प्रचलित पद्धतीने गुढी न उभारता धर्मध्वज उभारण्याचे धर्मशास्त्रविरोधी आवाहन !

एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्तीचे धार्मिक अज्ञान उघड

हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे नेते आणि कार्यकर्ते यांनाच धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हेच यातून दिसून येते ! अशा आवाहनांमुळे हिंदूंमध्ये संभ्रम निर्माण होऊन ते धर्माचरणापासून वंचित रहातात ! हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी अशी आवाहने करण्याआधी धर्मातील अधिकार्‍यांना याविषयी विचारणे अभिप्रेत आहे !

मुंबई – गुढीपूजनाच्या वेळी पालथा गडू आणि लुगडे, चोळी अन् कापड यांचा वापर करून उभारलेली गुढी ही विटंबना आहे. त्यामुळे अशा प्रकारे गुढी न उभारता भगवा ध्वज उभारून मंगल कलशाची पूजा करावी, असे आवाहन एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्तीने केले आहे. त्यांनी केलेले हे आवाहन सध्या सामाजिक माध्यमांवर सर्वत्र प्रसारित झाले आहे. विशेष म्हणजे असे करतांना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा संदर्भ दिला आहे. या पत्रकात म्हटल्याप्रमाणे वर्ष १९४० पासून स्वातंत्र्यवीर सावरकर गुढीपाडव्याच्या दिवशी भगवा धर्मध्वज उभारण्याविषयी प्रसार करत होते. ‘शकांनी उच्छाद मांडल्यावर अत्याचाराने प्रजा ग्रासली. त्या वेळी शरणागतीचे प्रतीक म्हणून दारावर चोळी-लुगडी फडकू लागली’, असे या पत्रकात म्हटले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, ‘ज्या राष्ट्राचा ध्वज लुगड्यांचा असेल, त्याच्या पराक्रमाविषयी काय बोलावे ? यज्ञसंस्कृतीचे द्योतक म्हणून आपला ध्वज भगवा आहे, तोच लावावा’, असे पत्रकात नमूद केले आहे.

धर्मशास्त्र हिंदूंना कळावे, यासाठी धर्माच्या अभ्यासकांच्या निवडक प्रतिक्रिया येथे देत आहोत

१. धर्मसंस्कारांचा परिचय करून देणे आणि सुवर्ण युगारंभ करण्यासाठी सर्वांना धर्मशास्त्र सांगणे आवश्यक ! – पंडित वसंतराव गाडगीळ, शृंगेरी शंकराचार्यांचे प्रतिनिधी

१ अ. गुढीपूजनाला ‘ब्रह्मध्वजाचे पूजन’ असे म्हटले पाहिजे !

आपण ज्याला ‘गुढी’ म्हणतो, त्याचे प्राचीन नाव ‘ब्रह्मध्वज’ आहे. त्यामुळे ‘ब्रह्मध्वजाचे पूजन’ असे म्हटले पाहिजे. ‘गुढी’ हा शब्द संस्कृत नाही, तर ‘पाडवा’ प्रतिपदेचा अपभ्रंश आहे. भारतात आपण दोन प्रकारे पाडवा साजरा करतो. एक म्हणजे चैत्र पाडवा; म्हणजेच शक संवत्सरारंभ. या दिवशी ब्रह्मदेवाने युगारंभ केला. दुसरे म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा, म्हणजेच बलीप्रतिपदा (दिवाळीतील पाडवा). या दिवशी विक्रम संवत्सरारंभ चालू होते. हिंदूंसाठी चैत्र मासापासून वर्षारंभ असून त्याला दक्षिण भारतात ‘उगादी’ असेही म्हणतात.

१ आ. सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव असून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी ‘ब्रह्मध्वजपूजन’ करतात

सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव असून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी ‘ब्रह्मध्वजपूजन’ करतात आणि तेव्हापासून रामनवरात्र चालू होते. ब्रह्मध्वजाला हिरवी साडी किंवा निळे कापड अथवा भगव्या वर्णाची साडी, भगवे वस्त्र नेसवतात आणि हे परंपरेला धरून आहे. पूर्वी सुवर्ण किंवा चांदीचे पात्र हे गुढीवर पालथे घातले जाई. पूर्वी देवघरातील देवतांची पात्रे ही चांदीविना इतर कोणत्याही धातूची नव्हती. ही जुनी परंपरा रिक्त होत असून कालातरांने चोर्‍या वाढल्या आणि संस्कृती र्‍हास म्हणून चांदीचे भांडे ठेवणे बंद झाले. त्यामुळे सध्या तांब्याचे भांडे वापरले जाते. खरेतर सुवर्ण, चांदी आणि कांस्य यांचा वापर व्हायला हवा; पण ते शक्य नसल्याने तांबे वापरले जाते. ‘स्टील’ किंवा ‘प्लास्टिक’ यांचा वापर पूजनामध्ये करता कामा नये. गुढीवर भांडे पालथे ठेवल्याने त्याद्वारे ब्रह्मदेवाच्या लहरी अधिकाधिक ग्रहण करता येतात. ब्रह्मध्वजपूजनाविषयीची माहिती ‘धर्मसिन्धु’ या ग्रंथामध्येही उपलब्ध आहे.

२. डॉ. सच्चिदानंद शेवडे, राष्ट्रीय प्रवचनकार

२ अ. वास्तविक स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘गुढीविषयी असे काही लिहिले आहे का’ याविषयी संभ्रम आहे. जर त्यांनी तसे कदाचित लिहिले असेल, तर तो तात्कालिक संदर्भ झाला. त्या काळच्या परिस्थितीला अनुसरून तो असेल, तो सर्वकालिन संदर्भ असू शकत नाही. रामायण आणि महाभारत या धर्मग्रंथांत पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्याचे संदर्भ आढळतात.

२ आ. मुळात ‘कलश पालथा ठेवणे, हे अशुभ असते’, हे कोणी ठरवले ? पूर्वीच्या काळी एखादी व्यक्ती बाहेर गेली आणि तिला येण्यास विलंब झाल्यास उंबर्‍यावर पालथा घडा ठेवून तिची वाट बघितली जात असे. याचा अर्थ चांगल्याची वाट बघणे. गुढीवर पालथा कलश ठेवणे  म्हणजे नववर्षादिनापासून ‘हिंदू चांगल्या दिवसांची वाट पहातात’, असाही आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment