सनातनच्या ८४ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) सुनीता प्रदीप खेमका (वय ६३ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

लहानपणापासून सात्त्विक वृत्ती आणि दैवी गुण अंगी असलेल्या कतरास (झारखंड) येथील सनातनच्या ८४ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) सुनीता प्रदीप खेमका (वय ६३ वर्षे) यांचा बालपणापासून ते आतापर्यंतचा साधनाप्रवास येथे दिला आहे. त्यांचे बालपण, बालपणापासून त्यांच्यात असलेले दैवी गुण, देवाप्रती असलेली भक्ती, सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागण्याआधी त्यांनी अनुभवलेली देवाची अपार कृपा हे येथे दिले आहे.

अनुक्रमणिका

 

पू. (सौ.) सुनीता खेमका

 

१. जन्म

‘माझा जन्म माघ शुक्ल एकादशीला (२७.१.१९६१ या दिवशी) बंगालच्या बराकर जिल्ह्याजवळ असलेल्या दिसरगढ येथे झाला.

 

२. बालपण

आमचे एकत्र कुटुंब होते. आमच्या कुटुंबात आम्ही पणजोबा-आजोबांपासून सर्व कुटुंबीय एकत्रित रहातो. माझ्या आजोबांना २ भाऊ होते. त्यांचे कुटुंबीय, त्यांच्या मुलांची कुटुंबे असे सर्व जण एकत्रच रहातो.

 

३. लहानपणापासून अंगी असलेले चांगले गुण !

३ अ. लहानपणापासून कुठल्याही वस्तूविषयी आसक्ती नसणे

एकत्र कुटुंबात रहात असल्यामुळे आम्ही पुष्कळ बहीण-भावंडे होतो. माझ्या मनात नेहमी इतरांचाच विचार असायचा. लहान असल्यापासूनच मला इतरांना साहाय्य करायला फार आवडते. घरात आम्हा भावंडांमध्ये मी मोठी होते; पण कुठलीही वस्तू ‘मला सर्वांत आधी मिळायला पाहिजे’, असे मला कधीच वाटले नाही. कुठलीही गोष्ट घरात आल्यावर ‘इतरांना मिळाल्यानंतर मी घेईन’, असाच माझा विचार नेहमी असायचा. कधी मी माझ्यासाठी आणि माझ्या धाकट्या बहिणीसाठी वस्तू आणल्यावर मी माझ्यासाठी घेतलेली वस्तू माझ्या बहिणीला आवडली, तर मी अगदी सहजतेने माझ्यासाठी घेतलेली वस्तू तिला देत असे. अगदी लहान असल्यापासूनच माझ्या मनात कुठल्याही वस्तूविषयी आसक्ती नव्हती.

३ आ. शेजारी रहाणार्‍या आजींना त्यांच्या कामात साहाय्य करण्यास आवडणे

आमच्या घरी कामे करण्यासाठी बरेच गृहकृत्य साहाय्यक (नोकर-चाकर) असल्यामुळे घरी कधी काही काम करण्यासाठी माझी आवश्यकताच नसायची; परंतु आमच्या घराशेजारी एक आजी एकट्याच रहात होत्या. त्यांना मूळबाळ नव्हते. मला त्यांना त्यांचे घर झाडायला आणि त्यांच्या इतर कामात साहाय्य करायला आवडत असे.

३ इ. अन्नपूर्णादेवी जसे सर्वांना जेवू घातल्यावर स्वतः जेवते, त्याप्रमाणे घरातील सर्व लहान-मोठ्यांची आणि गृहकृत्य साहाय्यकांचीही जेवणे झाल्यावर जेवणे

घरात सर्वांचे भोजन झाल्यानंतर सर्वांत शेवटी मी भोजन करत असे. माझा तो गुण अजूनही आहे. कितीही व्यस्त असो, कुठलाही कार्यक्रम असो किंवा इतर दिवशीही सर्वांची जेवणे झाल्यानंतरच मी भोजन करते. ‘भूक लागली; म्हणून मी आधीच खाऊन घेतले’, असे माझ्याकडून कधीच होत नाही. ‘मी गृहिणी आहे. गृहिणीमध्ये अन्नपूर्णादेवीचे अस्तित्व असते. अन्नपूर्णादेवी सर्वांना खाऊ घातल्यानंतरच स्वतः अन्न ग्रहण करते. घरातील कुणाला अन्न न्यून पडता कामा नये. सर्व कुटुंबियांचे आणि घरातील गृहकृत्य साहाय्यकांचे भोजन झाल्यानंतरच मी अन्न ग्रहण केले पाहिजे’, असे मला वाटते.

 

४. कुटुंबातील वातावरण आध्यात्मिक असल्यामुळे देवाची आवड असणे !

४ अ. कुटुंबातील वातावरण आध्यात्मिक असणे आणि सर्व जण खाटू श्यामबाबांची भक्ती करत असणे

प्रथमपासून आमच्या कुटुंबातील पूर्ण वातावरण आध्यात्मिकच आहे. आमच्या घरी पणजोबा-आजोबा यांच्या काळापासून खाटू श्यामबाबांची (कलियुगातील श्रीकृष्णाच्या रूपाची) उपासना केली जाते. खाटू श्यामबाबांचे झेंडे उचलणे, कलश यात्रा, पायी यात्रा इत्यादी सर्व गोष्टीत आम्ही सर्व कुटुंबीय मनापासून सहभागी होत असू. माझे मन लहानपणापासूनच पूजा आणि आरती यात रमत होते. मी सकाळ-संध्याकाळ दोन्ही वेळा आरती करणे, खाटू श्यामबाबांची पोथी वाचणे, हनुमान चालीसा म्हणणे, व्रते करणे इत्यादी करत असे. लहानपणापासूनच माझ्या मनात खाटू श्यामबाबांच्या प्रती ओढ होती. ईश्वराच्या कृपेने माझे पालन-पोषण सात्त्विक वातावरणात झाले.

४ आ. कीर्तनाची आवड असणे

मला कीर्तन ऐकायची पुष्कळ आवड होती. मी लहान असतांना आमच्या घराशेजारी असलेल्या ‘बराकर’ येथे २४ घंटे कीर्तन होत असे. मला ‘सर्व वेळ कीर्तनच ऐकत बसावे’, असे वाटत असे.

 

५. शिक्षण

माझे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. मी शिक्षणात सर्वसाधारण होते.

 

६. विवाह

बारावीनंतर माझा विवाह पू. प्रदीप खेमका (सनातनचे ७३ वे (समष्टी) संत) यांच्याशी झाला.

 

७. साधनेत नसतांनाही भगवंताची अनुभवलेली अपार कृपा !

७ अ. यजमान विवाहापूर्वी मांसाहार करत असणे; पण ईश्वराच्या कृपेने विवाह ठरल्यावर त्यांची ती सवय सुटणे

आमचा विवाह ठरण्यापूर्वी यजमान मांसाहार करत होते; परंतु आमचा वाङ्निश्चय झाल्यानंतर त्यांची मांसाहार करण्याची सवय पूर्णपणे सुटली. ‘यजमान मांसाहार करत होते’, ही गोष्ट मला आमच्या विवाहानंतर ठाऊक झाली. त्या काळी विवाहापूर्वी आम्हाला वराविषयी किंवा वराकडील लोकांविषयी फार काही ठाऊक नसायचे. आमचा विवाह ठरल्यावर ‘यजमानांचा मांसाहार करणे बंद झाले’, ही गोष्ट समजल्यावर मला ईश्वराप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. प्रयत्न करूनही ‘ही गोष्ट थांबवणे’ मला साध्य झाले नसते; मात्र ती गोष्ट आमच्या विवाहाआधीच ईश्वराने बंद करून माझ्यावर केवढी मोठी कृपा केली आहे. अलीकडे लोकांना ‘मांसाहार करणे’ ही गोष्ट फारच क्षुल्लक वाटते; परंतु माझ्यासाठी ‘मांसाहार करणे’ ही फारच मोठी गोष्ट होती. ‘कुणी मांसाहार करू शकतो’, असा मी विचारही करू शकत नव्हते. त्यामुळे ‘विवाहाआधीच यजमानांची ही सवय सुटली’ हे समजल्यावर ‘भगवंत माझ्यासाठी किती करत आहे ?’ या विचाराने मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

७ आ. कामाच्या व्यस्ततेमुळे यजमान पू. प्रदीप खेमका अनेक वेळा घरी उशिरा येत असणे, ‘त्यांचे अपहरण झाले, त्या दिवशी देवाच्या कृपेने ते सुखरूप घरी परत आल्यामुळे त्यांचे अपहरण झाले’, हे न कळणे

वर्ष १९९२ मध्ये व्यावसायिक वैमनस्यामुळे कुणीतरी यजमानांचे (पू. प्रदीप खेमका यांचे) अपहरण केले होते. अपहरणकर्त्यांनी यजमानांचे रात्री ८ – ९  वाजता अपहरण केले; पण ईश्वराच्या कृपेने त्याच रात्री २ – ३ वाजता यजमान सुखरूप घरी परत आले. त्या काळात यजमानांना कामाच्या व्यस्ततेमुळे घरी परतण्यास बरीच रात्र होत असे. त्यामुळे यजमान त्या रात्री उशिरा घरी परत आले, तेव्हा मला वाटले, ‘ते काम संपवून आताच घरी परत आले आहेत.’ त्यामुळे ही घटना झाल्यावर पुष्कळ दिवस मला यजमानांचे अपहरण झाल्याविषयी ठाऊकच नव्हते. यजमान घरी येईपर्यंत मी झोपत नसे. मी त्यांची वाट पहात सज्जात उभी रहायचे. त्या रात्री ३ – ३.३० वाजता यजमान घरी परत आल्यावर माझ्या मनात ‘यजमानांना घरी यायला एवढा उशीर का होतो ?’, एवढाच विचार आला. त्यानंतर काही दिवसांनी माझ्या नणंदबाईंनी मला ‘त्या दिवशी यजमानांचे अपहरण झाले होते’, असे सांगितले. तेव्हा माझा त्यावर विश्वासच बसला नाही; पण नंतर ‘ईश्वराने त्यांचे रक्षण केले’, या विचाराने मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

७ इ. सासरी आणि माहेरी दोन्हीकडील लोकांनी गुरुमंत्र घेतलेला असूनही स्वतःला गुरुमंत्र न मिळणे, काही काळाने सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केल्यावर ते ईश्वराचेच नियोजन असल्याचे लक्षात येणे

माझ्या सासरी आणि माहेरी दोन्ही ठिकाणी सर्वांनीच गुरुमंत्र घेतला होता. ‘मी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागण्यापूर्वी माझ्या जीवनात दुसरे कुणी गुरु आले नाहीत’, ही ईश्वराचीच लीला होती. मी कधी कुठल्याही ज्योतिष्याला माझा हात दाखवून माझ्या भविष्याविषयी काही विचारले नाही. एकदा मी माझ्या आईकडे गेले होते. तेव्हा तिचे गुरु घरी येणार होते. आई मला म्हणाली, ‘‘तूही गुरुमंत्र घे.’’ योगायोगाने मी आईच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तिचे गुरु घरी आले. आईने मला तिचे गुरु घरी आले असल्याचे भ्रमणभाष करून सांगितले; म्हणून मी पुन्हा तिच्या घरी गेले; परंतु मी घरी पोचण्यापूर्वीच तिचे गुरु तिथून निघून गेले. तेव्हा ‘माझ्या नशिबीच गुरूंचा योग नसेल’, या विचाराने मला फार वाईट वाटले होते. आता विचार केल्यावर ‘ती माझ्यावरील ईश्वराची कृपाच होती. ईश्वराने माझ्या भाग्यात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे माझे गुरु म्हणून मला सान्निध्य लाभणार आहे’, असा योग लिहिला होता; म्हणून तसे झाले’, असे माझ्या लक्षात आले.

 

८. सनातन संस्थेशी झालेला संपर्क

८ अ. सनातनचे साधक श्री. संजीव कुमार (आताचे पू. संजीव कुमार) यांनी नामजप करण्यास सांगणे; मात्र त्याकडे दुर्लक्ष करणे, त्यानंतर श्री. अरविंद ठक्कर यांनी सत्संग घेऊन त्यात नामजपाचे महत्त्व सांगितल्यानंतर नामजप आपोआप चालू होणे

श्री. संजीवकुमार (आताचे सनातनचे ११५ वे (समष्टी) संत पू. संजीव कुमार (वय ७३ वर्षे)) हे यजमानांचे मित्र आहेत. संजीवदादा सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत होते. त्यांनी आम्हालाही ‘कुलदेवता’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप करायला सांगितले होते; पण ‘आम्ही पूजा-पाठ, व्रते इत्यादी सर्व करतच आहोत; मग नामजपाने वेगळे काय होणार ?’, असे आम्हाला वाटत होते. संजीवदादांचा दूरभाष येत असे, तेव्हा यजमान घरात नसतील, तर मी तो दूरभाष उचलत असे. तेव्हा ते मलाही नामजपाविषयी विचारत असत; पण मी तो विषय टाळत असे. वर्ष २००० मध्ये धनबादमध्ये श्री. अरविंददादांचा (सनातनचे साधक श्री. अरविंद ठक्कर यांचा) सत्संग होता. आम्ही दोघे पहिल्यांदाच सत्संगाला गेलो होतो. संजीवदादांनी आम्हाला ‘कुलदेवता’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप करायला सांगितले होते; मात्र या सत्संगानंतर आमच्याकडून ‘हे नामजप केव्हा आणि कसे चालू झाले ?’, हे आम्हालाही कळले नाही.

८ आ. नामजपाला आरंभ केल्यानंतर आलेल्या अनुभूती !

८ आ १. कुटुंबातील सर्व जण जयपूर येथे स्थलांतरित झाल्यामुळे घरात एकटेपणा जाणवून रडू येणे; मात्र नामजप करू लागल्यावर एकटेपणाची भावना उणावणे : याच कालावधीत आमच्या कुटुंबातील सर्व जण जयपूर येथे स्थलांतरित झाले होते; मात्र आम्ही (यजमान, मी आणि मुले) येथेच राहिलो होतो. त्यामुळे मला नेहमी एकटेपणा जाणवत होता आणि ‘मी एकटीच आहे’, असे वाटून मला रडू येत असे. नामजप करायला आरंभ केल्यानंतर हळूहळू मला वाटणारा एकटेपणा न्यून होत गेला. तेव्हा ‘नामजप केल्यामुळेच मला जाणवणारा एकटेपणा न्यून झाला आहे’, असे माझ्या लक्षात आले. त्यामुळे माझी नामजपावरील श्रद्धा वाढली.’

८ आ २. ‘कर्ता-करविता भगवंतच आहे’, याची झालेली जाणीव ! : कुटुंबातील सदस्य जयपूरला गेल्यावर मला एकटेपणा वाटत असल्यामुळे यजमान मला म्हणाले, ‘‘तूही तिकडे जा. मी एकटा येथे रहातो.’’ तेव्हा माझ्या मनात आले, ‘तुम्ही येथे रहाणार आणि मी तिथे’, असे कधीच होऊ शकत नाही. असे मी माझ्या जीवनात कधीच करू शकत नाही. त्यानंतर काही प्रसंग असे घडले की, मला माझ्या मुलांसह जयपूरला जावे लागले आणि मी २ वर्षे तिथेच राहिले. ‘मी हे कधीच करू शकणार नाही’, असे मला वाटे, नेमके तेच मला करावे लागले. असे माझ्या जीवनात आणखीही २ – ३ प्रसंग आले. आता त्याचे स्मरण झाल्यावर मला वाटते, ‘मी असे करूच शकत नाही’, असे मी म्हणत होते. तेव्हा भगवंत माझ्याकडे पाहून हसत असेल. त्या प्रसंगांतून मला जाणीव झाली, ‘खरेतर आपल्या हातात काहीच नसते. कर्ता-करविता भगवंतच आहे.’

 

९. साधनेत आल्यावर केलेल्या विविध सेवा !

९ अ. गुरुकृपेमुळे कुठल्याही सेवेविषयी मनात विकल्प न येता ती चांगली करण्याचा प्रयत्न करणे

सेवेविषयी माझ्या मनात नेहमी आज्ञापालन करण्याचा विचार असतो. मला जी सेवा मिळाली आहे, ती मनापासून करण्याचा माझा पूर्ण प्रयत्न होत असे. वर्ष २००१ मधील माझ्या पहिल्याच गुरुपौर्णिमेच्या वेळी मला मिळालेली सर्वांत पहिली सेवा ही ‘चप्पल व्यवस्था’ करण्याची सेवा होती; पण माझ्यावर एवढी गुरुकृपा होती की, ‘ही सेवा मी कशी करू ? मला गुरुपौर्णिमेला आलेल्या लोकांच्या चपला उचलून मांडणीत नीट ठेवायला लागतील’, असा अहंचा विचार एकदाही माझ्या मनात आला नाही; उलट ‘मी ही सेवा चांगल्या प्रकारे कशी करू ?’ हाच एकमेव विचार मनात होता.

९ आ. मिळालेली प्रत्येक सेवा परिपूर्ण आणि तत्परतेने करणे

कधीही कुणीही सेवा सांगितली, तरी मी ती सेवा त्वरित करण्याचा प्रयत्न करत असे. मला कुठलीही सेवा अगदी मनापासून स्वीकारता येत होती. मग ती शिबिराच्या वेळी स्वयंपाकघरात मिळालेली सेवा असो किंवा सभेसाठी व्यासपीठ सिद्धतेची सेवा असो किंवा ग्रंथ मोजणीची सेवा असो. कुठलीही सेवा मिळाली, तरी ती परिपूर्ण आणि तत्परतेने करण्याचा मी प्रयत्न करीत असे.

 

१०. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा मिळालेला सत्संग !

१० अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रथमच पहातांना जाणीव हरपणे आणि केवळ ‘त्यांच्याकडे पहातच रहावे’, असे वाटून पुष्कळ आनंद होणे

वर्ष २००५ मध्ये देवद येथील पनवेल आश्रमात आमची (मी, यजमान आणि मुलगी मेघा यांची) प्रथमच परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा प्रथम सत्संग लाभला. गुरुदेवांना पहातांना मला एकदम वेगळे वाटले. मी माझी राहिलेच नाही. ‘केवळ त्यांना पहातच रहावे’, असे मला वाटत होते. माझ्या मनाला फार आनंद जाणवत होता.

 

११. गोवा येथील सनातनच्या रामनाथी आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे !

११ अ. ‘रामनाथी आश्रमात गेल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होणे, ही ईश्वराचीच कृपा होती’, असे वाटणे

आमच्या विवाहाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त आम्ही कुटुंबीय रामनाथी आश्रमात गेलो होतो. तेव्हा तेथे आम्ही ३ – ४ दिवस आश्रमात होतो, तेथे मला परम पूज्यांच्या दर्शनाचा लाभ झाला. तेव्हा ‘त्यांचे दर्शन होणे, ही केवळ ईश्वराची कृपाच होती’, असे मला वाटले.

११ आ. विवाहाच्या वाढदिवसानिमित्त काढलेली छायाचित्रे पाहून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘ही छायाचित्रे पुढे सहस्रो वर्षे रहातील’, असे म्हणणे

विवाहाच्या वाढदिवसानिमित्त परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला भेटवस्तू दिली आणि आमची छायाचित्रे काढायला सांगितली. आमची छायाचित्रे पाहून गुरुदेव म्हणाले, ‘ही छायाचित्रे सहस्रो वर्षांपर्यंत चालतील.’ तेव्हा त्यांच्या त्या बोलण्याचा भावार्थ आम्हाला समजला नव्हता. नंतर ग्रंथ, फ्लेक्स इत्यादींवर आमच्या दोघांची छायाचित्रे पाहिली, तेव्हा त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ माझ्या लक्षात आला.

 

१२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा वाढवणारे प्रसंग !

१२ अ. बाहेरच्या वातावरणामुळे मुलांना अयोग्य सवयी लागल्या, तर त्यांना त्यापासून परावृत्त करण्याएवढी क्षमता सौ. खेमका यांच्यात नसणे आणि ‘केवळ गुरुकृपेमुळेच मुले योग्य मार्गावर आहेत’, याची जाणीव होणे

‘प्रत्येकच मुलाचे माता-पिता आपल्या मुलांना योग्य शिक्षण आणि चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करतात; परंतु तरीही कधी कधी मुले भरकटतात आणि व्यसनाधीन होऊन वाईट मार्गाला लागतात. मुलांना वाईट सवयींपासून दूर ठेवण्याएवढी माझी क्षमता निश्चितच नाही; मात्र ‘आमच्यापाशी सर्वकाही असूनही आमची मुले वाईट संगतीला लागली नाहीत. ती योग्य मार्गावर आहेत’, ही केवळ आमच्यावरील गुरुकृपाच आहे.

१२ आ. मुलीचा विवाह ठरवतांना ‘जावई निर्व्यसनी असावा’, असे आतून वाटणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने ‘चांगलाच जावई मिळेल’, अशी दृढ श्रद्धा असणे

आमची मुलगी मेघा हिचा विवाह ठरवतांना मला ‘मुलगा निर्व्यसनी असावा’, असे वाटत होते. एकदा कुणीतरी मला म्हणाले, ‘जर मुलीच्या वाङ्निश्चयानंतर तुम्हाला समजले, ‘मुलगा दारू पिणारा आहे, तर तुम्ही काय कराल ?’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘माझी माझ्या श्री गुरूंवर एवढी श्रद्धा आहे की, ते मेघासाठी असा मुलगा शोधणारच नाहीत.’ प्रत्यक्षात तसेच घडले. मेघाच्या यजमानांना कसलेही व्यसन नाही.

ईश्वराच्या कृपेने प्रत्येक दिवशीच मला एक नवीन अनुभूती येते. त्याविषयी कितीही सांगितले, तरी ते अल्पच आहे.

१२ इ. एका कठीण प्रसंगात अडकलो असतांनाही साधना आणि सेवा नियमितपणे चालू राहाणे

वर्ष २०११ च्या एप्रिल मासात आमची (माझी आणि यजमानांची) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यानंतर मे मासापासून वर्ष २०१४ पर्यंत आम्ही सर्व जण एका कठीण प्रसंगात अडकलो होतो; परंतु गुरुकृपेने एवढ्या कठीण काळातही साधना किंवा सेवा यांविषयी आमच्या मनात कधीही कुठलाही विकल्प आला नाही.

माझ्या मनात गुरुदेवांप्रती दृढ श्रद्धा आहे, ‘गुरुदेव आहेत, तर सगळे काही चांगलेच होणार आहे. परिस्थिती कशीही असली, कितीही कठीण प्रसंग आला, तरी ‘गुरुदेव सर्व काही ठीक करणार आहेत.’

१२ ई. हिंदू अधिवेशनासाठी नियमितपणे येणे आणि तिथे मिळेल ती सेवा करणे

वर्ष २०१२ पासून अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचा आरंभ झाला. कौटुंबिक स्थिती कठीण असूनही गुरुकृपेने आम्ही प्रत्येक वर्षी अधिवेशनात सहभागी होत होतो आणि तिथे जी सेवा मिळेल ती करत होतो. माझे व्यष्टी साधनेचे सर्व प्रयत्नही अगदी नियमितपणे होत होते.

 

१३. साधनेत आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

१३ अ. वर्ष २०११ मध्ये एक शिबिर चालू असतांना ‘देवाला नमस्कार करतांना त्याचा हात मस्तकावर आहे’, असे जाणवणे आणि त्या दिवशी संध्याकाळी आम्हा उभयतांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित केली जाणे

वर्ष २०११ मध्ये अनुताई (आताच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर) आणि कु. प्रियांका जोशी (आताच्या सौ. प्रियांका राजहंस – वर्ष २०२३ ची आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) धनबादमध्ये एका शिबिरासाठी आल्या होत्या. वर्ष २०११ मध्ये अनुताईंची आध्यात्मिक पातळी ६९ टक्के होती. (२८.१०.२०११ या दिवशी अनुताईंची आध्यात्मिक पातळी ७१ टक्के होऊन त्या समष्टी संत झाल्या आणि ३०.७.२०१५ या दिवशी त्या सद्गुरु झाल्या.) शिबिराच्या काळात ‘भगवंताला नमस्कार करतांना माझ्या मस्तकावर भगवंताचा हात आहे’, असे मला जाणवायचे. तेव्हा एक दिवस मी अनुताईंची वेणी घालत असतांना त्या मला म्हणाल्या, ‘‘तुम्ही ध्यानमंदिरात देवाला नमस्कार करत असतांना ‘भगवंताचा हात तुमच्या मस्तकावर आहे’, असे मला जाणवले.’’ हे ऐकून मला एवढा आनंद झाला की, मी तो शब्दांत सांगू शकत नाही. मला अशीच अनुभूती येत होती आणि अनुताईंनीही अक्षरशः तसेच सांगितले. त्याच दिवशी सायंकाळच्या एका कार्यक्रमात प्रथम यजमानांची आणि नंतर माझी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के घोषित केली गेली.

१३ आ. सेवा करतांना बहुतांश वेळा माझे मन निर्विचार आणि शांत असते.

 

१४. नियमितपणे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याचे केलेले प्रयत्न !

१४ अ. नियमितपणे सारणी लिखाण करणे

‘साधकांना वेळोवेळी जे करण्यास सांगितले गेले, ते करण्याचा आम्ही (मी आणि यजमान पू. प्रदीप खेमका (सनातनचे ७३ वे (समष्टी) संत यांनी) प्रयत्न केला. वर्ष २००३ पासून आम्ही स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी सारणी (टीप) लिहायला आरंभ केला. प्रती एक घंट्याने लक्षात आलेल्या चुका आणि दैनंदिनी लिहिणे, स्वयंसूचना घेणे इत्यादी सर्व प्रयत्न केले. गुरुकृपेने आजपर्यंत आमचे सारणी लिहिणे नियमितपणे चालू आहे.

(टीप – स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी प्रतिदिन स्वतःकडून झालेल्या चुका वहीत लिहून त्यापुढे त्या कुठल्या स्वभावदोषांमुळे झाल्या, ते लिहिणे. त्यापुढे योग्य दृष्टीकोनाच्या सूचना लिहून त्या दिवसातून १०-१२ वेळा मनाला देणे)

पू. प्रदीप खेमका

१४ आ. यजमान पू. प्रदीप खेमका यांच्या व्यष्टी साधनेच्या गांभीर्यामुळे त्यांच्यासह स्वतःचे आणि नातवाचेही सारणी लिखाण होणे

साधना करण्यासाठी मला माझ्या कुटुंबियांकडून नेहमीच सहकार्य लाभले. यजमानांच्या साहाय्यामुळे माझे व्यष्टी साधनेचे प्रयत्न कधीही खंडित झाले नाहीत. यजमान प्रतिदिन रात्री झोपण्यापूर्वी आत्मनिवेदन लिहितात. रात्री कितीही उशीर झाला, तरी ते लिखाण केल्याविना झोपत नाहीत. त्यांच्यामुळे त्यांच्यासह बसून माझेही लिखाण होते. आता आमचा नातू श्रीहरि (वर्ष २०२३ मधील आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आणि वय ७ वर्षे) आम्हाला विचारतो, ‘आज माझ्याकडून काय चुका झाल्या ?’ आणि तोही आमच्यासह बसून दिवसभरात त्याच्याकडून झालेल्या चुका आठवून आमच्याप्रमाणे लिहिण्याचा प्रयत्न करतो.

 

१५. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे झालेले लाभ !

१५ अ. एका प्रसंगी अकस्मात् घरातील ध्यानमंदिराच्या समोरील सभागृहातील लाद्या आपोआपच एकापाठोपाठ एक उखडल्या गेल्यावर घाबरून न जाता स्थिर रहाता येणे, तेव्हा ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे महत्त्व लक्षात येणे

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागल्यानंतर मला गुरुदेवांच्या कृपेने पुष्कळ शिकायला मिळाले; मात्र एक सूत्र मला फारच वैशिष्ट्यपूर्ण वाटले, ते म्हणजे ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे प्रयत्न !’ सर्वांसाठीच ते फार महत्त्वाचे सूत्र आहे. ‘२९.१.२०१९ या दिवशी धनबादमध्ये ‘सनातन प्रभात’च्या वाचकांसाठी मार्गदर्शनाचे आयोजन केले होते. तिथे जाण्यासाठी यजमान पू. प्रदीप खेमका, सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि श्री. शंभू गवारे (वर्ष २०२३ ची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) घरातून निघत असतांना अकस्मात् घरातील ध्यानमंदिराच्या समोरच्या सभागृहातील लाद्या एकेक करून आपोआपच उखडल्या जाऊ लागून घराची स्थिती एकदम भयावह झाली. माझ्या डोळ्यांसमोर आपत्काळाचे दृश्य आले.’

ईश्वराच्या कृपेने आम्ही सर्व जण स्थिर राहू शकलो. तेव्हा गुरुदेवांनी शिकवलेली ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया किती महत्त्वाची आहे’, याची मला जाणीव झाली. आमचे स्वभावदोष न्यून झाले नाहीत, आमच्या मनाला स्थिरता आली नाही, तर आपण आपत्काळाचा सामना कसा करू शकू ? ‘एखाद्या प्रसंगात आपण लगेच घाबरून गेलो, योग्य निर्णय घेऊ शकलो नाही किंवा काळजी वाटू लागली, एक दुसर्‍यावर क्रोध करू लागलो, तर आपली स्थिती बिकट होईल’, असे देवाने माझ्या लक्षात आणून दिले.

१५ आ. साधना चालू केल्यावर ‘भावनाशीलता’ हा अहंचा पैलू आपोआप न्यून होणे

माझ्यामध्ये ‘कुठल्याही क्षुल्लक गोष्टीमुळे दुःखी होणे किंवा मनाला लावून घेणे’ हा अहंचा पैलू अधिक प्रमाणात होता. कुणी काही म्हटले की, लगेच माझ्या डोळ्यांत पाणी येत असे. साधना करतांना गुरुकृपेने हा अहंचा पैलू आपोआपच न्यून होत गेला.

१५ इ. साधकांवर नामजपादी उपाय करतांना साधकांना त्रास देणार्‍या अनिष्ट शक्तींचा त्रास वाढल्यावर भीती वाटणे, हळूहळू ती भीती नष्ट होणे आणि भीती नष्ट झाल्यावर दुसरी सेवा देण्यात येणे

वर्ष २०११ मध्ये माझी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्यानंतर मला साधकांसाठी नामजपादी उपाय करायला सांगितले होते. त्यासाठी मी प्रत्येक आठवड्यातून एकदा धनबादला जात होते. साधकांसाठी नामजपादी उपाय करतांना साधकांना होणार्‍या अनिष्ट शक्तींचा त्रास वाढायचा. त्याची मला फार भीती वाटत असे; परंतु ‘एका संतांनी मला ही सेवा करायला सांगितली आहे, तर ती सेवा मला करायचीच आहे’, असा विचार करून मी साधकांसाठी नामजपादी उपाय करण्यासाठी जात होते. एक साधक मला म्हणाले, ‘‘जेव्हा तुमची या प्रसंगांची भीती नष्ट होईल, तेव्हा तुमची ही सेवा पालटली जाईल.’’ नामजपादी उपायांच्या प्रत्येक दिवशी साधकांचे त्रास वाढतच होते. हळूहळू माझी या प्रसंगांची भीती नष्ट झाली. त्यानंतर १ – २ मासांनी माझी ही सेवा पालटण्यात आली.

‘माझी या प्रसंगांची भीती नष्ट व्हावी’, यासाठीच देवाने हा प्रसंग घडवला होता, असे यातून मला शिकता आले.

 

१६. आध्यात्मिक प्रगतीविषयी असलेले विचार !

१६ अ. ‘स्वतःच्या प्रयत्नाने ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठणे शक्य नसून ते केवळ गुरुकृपेनेच शक्य आहे’, असे वाटणे

आध्यात्मिक प्रगतीविषयी माझ्या मनात कधी विचार आले नाहीत. एकदा एका सत्संगात उत्तरदायी साधकाने सर्वांना साधनेसंबंधित काही प्रश्न दिले होते आणि चिंतन करून त्यांची उत्तरे पुढच्या साप्ताहिक सत्संगात लिहून आणण्यास सांगितली होती. त्यामध्ये पहिलाच प्रश्न होता, ‘६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्यासाठी तुम्ही कसे प्रयत्न करणार आहात ?’ त्याचे उत्तर म्हणून मी लिहिले होते, ‘मी माझ्या प्रयत्नाने ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठू शकेन’, हे माझ्या हातात नाही. परम पूज्यांची कृपा होईल, तेव्हाच असे होऊ शकेल !

१६ आ. ‘स्वतःला काहीच येत नसल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अधिक लक्ष आहे’, असे वाटणे

माता-पिता यांचे लक्ष त्यांच्या इतर मुलांच्या तुलनेत त्यांच्या रुग्णाईत किंवा कमकुवत बाळाकडे अधिक असते. त्याचप्रमाणे ‘मला काहीच येत नाही. त्यामुळे परम पूज्य माझ्याकडे अधिक लक्ष देतात’, असे मला नेहमी वाटते.

 

१७. साधनाप्रवासात प्राप्त झालेले संतांचे कृपाशीर्वाद !

१७ अ. पू. प्रदीप खेमका (सनातनचे ७३ वे (समष्टी) संत)

‘यजमान पू. प्रदीप खेमका यांच्या सहवासामुळेच माझ्या जीवनात परम पूज्य आले’, यासाठी मला यजमानांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते.

१७ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आशीर्वादात्मक बोल !

वर्ष २०११ मध्ये आम्हा दोघांची (माझी आणि यजमानांची) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाली, तेव्हा प.पू. गुरुदेवांनी लिहून पाठवले होते की मी ईश्वराला प्रार्थना करतो, ‘तुम्हा दोघांची आध्यात्मिक प्रगती एकमेकांच्या समवेतच व्हावी.’ हे त्यांनी आम्हाला दिलेले आमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आशीर्वचन आहे !

१७ इ. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

वर्ष २०१३ मध्ये आमचे कुटुंब एका कठीण परिस्थितीतून जात होते. तेव्हा मी सद्गुरु पिंगळेकाकांना (सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना) म्हणाले, ‘‘ईश्वर आहे ना ? सगळे काही ठीक होईल.’’ सद्गुरु पिंगळेकाका मला म्हणाले, ‘‘ताई, तुम्ही असा भाव ठेवा, ‘मी श्रीकृष्णाच्या नावेत बसले असून तो मला जसे पार करील, तसे मी पार होऊन जाईन’.’’ त्यानंतर माझ्या विचार करण्याच्या दृष्टीकोनात एकदम पालट झाला. विचारांत न गुरफटता, ‘गुरुदेव सर्व चांगलेच करणार आहेत’, अशी श्रद्धा मनात निर्माण झाली. हा फार मोठा पालट माझ्या जीवनात झाला.

माझ्या मनात गुरुदेवांप्रती नेहमीच दृढ श्रद्धा राहिली आहे. ‘गुरुदेव आमच्या जीवनात आहेत, तर आमचे सगळे चांगलेच होणार आहे’, असाच माझा भाव सदैव असतो.

१७ ई. पू. (डॉ.) ॐ उलगनाथन् आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

वर्ष २०१४ च्या गुरुपौणिमेपूर्वी पू. (डॉ.) ॐ उलगनाथन आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या समवेत मला एक मासाच्या दौर्‍यावर जाण्याची अपूर्व संधी लाभली होती. ‘ते दिवस माझ्या जीवनातील ‘सुवर्ण क्षण’ होते’, असे मला वाटते.

 

१८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेतचे अविस्मरणीय क्षण !

१८ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाच्या वेळी डोळे मिटून बसल्यावर ‘कृष्ण आला’, असे दिसून त्याच्याकडे पाहून हसणे, तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले समोर बसून स्वतःकडे पाहून हसत असणे

एकदा आम्ही रामनाथी आश्रमात गेलो असतांना आम्हाला परम पूज्यांचा सत्संग मिळणार होता. तेव्हा आमच्या कौटुंबिक समस्या पुष्कळ वाढल्या होत्या. सत्संगाच्या वेळी गुरुदेव येण्यापूर्वी मी डोळे बंद करून बसले होते. तेव्हा मला वाटले, ‘भगवान कृष्ण आला असून तो माझ्यासमोर बसला आहे आणि मी त्याच्याकडे पाहून हसत आहे.’ त्या क्षणी मी डोळे उघडून समोर पाहिले, तेव्हा परम पूज्य माझ्यासमोर बसले होते आणि ते माझ्याकडे पाहून हसत होते. हा प्रसंग कधीच माझ्या विस्मरणात जाऊ शकणार नाही.

१८ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगातील प्रत्येक क्षणच अविस्मरणीय असणे

आम्हाला जेव्हा कधी गुरुदेवांचा सत्संग लाभला, ते क्षण माझ्या स्मरणात नेहमीच राहिले आहेत. त्यांची प्रीती, त्यांचे ममत्व, त्यांची कृपा आम्ही नेहमीच अनुभवत असतो. ‘प.पू. गुरुदेवांच्या सत्संगातील क्षण आणि त्यांच्यासह छायाचित्रे काढणे’ हे सारे क्षण फारच अविस्मरणीय आहेत !

 

१९. स्वतःचा आणि विवाहाचा वाढदिवस असतांना पवित्र अशा कुंभमेळ्याच्या स्थानी संतपद प्राप्त केल्याचे घोषित करून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी जीवनातील सर्वाेच्च आनंदाचा दिलेला क्षण !

१६.२.२०१९ या दिवशी आम्ही प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी गेलो होतो. आम्ही कुंभमेळ्यात असतांना माझा तिथीनुसार वाढदिवस होता आणि आमच्या विवाहाचाही वाढदिवस होता. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी सद्गुरु पिंगळेकाकांशी बोलत असतांना मी ही गोष्ट त्यांना सांगितली होती. दुसर्‍या दिवशी सकाळी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याशी माझे बोलणे झाले. तेव्हा या २ वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी सांगून ते मला म्हणाले, ‘‘तुमचा आणि तुमच्या विवाहाचा वाढदिवस असतांना तुम्ही कुंभमेळ्याच्या पवित्र क्षेत्री आहात.’’ माझी रासही कुंभ आहे. असे सर्व योगायोग असतांनाच माझे संतपद घोषित केले गेले. त्यामुळे मला गुरुदेवांप्रती अपार कृतज्ञता वाटली. अशा शुभदिनी परम पूज्य मला माझ्या जीवनातील सर्वश्रेष्ठ भेट देऊ इच्छित होते. त्यासाठीच त्यांनी हा दिवस निवडला असावा. ‘परम पूज्य, आपण ‘माझा आणि माझ्या विवाहाचा वाढदिवस अन् माझा उद्धार’, असे सर्व काही एकाच दिवशी नियोजित केले’, असे मला वाटले. हा माझ्या जीवनातील सर्वाधिक आनंददायी दिवस होता.

 

२०. कृतज्ञता

मला प्रत्येक क्षणी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता वाटते. नदीमध्ये जसे वाळूचे कण चिकटून राहिलेले असतात, तसे परम पूज्यांच्या विशाल चरणांशी आम्ही सर्व जण वाळूंच्या कणांप्रमाणे चिकटलेलो आहोत. ‘परम पूज्यांनी आम्हाला सदैव त्यांच्या समवेतच ठेवावे’, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे.’

Leave a Comment