गुढीपाडवा अर्थात हिंदूंच्या नववर्षदिनाचे महत्त्व !

अनुक्रमणिका


सण, उत्सव आणि व्रते यांना अध्यात्मशास्त्रीय आधार असल्याने ते साजरे करतांना त्यांतून चैतन्यनिर्मिती होते अन् त्यायोगे अगदी सर्वसामान्य मनुष्यालाही ईश्‍वराकडे जाण्यास साहाय्य होते. सर्वांकडून सण, उत्सव आदींमागील शास्त्र लक्षात घेऊन ते श्रद्धापूर्वक साजरे केले जावोत आणि त्यायोगे जीवन कल्याणमय होवो, ही श्रीगुरुचरणी प्रार्थना करूया ! हिंदु वर्षातील पहिला सण अर्थात ‘गुढीपाडवा’. गुढीपाडव्याचे महत्त्व जाणून घेऊन या लेखमालेचा आरंभ करूया !’

 

१. गुढीपाडवा म्हणजेच वर्ष प्रतिपदा !

१. तिथी

युगादी तिथी, चैत्र शुद्ध प्रतिपदा

२. वर्षारंभ : चैत्र शुद्ध प्रतिपदाच का ?

याचा प्रथम उद्‍गाता ‘वेद’ आहे. वेद हे अतीप्राचीन वाङ्मय आहे, याबद्दल दुमत नाही. ‘द्वादशमासैः संवत्सरः ।’ असे वेदात म्हटले आहे. वेदांनी सांगितले म्हणून ते जगाने मान्य केले. वर्षारंभाचा प्रारंभदिवस ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा आहे.

चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास अर्थात गुढीपाडवा साजरा करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत.

 

२. गुढीपाडवा : साडेतीन मुहूर्तांपैकी एक

गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया आणि दसरा म्हणजे प्रत्येकी एक अन् कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे अर्धा, असे साडेतीन मुहूर्त आहेत. या साडेतीन मुहूर्तांचे वैशिष्ट्य असे की, इतर दिवशी कोणत्याही शुभकार्यासाठी मुहूर्त पहावा लागतो; या दिवशी मात्र मुहूर्त पहावा लागत नाही. या दिवसांतील कोणतीही घटिका शुभमुहूर्तच असते.

 

३. गुढीपाडव्याचे महत्त्व

अ. गुढीपाडवा : नैसर्गिक महत्त्व – वसंत ऋतूच्या प्रारंभाचा दिवस

ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंतसंपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त आणि विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) आणि वसंत ऋतू चालू होतो. सर्व ऋतूंत ‘कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे’, असे भगवंतांनी श्रीमद्‍भगवद्‍गीतेत (१०:३५) म्हटले आहे. या वेळी हवामान समशीतोष्ण आणि उत्साहवर्धक असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.

 

आ. गुढीपाडवा : ऐतिहासिक महत्त्व

१. रामाने वालीचा वध केल्याचा दिवस

रामाने वालीचा वध या दिवशी केला.

२. शालिवाहन शक चालू झाल्याचा दिवस !

शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळविला तोही हाच दिवस अर्थात् गुढीपाडवा. या दिवसापासूनच शालिवाहन शक सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळविला.

ही गुढीपाडवा हा वर्षारंभ साजरा करण्यामागील ऐतिहासिक कारणे आहेत.

३. गुढीपाडव्याविषयी महाभारतातील उल्लेख

महाभारताच्या आदिपर्वात (१.६३) उपरिचर राजाने इंंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंंद्राच्या आदरार्थ भूमीत रोवली आणि दुसर्‍या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून तिची पूजा करतात. महाभारतातच खिलपर्वात कृष्ण इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक शक्रोत्सव (इंद्रोत्सव) बंद करण्याचा समादेश देतो. महाभारतातील आदिपर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे.

 

इ. गुढीपाडवा : आध्यात्मिक महत्त्व

१. सृष्टीची निर्मिती म्हणजेच सत्ययुगाच्या प्रारंभाचा दिवस

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.

२. गुढीपाडवा हा पृथ्वीचा वर्षारंभदिन

‘गुढीपाडव्याला सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्‍वाच्या उत्पत्तीकाळाशी निगडित असल्याने सृष्टी नवचेतनेने भारित झालेली असते.

गुढीपाडवा या दिवशी सुरू होणार्‍या नववर्षाची तुलना सूर्योदयाला उगवणार्‍या तेजोमयी दिवसाशी करता येईल. निसर्गनियमाला अनुसरून केलेल्या गोष्टी मानवाला पूरक असतात, तर विरुद्ध केलेल्या गोष्टी मानवाला हानीकारक असतात.’ – (सनातनच्या साधकाला ईश्‍वरी कृपेमुळे मिळालेले ज्ञान)

३. प्रजापति-संयुक्‍तलहरी पृथ्वीवर जास्त प्रमाणात येणे

गणेशयामल या तंत्रग्रंथात ‘नक्षत्रलोकातील (कर्मदेवलोकातील) २७ नक्षत्रांपासून निघालेल्या २७ लहरींचे अजानजलोकात प्रत्येकी चार चरण (विभाग) होऊन पृथ्वीवर २७ x ४ = १०८ लहरी येतात’, असे सांगितले आहे. त्यांच्या विघटनाने यम, सूर्य, प्रजापति आणि संयुक्‍त अशा चार लहरी होतात.

१. प्रजापति लहरींमुळे वनस्पती अंकुरण्याची भूमीची क्षमता वाढणे, बुद्धी प्रगल्भ होणे, विहिरींना नवीन पाझर फुटणे, शरिरात कफप्रकोप होणे इत्यादी परिणाम होतात.

२. यमलहरींमुळे पाऊस पडणे, वनस्पती अंकुरणे, स्त्रियांना गर्भधारणा होणे, गर्भाची व्यवस्थित वाढ होणे, शरिरात वायूप्रकोप होणे इत्यादी परिणाम होतात.

३. सूर्यलहरींमुळे भूमीची उष्णता वाढून वनस्पती जळणे, चर्मरोग होणे, भूमीची उत्पादनक्षमता न्यून होणे, शरिरात पित्तप्रकोप होणे इत्यादी परिणाम होतात.

४. संयुक्‍त लहरी म्हणजे प्रजापति, सूर्य आणि यम या तिन्ही लहरींचे मिश्रण. ज्या संयुक्‍त लहरींत प्रजापति लहरींचे प्रमाण जास्त असते, त्यांना प्रजापति-संयुक्‍तलहरी म्हणतात. अशाच रितीने सूर्य संयुक्‍त आणि यम संयुक्‍त लहरीही असतात.

 

४. गुढीपाडवा अध्यात्मशास्त्रानुसार साजरा करतांना
त्यातील काही कृती करतांना होणारे सूक्ष्मातील लाभ

गुढी उतरवतांना होणारे परिणाम दर्शवणारे सूक्ष्म-चित्र

 

गुढीचे निर्माल्य विसर्जित करणे या कृतीचे सूक्ष्म-चित्र

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, उत्सव आणि व्रते’

गुढी पूजन चलच्चित्रपट (Video)

५. प्रत्येक पाऊल समृद्धीकरता पुढे टाकण्याची शिकवण देणारी चैत्र शुक्ल प्रतिपदा !

प.पू. परशराम <br> माधव पांडे महाराज
प.पू. परशराम माधव पांडे महाराज

उत्तरायणातील वसंतऋतूतील चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला शुभसंकल्पाची गुढी उभारायची असते. गुढीपाडवा हे संकल्पशक्‍तीचे गुढत्व दर्शवते. ‘आमचे प्रत्येक पाऊल आमच्या समृद्धीकरिता आता पुढेच पडत राहील’, असे प्रतिप्रदा सांगते; म्हणून या दिवशी शुभसंकल्प केल्यास, तो संकल्प आपल्या जीवनाला फलदायी होतो. याकरिताच सत्यसंकल्परूपी गुढीची मुहूर्तमेढ रोवायची असते. – प.पू. परशराम माधव पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

 

६. गुढी हे मानवी शरिराचे प्रतीक असणे

‘वीर्य बिजाचा आकार १ या अंकाप्रमाणे असतो. शरिरात डोके शून्याच्या आकारासारखे आणि मेरुदण्ड म्हणजे त्याची शेपटी (कणा) हे महत्त्वाचे आहे. म्हणूनच गुढीपाडव्याला कळकाच्या काठीवर गडू ठेवून (मानवाकृती करून) त्याची पूजा करतात. काठी म्हणजे मेरुदण्ड आणि गडू म्हणजे मानवाचे डोके. कळकालाही आपल्या पाठीच्या कण्याप्रमाणे मणके असतात.’

– प.पू. परशराम माधव पांडे (श्री गणेश-अध्यात्म दर्शन, पृष्ठ ४७)

 

७. सणांचे चक्र

‘माघी पौर्णिमेपासून ‘उत्सृष्टा वै वेदाः ।’ असे म्हणून ब्राह्मणांनी वेदाभ्यास थांबवून शास्त्राभ्यास चालू केल्यानंतर समाजव्यवस्थेत पालट होऊन समता निर्माण होते. सर्व भेदाभेद, विधी-निषेध, उच्च-नीच भाव यांची होळी करण्यात या समानतेचा कळस होतो. परस्परद्वेष, मारामारी आणि रक्‍तपात यांची रंगपंचमी करण्यांत तिचा शेवट होतो. अशा वेळी या समतेचा कंटाळा येऊन पुन्हा नव्या व्यवस्थेचा आरंभ होतो, तो दिवस म्हणजे पाडवा.

अ. उत्पत्ती

‘नव्या व्यवस्थेचा आरंभ करण्याचा दिवस म्हणजे पाडवा. नुसता पाडवाच नव्हे, तर चैत्राचा पहिला पंधरवडाच व्यवस्थेचा पाया घालण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कोणालाही न आवडणारी; पण व्यवस्थेत अत्यंत आवश्यक अशी निःस्वार्थी सेवावृत्तीची स्थापना या पंधरवड्याच्या शेवटीपर्यंत होते.’

आ. स्थिती

‘सर्वत्र सुव्यवस्था लागून तिचा शेवट जिकडे तिकडे सुबत्ता आणि स्थैर्य निर्माण होण्यात होते. हे स्थैर्य दिवाळीपर्यंत रहाते.’

इ. लय

दिवाळीच्या वेळी पुन्हा द्यूत आणि चंगळ यांना आरंभ होऊन होळी अन् रंगपंचमीच्या वेळी पुन्हा सगळ्या गोष्टींचा शेवट होतो. असे हे मानवीवर्षातील उत्पत्ती-स्थिती-लय यांचे निदर्शक अशा सणांचे चक्र आहे.’

 

८. वार्षिक प्रलय संपून नवनिर्मितीला आरंभ होण्याचा दिवस

‘नित्य प्रलय, मासिक प्रलय, वार्षिक प्रलय, युग-प्रलय, ब्रह्मदेवाचा प्रलय, असे अनेक प्रलय आहेत. सर्वांची गती आणि स्थिती सारखीच असल्यामुळे ‘एकाचे वर्णन करतांना दुसर्‍याचे रूपक केले’, असे वाटते; पण तसे नाही. एक वार्षिक प्रलय संपून पुन्हा नवनिर्मिती चालू होण्याचा पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. या दिवसालाच ‘पाडवा’, असे म्हणतात.’

 

९. पाडवा साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश

‘शिमग्याच्या काळात भेदभाव टाकून स्वीकारलेली समता फार काळ टिकू शकत नाही. त्यामुळे अव्यवस्था निर्माण होते. ही अव्यवस्था संपवून पुन्हा व्यवस्था निर्माण करण्यास आरंभ करण्याचा दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. या दिवसापासून पुन्हा देव, ऋषी, पितर, मनुष्य आणि भूत यांची पूजा करायला आरंभ करायचा, त्यांचे आशीर्वाद मिळवायचे आणि आपापली कर्तव्यकर्मे करायला आरंभ करायचा, हाच पाडवा साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.’

 

१०. चैत्र मासातील उन्हाळ्याचा
त्रास होऊ नये; म्हणून घ्यावयाचे औषध

‘चैत्र मास उन्हाळ्यात येतो. या उन्हाळ्याचा त्रास होऊ नये; म्हणून एक औषध सांगितले आहे. पाडव्याच्या दिवशी हे औषध सर्वांनी घ्यायचे असते. ज्यांना उन्हाळ्याचा त्रास होतो, त्यांनी नंतरसुद्धा हे औषध घ्यायला आडकाठी नाही.

पारिभद्रस्य पत्राणि कोमलानि विशेषतः ।

सपुष्पाणि समानीय चूर्णं कुर्यादि्वधानतः ।।१।।

मरीचिहिंगुलवणमजमोदा च शर्करा ।

तिंतिणीमेलनं कृत्वा भक्षयेद्दाहशांतये ।।२।।

अर्थ : कडुलिंबाची कोवळी पाने अणि फुले, मिरे, हिंग, मीठ, कैरी, साखर अन् चिंच हे सर्व साहित्य एकत्र करून ते चांगले वाटावे आणि औषध म्हणून घ्यावे. जून पानांत शिरा असतात आणि त्यामुळे त्यांच्यातील औषधी गुण अल्प होतो; म्हणून विशेषकरून मिळतील तितकी कोवळी पानेच घ्यावीत.

 

११. पाडव्याच्या दिवशी वर्षफल ऐकण्याचा लाभ

‘वर्षाच्या आरंभी त्या वर्षात घडणार्‍या बर्‍या-वाईट घडामोडींविषयी माहिती कळल्यास त्याप्रमाणे उपाययोजना करून आधीच व्यवस्था करून ठेवणे सोपे जाते. हाच वर्षफल ऐकण्याचा खरा लाभ असतो; म्हणून पाडव्याच्या दिवशी वर्षफल ऐकायचे असते. याची काही उदाहरणे पाहू.

अ. पाऊस लवकर चालू होणार असेल, तर त्या बेताने शेताची मशागत अगोदर करून ठेवता येते.

आ. पावसात खंड पडणार असेल किंवा पावसाचे प्रमाण अल्प असेल, तर अशा वेळी विहिरी इत्यादींचा उपयोग व्हावा; म्हणून लागणारे पाट, ताली इत्यादी सर्व साहित्य नीट करून ठेवता येते.

इ. दुष्काळ पडणार असेल, तर धान्य आणि वैरण यांची काटकसर करून किंवा ज्या देशांत सुबत्ता होणार वा झालेली असेल, तेथून धान्य, वैरण आणून साठा करता येतो अन् येणार्‍या अडचणीच्या काळाची व्यवस्था करून ठेवता येते.

ई. कोणती पिके होण्याचा संभव आहे, ते जाणून त्याप्रमाणे बियाणे, खत इत्यादी आणून ठेवता येते.’

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’
‘गुढीपाडवा’ या लेखमालिकेतील अन्य लेख

१. गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयानंतर लगेचच गुढीचे पूजन करून गुढी उभारावी, असे शास्त्रात सांगितले आहे. गुढीचे पूजन शास्त्रानुसार कसे करावे हे मंत्रांसंहित जाणून घेण्यासाठी धर्मध्वज पूजा-विधी यावर क्लिक करा !

२. सण, उत्सव आदींमागील शास्त्र लक्षात घेतल्यास ते श्रद्धापूर्वक साजरे केले जाऊन त्यायोगे जीवन कल्याणमय होते. या दृष्टीने वर्षातील पहिला सण आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचे नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व जाणून घेण्यासाठी तसेच गुढीचे पूजन शास्त्रानुसार कसे करावे याविषयीचा लघुपट पाहण्यासाठी ‘गुढीपाडवा अर्थात हिंदूंच्या नववर्षदिनाचे महत्त्व !’ यावर क्लिक करा !

३. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंब आणि अन्य पदार्थ एकत्रित करून प्रसाद सिद्ध केला जातो. या दिवशी प्रसादासाठी कडुनिंबाचाच वापर करण्यामागील शास्त्र जाणून घेण्यासाठी ‘गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंब घालून बनवलेला प्रसाद’ यावर क्लिक करा !

Leave a Comment