सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांची लहानपणापासून साधनेच्या अनुषंगाने झालेली वाटचाल – भाग २

श्री दुर्गादेवीचे चित्र काढण्याच्या संदर्भात सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर
यांना आलेल्या अनुभूतींसंदर्भात प.पू. डॉक्टरांनी दिलेली माहिती

सनातन-निर्मित श्री दुर्गादेवीचे चित्र

अ. श्री दुर्गादेवीने तिच्या मारक रूपातील तेजतत्त्व सहन करता यावे,
यासाठी कु. अनुराधा वाडेकर यांच्याभोवती संरक्षककवच निर्माण करून त्यांना शक्ती देणे

‘श्री दुर्गादेवीचे चित्र काढण्याच्या संदर्भात श्री. राम होनप यांनी कु. अनुराधा वाडेकर यांना सांगितले, ‘‘श्री दुर्गादेवी (सूक्ष्मातून) येणार आहे आणि तिचे चित्र तुम्हाला काढायचे आहे.’’ जेव्हा श्री दुर्गादेवी (सूक्ष्मातून) येणार होती, तेव्हा कु. अनुराधा श्री दुर्गादेवीची आतुरतेने वाट पहात होत्या. श्री. रामदादांनी श्री दुर्गादेवी आल्याचे सांगितले. त्या वेळी गार वार्‍याची झुळूक आली. पिवळ्या आणि लाल या रंगांचा प्रकाश पसरला. वातावरण प्रसन्न झाले. कु. अनुराधा यांचे मन कृतज्ञतेने भरून आले. तारक रूपात आलेल्या श्री दुर्गादेवीने श्री. रामदादा आणि कु. अनुराधा यांच्याकडे बघून स्मितहास्य केले. कु. अनुराधा यांच्या मनात विचार आला, ‘चित्राला प्रारंभ कुठून करायचा ?’ त्याच वेळी श्री दुर्गादेवी उठून उभी राहिली आणि तिने तिचा उजवा पाय वर उचलून मारक रूप धारण केले. त्या वेळी देवीचे ते रूप कु. अनुराधा बघू शकल्या नाहीत. श्री दुर्गादेवीच्या मारक रूपात तेजतत्त्व अधिक असल्यामुळे त्यांचे डोळे दीपले. ‘श्री दुर्गादेवी येऊनही आपण तिला पाहू शकत नाही’, याची खंत कु. अनुराधा यांना वाटत होती. कु. अनुराधा यांना श्री दुर्गादेवीचे दर्शन व्हावे, यासाठी श्री. रामदादांनी देवीला प्रार्थना केली. त्यानंतर श्री दुर्गादेवीने कु. अनुराधा यांच्याभोवती संरक्षककवच निर्माण करून त्यांना मारक रूपाचे तेज सहन करण्याची शक्ती दिली. त्यानंतर देवीने तिच्या शरिराचा एकेक भाग स्पष्ट दाखवण्यास सुरुवात करून तिचे चित्र पूर्ण करून घेतले. चित्र पूर्ण झाल्यानंतरच कु. अनुराधा यांना ‘श्री दुर्गादेवीचे संपूर्ण रूप कसे आहे ?’, ते कळले.

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांना मार्गदर्शन करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले (वर्ष २००३)

आ. श्री दुर्गादेवीने तिचे चित्र काढून घेतांना
कु. अनुराधा वाडेकर यांच्या मनावर आलेले दडपण दूर करणे

आपल्या समोर एखादी मोठी व्यक्ती आली, उदा. संत आले, तर आपल्या मनावर एक प्रकारचे दडपण येते. येथे साक्षात् श्री दुर्गादेवी कु. अनुराधा यांच्या समोर आली, तर त्यांच्या मनावर केवढे दडपण आले असेल ! शेवटी ती जगदंबाच, आईच आहे. श्री दुर्गादेवीने तिचा उजवा पाय वर उचलला आणि कु. अनुराधा यांच्या मनावरचे दडपण दूर करण्यासाठी विचारले, ‘काय गं, मी पाय एवढा वर केला, तो बरा दिसतो का ? तो जरा खाली करू कि वर करू ?’ बघा, आपल्यासाठी देवी मानवाच्या पातळीला येऊन बोलली. त्यानंतर चित्रामध्ये श्री दुर्गादेवीचे हात काढायचे होते. श्री दुर्गादेवीला १० हात आहेत (टीप). १० हात काढायची चित्रकारांना सवय नसते. देवीच्या दहा हातांत शस्त्रे आणि वस्तूही आहेत; म्हणून शस्त्रे एकमेकांना लागणार नाहीत, याचीही काळजी घ्यावी लागणार होती. यासाठी देवीने विचारले, ‘हा हात जरा खाली करू कि दुसरा ? तूच सांग, कोणता हात वर केला की, चांगला दिसेल ?’ आपण एखाद्याशी बोलायला प्रारंभ केला की, त्याच्या मनावरचे दडपण दूर होते. अनुराधा यांच्या मनावरील दडपण जावे, यासाठी देवी तसे म्हणाली होती. इतकेच नव्हे, तर चित्र काढून २ घंटे झाल्यानंतर देवी त्यांना म्हणाली, ‘अगं, तुला भूक लागली असेल. तू जेवून घे. मी परत येते.’ चित्र काढण्यास एकूण ५ घंटे लागले.

टीप – कु. अनुराधा वाडेकर यांनी काढलेल्या श्री दुर्गादेवीच्या मूळ चित्रात तिला १० हात काढले होते; कारण तेव्हा देवीचे उग्र मारक रूप असल्याने कु. अनुराधा यांना देवीचे नेहमीचे ८ हात दिसण्याऐवजी १० हात दिसले होते. पुढे जेव्हा देवीने काही वेळा दर्शन दिले, तेव्हा तिला ८ हात होते. त्यामुळे सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या देवीच्या चित्रात ८ हात आहेत.

इ. ‘माझे चित्र कधी काढणार ?’, असे मारुतीने कु. अनुराधा वाडेकर यांना सूक्ष्मातून विचारणे

श्री दुर्गादेवीचे चित्र पूर्ण झाल्यानंतर लगेच देवलोकात सर्वांना ती बातमी समजली की, कु. अनुराधा वाडेकर यांनी श्री दुर्गादेवीचे चित्र काढले आहे. त्यानंतर मारुतीने (सूक्ष्मातून) कु. अनुराधा वाडेकर यांना विचारले, ‘आता माझे चित्र कधी काढणार आहेस ?’ म्हणजे आपण जसे एकमेकांशी बोलतो, चालतो, वागतो, तशा आता देवताही आपल्या साधकांना भेटण्यास आणि बोलण्यास येऊ लागल्या आहेत.’

–  संत

 

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी स्वतःच्या
आयुष्यात प्रसंग घडवून अप्रत्यक्षपणे साधनेकडे वळवल्याविषयी
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

 

‘आपल्या आयुष्यात घडलेल्या घटनांकडे आपण बर्‍याचदा सुखद किंवा दुःखद दृष्टीकोनातून पहातो; पण त्या घटना ईश्‍वराच्या इच्छेनेच घडलेल्या असतात. तसेच ‘त्या घटनांतून देवाला माझी त्याच्याविषयीची ओढ वाढवायची आहे’, असा आपला दृष्टीकोन अल्प पडतो किंवा बहुतांश वेळा नसतोच; पण कु. अनुराधा वाडेकर यांनी तो दृष्टीकोन ठेवून स्वतःच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक प्रसंगामध्ये त्यांच्याकडून प.पू. डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त झाली. या कृतज्ञता येथे देत आहोत. कृतज्ञता व्यक्त करण्यापूर्वी त्यांनी स्वतःमध्ये कृतज्ञताभाव येण्यासाठी प.पू. डॉक्टरांना तळमळीने प्रार्थना केली आहे.

अ. प्रार्थना

‘प.पू. डॉक्टर, आपण माझ्यासाठी आजपर्यंत काहीच करायचे शिल्लक ठेवलेले नाही. आपल्याप्रतीच्या कृतज्ञतेविषयी लिहिण्याची माझी क्षमता नाही. आपणच माझ्याकडून आपल्याला अपेक्षित असे लिहून घ्यावे आणि माझ्यात कृतज्ञता निर्माण करावी’, ही आपल्या चरणी प्रार्थना !

आ. कृतज्ञता

१. प.पू. डॉक्टर, हा जीव कुठेतरी भटकत असतांना आपण मला माझ्या आई-वडिलांच्या माध्यमांतून पृथ्वीवर आणले.

२. माझ्या जन्मापूर्वी आई गर्भवती असतांना आत्महत्या करण्यास निघाली होती. तेव्हा आगगाडीच्या रुळांवर उभी असतांना तिच्या मनात गर्भाचा विचार निर्माण करून आपणच तिला आत्महत्येपासून परावृत्त केले. त्यामुळे माझा जन्म होण्यामध्ये असलेला पाताळातील वाईट शक्तींचा अडथळा दूर झाला. आज आपल्या कृपेमुळे मी जिवंत आहे.

३. माझे बालपण खडतर होते. मला पाताळातील वाईट शक्तींचा त्रासही होता; परंतु अशा वेळीही तुम्ही माझी देवावरची श्रद्धा कधी ढळू दिली नाही.

४. मी ३ वर्षांची असतांना मला एकाने पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा आजीच्या माध्यमातून बुद्धी देऊन आपणच आईला मला शोधण्यास सांगितले आणि मला वाचवले.

५. मी लहानपणी निराशेत असायचे आणि ‘कोणाचा तरी मृत्यू झाल्यावर दुःखी होऊन बसावे’, तसे दु:ख माझ्या तोंडवळ्यावर असायचे. त्या वेळी आपणच आईच्या माध्यमातून आधार देऊन मला साहाय्य केले आणि नवे आयुष्य दिले.

६. आई परिचारिकेची सेवा (नर्सिंग) करत असल्यामुळे लहानपणी मी आई-वडिलांपासून दूर होते. तेव्हा मावशीकडे राहिल्यामुळे माझी आई-वडिलांविषयीची आसक्ती तुम्हीच अल्प केलीत.

७. वयाच्या १० व्या वर्षी आई-वडील जवळ नसतांना माझ्यात निर्माण झालेल्या एकटेपणात आपल्याच कृपेमुळे मी ईश्‍वराच्या अधिक जवळ गेले, नाहीतर मला ईश्‍वराची जाणीव झाली नसती.

८. लहानपणी एकदा मी मावशीच्या घरी चोरी केली; पण त्यानंतर मला तशा वाईट कृत्यांपासून आपणच रोखलेत.

९. माझी मावसबहीण माझ्याशी व्यवस्थित वागत नसल्यामुळे मी व्यक्तींपासून अलिप्त राहून देवाकडेच ओढले गेले. तुम्हीच तिच्या माध्यमातून माझे प्रारब्ध अल्प केले.

१०. मावशी आणि मावशीचे यजमान नेहमी माझ्या आईची बाजू घेत असल्यामुळे मी सर्वांपासूनच अलिप्त झाले. त्यामुळे ‘आपले कोणी नसून देवच आपला आहे’, याची जाणीव आपणच मला करून दिली.

११. तरुण वयात वाईट प्रसंग घडतांना आपणच मला त्यातून वाचवले. वाईट जगापासून आपणच माझे रक्षण केले. तसेच ‘जग किती वाईट असते’, हेही शिकवले.

१२. मला आप्तेष्ट किंवा मित्र-मैत्रिणी यांच्याकडून प्रेम न मिळाल्यामुळे मी त्यांच्यात अडकले नाही. ‘या नात्यांमध्ये दुःखच असते’, याची आपणच मला जाणीव करून दिली.

१३. आई-वडिलांची एकुलती एक मुलगी असूनही त्यांच्या माध्यमांतून आपण माझे लाड न पुरवल्यामुळे मी लाडावले नाही.

१४. मला सर्व सुख-सोयींचा अनुभव दिल्यामुळे त्यांचे कुतूहल राहिले नाही. ‘त्यात अर्थ नसतो’, याची जाणीव आपणच मला करवून दिली.

१५. ‘सुखात किती दुःख आहे’, याची जाणीव करून दिल्यामुळेच माझी आनंदाची शोधयात्रा आपणच आरंभ केली.

१६. आपणच मला साधनेत आणले. त्या वेळी मला साधना, साधक, संत यांचे महत्त्व काहीच माहिती नव्हते, तरीही आपण मला बोलावले आणि आपले प्रत्यक्ष दर्शन दिले.

१७. साधनेचे महत्त्व टप्प्याटप्प्याने आणि कलेकलेने हळूवारपणे पटवून आपण मला साधनेकडे वळवले.

१८. माझ्या मनातील मायेची, व्यावहारिक जीवनाची ओढ अल्प होऊन मी साधनेत यावे, यासाठी आपणच माझ्या जीवनात आजारपणाचा प्रसंग आणलात. त्यामुळेच मी पूर्णवेळ साधिका होऊ शकले. अन्यथा साधना करण्याचा विचार माझा कधीच नव्हता.

माझ्या आयुष्यातील या अमूल्य क्षणांसाठी मी आपली अत्यंत कृतज्ञ आहे !’

– कु. अनुराधा वाडेकर (वर्ष २००८)

 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भावविश्‍वात रहाणार्‍या कु. अनुराधा वाडेकर

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचे पुढील लिखाण त्या संत आणि सद्गुरु होण्याच्या पूर्वीचे आहे. त्या कालावधीत प्रत्येक कृती करतांना त्यांनी ठेवलेला भाव सर्वांनाच शिकण्यासारखा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीच्या त्यांच्या उत्कट भावामुळेच आज त्या सद्गुरुपदापर्यंत पोहोचल्या आहेत. सर्वच साधकांना त्यांच्या प्रयत्नांतून शिकता यावे, यासाठी त्यांच्या प्रयत्नांतील भावसूत्रे येथे दिली आहेत.

१. सकाळी उठणे

‘मी प्रतिदिन सकाळी प.पू. डॉक्टरांच्या कृपेनेच उठते. त्यांच्या कृपेमुळेच मी जिवंत आहे.

२. वैयक्तिक आवरणे

ईश्‍वराला भेटायला जायचे आहे; म्हणून मी आवरत आहे. आवरण्यासाठी असणार्‍या वस्तू म्हणजे चैतन्य असून त्यांच्या माध्यमातून चैतन्यच मिळत आहे.

३. कोणत्याही खोलीचे दार उघडणे किंवा बंद करणे

मी प.पू. डॉक्टरांच्या खोलीतच जात आहे. तसेच माझ्या मनाची दारे उघडून मी माझ्या अंतर्मनात जात आहे.

४. लिखाण करणे

प.पू. डॉक्टरच माझ्या माध्यमातून लिहित आहेत. त्यांच्या सात्त्विक अक्षरांतून मला चैतन्य मिळणार आहे. तसेच त्यांनी सूक्ष्मातून आधीच लिहिले आहे. आता स्थुलातून माझ्या माध्यमातून ते लिहून घेत आहेत.

५. साधकांशी साधनेविषयी बोलणे

बोलणारा साधक आणि मी दोघांना चैतन्य मिळू दे. प.पू. डॉक्टर, तुम्हीच माझ्या माध्यमातून बोलून घ्यावे. त्यातून आम्हा दोघांची साधना होऊ दे.

६. साधकांचे बोलणे ऐकणे

समोरच्या साधकाच्या माध्यमातून प.पू. डॉक्टरच माझ्याशी बोलत आहेत आणि माझ्या जागी बसून तेच ऐकत आहेत. त्या ऐकण्यातून मला चैतन्य मिळत आहे.

७. साधकांना पहाणे

साधकांमुळेच माझी साधना होते. त्यांचे गुण शिकणे शक्य होते. त्यांच्यात ईश्‍वर आहे. त्यांच्या माध्यमांतून देव मला साहाय्य करणार आहे. माझ्या माध्यमातून प.पू. डॉक्टरच सर्वांकडे कौतुकाने पहात आहेत. त्यांच्या पहाण्यातूनही मला चैतन्य मिळत आहे.

८. बसणे

चैतन्याच्या गादीवर बसत आहे.

– कु. अनुराधा वाडेकर (आताच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर)

यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात