सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांचा साधनाप्रवास भाग – ३

सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांचा साधनाप्रवास भाग – २

अनुक्रमणिका

२१. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी टप्‍प्‍याटप्‍प्‍याने अध्‍यात्‍म शिकवून साधना आणि सेवा करून घेणे

वर्ष १९८९ मध्‍ये माझी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांशी भेट झाली. आरंभी त्‍यांना भेटतांना माझे वैयक्‍तिक प्रश्‍न सुटण्‍यावरच माझा भर होता; मात्र त्‍यांनी ‘सर्व प्रश्‍नांवर ‘साधना करणे’, हाच उपाय आहे’, हे माझ्‍या मनावर बिंबवले. त्‍यानंतर मी नामस्‍मरण, सत्‍संग आणि सत्‍सेवा करण्‍यास आरंभ केला. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी मला टप्‍प्‍याटप्‍प्‍याने अध्‍यात्‍म शिकवून माझ्‍याकडून साधना आणि सत्‍सेवा करून घेतली. हळूहळू माझी त्‍यांच्‍यावर नितांत श्रद्धा बसली.

२२. ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना अपेक्षित अशी साधना होत नाही’, याविषयी पू. शिवाजी वटकर यांना वाटणारी खंत

पू. शिवाजी वटकर

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांची भेट झाल्‍यापासून, म्‍हणजे वर्ष १९८९ ते २००६ पर्यंत मी घरी राहून आणि कार्यालयात कामे करत असतांना साधना करत होतो. प.पू. भक्‍तराज महाराज यांनी गायलेले संत जनाबाईंचे पुढील भजन मला फार प्रिय आहे. त्‍यामध्‍ये माझ्‍या मनाच्‍या स्‍थितीचे वर्णन आहे. माझ्‍या साधनाप्रवासात प्रत्‍यक्ष भगवंताने, म्‍हणजे परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी सर्वकाही केले आहे; मात्र ‘मी त्‍यांचे आज्ञापालन करण्‍यास न्‍यून पडलो’, याची मला नेहमी खंत वाटते.

नाहीं केली तुझी सेवा । दुःख वाटतसे माझ्‍या जिवा ॥ १ ॥
नष्‍ट पापीण मी हीन । नाहीं केलें तुझें ध्‍यान ॥ २ ॥
जें जें दुःख झालें मला । तें त्‍वां सोसिलें विठ्ठला ॥ ३ ॥
रात्रंदिन मजपाशीं । दळूं कांडूं लागलासी ॥ ४ ॥
क्षमा करावी देवराया । दासी जनी लागे पायां ॥ ५ ॥

अर्थ : संत जनाबाई विठ्ठलाला म्‍हणतात, ‘हे देवा, मी तुझी सेवा केली नाही’, याचे माझ्‍या जिवाला दुःख होत आहे. तुझे ध्‍यान न करणारी मी नीच पापीण आहे. मला जे जे दुःख झाले, ते ते तूच सहन केलेस. तू माझ्‍या समवेत रात्रंदिवस दळण-कांडण केलेस. हे देवराया, तू मला क्षमा कर. मी तुझ्‍या चरणांपाशी आले आहे.’

वरील अभंगाप्रमाणे परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी मला नेहमी स्‍थूल आणि सूक्ष्म स्‍तरांवर साहाय्‍य केले आहे. त्‍यांना मी ‘गुरुकृपायोगानुसार’ अष्‍टांग साधना करणे अपेक्षित आहे; पण ती करण्‍यास मी पुष्‍कळ न्‍यून पडलो. त्‍यासाठी त्‍यांनी मला क्षमा करावी.

आता मी एका सुखी, ऐश्‍वर्यसंपन्‍न आणि आनंदी अशा मोठ्या कुटुंबात, म्‍हणजे देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमात रहात आहे. येथे अनेक साधक एका कुटुंबातील सदस्‍य असल्‍याप्रमाणे वात्‍सल्‍यभावाने एकत्र रहातात. साधकांमध्‍ये व्‍यापकता वाढत आहे आणि त्‍या व्‍यापकतेचा आनंद सर्वजण घेत आहेत. या आश्रमामुळे मला भगवंताच्‍या ‘वसुधैव कुटुम्‍बकम् ।’, म्‍हणजे ‘संपूर्ण पृथ्‍वी हेच कुटुंब आहे’, असा आनंद चाखायला मिळत आहे.

प्रार्थना

‘हे गुरुराया, मला माझ्‍या स्‍वेच्‍छेने मायेतील मागितलेले काहीही देऊ नका. सर्वकाही ईश्‍वराच्‍या, म्‍हणजेच तुमच्‍या इच्‍छेने होऊ द्या. तुम्‍हीच माझ्‍याकडून तुम्‍हाला अपेक्षित अशी साधना आणि सेवा यांचे प्रयत्न करून घ्‍या. मला तुमच्‍या चरणी धूलीकण म्‍हणून राहू द्या’, अशी मी शरणागतभावाने प्रार्थना करतो.’

२३. जातीभेदाचा कलंकच पुसून टाकणार्‍या सनातन संस्‍थेचा स्‍वतःला अनुभव आल्‍यावर जातीविषयक संवेदनशील विषयावरही लिखाण करता येणे

२३ अ. सनातन संस्‍थेवर जातीवादाचे केले जाणारे आरोप चुकीचे असून येथे सर्व जातीधर्मांचे साधक एकमनाने साधना करत असणे

काही बुद्धीप्रामाण्‍यवादी, धर्मद्रोही आणि पुरोगामी यांचा ‘सनातन संस्‍थेमधे ब्राह्मणांचा भरणा असून तिथे जातीवादाला प्राधान्‍य दिले जाते’, असा आरोप आहे. प्रत्‍यक्षात सनातन संस्‍थेमध्‍येे विविध जातीधर्मांचे साधक एकमनाने साधना करत आहेत. यापूर्वी सनातन संस्‍थेत साधना करणार्‍या काही साधकांची जातीविषयक सूची दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये प्रकाशित केली होती. माझा जन्‍म मागासवर्गातील जातीमध्‍ये झाला आहे. कर्मधर्मसंयोगाने मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांमुळे सनातन संस्‍थेच्‍या संपर्कात आलो आणि माझ्‍या जीवनाला कलाटणी मिळाली. त्‍यामुळे मला न सुटणारे जातीवर्णाचे कोडेही कायमचे सुटले.

२३ आ. सनातन संस्‍थेमध्‍ये कुठलाही जातीभेद नसून ‘एक साधना करणारा जीव’ या दृष्‍टीने प्रत्‍येक साधकाकडे पाहिले जाणे

आरंभापासून म्‍हणजे वर्ष १९८९ पासून परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी किंवा संस्‍थेतील साधकांनी ‘मी कोणत्‍या जातीचा आहे ?’, याविषयी मला कधीही विचारले नाही. त्‍यांनी मला जातीवरून कधी सवलत दिली नाही किंवा माझ्‍यावर अन्‍यायही केला नाही. त्‍यांनी मला मानसिक स्‍तरावर न पहाता ‘साधना करणारा जीव’, या भावाने आध्‍यात्मिक स्‍तरावर सांभाळले. सनातन संस्‍थेत ‘साधना करणारा जीव’ एवढे एकच आत्मिक नाते असते. सनातन संस्‍थेचे सर्व संत आणि साधक हे मायेतील नातलगांच्‍या ऐवजी आत्‍मलग आहेत.

सनातन संस्‍थेनेे माझ्‍यावरील जातीभेदाचा कलंक पुसून माझ्‍याकडून चातुर्वर्णानुसार साधना करून घेतली आणि मला मोक्षाच्‍या मार्गावर नेले. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने मला ‘जातीभेद’ या संवेदनशील विषयावर लेख लिहिता आले. त्‍यांनी मला जातपात, स्‍वार्थ आणि माया यांच्‍या चिखलातून बाहेर काढले अन् मला आत्‍मविकासाची संधी दिली. त्‍यांनी त्‍यांच्‍या अध्‍यात्‍म आणि धर्मप्रचार या कार्यांत मला केवळ सहभागीच करून घेतले नाही; तर माझा आत्‍मविकास करून घेऊन माझी आध्‍यात्मिक प्रगतीही केली आहे.

२४. पू. शिवाजी वटकर यांनी समष्टि साधना म्हणून केलेले धर्मरक्षणाचे कार्य !

(आत्तापर्यंत आपण पू. शिवाजी वटकर यांनी केलेली व्यष्टि साधना पाहिली. सनातन संस्था व्यष्टि तसेच समष्टि साधना सांगते. समष्टि साधनेअंतर्गत केलेले धर्मरक्षणाचे कार्य आता आपण पाहूयात.)

देवतांच्‍या विडंबनाला विरोध : चित्रपट, नाटके, वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाहिनी यांद्वारे होणार्‍या देवतांच्‍या विडंबनाला वैध मार्गाने विरोध केला. देवतांचे विडंबन असलेल्‍या १५ हून अधिक नाटकांचे प्रयोग रहित केले गेले. देवतांचा अपमान करणारी २५ हून अधिक चित्रप्रदर्शने रहित केली.

२४ अ. हिंदु देवतांचे विडंबन करणार्‍या मकबूल फिदा हुसेन यांच्‍या चित्रांचे प्रदर्शन आणि विक्री यांना विरोध करणे

१. हिंदुद्वेष्‍टे हुसेन यांना दिला जाणारा मानाचा ‘रूपधर २००६ जीवनगौरव पुरस्‍कार’ रहित करण्‍यात मिळालेले यश !

२. मुंबई येथील ‘खुशी’ या संघटनेने आयोजित केलेल्‍या चित्र प्रदर्शनातील हुसेन यांच्‍या चित्राची विक्री होऊ न देणे

२४ आ. ‘कोप्रान’ या औषधनिर्मिती करणार्‍या मोठ्या आस्‍थापनाच्‍या हिंदूंच्‍या धार्मिक भावना दुखावणाऱ्या विडंबनात्‍मक विज्ञापनाला विरोध करणे

२४ इ. कागदाच्‍या लगद्यापासून श्री गणेशमूर्ती बनवण्‍याच्‍या विरोधात आंदोलन करणे

२४ ई. ‘मंदिर सरकारीकरण कायदा’ रहित करण्‍यासाठी तळमळीने प्रयत्न करणे  

२४ उ. हिंदूंचे ख्रिस्‍तीकरण टाळण्‍यासाठीच्‍या जनजागृती मोहिमेत सहभाग घेणे 

२४ ऊ. महाराष्‍ट्रातील धर्मविरोधी प्रस्‍तावित ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या’ला सतत १४ वर्षे विरोध केला.

२४ ए. इतिहासाचे विकृतीकरण थांबवण्‍याचे प्रयत्न 

२४ ऐ. राष्‍ट्ररक्षण विषयक कार्यक्रमांतील सहभाग

२४ ऐ १. भारताच्‍या नकाशाचे विकृतीकरण रोखणे  

२४ ऐ २. ‘गूगल मॅप’ने केलेल्‍या भारताच्‍या नकाशाच्‍या विकृतीकरणाला विरोध केला.

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने माझ्‍याकडून अनेक प्रकारच्‍या सत्‍सेवा झाल्‍या. मी त्‍यांना प्रार्थना करून सत्‍सेवा करत असे. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचा संकल्‍प आणि सूक्ष्म अस्‍तित्‍व यांमुळे माझी सत्‍सेवा चांगली होऊन ती फलद्रूप होत असे. केवळ त्‍यांच्‍यामुळेच मला त्‍यात यश मिळत असे.

२४ ओ. ‘श्रीकृष्‍ण आणि परात्‍पर गुरु डॉक्‍टर यांच्‍या कृपेने धर्मप्रसाराचे कार्य करता येणे : या सेवांची व्‍याप्‍ती पहाता हे सर्व माझे शरीर, मन, बुद्धी आणि शक्‍ती यांच्‍या पलीकडचे होतेे. श्रीकृष्‍ण आणि परात्‍पर गुरु डॉक्‍टर यांच्‍या कृपेमुळेच माझ्‍याकडून १८ वर्षे हिंदु धर्मप्रसाराचे थोडेफार कार्य झालेे.

आई लहान बाळाला पाऊल टाकायला शिकवते. मूल तिच्‍या आधारानेच उभे राहून चालत असते, तरीही ‘मुलगा त्‍याच्‍या पायावर चालत आहे’, असे कौतुक ती इतरांकडे करते. तसेच हे आहे. परात्‍पर गुरु डॉक्‍टर माझ्‍या एका जन्‍मातील नाही, तर अनेक जन्‍मांतील गुरुमाऊली आहेत. त्‍यांच्‍या चरणी कोटीशः

कृतज्ञता.’

२५. धर्मरक्षणाचे कार्य करतांना झालेले लाभ आणि शिकायला मिळालेली सूत्रे

२५ अ. ईश्‍वरी अधिष्‍ठान ठेवून कार्य केल्‍यास ते व्‍यापक आणि सहजतेने होणे

साधना म्‍हणून धर्मप्रसार किंवा धर्मरक्षण यांचे कार्य केले, तर समाजात वैचारिक क्रांती घडू शकते. देवाचे साहाय्‍य घेतले, तर कोणतेही कार्य सहज शक्‍य होते. यासाठी ईश्‍वरी अधिष्‍ठान ठेवून व्‍यापक कार्य केले पाहिजे. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी आरंभापासून हे तत्त्व सांगितले आणि त्‍यानुसार माझ्‍याकडून समष्‍टी सेवा करून घेतली आहे.

२५ आ. शंकराचार्य, संत आणि धर्माचार्य यांचा सत्‍संग मिळून धर्म अन् राष्‍ट्र यांविषयीचा अभिमान जागृत होणे

समितीच्‍या अंतर्गत आम्‍ही प.पू. गगनगिरी महाराज, त्‍यांचे शिष्‍य आबानंद महाराज, नाणीजधाम येथील जगद़्‍गुरु रामानंदाचार्य श्री स्‍वामी नरेंद्राचार्यजी महाराज, श्री श्री रविशंकर, कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्‍वती, ज्‍योतिर्मठ पिठाचे शंकराचार्य स्‍वरूपानंद सरस्‍वती, अशा अनेक संतांकडे जाऊन त्‍यांना राष्‍ट्र आणि धर्मरक्षण यांविषयी माहिती देणे, निवेदने देणे, अशा सेवा करत होतो. मी घाटकोपरचे प.पू. जोशीबाबा, नारायणगावचे प.पू. काणे महाराज इत्‍यादी संतांकडे जायचो. त्‍यांनी मला पुष्‍कळ प्रेम दिले आणि माझ्‍यातील धर्म अन् राष्‍ट्र यांविषयीचा अभिमान जागवला. मला त्‍यांचा सत्‍संग मिळाला आणि त्‍यांच्‍याकडून पुष्‍कळ शिकायला मिळाले.

२५ इ. अनेक संत, संप्रदाय किंवा हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना यांच्‍या संपर्कात येऊनही परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने कुणातही न गुंतणे

मी संत, हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना, लोकप्रतिनिधी आणि उद्योगपती यांच्‍या संपर्कात असायचो. मी त्‍यांचे कार्य, लोकसंग्रह आणि मोठेपणा यांच्‍यामुळे प्रभावित होत असे; मात्र परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी मला कुणामध्‍येही अडकू दिले नाही. त्‍यांनी मला ईश्‍वरी तत्त्वाशी आणि त्‍यांच्‍यातील गुरुतत्त्वाशी जोडून ठेवले. मागील ३० वर्षांपासून ते माझ्‍याकडून अशा प्रकारे साधना करून घेत आहेत; पण त्‍यांनी मला कुणातही अडकू न देता थेट ईश्‍वरी तत्त्वाशीच जोडले आहे. यातूनच ‘ते स्‍वतःच ईश्‍वर आहेत’, याची मला प्रचीती आली.

२५ ई. लाचार अधिकार्‍यांनी खोट्या गुन्‍ह्यांत अडकवण्‍याचा प्रयत्न करूनही ‘धर्माचे रक्षण करणार्‍याचे धर्म, म्‍हणजेच ईश्‍वर रक्षण करतो’, या वचनाची नित्‍य अनुभूती घेणे

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने अनेक मोहिमा आणि आंदोलने राबवली गेली. त्‍यामुळे मी पुरोगामी, बुद्धीवादी, धर्मद्रोही, हिंदुद्वेष्‍टे, अहंकारी राजकारणी, भ्रष्‍ट प्रशासन अधिकारी, पोलीस इत्‍यादींच्‍या संपर्कात आलो. त्‍यांचे प्रबोधन करणे, वैध मार्गाने विरोध करणे आणि धर्मरक्षणाचे कार्य करणे, हे सर्व माझी बुद्धी आणि कल्‍पना यांच्‍या पलीकडचे होते. दुष्‍प्रवृत्ती असलेल्‍या लाचार अधिकार्‍यांनी काही वेळा मला खोट्या गुन्‍ह्यांत अडकवण्‍याचा प्रयत्न केला; मात्र गुरुकृपारूपी चैतन्‍याच्‍या सामर्थ्‍यापुढे त्‍यांचे काही चालले नाही. ‘धर्मो रक्षति रक्षितः ।’ (मनुस्‍मृति, अध्‍याय ८, श्‍लोक १५), म्‍हणजे ‘धर्माचे रक्षण करणार्‍याचे धर्म, म्‍हणजेच ईश्‍वर रक्षण करतो’, या वचनाची मी नेहमीच अनुभूती घेतली आहे.

२६. सेवा करत असतांना व्यष्टी साधनेचे गांभीर्य लक्षात येऊन परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढणेे

वर्ष २००७ पासून साधकांमध्ये व्यष्टी साधनेचे गांभीर्य निर्माण करण्यासाठी विशेष शिबिरे घेऊन साधकांना व्यष्टी साधना (स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन) करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरानंतर माझ्यात व्यष्टी साधनेचेे गांभीर्य वाढले. माझ्यामध्ये स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू मोठ्या प्रमाणात होते. या शिबिरांनंतर ‘माझा कार्याकडील ओढा वाढला असून व्यष्टी साधनेकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे’, याची मला जाणीव झाली. त्या दिवसापासून मी ठरवले, ‘मी परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित अशी साधना केली पाहिजे.’ त्यानंतर सेवा करतांना माझ्याकडून व्यष्टी साधनेचे प्रयत्न गांभीर्याने होऊ लागले.

२७. आध्यात्मिक पातळी ६० टक्के होणे

२७ अ. वाढदिवसाच्या दिवशी आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्याचे घोषित होणे आणि त्या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांशी दूरभाषवरून बोलण्याची संधी मिळून त्यांनी ‘मला पुष्कळ आनंद झाला’, असे सांगणे

‘१३.१०.२००८ या दिवशी माझा वाढदिवस होता. त्या दिवशी माझी आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्याचे घोषित करून माझा सत्कार करण्यात आला. परात्पर गुरु डॉक्टरांंच्या कृपेने ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या सनातनच्या पहिल्या ४० साधकांमध्ये माझे नाव आले. त्या दिवशी रात्री परात्पर गुरु डॉक्टरांशी दूरभाषवरून बोलतांना ते मला म्हणाले, ‘‘मला पुष्कळ आनंद झाला आहे. तुम्हाला अनिष्ट शक्तींनी प्रगतीचे प्रमाणपत्रच दिले आहे.’’

(श्री. वटकर यांनी अनिष्ट शक्तींचा त्रास असणार्‍या साधकांसाठी नामजपादी आध्यात्मिक उपाय केले. त्या वेळी अनेक साधकांचा आध्यात्मिक त्रास पुष्कळ वाढला होता. – संकलक)

२७ आ. जाणवलेला पालट

माझी आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाली. त्या वर्षी माझ्याकडे असलेल्या पांढर्‍या सदर्‍याचा रंग गुलाबी झाला होता.

२८. ६० टक्के आध्यात्मिक पातळी ते संतपद (७० टक्के आध्यात्मिक पातळी) प्राप्त होईपर्यंतची मनाची विचारप्रक्रिया !

२८ अ. संतपद गाठण्याविषयीचे विचार उणावणे आणि नंतर ते विचार न येणे

वर्ष २०१७ मध्ये माझी आध्यात्मिक पातळी ६५ टक्के झाली. त्यानंतर ‘आध्यात्मिक प्रगती होऊन संत व्हावे’, यांविषयीचे माझे विचार उणावत गेले. वर्ष २०१८ मध्ये माझी आध्यात्मिक पातळी ६७ टक्के असतांना माझ्या मनात थोडेफार प्रगतीविषयी विचार येत होते. त्यानंतर मात्र या विचारांचे प्रमाण न्यून होऊन ते बंद झाले.

२८ आ. इतरांविषयी असलेल्या अपेक्षा उणावून स्थिरता येणे

पूर्वी मला कुटुंबीय आणि सहसाधक यांच्याकडून पुष्कळ अपेक्षा असायच्या. वर्ष २०१९ मध्ये ‘स्वतःविषयी, तसेच इतर लोक किंवा परिस्थिती यांच्याविषयी माझ्या मनात असलेल्या अपेक्षा न्यून झाल्या आहेत’, असे मला जाणवू लागले. पूर्वी चुका झाल्यावर मला ताण यायचा; परंतु नंतर चुकांतून शिकता येऊ लागले. त्यामुळे माझे मन स्थिर होऊ लागले. गुरुपौर्णिमा २०१९ पूर्वी माझ्या मनाची स्थिती स्थिर होती. माझे व्यष्टी साधनेचे प्रयत्न गांभीर्याने चालू होते.

२८ इ. ‘वटकर यांना संत व्हायला अजून २ वर्षे लागतील’, असे सांगून परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘तुमच्या मृत्यूनंतरही मी तुमच्या समवेत असणार आहे’, असे सांगून आश्‍वस्त केल्याने आनंद होणे

वर्ष २०१९ च्या गुरुपौर्णिमेच्या २ मास अगोदर माझे आध्यात्मिक मित्र श्री. तुकाराम लोंढे (वर्ष २०२३ ची आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) रामनाथी (गोवा) येथील आश्रमात गेले होते. तेव्हा त्यांनी परात्पर गुरु डॉक्टरांना माझ्या प्रगतीविषयी विचारले, ‘‘वटकरकाका संत केव्हा होणार ?’’ तेव्हा गुरुदेव म्हणाले, ‘‘त्यांची साधना चांगली चालू आहे. तुम्ही काळजी करू नका. त्यांना संत होण्यास आणखी २ वर्षे लागतील !’’ तेव्हा श्री. लोंढे त्यांना म्हणाले, ‘‘वटकरकाकांचे आता वय झाले आहे. ते लवकर संत झाले, तर बरे होईल.’’ तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘मी नंतरही त्यांच्या समवेत असणार आहे.’’ साधनेच्या आरंभीच्या काळात मला परात्पर गुरु डॉक्टरांचा सतत १० वर्षे स्थुलातून सत्संग मिळाला. ते एखाद्या दिवशी भेटले नाहीत, तर मला अस्वस्थता यायची. नंतर ते गोव्याला गेल्यावर मला त्यांचा सूक्ष्मातील सत्संग मिळू लागला; मात्र ‘माझ्या मृत्यूनंतर काय होईल ?’, असा प्रश्‍न मला पडायचा. ‘परात्पर गुरु डॉक्टर मृत्यूनंतरही माझ्या समवेत असणार आहेत’, हे कळल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. या घटनेनंतर मी स्थिर आणि सकारात्मक झालो.

२८ ई. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतःला त्यांच्या चरणांजवळ ठेवले आहे’, या विचारांमुळे कृतज्ञताभावात रहाता येणे

माझ्या समवेत आणि माझ्यानंतर साधनेत आलेले साधक माझ्या आधी संत झाले. तेव्हा कधीतरी मला वाटायचे, ‘६० टक्के पातळी गाठून १० वर्षे झाल्यावरही मी संतपद गाठू शकत नाही’; मात्र ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी मला त्यांच्या चरणांजवळ ठेवलेे आहे’, याविषयी मला कृतज्ञता वाटायची. ‘१४.१.१९९९ या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांनी मला ‘तुम्ही संत होणार’, आशीर्वाद दिला आहे’, याची आठवण होऊन माझा कृतज्ञताभाव जागृत व्हायचा.

२९. प्रगती झाल्याविषयी (संतपद प्राप्त झाल्याविषयी) मिळालेले संकेत

२९ अ. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी ‘संत’ झाल्याविषयी दिलेला संकेत !

मार्च २०१९ मध्ये परात्पर गुरु पांडे महाराज यांनी देहत्याग केला. त्या अगोदर ३ मास ते मला अधूनमधून सांगायचे, ‘‘तुमचे काम झालेे आहे. (म्हणजे तुमची प्रगती झाली आहे.)’’ तेव्हा ते मला ‘मी संतपद गाठले आहे’, असे सुचवत होते.

२९ आ. पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी साधनेचे प्रयत्न वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे

मला साधनेत कधी अडचण आल्यास मी देवद, पनवेल येथील आश्रमातील पू. (सौ.) अश्‍विनी पवार (सनातनच्या ६९ व्या संत, वय ३३ वर्षे) यांच्याशी बोलतो. माझ्यासारख्या चांगदेवाला साधनेत मार्गदर्शन करणार्‍या त्या जणू मुक्ताईच आहेत. मी त्यांना म्हटले, ‘‘माझी प्रगती होण्यासाठी आणखी २ वर्षे लागतील’, असे मला कळले आहे. हे मला फार कठीण वाटत आहे.’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘काका, गुरुपौर्णिमेला आणखी एक मास, म्हणजे ३० दिवस आहेत. तुम्ही प्रयत्न करा.’’ त्यामुळे मला सकारात्मक राहून गांभीर्याने प्रयत्न करता आले.

२९ इ. देवद आश्रमातील काही साधक मला म्हणायचे, ‘‘काका, ‘तुम्ही संतपद गाठले आहे’, असे आम्हाला जाणवते.’’

३०. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने संतपदी विराजमान होणे

३० अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आशीर्वादात्मक पत्राद्वारे केलेला गौरव !

गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी (१६.७.२०१९ या दिवशी) ‘माझी आध्यात्मिक पातळी ७१ टक्के झाली असून मी संतपदावर विराजमान झालो आहे’, असेे घोषित करण्यात आले. परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांच्या आशीर्वादात्मक पत्रात लिहिले, ‘श्री. शिवाजी वटकर यांच्या मनात अन्यायाविरुद्ध सात्त्विक चीड असून ‘देव आणि धर्म यांची विटंबना होऊ नये’, यासाठी ते अत्यंत जागरूक असतात. त्यांच्यातील समर्पणभाव आणि क्षात्रवृत्ती यांमुळे त्यांना धर्महानी रोखण्यात यशही मिळते. अशक्य वाटणार्‍या गोष्टीही त्यांनी सहजसाध्य करून दाखवल्या आहेत. त्यामुळे त्यांना ‘आदर्श धर्मरक्षक’ असे म्हणता येईल.’

३१. संतपद प्राप्त झाल्यावर शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या स्तरांवर जाणवलेले पालट

३१ अ. शारीरिक

३१ अ १. झोप न्यून होऊन उत्साह वाढणे : पूर्वी मी रात्री १० वाजता झोपून पहाटे ४ ते ५ या वेळेत गजर लावून उठत असे आणि दुपारी १ घंटा झोपत असे. आता रात्री १० वाजता झोपून मला पहाटे ३ च्या सुमारास आपोआप जाग येते आणि व्यायाम करणे, चालणे, मंत्रजप करणे, हे सर्व नेहमीप्रमाणेच होते. आता दुपारी १५ मिनिटे ते अर्धा घंटा विश्रांती घेतली, तरी मला ताजेतवाने वाटते.

३१ अ २. ऑगस्ट २०२० पासून माझे हात आणि पाय यांची नखे पिवळी पडत आहेत.

३१ आ. मानसिक पालट

३१ आ १. अपेक्षा आणि आसक्ती उणावणे : मार्च २०२० ते जून २०२० या ४ मासांच्या कालावधीत मला पाठीच्या मणक्यांचा पुष्कळ त्रास झाला. त्यामुळे मला सतत झोपून रहावे लागले. असे असूनही गुरुदेवांनी माझ्या मनाची स्थिती सकारात्मक आणि आनंदी ठेवली. या प्रसंगामुळे ‘स्वतःचे शरीर पूर्वीसारखेच सुदृढ राहिले पाहिजे’, याविषयीची माझी अपेक्षा किंवा माझी वेशभूषेविषयीची आसक्तीही देवाने अल्प केली.

३१ आ २. अलिप्तता न्यून होऊन आनंदी रहाण्याचे प्रमाण वाढणे : संत होण्यापूर्वी मी पुष्कळ अलिप्त राहून आणि कामापुरते ठराविक साधकांशी बोलत अन् मिसळत असे. आता मला ‘सर्व साधकांशी बोलावे, त्यांच्यात मिसळावे, साधनेविषयी एकमेकांशी बोलून त्यांना साहाय्य करावे आणि आनंदाने रहावेे’, असे वाटते.

३१ इ. आध्यात्मिक पालट

३१ इ १. ‘भगवंत चैतन्याच्या स्तरावर सर्वकाही करत आहे’, हे लक्षात येऊन साक्षीभावात आणि शिकण्याच्या स्थितीत रहाता येणे : ‘परात्पर गुरु डॉक्टर मला हळूहळू वरच्या आध्यात्मिक टप्प्याला घेऊन जात आहेत’, याविषयी कृतज्ञता वाटून माझा आनंद वाढला आहे. आता मला माझ्या भोवतालचे वातावरण अधिक चैतन्यमय वाटते. ‘सर्व गोष्टी आपोआप आणि सुरळीत होत आहेत’, असे मला वाटते. स्थुलातून पुष्कळ धडपड करून कार्य करत रहाण्यापेक्षा आवश्यक ती कृती करून ‘चैतन्याच्या स्तरावर कार्य कसे होते ? भगवंतच सर्वकाही कसे करत आहे ? मला साक्षीभावात रहाता येते का ? मला शिकण्याच्या स्थितीत रहाता येते का ?’, याचे चिंतन होऊ लागले आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आनंद वाढला आहे.

३१ इ २. परात्पर गुरु डॉ. आठवले ईश्‍वर असून ते चैतन्यरूपात सर्वत्र आहेत’, असे जाणवून त्यांचे चैतन्य अनुभवता येणे : पूर्वी ‘मला सेवा म्हणजेच सर्वकाही आहे’, असे वाटायचे. साधना म्हणून मला भावजागृतीचे प्रयत्न प्रयत्नपूर्वक करावे लागायचे. आता परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने हळूहळू मला सर्व सजीव आणि निर्जीव अशा सर्व गोष्टींमध्ये ईश्‍वरी तत्त्व अनुभवता येत आहे. माझा गुरुदेवांप्रती असलेला भाव सगुणाकडून निर्गुणाकडे जात असल्याने मला त्यांना व्यापक स्तरावर अनुभवता येत आहे. ‘परात्पर गुरु डॉक्टर म्हणजे ईश्‍वर आहेत आणि ते चैतन्यरूपात सर्वत्र आहेत’, असे जाणवून मला त्यांचे चैतन्य सर्वत्र अनुभवता येऊन आनंद मिळत आहे.

३१ इ ३. ‘सर्वकाही ईश्‍वरेच्छेने, म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांच्या इच्छेने घडत असून ‘ते आपल्या भल्यासाठीच घडत आहे’, याची जाणीव वाढणे : आता ‘कोणतीही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली, साधनेला विरोध झाला, वयोमानानुसार आजारपण आले किंवा काहीही झाले, तरी ते ईश्‍वरेच्छेने, म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांच्या इच्छेने होत असून ‘ते माझ्या भल्यासाठीच होत आहे’, अशी माझी श्रद्धा वाढली आहे. ते प्रत्येक प्रसंगातून मला शिकवत आहेत. मी स्थिर आणि शांत राहून सूक्ष्मातून गुरुचरणांजवळ बसून आनंद लुटत रहावा’, असे मला वाटते.

संतपद प्राप्त होणे आणि हे सर्व पालट होणे, यांसाठी मी काहीच प्रयत्न केले नाहीत. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने हे सर्व होत आहे’, याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

(समाप्त)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Leave a Comment