सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांचा साधनाप्रवास भाग – १

अनुक्रमणिका

कुशाग्र बुद्धीमत्तेमुळे उच्‍च शिक्षण घेणारे आणि प्रामाणिक अन् तत्त्वनिष्‍ठ राहून कार्यालयीन कामकाज करतांना शाश्‍वत सुखाचा शोध घेणारे सनातनचे संत पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) !

पू. शिवाजी वटकर

‘बालपणापासून शिक्षण घेतांना, कौटुंबिक जीवन जगतांना, तसेच नोकरी आणि साधना करतांना माझ्‍या जीवनाचा प्रवास कसा झाला ? परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी वेगवेगळ्‍या टप्‍प्‍यांवर माझ्‍याकडून साधना आणि सेवा कशी करून घेतली किंवा त्‍यांनी मला कसे घडवले आणि हळूहळू वरच्‍या आध्‍यात्मिक पातळीला कसे नेले ?’, याचे अनुभूतीकथन, म्‍हणजे माझा साधनाप्रवास आहे’, असे मला वाटते.

वर्ष १९८९ मध्‍ये वयाच्‍या ४३ व्‍या वर्षी मी ईश्‍वराच्‍या कृपेने परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या संपर्कात आलो. ज्‍या दिवशी मला तेे प्रत्‍यक्ष भेटले, तो माझ्‍यासाठी सुवर्णदिन होता. त्‍या दिवशी खर्‍या अर्थाने माझ्‍या साधनेचा ‘श्री गणेशा’ झाला. मला साधनेत अडचण आल्‍यावर परात्‍पर गुरु डॉक्‍टर सांगायचे,

‘‘९९ टक्‍के प्रतिकूल प्रारब्‍ध असतांना १ टक्‍का चांगले क्रियमाण वापरून, म्‍हणजे साधना करून त्‍यावर मात करू शकतो.’’

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी माझ्‍याकडून व्‍यष्‍टी आणि समष्‍टी साधना करून घेऊन माझ्‍या जीवनाचे सार्थक केले. त्‍यांनी मला संतपदाला पोचवले. वर्ष २०१९ मधील गुरुपौर्णिमेच्‍या शुभदिनी त्‍यांच्‍या कृपेने मला सनातन संस्‍थेचे ‘१०२ वे समष्‍टी संत’ म्‍हणून घोषित केले गेले.

यातून ‘ईश्‍वरी कृपेने काही जणांना शिकायला मिळो’, एवढीच ईश्‍वरचरणी प्रार्थना आहे.

भाव आणि सेवावृत्ती यांमुळे अनेक संतांचे मन जिंकणारे अन् निष्‍ठापूर्वक सेवा करणारे पू. शिवाजी वटकर !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘पू. शिवाजी वटकर यांच्‍या साधनाप्रवासाचा ‘भाग १’ वाचतांना माझे मन इतके भारावून गेले की, ‘कधी एकदा त्‍यांंच्‍या साधनाप्रवासाचे १५ भाग वाचेन’, असे मला झाले आहे.  लहानपणापासून अतिशय चांगले जीवन जगूनही ते सात्त्विक होते. मोठेपणी नोकरीत उच्‍चपदावर असूनही त्‍यांच्‍यात अहंभाव नव्‍हता. ते ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.’मध्‍ये ‘उपमहाप्रबंधक’ (‘डेप्‍युटी जनरल मॅनेजर’) या पदावर नोकरीत असतांना सनातन संस्‍थेच्‍या माध्‍यमातून एखादा जुना साधक साधना करतो, तशी वाहनचालकाची सेवा करणे, घरोघर जाऊन अध्‍यात्‍मप्रसार करणे, धर्मकार्यासाठी अर्पण गोळा करणे इत्‍यादी सर्व सेवा करू लागले. त्‍यांच्‍या इतक्‍या सेवा मलाही साधनेच्‍या आरंभी करता आल्‍या नाहीत. स्‍वत: उत्‍कृष्ट साधना करून त्‍यांनी सर्व साधकांपुढे आदर्श ठेवला. त्‍यांनी लिहिलेल्‍या त्‍यांच्‍या साधनाप्रवासात कोणती घटना कधी घडली, त्‍याचा मास आणि वर्ष एवढेच नव्‍हे, तर अनेक वेळा दिनांकही त्‍यांनी लिहून ठेवला आहे. हेही त्‍यांच्‍या लिखाणाचे एक वैशिष्‍ट्य आहे.

प.पू. भक्‍तराज महाराज (इंदूर), प.पू. काणे महाराज (नारायणगाव, जिल्‍हा पुणे) आणि प.पू. जोशीबाबा (मुंबई) हे पू. वटकर यांच्‍या घरी जात असत आणि काही वेळा हक्‍काने रहातही असत. ‘पू. वटकर यांचा भाव आणि सेवावृत्ती यांमुळे त्‍यांनी संतांचे मन जिंकले होते’, हे यावरून लक्षात येते. ‘ते सर्व संतांची सर्व सेवा यथायोग्‍य करतील’, असा मलाही त्‍यांच्‍याविषयी विश्‍वास वाटत असे.

वर्ष १९९५ मध्‍ये प.पू. भक्‍तराज महाराज पुष्‍कळ आजारी असतांना मी त्‍यांच्‍याकडे सेवेसाठी इंदूरला ७ – ८ मास (महिने) राहिलो होतो. पुढे वर्ष १९९८ पासून मी गोव्‍याला रहायला आलो. मी मुंबई येथे सेवाकेंद्रात रहात नसतांना पू. वटकर ‘माझा आश्रम’, या भावाने सेवाकेंद्रात जात असत आणि ‘काय हवे, काय नको’ इत्‍यादी आत्‍मीयतेने पहात असत. त्‍यामुळे मुंबई सेवाकेंद्रातील साधकांना त्‍यांचा आधार वाटत असे.

सेवानिवृत्तीनंतर त्‍यांनी सनातनच्‍या उच्‍चपदावरील अनेक सेवा अत्‍यंत साधेपणाने केल्‍या. त्‍यांचे वागणे सर्व साधकांशी अत्‍यंत जवळिकीचे असते. त्‍यांची वैशिष्‍ट्ये व्‍यक्‍त करायला माझ्‍याकडे शब्‍दच नाहीत. सनातन संस्‍थेचे कार्य जलदगतीने वाढण्‍यात त्‍यांचा मोठा सहभाग आहे.

त्‍यांनी निष्‍ठापूर्वक केलेल्‍या साधनेमुळे त्‍यांची आध्‍यात्मिक प्रगतीही जलदगतीने होऊन ते संत झाले आहेत. ‘अनेक साधकांनीही त्‍यांच्‍या पावलांवर पाऊल टाकून त्‍यांच्‍याप्रमाणे जीवनाचे सार्थक करावे’, हीच माझी ईश्‍वरचरणी प्रार्थना !’

– सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

 

१. बालपण

१ अ. जन्‍म आणि जन्‍मस्‍थळ

आश्विन शुक्‍ल चतुर्दशी (९.१०.१९४६) या दिवशी माझा जन्‍म उपळे (जि. धाराशिव), महाराष्‍ट्र येथे झाला.

१ आ. कुटुंबातील धार्मिक वातावरण आणि शिवाची उपासना यांमुळे भगवान शिवाविषयी भाव निर्माण होऊन अध्‍यात्‍माची गोडी लागणे

आमच्‍या घरी ‘एकादशीचा उपवास, खंडोबाचा भंडारा आणि जोगवा मागणे’, अशी कर्मकांडे केली जात. घरी प्रतिदिन शिवपिंडीवर अभिषेक केला जाऊन शिवाची उपासना केली जात असे. आमच्‍याकडे आमचे गुरु यायचे आणि ते ‘ॐ नमः शिवाय ।’ हा मंत्र कानात द्यायचे. या सगळ्‍याचा परिणाम माझ्‍या अंतर्मनावर होऊन माझ्‍या मनात भगवान शिवाविषयी भाव निर्माण झाला होता. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने मला ‘संत गोरा कुंभार’, ‘संत सावता माळी’ आणि ‘संत चोखामेळा’ यांच्‍यासारखीच अध्‍यात्‍माची गोडी लागली.

१ इ. कुटुंबातील लोकांनी केलेले चांगले संस्‍कार

माझे बालपण श्रीमंतीत गेले, तरी घरच्‍यांनी मला लहानपणापासूनच काटकसर करण्‍याची सवय लावली होती. माझ्‍यावर ‘स्‍वयंशिस्‍त, प्रामाणिकपणा, कष्‍ट करणे आणि निर्व्‍यसनी रहाणे’, असे चांगले संस्‍कार घरच्‍यांनी केले. ‘ईश्‍वराने बालपणापासून माझ्‍यात चिकाटी, शिस्‍त आदी गुण आणि कृतज्ञताभाव अंगी बाणवले’, असे मला वाटते.

१ ई. मला लहानपणापासून संतांची चरित्रे, कादंबर्‍या, ललित वाङ्‍मय इत्‍यादी वाचण्‍याची आवड होती.

 

२. शिक्षण – कुशाग्र बुद्धीमत्तेमुळे उच्‍च शिक्षण घेता येणे

२ अ. प्राथमिक शिक्षण

२ अ १. कुटुंबीय अशिक्षित असतांना देवाने शिकण्‍याची प्रेरणा देणे

माझे कुटुंबीय अशिक्षित होते. ‘त्‍यांना मी कोणत्‍या वर्गात शिकत आहे ?’, हेही ठाऊक नसायचे. शाळेतील मुख्‍याध्‍यापक आणि इतर शिक्षक घरी येऊन त्‍यांना शाळेतील माझ्‍या प्रगतीविषयी सांगत की, ‘‘शिवाजीसारखा हुशार विद्यार्थी गावात नाही.’’ यातून देव मला अभ्‍यास वाढवण्‍याची प्रेरणा देत असे.

२ अ २. १० वीच्‍या परीक्षेमध्‍ये बोर्डात ७ वा क्रमांक येणे

देवाच्‍या कृपेने माझा १० वीत, म्‍हणजेच मराठवाड्यातील ‘हायर सेकंडरी सर्टिफिकेट’ परीक्षेमध्‍ये बोर्डात ७ वा क्रमांक आला. त्‍यानंतर मी सोलापूर येथील ‘दयानंद महाविद्यालया’मध्‍ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला.

२ आ. महाविद्यालयीन शिक्षण

२ आ १. महाविद्यालयीन परीक्षेत चांगले गुण मिळणे

महाविद्यालयातील शिक्षण इंग्रजी माध्‍यमातून होते. मी कोणत्‍याही विषयाची शिकवणी लावली नव्‍हती, तरीही ११ वी आणि १२ वीच्‍या परीक्षांमध्‍ये महाविद्यालयात सर्व विषयांत माझा पहिला ते तिसरा क्रमांक यायचा. मला विशेष कोणाचे वैयक्‍तिक मार्गदर्शन नसतांना ‘शिवाजी विद्यापिठा’मध्‍ये माझा १२ वी सायन्‍समध्‍ये तिसरा क्रमांक आला आणि ७६ टक्‍के गुण मिळाले.

२ इ. आभियांत्रिकी पदवी मिळणे

वर्ष १९६६-१९७० ही ४ वर्षे मी पुणे येथे अभियांत्रिकी (इंजिनियरिंग) महाविद्यालयाच्‍या वसतीगृहात राहून शिक्षण घेतले. वर्ष १९७० मध्‍ये मी पुणे विद्यापिठातून बी.ई. (मेकॅनिकल) पदवी प्राप्‍त केली. अभियांत्रिकीच्‍या पदवी परीक्षेत मी पुणे विद्यापिठात तिसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झालोे.

२ ई. वर्ष १९७७ मध्‍ये नोकरी करत मी मुंबई विद्यापिठातून ‘डिप्‍लोमा इन् ऑपरेशन्‍स मॅनेजमेंट’चे शिक्षण घेतलेे.

अतिशय प्रतिकूल परिस्‍थिती असतांनाही देवाच्‍या कृपेने माझे शिक्षण चांगल्‍या प्रकारे झाले.

 

३. विविध ठिकाणी केलेली नोकरी

३ अ. वर्ष १९७०-१९७५ या काळात ‘टेल्‍को’ या आस्‍थापनात नोकरी करणे

३ अ १. आई-वडिलांचा सांभाळ करण्‍यासाठी नोकरीसाठी विदेशात न जाता भारतात रहाणे

वर्ष १९७० मध्‍ये अभियांत्रिकीची पदवी मिळाल्‍यावर माझ्‍या समवेतचे बरेच जण उच्‍च शिक्षण आणि नोकरी यांसाठी विदेशात गेले; मात्र मी ‘नोकरी करून आई-वडिलांचा सांभाळ करायचा’, असे ठरवले. मी ‘टेल्‍को (आताचे टाटा मोटर्स, पुणे)’ येथे २ वर्षांसाठी ‘ग्रॅज्‍युएट ट्रेनी इंजिनीयर’ म्‍हणून नोकरी करू लागलो.

३ अ २. ‘टेल्‍को’मध्‍ये नोकरी करतांना अनेक गुण अंगी बाणले जाणे

‘टेल्‍को’मधील प्रशिक्षणाची २ वर्षे अत्‍यंत कडक शिस्‍त आणि प्रायोगिक अनुभव अन् शिक्षण घेण्‍याची होती. या प्रायोगिक प्रशिक्षणाचा मला नंतरच्‍या जीवनात पुष्‍कळ उपयोग झाला. या कालावधीत देवाने स्‍वच्‍छता, स्‍वयंशिस्‍त, वेळेचे बंधन पाळणे, व्‍यवस्‍थितपणा, नियमांचे पालन करणे, स्‍वतःकडे न्‍यूनपणा घेणे, काम परिपूर्ण आणि समय मर्यादेत करणे इत्‍यादी साधनेला आवश्‍यक असे गुण माझ्‍या अंगी बाणवले.

२ वर्षांचे प्रशिक्षण संपल्‍यावर मी ‘टेल्‍को’मधील ‘क्‍वालिटी कंट्रोल (उत्‍पादनांचे गुणवत्ता नियंत्रण)’, ‘रिपेअर्स अँड मेन्‍टेनन्‍स’ (देखभाल आणि दुरुस्‍ती) इत्‍यादी विभागांत नोकरी केली.

३ आ. वर्ष १९७५-१९८० ‘माझगाव डॉक लिमिटेड’, मुंबई, येथे केलेली नोकरी

३ आ १. नियोजन करायला शिकता येणे

मुंबईतील ‘माझगाव डॉक लिमिटेड’, येथे जहाज बांधणीचे काम केले जाते. तेथे माझ्‍याकडे जहाज बांधणीच्‍या आरंभापासून ते जहाज विकत घेणार्‍या आस्‍थापनाशी करार करून ते जहाज त्‍यांच्‍या ताब्‍यात देईपर्यंत आणि नंतर ‘गॅरंटी’च्‍या कालावधीपर्यंतच्‍या सर्व कामांच्‍या नियोजनाचे दायित्‍व होते. यातून देवाने मला नियोजनकौशल्‍य शिकवले. त्‍यामुळे परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने मला साधना आणि सेवा करतांना साहाय्‍य झाले.

३ आ २. जीपला ट्रकची धडक बसल्‍यावर देवानेच अपघातातून वाचवणे

एकदा मला जहाज बांधणीच्‍या कामासाठी हिमाचल प्रदेश येथे जावे लागले. एके दिवशी तेथील एक अधिकारी आम्‍हाला फिरायला घेऊन गेले असता आमच्‍या जीपला अकस्‍मात् समोरून ट्रकची धडक बसली. तेव्‍हा सुदैवाने आमची जीप मार्गाच्‍या कडेला अडकून राहिल्‍यामुळेे आम्‍ही वाचलो. देवानेच आम्‍हाला या अपघातातून वाचवले.

३ इ. वर्ष १९८० ते २००६ पर्यंत ‘शिपिंग कॉर्पाेरेशन ऑफ इंडिया लि.’ येथे केलेली नोकरी

३ इ १. व्यवस्थापनाचे शिक्षण आणि नोकरीतील अनुभव यांमुळे आस्थापनात सहव्यवस्थापकाची नोकरी मिळणे

वर्ष १९७७ मध्ये मी ‘माझगाव डॉक’ येथे नोकरी करत असतांना ‘डिप्लोमा इन ऑपरेशन्स मॅनेजमेंट’चे शिक्षण घेतले. व्यवस्थापनाचे (डिप्लोमा इन ऑपरेशन्स मॅनेजमेंट) शिक्षण आणि माझा नोकरीतील १० वर्षांचा अनुभव यांमुळे मला ‘शिपिंग कॉर्पाेरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (भारतीय नौवहन निगम लिमिटेड)’ या आस्थापनात सहव्यवस्थापकाची नोकरी लागली. मी पुष्कळ कष्ट घेऊन आणि प्रामाणिकपणे नोकरी केली. वर्ष २००६ मध्ये वयाच्या ६० व्या वर्षी मी या आस्थापनातून ‘उपमहाप्रबंधक’ (‘डेप्युटी जनरल मॅनेजर’) या पदावरून निवृत्त झालो.

३ इ २. व्यवस्थापनाचे कार्य सहजतेने आणि लवकर होऊन साधना अन् सेवा करण्यास वेळ मिळणे

आस्थापनात शनिवारी आणि रविवारी सुटी मिळत असल्यामुळे मला साधना आणि सेवा करता आली. मी कुलदेवतेचे नामस्मरण, सत्संग आणि सत्सेवा करत असल्यामुळे माझ्या जीवनात आमूलाग्र पालट झाला होता. व्यवस्थापनाचे कार्य माझ्याकडून सहजतेने आणि लवकर होत होते. त्यामुळे मला मोकळा वेळ मिळून साधना आणि सेवा करण्यास पुष्कळ वेळ मिळाला. ही नोकरी करतांना मला पुष्कळ आनंद मिळत होता. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने माझी अध्यात्मातही पदोन्नती, म्हणजे प्रगती झाली.

३ इ ३. गुरुकृपेने व्यसनांपासून दूर रहाता येणे

आस्थापनात मी उच्च अधिकारी पदावर होतो. तेथे वेगवेगळ्या अधिकार्‍यांचे गट होते. ते ‘मद्य पिणे, मेजवान्या करणे, हॉटेलमध्ये जाणे, विविध मार्गांनी पैसे कमवणे’, असे करत होते; मात्र देवाच्या कृपेने मला या सर्व व्यसनांपासून दूर रहाता आले. श्री गुरूंनी मला कुठल्याच व्यक्तीत किंवा व्यसनात अडकू दिले नाही. ‘प्रामाणिकपणे आणि तत्त्वनिष्ठ राहून काम करणे’, हे माझे कर्तव्य आहे’, असे मला वाटत असे.

 

४. कौटुंबिक जीवन

४ अ. विवाह

१७.११.१९७३ या दिवशी माझा विवाह झाला. मला एक मुलगा (डॉ. नितीन वटकर (वय ४७ वर्षे)) आणि एक मुलगी (श्रीमती स्वाती अटवाल (वय ४४ वर्षे)) आहे. मुलगा दंतवैद्य आहे आणि मुलगी शिक्षिका आहे.

४ आ. संसारातील समस्यांवर उपाय मिळवण्यासाठी मंदिरात किंवा ज्योतिषांकडे जाणे

माझ्या संसारात काही समस्या निर्माण झाल्या होत्या. कौटुंबिक समस्यांवर उपाय मिळवण्यासाठी मी ज्योतिषी किंवा मंदिरात केवळ व्यावहारिक आणि मायेतील गोष्टींसाठी जात असे.

४ इ. समाधान आणि शांती यांच्या शोधात मृगजळामागे धावणे

वयाच्या ४३ व्या वर्षापर्यंत मी सुख मिळवण्यासाठी मृगजळाच्या मागे धावलो. मला शाश्वत सुख किंवा आनंद कुठेही मिळत नव्हता. मी समाधान, शांती, प्रेम आणि आनंद यांच्या शोधात होतो.

 

५. जीवनात दुःखच अधिक आल्याने मनाला ऊर्जा आणि आधार मिळवण्यासाठी प्रयत्न करणे

मी हुशार आणि उच्च-शिक्षित असल्याने ‘माझे जीवन पुष्कळ आनंदात जाईल’, असा माझा भ्रम होता; पण उच्च शिक्षण घेऊन आणि पैसा मिळवूनही माझ्या जीवनात दुःखच अधिक आले. मनाला ऊर्जा आणि आधार देण्यासाठी मी स्वामी विवेकानंद किंवा इतर संत यांचे ग्रंथ वाचत होतो. मी समाजसेवा करून किंवा एखाद्या आध्यात्मिक केंद्रात जाऊन मनःशांतीसाठी ठिकाण शोधत राहिलो; मात्र मला हवे ते मिळत नव्हते.

 

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेली भेट आणि साधना करू लागल्यावर आलेल्या अनुभूती

६ अ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या चिकित्सालयात लावलेले चित्र पाहून स्वतःच्या स्थितीची जाणीव होणे आणि त्यांनी सांगितलेल्या साधनेमुळे मनावरील ताण न्यून होऊन आनंद मिळू लागणे

वर्ष १९८९ मध्ये माझी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी प्रथम भेट झाली. तो दिवस माझ्या जीवनातील अविस्मरणीय दिवस होता. मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चिकित्सालयात गेलो होतो. तेथील भिंतींवर बरीच बोधचित्रे आणि सुवचने लावली होती. तिथे ‘एक चिमणी गवताची एक एक काडी आणून उंटाच्या पाठीवर टाकते आणि शेवटच्या एका काडीच्या ओझ्यामुळे उंट खाली बसतो’, अशा आशयाचे एक चित्र लावले होते. चित्राखाली ‘द स्ट्रॉ दॅट ब्रोक द कॅमल्स बॅक (‘The straw that broke the camel’s back’) ’, असे लिहिले होते. याचा अर्थ होता, ‘उंटावर एवढे ओझे झाले होते की, चिमणीने त्याच्यावर टाकलेल्या गवताच्या एका काडीच्या ओझ्याने उंट खाली बसला.’

माझी स्थितीही त्या उंटासारखीच झाली होती. मी त्या वेळच्या तणावाच्या स्थितीत तसाच राहिलो असतो, तर पुढे थोडासा ताण आणणार्‍या प्रसंगानेही माझ्या मनाचे संतुलन बिघडून ‘मला वेड लागेल कि काय’, अशी मला काळजी वाटत होती. परात्पर गुरु डॉक्टरांशी भेट झाल्यावर त्यांनी सांगितलेल्या साधनेमुळे माझ्यावरील ताण न्यून होत गेला आणि मला आनंद मिळू लागला. परात्पर गुरु डॉक्टरांच्या आधाराचा पावन हात मला मिळाला. आजपर्यंत तोच हात माझ्या डोक्यावर ‘वरदहस्त’ म्हणून राहिला आहे.

६ आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी कुलदेवतेचा नामजप करायला सांगितल्यावर पुष्कळ आश्चर्य वाटणे आणि नामजप केल्यावर अनुभूती येऊन मनावरील ताण न्यून होणे

परात्पर गुरु डॉक्टरांकडे गेल्यावर ‘ते मानसिक ताण जाण्यासाठी उपचार करतात’, असे मला कळले. काही दिवस मी त्यांनी सांगितल्यानुसार उपचार आणि स्वयंसूचना घेतल्या. त्यांनी मला माझ्या कुलदेवतेचा नामजप करण्यास सांगितला. ‘आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मानसोपचार तज्ञ’ असे कसे सांगतात ?’, याचे मला पुष्कळ आश्चर्य वाटले. मला मानसिक दुःखातून मुक्त व्हायचे असल्यामुळे मी ‘श्री खंडोबाय नमः ।’, हा माझ्या कुलदेवतेचा नामजप आर्त भावाने करायला आरंभ केला. तेव्हा लगेचच मला श्री खंडोबाच्या भंडार्‍याच्या (हळदीच्या) सुगंधाची अनुभूती आली. नामजपामुळे हळूहळू माझ्या मनावरील ताण न्यून होत गेला आणि माझे मन स्थिर झाले. या अनुभूतीमुळे माझा अध्यात्म आणि साधना यांवर विश्वास बसला.

६ इ. ‘विज्ञानापेक्षा अध्यात्म श्रेष्ठ आहे’, असे शिकवणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ परात्पर गुरु डॉक्टर आठवले !

मी अभियंता असल्याने आरंभी मला विज्ञानाचा व्यर्थ अभिमान होता; मात्र ‘जीवनात आनंदी रहाता येण्यासाठी त्याचा काही उपयोग होत नाही’, याचा मला अनुभव येत होता. परात्पर गुरु डॉक्टरांची ‘आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ’ म्हणून ख्याती होती. ते विदेशात राहून शोधनिबंध लिहिणारे संशोधक होते. असे असतांना त्यांनी आम्हाला मुंबई येथे होणार्‍या अभ्यासवर्गात अध्यात्म आणि विज्ञान यांची तुलना करून ‘अध्यात्मच कसे श्रेष्ठ आहे ?’, हे शिकवले.

६ ई. परात्पर गुरु डॉक्टरांच्या वाणीतील चैतन्यामुळे त्यांनी शिकवलेले ज्ञान अंतर्मनात जाऊन त्याचा मनावर संस्कार होणे

मी परात्पर गुरु डॉक्टर घेत असलेले अभ्यासवर्ग आणि प्रवचने यांसाठी जाऊ लागलो. त्यांच्या चैतन्यमय वाणीमुळे त्यांनी शिकवलेले ज्ञान माझ्या अंतर्मनापर्यंत जाऊन त्यांचा मनावर संस्कार होऊ लागला. त्यांनी ‘बाह्यमन, अंतर्मन आणि त्यांतील संस्कारकेंद्रे कशी कार्य करतात ? अंतर्मनातील लाखो संस्कार घालवण्यासाठी स्वयंसूचना घेणे आणि नामस्मरण करणे का आवश्यक आहे ?’, हे सर्व शिकवले. त्यांनी शिकवलेले आणि त्यांच्याच संकल्पाने सिद्ध झालेले ज्ञान मी कृतीत आणण्याचा प्रयत्न करत असे. त्यातून मला शिकण्याचा खरा आनंद मिळू लागला.

६ उ. परात्पर गुरु डॉक्टरांनी लिहिलेला ‘अध्यात्मशास्त्र’ हा ग्रंथ वाचतांना आलेली अनुभूती

परात्पर गुरु डॉक्टरांची भेट झाल्यावर मी त्यांनी लिहिलेल्या ‘अध्यात्मशास्त्र’ या ग्रंथाचा अभ्यास केला आणि थोडीफार तशी कृती करायला आरंभ केला. तेव्हा मला शिकण्यातील आनंद मिळायला लागला. हा ग्रंथ वाचतांना ‘कोणतीतरी दैवी शक्ती मला हे सांगत असून ते ऐकून मी कृती करत आहे’, असे मी अनुभवत होतो.

परात्पर गुरु डॉक्टरांशी भेट झाल्यावर माझा शाश्वत आनंदाचा शोध संपला आणि मला समाधान, आत्मीयता, प्रेम, आनंद अन् शांती यांचा अखंड ठेवा सापडला. परात्पर गुरु डॉक्टरांच्या भेटीनंतर मला नैराश्य किंवा नकारात्मता कधीच आली नाही.

६ ऊ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या भेटीनंतर जीवनात चालू झालेला सुवर्णकाळ !

६ ऊ १. परात्पर गुरु डॉक्टरांनी वेळोवेळी दिलेल्या दृष्टीकोनामुळे कठीण प्रारब्ध भोगण्यासाठी शक्ती मिळणे

घरी कधी कौटुंबिक कठीण प्रसंग घडल्यास माझ्या मनात टोकाचे विचार येत. याविषयी परात्पर गुरु डॉक्टरांना सांगितल्यावर ते मला म्हणाले, ‘‘कौटुंबिक आणि व्यावहारिक जटील प्रश्न हे आपल्या प्रारब्धाचे भोग आहेत. ‘साधना वाढवणे’ हाच त्यावरील एक उपाय आहे.’’ असे दृष्टीकोन देऊन त्यांनी माझे कठीण प्रारब्ध भोगण्यासाठी मला शक्ती दिली. माझे स्वभावदोष आणि अहं न्यून करून मला आनंद दिला अन् माझी साधनेत प्रगतीही करून घेतली.

६ ऊ २. ‘साधना करणे, हीच आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे’, हे समजणे

लहानपणापासून माझ्या जीवनात एक पोकळी होती. परात्पर गुरु डॉक्टर माझ्या जीवनात आल्यावर ती पोकळी भरून निघाली आणि स्थिरता आली. माझ्या जीवनातील खडतर काळ संपून सुवर्णकाळ चालू झाला. मला जीवनात खरा आनंद मिळू लागला आणि ‘साधना करणे, हीच आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे’, हे शिकता आले.

६ ऊ ३. परात्पर गुरु डॉक्टरांसारखे गुरु लाभल्यामुळे जीवनाचे परम कल्याण होणे

मी ज्या आनंदाच्या शोधात होतो, तो आनंद मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या रूपात मिळाला. त्यांच्या रूपात मला प्रत्यक्ष देवच भेटला होता. माझे श्रद्धास्थान मिळाल्याने चिरंतन सुखाच्या शोधासाठी चाललेली माझी भटकंती बंद झाली. ‘अशा श्रद्धास्थानाला ‘गुरुतत्त्व’ म्हणतात’, हे मला नंतर समजले. असे ‘मोक्षगुरु’ माझ्यासारख्या सर्वसाधारण साधकाच्या केवळ व्यावहारिक अडचणी सोडवून सुख मिळवून देत नाहीत, तर साधकाला जन्म-मृत्यूच्या रहाटगाडग्यातून सोडवून हात धरून मोक्षाच्या मार्गावरून चालवतात. त्याच्याकडून साधना करून घेऊन त्याला ‘सक्षम शिष्य’ बनवतात. त्याला ‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।’ म्हणजे ‘गुरुकृपा शिष्याचे परम कल्याण करते’, याची अनुभूती देतात.

६ ऊ ४. ‘संसार असार आहे’, असे वाटत असतांना प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या भेटीनंतर संसारातही सार आहे’, असे वाटणे

समर्थ रामदासस्वामी यांनी सांगितले आहे, ‘ज्यातून सार निघून गेले आहे, त्याला ‘संसार’ म्हणतात.’ समर्थांनी सांगितल्यानुसार मला रज-तम संसाराचा अनुभव येऊन उबग आला होता; मात्र ‘प.पू. भक्तराज महाराज, परात्पर गुरु डॉक्टर आणि इतर अनेक संत माझ्या जीवनात आल्यावर संसारामध्येही सार, म्हणजे रस आहे’, असे मला अनुभवता आले.

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार ‘गुरुकृपायोगानुसार’ साधना केल्यामुळे माझे स्वभावदोष आणि अहं उणावले. माझे मन स्थिर होऊ लागले. ‘प्रारब्धभोग भोगून संपवणे आणि मोक्षप्राप्ती (आनंद) करणे’, हेच मनुष्यजन्माचे ध्येय आहे’, हे मला शिकता आले. परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्याकडून साधना आणि सेवा करून घेऊन मला आनंदात ठेवले. वर्ष २००८ मध्ये माझी आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्याचे घोषित केले. त्यानंतर माझ्या साधनेची स्थिती दोलायमान असल्याने पातळी खाली-वर होत होती. नंतर वर्ष २०१९ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी माझी आध्यात्मिक पातळी ७१ टक्के झाली असल्याचे सांगून समष्टी संतपद गाठल्याचे घोषित केले. मी यापेक्षा मोठा चमत्कार किंवा अनुभूती यांची कल्पनाही करू शकत नाही. हे केवळ परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्याकडून करून घेतलेल्या साधनेमुळे शक्य झाले. त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करतो.

 

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांप्रती ओढ निर्माण झाल्‍यावर गुरुदेवांनी विविध प्रसंगांतून ‘ईश्‍वराशी जोडणे कसे महत्त्वाचे आहे’, याची पू. शिवाजी वटकर यांना दिलेली शिकवण !

सेवेची ओढ वाढणे; म्‍हणजे गुरुप्राप्‍तीची ओढ वाढणे ! – श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

 ७. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याविषयी जाणवणारे दैवी आकर्षण

७ अ. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांंचे मुंबई येथील निवासस्‍थान साधनेचे प्रेरणास्‍थान बनणे

‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांंचे मुंबई येथे निवासस्‍थान होते आणि तेच सनातन संस्‍थेचे सेवाकेंद्रही होते. वर्ष १९९० पासून वर्ष २००६ पर्यंत म्‍हणजे मी तिथे साधना आणि सेवा करण्‍यासाठी जात असे. वर्ष १९९० ते १९९९ पर्यंत, म्‍हणजे ९ – १० वर्षे मला परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या थेट मार्गदर्शनानुसार आणि कृपाछत्राखाली साधना करण्‍याचे भाग्‍य लाभलेे. माझ्‍यासाठी त्‍यांचे निवासस्‍थान हेच सनातन संस्‍थेचे मुख्‍य कार्यालय आणि साधनेचे प्रेरणास्‍थान होते.

७ आ. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे निवासस्‍थान स्‍मशानाजवळ आणि रज-तमाच्‍या वातावरणात असूनही ‘तिथे जावे’, असे वाटणे अन् तेथे गेल्‍यावर शांत वाटणे

‘मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या निवासस्‍थानी नेहमी का जातो ? आणि मला तेथे का थांबावेसे वाटते ?’, याचे मला आश्‍चर्य वाटायचे. प्रत्‍यक्षात त्‍यांचे निवासस्‍थान असलेली इमारत स्‍मशानाच्‍या फाटकाला (कंपाउंडला) लागून होती. त्‍यामुळे तिथे प्रेते जळण्‍याचा वास आणि धूरही येत असे. त्‍यांच्‍या इमारतीजवळ रज-तमाचे वातावरण होते. असे असतांनाही मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांकडे जायचो. तिथे गेल्‍याविना मला करमायचे नाही.

यावर देवाने मला पुढील दृष्‍टीकोन देऊन तिकडे जाण्‍यासाठी स्‍फूर्ती दिली, ‘लोक साधना करण्‍यासाठी हिमालयात जाऊन प्रतिकूल वातावरणात तपश्‍चर्या करतात. मला त्‍यापेक्षा सुलभ ठिकाणी जायला मिळत आहे. हिमालयात किंवा इतरत्र मला जो आनंद आणि सुविधा मिळणार नाहीत, त्‍या सर्व सुविधा मला इथे मिळत आहेत.’ मुंबई येथेे गेल्‍यानंतर माझ्‍या मनातील नकारात्‍मक विचारांचे त्‍वरित सकारात्‍मक विचारांत परिवर्तन होत असे. माझ्‍या मनाची अस्‍वस्‍थता अन् अस्‍थिरता जाऊन मला शांत वाटायचे. त्‍यामुळे कोणतेही अडथळे आले, तरी काहीही करून मी त्‍यांच्‍याकडे जात असे.

 

८. नामजपामुळे साधनेतील अडथळे दूर होणे आणि ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी सांगितलेले सर्व नामजप गुरुमंत्रच आहेत’, असे अनुभवणे

मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांकडे पहिल्‍यांदा गेलो. तेव्‍हा त्‍यांनी मला कुलदेवतेचा नामजप करायला सांगितला. नंतर त्‍यांच्‍या सांगण्‍यानुसार कुलदेवता आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप केल्‍यावर मला अनेक अनुभूती आल्‍या. माझ्‍या साधनेतील अडथळे दूर होऊन मला सत्‍संगाची गोडी लागली. परात्‍पर गुरु डॉक्‍टर आम्‍हाला म्‍हणाले होतेे, ‘‘नामस्‍मरण’ हा प.पू. भक्‍तराज महाराज यांचा प्राण आहे. त्‍यांनी भजनांमध्‍ये नामस्‍मरणाचे महत्त्व सांगितले आहे.’’

नामस्‍मरण केल्‍यामुळे माझे शारीरिक, मानसिक आणि आध्‍यात्मिक त्रास उणावले. तेव्‍हापासून आतापर्यंत ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी मला जे नामजप किंवा आध्‍यात्मिक उपायांसाठी मंत्रजप सांगितले आहेत, ते सर्व गुरुमंत्रच असतात’, असे मी अनुभवले आहे. ‘माझ्‍या कुलदेवतेने मला परात्‍पर गुरु डॉक्‍टरांमधील गुरुतत्त्वाकडे सर्वस्‍वी सोपवले आहे’, असे मला वाटते.

 

९. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘अव्‍यक्‍त भाव असेल, तर समष्‍टी सेवा चांगल्‍या प्रकारे करता येते’, असे सांगणे

परात्‍पर गुरु डॉक्‍टर घेत असलेल्‍या अभ्‍यासवर्गाच्‍या वेळी बर्‍याच साधकांचा भाव जागृत होऊन त्‍यांच्‍या डोळ्‍यांतून भावाश्रू येत. माझी मात्र क्‍वचितच भावजागृती होत असे. त्‍यामुळे ‘मी रुक्ष आहे. माझ्‍यात भाव नाही’, असे मला वाटत असे. याविषयी मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना विचारल्‍यावर ते मला म्‍हणाले, ‘‘व्‍यक्‍त (व्‍यष्‍टी) आणि अव्‍यक्‍त (समष्‍टी)’, असे भावाचे २ प्रकार असतात. व्‍यक्‍त भाव असला, तर त्‍या स्‍थितीत समष्‍टी सेवा करता येत नाही आणि अव्‍यक्‍त भाव असेल, तर समष्‍टी सेवा चांगल्‍या प्रकारे करता येते.’’ हे ऐकल्‍यानंतर मी त्‍यांचे आज्ञापालन करून समष्‍टी सेवा करत राहिलो.

 

१०. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांंनी ‘स्‍थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्‍ठ’ हे तत्त्व कृतीतून शिकवून ‘स्‍वतःला ईश्‍वराशी जोडणे महत्त्वाचे आहे’, अशी महान शिकवण देणे

१० अ. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी ‘स्‍थूल देहाच्‍या सेवेपेक्षा गुरुपौर्णिमेची सेवा अधिक महत्त्वाची आहे’, हे प्रसंगातून शिकवणे

वर्ष १९९६ मध्‍ये मानखुर्द, मुंबई येथे आमच्‍या घराजवळील शाळेमध्‍ये परात्‍पर गुरु डॉक्‍टरांची सभा होती. सभेनंतर आमच्‍या घरी ‘भेट आणि भोजन’, असेे त्‍यांचे नियोजन केले होते. त्‍यामुळे मला फार आनंद झाला होता; मात्र वर्ष १९९६ च्‍या गुरुपौर्णिमेच्‍या नियोजनाची बैठक नेमकी त्‍याच दिवशी सांगली येथे होती. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी मला तिकडे जाण्‍यास सांगितले. ते म्‍हणाले, ‘‘तुम्‍ही घरी नसलात, तरी चालेल. मी तुमच्‍या घरी जाईन.’’ त्‍याप्रमाणे मी घरी नसतांनाही ते आमच्‍या घरी जाऊन आले. ‘स्‍थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्‍ठ’ म्‍हणजे प.पू. डॉक्‍टरांच्‍या स्‍थुलातील सेवेपेक्षा ‘गुरुपौर्णिमेची सेवा (समष्‍टी सेवा) श्रेष्‍ठ आहे’, हे त्‍यांनी मला या प्रसंगातून शिकवले.

१० आ. ‘स्‍थूल देहा असे ।’ या पंक्‍तीतून तत्त्वनिष्‍ठ रहाण्‍याची शिकवण देणे

मला प.पू. डॉक्‍टरांच्‍या स्‍थुलातील सत्‍संगाची सवय झाली होती. नंतर ते आधी देवद आणि नंतर गोवा येथील आश्रमांत रहायला गेल्‍यावर त्‍यांनीच त्‍यांचा हा स्‍थुलातील वियोग सुसह्य करून देऊन त्‍यांच्‍या पुढील पंक्‍तींची मला अनुभूती दिली.

‘स्‍थूल देहा असे । स्‍थळकाळाची मर्यादा ।
कैसे असू सर्वदा । सर्वा ठायी ॥
सनातन भारतीय संस्‍कृति । माझे नित्‍य रूप ।
त्‍या रूपे मी सर्वत्र । आहे सदा ॥’

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी मला त्‍यांच्‍यात किंवा इतर व्‍यक्‍तींमध्‍ये अडकू दिले नाही. त्‍यांनी मला सनातन संस्‍थेशी, म्‍हणजे त्‍यांच्‍या समष्‍टी रूपाशी जोडून दिले. ‘सनातन संस्‍था’ हे ईश्‍वरप्राप्‍ती करण्‍यासाठी असलेले एक माध्‍यम आहे. या माध्‍यमलाही उत्‍पत्ती, स्‍थिती अन् लय आहेे; म्‍हणून ‘तत्त्वाशी, म्‍हणजे ईश्‍वराशी जोडणे महत्त्वाचे आहे’, असे सांगून त्‍यांनी मला स्‍वयंपूर्ण होऊन तत्त्वनिष्‍ठ (ईश्‍वरनिष्‍ठ) रहायला शिकवलेे. वरील सुवचनानुसार त्‍यांनी ‘स्‍थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्‍ठ’ हे मला त्‍यांच्‍या आदर्श कृतीतून शिकवले.

आतापर्यंतच्‍या माझ्‍या जीवनातील घटनांवरून ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर हे परब्रह्म आहेत’, हे त्‍यांच्‍याच कृपेने माझ्‍या लक्षात येत आहे. याची मला एकट्यालाच नाही, तर सनातनच्‍या सहस्रो साधकांना अनुभूतीही येत आहे. ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी मला त्‍यांच्‍या चरणांचा धूलीकण म्‍हणून रहाण्‍याचे भाग्‍य दिले आहे’, यासाठी मला पुष्‍कळ कृतज्ञता वाटते.’

 

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने पू. शिवाजी वटकर यांना लाभलेला संतांचा सत्‍संग आणि त्‍यामुळे साधनेसाठी झालेले साहाय्‍य !

११. संतांचा लाभलेला अनमोल सहवास

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने मला अनेक संतांच्‍या सहवासातून शिकता आलेे.

११ अ. प.पू. रघुवीर काणे महाराज

नारायणगावचे प.पू. रघुवीर काणे महाराज यांचा मला अनेक वर्षे सत्‍संग लाभला. ते ज्ञानगुरु होते. मी त्‍यांच्‍या समवेत असतांना ते माझ्‍याकडून नामजपादी साधना करून घेत. ते मला त्‍यांच्‍या पुढ्यात बसवून अध्‍यात्‍माविषयी शिकवत असत.

११ आ. डॉ. आठवले यांचे गुरु प.पू. भक्‍तराज महाराज

११ आ १. पत्नीची शिर्डीच्‍या साईबाबांवर श्रद्धा असणे आणि ‘प.पू. भक्‍तराज महाराज घरी आल्‍यावर ‘ते साईबाबा आहेत’, याची पत्नीला अनुभूती येणे

वर्ष १९९२ मध्‍ये प.पू. भक्‍तराज महाराज (प.पू. बाबा) प.पू. डॉक्‍टरांच्‍या घरी मुंबई येथे आले होते. मी आणि माझी पत्नी पहाटे ५ वाजता प.पू. बाबांसाठी अल्‍पाहाराचे पदार्थ घेऊन गेलो होतो. पत्नीने प.पू. बाबांना आमच्‍या घरी येण्‍यासाठी आग्रह केला. मी पत्नीला सांगत होतो, ‘‘अशा उच्‍च कोटीच्‍या संतांना आपण आग्रह करून घरी बोलवू नये. त्‍यांची इच्‍छा असेल, तर ते स्‍वतःहून येतील.’’

पूर्वी आम्‍ही वर्षातून २ – ३ वेळा शिर्डीला जायचो. त्‍यामुळे पत्नीची शिर्डीच्‍या साईबाबांवर श्रद्धा होती. पत्नी मला म्‍हणाली, ‘‘मी अनेक वर्षे साठवलेले पैसे शिर्डीला जाऊन साईबाबांच्‍या चरणी अर्पण करणार होते; परंतु प.पू. बाबा जर साईबाबा असतील, तर ते आपल्‍या घरी येतील आणि तेव्‍हा मी त्‍यांना माझ्‍याकडील पैसे अर्पण करीन.’’

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या घरी सकाळी अल्‍पाहार केल्‍यानंतर प.पू. बाबा तिथून निघाले. निघतांना ते आम्‍हाला म्‍हणाले, ‘‘मी आज दुपारपर्यंत तुमच्‍याकडे येतो.’’ नंतर दुपारी प.पू. बाबा आणि त्‍यांच्‍या समवेत त्‍यांचे २५ भक्‍त आमच्‍याकडे आले. आम्‍ही प.पू. बाबांची पाद्यपूजा केली. पत्नीने ठरवल्‍याप्रमाणे प.पू. बाबांना जमवलेले पैसे अर्पण केले. ‘प.पू. बाबा हे शिर्डीचे साईबाबा आहेत’, याची पत्नीला अनुभूती आली. त्‍यानंतर प.पू. बाबा आमच्‍या घरी ३ वेळा आले.

११ आ २. प.पू. भक्‍तराज महाराज यांनी साधनेसाठी केलेले साहाय्‍य !
११ आ २ अ. पत्नीने ‘यजमान उशिरा घरी येतात’, असे प.पू. भक्‍तराज महाराजांना सांगितल्‍यावर प.पू. बाबांनी तिला समजावून सांगणे

मी माझे कार्यालयीन कामकाज करून सायंकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत सेवा करत असे. त्‍या वेळी मी मुंबई सेवाकेंद्रात किंवा मुंबईत अध्‍यात्‍मप्रचारासाठी जात असे. त्‍यामुळे मला घरी जायला उशीर होत असे आणि माझ्‍या पत्नीला हे आवडत नसेे. एकदा प.पू. बाबांच्‍या दर्शनासाठी आम्‍ही मुंबई सेवाकेंद्रात गेलो असतांना तिने सांगितले, ‘‘यजमान रात्री घरी उशिरा येतात.’’ तेव्‍हा प.पू. बाबा तिला म्‍हणाले, ‘‘उद्यापासून तुझे यजमान सायंकाळी ७ वाजता घरी येतील; मात्र येतांना ते दारूची बाटली घेऊन येतील आणि घरी दारू पीत बसतील. हे तुला चालेल का ? त्‍याऐवजी ‘ते सत्‍संग घेणे’, हे अध्‍यात्‍माचे कार्य करतात, हेे किती चांगले आहे.’’ तेव्‍हा पत्नीच्‍या हे लक्षात आले. काही दिवसांनी पत्नीही अध्‍यात्‍मप्रसार करायला लागली.

११ आ २ आ. पत्नीला सेवेमुळे घरी येण्‍यास उशीर होणे आणि तसे परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना सांगितल्‍यावर त्‍यांनी ‘प.पू. बाबांनी कसे उलट केले आहे’, हे लक्षात आणून देणे

माझी मुले शाळेत शिकत होती. ‘त्‍यांच्‍याकडे दुर्लक्ष होऊ नये’; म्‍हणून मी काही वेळा घरी लवकर जाऊ लागलो. पत्नी सत्‍संग घेण्‍यासाठी जात असल्‍यामुळे तिला घरी येण्‍यास उशीर होत असे. एकदा प.पू. रामानंद महाराज, मी आणि माझी पत्नी मुंबई येथे परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या घरी बोलत बसलो होतो. तेव्‍हा मी म्‍हटले, ‘‘सध्‍या काही वेळा पत्नी घरी उशिरा येते.’’ तेव्‍हा परात्‍पर गुरुदेव म्‍हणाले, ‘‘आता तुम्‍ही पत्नीविषयी गार्‍हाणे करत आहात. पूर्वी त्‍या तुमच्‍याविषयी प.पू. बाबांकडे गार्‍हाणे करत होत्‍या. प.पू. बाबांनी कसे उलट केले आहे, पहा !’’

असा विनोद केल्‍यावर सर्व जण हसले. यातून ‘प.पू. बाबांसारखे उच्‍च कोटीचे संत साधकांची साधना होण्‍यासाठी कसे साहाय्‍य करतात’, हे शिकायला मिळाले.

वर्ष १९९१ ते १९९५ पर्यंत परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने मला प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या गुरुपौर्णिमा महोत्‍सवांत सहभागी होण्‍याची आणि ते जेव्‍हा मुंबईला येत असत, तेव्‍हा मला त्‍यांच्‍या समवेत रहाण्‍याची संधी लाभली.

११ इ. देवद, पनवेल आश्रमात परात्‍पर गुरु पांडे महाराज यांचा लाभलेला अनमोल सत्‍संग !

परात्‍पर गुरु पांडे महाराज हे ज्ञानयोगी संत होते. वर्ष २०१६ ते वर्ष २०१९ या कालावधीत मला त्‍यांचा देवद येथील सनातनच्‍या आश्रमात प्रतिदिन सकाळी अर्धा घंटा सत्‍संग मिळाला. तेव्‍हा ते माझ्‍याशी अध्‍यात्‍म, साधना, राष्‍ट्र, धर्म आदी अनेक विषयांवर बोलायचे. मी ते बोलणे ध्‍वनीमुद्रित करून त्‍याचे टंकलेखन करत असे. ते ज्ञानयोगी असूनही त्‍यांनी मला ‘व्‍यष्‍टी आणि समष्‍टी साधना करण्‍यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, हे हसत-खेळत आणि सोप्‍या भाषेत शिकवले. मला त्‍यांच्‍या चैतन्‍यमय वाणीतून शिकता आले.

मंदिराच्‍या गाभार्‍यातील निरांजन होण्‍यासाठी करतो प्रार्थना गुरुदेवांना ।

‘पूर्वी मला ‘नावाजलेला कार्यकर्ता’ होण्‍याची हौस होती. सनातनच्‍या मार्गदर्शनानुसार साधना करतांना मला सतत आनंद मिळू लागला. याविषयी विचार करत असतांना गुरुकृपेने सुचलेली सूत्रे आणि स्‍फुरलेली कविता पुढे दिली आहे.

मायेतील जीवन जगत असतांना काही समाजसेवक काही कालावधीसाठी धडाडीचे आणि दिखाऊ कार्य करून समाजाकडून स्‍वकौतुक करून घेत असतात; कारण त्‍यांचे कार्य आकाशात अकस्‍मात् कडाडणार्‍या विजेप्रमाणे किंवा डोंगरावर लागलेल्‍या वणव्‍याप्रमाणे डोळे दिपून टाकणारे असते. ते काही वेळच टिकते, तसेच समाजाला त्‍याचा उपयोग न होता हानी होण्‍याची शक्‍यता असते. असे असले, तरी मला पूर्वी मायेत असतांना त्‍यांच्‍याप्रमाणे कार्यकर्ता व्‍हावेसे वाटायचे. सनातन संस्‍थेच्‍या मार्गदर्शनानुसार साधना चालू केल्‍यावर त्‍यातील क्षणभंगूरता, असत्‍य आणि अपावित्र्य माझ्‍या लक्षात आले अन् काही समाजसेवकांप्रमाणे ‘दूरच्‍या गावात जाऊन सातत्‍याने आणि निरपेक्ष भावाने समाजसेवा करावी’, असे मला वाटले. आता मात्र मला वीज किंवा वणवा होण्‍यापेक्षा ‘मंदिराच्‍या गाभार्‍यातील दीप व्‍हावे’, असे वाटते. तो दीप स्‍वतः जळून इतरांना प्रकाश देण्‍याचे पवित्र, सात्त्विक आणि समष्‍टी कार्य करतो.

‘हे गुरुदेवा, सनातन संस्‍थेच्‍या जगभरातील अफाट कार्यात मला मंद प्रकाश देणार्‍या एका लहान दीपाप्रमाणे होता येऊ दे’, अशी आपल्‍या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करतो.’

लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी भेट द्या सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांचा साधनाप्रवास भाग – २

 

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Leave a Comment