सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांचा साधनाप्रवास भाग – २

लेखाचा प्रथम भाग वाचण्यासाठी भेट द्या सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांचा साधनाप्रवास भाग – १

अनुक्रमणिका

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या जाहीर सभांच्‍या वेळी पू. शिवाजी वटकर यांनी केलेल्‍या विविध सेवा

१२. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे निवासस्‍थान असलेल्‍या मुंबई सेवाकेंद्रात केलेल्‍या सेवा !

१२ अ. मुंबई सेवाकेंद्रात परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचा प्रत्‍यक्ष सत्‍संग मिळून ते सांगतील, त्‍या सर्व सेवा करणे

‘वर्ष १९९० ते १९९९ या काळात मी माझ्‍या कार्यालयातील कामकाज पूर्ण झाल्‍यानंतर सायंकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे निवासस्‍थान असलेल्‍या मुंबईतील सेवाकेंद्रात जात असे. तेथे मी ग्रंथांचे मुद्रितशोधन, साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’च्‍या संदर्भातील सेवा, मुंबई-ठाणे-रायगड या जिल्‍ह्यांतील प्रचाराच्‍या नियोजनाची सेवा किंवा परात्‍पर गुरु डॉक्‍टर सांगतील, त्‍या सर्व सेवा करत होतो. प्रतिदिन माझ्‍याकडे सेवेसाठी ४ घंटे वेळ असायचा. परात्‍पर गुरु डॉक्‍टर माझ्‍यासाठी १० घंट्यांची सेवा उपलब्‍ध करून ठेवायचे. तेथील सेवांमुळे मला परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचा प्रत्‍यक्ष सत्‍संग मिळून त्‍यांच्‍याकडून शिकता आले.

१२ आ. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या लिखाणाचे वर्गीकरण करतांना पुष्‍कळ आनंद मिळणे

परात्‍पर गुरु डॉक्‍टर मला त्‍यांच्‍या लिखाणाची कात्रणे द्यायचे. त्‍या कात्रणांवर ‘भक्‍तीयोग’, ‘कर्मयोग’, ‘साधना’, आदी लिहिलेले असे. त्‍यानुसार त्‍यांचे वाचन करून मी वर्गीकरण करत असे. ही सेवा करतांना मला पुष्‍कळ आनंद मिळत असे. नंतर मी निवृत्त झाल्‍यावर काही आस्‍थापनांनी माझ्‍या अनुभवाचा लाभ घेण्‍यासाठी मला नोकरीसाठी बोलावले; मात्र सेवा करतांना मिळणार्‍या आनंदामुळे मला अशा नोकरीत रस राहिला नव्‍हता.

१२ इ. ग्रंथांचे मुद्रितशोधन करणे

मी मुंबई येथून ग्रंथ लिखाणाच्‍या काही प्रकरणांच्‍या प्रती घेऊन घरी जात असे आणि मला वेळ मिळेल, तसे त्‍यांचे मुद्रितशोधन करत असे.

१२ ई. प.पू. डॉक्‍टरांच्‍या प्रवचनांच्‍या नोंदीतून एक लेख बनवणे, तो वाचल्‍यावर प.पू. डॉक्‍टरांनी लेखातील चुका सांगणे आणि शरणागतभावाने त्‍यांची क्षमायाचना करून सुधारणा केल्‍यावर त्‍यांना तो लेख आवडणे

वर्ष १९९५ च्‍या गुरुपौर्णिमेनंतर प.पू. भक्‍तराज महाराज रुग्‍णाईत होते. त्‍यामुळे प.पू. डॉक्‍टर त्‍यांच्‍या समवेत गेले होते. मी त्‍यांच्‍या प्रवचनांच्‍या नोंदीतून एक लेख बनवला आणि त्‍याची प्रत त्‍यांच्‍याकडे पन्‍हाळा (जि. कोल्‍हापूर) येथे पाठवली. त्‍यांनी त्‍यामध्‍ये काही सुधारणा केल्‍या. त्‍या लिखाणात व्‍याकरण, शब्‍द आणि वाक्‍यरचना यांच्‍या पुष्‍कळ चुका होत्‍या. त्‍यावर प.पू. डॉक्‍टरांनी लिहिले होते, ‘पुष्‍कळ चुका आहेत. तुम्‍हाला एवढेही कसे येत नाही !’

तेव्‍हा ‘माझे लिखाण अशुद्ध असून मला काहीच येत नाही’, याची मला जाणीव झाली. मी शरणागतभावाने त्‍यांच्‍याकडे क्षमायाचना केली. त्‍यांनी सुचवल्‍यानुसार लेखात सुधारणा केल्‍या. त्‍यानंतर ते म्‍हणाले, ‘‘आता हा लेख पुष्‍कळ छान झाला आहे. याचा आपण ग्रंथ छापू. जिज्ञासू, तसेच प्रवचन किंवा सत्‍संग घेणारे साधक यांना प्रत्‍यक्ष साधना करण्‍यास याचा उपयोग होईल.’’ त्‍यानंतर ३०.७.१९९६ या दिवशी त्‍यांनी ‘अध्‍यात्‍माचे प्रास्‍ताविक विवेचन’ हा ग्रंथ प्रकाशित केला.

१२ उ. कार्यालयात जाण्‍या-येण्‍याच्‍या वेळेचा सेवेसाठी करून घेतलेला लाभ !

वर्ष २००६ पर्यंत, म्‍हणजे मी निवृत्त होईपर्यंत मला नोकरी करत असतांनाच साधना आणि सेवा यांत सातत्‍य ठेवता आले. मला कार्यालयात जाण्‍या-येण्‍यासाठी ३ घंटे लागायचे. या प्रवासाच्‍या वेळी मला नामजप करणे, सेवेचा समन्‍वय करणे, ग्रंथांचे वाचन करणे, सत्‍संग किंवा अभ्‍यासवर्ग यांची सिद्धता करणे इत्‍यादी सेवा करता आल्‍या. कार्यालयात गेल्‍यानंतर मी माझी सर्व कर्तव्‍ये तत्‍परतेने पूर्ण करून राहिलेला वेळ साधना आणि सेवा यांसाठी देत असे. काही अर्पणदाते आणि धर्माभिमानी माझ्‍या संपर्कात होते. त्‍यांच्‍याकडून मी गुरुकार्यासाठी विज्ञापने आणि अर्पण घेत असे.

१३. साधकांकडून समष्‍टी साधना करून घेऊन त्‍यांना घडवणारे परात्‍पर गुरु डॉ. आठवले !

१३ अ. आरंभी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी स्‍वतः सत्‍संग घेऊन शिकवणे आणि नंतर साधकांना समाजात जाऊन सत्‍संग घेण्‍यास प्रवृत्त करणे

आरंभी परात्‍पर गुरु डॉक्‍टर त्‍यांच्‍या मुंबई येथील निवासस्‍थानी आम्‍हा १० – १२ साधकांसाठी सत्‍संग घेऊ लागले. ६ मासांनंतर त्‍यांनी आम्‍हाला बाहेर समाजात जाऊन सत्‍संग घेण्‍याचे नियोजन करण्‍यास सांगितले. तेव्‍हा मला वाटले, ‘येथे परात्‍पर गुरु डॉक्‍टर सत्‍संग घेत असल्‍याने त्‍यांच्‍या आकर्षणाने १० – १२ जण येतात. आम्‍ही बाहेर सत्‍संग घेतल्‍यावर सत्‍संगाला कोण येणार ?’; मात्र त्‍यांचे आज्ञापालन म्‍हणून आम्‍ही प्रत्‍येक रविवारी दादर येथील एक साधक श्री. कुबल यांच्‍या माहीम येथील औद्योगिक वसाहतीतील गाळ्‍यामध्‍ये दुपारी १ ते ५ सत्‍संग आणि अभ्‍यासवर्ग घेण्‍यास आरंभ केला. त्‍यानंतर आम्‍ही माहीम येथे ‘सिटी ऑफ लॉस एंजल्‍स’ या महानगरपालिकेच्‍या इंग्रजी शाळेत सत्‍संग आणि अभ्‍यासवर्ग घेऊ लागलो. आश्‍चर्य म्‍हणजे परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या संकल्‍पामुळे तेथे साधकांची उपस्‍थिती पुष्‍कळ वाढली. परात्‍पर गुरु डॉक्‍टर आवश्‍यकतेनुसार त्‍या सत्‍संगात येऊन मार्गदर्शन करत असत.

१३ आ. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने प्रवचने आणि सत्‍संग घेता येऊन त्‍यांना उत्तम प्रतिसाद लाभणे

आरंभी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी मला मुंबई, ठाणे आणि रायगड येथे साप्‍ताहिक सत्‍संग घेण्‍यास सांगितले. मी भगवद़्‍गीता, महाभारत किंवा इतर आध्‍यात्मिक ग्रंथ यांंचे वाचन केले नव्‍हते. प्रवचने, कीर्तने आदी ऐकली नव्‍हती किंवा पोथीपुराणांतील कथा वाचल्‍या आणि ऐकल्‍या नव्‍हत्‍या. माझ्‍यावर लहानपणापासून साधनेचे संस्‍कार झाले नव्‍हते. असे असतांना केवळ परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने मला प्रवचने आणि सत्‍संग घेता आले अन् त्‍यांना उत्तम प्रतिसादही मिळाला.

१३ इ. साधकांच्‍या सेवेतील चुका सांगणारे, तसेच सेवा चांगली झाल्‍यावर सत्‍संगात कौतुक करून प्रोत्‍साहन देणारे परात्‍पर गुरु डॉ. आठवले !

सेवा केल्‍यानंतर ‘प्रत्‍येक वेळी मी कुठे न्‍यून पडलो ?’, याविषयी परात्‍पर गुरु डॉक्‍टर मला सांगायचे. त्‍याचप्रमाणे जी सेवा त्‍यांच्‍याच कृपेने झालेली असायची, तिचे कौतुक करून ते मला प्रोत्‍साहनही द्यायचे. ‘इतरांना शिकता यावे’, यासाठी ते सत्‍संग आणि अभ्‍यासवर्ग या ठिकाणी त्‍या सेवेविषयी सांगायचे. ‘चुका सांगणे आणि कौतुक करणे’, हे सर्व त्‍यांचे आशीर्वादात्‍मक अमृतवचनच आहे’, असे मला वाटायचे.

१३ ई. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी साधकाच्‍या व्‍यष्‍टी प्रकृतीचे समष्‍टी प्रकृतीमध्‍ये रूपांतर करणे

लहानपणापासून माझी ‘एकलकोंडेपणाने रहाणे, मनमोकळेपणाने न बोलणे, मी भला आणि माझे काम भले’, अशी संकुचित, म्‍हणजे व्‍यष्‍टी प्रकृती होती. ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी माझ्‍या व्‍यष्‍टी प्रकृतीचे समष्‍टी प्रकृतीमध्‍ये कधी रूपांतर करून घेतले’, हे मला कळलेच नाही. विशेष म्‍हणजे त्‍यांनी माझ्‍यात व्‍यापकत्‍व वाढवून समष्‍टी कार्य करवून घेत माझी आध्‍यात्मिक प्रगतीही करवून घेतली.

१३ उ. प.पू. भक्‍तराज महाराज यांनी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी घडवलेल्‍या साधकांचे कौतुक करणे

मुंबई येथे मी प.पू. बाबांच्‍या समवेत असतांना त्‍यांचे भक्‍त मला विचारायचे, ‘‘तुम्‍हाला प.पू. बाबांनी अनुग्रह किंवा गुरुमंत्र दिला आहे का ?’’ तेव्‍हा मी त्‍यांना सांगायचो, ‘‘मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी सांगितलेला माझ्‍या ‘कुलदेवते’चा नामजप करतो.’’ असे असतांनाही ‘प.पू. बाबा मला एवढे जवळ का करतात ?’, याचे त्‍या भक्‍तांना आश्‍चर्य वाटायचे. काही वेळा प.पू. बाबा आमच्‍याकडे (परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या शिष्‍यांकडे) बोट दाखवून त्‍यांच्‍या भक्‍तांना सांगायचे, ‘‘डॉक्‍टरांची मुले (शिष्‍य) लाखमोलाची आहेत ! त्‍यांच्‍यासारखी सेवा करायला शिका.’’ तेव्‍हा ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी मला कसे घडवले ?’, याची जाणीव होऊन माझी भावजागृती व्‍हायची.

‘मी कसा होतो आणि परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी मला कसे घडवले ?’, याचा विचार केल्‍यावर ‘त्‍यांचे माझ्‍यावर अनंत कोटी ऋण आहेत. हे ऋण मी कणभरही फेडू शकत नाही’, याची मला पावलोपावली जाणीव होते.

१४. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा अध्‍यात्‍मप्रसार दौरा !

१४ अ. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या दौर्‍याच्‍या वेळी चालक म्‍हणून सेवा करणे आणि त्‍यांचे अनेक गुण जवळून अनुभवता येणे

वर्ष १९९२ मधील डिसेंबरच्‍या पहिल्‍या आठवड्यात परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी रायगड जिल्‍ह्याचा पहिला अध्‍यात्‍मप्रसार दौरा केला. तेव्‍हा पू. (कै.) विनय भावे (सनातनचे ३५ वे संत) यांनी त्‍यांच्‍या दौर्‍याचे नियोेजन केले होते. मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या समवेत चालक म्‍हणून आणि शिकण्‍यासाठीही गेलो होतो. हा ४ दिवसांचा दौरा होता. पहिले प्रवचन नागोठणे येथे, म्‍हणजे गुरुदेवांच्‍या जन्‍मस्‍थानी झाले. ६.१२.१९९२ या दिवशी दौर्‍यातील शेवटचे प्रवचन पाली येथे झाले. या प्रसारदौर्‍यात मला परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृतीतून त्‍यांचे अनेक गुण शिकता आले. त्‍यांची साधी रहाणी, काटकसरीपणा, वक्‍तशीरपणा, इतरांचा विचार करणे, वागण्‍यामधील सहजता आदी अनेक गुण अनुभवता आले. ‘अध्‍यात्‍मप्रसाराची समष्‍टी सेवा कशी करायची ?’, हे त्‍यांनीच मला शिकवले.

१४ आ. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या जिल्‍ह्याजिल्‍ह्यांतील जाहीर सभांच्‍या निमित्ताने अनेक सेवा करण्‍याची संधी मिळणे

परात्‍पर गुरु डॉक्‍टर आरंभी प्रवचने आणि अभ्‍यासवर्ग घेत असत. प्रचारकार्य वाढत गेले, तसा समाजातून प्रतिसादही वाढत गेला. व्‍यापक जनजागृतीसाठी त्‍यांनी मैदाने आणि सभागृहे येथे जाहीर सभा घेण्‍यास आरंभ केला. त्‍यांच्‍यातील चैतन्‍यामुळे या सभांना चांगला प्रतिसाद मिळत असे. मुंबई, ठाणे, रायगड आणि सोलापूर येथे त्‍यांच्‍या सभा झाल्‍या. तेव्‍हा मला ‘त्‍या सभांचे नियोजन, सभेचा प्रचार, सभा चालू असतांना कराव्‍या लागणार्‍या सेवा आणि सभेनंतरच्‍या प्रसाराची सेवा’, अशा सेवा करण्‍याची संधी मिळाली.

१४ इ. परात्‍पर गुरु डॉ. आठवले घेत असलेल्‍या जाहीर सभांची वैशिष्‍ट्ये !

१४ इ १. सभेचे वैशिष्‍ट्यपूर्ण व्‍यासपीठ ! : या जाहीर सभा ‘सनातन भारतीय संस्‍कृती संस्‍थे’च्‍या वतीने घेण्‍यात आल्‍या. सभेच्‍या व्‍यासपिठावर वक्‍त्‍याच्‍या पाठीमागे श्रीकृष्‍णार्जुनाच्‍या रथाचा भव्‍य पडदा लावलेला असे. व्‍यासपिठाच्‍या उजव्‍या बाजूला श्रीराम आणि मारुति, तर डाव्‍या बाजूस श्रीकृष्‍ण आणि परशुराम यांची युद्धसज्‍ज असलेली भव्‍य चित्रे लावली जात. त्‍यामुळे सभेचे मैदान म्‍हणजे कुरुक्षेत्राची युद्धभूमी वाटत असे. सभेच्‍या ठिकाणी चैतन्‍यमय वातावरणही निर्माण होत असे.

१४ इ २. सभांच्‍या वेळी येणार्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती

अ. ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या रूपात प्रत्‍यक्ष श्रीकृष्‍ण श्रोत्‍यांना ‘साधना म्‍हणजे कलियुगातील गीता’ सांगत आहे’, अशी अनुभूती शेकडो साधक आणि समाजातील व्‍यक्‍ती यांना येत असे. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे लेखातून अथवा बोलण्‍यातून शिकवणे म्‍हणजे ‘कलियुगातील गीता’ अशी अनुभूती शेकडो साधक आणि समाजातील व्‍यक्‍ती यांना येते.

आ. परात्‍पर गुरु डॉक्‍टर प्रवचनाच्‍या वेळी नेहमी सांगायचे, ‘साधकांनी प्रवचनांतील शब्‍दांकडे लक्ष न देता ‘कोणती अनुभूती येते का ?’, ते पहावे.’ नेमके तसेच होत असे. ‘साधकांना प्रत्‍यक्ष भगवंत बोलत आहे’, अशी अनुभूती येत असे.

इ. मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांची शेकडो प्रवचने आणि अनेक जाहीर सभा यांतून त्‍यांचे मार्गदर्शन ऐकले आहे; मात्र ‘प्रत्‍येक वेळी मी ते प्रथमच ऐकत आहे’, असे वाटून मला आनंद मिळत असे. ‘नित्‍यनूतनः सनातनः ।’ म्‍हणजे ‘सनातन म्‍हणजे नित्‍यनूतन’, याचा मला अनुभव येत असे.

ई. परात्‍पर गुरु डॉक्‍टर यांची प्रवचन किंवा सभा यांच्‍याशी संबंधित सेवा करतांना साधकांना नेहमी उत्‍साह आणि आनंद वाटणे : प्रवचन किंवा सभा यांच्‍याशी संबंधित सेवा करतांना मला नेहमी उत्‍साह आणि आनंद वाटत असे. मायेतील एखादी आवडती गोष्‍ट पुनःपुन्‍हा केली, तर तिचा कंटाळा येतो; मात्र या सेवांतून कंटाळा न येता नेहमी आनंदच मिळत असे; कारण हेे सर्व कार्य परात्‍पर गुरु डॉक्‍टरांमधील चैतन्‍यशक्‍तीमुळे होत होते.

१५. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने अध्‍यात्‍माचा प्रचार करण्‍यासाठी लाभलेले सहसाधक !

१५ अ. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांप्रती पुष्‍कळ भाव असलेल्‍या आदर्श साधिका दादर येथील श्रीमती सावंतआजी !

वर्ष १९९० ते वर्ष १९९२ या काळात परात्‍पर गुरु डॉक्‍टर दादर येथील संत ज्ञानेश्‍वर मंदिर, समर्थ व्‍यायाम मंदिर आणि बालमोहन शाळा येथे रविवारी दुपारी १ ते ५ या वेळेत अभ्‍यासवर्ग घेत असत. त्‍या अभ्‍यासवर्गाला दादर येथील श्रीमती सावंतआजी येत. त्‍यांना कथा, कीर्तने आणि प्रवचने आवडत. त्‍या गुरूंच्‍या शोधात होत्‍या. संत ज्ञानेश्‍वर मंदिरात परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या अभ्‍यासवर्गाला आल्‍यावर त्‍यांचा गुरूंचा शोध संपला आणि त्‍यांना जे पाहिजे होते, ते मिळाले. त्‍यांचा परात्‍पर गुरु डॉक्‍टरांप्रती पुष्‍कळ भाव होता. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी ‘त्‍यांची आध्‍यात्मिक पातळी ७० टक्‍के आहे’(म्‍हणजे त्‍या संत आहेत.), असे आम्‍हाला सांगितले होते. त्‍या आमच्‍यासाठी आदर्श साधिका होत्‍या.

१५ आ. साधनेत साहाय्‍य करणारे पू. (कै.) विनय भावे (सनातनचे ३५ वे संत)

पू. भावे यांच्‍या वरसई, (ता. पेण, जि. रायगड) येथील घरी अनेक संत आणि संप्रदायांचे प्रमुख यायचे. घाटकोपरचे प.पू. जोशीबाबा यांच्‍या समवेत मी अनेक वेळा पू. विनय भावे यांच्‍याकडे गेलो आहे. पू. भावे यांच्‍यात पुष्‍कळ प्रेमभाव होता. मला त्‍यांच्‍याकडून पुष्‍कळ शिकता आले आणि साधनेतही नेहमी साहाय्‍य झाले.

१५ इ. नोकरी सोडून पूर्णवेळ साधना करणारे मुंबईतील पहिले साधक – श्री. माधव देशपांडे

परात्‍पर गुरु डॉक्‍टर बांद्रा (मुंबई) येथे घेत असलेल्‍या अभ्‍यासवर्गाला श्री. देशपांडे आले होते. ते ‘जर्मन रेमेडीज्’ या औषध निर्मितीच्‍या कारखान्‍यात नोकरी करत होते. त्‍यांनी मला घरच्‍याप्रमाणे प्रेम दिले. त्‍यांच्‍यामुळे मला सेवा करण्‍यास आधार मिळाला. आम्‍ही दोघांनी एकत्रित साधना आणि प्रचारसेवा चालू केली. त्‍यांनी मला प्रचारात मोलाचे साहाय्‍य केले. गुरुदेवांच्‍या कृपेने आम्‍ही श्री. देशपांडे यांच्‍या वरळी (मुंबई) येथील घरी साप्‍ताहिक सत्‍संग चालू केला. त्‍यानंतर वरळी भागात अनेक सत्‍संग चालू झाले. नोकरी सोडून पूर्णवेळ साधना करणारे श्री. देशपांडे हे मुंबईतील पहिले साधक होतेे. त्‍यांच्‍या घरात मिळवतेे दुसरे कोणी नसल्‍यामुळे त्‍यांच्‍यावर कुटुंबियांचे दायित्‍व होते, तरीही त्‍यांनी पूर्णवेळ साधना करण्‍यासाठी नोकरी सोडली. तेव्‍हा परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना पुष्‍कळ आनंद झाला. ते म्‍हणाले, ‘‘एक जीव मायेतून सुटला !’’

१५ ई. सनातनला पहिली गाडी अर्पण करणारे श्री. काली मेहेरनोश !

श्री. मेहेरनोश ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ या आस्‍थापनात माझ्‍याप्रमाणे उच्‍च पदावर कार्यरत होते. मी त्‍यांना सनातन संस्‍था आणि साधना यांविषयी सांगितल्‍यावर त्‍यांनी लगेच साधना करायला आरंभ केला. त्‍यांना चांगल्‍या अनुभूतीही आल्‍या. श्री. मेहेरनोश यांना त्‍यांची जुनी ‘फियाट’ गाडी सनातन संस्‍थेच्‍या प्रसारकार्यासाठी अर्पण करायची होती. तेव्‍हा परात्‍पर गुरु डॉक्‍टर श्री. मेहेरनोश यांना म्‍हणाले, ‘‘तुम्‍ही सनातनमध्‍ये असा किंवा नसा; पण तुम्‍ही साधना चालू ठेवणार असाल, तरच अध्‍यात्‍माच्‍या प्रसारासाठी गाडी अर्पण म्‍हणून घेऊ.’’ श्री. मेहेरनोश यांचा भाव चांगला होता. त्‍यांनी त्‍यांची ‘फियाट’गाडी सनातन संस्‍थेला अर्पण केली. तेव्‍हापासून वर्ष २००८ पर्यंत, म्‍हणजे १० वर्षे ते सनातन संस्‍थेमध्‍ये सेवा आणि साधना करत होते. मी नोकरी आणि प्रसार करत असतांना परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी मला श्री. मेहेरनोश यांच्‍या रूपात एक चांगला आध्‍यात्मिक आणि व्‍यावहारिक मित्र दिला होता. त्‍यांचा मी सदैव ऋणी आहे.

१५ उ. आध्‍यात्मिक मैत्री जपणारे श्री. तुकाराम लोंढे !

वर्ष १९९५ पासून आतापर्यंत परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी श्री. तुकाराम लोंढे ( वर्ष २०२३ मधील आध्‍यात्मिक पातळी ६७ टक्‍के) यांच्‍याशी माझी आध्‍यात्मिक मैत्री करून दिली आहे.

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी घरून विरोध असणार्‍या आणि आध्‍यात्मिक त्रास असलेल्‍या अनेक साधकांकडूनही साधना अन् सेवा करून घेतली आहे. साधना आणि अध्‍यात्‍मप्रसार सेवेत मला अनेकांचे अनमोल साहाय्‍य लाभले. सहसाधकांचे घर म्‍हणजे मला श्री गुरूंचा आश्रमच वाटायचा. मला मिळालेले सहसाधक हे परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी माझ्‍या साहाय्‍यासाठी दिलेले देवदूत होते. माझी संतपदापर्यंत वाटचाल होण्‍यात या सर्वांचा सिंहाचा वाटा आहे. त्‍यामुळे ‘माझ्‍या संपर्कातील सर्व साधकांची आध्‍यात्मिक प्रगती व्‍हावी’, असे मला मनापासून वाटते.

वर्ष २०१० पासून परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी मला देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमात पूर्णवेळ निवास करण्‍याची संधी देऊन माझी साधना करून घेतली आहे. त्‍यातून ते माझ्‍याकडून नकळत एक प्रकारची संन्‍यासाश्रमाची साधना करून घेत आहेत. त्‍यासाठी मी त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

सूक्ष्म जगताची ओळख करून देणारे आणि सेवा करतांना वाईट शक्‍तींच्‍या अडथळ्‍यांपासून रक्षण करणारे परात्‍पर गुरु डॉ. आठवले !

१६. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी ‘सूक्ष्म जगता’ची करून दिलेली ओळख

१६ अ. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी अभ्‍यासवर्गात घेतलेल्‍या सूक्ष्मातील प्रयोगांमुळे ‘सूक्ष्म’ विषय कळू लागणे

साधनेत येण्‍यापूर्वी ‘सूक्ष्म जग असते’, हे मला ठाऊकच नव्‍हते. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी अभ्‍यासवर्गात सूक्ष्मातील अनेक प्रयोग घेतल्‍यामुळे मला त्‍याविषयी ठाऊक झाले आणि थोडेफार कळूही लागले. मला कधी वाईट शक्‍ती दिसली नाही. त्‍यामुळे मी कुठेही गेलो, तरी मला त्‍यांची भीती वाटत नाही. माझ्‍याभोवती गुरुकृपेचे संरक्षककवच असल्‍यामुळे मी सुरक्षित आणि स्‍थिर राहू शकत आहेे.

१६ आ. अध्‍यात्‍मप्रचाराच्‍या सेवेत वाईट शक्‍तींचे आलेले अडथळे

१. वर्ष १९९३ – १९९४ मध्‍ये मी अध्‍यात्‍माच्‍या प्रचारासाठी संभाजीनगर, पुणे, रायगड इत्‍यादी ठिकाणी जात होतो. प्रचारासाठी बाहेरगावी जातांना मला अनिष्‍ट शक्‍तींचा विरोध होत असे.

२. वर्ष २००१ मध्‍ये मला अकस्‍मात् हृदयविकाराचा त्रास चालू झाला. तेव्‍हा परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने घाटकोपर (मुंबई) येथील प.पू. विजय जोशीबाबा यांनी माझ्‍यासाठी आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय केले. त्‍यामुळे मी वाईट शक्‍तींच्‍या प्राणघातक आक्रमणातून वाचलो.

३. वर्ष २०१० पासून वाईट शक्‍तींच्‍या आक्रमणामुळे आमच्‍या कुटुंबात काही कौटुंबिक प्रश्‍न निर्माण झाले. वर्ष २०१२ पासून माझ्‍या कुटुंबियांवर ७ – ८ न्‍यायालयीन खटले चालू झाले. ‘वाईट शक्‍तींनी मी आणि माझे कुटुंबीय यांच्‍या साधनेत आणलेले हे अडथळे आहेत’, असे मला वाटते. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने मला वाईट शक्‍तींच्‍या आक्रमणावर मात करता आली आणि माझ्‍या सेवेत खंड पडला नाही.

१७. अन्‍य राज्‍यांत प्रचार करतांना परात्‍पर गुरु डॉक्‍टरांची अनुभवलेली अपार कृपा आणि अनिष्‍ट शक्‍तींपासून झालेले रक्षण

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने मला वर्ष १९९६ ते २००० पर्यंत प्रत्‍येक शनिवारी आणि रविवारी सोलापूर, कर्णावती (अहमदाबाद), बडोदा, तसेच भाग्‍यनगर (हैद्राबाद) येथे अध्‍यात्‍म प्रचारासाठी जाण्‍याची संधी मिळाली.

१७ अ. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी भाग्‍यनगर जाण्‍यास सांगणे आणि त्‍यांच्‍या कृपेने अनोळखी प्रदेशात निवास, भोजन, प्रवास इत्‍यादींची सोय होणे

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी आरंभी भाग्‍यनगर येथे मला एकट्यालाच अध्‍यात्‍म प्रचारासाठी जाण्‍यास सांगितले होते. ‘गुरुदेव सांगत आहेत, म्‍हणजे तेच माझ्‍याकडून अपेक्षित अशी सेवा करून घेणार आहेत’, असा विचार करून मी भाग्‍यनगर येथे प्रचारासाठी गेलो. ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी तिथे माझ्‍यासाठी अगोदरच सर्व नियोजन केले होते’, याची मला अनुभूती आली. मी भाग्‍यनगरला पूर्वी कधीही गेलो नव्‍हतो, तरीही गुरुकृपेने तेथे माझी निवास, भोजन, प्रवास आणि संपर्क या सगळ्‍यांची सोय झाली. अन्‍य राज्‍यांत जाऊन एकट्यानेच प्रचार चालू केल्‍याने माझी तन-मन-धनाने सेवाही झाली. कार्याला विरोध करणार्‍यांकडे साक्षीभावाने पाहून मला त्‍यांना टाळता येऊ लागले.

१७ आ. बडोदा (गुजरात) येथे सेवा करतांना परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने वाईट शक्‍तींपासून रक्षण होणे

१७ आ १. बडोदा येथे एका व्‍यक्‍तीने ग्रंथप्रदर्शन कक्षावर साहाय्‍य करून जवळीक करणे : आरंभी मी बडोदा (गुजरात) येथे अध्‍यात्‍म प्रचारासाठी एकटाच जात असे. मी तेथील मंदिराबाहेर सनातन-निर्मित ग्रंथांचे प्रदर्शनकक्ष लावत असे. एकदा तिथे आलेल्‍या एका व्‍यक्‍तीने मला ‘‘तुम्‍हाला काही साहाय्‍य हवे का ?’’, असे विचारले आणि साहाय्‍यही केले. असे काही वेळा झाल्‍यावर ‘मंदिरात येणारी ती व्‍यक्‍ती धार्मिक आहे’, असे मला वाटले आणि माझी तिच्‍याशी चांगली ओळख झाली.

१७ आ २. मंदिरात भेटलेल्‍या व्‍यक्‍तीने सहसाधकाशी ओळख वाढवून त्‍यांना घरी नेऊन जेवू घालणे आणि नंतर सहसाधकाला आध्‍यात्मिक त्रास होऊ लागणे : त्‍यानंतर पनवेल, रायगड येथील साधक श्री. प्रमोद बेंद्रे माझ्‍या समवेत बडोदा येथे सेवेसाठी येऊ लागले. त्‍यांचीही त्‍या व्‍यक्‍तीशी ओळख झाली. ती व्‍यक्‍ती श्री. बेंद्रे यांना तिच्‍या घरी जेवायला घेऊन जात असे; पण त्‍यामुळे श्री. बेंद्रेना आध्‍यात्मिक त्रास होऊ लागला.

१७ आ ३. ‘मंदिरात भेटलेली व्‍यक्‍ती अघोरी विद्येचे प्रयोग करणारी आहे’, असे कळणे; मात्र परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने सुरक्षित रहाणे : नंतर मला कळले, ‘ती व्‍यक्‍ती अघोरी विद्येचे प्रयोग करणारी आहे.’ त्‍या व्‍यक्‍तीने मला ग्रंथ प्रदर्शनासाठी साहाय्‍य केले आणि बडोद्यातील तिच्‍या ओळखीच्‍या धार्मिक व्‍यक्‍तींचे संपर्क क्रमांकही दिले होते. ती व्‍यक्‍ती आरंभी कोणताही त्रास न देता ‘धर्मप्रचारासाठी साहाय्‍य करत आहे’, असेे दाखवत होती आणि नंतर त्रास देत होती; मात्र परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या संरक्षक कवचामुळे मी पूर्णपणे सुरक्षित राहिलो.

अध्‍यात्‍मप्रचाराच्‍या कार्यात वाईट शक्‍ती अनेक अडथळे आणत; मात्र तेथील स्‍थानदेवता, दैवी शक्‍ती, संत आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या चैतन्‍याचे माझ्‍याभोवती कवच निर्माण होत असे. अन्‍य राज्‍यांतील अध्‍यात्‍मप्रचाराचे कार्य मी केवळ परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचा संकल्‍प आणि कृपाशीर्वाद यांमुळेच करू शकलो. त्‍यांनी माझ्‍या साधनेतील केवळ स्‍थुलातीलच नाही, तर सूक्ष्मातील अडथळेही दूर केले. त्‍यामुळे मी थोडीफार सेवा करू शकलो. त्‍याबद्दल त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या सत्‍संगामुळे झालेले गुणवर्धन आणि त्‍यांच्‍या अविस्‍मरणीय सत्‍संगातील काही सुखद आठवणींचे स्‍मरण

१८. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या सत्‍संगामुळे झालेले गुणवर्धन

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१८ अ. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचा स्‍थुलातून सत्‍संग लाभूनही त्‍यांचा ‘प्रीती’ हा गुण आत्‍मसात करता न येणे आणि त्‍यांनी प्रामुख्‍याने प्रेमभाव वाढवण्‍यासाठी प्रयत्न करण्‍यास सांगणे

साधना करतांना आरंभीची सलग १० वर्षे मला परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचा स्‍थुलातून सत्‍संग लाभला, तरीही मी त्‍यांच्‍याकडून ‘प्रीती’ हा गुण शिकण्‍यास न्‍यून पडलो. कधीकधी परात्‍पर गुरु डॉक्‍टर म्‍हणायचे, ‘‘निरपेक्ष प्रेम करणे’, हे वटकरांना जमणार नाही. त्‍यामुळे ‘त्‍यांचे साधनेचे दुसरे काही पैलू विकसित होतील’, अशी सेवा त्‍यांना सांगूया.’’ एवढी माझी साधनेची स्‍थिती गंभीर होती. याविषयी मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना विचारल्‍यावर ते म्‍हणाले, ‘‘तुम्‍ही प्रामुख्‍याने प्रेमभाव वाढवण्‍याचा प्रयत्न करा. म्‍हणजे सर्वकाही ठीक होईल.’’

परात्‍पर गुरु डॉक्‍टर आणि सहसाधक यांनी माझ्‍यातील ‘प्रीती’ या गुणाची वाढ होण्‍यासाठी माझ्‍याकडून सातत्‍याने प्रयत्न करून घेतले. ‘अशक्‍य ही शक्‍य करतील स्‍वामी ।’ या वचनानुसार ‘जे देवाला शक्‍य झाले नाही, ते श्री गुरु करू शकतात’, याची मला अनुभूती आली. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनीच मला अहंच्‍या गंभीर स्‍थितीतून बाहेर काढून आनंद दिला.

१८ आ. ‘नियोजन करणे’ या गुणामुळे झालेला लाभ

१८ आ १. ‘लिखित नियोजन’ म्‍हणजे देवाला दिलेला शब्‍द आहे’, असे वाटून तो शब्‍द पूर्ण करण्‍यासाठी तळमळीने प्रयत्न केले जाणे : मी लहानपणापासूनच लिखित नियोजन करायला शिकलो आणि हळूहळू मला त्‍याची गोडी लागली. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांची भेट होऊन साधना चालू केल्‍यावर ‘लिखित नियोजन’ म्‍हणजे त्‍यांना दिलेले वचन आहे’, याची जाणीव होऊन माझ्‍याकडून सेवा करण्‍याचा प्रयत्न केला जाऊ लागला. लिखित नियोजन हे माझे ‘ध्‍येय’ असते आणि ते पूर्ण झाल्‍याविना मला करमत नाही. नियोजनात ठरवलेल्‍या कृती ‘केव्‍हा पूर्ण करीन’, याचा मला रात्रंदिवस ध्‍यास लागलेला असतो. ‘यालाच ‘तळमळ’ म्‍हणतात आणि ‘साधनेमध्‍ये तळमळीला ८० टक्‍के महत्त्व आहे’, हेही परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी आम्‍हाला शिकवले आहे.

१८ आ २. नियोजन केल्‍यामुळे वेळेत आणि कार्यपद्धतीनुसार सेवा करण्‍याची शिस्‍त लागून क्षमता वाढणे : नियोजन केल्‍यामुळे मी करत असलेल्‍या सेवा माझ्‍या नियंत्रणात राहून त्‍या समयमर्यादेत करण्‍याचा प्रयत्न होत असे. त्‍यामुळे सेवा कार्यपद्धतीनुसार आणि वेळेत करण्‍याची शिस्‍त माझ्‍या अंगी बाणली गेली. अल्‍प वेळेत अधिक कृती केल्‍याने गुरुकृपेने माझी क्षमताही वाढली.

१८ आ ३. ‘नामस्‍मरणासाठी किती वेळ मिळतो’, हे दर्शवणारा लेख लिहिणे आणि त्‍यामुळे दिवसभर १३ घंटे नामजप करण्‍यासाठी मिळू शकतात’, हे लक्षात येऊन प्रयत्न होऊ लागणे : वर्ष १९९० मध्‍ये परात्‍पर गुरु डॉक्‍टर घेत असलेल्‍या अभ्‍यासवर्गात सर्वांना नामस्‍मरणाचे महत्त्व कळले; मात्र ‘नामस्‍मरण करण्‍यासाठी वेळ मिळत नाही’, असे वर्गातील सर्वजण म्‍हणू लागले. तेव्‍हा मी ‘मॅनेजमेंट फॉर चँटिंग’, असा लेख लिहिला. प्रतिदिन २४ घंटे, म्‍हणजे १४४० मिनिटे मिळतात. त्‍यामध्‍ये ‘दिवसभर मला कोणत्‍या कृती करायच्‍या आहेत आणि ‘त्‍यासाठी किती वेळ लागतो ?’, हे मी लिहून काढले. तेव्‍हा ‘जवळजवळ ५४ टक्‍के, म्‍हणजे १३ घंटे एवढा वेळ नामजप करण्‍यासाठी मिळू शकतो’, असे माझ्‍या लक्षात आले. प्रवासात, वैयक्‍तिक आवरतांना, जेवतांना, म्‍हणजे ‘ज्‍या कृती करण्‍यासाठी बुद्धीचा वापर करायचा नसतो’, अशा कृती करतांना आपण नामस्‍मरण करू शकतो.

मी हे अभ्‍यासवर्गात परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना दाखवले आणि त्‍यांच्‍या कृपेने मी तसे प्रयत्न करण्‍यास आरंभ केला. यातून ‘नामजप करण्‍यास पुष्‍कळ वेळ उपलब्‍ध आहे’, हा संस्‍कार माझ्‍या मनावर झाला.

१८ आ ४. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या प्रचारदौर्‍यांचे नियोजन करतांना त्‍यांनी अनेक बारकावे शिकवणे : परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे महाराष्‍ट्र आणि गोवा येथे अध्‍यात्‍मप्रचार दौरे असायचे. त्‍या वेळी मला त्‍यांचे लिखित नियोजन आणि त्‍या त्‍या जिल्‍ह्यांतील साधकांशी समन्‍वय करण्‍याची सेवा मिळाली. तेव्‍हा परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी मला ‘एकाच वेळी २ – ३ गोष्‍टी कशा करायच्‍या ? अगदी लहान लहान गोष्‍टींचेही नियोजन कसे करायचे ?’, इत्‍यादी शिकवले.

गुरुकृपायोगांतर्गत साधनेतील स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलन प्रक्रियेमुळे माझ्‍यातील अनेक स्‍वभावदोष जाऊन गुरुकृपेने ईश्‍वरी गुणांची वाढ होत आहे. ही सर्व परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी माझ्‍यावर केलेली कृपाच आहे.

१९. संत आणि प्रचारसेवा यांसाठी चारचाकी गाडीचा झालेला उपयोग !

मुंबई, ठाणे आणि रायगड येथील अध्‍यात्‍मप्रचाराच्‍या सेवेसाठी मला माझ्‍याकडे असलेल्‍या चारचाकी गाडीचा पुष्‍कळ उपयोग झाला. गाडीमुळे मला अध्‍यात्‍मप्रचाराची, तसेच संतांना इच्‍छित स्‍थळी नेण्‍याची सेवा करता आली.

अ. मी परात्‍पर गुरु डॉक्‍टर आणि त्‍यांच्‍या पत्नी डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांना गाडीतून मुंबई येथून परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचा अभ्‍यासवर्ग असलेल्‍या ठिकाणी घेऊन जात असे.

आ. एके दिवशी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी मला गाडीतून प.पू. काणे महाराज यांना अभ्‍यासवर्गाला घेऊन येण्‍याची सेवा दिली.

इ. घाटकोपर येथील प.पू. विजय जोशीबाबा यांच्‍या समवेत ते सांगतील, त्‍या ठिकाणी मी गाडी घेऊन जात असे.

ई. प.पू. भक्‍तराज महाराज (प.पू. बाबा) मुंबईला यायचे. तेव्‍हा मी गाडी घेऊन त्‍यांच्‍या समवेत जात असे. प.पू. बाबांनी प.पू. डॉक्‍टरांना सांगितले होते, ‘‘मी जेव्‍हा मुंबईत येईन, तेव्‍हा वटकरांना माझ्‍या समवेत ठेवा.’’

परात्‍पर गुरु डॉक्‍टर अभ्‍यासवर्गात ‘चालक’ म्‍हणून माझ्‍याकडून झालेल्‍या सेवेतील चुका घ्‍यायचे. ‘मी कुठे चुकलो ?’, हे दाखवून त्‍यांनी मला साधनेच्‍या पुढच्‍या पुढच्‍या टप्‍प्‍याला नेले. ही त्‍यांची माझ्‍यावर असलेली कृपाच आहे.

२०. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या अविस्‍मरणीय सत्‍संगातील काही सुखद आठवणी

मला परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचा १० वर्षांपेक्षाही अधिक काळ प्रत्‍यक्ष सहवास लाभला. त्‍यांच्‍या सत्‍संगातील प्रत्‍येक क्षण अविस्‍मरणीय असून त्‍यांच्‍या सुखद आणि चैतन्‍यदायी अशा काही आठवणी पुढे दिल्‍या आहेत.

२० अ. प.पू. भक्‍तराज महाराज प्रत्‍यक्ष भजने म्‍हणत असतांना ती ऐकण्‍याची तीव्र इच्‍छा असणे आणि मोरटक्‍का येथील भंडार्‍याला गेल्‍यावर प.पू. डॉक्‍टरांनी ती इच्‍छा पूर्ण करणे

प.पू. भक्‍तराज महाराज (प.पू. बाबा) मुंबईत येत. तेव्‍हा प.पू. डॉक्‍टरांच्‍या कृपेने मला त्‍यांचा अनमोल सत्‍संग लाभत असे. प.पू. बाबा जे बोलत, तो प्रत्‍येक शब्‍द मी मनात कोरून ठेवून ती अमृतवचने लिहून प.पू. डॉक्‍टरांकडे देत असे. मला प.पू. भक्‍तराज महाराज यांची भजने फार आवडायची आणि ते प्रत्‍यक्ष भजने म्‍हणत असतांना मला ती ऐकण्‍याची तीव्र इच्‍छा होती.

मोरटक्‍का येथील भंडार्‍याच्‍या दिवशी मी श्री ‘शामसाई यांच्‍या आश्रमा’त झोपायला गेलो होतो. रात्री १२ वाजता प.पू. डॉक्‍टरांनी मला शोधले आणि प.पू. बाबा भजने म्‍हणत होते, त्‍या सभागृहात नेले. तिथे बसायला जागा नव्‍हती. त्‍यामुळे त्‍यांनी मला प्रत्‍यक्ष प.पू. बाबांच्‍या चरणांजवळच बसवले आणि भजने ऐकण्‍याचा आनंद दिला.

वर्ष १९९१ पासून मी प.पू. भक्‍तराज महाराज भजने गात असतांना ऐकत होतो. मी कोणत्‍याही मनःस्‍थितीत असलो, तरी त्‍या भजनांतील चैतन्‍यामुळे मला सकारात्‍मकता आणि आनंद अनुभवता यायचा. या भजनांमुळे मला आतापर्यंत साधना करण्‍यासाठी प्रोत्‍साहन मिळत आहे आणि ‘आनंदी जीवन कसे जगायचे ?’, हेही शिकता येत आहे.

२० आ. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या सहवासातील आठवणींचे स्‍मरण होऊन ‘त्‍यांच्‍या रूपात भगवंतच समवेत होता’, या विचाराने भावजागृती होणे

डिसेंबर १९९२ मध्‍ये मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या समवेत रायगड जिल्‍ह्यात अध्‍यात्‍मप्रचाराला गेलो होतो. वाटेत आम्‍ही एका उपाहारगृहात मसाला डोसा खाल्ला होता. आता कधी कधी मला त्‍या गोष्‍टीची आठवण होते. तेव्‍हा मला काही कळत नव्‍हते; पण आता ‘प्रत्‍यक्ष भगवंतच सगुण रूपात माझ्‍या समवेत होता’, असा विचार येऊन माझी पुष्‍कळ भावजागृती होते.

सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांचा साधनाप्रवास भाग – ३

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Leave a Comment