साधकांचा आनंद द्विगुणित करणारा पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांचा अनुपम संतसन्मान सोहळा !

पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार

देहली – गुरुवार ! श्रीगुरूंचा वार ! २३ डिसेंबर २०२१ या दिवशी सनातनच्या ग्रंथांसंदर्भातील ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’विषयी श्रीगुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलेल्या देहली आणि हरियाणा येथील साधकांवर श्रीगुरूंनी गुरुकृपेची उधळण केली. साधकांना देहली येथील पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला संजीव कुमार या दोन संतरत्नांची अनमोल भेट देऊन श्रीगुरूंनी साधकांचा आनंद द्विगुणित केला. हा अनुपम सोहळा अनुभवल्यानंतर प्रत्येकाच्या मनात हाच भाव होता, ‘अमोल चीज जो दी गुरुने, न दे सके भगवान भी !’

पू. संजीव कुमार हे देहली येथील यशस्वी उद्योजक आहेत. ते वर्ष १९९९ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करत आहेत. त्यांच्या संतसन्मान सोहळ्याचा विस्तृत वृत्तांत येथे प्रसिद्ध करत आहोत.

१. सूक्ष्मातील प्रयोगाद्वारे उलगडले कुमार दांपत्याचे संतत्व !

सोहळ्याच्या प्रारंभी गत सप्ताहात रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिलेले साधक श्री. संजीव कुमार आणि त्यांची पत्नी सौ. माला संजीव कुमार यांनी सनातन आश्रमात त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती सर्वांना सांगितल्या. ते अनुभूती सांगत असतांना ‘सर्व जण रामनाथीरूपी वैकुंठातच (रामनाथी गोवा येथील सनातन आश्रमात) आहोत’, असे भावविश्व सर्व साधकांना अनुभवता आले. तेव्हा सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी साधकांना ‘श्री. संजीव कुमार आणि सौ. माला कुमार यांच्याकडे पाहून काय वाटते ?’, यासंदर्भात प्रयोग करण्यास सांगितले. या वेळी ‘श्री. संजीव कुमार यांच्या जागी त्यांचे अस्तित्व न जाणवता केवळ प्रकाशच दिसणे’, ‘त्यांच्याकडे पाहून भावजागृती होणे’, ‘त्यांच्या ठिकाणी प.पू. भक्तराज महाराज यांचे दर्शन होणे’, अशा अनुभूती साधकांना आल्या. सौ. माला कुमार यांच्याकडे पाहून अनेक साधकांना श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन झाले, तर काही साधकांना कमलपुष्प दिसले. याव्यतिरिक्त दोघांकडे पाहून साधकांचा नामजप चालू झाला. साधकांच्या या अनुभूतींचे गमक सद्गुरु डॉ. पिंगळेकाका यांनी उलगडले. श्री. संजीव कुमार हे ‘समष्टी संत’ म्हणून सनातनच्या ११५ व्या संतपदी, तर त्यांची पत्नी सौ. माला कुमार या ‘समष्टी संत’ म्हणून सनातनच्या ११६ व्या संतपदी विराजमान झाल्याची घोषणा सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी या सोहळ्यात केली. हे ऐकताच अनेक साधकांची भावजागृती झाली. या वेळी साधकांना ईश्वरी चैतन्य, आनंद आणि प्रीती यांची अक्षरशः उधळण होत असल्याची अनुभूती आली.

२. त्यागी वृत्ती आणि सतत कृतज्ञताभावात असलेले देहलीतील श्री. संजीव कुमार सनातनच्या ११५ व्या
अन् सेवाभावी वृत्ती आणि सतत आनंदावस्थेत असलेल्या सौ. माला कुमार ११६ व्या संतपदावर विराजमान !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘देहली येथील साधक-दांपत्य श्री. संजीव कुमार (वय ७० वर्षे) आणि सौ. माला संजीव कुमार (वय ६७ वर्षे) वर्ष १९९९ पासून साधना करत आहे. श्री. संजीव कुमार हे प्रतिष्ठित आणि यशस्वी उद्योजक आहेत.

अध्यात्मात सगळ्यात महत्त्वाचा असतो, तो त्याग ! श्री. संजीव कुमार यांना साधना कळल्यावर त्यांनी त्यागाचे महत्त्व जाणले आणि धनाचा त्याग करण्याची प्रत्येक संधी शोधली. साधक, प्रसारकार्य, तसेच सेवाकेंद्र यांसाठी निरपेक्ष वृत्तीने केलेल्या धनाच्या त्यागातून त्यांनी शीघ्रतेने आध्यात्मिक प्रगती करून घेतली.

श्री. संजीव कुमार आणि सौ. माला कुमार या उभयतांच्या मनात साधकांप्रती अत्यंत प्रीती आहे. सर्व साधक-परिवार त्यांना आपलाच वाटतो. ते दोघे साधकांचे आदरातिथ्य इतक्या प्रेमाने करतात की, सेवेसाठी घरदार सोडून आलेल्या साधकांना ते आपले माता-पिताच वाटतात. धर्म आणि अध्यात्मप्रसार कार्य करणार्‍या देहलीतील साधकांसाठी ते मोठा आधारस्तंभ आहेत.

सौ. माला कुमार यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यातील सेवाभावी वृत्ती ! त्या प्रत्येक सेवा अत्यंत कलात्मक आणि सात्त्विक पद्धतीने करतात. तळमळीने, उत्साहाने आणि भावपूर्ण सेवा करणार्‍या सौ. माला कुमार सतत आनंदावस्थेत असतात.

मागील पावणेदोन वर्षांपासून ‘कोरोना’च्या संसर्गामुळे सर्वत्र भयप्रद वातावरण निर्माण झाले आहे. देहलीतही सर्वत्र ‘कोरोना’ने हाहाःकार माजवला. अशा स्थितीत ईश्वरावरील अतूट श्रद्धेच्या बळावर श्री. संजीव कुमार आणि सौ. माला कुमार यांनी या प्रतिकूल परिस्थितीचा साधनेसाठी, तसेच भाववृद्धीसाठी लाभ करून घेतला. भावावस्थेत राहिल्यामुळे अशा आपत्कालीन स्थितीत त्यांना ‘भाव तेथे देव’ या उक्तीची पदोपदी अनुभूती घेता आली आणि या काळात त्या दोघांची आध्यात्मिक उन्नती झपाट्याने झाली.

या दांपत्याने एकत्रितपणे साधनेला आरंभ केला. वर्ष २०१७ मध्ये एकाच दिवशी या दोघांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आणि आजच्या शुभदिनी या दोघांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून एकाच दिवशी संतपदही प्राप्त केले आहे.

सतत भावावस्थेत रहाणारे श्री. संजीव कुमार ‘समष्टी संत’ म्हणून सनातनच्या ११५ व्या आणि सतत आनंदावस्थेत रहाणार्‍या सौ. माला संजीव कुमार ‘समष्टी संत’ म्हणून सनातनच्या ११६ व्या संतपदावर विराजमान झाल्या आहेत. त्यांचा संपूर्ण परिवारही साधना करत असून त्यांची नात कु. मिराया (मुलाची मुलगी, वय १० वर्षे) महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालिका आहे. त्यांच्या दोन कन्या सौ. आनंदिता आणि अनन्या यांनाही साधनेची आवड आहे.

‘प्रांजळपणा, शिकण्याची वृत्ती आणि निरपेक्ष प्रीती असलेले अन् सतत कृतज्ञताभावात रहाणारे पू. संजीव कुमार अन् पू. (सौ.) माला कुमार यांची पुढील प्रगती अशीच शीघ्र गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२३.१२.२०२१)

३. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी संतपदी
विराजमान झालेल्या कुमार दांपत्याविषयी काढलेले गौरवोद्गार

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

३ अ. साधकांवर निरपेक्ष प्रीती करणे, अखंड कृतज्ञताभावात रहाणे आणि
जीवनाचे अध्यात्मीकरण करणे, हे पू. संजीव कुमार यांच्या जलद आध्यात्मिक उन्नतीचे गमक !

पू. संजीवभैय्या आणि पू. (सौ.) मालादीदी यांचे वैशिष्ट्य आहे की, त्यांनी घराला आश्रम बनवले. त्यासह ‘आश्रमातील साधकांना काही अडचण नाही ना ? त्यांना कसे साहाय्य करता येईल ?’, असा त्यांचा विचार असतो. अनेक वेळा परिचितांपेक्षा ते साधकांना प्राधान्य देतांना दिसतात. यांतून त्यांची साधकांप्रती असलेली प्रीती लक्षात येते. त्यांनी व्यवसायासह स्वतःच्या जीवनाचेही अध्यात्मीकरण केले आहे. मध्यंतरी त्यांची व्यवसायात प्रचंड हानी झाली. ‘अशा बिकट परिस्थितीतून गुरूंच्या कृपेने मी पुन्हा पूर्वपदावर येऊ शकलो. त्यामुळे आता मी जो काही आहे, तो गुरुदेवांच्या कृपेने आहे’, असा त्यांचा भाव असतो. ते अत्यंत कृतज्ञताभावात असतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या जेव्हा दैवी प्रवासासाठी देहली येथे येतात, त्या वेळी त्यांच्यात गुरुदेवांचे रूप पाहून ते पूर्ण समर्पित होऊन त्यांची सेवा करतात. अध्यात्मप्रसारासाठी त्यांच्या घरी येणारे संत आणि साधक यांचे स्वागत त्यांनी कोणताही संकोच न करता केले. संत आणि साधक आल्यावर ‘आपण रामनाथी आश्रमातच आहोत’, असा त्यांचा भाव असतो.

३ आ. वात्सल्यभाव, निर्मळता आणि गुरुसेवेची तळमळ असलेल्या पू. (सौ.) माला कुमार यांच्याकडून शिकायला मिळते !

वात्सल्यभाव, निर्मळता, गुरुसेवेची तळमळ आदी गुण असलेल्या पू. (सौ.) माला कुमार यांच्याकडून प्रामुख्याने शिकायला मिळाले. अनेकदा त्यांचे शारीरिक स्वास्थ्य ठीक नसते; पण त्यांच्याकडे सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादने घेण्यासाठी कुणी आले, तर सर्व त्रास विसरून त्या सेवा करण्यास प्राधान्य देतात. त्यांचा निवास इमारतीत तिसर्‍या मजल्यावर आहे. त्यामुळे जिज्ञासूंना सात्त्विक उत्पादनांची देवाण-घेवाण करण्यासाठी अडचण येऊ नये; म्हणून त्यांनी खोलीच्या आगाशीत एक ‘पुली’ही (दोरीला बांधलेल्या पिशवीतून खालच्या मजल्यावर साहित्य पाठवण्याची व्यवस्था) बनवून घेतली आहे. त्यामुळे साहित्य वरून खाली पाठवणे आणि जिज्ञासूंकडून त्याचे पैसे घेणे सोयीचे झाले. अडचणींमध्ये न अडकता त्यावर मार्ग काढण्याची आणि सेवा करण्याची पू. दीदींची तळमळ यातून दिसून येते. त्यांच्यातील अशा अनेक गुणांमुळे आज त्यांच्याकडे पाहून सर्व साधकांना विविध अनुभूती आल्या.

 

४. संतपदी विराजमान झाल्यानंतर कुमार दांपत्याने व्यक्त केलेले हृद्य मनोगत

पू. संजीव कुमार यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

४ अ. सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना केल्यामुळे माझे मन तृप्त झाले ! – पू. संजीव कुमार

मी प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले), श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सद्गुरु डॉ. पिंगळेकाका यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो. जीवनात मला ईश्वरप्राप्तीसाठी साधनाच करायची आहे. मला लहानपणापासूनच अध्यात्माची आवड आहे; पण सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना केल्यामुळे माझे मन तृप्त झाले. (पू. संजीव कुमार यांचा भाव जागृत झाल्यामुळे त्यांना पुढे बोलता आले नाही.)

पू. (सौ.) माला कुमार यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

४ आ.या प्रगतीत आमचे काहीच कर्तेपण नाही ! – पू. (सौ.) माला कुमार

या प्रगतीत आमचे काहीच कर्तेपण नाही. सर्व गुरुदेवांचे आहे. साधकांना आमच्याविषयी ज्या अनुभूती आल्या, ती प.पू. डॉक्टरांची कृपा आहे. सद्गुरु डॉ. पिंगळेकाका देहली येथे अध्यात्मप्रसारासाठी आल्यापासून त्यांनी ‘आम्हा उभयतांची साधनेत प्रगती व्हावी’, यासाठी पुष्कळ परिश्रम घेतले. आमच्यावर ही कृपा केली; म्हणून मी परात्पर गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु डॉ. पिंगळेकाका यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करते.

माझ्या जीवनात पू. (सौ.) माला गुरुरूपातच आहेत ! – पू. संजीव कुमार

पत्नी पू. (सौ.) माला कुमार यांच्याविषयी पू. संजीव कुमार म्हणाले की, माझ्या जीवनात पू. (सौ.) माला या गुरुरूपातच आहेत. माझी आई माझी पहिली गुरु होती. त्यानंतर पू. (सौ.) माला यांनी मला साधनेत पुष्कळ साहाय्य केले. त्यांचा ईश्वराप्रती पुष्कळ कृतज्ञताभाव आहे. त्यातून मला शिकायला मिळाले. मी त्यांच्या प्रतीही कृतज्ञ आहे.

५. पू. संजीव कुमार यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेले मनोगत

अनन्या कुमार

५ अ. ‘भाव कसा असावा ?’, हे पूज्य आई-वडिलांकडून शिकायला मिळते !
– अनन्या कुमार (पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांची ज्येष्ठ कन्या)

माझ्या जीवनात काही कठीण प्रसंग आले; पण बाबा माझा आध्यात्मिक आधार बनून उभे होते. ते क्षणभर ही भावनात्मक झाले नाहीत. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याविषयी त्यांचा इतका भाव आहे की, ‘त्या देहली येथे येणार’, हे कळताच घरातील वातावरण पालटते. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी घरी प्रतिदिन सकाळी अग्निहोत्र चालू केले आहे. आजपर्यंत ते नियमित चालू आहे. त्यांनी त्यात कधीही खंड पडू दिला नाही.

गेल्या सप्ताहात आम्ही सहपरिवार रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेलो होतो. संपूर्ण प्रवासात आम्ही बहिणी-बहिणी आपसांत बोलत होतो. बाबा विमानातील अन्य प्रवाशांना साधना सांगत होते; पण आई जपमाळ घेऊन नामजप करत होती. पूर्ण प्रवासात तिच्याशी कुणी काही बोलले नाही; पण तिला जराही अपेक्षा नव्हती की, माझ्याशी कुणीतरी बोलावे.

अन्य वेळीही आई ‘मी वृंदावनातच आहे’, या भावात असते. ‘तो पक्षी किती सुंदर आहे’, ‘ते फूल किती सुंदर आहे’, ‘ईश्वराने सर्वांना कसे सुंदर बनवले आहे’, असे ती सांगत असते. आईचा स्वभाव मनमोकळा आहे, त्यामुळे सर्वांना आनंद होतो.

५ आ. ‘संतांच्या उदरी माझा जन्म झाला, याविषयी मला कृतज्ञता वाटत आहे’

‘संतांच्या उदरी माझा जन्म झाला, याविषयी मला कृतज्ञता वाटत आहे’, असे पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांची कोलकाता येथीलकनिष्ठ कन्या सौ. आनंदिता दासगुप्ता म्हणाल्या. त्यांनी संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून या सोहळ्याचा लाभ घेतला.

 

६. सोहळ्यात अनुभवलेले वैशिष्ट्यपूर्ण भावक्षण

६ अ. पू. संजीवभैय्या आणि पू. मालादीदी यांची सोहळ्यात भावजागृती होत होती. दोघेही बराच वेळ हात जोडून कृतज्ञताभावात होते. ‘पू. संजीवभैय्या यांचा भाव दाटून त्यांना भावाश्रू आले आणि पू. मालादीदी या डोळे मिटून गुरुदेवांच्या अनुसंधानात आहेत’, असे जाणवत होते.

६ आ. सोहळा झाल्यावर पू. संजीवभैय्या यांनी सद्गुरु डॉ. पिंगळेकाका यांना साष्टांग नमस्कार केला. पू. मालादीदी यांनीही सद्गुरु पिंगळेकाका यांना वाकून नमस्कार केला.

६ इ. सोहळ्याच्या ध्वनीयंत्रणेसाठी आलेले व्यावसायिक तंत्रज्ञ श्री. सूरज यांनी सांगितले, ‘‘आम्ही अनेक कार्यक्रमांना जातो; पण हा सोहळा वेगळाच होता. आम्हाला बाकी काही ठाऊक नाही; पण आमच्याही डोळ्यांत मध्ये मध्ये अश्रू येत होते.’’

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Leave a Comment