सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी (वय ८२ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी (वय ८२ वर्षे) यांचा साधनाप्रवास पाहूया !

जन्मदिनांक – ३१.१२.१९३९
जन्मतिथी – मार्गशीर्ष कृष्ण पक्ष षष्ठी
संतपद प्राप्त – २२.५.२०१९
‘लहानपणापासून विवाहानंतरही काही वर्षे अतिशय खडतर जीवन जगूनही संतपदाला पोचल्याविषयी पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजींचे कौतुक करावे, तेवढे थोडे !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. जन्म आणि बालपण

‘माझा जन्म ३१.१२.१९३९ या दिवशी अकोला जिल्ह्यातील राजंदा या खेडेगावी झाला. माझे वडील एक कर्मठ याज्ञिक ब्राह्मण होते. ते पौरोहित्य करायचे. मी सातवीत असतांनाच माझी आई वारली. त्या वेळी घरात मी सर्वांत मोठी होते आणि माझ्या पाठी तीन लहान भावंडे होती. त्या वेळी ‘वडिलांनी पुनर्विवाह करावा’, यासाठी नातेवाइकांनी त्यांना बराच आग्रह केला; परंतु ‘मुलांचे हाल होऊ नयेत’, यासाठी वडिलांनी पुनर्विवाह केला नाही. भावंडे लहान असल्याने साहजिकच घराचे दायित्व माझ्यावर आले. त्या वेळी मला स्वयंपाकही करता येत नव्हता. वडिलांचे कडक सोवळे असल्याने ते बाहेरचे काही खात नसत. त्या वेळी ओले सोवळे नेसून स्वयंपाक करावा लागायचा. आरंभी तेच घरी स्वयंपाक करायचे. त्यानंतर मला शिकण्याची आवड असूनही शाळा सोडून द्यावी लागली. शेजारच्या एका नातेवाईक स्त्रीकडून मी सोवळ्यात स्वयंपाक करायला शिकले.

१ अ. भावंडांच्या पुढील शिक्षणासाठी राजंदा येथून अकोला
येथे येणे आणि तेथे प्रतिकूल परिस्थितीत दिवस काढावे लागणे

काही वर्षांनंतर गावात पटकीची (कॉलर्‍याची) साथ आली, तसेच माझ्या भावंडांना पुढे शिकायचे होते. त्यामुळे आम्हाला आमचे गाव सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी, म्हणजे अकोला येथे यावे लागले. आरंभी आम्ही जेथे रहायचो, तेथे पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. आम्हाला लांबून विहिरीचे पाणी आणावे लागायचे. तेथे शौचालयाचीही व्यवस्था नव्हती. नंतर आम्ही जेथे घर घेतले, तेथे शौचालय होते; परंतु तेथे घराच्या अवतीभोवती सखल भाग होता. त्यामुळे तेथे पावसाळ्यात पाणी साचायचे. आजूबाजूला बेडूक, किडे-कीटक यांचे आवाज सतत येत असायचे. त्यामुळे आम्हाला भीती वाटायची.

एकदा बराच पाऊस पडल्याने आमच्या घरात पाणी शिरले. त्या वेळी आम्ही एका खाटेवर बसून स्वयंपाक केला. माझ्या एका भावाने हातात स्टोव्ह (रॉकेलवर चालणारी शेगडी) धरला. दुसर्‍याने तो पेटवला आणि मी मटकीला फोडणी दिली. मटकी पाण्यामुळे आधीच भिजली होती. आम्ही तिचीच उसळ करून खाल्ली. हा प्रसंग उदाहरणादाखल येथे मांडला आहे. असे कितीतरी कठीण प्रसंग माझ्या जीवनात आले; परंतु देवाच्या कृपेने आम्ही त्यांतून बाहेर पडलो.

१ आ. वडिलांनी समाजाची भीड न बाळगता मुलीवर चांगले संस्कार करणे

माझे वडील अकोला येथील श्री मुकुंद मंदिरात भागवत वाचायचे, तसेच तेथील दत्तमंदिरात गुरुचरित्राचे वाचन करायचे. वडील मला तेथे सकाळ-सायंकाळ दिवा लावायला सांगायचे. तेव्हा तेथील स्त्रिया वडिलांना सांगायच्या, ‘‘हिला शाळेत पाठवा. हिला नऊवारी साडी नेसायला सांगू नका. इतक्या लहान मुलीला कामे का सांगता ?’’; परंतु वडिलांनी माझ्यावर संस्कार करणे सोडले नाही. त्यांनी त्यातूनच मला घडवले.

 

२. वैवाहिक जीवन

घरच्या दायित्वामुळे माझा विवाह उशिरा झाला. तेव्हाच्या पद्धतीनुसार मी विवाहापूर्वी यजमानांना पाहिलेच नव्हते. केवळ ‘माझ्या सासू-सासर्‍यांचे नाव ‘सीताबाई’ आणि ‘रामचंद्र’ आहे’, हे कळल्यावर मी विवाहाला होकार दिला. श्रीरामाच्या कृपेने माझे वैवाहिक जीवन चांगले गेले. माझे सासरे स्वभावाने तापट असले, तरी त्यांनी माझा सांभाळ प्रेमाने केला. सासूबाईंचा स्वभाव जरी विचित्र असला, तरी यजमान प्रत्येक प्रसंगात साहाय्य करत असल्याने सासूबाईंच्या वागण्याचा मला त्रास झाला नाही.

२ अ. एकत्र कुटुंबपद्धतीमुळे कामांचा पुष्कळ व्याप असणे

सासरी एकत्र कुटुंबपद्धत होती. आम्ही जवळजवळ २५ ते ३० जण एकत्र रहायचो. त्यामुळे कामांचा पुष्कळ व्याप होता. स्वयंपाक, धुणी-भांडी, घराची स्वच्छता, अशी सर्वच कामे करावी लागायची. घर मातीचे असल्याने प्रसंगी भिंती शेणामातीने सारवणे इत्यादी कामेही असायची. नंतर जावा (दीरांच्या पत्नी) आल्याने त्याही मला साहाय्य करायच्या.

२ आ. अपत्ये

त्या काळी बाळंतपणेही घरीच असायची. मला दोन मोठ्या मुली आणि त्यांच्या पाठीवर दोन मुले, अशी चार अपत्ये झाली. देवाच्या कृपेने तेही दिवस आनंदात गेले.

२ इ. यजमानांनी विविध व्यवसाय करणे आणि त्यांचे उत्पन्न जेमतेम असल्याने घरी गरिबी असणे

यजमान प्रारंभी वन विभागात नोकरी करायचे. त्यांच्या आईने सांगितल्याप्रमाणे ते नोकरी सोडून आईची सेवा करायला आले. त्यानंतर काही काळ ते शेती करायचे. त्यानंतर त्यांनी ‘स्टॅम्प व्हेंडर’ (खरेदी-विक्री करण्यासाठी लागणार्‍या स्टॅम्पचे विक्रेते) म्हणून व्यवसाय चालू केला. कालांतराने त्यांनी ‘पिटिशन रायटर’ (दस्तलेखक) म्हणून व्यवसाय चालू केला. त्यांचे उत्पन्न जेमतेम असल्याने घरी गरिबी होती.

२ ई. यजमानांनी अनेक जणांना साहाय्य करणे,
प्रसंगी व्यवसाय बंद ठेवूनही भजनाला जाणे, त्या काळात
अर्थार्जन नसणे आणि त्या स्थितीतही त्यांनी मुलांचे लाड पुरवणे

यजमान प्रत्येकाला साहाय्य करायचे. ते धार्मिक वृत्तीचे असल्याने प्रतिवर्षी पंढरपूरला जाण्यासाठी निघणार्‍या दिंडीला अन्नदान करायचे. त्यानंतर ते स्वतःही बरीच वर्षे वारीला गेले. त्यांना भजन-कीर्तनाची आवड असल्याने ते प्रसंगी व्यवसाय बंद ठेवूनही भजनाला जायचे. त्यामुळे त्या काळात अर्थार्जन नसायचेच. त्याही स्थितीत ते मुलांचे सर्व लाड पुरवायचे.

२ उ. प्रतिकूल परिस्थितीतही सर्व मुलांनी शिक्षण पूर्ण करणे

देवाच्या कृपेने मुले समंजस होती. चटणी-भाकरी खाऊनही ती आनंदात रहात. कालौघात दोन्ही मुलींचे (आताच्या सौ. माया पिसोळकर आणि सौ. छाया देशपांडे यांचे) पदवीपर्यंतचे शिक्षण होऊन त्यांची लग्ने झाली. थोरला मुलगा (श्री. राजेश) बारावीनंतर कर्ज काढून स्वबळावर अभियंता झाला. धाकट्या मुलानेही (अधिवक्ता योगेश जलतारे यांनीही) वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. एकूण आमचे व्यावहारिक जीवन कष्टात गेले असले, तरी समाधानात व्यतीत झाले.

 

३. सनातन संस्थेच्या संपर्कात येण्यापूर्वी केलेली साधना

घरी आधीपासूनच धार्मिक वातावरण असल्याने देवाधर्माचे काहीतरी करण्याचे बाळकडू मला लहानपणीच मिळाले होते. सासरी यजमान सोडून इतर कुणी देवाचे फार करणारे नसले, तरी त्यांनी मला त्यासाठी विरोध केला नाही. त्यामुळे माझी ‘भागवत सप्ताहाला जाणे, नित्यनेमाने मंदिरात दर्शनासाठी जाणे, भजनाला जाणे’, अशी थोडीफार साधना चालूच होती. त्या वेळी कुणीतरी मला आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काही व्रतवैकल्ये करायला सांगितली. तीही मी केली आणि त्यानंतर खरोखरच त्याची प्रचीती येऊन आमची आर्थिक स्थिती काही प्रमाणात सुधारली.

 

४. एका संतांनी गुरुमंत्र म्हणून
कुलदेवीचा नामजप करण्यास सांगणे, सनातन संस्थेच्या संपर्कात येईपर्यंत
तोच नामजप करणे आणि ‘कुलदेवीच्या नामजपाने साधनेला योग्य दिशा मिळाली’, असे वाटणे

आमच्या शेजारी एक महिला रहात होत्या. त्यांनी एकदा मला अकोला जिल्ह्यातील तेल्हारा या गावी प.पू. विष्णुदास महाराज यांच्याकडे नेले. त्यांनी मला गुरुमंत्र म्हणून कुलदेवीचा नामजप करण्यास सांगितले. सनातन संस्थेच्या संपर्कात येईपर्यंत मी तोच नामजप प्रतिदिन १ माळ करायचे. मला वाटते, ‘कुलदेवीच्या नामजपाच्या निमित्ताने माझ्या साधनेला योग्य दिशा मिळाली आणि त्यानंतर सनातन संस्थेचे मार्गदर्शन मिळून त्या साधनेला पूर्णत्व आले.’

 

५. सनातन संस्थेशी संपर्क आणि त्यानंतर केलेल्या विविध सेवा

वर्ष १९९८ मध्ये आमच्या गावात सनातन संस्थेचे सत्संग चालू झाले. मी त्या सत्संगांना जात असे. काही दिवसांनी आमच्या घरी साधकांचे येणे-जाणे चालू झाले. अशा प्रकारे आमचे सर्व कुटुंब सनातनशी कायमचे जोडले गेले. त्यानंतर ‘ग्रंथप्रदर्शन लावणे, ‘साप्ताहिक सनातन प्रभात’चे वितरण, सत्संग घेणे’, अशा सेवा देवाने माझ्याकडून करवून घेतल्या. सत्संग घेण्यासाठी मी शेजारच्या खेड्यांतही जायचे. सेवेसाठी मला माझ्या यजमानांचे पूर्ण सहकार्य असायचे.

 

६. आश्रमजीवन

मोठ्या मुलाचे (श्री. राजेश यांचे) लग्न झाल्यावर काही वर्षांनी, म्हणजे साधारणतः वर्ष २००७ मध्ये मी आणि यजमान दोघेही सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात रहायला गेलो. तेथे आम्ही सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादनांच्या संदर्भातील सेवा केली. मधे मधे मी स्वयंपाकघरातही सेवेसाठी जात असे.

 

७. यजमानांचे निधन

वर्ष २०११ मध्ये देवद आश्रमात सेवेत असतांनाच यजमानांचे वार्धक्यामुळे निधन झाले. देवाच्या कृपेने त्या प्रसंगात मला स्थिर रहाता आले. त्याही परिस्थितीत देवाने माझ्यावर केलेली अखंड कृपा आठवून मला त्याच्याप्रती कृतज्ञता वाटत असे.

 

८. ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठणे

‘माझी लवकरात लवकर आध्यात्मिक प्रगती व्हावी’, अशी तळमळ मला लागली होती. पुढे वर्ष २०१२ मध्ये माझी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले.

 

९. संतपद

पुढे काही काळ आश्रमात आणि काही काळ घरी, अशी माझी साधना चालू राहिली. वर्ष २०१९ मध्ये ‘माझी आध्यात्मिक पातळी ७१ टक्के झाली असून मी संतपदी विराजमान झाले आहे’, असे घोषित करण्यात आले. त्या वेळी मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने जीवन सार्थक झाल्याची अनुभूती आली. सध्या मला समष्टीसाठी नामजप करण्याची सेवा देण्यात आली आहे.

 

१०. आलेल्या विविध अनुभूती

१० अ. लहानपणी घोडागाडीतून जातांना गाडी नाल्यात उलटणे अन् देवाच्या कृपेने त्यातून वाचणे

लहानपणी आम्ही सर्व भावंडे एका नातेवाइकाच्या लग्नासाठी जात होतो. तेव्हा घोडागाडीतूनच प्रवास करावा लागायचा. एकदा घोडागाडीतून प्रवास करत असतांना एका नाल्याच्या ठिकाणी अकस्मात् घोडा उधळल्याने आमची गाडी नाल्यात उलटली. त्या वेळी गाडीचालकाने प्रसंगावधान राखून आम्हाला वाचवले. देवाच्या कृपेने त्या वेळी मला जीवनदान मिळाले.

१० आ. यजमान भजनाला गेल्यावर घरी खाण्यासाठी काही नसतांना एका अज्ञात व्यक्तीने शिधा आणून देणे

भजन असले की, यजमान व्यवसायाकडे दुर्लक्ष करत असत. त्या वेळी त्यांचे घरातही लक्ष नसायचे. एकदा असेच ते भजनाला गेले. त्या दिवशी घरात खाण्यासाठी एक दाणाही नव्हता. मी ‘आपण एक वेळ उपाशी राहू; परंतु मुलांना उपाशी कसे ठेवायचे ?’, या चिंतेत होते. दुपारच्या वेळी अकस्मात् एक अज्ञात व्यक्ती घराचे दार वाजवू लागली. तिच्या हातात किराणा मालाच्या पिशव्या होत्या. ती व्यक्ती मला म्हणाली, ‘‘महाराजांनी हे साहित्य पाठवले आहे.’’ त्या काळी काही लोक यजमानांना ‘महाराज’ म्हणायचे. मी ते साहित्य ठेवून घेतले. रात्री यजमान भजन करून घरी आल्यावर मी त्यांना हा प्रसंग सांगितला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘मी कुणाच्या समवेत कुठलेही साहित्य पाठवले नाही.’’ त्यानंतर ती अज्ञात व्यक्ती आम्हाला कधी दिसली नाही.

१० इ. यजमानांच्या रक्तातील साखर वाढल्याने
त्यांना रुग्णालयात भरती करावे लागणे, त्या वेळी दोन्ही मुले घरी नसणे
आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने यजमानांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण सर्वसामान्य होणे

यजमानांना मधुमेह होता. आम्ही आमच्या अकोट (जिल्हा अकोला) येथील रहात्या घरी दोघेच जण होतो. मोठा मुलगा (श्री. राजेश जलतारे) नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी, तर धाकटा मुलगा (अधिवक्ता योगेश जलतारे) ठाणे येथे सनातन संस्थेच्या सेवाकेंद्रात रहात होता. त्यामुळे आमच्या समवेत कुणीही नव्हते. त्या वेळी यजमानांच्या रक्तातील साखर वाढल्याने त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले. त्या वेळी माझे दीर दूरभाष करून साधना करत असलेल्या माझ्या धाकट्या मुलाला सनातनवरून पुष्कळ बोलले. ‘तू वडिलांकडे दुर्लक्ष करतोस आणि ‘देव, देव’ करत हिंडतोस’, असे ते त्याला बोलले. त्या वेळी मुलाने त्यांना परोपरीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. शेवटी मुलाने ‘देव काळजी घ्यायला समर्थ आहे’, असे सांगून दूरभाष ठेवला. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने दुसर्‍या दिवशी आपसूकच यजमानांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण सर्वसामान्य (नॉर्मल) झाले.

१० ई. कुलदेवीच्या दर्शनासाठी गेल्यावर
माझी आणि यजमानांची चुकामूक होणे, एका गृहस्थांनी यजमानांजवळ
आणून सोडणे आणि ते गृहस्थ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखेच दिसत असल्याचे लक्षात येणे

एकदा मी आणि यजमान माहूर येथे कुलदेवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. तेथे एका डोंगरावर श्री रेणुकादेवीचे (कुलदेवीचे) आणि दुसर्‍या डोंगरावर श्री कालिकादेवीचे स्थान आहे. त्या डोंगरावर तांत्रिक प्रयोग चालत असल्याने सहसा तेथे कोणी जात नाही. दर्शनासाठी जात असतांना माझी आणि यजमानांची चुकामूक झाली अन् मी श्री कालिकादेवीच्या डोंगरावर चढू लागले. त्या वेळी एक वयस्कर गृहस्थ माझ्या जवळ येऊन मला म्हणाले, ‘‘बाई, या डोंगरावर कुठं चालली ? श्री रेणुकादेवीचा डोंगर दुसरा आहे.’’ त्या गृहस्थांना ‘मी श्री रेणुकादेवीच्या दर्शनासाठी आले आहे’, हे कसे कळले ?’, हे मला समजलेच नाही. त्यांनीच मला यजमानांजवळ आणून सोडले. ते गृहस्थ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखेच दिसत होते.

१० उ. यजमान आगगाडीच्या डब्यात चढेपर्यंत आगगाडी चालू होणे,
डब्यात चढत असतांना अकस्मात् त्यांचा तोल जाणे आणि त्या वेळी
सूक्ष्मातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांचा हात धरल्याने त्यांचा प्राण वाचणे

एकदा माझे यजमान आगगाडीने एका गावाहून दुसर्‍या गावाला जाण्यासाठी निघाले. ते आगगाडीच्या डब्यात चढेपर्यंत आगगाडी चालू झाली होती. ते डब्यात चढत असतांना अकस्मात् त्यांचा तोल गेला. त्या वेळी कुणीतरी त्यांचा हात धरला आणि ते पडता पडता वाचले. त्यांनी वर पाहिले, तर ‘त्यांचा हात धरणारे दुसरे-तिसरे कोणी नसून (सूक्ष्मातील) परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत’, असे त्यांना जाणवले. त्यानंतर यजमानांची परात्पर गुरु डॉक्टरांप्रती श्रद्धा निर्माण झाली आणि ते साधनेसाठी देवद आश्रमात रहायला आले.’

– (पू.) श्रीमती कुसुम जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment