छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन आणि गुढीपाडवा यांचा काहीही संबंध नाही, हे जाणा !

Article also available in :

छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन आणि गुढीपाडवा हा नववर्षारंभदिन लागोपाठ येतात. वर्ष २०१३ मध्ये खानदेश (उ‌त्तर महाराष्ट्र) आणि मराठवाडा येथे काही जात्यंधांनी ‘गुढ्या उभारणे’, हा छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान आहे, असे सांगत हिंदूंना गुढ्या उभारू दिल्या नाहीत आणि उभारलेल्या गुढ्या खेचून काढल्या. ‘फेसबूक’, ‘व्हॉट्स अ‍ॅप’ यांसारख्या सामाजिक संकेतस्थळांवरून गुढीपाडव्याविषयी जात्यंधांकडून अपप्रचार केला जात आहे. जात्यंधांकडून गुढीपाडव्याविषयी केली जाणारी टीका आणि त्याचे खंडण आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.

टीका : (म्हणे) ‘शुभ समजला जाणारा कलश गुढीपाडव्याच्या दिवशी उलट का लावतात ?’

खंडण : गुढीवर उलट घालण्यात आलेल्या कलशाच्या काही प्रमाणात निमुळत्या झालेल्या भागातून तो ब्रह्मांडमंडलातून प्रजापति-लहरी आकृष्ट करून घेतो. या लहरी कलशात सामावून रहातात. कलश उलट घातल्यामुळे ती स्पंदने भूमंडलाकडे आणि पूजकाकडे प्रक्षेपित होतात. देवळातील कळस हा सुद्धा याचप्रमाणे वरच्या दिशेने पूर्णपणे निमुळता असतो आणि तो लहरी आकृष्ट करतो. (संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ सण, धार्मिक उत्सव आणि व्रते)

टीका : (म्हणे) ‘ब्राह्मणांनीच शंभूराजांची हत्या करून गुढी उभारायला प्रारंभ केला !’

खंडण :
१. अ. वर्ष १६८९ मध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना फाल्गुन अमावास्येच्या दिवशी हालहाल करून मारले. दुसर्‍या दिवशी चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा, म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षदिन होता. हिंदूंनी तो साजरा करू नये, असा औरंगजेबाचा त्यामागे हेतू होता. वस्तूतः हत्येचा गुढीपाडव्याच्या दिवशी उभारल्या जाणार्‍या गुढीशी काहीच संबंध नाही. प्रभु श्रीराम वनवास संपवून अयोध्येत परतले, तेव्हापासून गुढ्या उभारणे, तोरणे लावणे, ही आपली परंपरा आहे. सृष्टीच्या निर्मितीचा दिवस म्हणूनही गुढीपाडव्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टी निर्माण केल्याचे मानले जाते. म्हणजेच खरे तर हा दिवस केवळ हिंदूंचाच नसून अखिल विश्‍वातील मानवजातीचा आहे.

२. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून मारले, हा सूर्यप्रकाशाइतका स्वच्छ इतिहास आहे. अनेक ठिकाणी तो संदर्भांसह उपलब्धही आहे. आजपर्यंत एकाही इतिहासकाराने ‘छत्रपती संभाजी महाराजांना ब्राह्मणांनी मारले’, असे म्हटलेले नाही. असे असतांना ‘क्रूरकर्मा औरंगजेबाचे पाप झाकण्याचा प्रयत्न काही जात्यंध का करत आहेत ?’ असा प्रश्‍न हिंदूंनी त्यांना खडसवून विचारला पाहिजे.

यापूर्वीही काही जात्यंधांनी ‘ब्राह्मणांनी संत तुकाराम महाराजांचा खून केला’, असा आरोप केला होता. त्याला हिंदूंनी दाद लागू दिली नाही. हिंदूंनो, गुढीपाडव्याविषयी या जातीद्वेषमूलक प्रसारालाही दाद लागू न देता ‘हिंदु संस्कृतीनुसार गुढीपाडवा साजरा करून धर्माचरण करा ! तो अधिकाधिक हिंदूंनी शास्त्रशुद्धपणे साजरा करणे’, हीच जात्यंधांना चपराक असेल !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment