गुरुकार्याची तीव्र तळमळ आणि साधकांना सेवेच्या माध्यमातून घडवणाऱ्या सनातनच्या ११८ व्या संत पू. रत्नमाला दळवी (वय ४५ वर्षे) !

अनुक्रमणिका


पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी यांचा चैत्र कृष्ण त्रयोदशी (२८.४.२०२२) या दिवशी ४५ वा वाढदिवस आहे. पू. रत्नमालाताई या ‘समष्टी संत’ म्हणून सनातनच्या ११८ व्या संतपदी विराजमान झाल्याचे ६.३.२०२२ या दिवशी एका सोहळ्यात घोषित करण्यात आले. पू. रत्नमालाताई यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त देवद, पनवेल येथे त्यांच्या समवेत सेवा करणाऱ्या साधिकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

 

१. सौ. समिधा संजय पालशेतकर

सौ. समिधा पालशेतकर

१ अ. प्रेमभाव

‘मी ६ मास यजमानांच्या (श्री. संजय पालशेतकर यांच्या) उपचारांसाठी घरी रहात होते. त्या कालावधीत मी सेवा करू शकत नव्हते. त्या वेळी पू. रत्नमालाताई मला आठवणीने भ्रमणभाष करून माझी आपुलकीने विचारपूस करायच्या. त्या ‘माझा दिनक्रम कसा आहे ? आम्हा दोघांची शारीरिक आणि मानसिक स्थिती कशीआहे ?’, हे विचारायच्या.

१ आ. साधना करण्यासाठी साहाय्य करणे

माझे यजमान रुग्णाईत असतांना ‘आम्ही दोघे आश्रमात राहिलो, तर आश्रमावर त्याचा भार होईल’, असे मला वाटत होते. त्यामुळे मी पनवेल येथील घर विकून गावी जाऊन रहाण्याचा आणि घरून सेवा करण्याचा विचार करत होते. मी पू. रत्नमालाताईंना याविषयी सांगितल्यावर त्यांनी मला माझ्या अयोग्य विचारांची जाणीव करून दिली. त्यांनी मला ‘यजमानांची सेवा आणि वैयक्तिक कामे’ करून आश्रमातील सेवेला किती वेळ देऊ शकते ?’, याचे नियोजन करायला साहाय्य केले. पू. ताईंमुळेच मी आज आश्रमात राहून सेवा करू शकते.’

 

२. सुश्री (कु.) स्मिता जाधव (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के)

सुश्री (कु.) स्मिता जाधव

२ अ. नियोजनकौशल्य

‘पू. रत्नमालाताई ‘दिवसभरात कोणत्या सेवा करायच्या ?’, याच्या नोंदी वहीत लिहून ठेवतात आणि नियोजनाप्रमाणे सेवा करतात. त्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात जाण्यापूर्वीही ‘तेथे गेल्यावर कोणत्या साधकांना भेटायचे ? कोणाला कोणत्या सेवा सांगू शकतो ?’, याचे नियोजन त्या आधीच करतात. त्यामुळे त्यांच्या तेथील सर्व सेवा समयमर्यादेत पूर्ण होतात.

२ आ. वेळेचे पालन करणे

पू. ताई आश्रमातील प्रसाद आणि महाप्रसाद यांच्या वेळांचे काटेकोरपणे पालन करतात. त्या आम्हाला आश्रमातील अन्य सेवेला वेळेत जाण्याची आठवण करून देतात. पू. ताईंनी आम्हाला सांगितले, ‘‘आपण एखाद्याला वेळ देतो, तेव्हा तेथे देव उपस्थित असतो आणि त्याचे आपल्याला साहाय्य मिळते.’’ एकदा मला महाप्रसाद ग्रहण करायला जायला विलंब झाला होता. तेव्हा त्यांनी मला माझी चूक लक्षात आणून दिली. त्यांनी ‘स्वयंपाकघरातील साधकांना सर्वांचे भोजन झाल्यानंतर सर्व आवरायचे असते आणि आपल्यामुळे त्यांना विलंब होतो’, याची मला जाणीव करून दिली.

२ इ. साधकांना योग्य दृष्टीकोन देऊन आधार देणे

पू. ताईंना एखादी अडचण सांगितल्यावर त्या ती लगेच सोडवतात. त्या अडचणीवर योग्य उपाययोजना सांगतात. त्या साधकांना कुठल्याही प्रसंगातून बाहेर काढतात. पू. ताईंना वैयक्तिक अडचण सांगितल्यासही त्या योग्य दृष्टीकोन देतात. माझ्या आईचे शस्त्रकर्म असल्याने मला १ मास घरी रहावे लागणार होते. त्या वेळी पू. ताई मला म्हणाल्या, ‘‘घरी जाऊन कर्तव्य पूर्ण कर आणि आईला घेऊन आश्रमात ये, म्हणजे आईला आश्रमातील चैतन्य मिळेल अन् तुझी सेवाही होईल.’’ त्या वेळी आईही आश्रमात यायला सिद्ध झाली आणि मी १५ दिवसांत आईच्या समवेत आश्रमात आले. तेव्हा मला पू. ताईंप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.

२ ई. गुरुकार्याची तीव्र तळमळ :

वर्ष २०१६ मध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी पू. ताईंना ताप आणि थकवा आला होता. आधुनिक वैद्यांनी त्यांना ‘सलाईन’ लावण्याचा प्रयत्न केल्यावर त्यात अडचण येत होती. पू. ताईंना पुष्कळ वेदना होत होत्या, तरीही त्या स्थिर होत्या. पू. ताई त्या दिवशी एक सत्संग घेणार होत्या. ‘सलाईन’ व्यवस्थित लागल्यावर आधुनिक वैद्य नरेंद्र दाते यांनी पू. ताईंना विचारले, ‘‘सत्संगाचे कसे करूया ?’’ तेव्हा पू. ताईंना प्रचंड वेदना होत असतांना आणि एका हाताला ‘सलाईन’ लावले असतांनाही त्यांनी सत्संग घेतला.

२ उ. परात्पर गुरु डॉक्टरांप्रती भाव

पू. ताई नमस्कार करतांना ‘परात्पर गुरु डॉक्टर प्रत्यक्ष समोर आहेत आणि पू. ताई त्यांच्या चरणांवर डोके ठेवत आहेत’, असे मला जाणवते आणि माझा भाव जागृत होतो. पू. ताईंनी केवळ ‘प.पू. डॉक्टर’, असे म्हटल्यावरही मला गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवता येते. त्या वर्षातून ३ – ४ वेळा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी जातात. त्या देवद आश्रमात परत आल्यावर आम्हाला संत आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या सत्संगात अनुभवलेले भावक्षण सांगतात. ते ऐकून आमची भावजागृती होते आणि ‘आम्ही सर्व जण ते प्रत्यक्ष अनुभवत आहोत’, असे वाटते.’

 

३. सौ. तनुजा गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के)

सौ. तनुजा गाडगीळ

३ अ. मनमोकळेपणा आणि  सहजता

‘पू. रत्नमालाताईंच्या प्रत्येक कृतीत सहजता असते. त्यामुळे मी कोणतेही सूत्र त्यांना मनमोकळेपणे सांगू शकते. पूर्वी त्या साधकांशी फार बोलत नसत. ‘त्या आणि त्यांची सेवा’, असे असायचे. संतांनी त्यांना यावर प्रयत्न करायला सांगितले. आता त्या सर्वांशी सहजतेने बोलतात.

३ आ. प्रेमभाव

पू. ताई सेवेशी संबंधित प्रत्येक साधकाच्या प्रकृतीची काळजी घेतात. एखादा साधक रुग्णाईत असल्यास ‘त्याने औषध आणि विश्रांती घेतली का ?’, याकडे त्या स्वतः लक्ष देतात. ‘रुग्णाईत साधकाने आणखी काय काळजी घ्यायला हवी ?’, याविषयी पू. ताई स्वतःहून वैद्यांना विचारून घेतात आणि त्याप्रमाणे त्या साधकांच्या सेवेचे नियोजन करतात.

३ इ. स्वतःच्या प्रकृतीपेक्षा गुरुकार्याला प्राधान्य देणे

त्यांना मानदुखी आणि कंबरदुखी यांचा तीव्र त्रास असूनही त्या सतत सेवारत असतात. एकदा त्यांना मुंबई येथील एका वैद्यांकडे उपचार करून घेण्यासाठी जायचे होते. त्यात त्यांचा पुष्कळ वेळ जाणार होता. तेव्हा पू. ताईंनी तातडीच्या सेवेला प्राधान्य दिले आणि ‘काही कालावधीनंतर उपचार घेते’, असे त्यांना कळवले.

३ ई. साधकांना सेवेच्या माध्यमातून घडवणे

३ ई १. तत्त्वनिष्ठता

पू. ताई साधकांना मानसिक स्तरावर सांभाळत नाहीत. साधकांकडून ‘गुरुकार्यात कोणतीही चूक होऊ नये’, असा त्यांचा विचार असतो. सेवा करतांना आमच्याकडून झालेल्या चुका त्या आम्हाला लगेच सांगतात आणि साधकांचे लक्षात आलेले स्वभावदोषही सांगतात. त्या साधकांकडून परिपूर्ण सेवा होण्यासाठी स्वतः लक्ष घालतात. त्या ‘सहसाधकांकडून आश्रमातील कार्यपद्धतींचे पालन होत आहे ना ?’, याकडेही लक्ष देतात.

३ ई २. साधकांमध्ये संघभावना निर्माण करणे

पूर्वी आमच्या सेवेशी संबंधित साधकांमध्ये संघभाव अल्प होता. प्रत्येक जण स्वतःची सेवा करत असे. पू. ताईंनी आम्हाला एकत्रित सेवा करण्यास शिकवले, उदा. स्वच्छता करणे, सर्वांनी एकत्रित स्वयंपाकघरात सेवा करणे. त्यामुळे आमच्याकडून सेवा अल्प वेळेत आणि परिपूर्ण व्हायला साहाय्य झाले अन् सहसाधकांचे गुण आणि स्वभावदोष आमच्या लक्षात आले. अशा प्रकारे एकमेकांना सेवेत साहाय्य करत असतांना आमच्यात संघभावना निर्माण झाली.

३ ई ३. सेवा परिपूर्ण करणे

‘प्रत्येक सेवा केल्यावर अन्य साधकांकडून ती पडताळून घेतली, तर त्यामध्ये चुका रहात नाहीत आणि सेवा परिपूर्ण होते’, अशी पू. ताईंनी कार्यपद्धत घालून दिली आहे. त्यामुळे आमच्या मनावर सेवा परिपूर्ण करण्याचा संस्कार झाला.

३ ई ४. सर्व साधकांना सर्व सेवा शिकवणे आणि त्यांच्याकडून त्या करवून घेणे

पू. ताई लहान लहान सेवांचे दायित्व प्रत्येक साधकाला देऊन त्याच्याकडून सेवा करवून घेतात. त्या सेवा करतांना ‘त्या सेवेतून देवाला आपल्याला काय शिकवायचे आहे ? आपल्यात कोणते गुण वाढवायचे आहेत ? कसे प्रयत्न करायला हवेत ?’, याविषयी सांगतात. त्यामुळे सेवा करतांना साधकाला कोणताही ताण येत नाही. ‘प्रत्येक साधकाला सहसाधक करत असलेल्या सेवांविषयी सर्व माहिती असायला हवी’, असा पू. ताईंचा विचार असतो. पू. ताई साधकांना सर्व सेवा शिकवतात आणि त्यांच्याकडून करवून घेतात. त्या साधकांना सर्व दृष्टींनी घडवतात.

३ उ. मायेची ओढ नसणे

पू. ताई वर्षातून एकदा आणि तेही थोड्या कालावधीसाठी घरी जातात. त्या घरी गेल्यावरही त्यांची सेवा चालू असते. त्या आश्रमात असतांना प्रत्येक सप्ताहात घरातील व्यक्तींना भ्रमणभाष करतात. घरातील व्यक्ती रुग्णाईत असल्यास पू. ताई त्यांना नामजपादी उपाय कळवतात.

३ ऊ. गुरुकार्याचा ध्यास

१. पू. ताईंना काही सेवांसाठी अकस्मात् अन्य आश्रमांत जावे लागते. त्यांना निरोप मिळाल्यापासून कधी २ घंट्यांत निघायचे असते. एवढ्या अल्प कालावधीत प्रवासाची सिद्धता करतांना त्यांची कधीही चिडचिड होत नाही.

२. पू. ताई स्वतःच्या सेवांसह ग्रंथ आणि नियतकालिके यांच्याशी संबंधित सेवाही पुढाकार घेऊन पहातात. त्यांना ‘सर्व सेवा माझ्याच आहेत’, असे वाटते.

३. आमच्या सेवेशी संबंधित सेवा करणाऱ्या साधकांची संख्या अल्प आहे आणि सेवांची व्याप्ती पुष्कळ आहे. एकदा काही साधक त्यांच्या वैयक्तिक कामासाठी घरी गेले होते. त्या कालावधीत पू. ताईंनी त्या साधकांच्या सेवा स्वतः केल्या. तेव्हा ‘पू. ताईंच्या तळमळीमुळे देव त्यांची क्षमता वाढवतो आणि त्यांच्याकडून सेवा करवून घेतो’, हे आम्हाला अनुभवता आले.

४. पू. ताई त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक सेवेचा आढावा त्यांच्या उत्तरदायी साधकांना नियमितपणे देतात. ‘उत्तरदायी साधकांना सेवेचा आढावा दिल्यामुळे आपल्याला दिलेली सेवा परिपूर्ण होते’, असा त्यांचा भाव आहे.

३ ए. पू. रत्नमालाताईंनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन

अ. देवाने आपल्याला विश्वासाने सेवा दिली आहे, तर आपण तो विश्वास संपादन करायला हवा.

आ. सेवा करतांना आपण सतत ‘मला या सेवेतून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आनंद द्यायचा आहे’, असा विचार करायला हवा.

इ. समष्टी सेवा करतांना आपण सहसाधकांना सतत समजून घ्यायला हवे.

ई. सेवा करतांना आपल्याकडून ‘गुरूंच्या कार्यात अडथळा येईल’, अशी कृती होऊ नये.

उ. समष्टी सेवेत एखादी अडचण लक्षात आल्यास तिच्यावर लगेच उपाययोजना काढून गुरुकार्य पुढे न्यायला हवे.

ऊ. गुरूंनी दिलेल्या प्रत्येक गोष्टीविषयी आपल्याला कृतज्ञता वाटायला हवी आणि ‘देव किती प्रेम करतो !’, ते आपण अनुभवायला हवे.

ए. सेवा करतांना आपण सेवेशी एकरूप व्हायला हवे, तरच ती सेवा गुरुचरणांशी रूजू होते.’

 

४. सेवेशी संबंधित असलेले सर्व साधक

४ अ. सर्वांच्या ‘माई’ असणाऱ्या पू. रत्नमालाताई !

‘पू. रत्नमालाताईंना घरी सर्व जण ‘माई’ असे संबोधतात. त्या आम्हा सर्व साधकांचा आधार आहेत. त्या सर्व साधकांशी समभावाने वागतात. त्यामुळे ‘त्यांच्यासाठी ‘माई’ हा शब्द योग्य आहे’, असे आम्हा सर्वांना वाटते.’

‘परात्पर गुरु डॉक्टर, आम्हाला पू. ताईंच्या सत्संगाचा आपल्याला अपेक्षित असा लाभ करून घेता येऊ दे. त्यांच्यासारखी तळमळ आमच्यात निर्माण होऊ दे आणि आमच्याकडून प्रयत्न होऊ देत’, अशी आपल्या चरणी  प्रार्थना आहे.’

 

‘पू. रत्नमालाताईने स्वतःच्या नावाचे सार्थक केले !’ – (पू.) श्रीमती निर्मला दातेआजी

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी

‘पू. (सुश्री (कु.)) रत्नमालाताई संत झाल्याचे समजल्यावर ‘त्यांच्या आई-वडिलांनी ताईचे ठेवलेले ‘रत्नमाला’ हे नाव ताईने सार्थकी लावले’, असे मला वाटले. त्या संत झाल्याचा आम्हाला इतका आनंद झाला, तर त्यांच्या आईला किती आनंद झाला असेल ! खरोखरच सनातनला आज एक ‘रत्न’ मिळाले.’

– (पू.) श्रीमती निर्मला दातेआजी

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Leave a Comment