सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांची लहानपणापासून साधनेच्या अनुषंगाने झालेली वाटचाल – भाग १

‘सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करून आतापर्यंत ९६ साधकांनी संतपद प्राप्त केले आहे, तर १५ साधक सद्गुरु पदावर आरुढ झाले आहेत. त्यांपैकी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर १२ व्या संत आणि ६ व्या सद्गुरु आहेत. दैनिक सनातन प्रभातमधून वेळोवेळी संतांकडून साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे, त्यांनी साधनेसंदर्भात केलेले मार्गदर्शन, त्यांच्या संदर्भात साधकांना आलेल्या अनुभूती इत्यादी प्रसिद्ध करण्यात येते. त्यातून साधकांना आणि समाजाला त्या संतांचा अध्यात्मातील अधिकार कळायला साहाय्य होते; पण त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी साधनेचे काय प्रयत्न केले, आयुष्यात त्यांना किती संकटांना तोंड द्यावे लागले, हे कोणालाच ज्ञात नसते. हे सर्व सद्गुरु अनुताईंनी साधनेच्या आरंभापासून सविस्तर लिखाण केल्याने आपल्याला वाचायला मिळत आहे. यातील अल्पसा भाग आपण क्रमशः पहाणार आहोत.

सद्गुरु अनुताईंमुळे साधकांना शिकायला मिळत आहे आणि त्यांचा आदर्श साधक डोळ्यांसमोर ठेवू शकत आहेत. ते वाचून साधकांमध्ये ‘सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्याप्रमाणेच आपणही त्रासांवर मात करून साधनेत प्रगती करू शकतो’, असा आत्मविश्‍वास निर्माण होऊन साधना करण्यासाठी स्फूर्ती मिळेल. असे मार्गदर्शनपर लिखाण केल्याबद्दल सर्व साधक त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहेत.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्यामध्ये बालपणी असलेले गुण

१ अ. चाळीतील सर्व मुलांशी जवळीक असणे आणि त्यांना एकत्र करून खेळणे

‘ठाण्यामध्ये एका छोट्या चाळीतील १० x १० च्या २ खोल्यांमध्ये आई–बाबा आणि मी रहायचो. तेथे १० कुटुंबे होती. त्या सर्वांकडे मी अगदी मोकळेपणाने जायचे. सर्व जण माझे लाड करायचे आणि मला खाऊ द्यायचे. मी त्यांच्या घरातील सदस्य असल्याप्रमाणे माझ्याशी वागायचे. मी आले की, सर्वांना आनंद व्हायचा. ‘ते वेगळे आहेत’, असे मला वाटत नसे. ‘सर्व जण माझ्या कुटुंबातील आहेत’, असे मला वाटायचे. चाळीतील सर्व लहान मुलांशीही माझी जवळीक होती. मला लहान मुलांशी खेळायला फार आवडायचे. आम्ही संध्याकाळी नियमित ‘लगोरी’, ‘सोनसाखळी’, ‘राम–लखन–सीता’ हे खेळ खेळायचो. मी त्यांची मुख्य नेता असायची.

१ आ. समजूतदारपणा

आईने मला सांगितले, ‘‘तुझ्यात अतिशय समजूतदारपणा होता. मुलांमध्ये भांडण झाले, तर तू सोडवायचीस. त्यांना एकत्र करून तू समजावून सांगायचीस. तुझे कधीच कुणाशी भांडण होत नसे. तू सर्वांना एकत्रित करून खेळायचीस. सर्वांना तुझा आधार वाटायचा.’’

१ इ. अभ्यासात हुशार असणे

‘एकदा वडिलांच्या कार्यालयामधील एका महिलेने ‘तुमच्या अनूचा इयत्ता २ रीमध्ये ५ ते ७ तुकड्यांमधून प्रथम क्रमांक आला आहे. तिचे शाळेतील फलकावर नावही लिहिले आहे’, असे आई–बाबांना सांगितले. तेव्हा त्यांना पुष्कळ आनंद झाला. लहानपणी मी फार हुशार होते.

१ ई. चित्रकलेची आवड असणे आणि चित्रकलेचे शिक्षण घेण्याची इच्छा देवाने पूर्ण करणे

१ ई १. वडिलांच्या कार्यालयात फळ्यावर चित्र काढायला सांगितल्यावर एका मुलीचे चित्र काढणे आणि ते चित्र पाहून सर्वांनी कौतुक करणे

लहानपणापासूनच मला चित्रे काढण्याची पुष्कळ आवड होती. मी पाटीवर आंबा, फूल इत्यादींची छान चित्रे काढायचे. मी ४ वर्षांची असतांना बाबांच्या कार्यालयात गेल्यावर तिथे मला फळ्यावर चित्र काढायला सांगितले. तेव्हा मी माझ्यासारख्याच दिसणार्‍या मुलीचे चित्र काढले. ते चित्र पाहून सर्वांनी माझे कौतुक केले.

१ ई २. ‘अ‍ॅप्लाईड आर्ट’च्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे

चित्रकलेच्या परीक्षेमध्ये मी मन लावून चित्र काढत असे. १० वीच्या सुटीत मी चित्रकलेच्या शिकवणीवर्गाला जात होते. ‘अ‍ॅप्लाईड आर्ट’च्या दोन्ही परीक्षांमध्ये अनुक्रमे ‘ए प्लस’ आणि ‘ए’ अशी श्रेणी मिळाली होती.

१ ई ३. कला विभागातून शिक्षण घेण्याचा निश्‍चय करणे आणि ‘पेन्सिल शेडिंग’ चांगले येत असल्यामुळे ‘जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’मध्ये प्रवेशाच्या वेळच्या तोंडी परीक्षेत निवड होणे

आईला मी ‘आधुनिक वैद्य व्हावे’, असे वाटत होते. लहानपणी मला कुणी विचारले, ‘तू मोठेपणी कोण होणार ?’, तर ‘मी शिक्षिका होणार’, असे मी सांगायचे. इयत्ता ७ वीमध्ये असतांना ‘मला कला विभागातच शिक्षण घ्यायचे आहे. मी त्यासाठीच प्रयत्न करणार’, असा माझा निश्‍चय झाला. माझा मामा त्या वेळी वास्तूविशारद (आर्किटेक्ट) होता. त्याचे रेखाचित्र (ड्रॉईंग) मी नेहमी निरखून पहायचे. त्यानेही मला कला विभागात जाण्यास प्रोत्साहन दिले. इयत्ता १० वीनंतर मी कलाक्षेत्रात जाण्याच्या दृष्टीने ‘जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’मध्ये प्रवेश घ्यायचे ठरवले. त्या वेळी तिथे प्रवेश मिळणे फार कठीण होते. मुंबईत कलेतील पदवीपर्यंत शिक्षण देणारे ते एकच महाविद्यालय होते. महाविद्यालयात प्रवेशासाठी माझी तोंडी परीक्षा होती. त्या वेळी मी काही चित्रे घेऊन दाखवायला गेले होते. माझे ‘पेन्सिल शेडिंग’ पुष्कळ चांगले होते. तेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘पोट्रेट’ चित्र ‘पेन्सिल शेडिंग’मध्ये काढले होते. मी ते दाखवायला घेऊन गेले होते. तेव्हा आईने मला आधीच सांगितले होते, ‘‘तुला ‘हे चित्र तूच काढले आहेस का ?’, असे विचारतील. तेव्हा तू ‘हो, मीच काढले आहे. तुम्ही मला कागद–पेन्सिल द्या. मी तुम्हाला काढून दाखवते’, असे सांग.’’ अगदी तसेच मला विचारले गेले आणि मी तेच उत्तर दिले आणि त्यावर माझी निवड झाली.

 

२. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांना
लहानपणी आलेल्या आध्यात्मिक अनुभूती

२ अ. ‘स्वतः ऋषिकन्या आहे’, असे वाटणे

कधीतरी ‘मी मागील जन्मात ऋषिकन्या होते’, असे दृश्य मला दिसायचे. ‘मी ऋषिकन्येच्या पांढर्‍या वेशात आहे. केसांमध्ये पांढरा गजरा माळून आश्रमाजवळ फुले तोडत आहे’, असे मला जाणवायचे. शकुंतलेचा वेष कसा असेल, तसा माझा वेष दिसायचा. मला या दृश्यांचा अर्थ तेव्हा समजत नव्हता. मला मनाचेच खेळ वाटायचे; पण ‘देव त्या वेळी मला कसलीतरी जाणीव करून देत होता आणि सांगत होता’, हे माझ्या लक्षात आले.

२ आ. ‘श्रीराम आणि श्रीभवानीदेवी स्वतःच्या समवेत आहे’, असे जाणवणे

मला लहानपणापासून श्रीराम आवडायचा. मी मनानेच ‘श्रीराम, श्रीराम’, असा जप करायचे. मी त्याच्याशी बोलायचे. माझ्या मनातील अनेक विचार मी त्याला सांगायचे. ‘श्रीराम माझ्या समवेत आहे’, असे मला जाणवायचे. ‘अनेकदा भवानीदेवीही माझ्या समवेत आहे’, असे मला जाणवायचे.

२ इ. शिवपिंडीचा आकार मोठा होत असल्याचे जाणवणे

माझे मन कधी दुःखी झाले, तर मी ठाणे येथील कौपिनेश्‍वराच्या मंदिरात जाऊन बसायचे. ती शिवपिंडी मला पुष्कळ जवळची वाटायची. ‘शिवपिंडी पहातांना कधी कधी तिचा आकार मोठा होत आहे’, असे मला जाणवायचे.

 

३. लग्न, संसार अशा मोहमायेच्या
विषयांतून बाहेर पडण्यासाठी देवाचाच विचार
सतत करत मनाला समजावून साधनेचे प्रयत्न करत रहाणे

३ अ. साधनेच्या आरंभी लग्न करण्याचा मनात
विचार आल्यावर ‘लग्न झाले आणि नाही झाले, तरी कोणत्याही
परिस्थितीत आनंदाने साधना करणेच, देवाला अपेक्षित आहे’, हे मनाला समजावत असणे

‘साधनेमध्ये मला मोहमायेचा त्याग करून प्रयत्न करणे सहज शक्य झालेले नाही. त्यासाठी पुष्कळ संघर्ष करावा लागला. साधनेच्या आरंभी माझ्याही मनात ‘आपण संसार करावा. आपल्यावर प्रेम करणारे कुणी असावे’, असे वाटायचे. कुणाचे लग्न झालेले समजले म्हणजे ‘आपणही लग्न करावे’, असे वाटायचे. त्याच वेळी ‘आपल्याला साधना तर करायची आहे. त्यामुळे साधनेला पूरक असेल, तरच आपण लग्नाचा विचार करावा’, असाही विचार मनात यायचा. लग्न करणे माझ्या प्रारब्धात आहे कि नाही, हेही ठाऊक नसल्याने लग्न झाले तरी आणि नाही झाले तरी साधनाच करायची असल्याने जे समोर येईल ते स्वीकारायचे, अशा दोन्ही गोष्टींसाठी मी माझ्या मनाची सिद्धता (तयारी) करत होते. ‘लग्न झाले आणि नाही झाले, तर काय होईल ?’, याचा विचार मनात यायचा अन् त्या वेळी ‘स्वीकारलेल्या परिस्थितीत ‘आनंदाने साधना करणेच’ देवाला अपेक्षित आहे’, हे मी माझ्या मनाला समजावत होते. ‘एखादी गोष्ट मिळाली म्हणून त्यात वाहवत जायचे नाही आणि एखादी गोष्ट मिळाली नाही; म्हणून त्याची खंतही वाटून घ्यायची नाही. आपले सर्व प्रयत्न ईश्‍वरप्राप्तीसाठीच करायचे, म्हणजे तोच आपल्याला त्याही स्थितीतून बाहेर काढतो’, हे लक्षात घेऊन साधना करत रहाण्याचे प्रयत्न माझ्याकडून झाले. यातून हेच लक्षात आले की, मनाचा कितीही संघर्ष झाला, तरी प्रत्येक स्थितीत आपल्याला ईश्‍वराचे चरण पकडून रहाता आले पाहिजे, तरच आपल्याला त्याही स्थितीतून बाहेर पडता येते.

३ आ. देवाचाच विचार सतत धरून ठेवल्याने
प्रत्येक प्रसंगातून आणि संघर्षातून बाहेर पडणे सोपे होणे

प्रत्येक प्रसंगात मी मनाला प्रश्‍न विचारत राहिल्याने मनाचा संघर्ष झाला, तरी मला मोहमायेतून बाहेर पडता आले. एखादी व्यक्ती मला आवडली, तर मी मनाला प्रश्‍न विचारायचे, ‘एकीकडे ही व्यक्ती आहे आणि दुसरीकडे देव आहे. अनु, तू कोणाला निवडणार ?’ त्या वेळी आतून एकच उत्तर मिळायचे, ‘कितीही संघर्ष करावा लागला, तरी मला देवच हवा आहे. तोच मला प्राप्त परिस्थितीतून बाहेर काढणार आहे.’ अशा प्रकारे देवाचाच विचार सतत धरून ठेवल्यामुळे मला प्रत्येक प्रसंगातून आणि संघर्षातून बाहेर पडणे सोपे झाले.’

– (सद्गुरु) कु. अनुराधा वाडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.१२.२००८)

 

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी साधनेच्या अनुषंगाने
वेळोवेळी केलेले चिंतन आणि त्यादिशेने झालेली त्यांची वाटचाल

१. कु. अनुराधा वाडेकर यांची साधनेसंदर्भातील अंतर्मुखता

१ अ. कु. अनुराधा वाडेकर यांनी त्यांच्या व्यष्टी साधनेचे केलेले नियोजन

१ अ १. दिवसभराचे एकूण नियोजन

१ अ २. करत असलेल्या दिवसभराच्या सविस्तर नियोजनाचे एक प्रातिनिधिक उदाहरण – २८.४.२००९ या दिवसासाठी केलेले नियोजन
अ. सकाळी

६ ते ६:१५ – आवरणे

६:१५ ते ७:०० – प.पू. पांडे महाराजांच्या खोलीची स्वच्छता

७ ते ७:३० – व्यायाम

७:३० ते ८:०० – वैयक्तिक खोलीची स्वच्छता

८ ते ८:३० – वैयक्तिक आवरणे

८:३० ते ९:०० – न्याहरी आणि कपडे भिजवणे

९ ते ११:०० – आध्यात्मिक उपाय, स्वयंसूचनेची ३ सत्रे आणि सारणी (तक्ता) लिखाण

११ ते दुपारी १२:३० – कपडे धुण्याची सेवा

आ. दुपारी

१२:३० ते १:०० – जेवण

१ ते ४ – सेवा

४ ते ५ – नामजप-उपाय

इ. सायंकाळी

५ ते ५:३० – न्याहरी, साधकांशी बोलणे इत्यादी

५:३० ते रात्री ९ – सेवा

ई. रात्री

९ ते ९:३० – जेवण आणि स्वयंसूचनेचे १ सत्र

९:३० ते ११:०० – प.पू. पांडे महाराजांना मालीश

११:०० ते १२:०० – वैयक्तिक आवरणे आणि स्वयंसूचनेचे १ सत्र

१२:०० ते सकाळी ६:०० – झोपणे

१ अ ३. अनावश्यक जाणारा वेळ वाचवण्यासाठी केलेली उपाययोजना

अ. आदल्या दिवशी दुसर्‍या दिवशी करायच्या सेवांचे नियोजन करणे आणि प्राधान्य ठरवणे

आ. ज्या सेवा ज्या वेळी करणे आवश्यक आहेत, त्याच वेळी त्या करणे

इ. सेवा प्रलंबित न ठेवता एकेक सेवा पूर्ण करत जाणे

ई. इतरांशी अनावश्यक बोलण्यात वेळ वाया जायला नको, यासाठी प्रार्थना करणे, ‘मी ज्यांच्याशी बोलणे अपेक्षित नाही, त्यांना माझ्याकडे येण्याची बुद्धी व्हायला नको.’

उ. साधकांशी शक्यतो अल्पाहाराच्या (न्याहरीच्या) वेळेत बोलणे

ऊ. साधकांना प्रथम आश्रमातील उत्तरदायी साधकांशी बोलायला सांगणे आणि उत्तरदायी साधकांना ‘आवश्यक असल्यासच साधकांना माझ्याकडे पाठवावे’, असा निरोप देणे

ए. स्वागतकक्षात काही द्यायचे असल्यास त्याची सूची (यादी) तयार ठेवणे. (यामुळे पुनःपुन्हा ये-जा करण्यात वेळ जात नाही.)

ऐ. हातात घेतलेली वस्तू पुन्हा ठेवतांना ती जागेवरच ठेवायची सवय लावणे (नाहीतर वस्तू आवरण्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागतो.)

ओ. रात्रीची ६ घंटे झोप पूर्ण करणे (नाहीतर नामजप-उपायांमध्ये झोप येते आणि वेळ वाया जातो.)’

– कु. अनुराधा वाडेकर (संत होण्यापूर्वीचे, म्हणजे वर्ष २०११ पूर्वीचे लिखाण)

१ आ. कु. अनुराधा वाडेकर यांनी दिवसभरातील
विविध सेवा किंवा कृती यांविषयी ठेवलेले दृष्टीकोन आणि भाव

१ आ १. ‘दैनिक सनातन प्रभात’चे वाचन

अ. ‘दैनिक सनातन प्रभात’च्या वाचनाने प.पू. डॉक्टरांना अपेक्षित अशा राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या संवेदना माझ्या अंतर्मनात निर्माण होऊ देत.

आ. दैनिक सनातन प्रभात हा माझा सहसाधक आहे. तो मला योग्य मार्गदर्शन करून साधनेची पुढची दिशा देतो.

१ आ २. सत्सेवा करणे

अ. मला प्रयत्नांची पराकाष्ठा करून गुरुकृपा संपादन करायची आहे.

आ. मला ‘दिसेल ते कर्तव्य’ या वृत्तीने सेवा करायची आहे.

इ. आपली योग्य कृती हीच आपला शिक्षक आहे.

ई. मनात येणार्‍या पहिल्या (ईश्‍वराच्या) विचाराप्रमाणे कृती करायची आहे.

उ. सत्सेवेतूनच ईश्‍वराकडे जाण्याची वाट मोकळी होते. नामजप सूक्ष्म असल्याने तो सत्सेवेमध्येही सातत्याने चालू राहू शकतो.

१ आ ३. प.पू. पांडे महाराजांची सेवा

अ. प.पू. पांडे महाराज हे प्रत्यक्ष ईश्‍वर आहेत. ईश्‍वराची सेवा, म्हणजेच प.पू. डॉक्टरांची सेवा करण्याचे भाग्य मला मिळाले आहे.

आ. प.पू. पांडे महाराजांची खोली ही ‘तपोलोक’ असून मी सेवेसाठी त्यांच्या खोलीत जातांना पृथ्वीवरून तपोलोकात जात आहे. मला तेथील चैतन्य मिळत आहे.

इ. मला आध्यात्मिक त्रास असूनही मी प.पू. पांडे महाराजांची सेवा त्यांच्यातील चैतन्यामुळे करू शकत आहे.

ई. प.पू. पांडे महाराजांच्या स्पर्शाने मी पावन होत आहे. अहिल्येला श्रीरामाचा स्पर्श झाल्यावर ती पुनर्जिवीत झाली. तसाच माझा पुनर्जन्म प.पू. पांडे महाराजांच्या स्पर्शातील चैतन्याने होत आहे.

उ. प.पू. पांडे महाराजांच्या चैतन्याने त्यांच्या खोलीतील प्रत्येक गोष्ट दैवी आणि सुगंधित झाली आहे. त्याचा मला लाभ होत आहे.

ऊ. प.पू. पांडे महाराजांच्या वाणीतील चैतन्याने माझ्या देहाची शुद्धी होत आहे.

ए. प.पू. पांडे महाराजांच्या अस्तित्वाने माझ्या सप्तचक्रांवरील त्रासदायक शक्तीचे आवरण दूर होऊन मी चैतन्याने न्हाऊन निघत आहे.

१ आ ४. त्याग करणे

अ. त्यागातच खरा आनंद आहे.

आ. मिळवण्यापेक्षा देण्यात अधिक आनंद आहे.

इ. एक दिवस मला सर्वस्वाचा त्याग करून ईश्‍वरचरणी लीन व्हायचे आहे.’

१ आ ५. प.पू. पांडे महाराज करत असलेले नामजपादी उपाय

अ. संतसहवास आणि संतांचे उपाय मिळणे, हे फार मोठे भाग्य आहे.

आ. मी फार लांबून चालत येऊन प.पू. पांडे महाराजांच्या नामजपादी उपायांना बसले आहे. या उपायांचा जास्तीतजास्त लाभ करून घेण्यासाठी मला तळमळीने प्रार्थना करायची आहे.

इ. मी प्रत्यक्ष ईश्‍वराच्या समोर उपायांना बसले आहे. त्याच्या अस्तित्वाने आणि चैतन्याने माझे प्रारब्ध, स्वभावदोष, अहं इत्यादी सर्व जळून मी त्याला अपेक्षित अशी शुद्ध होत आहे.

ई. माझ्या प्रयत्नांनी माझ्यावरील त्रासदायक आवरण नष्ट करण्यासाठी आणि माझा त्रास दूर होण्यासाठी कित्येक जन्म लागले असते. केवळ प.पू. डॉक्टरांच्या कृपेनेच मला प.पू. पांडे महाराजांचे उपाय मिळाले असून अल्प काळात माझा त्रास न्यून (कमी) होणार आहे.

उ. जगात अनेक जण दुःखी आहेत; पण त्यांच्याकडे त्यावर उपाय नाहीत. मी किती भाग्यवान आहे ! मला प.पू. पांडे महाराजांसारख्या संतांचे उपाय मिळत आहेत.

१ आ ६. शिकायला मिळालेली सूत्रे, अनुभूती यांविषयीचे लिखाण करणे

अ. प.पू. डॉक्टर आजारी असतांनाही ग्रंथांसाठी संगणकावर प्रतिदिन २०० ‘केबी’ एवढे लिखाण (‘ए-४’ आकाराची ४० पाने) पडताळतात. मी दिवसभरात किती लिखाण केले ?

आ. मला माझ्यासाठी नाही; पण इतरांसाठी लिहून ठेवावेच लागेल.

१ इ. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी त्यांच्या
साधनेत सातत्य का रहात नाही, यासंदर्भात केलेले चिंतन

‘१२.७.२००३ या दिवशी माझ्या मनात विचार आला, ‘माझ्या साधनेच्या प्रयत्नांमध्ये सातत्य का रहात नाही ?’ तेव्हा पुढील सूत्रे लक्षात आली.

१. माझे ध्येय निश्‍चित करण्याचे प्रमाण अल्प आहे.

२. सेवा करतांना बर्‍याचदा प्रयत्नांचा कल सेवेतून अंतर्मुखता निर्माण होण्यापेक्षा कृतींकडे अधिक असतो.

३. अंतर्मुखतेची प्रक्रिया दुःखदायक असते आणि लवकर साध्य होणारी नसते.

४. एखाद्या गोष्टीमध्ये सातत्य टिकवण्याच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे विचार केल्यास लाभ मिळतो.

अ. प्रयत्नांत सातत्य ठेवल्यास ‘मला काय साध्य होणार आहे ?

आ. सातत्याने प्रयत्न न केल्यास माझी साधनेत काय हानी होणार आहे ?

या विचारप्रक्रियेवरून साधनेचा दृष्टीकोन सुस्पष्ट होऊन प्रयत्नांना दिशा मिळते.

– कु. अनुराधा वाडेकर

१ ई. कु. अनुराधा वाडेकर यांच्या मनातील विचार आणि त्यावर देवाने दिलेली उत्तरे

१ ई १. अहंच्या संदर्भातील सूत्रे

मी : मला पुष्कळ सेवा करायची आहे.

देव : तुला काय करायचे आहे, याला काहीच महत्त्व नाही. मला तुझ्याकडून काय करवून घ्यायचे, हे महत्त्वाचे आहे. तुझ्या अस्तित्वाला शून्य किंमत आहे. तू केवळ माध्यम आहेस.

मी : मला पुष्कळ पुष्कळ सेवा करायची आहे.

देव : तू करणार असशील, तर पुष्कळ कशा होतील ? माझ्यावर सोपवलेस, तरच त्या होऊ शकतील.

मी : मला माझे अस्तित्व नको आहे.

देव : आहे ते अस्तित्व तू तुझे समजतेस, हीच तुझी चूक आहे. तो तुझा भ्रम आहे.

१ ई २. त्रास असणार्‍या साधकांना मार्गदर्शनपर सूत्रे

मी : त्रास असणार्‍यांनी ‘मला त्रास आहे’, असे म्हणण्यापेक्षा प्रसंगावर मात कशी करावी ? सेवेची आणि साधनेची फलनिष्पत्ती अन् शिकण्याची वृत्ती कशी वाढवावी ?

देव : एखादी गोष्ट करतांना माझी भूमिका काय असणार, हे ठरवणे आवश्यक आहे, उदा. एखादी बैठक घेतांना पुढील सूत्रे लक्षात घेतली पाहिजेत.

अ. मी बैठक घेणार आहे, तर मला कोणती माहिती असणे आवश्यक आहे ?

आ. ‘स्वतः बैठक घेणार नसल्यास बैठकीत काही अडले, तर सांगणार’ किंवा ‘बैठक घेणार्‍याकडून शिकणार’, असे ठरवणे

इ. एखाद्याची अडचण असल्यास ती सोडवणे

ई. समोरच्याकडून शिकणे

उ. ‘एकूण प्रसंगातून काय शिकणार’, असे ठरवल्यास शिकण्याची वृत्ती वाढेल.

ही भूमिका ठरवली आहे आणि ‘मला काहीतरी करायचे आहे; पण त्रासामुळे करू शकत नाही’, असे झाले, तर देव त्यावर मात करतो किंवा मात करण्यासाठी शक्ती देतो; मात्र ‘मला काहीच करायचे नाही. मी नुसताच बैठकीत बसलो आणि मला त्रासही आहे, तर माझे त्रासाकडेच लक्ष जाणार. बैठकीत नुसते बसून काहीच उपयोग होणार नाही. ध्येय असल्यास संघर्ष होईल आणि तसे प्रयत्नही होतील. त्यामुळे शिकण्यातील आनंद मिळेल. देवही निश्‍चितपणे साहाय्य करेल.

१ ई ३. साधनेसंदर्भातील सूत्रे

मी : ‘माझी साधना योग्य होत आहे कि नाही’, असे सातत्याने वाटते.

देव : ७० टक्के आध्यात्मिक पातळी गाठेपर्यंत मन असते. तोपर्यंत असे वाटणारच. त्यानंतर मनोलय होईल आणि शांती अनुभवता येईल.

१ ई ४. मनाच्या स्थितीसंदर्भात केलेले मार्गदर्शन

मी : माझ्या मनाची स्थिती सातत्याने दोलायमान असते. हे करू कि ते करू, योग्य कि अयोग्य, असे वाटते.

देव : तू स्वतःच्या मनाने काहीच ठरवू नकोस. तू मला विचार आणि त्याप्रमाणे कृती कर.

मी : माझ्या मनात तुझ्याऐवजी इतर असंख्य विचार असतात.

देव : त्या असंख्य विचारात तू काही शोधण्याचा प्रयत्न केलास, तरी तिथे मीच असेन. त्या विचारांमध्ये मला शोधण्याचा प्रयत्न कर.

मी : मी वेळ वाया घालवते का रे ?

देव : वेळ तू वापरतेस का ? वेळेचे नियंत्रण तुझ्याकडे आहे का ? मग गेलेला वेळ वाया कसा समजतेस ? त्यातून शिकल्यानेच तुझा पुढचा वेळ वाचेल.

मी : मी पुष्कळ अस्वस्थ आहे. मला स्थिर कर.

देव : अस्थिरतेमुळेच स्थिरतेचे महत्त्व कळते.

मी : ‘मी तुझ्यात कधी विलीन होणार ?’, असे मला वाटते.

देव : हा विचार गेला की, तू माझ्यात विलीन झालेली असशील.

मी : माझे तुझ्यापेक्षा इतरांकडे जास्त लक्ष जाते.

देव : इतरांमध्येही मला पाहिलेस, तर माझ्याकडेच लक्ष राहील.

१ ई ५. प.पू. डॉक्टरांच्या संदर्भातील सूत्रे

मी : परात्पर गुरु डॉक्टरांनी मला सर्वच दिले आहे.

देव : मग आता तू तुझे सर्वस्व त्यांना अर्पण कर.

मी : प.पू. डॉक्टरांना अपेक्षित असे मला बनव.

देव : मला अपेक्षित होण्यासाठीच सर्व घडत आहे.

मी : तूला अपेक्षित असेच माझ्याकडून होऊ दे.

देव : मला अपेक्षित असेच घडत आहे; पण ते तुला मनापासून स्वीकारता येत नाही, ही अडचण आहे.

१ ई ६. देवाने सतत साधिकेच्या समवेत असल्याचे सांगणे

मी : इतर साधक आनंदात किंवा हसतांना दिसले, तर ‘मी आनंदी नाही’, असे मला वाटते.

देव : मी तुझ्यात आहे. मी तुझ्या समवेत आहे. यातच खरा आनंद आहे.

मी : देवा, तू कुठे आहेस ?

देव : मी इथेच तुझ्या समवेत आहे.

मी : तू माझ्याशी बोल ना !

देव : तुझ्यातून मीच बोलतो आणि ऐकतो. (देवाच्याच शक्तीने आपण बोलू शकतो.)

मी : तू माझ्यावर रागावलास का ?

देव : मी म्हणजे काय तू आहेस का रागवायला ? (ईश्‍वर मनुष्याप्रमाणे कोणावर कधीही रागावत नाही.)

मी : तू मला सोडून कुठेही जायचे नाही.

देव : तूच मला सोडून जाण्याचा सतत विचार करतेस. मी तर तुला कायमचे घट्ट बांधून ठेवले आहे.

मी : तू माझ्या समवेत रहा.

देव : मी तुझ्यातच आहे.

मी : तू मला समजून घेतोस. तू किती चांगला आहेस ?

(देव फक्त हसला.) (मार्च २००९)

 

२. तीव्र त्रासामुळे होणार्‍या संघर्षातही
जिद्द, चिकाटी आणि प.पू. डॉक्टरांवरील श्रद्धा
यांच्या बळावर लढून आदर्श ठरणार्‍या सद्गुरु अनुताई !

‘एकदा एक साधिका सद्गुरु अनुताईंना म्हणाली, ‘‘मला इतरांसारखी सेवा जमत नाही.’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘तू तुझ्या क्षमतेनुसार सेवा करायला हवी. संघर्षातच साधना असते.’’ त्यांनी तिला स्वत:चे उदाहरण दिले. पूर्वी त्यांच्याकडे (सद्गुरु अनुताईंकडे) प.पू. पांडे महाराजांचे कपडे धुण्याची सेवा होती. कपडे धुतांना त्यांना पुष्कळ त्रास व्हायचा. तीव्र त्रास होऊन हात वाकडे व्हायचे. मधेच त्या कडेला जाऊन बसायच्या. असे करत-करत त्यांना कपडे धुण्यासाठी ५ – ६ घंटे लागायचे. असह्य त्रासामुळे पू. ताई प.पू. महाराजांचे कपडे धुतलेले पाणी उपाय होण्यासाठी प्यायच्या. ती सेवा न सोडता ‘संघर्षातच साधना आहे’, असा दृष्टीकोन ठेवून त्याच स्थितीत पू. ताईंनी ती सेवा केली. त्यानंतर त्या सेवेला लागणारा कालावधी न्यून होत गेला. हे ऐकल्यावर ‘पू. ताईंचा भाव, श्रद्धा, त्रासाशी लढण्याची क्षात्रवृत्ती आणि चिकाटी किती असेल ?’, याची कल्पना आली.’

– कु. सोनाली गायकवाड, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

 

३. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांना
साधनेच्या प्रवासात स्वतःत जाणवलेले पालट
आणि त्यांतून त्यांनी साधकांपुढे ठेवलेला आदर्श

(साधना करत असतांना सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचा निर्जीव वस्तू, केस, कपडे, आवडी-निवडी, यांकडे बघण्याचा पूर्वीचा आणि आताचा दृष्टीकोन, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले, देव, साधना यांविषयीच्या त्यांच्या पूर्वीच्या विचारांमध्ये आता झालेले दृष्टीकोनात्मक पालट आणि त्याविषयी त्यांनी केलेले चिंतन येथे दिले आहे. – संकलक)

३ अ. विविध वस्तूंकडे पहाण्याचा दृष्टीकोन

३ अ १. पूर्वी : ‘पूर्वी मला वस्तूंविषयी आसक्ती वाटायची. ‘चांगल्या वस्तू माझ्याकडे हव्यात’, ‘माझी वस्तू’, ‘मला वस्तू हव्यात’, ‘हे हवे, ते हवे’, ‘असे व्हायला हवे’, असे मला वाटायचे.

३ अ २. आता : आता मला वस्तूंविषयी आत्मीयता वाटते. ‘वस्तूंना जवळ घेऊन कवटाळावे. त्यांच्या पाप्या घ्याव्यात’, असे मला वाटते. ९.१२.२००८ या दिवशी मला निर्जीव वस्तूंविषयी प्रेम आणि कृतज्ञता वाटू लागली. ‘लेखणीमुळे (पेनमुळे) मी लिहू शकते’, अशी मला कृतज्ञता वाटली. लेखणी, छोटी पिशवी (पाऊच) आणि पाण्याची बाटली यांच्याकडे प्रेमाने पहाणे, न्याहाळणे, अशा कृती माझ्याकडून होऊ लागल्या. अत्तराच्या बाटलीकडे पाहून ‘हे अत्तर किती भाग्यवान आहे ! देवाच्या हातात आल्याने आता तेही उपाय करते’, असे विचार माझ्या मनात येऊ लागले.

३ आ. केस

३ आ १. पूर्वी : पूर्वी कुणाचे लांब आणि जाड केस पाहिले की, ‘माझे केस पातळ, गळणारे अन् आखूड आहेत’, असे मला वाटायचे.

३ आ २. आता : आता ‘डोक्यावर केस आहेत. ते गुंतत नाहीत आणि ते पातळ आहेत’, यापेक्षाही ‘ते आहेत’, हे महत्त्वाचे असून ईश्‍वराच्या इच्छेने, त्याला अपेक्षित तेवढेच अन् तेवढ्याच लांबीचे ते असू देत’, असे मला वाटते. पूर्वी माझ्याकडून केस पुष्कळ जोरात विंचरले जायचे आणि न्हायल्यावर खसाखसा पुसले जायचे. आता ‘ते देवाने दिलेले आहेत आणि ते त्याचेच आहेत’, म्हणून ते व्यवस्थित विंचरणे अन् त्यांना व्यवस्थित तेल इत्यादी लावणे माझ्याकडून होते.

३ इ. कपडे

३ इ १. पूर्वी : पूर्वी ‘नवे कपडे हवेत. जुने अर्पण करूया’, असे मला वाटायचे. इतरांचे नवीन कपडे आवडले की, ‘त्या रंगाचे कापड आपणही घ्यावे’, असा विचार माझ्या मनात यायचा. नंतर ‘मला आवश्यक त्या वस्तू आणि आवडत्या रंगाचे कपडे कुणाच्या तरी माध्यमातून देव देईल’, असे वाटून मी त्याची वाट पहायचे. त्यात माझी अपेक्षा असायची.

३ इ २. आता : आता ‘आहे तेच नीट ठेवूया. जास्त काहीच ठेवायला नको आणि आहे त्याचाही वापर होत नसेल, तर ते योग्य व्यक्तीला देऊया’, असा विचार माझ्याकडून होतो.

३ ई. चांगल्या वस्तूंची आवड

३ ई १. पूर्वी : पूर्वी ‘माझ्याकडे सर्व वस्तू चांगल्या अन् सर्वांत सुंदर असायला हव्यात’, असे मला वाटायचे. तेव्हा ईश्‍वरी कृपेने मला आवडीचे असे न मिळता नावडत्या रंगाचे कपडे आणि वस्तू मिळायच्या. त्या वेळी मला त्यातून सुख मिळत नसे. देणारेही वेगळ्याच रंगाचे आणि असात्त्विक कपडे अन् वस्तू द्यायचे. ‘देवाची इच्छा समजून आणि माझी आसक्ती न्यून व्हावी’, म्हणूनच हे घडत आहे’, असा विचार करून मी सकारात्मक रहाण्याचा प्रयत्न करायचे. कुणाकडे गेले की, ‘त्यांनी काहीतरी द्यावे’, अशी मला अपेक्षा आणि आसक्ती असायची.

३ ई २. आता : आता ‘कुणी दिले नाही, तर बरे होईल. चांगली वस्तू दुसर्‍याकडे, त्याच्या अंगावरच शोभून दिसते’, असे मला वाटायला लागले. मी जेव्हा ‘खराब वस्तू आणि कपडे’ म्हणते, तेव्हा ‘त्यांना किती वाईट वाटत असेल ! त्यांनाही ‘कुणीतरी ‘आपले’ म्हणायला हवे’, असे वाटत असणार’, असे मला वाटायला लागले. तेव्हा मी त्या कपड्यांना जवळ घेऊन त्यांची क्षमा मागायचे. ईश्‍वराचा प्रसाद म्हणून त्यांचा स्वीकार करण्यास आरंभ केल्यावर मला सर्वच सुंदर वाटू लागले. आता ‘माझ्याकडे जे आहे, ते माझ्यासाठी योग्य आहे आणि जे नाही, ते आवश्यक नाही; म्हणून माझ्याकडे नाही’, असे मला वाटते.

३ उ. दागिने चोरीला जाणे

३ उ १. पूर्वी : असा प्रसंग झाला असता, तर मला दुःख झाले असते.

३ उ २. आता : मी सनातन संस्थेत आल्यानंतर वर्ष २००५ मध्ये उत्तर भारताच्या दौर्‍यावर असतांना एकदा आमच्या घरात चोरी झाली. आई-वडील काही दिवसांसाठी बाहेरगावी गेले होते. त्या वेळी घर फोडून आणि कपाट तोडून चोरी झाली होती. त्या वेळी घरातील सर्व पैसे आणि दागिने चोरीला गेले. देवापुढे असलेली चांदीची वाटी मात्र तशीच होती. आईने मला सांगितले, ‘‘तुझ्यासाठी केलेला हार, कानातले आणि सोन्याची साखळी चोरीला गेले.’’ त्या वेळी मला विशेष काही वाटले नाही. ‘जे जायचे, ते गेले आणि जे नशिबात आहे, ते मिळेल’, असे मला वाटले. त्याच कालावधीत उत्तर भारतामध्ये प्रवासात माझ्या गळ्यातील साखळी चोराने चोरली. ‘साखळी चोरली’, याचे मला काहीच वाटत नव्हते; मात्र गुरुदेवांनी दिलेल्या साखळीतील ‘गुरुकृपायोगाचे बोधचिन्ह’ गेल्याचे मला वाईट वाटत होते. माझ्या मनात विचार आला, ‘ज्या चोराला बोधचिन्ह मिळाले असेल, त्याचेही काहीतरी भाग्यच असेल; मात्र ते भक्ताच्या हातातून पडले असेल, तर भक्ताला देव ते मिळवून देईल’, असा मनात विचार आल्याने मी शांत आणि स्थिर झाले. ‘देवाने जीवनाचेच सोने केले आहे. त्यापुढे स्थुलातील सोन्याला काही किंमत नाही,’ याची नंतर मला जाणीव झाली.

३ ऊ. स्वतःतील वैगुण्य

३ ऊ १. पूर्वी : स्वतःतील वैगुण्य लक्षात आल्यावर वाईट वाटायचे.

३ ऊ २. ‘ईश्‍वराला अपेक्षित अशी मी असणार’, असे वाटणे : मला स्वतःत काही वैगुण्य जाणवले, तर ‘ईश्‍वराने त्याला जसे अपेक्षित आहे, तसेच मला बनवले आहे, तर तेच माझ्यासाठी योग्य आहे’, असा विचार माझ्या मनात येतो. ‘मी कसे असायला हवे ?’, याबद्दल ‘मला काय वाटते ?’, याला काहीच किंमत नाही. उद्या माझा एक पाय, एक हात जरी तुटला, तरी ‘ईश्‍वराला अपेक्षित अशी मी असणार’, असे मला समाधान वाटते.

३ ए. लग्नाविषयी विचार

३ ए १. पूर्वी : पूर्वी लग्न झालेल्या साधकांना पाहून ‘माझे लग्न व्हावे. आपले कोणीतरी असावे’, असे मला वाटायचे.

३ ए २. आता : आता ‘आपले कोणी नाही; म्हणून देवच आपला आहे’, ही भावना तीव्र होत असल्याची जाणीव होऊन मला कृतज्ञता वाटते.

३ ऐ. इतरांकडून अपेक्षा

३ ऐ १. पूर्वी : पूर्वी मी इतरांवर अवलंबून रहायचे. जवळच्या व्यक्तींकडून प्रेम आणि आपुलकी यांविषयीच्या कृतीची मी अपेक्षा करायचे. ‘देवाचे माझ्यावर प्रेम आहे’, याचा स्थुलातून काहीतरी पुरावा हवा’, अशी माझ्या मनाची धारणा होती. तसे झाले, ‘तर प्रेम आहे, नाहीतर नाही’, असे वाटून मला वाईट वाटायचे.

३ ऐ २. आता : आता कोणाही व्यक्तीपेक्षा ‘देव त्या व्यक्तीच्या माध्यमातून माझ्यासाठी करतो’, असे मला वाटते आणि जेव्हा माझ्यासाठी काही करत नाही, तेव्हा ‘माझ्या मनाच्या सिद्धतेसाठी, मला घडवण्यासाठी आणि माझ्या चांगल्यासाठीच हे आहे’, असे मला वाटते.

३ ओ. साधनेविषयी विचार

३ ओ १. पूर्वी

अ. ‘आहे त्या प्रसंगातून शिकणे आणि तो स्वीकारणे, म्हणजेच देवाची इच्छा. देवाची इच्छा स्वीकारणे म्हणजेच साधना’, असे मला वाटायचे.

आ. ‘मला आवश्यक ते देव त्या त्या वेळी देतच आहे. माझे जे काही आहे, ते योग्यच चालू आहे आणि ‘ईश्‍वर त्याच्या इच्छेने योग्य वेळी योग्य घडवत आहे, याबद्दल समाधान वाटणे म्हणजे साधना’, असे मला वाटायचे.

३ ओ २. आता : आता ‘प्रसंग काहीही घडो, मनाची स्थिती कशीही असो, त्याचा विचार नको. प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी योग्यच असणार. मला आश्रमातून घरी पाठवण्याची वेळ आली, तरी माझ्यासाठी ते योग्यच असणार आहे’, असे मला वाटते. ‘देव कधीही कुणाचे अकल्याण करत नाही’, यावर श्रद्धा ठेवून आहे त्या स्थितीत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून त्याच्या चरणांशी रहायचे. काहीही झाले, तरी त्याचे चरण सोडायचे नाहीत. सतत त्याच्या चरणांवर डोके असायला हवे आणि असे करणे म्हणजे साधना आहे’, असे मला वाटते. ‘त्याच्या चरणांशी रहाण्यासाठी माझ्या स्तरावर प्रयत्न करून काहीही उपयोग नाही. प्रार्थना आणि कृतज्ञता यांविना तरणोपाय नाही’, याची मला आतून जाणीव होते. (याचा अर्थ ‘प्रयत्न करायचे नाहीत, असे नाही; पण प्रार्थनेच्या बळावर प्रयत्न करायला हवेत’, हे माझ्या लक्षात येते.) शेवटी ‘देव करतो. देवाने केले. देवामुळे झाले. तोच करू शकतो. मी आणि माझा अहं त्याच्या चरणांशीच असायला हवा’, हे मला साध्य करायचे आहे.

३ औ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीचे विचार

३ औ १. पूर्वी

अ. आधी परात्पर गुरु डॉक्टरांशी बोलणे, त्यांच्या सहवासात रहाणे, त्यांच्याकडून शिकणे, यांत मला आनंद वाटायचा आणि ‘तेच श्रेष्ठ आहेत’, असे वाटायचे.

आ. नंतर ‘त्यांनी सांगितलेले करणे आणि त्यासाठी इतरांचे साहाय्य घेणे श्रेष्ठ’, असे मला वाटायचे.

इ. त्यानंतर ‘त्यांनी सांगितलेले’ आणि ‘त्यांना अपेक्षित असलेले’ यांत फरक आहे अन् त्यांना अपेक्षित ते होण्यासाठी धडपड करणे, म्हणजे साधना करणे आणि ‘ते श्रेष्ठ आहे’, असे मला वाटायचे.

३ औ २. आता : आता ‘त्यांना अपेक्षित असे करणे त्यांच्याच कृपेने होऊ शकते. मी प्रयत्न करून होऊ शकत नाही’, हे मला कळले. ‘ते झाले किंवा नाही झाले, तरी त्याच्या फळाची अपेक्षा नको’, हे साध्य होणे’, ही साधना आहे’, असे मला वाटते.

३ अं. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आवडते होण्याविषयी विचार

३ अं १. पूर्वी : आधी ‘परात्पर गुरु डॉक्टरांंची उत्तम आणि सर्वांत आवडती शिष्या व्हावे’, असे मला वाटायचे.

३ अं २. आता : आता ‘परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित असेच सर्व असायला हवे. त्यांच्याच इच्छेने आणि त्यांना योग्य वाटेल त्याच वेळी ते करवून घेणार’, असे मला वाटते. ‘मी आवडती शिष्या होण्यापेक्षा माझा अहं न्यून व्हायला हवा. माझी शरणागती वाढायला हवी. मी कुणी नाही. माझे अस्तित्वच नसायला हवे आणि देवाचेच अस्तित्व असावे’, असे मला वाटते.

३ क. देवाला अपेक्षित करणे

३ क १. पूर्वी

अ. पूर्वी ‘देवाला अपेक्षित असे मी करत नाही. देवही माझ्याकडून करवून घेत नाही’, म्हणून देवाबद्दल माझ्या मनात गार्‍हाणे असायचे. देवाला अपेक्षित असे करण्यासाठी माझा अट्टाहास असायचा आणि माझी धडपड व्हायची. माझ्या मनात असमाधान असायचे.

आ. नंतर ‘देवाला अपेक्षित असलेले त्याने करवून घ्यावे’, यासाठी माझ्याकडून प्रार्थना व्हायची.

३ क २. आता : आता ‘त्याला अपेक्षित असे तो करवून घेणारच आहे आणि झाले नाही, तरी त्याची इच्छा आणि ती स्वीकारणे, हीच माझी साधना आहे’, असे मला वाटते.

३ ख. देवाकडून अपेक्षा

३ ख १. पूर्वी : पूर्वी ‘देव त्याला जे अपेक्षित आहे, ते माझ्याकडून करवून घेत नाही’, असे मला वाटायचे. तेव्हा ‘देवाने माझ्यासाठी अमुक एक करावे’, ‘त्याने माझी प्रगती करावी’, अशा प्रकारच्या देवाकडून माझ्या पुष्कळ अपेक्षा असायच्या.

३ ख २. आता

अ. ‘देवाकडे काय मागायचे ?’, हे मला कळत नाही आणि ‘देव मला आवश्यकतेपक्षा अधिक जास्त देतच आहे’, असे मला जाणवते. ‘त्याबद्दल तरी कृतज्ञता असावी’, अशी माझ्याकडून प्रार्थना व्हायची.

आ. ‘देवाला जे अपेक्षित आहे, ते उमजण्याची पात्रता माझ्यात नाही. देव माझ्यासाठी काय करतो आणि किती प्रमाणात करतो, हे सर्व अमर्याद असल्याने मला कधीच कळणार नाही’, याची मला जाणीव होते. बाळाने न मागताही आई बाळाला जे हवे ते सर्व करतच असते. बाळाला ‘आई काय करते ?’, हे कुठे कळते ?; पण आईमुळेच ते घडते, मोठे होते आणि त्याच्यावर संस्कार होतात. तसेच हे आहे. बाळाला कुठे कळते आईची महती ? आईच्या प्रेमात अपेक्षा असतात. देवाचे प्रेम मात्र सदैव निरपेक्ष असते.

कृतज्ञता

माझ्या प्रत्येक चांगल्या-वाईट स्थितीत, प्रत्येक परिस्थितीत देवाने मला सांभाळले आहे, सावरले आहे. मी त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही; कारण ‘कृतज्ञता म्हणजे काय आणि ती व्यक्त होणे म्हणजे काय ?’, हे समजण्याची आणि तसे करण्याची माझी पात्रता नाही.’

– (सद्गुरु) कु. अनुराधा वाडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.१२.२००८)

प.पू. डॉक्टरांनी सहज बोलतांना ‘कु. अनुराधा वाडेकर
खूप पुढे जातील’, असे म्हणणे आणि प्रत्यक्षातही तसेच घडणे

‘वर्ष १९९६ मध्ये एकदा मुंबई येथील सेवाकेंद्रात असतांना प.पू. डॉक्टरांशी बोलत असतांना कु. अनुराधा वाडेकर यांचा विषय निघाला. तेव्हा प.पू. डॉक्टर सहज बोलले, ‘‘अनु खूप पुढे जाईल.’’ प्रत्यक्षातही आज कु. अनुराधा वाडेकर यांची प्रगती खूप चांगली होत आहे.’

– श्री. संदीप आळशी, रामनाथी आश्रम, गोवा. (वर्ष २००७) (आताचे पू. संदीप आळशी)

(‘वरील उदाहरणातून प.पू. डॉक्टरांचे द्रष्टेपण लक्षात येतेच, शिवाय त्यांचे सहज बोलणे हे केवळ बोलणे नसून ते संकल्पयुक्त बोलणेच असते, हेही लक्षात येते. साधकांनी कृती केली, तर त्यांचा संकल्प कार्यरत होतो आणि त्याचे फळ त्यांना मिळते. आता वर्ष २०१९ मध्ये सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर या आध्यात्मिक उन्नती करून ‘सद्गुरु’ पदावर विराजमान आहेत.’ – संकलक)

यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात