ?’, हे विचारून मला साधनेसाठी प्रोत्साहित केले. मी त्यांना सनातनचे ‘अध्यात्म’, ‘गुरुकृपायोग’, तसेच ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन आणि वैयक्तिक साधना’ हे ग्रंथ भेट म्हणून दिले. त्यांनी माझी स्वेच्छानिवृत्ती लगेच स्वीकारून मला निवृत्तीवेतन मिळण्यासाठी पुष्कळ साहाय्य केले.

४ ए ५. मी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यापासून आजपर्यंत आम्हाला कधीही आर्थिक टंचाई जाणवली नाही. मला आर्थिक साहाय्याची आवश्यकता असल्यास देवाच्या कृपेमुळे कुठूनतरी तेवढी रक्कम माझ्या अधिकोषातील खात्यावर जमा होते.

४ ए ६. २८ वर्षांच्या नोकरीत पदोन्नतीसाठी अधिक कालावधी लागणे आणि त्या तुलनेत अध्यात्मातील संतपदापर्यंतचा प्रवास गुरुकृपेने १६ वर्षांत पूर्ण होणे

नोकरी करत असतांना माझी नेमणूक झाली होती, ते पद पर्यवेक्षकाचे होते. त्यानंतरचे पद शाखा अभियंत्याचे होते आणि जर मी पदोन्नतीसाठी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय मागे घेतला असता, तर मी ‘उपअभियंता’ या पदापर्यंत पोचू शकलो असतो. स्वेच्छा निवृत्तीच्या वेळी माझी २८ वर्षांची नोकरी झाली होती. या पदावलीची तुलना अध्यात्मातील प्रगतीशी केली, तर ‘मुमुक्षू, जिज्ञासू, साधक, शिष्य आणि संत’, हा प्रवास मी गुरुकृपेने १६ वर्षांत पूर्ण केला.’

४ ऐ. आईचा मृत्यू झाल्यावर अमरावतीला जाण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘टॅक्सी’ पाठवणे आणि तिच्यात माझ्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी आधुनिक वैद्या असलेली एक साधिका अन् एक चालक साधक असणे

‘मी मिरज येथे असतांना वर्ष २००२ मध्ये माझ्या आईचा मृत्यू झाल्याचे मला दुपारी १२ वाजता समजले. मला ४ बहिणी असल्याने आणि आईला मी एकटाच मुलगा असल्याने मला अमरावती येथे लवकरात लवकर पोचणे आवश्यक होते. तेव्हा मिरजहून अमरावतीला जाणारी एकच गाडी होती आणि तीही दुसर्‍या दिवशी दुपारी अमरावती येथे पोचणार होती. अन्य पर्याय म्हणून मी पंढरपूर येथे जाऊन तेथून थेट अमरावतीला सकाळी ११ वाजता पोचणार्‍या बसने जाण्याचा निर्णय घेतला. मी बसने पंढरपूर येथे दुपारी पोचलो आणि मला ‘तुम्हाला ‘टॅक्सी’ने अमरावतीला जायचे आहे’, असा निरोप मिळाला. थोड्याच वेळात टॅक्सी आली. तिच्यात आधुनिक वैद्या असलेली एक साधिका अन् गाडी चालवू शकणारा एक साधकही होता. ‘मला उच्च रक्तदाबाचा थोडासा त्रास आहे’, हे परात्पर गुरु डॉक्टरांना ठाऊक होते. त्यांनी ‘प्रवासात मला काही त्रास झाल्यास वैद्यकीय साहाय्य मिळावे’, यासाठी आधुनिक वैद्या असलेल्या एका साधिकेला माझ्या समवेत पाठवले होते. परम दयाळू गुरूंनी ही सोय केल्यामुळे मी अमरावती येथे सकाळी ६ वाजता पोचू शकलो.

४ ओ. अमरावती येथील वडिलोपार्जित घराच्या वाटणीतील बहिणींचा रोख रकमेचा वाटा देण्यासाठी आवश्यक रक्कम उपलब्ध होणे

माझ्या आईचा मृत्यू झाला. त्या वेळी घर आईच्या नावावर होते. कायद्याप्रमाणे आईच्या मृत्यूनंतर मालमत्तेचा अधिकार कुटुंबातील सर्व भावंडांना समान मिळतो. आम्ही सर्व भावंडांनी एकत्र बसून ‘रहाते वडिलोपार्जित घर मी ठेवावे आणि चार बहिणींना प्रत्येकी काही रक्कम रोख द्यावी’, असा निर्णय सामोपचाराने घेतला. त्या वेळी माझ्या अधिकोषात नगण्य रक्कम होती. काही दिवसांनी ‘मागील येणे’ म्हणून माझ्या खात्यात आमच्या कार्यालयाच्या वतीने आवश्यक तेवढी रक्कम जमा झाली आणि मी बहिणींचे पैसे सहज देऊ शकलो. ‘त्या माध्यमातून गुरूंनी माझा बहिणींच्या समवेतचा या जन्मीचा देवाण-घेवाण हिशोब पूर्ण केला’, असे मला जाणवले.

४ औ. अमरावती येथील नवीन घर सनातन संस्थेच्या कार्यासाठी अर्पण करणे

४ औ १. बाहेरगावाहून आलेल्या सनातनच्या साधकांना घर भाड्याने देण्याविषयी मित्रांनी विचारल्यावर त्याला नकार देणे

‘अमरावती येथे माझी आई रहात होती, ते आमचे वडिलोपार्जित घर आणि मी बांधलेले घर’, अशी दोन घरे होती. मी यवतमाळ येथे असतांना अमरावती येथे बांधलेले एक घर रिकामे होते. अमरावतीच्या माझ्या मित्रांनी मला विचारले, ‘‘काही धर्मप्रचारकांना (अध्यात्मप्रसारासाठी बाहेरगावाहून आलेल्या सनातनच्या साधकांना) तुमचे घर भाड्याने देणार का ?’’ त्या वेळी मी त्याला नकार दिला होता. नंतर मी अमरावती येथे स्थानांतर केले आणि साधनेत आलो; पण तोपर्यंत त्या घरासाठी भाडेकरू मिळाले नव्हते. मी आईजवळ आमच्या जुन्या घरातच रहात होतो.

४ औ २. विदर्भात दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयासाठी जागा हवी असतांना नवीन घर गुरूंच्या चरणी अर्पण करण्याचा विचार सर्व कुटुंबियांच्या मनात एकाच वेळी येणे

मी अमरावती येथे आल्यानंतर विदर्भात दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू करण्याचे नियोजन चालू होते आणि ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयासाठी जागा हवी होती. याविषयी आमच्या घरीच चर्चा चालू होती. त्या वेळी मी अमरावती येथे बांधलेले घर रिकामेच असल्याने आम्ही (मी, माझी पत्नी आणि मुली) केवळ एकमेकांकडे पाहिले. तेव्हा आम्हा सर्वांच्या मनात ‘आपल्या घरीच दैनिक कार्यालय चालू करूया’, हा एकच विचार होता. मी उत्तरदायी साधकांना घराच्या अर्पणाविषयी सांगितले. यावरून लक्षात आले, ‘देवाने कोणतीही चर्चा करून न घेताच आमची मने जुळवली होती. नवीन घर गुरूंच्या चरणी अर्पण व्हायचे होते; म्हणून आतापर्यंत ते रिकामे राहिले होते.’ नंतर संस्थेच्या कार्याची व्याप्ती वाढत गेल्यावर त्या घराचे सेवाकेंद्रात रूपांतर झाले.

४ अं. आईच्या निधनानंतर कुटुंबियांच्या समवेत अमरावती येथे राहून विविध प्रकारच्या सेवा करणे

माझी आई असेपर्यंत अन्य सर्व जण सेवेसाठी बाहेर गेलो, तरी निखिल (मुलगा) तिच्या समवेत रहात असे. माझ्या आईचे निधन झाल्यानंतर मात्र मी मिरज येथून अमरावती येथे आलो आणि अमरावतीला राहू लागलो. त्या वेळी मी, पत्नी आणि दोन्ही मुली यांच्यापैकी एक जण आळीपाळीने निखिलजवळ थांबायचो अन् बाकीचे सर्व जण बाहेर प्रसाराला जात असत.

वर्ष २००२ ते २००६ या कालावधीत मी अमरावती येथे ‘संगणकीय टंकलेखन, विदर्भ प्रभागाची ग्रंथसाठ्याची सेवा, दैनिक ‘सनातन प्रभात’साठी विदर्भातील सर्व जिल्ह्यांतून वार्ता मागवून त्या पाठवणे, नागपूरच्या विधीमंडळात वृत्तसंकलनासाठी जाणे’, अशा आणि मिळेल त्या सेवा करत होतो. वर्ष २००५ मध्ये मला अमरावती जिल्ह्याची अध्यात्मप्रसाराची सेवा मिळाली.

४ क. सेवेसाठी जळगाव येथे जाणे

४ क १. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भातील सेवा करण्यासाठी जळगावला जाणे आणि तेथे दैनिकाच्या संदर्भातील अन् इतरही अनेक सेवा करण्याची संधी मिळणे

त्यानंतर एक वर्षाने दैनिक ‘सनातन प्रभात’ची जळगाव आवृत्ती चालू करण्याचा निर्णय झाला. मला दैनिकाच्या सेवेसाठी जळगाव येथे जाण्याची संधी मिळाली. वर्ष २००६ ते २०१२ या काळात मी जळगाव येथे सेवा केली. दैनिकाच्या संदर्भात सेवा करत असतांना मला साधनेतील पुष्कळ बारकावे शिकायला मिळाले. ‘वार्ताहर, दैनिकाचे मुद्रण (छपाई), वितरण, वसुली, तसेच दैनिकाचे वितरण करणे’ आदी सेवा मी केल्या. काही वेळा प्रतिकूल परिस्थिती असतांनाही देवाच्या कृपेने मला तिच्यावर मात करता आली. त्या काळात मला प्रतिदिन सकाळी अल्पाहार बनवावा लागत असे, तसेच क्वचित् प्रसंगी स्वयंपाकही करावा लागत असे. काही काळासाठी मला अन्य एका साधकाच्या समवेत जळगाव, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांत प्रसारकार्यही करण्याची संधी मिळाली. त्या वेळी कुणी रामनाथी आश्रमातून आल्यास परात्पर गुरु डॉक्टर माझ्यासाठी खाऊ पाठवायचे. त्यांच्याकडून खाऊ मिळेपर्यंत त्यांनी आधी पाठवलेला खाऊ मला पुरत असे.

४ क २. जळगाव येथे जेवणात तिखटाचे प्रमाण अधिक असणे आणि तेथे तिखटाविना पदार्थ खाण्यास आरंभ करणे

जळगावमध्ये तिखट पुष्कळ प्रमाणात खातात. मी जळगावला आल्यावर खाद्यपदार्थात अल्प तिखट घालायला सांगितले, तरी स्वयंपाक करणार्‍या साधिकांच्या हातून पदार्थ तिखट व्हायचे. त्यामुळे मी तिखटाविना पदार्थ खाण्यास आरंभ केला. ते पथ्य मी आताही पाळतो.

४ क ३. परात्पर गुरु देशपांडेकाका यांनी व्यष्टी साधनेचे प्रयत्न अल्प होत असल्याची जाणीव करून दिल्यावर प्रयत्नांत वाढ होणे

जळगाव येथे असतांना माझे जप, स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन आणि प्रक्रियेच्या अंतर्गत सारणी लिखाण आणि स्वयंसूचना सत्रे, यांकडे दुर्लक्ष व्हायचे. ‘काय प्रयत्न करावेत ?’, हे मला कळत नव्हते. एकदा परात्पर गुरु देशपांडेकाका जळगाव येथे आले असतांना त्यांनी मला व्यष्टी साधनेचे प्रयत्न अल्प असल्याचे रागावून सांगितले होते. त्यानंतर त्यांच्या संकल्पाने माझे व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढू लागले.

४ क ४. एका साधकाने केलेल्या साधनेच्या प्रयत्नांविषयीचा दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेख वाचनात येणे आणि त्यात सांगितल्यानुसार प्रार्थना केल्यावर दिवसभरात ८० प्रार्थना होऊन व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांत वाढ होणे

एकदा मी अमरावती येथे घरी गेलो होतो. तिथे मला दैनिक कार्यालयातून भ्रमणभाष आला की, ‘सनातन प्रभात’च्या मागील अंकातील एक वृत्त शोधून पाठवा. माझ्या घरी येत असलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ मी पहात होतो. तेव्हा अकस्मात् गोवा येथील एका साधकाचा ‘त्याने केलेले साधनेचे प्रयत्न’ हा लेख माझ्या वाचनात आला. त्यांनी ‘प्रतिदिन सारणीत २० – २५ चुका लिहिणे, १० – १२ सूचनासत्रे करणे, १०० प्रार्थना आणि १०० कृतज्ञता व्यक्त करणे’, असे ध्येय घेतल्याचे अन् ते पूर्ण करत असल्याचे लिहिले होते. ते श्रीकृष्णाला पुढील प्रार्थना करायचे.

हे श्रीकृष्णा,

१. माझे मन, बुद्धी आणि अहं यांचा लय होऊ दे.

२. माझ्या हृदयात तुझ्याप्रती कृतज्ञता आणि शरणागती यांचा भाव प्रत्येक क्षणी वाढू दे.

३. मला तुझ्या नामजपाचे सतत स्मरण राहू दे.

‘या तीन प्रार्थनांना एक मिनिटही लागत नाही’, असेही त्यांनी लिहिले होते. मला तो एक दैवी संकेत वाटला. मी त्या प्रार्थना कागदावर लिहिल्या आणि करायला आरंभ केला. जळगावला परत गेल्यावर मी भ्रमणभाषवर प्रत्येक १० मिनिटांचा गजर लावून प्रार्थना करायचो. त्यामुळे दिवसभरात माझ्या ५० प्रार्थना व्हायच्या. काही दिवसांनी मी प्रतिदिन १०० प्रार्थना करण्याचे ध्येय घेतले; पण मी ८० प्रार्थना करण्याच्या ध्येयापर्यंतच पोचू शकलो. त्या प्रार्थनांचा परिणाम मला दिसायला लागला. माझे व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढले.

४ क ५. जळगाव येथे असतांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
४ क ५ अ. दैनिकाच्या सेवेसाठी जात असतांना अकस्मात् दुचाकी वाहनाने मुसंडी मारणे, एका व्यक्तीने साहाय्य केल्याने पुढील सेवा करता येणे आणि गुरुकृपेने रक्षण झाल्याचे जाणवणे

दैनिक ‘सनातन प्रभात’ची छपाई करण्यापूर्वी दैनिकाच्या चारही पानांचे बटर पडताळणीसाठी प्रतिदिन रात्री ‘गावकरी’ या दैनिकाच्या कार्यालयात पाठवावे लागत असे. एकदा मुसळधार पाऊस पडत होता. मी दुचाकीवरून जात होतो. ‘नेहमीच्या मार्गावर पाणी साचते. त्यामुळे दुचाकी वाहन बंद पडेल’, या भीतीने मी अन्य मार्गाने जात होतो. पावसामुळे मी मार्ग विसरलो आणि माझ्या नकळत दीड फूट खोल नालीवरून माझ्या दुचाकी वाहनाने मुसंडी मारली. मी घाबरलो. बाजूच्या पान-टपरीवर काही माणसे होती. त्यांनी मला पाहिले. त्यांतील एकाने माझे दुचाकी वाहन उभे केले. मी त्याचे आभार मानले आणि दुचाकी वाहनाला ‘किक’ मारून पाहिली, तर ती चालू झाली. मी लगेच ‘गावकरी’ कार्यालयात पोचलो आणि माझी सेवा पूर्ण केली. दुसर्‍या दिवशी पाऊस नसतांना मी आदल्या दिवशीच्या मार्गाने जात असतांना आधीच्या जागेवर पाहिले. तेव्हा मला आश्चर्य वाटले. तिथे रस्ता आणि मी जिथून पडलो, त्या पातळीत १ फूट अंतर होते आणि नंतर नाली होती. त्या अपघातातून केवळ गुरुमाऊलीच्या कृपेने मी वाचलो होतो. मला साधे खरचटलेही नव्हते.

४ क ५ आ. साधकाच्या हातून ८ फूट उंचीवरून एक लादी मांडीवर उभी पडूनही छोटीशी जखम होणे

जळगाव येथील सेवाकेंद्रात मी अंगणात बसलो होतो. तेव्हा काही साधक वरच्या गच्चीवर लाद्या नेत होते. अकस्मात् एका साधकाच्या हातून सुटून एक लादी ८ फूट उंचीवरून माझ्या मांडीवर पडली आणि मांडीला थोडी जखम झाली अन् तिच्यातून रक्त येऊ लागले. सर्व साधक घाबरले. साधकांनी प्रथमोपचार करून मला पट्टी बांधली. एवढ्या उंचीवरून लादी उभी पडूनही मला झालेली जखम नगण्य होती. त्या वेळी सर्वांनी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त केली.

४ ख. आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्याचे घोषित होणे

‘आतापर्यंतच्या माझ्या सेवांची फलनिष्पत्ती आणि परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा, यांमुळे १०.९.२००९ या दिवशी माझी आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले.

४ ग. ‘अहं वाढू नये’, याची परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी घेतलेली काळजी !

४ ग १. आध्यात्मिक पातळी ६० टक्के होण्यापूर्वी
४ ग १ अ. उत्तरदायी साधकांनी परात्पर गुरुदेवांना कुटुंबाची ओळख करून देतांना ‘यांनी यांचे घर दैनिक कार्यालयासाठी देण्याची सिद्धता दर्शवली आहे’, असे सांगितल्यावर त्यांनी केवळ हसणे आणि तेव्हा ‘त्यांनी कौतुक करावे’, असा विचार मनात असणे

वर्ष १९९९ मध्ये अमरावतीला दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयासाठी मी आमचे घर अर्पण करण्याविषयी ठरवत होतो. त्याच वर्षी विदर्भातील सर्व साधकांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या दर्शनासाठी आणि मार्गदर्शन ऐकण्यासाठी नाशिक येथे बोलावले होते. कुटुंबातील आम्ही सर्व जण गेलो होतो. तिथे व्यासपिठावर परात्पर गुरु डॉक्टर स्थानापन्न झाल्यावर अमरावती येथील उत्तरदायी साधक विदर्भातील सर्व साधकांची ओळख करून देत होते. आमच्या कुटुंबाची ओळख करून देतांना उत्तरदायी साधकांनी सांगितले, ‘‘यांनी यांचे घर दैनिक कार्यालयासाठी देण्याची सिद्धता दर्शवली आहे.’’ तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर केवळ हसले. तेव्हा माझ्या मनात ‘त्यांनी आमचे कौतुक करावे’, असा विचार होता.

४ ग १ आ. मुलगी जिल्ह्याची सेवा पहात असतांना तिने सांगितल्याप्रमाणे सेवा करणे

अमरावतीला असतांना कु. तेजल (मुलगी) जिल्ह्याचे दायित्व घेऊन सेवा पहायची आणि मी तिने सांगितल्याप्रमाणे सेवा करायचो. पार्सल आणण्यासारख्या सेवाही देवाने माझ्याकडून करवून घेतल्या.

४ ग २. आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्यानंतर
४ ग २ अ. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेखात कुठेही आध्यात्मिक पातळी लिहिली न जाणे आणि तेव्हा ‘आपली पातळी मथळ्यात यायला हवी’, असा अहंयुक्त विचार मनात येणे

माझी आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्यावर मी लिहिलेले काही लेख दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्या वेळी ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठलेल्या अन्य साधकांच्या लेखांच्या मथळ्यात त्यांची आध्यात्मिक पातळी प्रसिद्ध केली जात असे. माझ्या लेखाच्या मथळ्यात किंवा लेखात अन्य कुठेही माझी आध्यात्मिक पातळी लिहिली जात नसे. तेव्हा ‘माझीही आध्यात्मिक पातळी मथळ्यात यायला हवी’, असा अहंयुक्त विचार माझ्या मनात येत असे.

४ ग २ आ. जिल्ह्याचे दायित्व पहाणारे सर्व साधक अल्प पातळीचे असणे आणि त्यांच्याशी जुळवून घेणे

मी ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्यानंतर जळगाव जिल्ह्याचे दायित्व पहायला आलेले सर्व साधक माझ्याहून अल्प पातळीचे होते. ते आमचा व्यष्टी साधनेचा आढावा घ्यायचे. त्या वेळी सुदैवाने त्यांच्याशी जुळवून घ्यायला शिकवले.

४ घ. अहं वाढल्याने आध्यात्मिक पातळी तेवढीच राहिल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले आणि संत यांच्या मार्गदर्शनानुसार प्रयत्न करणे

माझ्या आजपर्यंतच्या साधनेतील मोठा कालावधी मी जळगाव येथे व्यतीत केला. मी तिथे असेपर्यंत माझी आध्यात्मिक पातळी ६४ टक्के झाली. माझ्यातील अहं वाढल्याने आणि माझ्याकडून झालेल्या समष्टी चुकांमुळे वर्ष २०११ मध्ये माझी पातळी तेवढीच राहिली.

१. सद्गुरु राजेंद्र शिंदे जळगाव येथे आले असतांना त्यांनी माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांची मला कठोर शब्दांत जाणीव करून दिली.

२. नंतर सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी मला माझ्यात कृतज्ञताभाव अल्प असल्याची जाणीव करून दिली आणि प्रत्येक नामजपानंतर ‘कृतज्ञता’ या शब्दाचा जप करायला सांगितला.

या संतद्वयींनी केलेल्या मार्गदर्शनानुसार देवाने माझ्याकडून प्रयत्न करवून घेतले.

३. त्यानंतर मी परात्पर गुरु डॉक्टरांना ‘मी काय करावे ?’, असे विचारले असता त्यांनी मला ‘व्यष्टी साधनेसाठी भाव आणि समष्टी साधनेसाठी प्रेमभाव’ हा कानमंत्र दिला. त्यानंतर त्यांच्या कृपेने माझ्याकडून तसे प्रयत्न झाले.

४ च. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे दुःखद घटनांतही स्थिर रहाता येणे

४ च १. आईच्या मृत्यूच्या वेळी पुष्कळ दुःख न होणे

वर्ष २००२ मध्ये अमरावती येथे माझ्या आईचे निधन झाल्यावर दुसर्‍या दिवशी सकाळी मी मिरजहून अमरावतीला पोचलो; पण मला तिच्या मृत्यूचे पुष्कळ दुःख झाले नाही.

४ च २. बहिणीच्या अंत्यसंस्कारापर्यंत पोचता येणे शक्य नसल्याचे लक्षात येणे आणि संतांचे मार्गदर्शन ऐकल्यानंतर रात्री तेथे जायला निघणे

जळगाव येथे सेवेला असतांना वर्ष २०१० मध्ये माझ्या दुसर्‍या क्रमांकाच्या पुणे येथे रहात असलेल्या बहिणीचे निधन झाल्याचे माझ्या लहान बहिणीने मला दुपारी कळवले. त्याच दिवशी परात्पर गुरु देशपांडेकाका आणि सद्गुरु सत्यवानदादा यांचे साधकांसाठी मार्गदर्शन होते. मी विचार केला, ‘बहिणीच्या अंत्यसंस्कारापर्यंत मला पोचणे शक्य नाही.’ तेव्हा मी संतांचे मार्गदर्शन ऐकल्यानंतर रात्री निघण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे रात्री निघून सकाळी पुणे येथे पोचलो.

४ च ३. मोठ्या बहिणीचे निधन झाल्यावर हिंदु राष्ट्र-जागृती सभेशी निगडित सर्व सेवा आटोपून तिसर्‍या दिवशी अस्थि आणि राख सावडायला (गोळा करायला) जाणे

वर्ष २०१९ मध्ये पुसद (जिल्हा यवतमाळ) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभा झाल्यावर रात्री आम्ही साधक यवतमाळ येथे चारचाकी वाहनाने जायला निघालो. प्रवासात असतांना नागपूरच्या बहिणीच्या मुलाचा भ्रमणध्वनी आला, ‘‘आईचे (माझ्या मोठी बहिणीचे) निधन झाले. तिच्यावर उद्या सकाळी अंत्यसंस्कार करणार आहेत.’’ मी सभेशी निगडित सर्व सेवा आटोपून नागपूरला तिसर्‍या दिवशी अस्थि आणि राख सावडायला (गोळा करायला) गेलो.

४ च ४. साधनेत आल्यानंतर शारीरिक विकार आपोआप न्यून होणे

साधनेत येण्यापूर्वी माझी प्रकृती अतिशय नाजूक होती. सर्दी, पडसे, ताप, जुलाब, असे विकार वर्षभर चालू रहायचे. साधनेत आल्यानंतर माझे हे विकार आपोआप न्यून झाले.

४ छ. ‘आध्यात्मिक पातळी ६४ टक्के ते संतपद’ हा प्रवास !

१. ‘फेब्रुवारी २०१२ मध्ये मी देवद (पनवेल) येथील आश्रमात सेवेसाठी गेलो. तिथे मी ग्रंथांच्या संबंधित संकलनाची सेवा केली. त्या वर्षी माझी आध्यात्मिक पातळी ६६ टक्के झाली.

२. ऑक्टोबर २०१२ पासून मी रामनाथी आश्रमात ग्रंथांशी संबंधित सेवा करत होतो. वर्ष २०१३ मध्ये माझी आध्यात्मिक पातळी ६७ टक्के झाली.

३. ‘परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा, संतांचे आशीर्वाद आणि साधकांची प्रीती’, यांमुळे १०.५.२०१४ या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांनी मी संतपदी विराजमान झाल्याचे घोषित केले. तेव्हापासून ऑक्टोबर २०१७ पर्यंत मी रामनाथी आश्रमात सेवारत होतो.

४ ज. वर्तमानकाळात रहायला शिकवणारी गुरुमाऊली !

माझ्या साधनाप्रवासाच्या आरंभीच्या टप्प्यात मी परात्पर गुरु डॉक्टरांपासून (गोव्यापासून) १ सहस्र ६०० कि.मी. दूर अमरावती येथे होतो. नंतर मी जळगाव येथे सेवा करू लागलो. तेव्हा ते अंतर ३०० कि.मी. झाले. नंतर मी देवद आश्रमात सेवा करायला लागल्यावर ते अंतर ७०० कि.मी. न्यून झाले आणि ऑक्टोबर २०१२ पासून मी गोवा येथे सेवा करायला लागल्यावर ते अंतर (मी सेवा करत असलेल्या ठिकाणापासून परात्पर गुरु डॉक्टरांची खोली यांतील अंतर) केवळ ७ मीटर होते. ‘त्यांनी मला एवढ्या समीप आणून नंतर पुन्हा अमरावतीला १ सहस्र ६०० कि.मी. दूर सेवेला पाठवून मला वर्तमानकाळात रहायला शिकवले’, असे मला जाणवले.

४ झ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘तुमची निर्गुण रूपाची साधना आहे’, या बोलाची आलेली प्रचीती !

आजपर्यंत माझी पात्रता नसतांनाही गुरुमाऊलीने मला सर्वकाही दिले. एकदा मी गुरुमाऊलींना विचारले, ‘‘मला स्वप्नात कधी तुमचे किंवा देवतांचे दर्शन होत नाही. मला नामजप करतांना काही अनुभूती येत नाहीत.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुमची निर्गुण रूपाची साधना आहे.’’ नंतर मला पुढील दोन प्रसंग आठवले.

४ झ १. तिरुपति बालाजीच्या दर्शनासाठी गेल्यावर अंधार असल्याने मूर्तीच्या समोरून जाऊनही दर्शन न होणे आणि त्याचे काही न वाटणे

आम्ही एकदा साधनेत नसतांना तिरुपति येथे बालाजीच्या दर्शनासाठी गेलो होतो. गर्दी असल्याने आणि मंदिरात सर्वत्र अंधार असल्याने बालाजीच्या मूर्तीसमोरून जातांनाही मी दर्शन न घेताच पुढे गेलो. मला हे कळलेही नाही. नंतर पत्नीने मला विचारले, ‘‘दर्शन झाले का ?’’ तेव्हा मी तिला ‘नाही’ म्हणालो. त्यावर तिने सांगितले, ‘‘आपण पुढे आलो आणि मूर्ती तर मागे राहिली.’’ गर्दी असल्याने मंदिरातील स्वयंसेवक भाविकांना पुढे ढकलत होते. त्यामुळे आता दर्शनासाठी परत मागे फिरणे अशक्य होते; पण मला त्याचे काहीच वाटले नाही.

४ झ २. हनुमान जयंतीच्या दिवशी हितचिंतकाने भाविकांना ‘हनुमानचालीसा’ छापलेला कागद पाकिटात घालून देणे; मात्र स्वतःला दिलेले पाकीट रिकामे आढळणे

दुसर्‍या प्रसंगात जळगाव येथे असतांना एका हितचिंतकाने मला हनुमान जयंतीला बोलावले होते. ते आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ‘हनुमानचालीसा’ छापलेला एक कागद खिशात मावेल, एवढ्या आकाराच्या पाकिटात घालून देत होते. त्यांनी मला दिलेले पाकीट मी उघडून पाहिल्यावर त्यात काहीच नसल्याचे मला आढळले.

४ ट. सध्या करत असलेली सेवा

सध्या मी प्रसारसेवा करत आहे. परात्पर गुरु डॉक्टर या धावपळीच्या सेवेतही प्रत्येक क्षणी माझी काळजी घेत आहेत.

 

५. कुटुंबीय आणि साधक यांनी साधनेत केलेल्या साहाय्याबद्दल त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

या साधनाप्रवासात मला जे काही मिळाले, ते केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे मिळाले. या वाटचालीत मला माझी पत्नी सौ. शुभांगी, कन्या कु. तेजल (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) आणि सौ. अनघा जोशी ((पूर्वाश्रमीची कु. मीनल) (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के)) अन् मुलगा श्री. निखिल यांचे अनमोल साहाय्य मिळाले. आवश्यक वाटल्यास मी अजूनही साधनेत त्यांचे साहाय्य घेतो. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने माझे जावई श्री. शशांक जोशी देवद आश्रमात पूर्णवेळ साधना करत आहेत, तसेच माझी सून (निखिलची पत्नी) सौ. नमिता निखिल पात्रीकर आणि आणि तिचे आई-वडील (सौ. जयश्री अशोक सारंगधर आणि श्री. अशोक सारंगधर) पूर्णवेळ साधक आहेत.

मी जिथे सेवेला होतो, त्या ठिकाणच्या साधकांनीही मला साधनेत साहाय्य केले. त्या सर्वांच्या प्रती मी कृतज्ञ आहे.

 

६. गुरुचरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

परात्पर गुरु डॉक्टरांनी एका रजोगुणी आणि मायेत पूर्णपणे गुंतलेल्या अभियंत्याला त्याच्या वयाच्या ४७ व्या वर्षी साधनेत आणले आणि तेव्हापासून ते माझे बोट धरून मला चालवत आहेत. त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्प आहे. ‘संतपद मिळाल्यावर माझे आत्मिक बळ पुष्कळ वाढले आहे’, असे मला जाणवते.

‘या देहाचा अंतही गुरुमाऊलींच्या चरणांशी व्हावा’, हेच त्यांच्या चरणी मागणे आहे. गुरुमाऊलीने सुचवलेली ही शब्दसुमने त्यांच्या चरणांवर कृतज्ञताभावाने समर्पित करतो.’

– (पू.) अशोक पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Leave a Comment