गुढीपाडवा २०२३ निमित्त श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा शुभसंदेश !

श्रीगुरूंना अपेक्षित असलेले रामराज्‍य अंतर्बाह्य अवतरावे, यासाठी साधनेचे प्रयत्न झोकून देऊन करण्‍याचा शुभसंकल्‍प करा !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

‘यंदा २२ मार्च या दिवशी गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा, म्‍हणजे सृष्‍टीचा निर्मितीदिन ! या नववर्षारंभ दिनाच्‍या निमित्ताने श्रीरामस्‍वरूप सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या चरणी शरण जाऊन साधनेचे प्रयत्न वृद्धींगत करण्‍याचा शुभसंकल्‍प करूया !

त्रेतायुगात प्रभु श्रीरामचंद्रांनी अवतारी कार्य करतांना पितृआज्ञेने १४ वर्षांच्‍या वनवासाचा कठीण काळही भोगला. त्‍यानंतर सकल जनांचे कल्‍याण करणारे आदर्श रामराज्‍य स्‍थापन केले. प्रभु श्रीरामाने रघुवंशाचे कुलगुरु महर्षि वसिष्‍ठ यांच्‍या मार्गदर्शनाखाली राज्‍य केले. आदर्श राजा असलेला श्रीविष्‍णुचा अवतार प्रभु श्रीराम आणि त्‍यांना मार्गदर्शन करणारे महर्षि वसिष्‍ठ यांच्‍या आध्‍यात्मिक शक्‍तीचा आविष्‍कार म्‍हणजे रामराज्‍य ! श्रीरामस्‍वरूप सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवही या कलियुगात हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेचे अवतारी कार्य अविरत करत आहेत. सध्‍याचा आपत्‍काळ समाप्‍त होताच त्‍यांच्‍या संकल्‍पाने रामराज्‍याची अनुभूती देणारे हिंदु राष्‍ट्र अवतरणार आहे. श्रीगुरूंच्‍या या अवतारी कार्यासाठी सप्‍तर्षि जीवनाडीपट्टीच्‍या माध्‍यमातून आपल्‍याला वसिष्‍ठ, विश्‍वामित्रादी सप्‍तर्षींचे मार्गदर्शन लाभत आहे. भगवंताने त्‍याच्‍या या अवतारी कार्याचे आपल्‍याला साक्षीदार तर बनवले आहेच, त्‍यासह त्‍याच्‍या या दिव्‍य कार्यात सहभागीही करून घेतले आहे, यासाठी आपण अंतरी अखंड कृतज्ञताभाव अनुभवूया.

भगवंताच्‍या कृपेने याच जन्‍मात आपला उद्धार व्‍हावा, यासाठी हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेपूर्वीच्‍या या संधीकाळात साधनेच्‍या प्रयत्नांची गती वाढवूया. गुढीपाडव्‍याच्‍या निमित्ताने स्‍वतःतील दोष-अहंची मलिनता नष्‍ट होऊन अंतरंग निर्मळ बनावे आणि तेथे ईश्‍वरी गुण रूजावेत, यासाठी व्‍यष्‍टी साधनेचे प्रयत्न तळमळीने आणि चिकाटीने करण्‍याचे ध्‍येय ठेवूया. त्‍यासमवेत हिंदु राष्‍ट्र भूतलावर शीघ्रतेने अवतरावे, यासाठी समष्‍टी साधनेचे प्रयत्न झोकून देऊन करण्‍याचा शुभसंकल्‍प करूया. निर्मळ आणि भक्‍तीपूर्ण अंतःकरणाने प्रभु श्रीरामाच्‍या परमदिव्‍य सुकोमल चरणी शरण जाऊया. श्रीगुरूंना अपेक्षित असलेले अंतर्बाह्य रामराज्‍य शीघ्रतेने अवतरावे, यासाठी त्‍याच्‍या चरणी कळकळीने साकडे घालूया !’

– श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या एक आध्‍यात्मिक उत्तराधिकारी (२१.३.२०२३)

 

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी प्रभु श्रीरामाच्‍या चरणी केलेली आर्त प्रार्थना !

‘हे श्रीरामा, आम्‍ही रामराज्‍याची तळमळीने वाट पहात आहोत ! रामराज्‍यातील दिव्‍य वातावरण या भूतलावर पुन्‍हा एकदा अवतरू दे. आम्‍हाला त्‍या परमानंदाची अनुभूती घेता येऊ दे. सर्वांमध्‍ये नवचैतन्‍य संचारू दे. चराचर सृष्‍टी पुनश्‍च आनंदाने पुलकित होऊ दे. तुझ्‍या दिव्‍य चरणस्‍पर्शाने या भूतलाचा उद्धार कर रघुराजा ! हे भगवंता, ही धरणी पुन्‍हा एकवार मंगलमय व्‍हावी, अशी तुझ्‍या चरणी प्रार्थना !’

– श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२१.३.२०२३)

‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केलेली ही प्रार्थना खूप आवडली आणि तिच्‍यातून ‘प्रार्थना कशी करावी?’, हे शिकायला मिळाले. याबद्दल सर्वच साधकांच्‍या वतीने मी कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’ – सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (२१.३.२०२३)

Leave a Comment