#Gudhipadva : हिंदूंच्या अद्वितीय कालमापन पद्धतीचे अलौकिकत्व सांगणारा गुढीपाडवा !

गुढीपाडवा म्हटले की, येते… गुढीपूजन, रांगोळ्या, भरजरी पोशाख, गोडधोड, भगवे ध्वज आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नववर्षाच्या शुभेच्छा ! हो, हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

जसा हिंदूंचा कुठलाही सण हा मौजमजेचा विषय नाही, तर मांगल्य, पावित्र्य, चैतन्य यांचा आनंदसोहळा आहे, तसाच गुढीपाडवाही आहे ! आणि त्यातही गुढीपाडव्याचे एक अधिक वैशिष्ट्य म्हणजे, हा केवळ हे सारे घेऊन येत नाही, तर हा काळाची प्रत्यक्ष जाणीव करून देऊन जिवाला अधिकाधिक अंतर्मुख करतो ! अंतर्मुख झालेला जीव अधिकाधिक ईश्वराकडे ओढला जातो !

जेव्हा नवीन वर्षाचा संबंध येतो, तेव्हा साहजिकच काळाचा संबंध येतो. गुढीपाडव्याच्या धार्मिक कृतींत म्हणूनच अभ्यंगस्नान करतांना ‘देशकालकथन’ ही कृती करावयास सांगितली आहे. हे देशकालकथन ना केवळ प्राचीन हिंदु संस्कृतीच्या महानतेने आपल्याला अवाक करते, तर या अतीप्रचंड काळाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सूक्ष्मतम् अस्तित्वाची जाणीवही करून देते !

‘ब्रह्मदेवाचा जन्म झाल्यापासून आतापर्यंत ब्रह्मदेवाची किती वर्षे झाली; कोणत्या वर्षातील कोणते आणि कितवे मन्वंतर चालू आहे; या मन्वंतरातील कितवे महायुग अन् कोणते उपयुग चालू आहे’, या सर्वांचा उल्लेख ‘देशकालकथना’त असतो.

 

हिंदु संस्कृतीची प्राचीनता !

२०२२ या वर्षाच्या गुढीपाडव्याला हिंदु धर्माच्या कालगणनेनुसार १५ निखर्व, ५५ खर्व, २१ अब्ज, ९६ कोटी ८ लक्ष ५३ सहस्र १२४ व्या वर्षाचा आरंभ होत आहे.

टीप : १ खर्व म्हणजे १०,००,००,००,००० वर्षे (शंभर सहस्र लक्ष किंवा लक्ष लक्ष वर्षे), तर १ निखर्व म्हणजे १,००,००,००,००,००० वर्षे (दहा सहस्र कोटी वर्षे)

 

कालमापनाची सूक्ष्म परिमाणे देणारे ‘श्रीमद्भागवतपुराण’ !

‘श्रीमद्भागवतपुराणा’त भारतीय कालमापनपद्धती ३ ऱ्या स्कंधातील ११ व्या अध्यायात इतक्या सुलभ पद्धतीने दिली आहे की, जणू श्रीकृष्णाची लीलाच वर्णिली जात आहे. या अध्यायात मैत्रेयऋषि विदुर यांना काळाचे पुढील परिमाण सांगतात –

‘दोन परमाणू मिळून एक अणू सिद्ध होतो. तीन अणू मिळून एक त्रसरेणू निर्माण होतो. त्रसरेणू म्हणजे झरोक्यातून येणाऱ्या सूर्यकिरणांच्या प्रकाशात जे उडतांना दिसतात ते. असे तीन त्रसरेणू पार करण्यासाठी सूर्यकिरणाला जेवढा वेळ लागतो त्याला त्रुटि म्हणतात. त्याला शंभराने गुणले की, त्याला वेध म्हणतात. तीन वेध म्हणजे एक लव. तीन लव म्हणजे एक निमिष. तीन निमिष म्हणजे एक क्षण. पाच क्षण म्हणजे एक काष्ठा. पंधरा काष्ठा म्हणजे एक लघु. पंधरा लघु म्हणजे एक नाडिका. दोन नाडिका म्हणजे एक मुहूर्त. सहा किंवा सात नाडिका यांचा एक प्रहर. एक दिवस किंवा रात्र यात प्रत्येकी ४ प्रहर येतात. पंधरा दिवसांचा एक पक्ष आणि दोन पक्षांचा एक मास होतो. (पितरांसाठी १ मास म्हणजे एक दिवस आणि रात्र) दोन मासांचा एक ऋतू आणि सहा मासांचे एक आयन असते. दोन आयन (उत्तरायण आणि दक्षिणायन) मिळून एक वर्ष बनते. (मानवाचे हे एक वर्ष देवतांसाठी एक दिवस आणि रात्र असते.)

मानवाची ४३ लक्ष २० सहस्र वर्षे म्हणजे देवतांची १२ सहस्र वर्षे, म्हणजेच एक चतुर्युगी. यात सत्ययुगाची ४ सहस्र, त्रेतायुगाची ३ सहस्र, द्वापरयुगाची २ सहस्र आणि कलियुगाची १ सहस्र वर्षे अन् प्रत्येक युगाच्या आधी आणि नंतर येणाऱ्या संधीकाळाची काही वर्षे असतात.’

–  डॉ. मुरली मनोहर जोशी, वरिष्ठ नेते भाजप आणि माजी केंद्रीय मंत्री

 

भारतीय कालगणनेची महती !

सौ. प्राजक्ता जोशी

‘भारतीय कालगणनेत युग पद्धतीचा विचार केला जातो. सत्य (कृत), त्रेता, द्वापर आणि कलि अशी ४ युगे आहेत. कलियुग ४ लाख ३२ सहस्र वर्षे आहे. त्याच्या अनुक्रमे २, ३ आणि ४ पट अनुक्रमे द्वापर, त्रेता आणि कृत ही युगे आहेत. या ४ युगांनी मिळून एक महायुग होते. अर्थात् ते कलियुगाच्या १० पट असते. महायुग ४३ लाख २० सहस्र वर्षांचे आहे. अशी १ सहस्र महायुगे मिळून १ कल्प होते. हा ब्रह्मदेवाचा दिवस होतो. एका कल्पात १४ मनु होतात. प्रत्येक मनुत ७१ महायुगे होतात. चालू असलेले मन्वंतर (मनु) ७ वे असून यातील २७ महायुगे जाऊन २८ वे महायुग चालू आहे. कलियुगाच्या एकंदरीत वर्षांतून आज ५ सहस्र १२३ वर्षे मागे पडली. अजून ४ लाख २६ सहस्र ८७७ वर्षे शेष आहेत.’

‘चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेला संवत्सरारंभ होतो. हा हिंदु नववर्षाचा प्रथम दिवस असतो. पूर्वाफाल्गुनी ही संवत्सराची शेवटची रात्र आणि उत्तराफाल्गुनी ही संवत्सराची पहिली रात्र. याचाच अर्थ संवत्सराच्या शेवटच्या रात्री पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात चंद्र असतो आणि संवत्सराच्या प्रारंभदिनी उत्तराफाल्गुनी नक्षत्रात चंद्राचे भ्रमण चालू असते. संवत्सर म्हणजे ‘सम + वसंति + ऋतवः ।’, म्हणजे सर्व ऋतू ज्यामध्ये येतात, असा काळ किंवा वर्ष. ज्योतिषशास्त्रात ६० संवत्सर आहेत. प्रत्येक संवत्सरास वेगवेगळी नावे आहेत. ६० वर्षांचे १ चक्र असते, म्हणजेच ६० वर्षांनंतर पुन्हा तेच संवत्सर येते. संवत्सराचे फळ त्यांच्या नावाप्रमाणे जाणावे. २ एप्रिल २०२२ पासून ‘शुभकृत्’ संवत्सर चालू होत आहे.’

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

#Gudhipadva #Gudhipadwa #गुढीपाडवा #युगादि #युगादी #hindunewyear #hindunavvarsh #हिन्दूनववर्ष

Leave a Comment