श्रीमद्‌भगवद्‌गीता

१. महत्त्व

भगवद्‌गीता श्रीकृष्णाच्या मुखातून प्रगट झाली
भगवद्‌गीता श्रीकृष्णाच्या मुखातून प्रगट झाली

अ. वेदु संपन्नु होय ठाईं । परि कृपणु ऐसा आनु नाहीं ।

जे कानीं लागला तिहीं । वर्णांच्याचि ।। – ज्ञानेश्‍वरी, अध्याय १८, ओवी १४५७

अर्थ : वेद संपन्न आहेत; पण कृपणही आहेत; कारण ते केवळ त्रिवर्णांसाठीच आहेत. गीता संपन्न आणि उदारही आहे; कारण ती चारही वर्णांना वाचनीय आहे.

आ. कृष्णनिःश्‍वासीं जन्मले वेद । गीता श्रीकृष्णमुखें प्रगटली शुद्ध ।

यालागीं गीतार्थ अगाध । धडौते वेद तेणें जाहले ।। – एकनाथी भागवत, अध्याय ३१, ओवी २७९

अर्थ : वेद हे कृष्णाच्या श्‍वासोच्छ्वासापासून जन्मास आले; पण गीता ही प्रत्यक्ष त्याच्या मुखाने प्रगट झाली; म्हणून गीतेचा अर्थ अगाध आहे. तिच्यायोगानेच वेद धष्टपुष्ट झाले.

इ. गुलाबराव महाराज म्हणतात, ‘‘गीता ही जागृत श्रुति आहे.’’

ई. ‘गीता जाणा हे वाङ्मयी । श्रीमूर्ती प्रभूचि ।। – ज्ञानेश्‍वरी, अध्याय १८, ओवी १६८४’

अर्थ : कारण गीता ही भगवंताची शब्दमय मूर्तीच आहे.

उ. जें उपनिषदांचें सार । सर्व शास्त्रांचें माहेर ।

परमहंसीं सरोवर । सेविजे जें ।। – ज्ञानेश्‍वरी, अध्याय १८, ओवी १८०७

अर्थ : जे उपनिषदांचे सार असून सर्व शास्त्रांचे माहेर आणि परमहंस साधूंचे क्रीडा करण्याचे सरोवरच होय.

ऊ. महाभारत सव्वा लक्ष श्‍लोकांचे आहे आणि गीता केवळ ७०० श्‍लोकांची आहे, तरी ती सर्व शिकवते.

ए. भारतातील सर्व शास्त्रे नाश पावली (बुडाली) आणि केवळ गीता शिल्लक राहिली, तरी सर्व शास्त्रे पुन्हा निर्माण होऊ शकतील.

ऐ. जर्मनीतील एक अभ्यासक सापानहार हे गंभीर आणि उदासीन स्वभावाचे होते. ते कधी हसत नसत; परंतु भगवद्‌गीता वाचल्यावर भगवद्‌गीतेचा त्यांनी अभ्यास केल्यावर ते भगवद्‌गीता डोक्यावर घेऊन नाचले.

 

२. वैशिष्ट्ये

अ. भगवद्‌गीता रणभूभीवर लिहिली गेली, तर अन्य सर्व धर्मग्रंथ शांत वातावरणात लिहिले गेले.

आ. भगवद्‌गीता युद्धापासून (संसारापासून) पळून जायला सांगत नाही, तर युद्धात (संसारात) उभे राहून मन निर्विकार, शांत ठेवण्यास शिकविते.

इ. साचचि बोलाचें नव्हे हें शास्त्र । पैं संसारु जिणतें हे शस्त्र ।

आत्मा अवतरविते मंत्र । अक्षरें इयें ।। – ज्ञानेश्‍वरी, अध्याय १५, श्‍लोक ५७७

अर्थ : गीता म्हणजे बोलून वर्णन करण्याजोगे शास्त्र नाही. ते संसाराला जिंकण्याचे एक शस्त्रच आहे. गीतेची अक्षरे ही आत्मभाव उत्पन्न करण्याचे मंत्रच होत. हिच्या अक्षरांत आत्मप्राप्ती करून देण्याची शक्ती आहे.

– डॉ. वसंत बाळाजी आठवले (प.पू. डॉ. जयंत आठवले यांचे ज्येष्ठ बंधू), ख्रिस्ताब्द १९९०

Leave a Comment