देवरुख (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनच्या ९४ व्या संत पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये (वय ७२ वर्षे) यांचा साधनाप्रवास ! भाग २

अनुक्रमणिका

मूळच्या देवरुख (जिल्हा रत्नागिरी) येथील आणि आता खेड तालुक्यातील तपोधाम येथे रहाणार्‍या सनातनच्या ९४ व्या संत पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये यांचा साधनाप्रवास येथे पहाणार आहोत.

या लेखाचा भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  https://www.sanatan.org/mr/a/87688.html

पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये

 

१०. सूक्ष्मातील कळत असण्याच्या संदर्भातील प्रसंग

१० अ. बहिणीच्या मृत मुलाने दूरभाषवरून बोलणे आणि तो दारात उभा असल्याचे दिसणे

एकदा मी अंधेरी (मुंबई) येथे बहिणीकडे (सौ. जयश्री जनार्दन गांगण यांच्याकडे) गेले होते. त्या वेळी तिच्या १४ वर्षांच्या उंच गोर्‍यापान मुलाचे (कु. राहुल जनार्दन गांगण याचे) कर्करोगाने निधन झाले होते. एकदा मी त्यांच्या सदनिकेत एकटीच होते. बहीण आणि तिचे पती बाहेर गेले होते. काही वेळाने दूरभाष आल्यावर मी ‘हॅलो’ म्हटले. दूरभाषवर बोलणार्‍या व्यक्तीने घोगर्‍या आवाजात मला विचारले, ‘आप कौन बोल रहे है ?’ मी म्हटले, ‘‘मै उनकी बहन बोल रही हूं ।’’ त्यावर मी विचारले, ‘‘आप कौन बोल रहे है ? आप का नाम क्या है ?’’ समोरून उत्तर आले, ‘राहुल.’ बहिणीच्या गेलेल्या मुलाचे नाव ‘राहुल’च होते. २ वेळा ‘तो दारात उभा आहे’, असे मला दिसले. याविषयी मी बहिणीला काही बोलले नाही. ती ‘त्याच्या छायाचित्राला फुले वहाणे, उदबत्ती दाखवणे’ इत्यादी करत होती. मी तिला ‘असे करू नकोस’, असे २ वेळा सांगितले.

 

११. साधनेच्या प्रवासात स्वतःत झालेले पालट

११ अ. भित्रेपणा न्यून होऊन धीटपणा येणे

माझा स्वभाव भित्रा होता; परंतु मी साधनेत आल्यावर माझ्या मनातील भीती नाहीशी होऊन माझ्यात धीटपणा आला, तसेच माझा स्वभाव एकलकोंडा आणि अबोल होता. आता त्यातही पालट झाला आहे.

११ आ. पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेता येणे

पूर्वी मला कोणाकडे रहायला आवडत नसे. प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळेच मी पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेऊ शकले.

 

१२. दृढ भाव

गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) आणि गुरुसेवा यांच्याप्रती माझा दृढ भाव आहे.

 

१३. पूर्णवेळ साधना

१३ अ. निवृत्त झाल्यावर पूर्णवेळ साधना करण्यासाठी रत्नागिरी सेवाकेंद्रात येणे

१.६.२००६ या दिवशी मी नोकरीतून निवृत्त झाले. तोपर्यंत मी नोकरी आणि कुटुंब सांभाळून जमेल तशी थोडीफार साधना करत होते. निवृत्त झाल्यावर मला आश्रमात राहून सेवा करायची ओढ लागली होती. मी साधनेत आल्यावर ‘मुलांना नोकरी मिळेल कि नाही ? त्यांची लग्ने होतील कि नाही ?’, असा कोणताच विचार केला नाही. त्यांची काळजी देव घेतच होता. मी सेवानिवृत्त होईपर्यंत ‘मुलांना नोकरी लागणे, त्यांची लग्ने होणे, त्यांना मुले होणे’, हे सर्वकाही देवाने केले होते. त्यामुळे मी घरी न थांबता आश्रमात जायचे ठरवले. देवाने मला आणि मुलांना सर्व काळजीतून सोडवले. माझा मुलगा राजेश मला म्हणाला, ‘‘तू आमच्यात अडकू नकोस. तू तुझी साधना चांगली कर.’’ त्यामुळे मला साधनेत कोणताच अडथळा राहिला नाही. त्यानंतर २ मासांत निवृत्ती वेतनाची (‘पेन्शन’ची) कामे करून ऑगस्ट २००६ मध्ये मी रत्नागिरी सेवाकेंद्रात पूर्णवेळ साधना करण्यासाठी आले.

 

१४. आध्यात्मिक पातळी ६२ टक्के होणे

१४ अ. वर्ष २०१२ मध्ये देवरुख येथे श्री. विनायक फाटक यांच्या
घरी माझी आध्यात्मिक पातळी ६२ टक्के झाली असल्याचे घोषित करण्यात आले.

१४ आ. प्रसारातील साधिकेला सेवेत साहाय्य करणे

राजापूर येथील सौ. पल्लवी प्रमोद लांजेकरताई सनातनचे २५ वे संत पू. हजारेकाका यांच्या (पू. पृथ्वीराज हजारे यांच्या) समवेत ‘अध्यात्मप्रसार करणे आणि समाजातील व्यक्तींच्या भेटी घेणे’, या सेवा काही दिवस करत होत्या. त्यांच्या घरी त्यांच्या वयस्कर सासूबाई आणि यजमान होते. त्यांना प्रतिदिन रात्री घरी येऊन स्वयंपाक करणे आणि आवरणे जमत नसे; म्हणून मी साहाय्यासाठी त्यांच्या घरी जाऊन राहिले होते; म्हणून त्या पू. हजारेकाकांच्या समवेत पूर्णवेळ सेवेसाठी जाऊ शकल्या. या प्रसंगानंतर थोड्या दिवसांनी माझी आध्यात्मिक पातळी ६२ टक्के झाली.

१४ इ. एका वैद्यांना पू. (श्रीमती) शेट्ये यांच्या गळ्यातील वैजयंती माळेच्या
मण्यातून किरण आल्याचे जाणवणे आणि त्यानंतर त्यांचा थकवा जाऊन त्यांना उत्साही वाटणे

मी आणि सहसाधिका श्रीमती गीतांजली फाटकबाई, साखरपे (जिल्हा रत्नागिरी) येथील एका वैद्यांना संपर्क करण्यासाठी गेलो होतो. त्या वैद्या सनातनची सात्त्विक उत्पादने घ्यायच्या आणि इतर सहकार्यही करायच्या. त्या दिवशी वैद्या रुग्ण तपासण्यात फार व्यस्त होत्या, तरीही त्या आम्हाला भेटायला आल्या. त्या फार थकलेल्या दिसल्या. त्या फाटकबाईंशी बोलल्या आणि त्यानंतर आम्ही दुसर्‍या सेवेसाठी गेलो. काही दिवसांनी जेव्हा फाटकबाई त्या वैद्यांना भेटल्या, तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘मागे तुम्ही आला होतात, तेव्हा मी फार थकले होते. त्या वेळी तुमच्या समवेत आलेल्या महिलेच्या माळेतून एक किरण माझ्याकडे आला. त्यामुळे मला ताजेतवाने वाटले आणि मला रुग्ण उत्साहाने तपासता आले. तुमच्या समवेत आलेल्या कोण होत्या ?’’ फाटकबाईंनी त्यांना माझे नाव सांगितले. मी माझ्याकडील वैजयंती माळेने नेहमी नामजप करत असे. त्या वेळी माझी आध्यात्मिक पातळी ६२ टक्के होती.

 

१५. संतपदी विराजमान होणे

२०.५.२०१९ या दिवशी मी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून संत झाल्याचे घोषित करण्यात आले. त्या वेळी ‘मी दुसर्‍याचाच सोहळा पहात आहे’, असे मला वाटत होते.

 

१६. आध्यात्मिक पातळी तेवढीच राहिल्यावर मनात अनेक शंका येणे
आणि शेवटी ‘देवावर सर्व सोडून आपण केवळ साधना करायची’, असे ठरवणे

माझी आध्यात्मिक पातळी वर्ष २०२० मध्ये ७२ टक्के झाली आणि वर्ष २०२१ मध्ये आहे तेवढीच राहिली. तेव्हा ‘काय झाले असेल ? माझी आध्यात्मिक पातळी का वाढली नाही ? माझ्याकडून काय चुका झाल्या असतील ?’, असे विचार माझ्या मनात बरेच दिवस येत होते. नंतर मी विचार करणे सोडून दिले आणि ‘आपण केवळ देवाने सांगितल्याप्रमाणे साधना करत रहायचे. बाकीचे देव बघून घेईल’, असे मी ठरवले.

 

१७. कुटुंबियांनी साधनेत केलेले साहाय्य !

१७.अ. मी साधनेला आरंभ केला. तेव्हा मी मुलांसह एकत्र कुटुंबात रहात होते. मी, आई-वडील, भाऊ, भावजया, त्यांची मुले इत्यादी एकत्र रहात होतो; पण माझ्या साधनेला कुणाचाच विरोध नव्हता. केवळ वडील मला म्हणायचे, ‘‘अधिकोषाचे काम सांभाळून कर. उगाच त्रास व्हायला नको. तू जे करतेस, त्यातून तुला समाधान मिळत आहे ना ! मग कर.’’

१७.आ. मी अधिकोषातून बाहेर पडल्यावर अर्पण आणि विज्ञापने मिळवणे, भेटी घेणे इत्यादी सेवांसाठी जायचे आणि रात्री ८.३० – ९ वाजेपर्यंत घरी यायचे. तोपर्यंत मोठा मुलगा चपातीचे पीठ भिजवून आणि भाजी चिरून ठेवायचा. तो मला साहाय्य करायचा. ‘आई एवढे सर्व करून आनंदी असते’, असे त्याचे निरीक्षण असायचे.

 

१८. आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

१८ अ. मैत्रिणीच्या समवेत झाडाखालून चालत असतांना साप
झाडावरून खाली येणे आणि मैत्रिणीला मागे ओढल्याने साप तिच्या अंगावर न पडणे

लहानपणी एकदा मी आणि माझी मैत्रीण शाळेतून घरी येत होतो. आम्ही एका मोठ्या आंब्याच्या झाडाखालून चालत होतो. माझे लक्ष सहज वर गेले. एक मोठा सर्पटोळी (हिरव्या रंगाचा झाडावर आढळणारा साप) खाली येत होता. मी मैत्रिणीला झटकन मागे ओढले. तो साप आमच्या जवळ नालीमध्ये (गटारात) पडला आणि ‘सप, सप’ उड्या मारत गेला.

१८ आ. अधिकोषातून घरी परत जातांना वीज गेल्यामुळे अंधारातून
चालत जावे लागणे आणि एका दुचाकीवाल्याने रस्त्यातील सापापासून वाचवणे

एकदा सायंकाळी ७.३० वाजता मी अधिकोषातून घरी जाण्यासाठी बाहेर पडले. देवरुखमधील वीज गेली होती. त्यामुळे सगळीकडे पूर्ण काळोख होता. त्यामुळे मी अधिकोषापासून जवळच असणार्‍या एका दुकानात ते बंद होईपर्यंत थांबले. रात्री उशिरा वाहने क्वचितच असायची. मला अंधारातून चालत जावे लागले. मी देवाला सारखी प्रार्थना करत होते. मी क्रियमाण चुकवले आहे; पण आता मी काहीच करू शकत नाही. मी नामस्मरण आणि प्रार्थना करत अंदाजाने पावले टाकत जात होते. मागून एक दुचाकीवाला आला आणि पुढे गेला; पण तो वळून परत आला आणि रस्त्यात थांबला. मी ज्या बाजूने जात होते, त्या बाजूला एक मोठा साप रस्त्यात आडवा पडला होता. तो त्याने पाहिला; म्हणून तो वळून माझ्यासाठी थांबून राहिला. तो मला म्हणाला, ‘‘तुमच्या हातात विजेरीही (‘बॅटरी’ही) नाही; म्हणून मी थांबलो आहे.’’ त्याच्यामुळे मी वाचले. त्या दिवशी अमावास्या होती.

१८ इ. दुचाकी चालवतांना काहीतरी पडल्याचा आवाज येणे
आणि गाडी थांबवल्यावर २ साप खाली पडल्याचे लक्षात येणे

एकदा मी सत्संगाहून उशिरा घरी आले. मी दुचाकी घराच्या बाजूने नेत होते. तोपर्यंत वरून काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि गाडीचे हँडल धरलेल्या माझ्या हाताला स्पर्श झाला. मी गाडी उभी करून पाहिले, तर गाडीच्या बाजूला एकात एक अडकलेले २ साप खाली पडले होते. त्यांचा रंग एका बाजूने काळा आणि दुसर्‍या बाजूने लाल होता.

१८ ई. तपोधाम येथे असतांना आलेल्या अनुभूती

१८ ई १. तपोधाम येथे उंदरांचा त्रास वाढणे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर एक मांजर तेथे येणे अन् त्यानंतर उंदरांचा त्रास न्यून होणे

तपोधाम येथे उंदरांचा त्रास फार वाढला होता. त्यांच्यावर औषधाचाही काही परिणाम होत नव्हता. पिंजरा लावूनही त्यात उंदीर अडकत नव्हते. त्यांनी प्लास्टिकच्या सर्व बरण्या तोडल्या होत्या. एक दिवस मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केली, ‘तुम्ही सर्व भरभरून देता आहात; पण आम्हाला हे सांभाळता येत नाही.’ दुसर्‍याच दिवशी आश्रमात एक मांजर आले. मांजराचा वावर वाढल्यामुळे उंदरांचा त्रास अल्प झाला.

१८ ई २. मांजराला रागावल्यावर ते कुठेतरी निघून जाणे आणि ७ – ८ मासांनी उंदरांचा त्रास चालू झाल्यावर ते परत येणे

मी नामजपाला बसले की, ते मांजर माझ्या पायांमध्ये येऊन बसायचे. ते माझ्या समवेत फिरत रहायचे. एक दिवस ते सारखे ओरडत होते. तेव्हा मी त्याला म्हणाले, ‘‘सारखे ओरडत राहिलास, तर मी तुला कुठेतरी सोडून येईन.’’ ‘ते त्याला कळले’, असे मला वाटले. ते ७ – ८ मास कुठेतरी निघून गेले. मी त्याला उगाच ओरडले; म्हणून मला फार वाईट वाटले. त्या कालावधीत परत उंदरांचा त्रास चालू झाला. त्या वेळी पुन्हा तेच मांजर परत आले आणि उंदरांचा त्रास न्यून झाला.

 

१९. आतापर्यंतच्या साधनेतील वाटचाल गुरुमाऊलीच्या कृपेनेच झाली आहे !

मी साधना करत नव्हते, तेव्हा माझे घरदार, दागदागिने सर्वकाही गेले, तरीही मी विचार करायचे, ‘जे आपले नाही, ते आपल्याला मिळणार नाही आणि जे आपले आहे, ते कुणीही घेणार नाही.’ साधना चालू केल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला सर्वकाही मिळाले. त्यांनी आम्हाला काहीच न्यून पडू दिले नाही आणि आध्यात्मिक उन्नतीही करवून घेतली. संतपदापर्यंतच्या वाटचालीचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. माझा स्वभाव फार भित्रा आणि अबोल होता. आता मी जी काही आहे, ती गुरुमाऊलीच्या कृपेनेच आहे. त्यांनी माझ्यावर कृपेचा अपार वर्षाव केला आहे आणि करत आहेत. किती कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी अल्पच आहे. माझ्या अंतर्मनातून सतत कृतज्ञताच असते.

माझी अवस्था दोर तुटलेल्या पतंगासारखीच होती. गुरुमाऊलींनी मला आपल्या चरणांजवळ घेतले. पुढची वाटचालही गुरुमाऊलीच करवून घेतील. कोटीशः कृतज्ञता !

– (पू.) श्रीमती स्नेहलता शेट्ये (वय ७२ वर्षे), देवरुख, रत्नागिरी. (७.३.२०२२)

 

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  •  सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

Leave a Comment