सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणार्‍या पू. (कु.) रत्नमाला दळवी ! (भाग १)

अनुक्रमणिका

 

१. जन्म आणि बालपण

१ अ. जन्म

माझा जन्म चैत्र कृष्ण त्रयोदशी (१६.४.१९७७) या दिवशी तिवरे (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) या गावी झाला.

१ आ. प्रकृती चांगली नसणे

लहानपणापासूनच मी अनेक वेळा रुग्णाईत असायचे. साधारण वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत मला काविळ, मलेरिया, विषमज्वर (टायफॉईड), कांजिण्या, गोवर, असे आजार झाले आहेत. जन्मतःच माझ्या हृदयाच्या पडद्याला छिद्र होते. वर्ष २००३ मध्ये त्यावरील शस्त्रकर्म झाल्यावर त्याविषयीचा त्रास बंद झाला.

१ इ. देवाची आवड असणे

माझ्या कुटुंबातील वातावरण धार्मिक आहे. कुटुंबात सर्व सण, उत्सव, कुलाचार धार्मिक पद्धतीने साजरे केले जातात. त्यामुळे मला लहानपणापासूनच देवाविषयी आवड होती.

 

२. शिक्षण

माझे कला शाखेतून पदवीपर्यंतचे शिक्षण (बी.ए.) पूर्ण झाले आहे.

 

३. लहानपणापासून नीटनेटके रहायला आवडणे

मला लहानपणापासूनच नीटनीटकेपणाची सवय आणि आवड आहे. प्रत्येक वस्तू त्या त्या जागेवर ठेवायला, वस्तू आणि कपडे यांचा वापर चांगल्या प्रकारे करायला मला आवडते. मला अनावश्यक व्यय करायला आवडत नाही.

 

४. सनातन संस्थेशी झालेला संपर्क !

४ अ. सनातन संस्थेशी संपर्क होऊन साधनेला आरंभ होणे

वर्ष १९९९ मध्ये मला काही साधकांकडून सनातन संस्थेची माहिती मिळाली. ‘सनातन संस्था देवाचेच करायला सांगत असल्यामुळे मी सत्संगाला जायला आरंभ केला. सत्संगात कुलदेवता आणि दत्त यांच्या नामजपाचे महत्त्व कळल्यावर मी ते नामजप करायला आरंभ केला. त्यापूर्वी मी कधीही कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप केला नव्हता.

४ आ. सेवेला आरंभ होणे

वर्ष २००० पासून मी सनातन संस्थेच्या माध्यमातून सेवेला आरंभ केला. आरंभी मी महाविद्यालयीन शिक्षण घेत नामजप आणि सेवा करायला आरंभ केला. काही दिवस मी मंदिरातील उत्सवांच्या वेळी ग्रंथप्रदर्शन, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण, गुरुपौणिमेनिमित्त अर्पण जमा करणे, अशा सेवा केल्या. माझी महाविद्यालयातील शेवटच्या वर्षाची परीक्षा चालू असतांना रत्नागिरी येथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची जाहीर सभा होणार होती; परंतु परीक्षा असल्याने मी या सभेला गेले नाही. माझे वडील या सभेला गेले होते. सभेहून आल्यावर त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सभा यांविषयी आम्हाला सांगितले. तेव्हा ‘मी साधनेतील एक चांगली संधी गमावली’, याची मला आता जाणीव होत आहे.

 

४ इ. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या नियमित वाचनामुळे सेवेची ओढ लागणे
आणि पुढील शिक्षणाच्या मायेत न अडकता पूर्णवेळ सेवा करण्यास आरंभ होणे माझे

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर माझी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्याची प्रक्रिया चालू होती. तेव्हा मी दैनिक ‘सनातन प्रभात’ नियमित वाचत असे. त्यामुळे माझ्या मनामध्ये ‘शिक्षणापेक्षा सेवा करूया’, असा विचार येऊ लागला. त्यामुळे मी पुढील शिक्षण न घेता साधना करण्याचे ठरवले. मी रत्नागिरी येथील सनातन संस्थेच्या सेवाकेंद्रात सेवेला जाण्यास आरंभ केला. फेब्रुवारी २००२ पासून श्री गुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने माझा पूर्णवेळ साधना करण्यास आरंभ झाला. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी येथील कार्यालयात आलेल्या वार्तांचे टंकलेखन करणे, दैनिक आणि विज्ञापने यांची संरचना करणे, यांसह दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाशी संबंधित सेवा देवाने माझ्याकडून करवून घेतल्या.

४ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रथम दर्शन !

वर्ष २००२ मध्ये रत्नागिरी येथे झालेल्या सर्वसंप्रदाय सत्संगासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले रत्नागिरी येथे आले होते. तेव्हा प्रवेशद्वारापाशी परात्पर गुरु डॉ. आठवले गाडीतून उतरत असतांना मला त्यांचे प्रथम दर्शन झाले. परात्पर गुरु डॉ. आठवले येण्याच्या काही वेळ आधीपासूनच माझ्या मनाला पुष्कळ आनंद जाणवत होता आणि वातावरणातही पुष्कळ शांतता अनुभवता येत होती.

 

५. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी व्यष्टी साधनेचे महत्त्व मनावर बिंबवणे

वर्ष २००३ मध्ये मी देवद आश्रमात रहायला आले. वर्ष २०१६ पासून परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याकडे माझ्यासह काही सहसाधकांचा व्यष्टी साधनेचा आढावा चालू झाला. तेव्हापासून माझ्या व्यष्टी साधनेच्या प्रक्रियेला खर्‍या अर्थाने आरंभ झाला. त्यांनी माझ्या मनावर व्यष्टी साधनेचे महत्त्व बिंबवले. त्यामुळे माझ्या मनामध्ये व्यष्टी साधनेचा संस्कार निर्माण होऊन माझ्यामध्ये व्यष्टी साधनेसाठी प्रयत्न करण्याची गोडी निर्माण झाली.

 

६. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी स्वभावदोषांचे निर्मूलन आणि गुणसंवर्धन करण्यास शिकवणे

सद्गुरु राजेंद्रदादा यांनी मला माझ्यातील स्वभावदोषांची नेमकपेणाने जाणीव करून देऊन ‘त्यातून कसे बाहेर पडायचे ?’, हे शिकवले. तसेच ‘समष्टी साधनेच्या दृष्टीने माझ्यामध्ये कोणत्या गुणांचा अभाव आहे आणि ते गुण वाढवण्यासाठी मी कसे प्रयत्न करायला हवेत ?’, हेही त्यांनी मला शिकवले.

६ अ. स्वभावदोष निर्मूलन करण्यासाठी केलेले प्रयत्न !

६ अ १.  साधकांकडून ‘अपेक्षा करणे’ या स्वभावदोषाची तीव्रता अधिक असल्यामुळे चिडचिड होऊन साधकांविषयी पूर्वग्रह निर्माण होणे

माझ्यामध्ये ‘अपेक्षा करणे’ या स्वभावदोषाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे माझ्यासह सेवा करणारे आश्रमातील साधक आणि जिल्ह्यातील साधक यांच्याकडून माझ्या सेवेविषयी पुष्कळ अपेक्षा असायच्या अन् माझ्या मनातील त्या विषयीच्या विचारांचा कालावधीही अधिक वेळ टिकून रहायचा. तेव्हा माझ्या मनात ‘या अपेक्षा किंवा हे विचार केवळ सेवेच्या अनुषंगानेच आहेत. यामध्ये माझा वैयक्तिक लाभ नाही’, असा चुकीचा विचार असायचा; पण ‘त्यामुळे माझी साधनेत हानी होत आहे ?’, याकडे माझे लक्ष नसायचे. त्यामुळे हा स्वभावदोष न्यून करण्यासाठी माझ्याकडून तितक्या गांभीर्याने प्रयत्न होत नव्हते. या स्वभावदोषामुळे तेच तेच प्रसंग पुनःपुन्हा घडल्यावर माझी चिडचिड होत असे आणि ते विचार माझ्या मनात राहून त्या त्या साधकांविषयी माझ्या मनात पूर्वग्रह निर्माण होत असे.

६ अ २. व्यष्टी साधनेत मिळत असलेले मार्गदर्शन आणि जिल्ह्यातील साधकांशी वाढलेला समन्वय यांमुळे साधकांना समजून घेता येऊ लागणे

आम्ही करत असलेली सेवा ही पूर्णपणे जिल्ह्यातील साधकांच्या सेवांवर अवलंबून असते. त्यामुळे जिल्ह्यातून माहिती येण्यास विलंब झाला किंवा आलेल्या माहितीमध्ये चुका असल्यास माझी चिडचिड व्हायची. माझ्या साधकांकडून अपेक्षा व्हायच्या. माझा साधकांना समजून घेण्याचा भाग पुष्कळच अल्प होता. माझा जिल्ह्यांशी असलेला समन्वय वाढत गेला आणि मला व्यष्टी साधनेसाठी सद्गुरु राजेंद्रदादांचे (सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचे) मार्गदर्शन मिळू लागले, तसतशा माझ्या मनातील अपेक्षा अन् चिडचिड न्यून होऊ लागली. माझ्याकडून साधकांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न होऊ लागला. परिणामी साधकांविषयी जवळीक निर्माण होण्याच्या प्रक्रियेला आरंभ झाला. ‘जिल्ह्यातील साधकही शिकत आहेत. त्यांना समजून घ्यायला हवे’, अशी माझी विचारप्रक्रिया होऊ लागली.

६ अ ३. प्रसंग घडल्यावर मनाचा अभ्यास केल्यावर अयोग्य विचारांची जाणीव होणे आणि ‘देवाला या प्रसंगातून काय शिकवायचे आहे ?’, असा विचार होऊन ते शिकता येणे

सद्गुरु राजेंद्रदादांकडे माझा व्यष्टी साधनेचा आढावा चालू झाल्यापासून ‘अपेक्षा करणे’ या स्वभावदोषामुळे माझ्या साधनेची हानी होत आहे आणि मी देवाच्या अनुसंधानापासून दूर जात आहे’, याची मला तीव्रतेने जाणीव होऊ लागली. त्यामुळे त्यावर मात करण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न होऊ लागले. ‘इतरांना समजून घेतल्यास अपेक्षेचे विचार लगेच न्यून होतात’, हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे माझ्या मनात अपेक्षेचे विचार आल्यावर ‘मला या विचारांमध्ये अडकायचे नाही. तेवढा वेळ मी देवापासून दूर जाणार आहे’, असा माझा विचार होण्यास आरंभ झाला. कुणाविषयीही माझ्या मनात प्रतिक्रिया आल्यावर मला माझ्या मनाचा अभ्यास करता येऊ लागला. ‘माझी चिडचिड होत नाही ना ? माझ्या साधनेच्या दृष्टीने योग्य काय आहे ?’, असा विचार करण्यास मला जमू लागले. त्यामुळे माझ्या मनात साधकांविषयी असलेल्या पूर्वग्रहाचे विचार न्यून होण्यास आरंभ झाला. एखादा प्रसंग घडल्यावर त्या प्रसंगात ‘मी कुठे न्यून पडले आहे, हे देवाला मला दाखवून द्यायचे आहे’, असा विचार मनात येऊन ‘त्या प्रसंगातून देवाला मला काय शिकवायचे आहे ?’, हे माझ्या लक्षात यायला लागले.’

६ आ. अहं-निर्मूलन होण्यासाठी केलेले प्रयत्न

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करतांना आढावासेवक जे सांगतील, ते कृतीत आणण्याचा प्रयत्न देवानेच माझ्याकडून करवून घेतला. प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने व्यष्टी साधनेचे प्रयत्न करतांना एखादा स्वभावदोष किंवा एखादी चूक कुणी लक्षात आणून दिल्यावर ती स्वीकारतांना किंवा त्यावर मात करतांना माझ्या मनाचा कधी संघर्ष झाला नाही.

६ इ. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी ‘देवच सेवा देतो आणि त्यासाठी आवश्यक
असलेली क्षमताही तोच देतो’, असे सांगून देवावरची श्रद्धा वाढवल्यामुळे सेवेचा ताण न्यून होणे

मी करत असलेल्या सेवेत नेहमी ‘साधकसंख्या अल्प आणि सेवा अधिक’, अशी स्थिती असते. त्यामुळे पूर्वी सेवा प्रलंबित राहिल्यावर मला पुष्कळ ताण यायचा. मी रात्री पुष्कळ वेळ जागून त्या सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचे. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी व्यष्टी साधनेच्या आढाव्यामध्ये मला सांगितले, ‘‘देवच सेवा देतो आणि ती सेवा करण्याचे बळही तोच देतो. ‘ती सेवा करण्याची आपली क्षमता आहे कि नाही ?’, हेही देवालाच ठाऊक असते. त्यामुळे आपण केवळ त्यालाच शरण जायचे.’’ अनेक प्रसंगांच्या माध्यमातून त्यांनी ते माझ्या लक्षातही आणून दिले. त्यामुळे हळूहळू देवाच्या कृपेने मला सेवेचा ताण येण्याचे प्रमाण न्यून होत गेले. ही परिस्थिती देवानेच ‘माझी सकारात्मकता आणि देवावरची श्रद्धा वाढवण्यासाठी निर्माण केली होती’, असे आता माझ्या लक्षात येते.

६ ई. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी समष्टी सेवेसाठी व्यापक विचार करता येण्यासाठी केलेले मार्गदर्शन !

६ ई १. ‘सहसाधकांमुळे साधना आणि सेवा करू शकत आहे’, याची जाणीव होऊन इतरांना समजून घेता येऊ लागणे

साधकांकडून चुका झाल्यावर त्यांच्याशी बोलतांना माझी चिडचिड होत असे आणि ‘त्याच त्याच चुका त्यांच्याकडून पुन्हा होऊ नयेत’, यासाठी त्यांना त्याची जाणीव करून द्यायला हवी’, असा विचार होत असे. तेव्हा माझा साधनेच्या दृष्टीने अल्प आणि कार्याच्या दृष्टीने अधिक विचार असायचा. त्यानंतर एकदा व्यष्टी साधनेच्या आढाव्यामध्ये सद्गुरु राजेंद्रदादांनी मला ‘सहसाधकांचे साधनेतील महत्त्व’ या विषयावर चिंतन करून यायला सांगितले. तेव्हा ‘सहसाधकांमुळे मी साधना आणि सेवा करू शकत आहे’, हे माझ्या लक्षात आले. ‘देव सर्वांनाच साधनेत साहाय्य करत आहे’, असा माझ्याकडून विचार व्हायला लागला. त्यानंतर ‘सहसाधकांशी बोलण्यापूर्वी, बोलतांना आणि बोलल्यानंतर माझ्या मनात कोणते विचार चालू आहेत ?’, याचा मी अभ्यास करायला आरंभ केला. त्यामुळे ‘मी आणखी काय करू शकले असते ?’, असा विचार मला करता यायला लागला. त्यामुळे माझ्या वागण्यात सहजता येऊ लागली.

६ ई २. पूर्वी स्वभावदोषांमुळे केवळ स्वतःकडील सेवेला प्राधान्य देणे

माझ्याकडून माझ्या सेवेपुरताच विचार व्हायचा. मी अनेक वर्षांपासून सेवा करत आहे; पण मी स्वतःच्या सेवेची एक चौकट करून घेतली होती. सेवा करतांना स्वतःकडे जेवढी सेवा आहे, तेवढीच सेवा मी करत होते. उत्तरदायी साधकांनी त्या व्यतिरिक्त इतर कोणतीही सेवा सांगितली, तरी मी ती सेवा करण्यास कधीच सिद्ध होत नसे. यामध्ये ‘पुढाकार न घेणे, दायित्व न घेणे, साधकांमध्ये न मिसळणे, नियोजनाचा अभाव’, असे माझ्यातील अनेक स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू कार्यरत होते अन् माझ्या ते लक्षातही येत नव्हते.

६ ई ३. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी ‘सेवेतील दायित्व जेवढे अधिक, तेवढी साधनेची संधी अधिक’, हे सूत्र मनावर बिंबवणे

सद्गुरु राजेंद्रदादा व्यष्टी साधनेच्या आढाव्यात अनेक प्रसंगांच्या माध्यमातून मला ‘सेवेचे दायित्व किती आहे ?’, याची जाणीव करून द्यायचे. ‘जितके दायित्व अधिक, तितकी साधनेची संधी अधिक’, हे त्यांनी माझ्या मनावर बिंबवले. त्यामुळे माझ्यातील दायित्व घेण्याची जाणीव पुष्कळ प्रमाणात वाढली. नंतर ‘माझी सेवा करून मी अन्य सेवा करू शकते’, अशी विचारप्रक्रिया होण्यास आरंभ झाला. त्यामुळे काही कालावधीने उत्तरदायी साधकांनी सांगितल्यावर मी आमच्या सेवेच्या ठिकाणच्या स्वच्छतेच्या सेवेचे दायित्व घेतले. इथूनच नियोजन करण्याच्या सेवेतून समष्टीमध्ये सहभागी होण्यास आरंभ झाला.

६ ई ४. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी ‘व्यापकत्व वाढण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, ते सांगून प्रयत्नांना योग्य दिशा देणे

व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सद्गुरु राजेंद्रदादांनी मला ‘व्यापकत्व वाढायला हवे’, याची जाणीव करून दिली आणि ‘त्यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, याविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘प्रत्येक सेवा माझी आहे’, या विचाराने समोर आलेली कोणतीही सेवा किंवा दुसर्‍याने सांगितलेली सेवा सहजतेने स्वीकारता आली पाहिजे. तुम्हाला कितीही घाई असली किंवा कितीही तातडीची सेवा असली, तरी सहजतेने इतरांना साहाय्य करता आले पाहिजे. एखादा साधक काही अडचण सांगायला किंवा काही विचारायला आल्यावर त्याला प्रथम प्राधान्य देता आले पाहिजे. नेहमी समष्टीचा विचार अधिक व्हायला हवा.’’ सद्गुरु राजेंद्रदादांनी प्रयत्नांची अशी दिशा दिल्याने माझ्याकडून तसे प्रयत्न होऊ लागले. त्यामुळे मला व्यापक होता येऊन समष्टी सेवा करण्यातील आनंद अनुभवता येऊ लागला.

६ ई ५. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आश्रमातील सर्व साधकांविषयी जवळीक वाटू लागणे

जेव्हा मी आश्रमातील अन्य सेवांमधील काही सेवा बघायला आरंभ केला, तेव्हा सद्गुरु राजेंद्रदादांनी मला सांगितले, ‘‘जेवढी तुमची सेवा तुम्हाला आपली वाटते, तेवढीच अन्य सेवाही आपली वाटली पाहिजे.’’ याचा परिणाम असा झाला की, जरी कार्याच्या अनुषंगाने मला तेवढा वेळ देता येत नसला, तरी अन्य विभागातील सेवा आणि साधक यांच्याविषयी माझ्या मनात पुष्कळ जवळीक निर्माण झाली. माझ्या सेवेतील अडचणी सोडवण्यासाठी माझ्याकडून जसे प्रयत्न होतात, तसेच अन्य सेवांतील अडचणी सोडवण्यासाठीही प्रयत्न होऊ लागले.

६ उ. सेवांचे नियोजन करतांना आणि गुणसंवर्धन होण्यासाठी केलेले प्रयत्न

६ उ १. स्वतः त्या सेवेचा अभ्यास करणे
६ उ २. सेवेतील सर्व साधकांना समवेत घेऊन सेवेचे नियोजन करणे

‘या सेवेचे नियोजन कसे करूया ?’, असे साधकांना विचारून त्यांचे मत समजून घेऊन सहसाधकांनी सांगितलेल्या पर्यायांचा विचार करून आवश्यक तिथे पालट केले. सहसाधकांना समवेत घेऊन सेवेचे नियोजन केल्याने १ – २ वर्षांतच अन्य साधकही छोट्या छोट्या सेवांचे दायित्व घेण्यास आणि त्या सेवेचे नियोजन करायला शिकले.

६ उ ३. सहसाधकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या सेवेचे नियोजन करणे

अधिक कालावधीच्या सेवेचे नियोजन करतांना ‘सहसाधक त्या कालावधीत घरी जाणार आहेत का ?’ किंवा त्यांना येऊ शकणार्‍या अडचणी विचारून घेतल्यामुळे सहसाधक आणि दायित्व साधक यांच्यामध्ये वेगळेपण राहिले नाही. त्यामुळे साधकांकडून कोणत्याही सेवेचे नियोजन सहजतेने स्वीकारले जाऊ लागले.

६ उ ४. सेवेची कार्यपद्धत ठरवतांना सर्वांचा विचार घेणे

सेवेची एखादी कार्यपद्धत ठरवल्यानंतर ती संबंधित सर्वांना वाचायला देऊन त्यांनी सांगितलेले पालट आवश्यकतेनुसार केल्याने संघटितपणा वाढण्यास साहाय्य झाले.

६ उ ५. नवीन सेवा आधी स्वतः करून पहाणे

एखादी नवीन सेवा आधी स्वतः करून मग सहसाधकांना करायला सांगितली. असे केल्याने ‘त्या सेवेमध्ये काय अडचण येऊ शकते ?’, हे आधीच माझ्या लक्षात येऊन त्या अडचणीवर उपाययोजना काढणे सोपे झाले.

६ उ ६. साधकांना त्यांच्या क्षमतेनुसार सेवा देणे

साधकांची क्षमता, त्यांच्यातील स्वभावदोष आणि अहं, त्यांना होणारे शारीरिक अन् अनिष्ट शक्तींचे त्रास, हे सर्व लक्षात घेऊन त्यांना सेवा देण्याचा प्रयत्न केला. एकाच प्रकारची सेवा करायला दोन साधकांना वेगवेगळा कालावधी लागत असेल, तर स्वतः त्या सेवेचा अभ्यास करून सेवा योग्य वेळेत होण्यासाठी साधकांना साहाय्य केले.

६ उ ७. साधकांना त्यांच्याकडून होणार्‍या चुकांची जाणीव करून देणे

साधकांच्या सेवा आणि नामजपादी उपाय यांचे नियोजन करून देऊन ‘त्यानुसार सेवा होत आहे ना ?’, हे पहायला आरंभ केला. साधकांकडून नियोजनाप्रमाणे सेवा न झाल्यास त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यात जे चुकले असेल, त्याची साधकांना जाणीव करून देऊ लागले.

६ उ ८. सेवा वेळेत आणि परिपूर्ण होण्यासाठी केलेले प्रयत्न
६ उ ८ अ. सेवा वेळेत होण्यासाठी साधकांच्या अडचणी सोडवण्याला प्राधान्य देणे आणि सेवा प्रलंबित रहात असतील, तर त्यांना साहाय्यासाठी आणखी एक साधक जोडून देणे

सेवा पूर्ण करण्याचा अंतिम दिनांक लक्षात घेऊन सेवेचे नियोजन (‘रिव्हर्स’ प्लानिंग) करून सेवा वेळेत होण्यासाठी प्रयत्न केले आणि साधकांकडून तसे प्रयत्न करवून घेतले. साधकांच्या सेवेमध्ये येणार्‍या अडचणी सोडवण्यासाठी प्राधान्य दिले. एखाद्या साधकाची सेवा प्रलंबित राहू लागली, तर लगेचच त्याला साहाय्यासाठी दुसरा साधक जोडून दिला. साधकांकडून होणार्‍या चुकांची त्यांना स्पष्टपणे जाणीव करून दिली. एखाद्या साधकाकडून पुनःपुन्हा त्याच चुका होत असतील, तर त्याला शिक्षापद्धतीचा अवलंब करायला सुचवले, तसेच मी माझ्याकडून झालेल्या चुकाही साधकांना सांगितल्या.

६ उ ८ आ. अधिक व्याप्ती असलेल्या सेवा एकत्रितपणे करणे

गुरुपौर्णिमेनंतर एक सेवा वर्षातून एकदाच करायची असते; परंतु तिची व्याप्ती पुष्कळ असते आणि त्यामध्ये बारकावेही असतात. साधक एकेकट्याने ही सेवा करत असल्यामुळे या सेवेला पुष्कळ अधिक वेळ लागायचा. त्यामुळे अन्य सेवांवरही परिणाम व्हायचा. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला ‘ही सेवा सर्वांनी मिळून एकत्रित करू शकतो’, हे सुचले. त्याप्रमाणे ३ – ३ साधकांच्या जोड्या केल्याने ही सेवा गतीने होऊ लागली. त्यामुळे नियमितच्या सेवेवरही परिणाम झाला नाही आणि सेवा करतांना कुणाला कंटाळाही आला नाही. त्यामुळे सेवेची फलनिष्पत्तीही वाढली.

६ उ ८ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा विश्वास संपादन करण्यासाठी स्वत: प्रयत्न करणे आणि साधकांकडूनही तसे प्रयत्न करवून घेणे

पूर्वी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये’, यासाठी मी मधे मधे साधकांना चुकांची जाणीव करून देत होते. ‘गुरुदेवांनी ज्या विश्वासाने आपल्याला सेवा दिली आहे, तो विश्वास संपादन करायचा आहे’, याची स्वतः जाणीव ठेवून सहसाधकांनाही तशी जाणीव करून देत होते.

– (पू.) सुश्री (कु.) रत्नमाला दळवी, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

भाग २ वाचण्यासाठी भेट द्या (भाग २)

Leave a Comment