म्हापसा (गोवा) येथील प.पू. सुशीला आपटेआजी (वय ८३ वर्षे) यांचा खडतर जीवनप्रवास आणि गुरुकृपेने त्या माध्यमातून त्यांची झालेली कठोर साधना !

१. प.पू. आजींचा विवाह आणि तपस्येसमान असलेले वैवाहिक जीवन

१ अ. अग्निहोत्राची साधना करणार्‍या आणि अक्कलकोट येथील परम
सद्गुरु श्री गजानन महाराज यांचे शिष्य असलेल्या मुलाशी लहान वयात विवाह होणे

‘प.पू. आपटेआजींचा विवाह झाला, त्या वेळी त्यांचे वय साडेतेरा वर्षे एवढेच होते आणि त्यांचे यजमान म्हणजे सोमयागी प.पू. दीक्षित, श्री सखा आपटे (दादा) यांचे वय २५ वर्षे होते. अक्कलकोट येथील परम सद्गुरु श्री गजानन महाराज हे त्यांचे गुरु आहेत. श्री गजानन महाराजांनीच प.पू. दादांना ‘श्रौताग्नी’ची दीक्षा देऊन नित्य अग्निहोत्र करण्यास सांगितले होते. आजही त्यांच्या म्हापसा येथील निवासस्थानी श्रौताग्नीची चैतन्यमय धुनी अखंड प्रज्वलित असते. श्री गजानन महाराजांनीच प्रथम येथील अग्नीची स्थापना केली आहे. श्रीविष्णूचा अवतार असलेल्या भगवान परशुरामांची दीक्षा प.पू. दादांना लाभली होती. ‘परशुरामांच्या मंत्राचा दिव्य नाद आजही या वास्तूमध्ये अखंड ऐकू येत असतो. मी नामजप विसरले, तर परशुरामच मला या नादाच्या माध्यमातून नामजपाची आठवण करून देतात’, असे प.पू. आजी सांगतात.

प.पू. सुशीला आपटेआजी

१ आ. गजानन महाराजांनी सांगितल्याप्रमाणे प.पू. आजींच्या
लग्नासाठी आध्यात्मिक मुलाचे स्थळ येणे आणि प.पू. आजींच्या वडिलांनी त्याला होकार देणे

गजानन महाराजांनी प.पू. दादांच्या वडिलांना सांगितले होते, ‘‘तुझ्या मुलासाठी जेथे मुलगी पहाशील, तेथे त्यांनी जर विचारले की, मुलगा काय करतो ? तर त्या घरातील मुलगी करू नकोस.’’ प.पू. आजींचे वडीलही धार्मिक होते. त्यांच्याकडे प.पू. दादांचे वडील प.पू. आजींना मागणी घालायला आले. तेव्हा प.पू. दादांच्या वडिलांनी सांगितले, ‘‘आमचा मुलगा नोकरी-धंदा असे काहीही करत नाही. केवळ देव, देव करतो.’’ यावर प.पू. आजींचे वडील म्हणाले, ‘‘आम्हाला चालते. मला असाच आध्यात्मिक मुलगा हवा आहे.’’

१ इ. प.पू. आपटेगुरुजींची नित्य साधना चालू असल्याने आणि
आर्थिक स्थिती बिकट असल्याने अनेक मास उपाशी राहून दिवस काढणे

विवाहानंतर प.पू. आजींनी संसार सांभाळायला आरंभ केला. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होती. प.पू. दादांची मात्र साधना चालू होती. देहभान विसरून ते साधना करत असत. ‘नित्यनेमाने अग्निहोत्र करणे, परशुरामाची भक्ती करणे’, असे त्यांचे चालू होते. त्यांना खाण्या-पिण्याचीही शुद्ध नसे. प.पू. आजींनी त्यांच्यासह उपाशी राहून अनेक मास काढले.

१ ई. आर्थिक स्थिती चांगली नसतांनाही कौटुंबिक दायित्वे पार पाडणे

त्यांना एकूण ५ मुले आहेत. जसजसा काळ गेला, तशा बर्‍याच चांगल्या-वाईट कौटुंबिक गोष्टींना प.पू. आजींना सामोरे जावे लागले. त्या वेळी आर्थिक परिस्थिती चांगली नसतांनाही प.पू. दादा आणि प.पू. आजी यांनी त्यांच्या सुनांना विवाहाच्या वेळी सोने-नाणे घातले.

 

२. गुरुकृपा आणि साधना

२ अ. विवाह झाल्यावर गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी गेल्यावर गजानन
महाराजांनी प.पू. आजींना त्यांच्या अंगावरील सर्व दागिने देवाच्या कार्यासाठी दान म्हणून देण्यास सांगणे
आणि प.पू. आजींनी एकही प्रश्न न विचारता अंगावरचे सोन्याचे सर्व दागिने लगेचच गुरूंच्या चरणी अर्पण करणे

एकदा गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी प.पू. दादा आणि प.पू. आजी शिवपुरी, अक्कलकोट येथे गेले होते. त्या वेळी ते थेट गजानन महाराज बसलेले होते, त्या ठिकाणी त्यांच्या दर्शनासाठी गेलो. तो दिवस गुप्तदानाच्या संकल्पाचा दिवस होता. प.पू. दादा आणि प.पू. आजी यांचा विवाह होऊन अधिक दिवस झाले नव्हते. प.पू. आजींच्या अंगावर सोन्याचे कंकण आणि पाटल्या, असे दागिने होते. त्यांनी गजानन महाराजांना नमस्कार केला. तेवढ्यात ते म्हणाले, ‘‘तुझ्या शरिरावरचे सर्व दागिने देवाच्या कार्यासाठी दान म्हणून दे.’’ त्यांनी सांगितल्यावर एकही प्रश्न न विचारता प.पू. आजींनी त्यांच्या अंगावरचे सोन्याचे सर्व दागिने लगेचच गुरूंच्या चरणी अर्पण केले. याचे प.पू. आजींच्या मनाला काहीही वाटले नाही. ‘गुरूंपुढे आपण काय आहोत ? त्यांनी जे सांगितले, ते केवळ ऐकायचे आणि तसे वागायचे. ही सर्व गुरूंचीच लीला असते. ते सर्वज्ञ आहेत. देणारेही तेच आणि घेणारेही तेच !’, असे विचार त्या वेळी प.पू. आजींच्या मनात आले.

२ आ. गजानन महाराजांनी ‘संसार करायचा; पण कशातही
गुंतायचे नाही’, असे सांगून प.पू. आजींना वैराग्याचा आशीर्वाद देणे

तेव्हा गजानन महाराज म्हणाले, ‘‘संसार करायचा, सर्व करायचे; पण कशातही गुंतायचे नाही.’’ एका सौभाग्यवतीला गुरुकृपेने मिळालेला तो वैराग्याचा आशीर्वादच होता. प.पू. आजींनी गुरुचरणांवर ज्याचा त्याग केला, त्याचा उभ्या आयुष्यात पुन्हा कधीच विचारही केला नाही. (‘सर्व नाती-गोती, धनसंपत्ती यांचा मनुष्याला शेवटच्या क्षणी त्याग करावा लागतो, तरीही त्याची आसक्ती मात्र जात नाही. गुरु शिष्याची आसक्ती जिवंतपणीच घालवून त्याला मोहमायेच्या चक्रातून बाहेर काढून वैराग्य प्राप्त करून देतात !’ – संकलक)

२ इ. प.पू. दादांसह राहून प.पू. आजींचीही कठोर साधना होणे आणि प.पू. दादा
अन् प.पू. आजी यांच्या कठोर साधनेची पावती गजानन महाराजांनी पत्ररूपी आशीर्वादातून देणे

प.पू. दादांसह राहून प.पू. आजींचीही कठोर साधना देवाने करवून घेतली. पतीसेवेमध्ये घडलेल्या या कठोर साधनेमुळे प.पू. आजींनी गुरूंना प्रसन्न करून त्यांची कृपा संपादन केली. आजगावला असतांना एकदा परम सद्गुरु गजानन महाराजांचे आशीर्वादाचे पत्र प.पू. दादांना आले. त्यामध्ये महाराजांनी म्हटले होते, ‘तुम्ही नित्य अग्निहोत्र साधना करत आहात’, याचा मला आनंद आहे. परशुरामाच्या चरणी तुमची चांगली साधना चालू आहे. तुम्ही करत असलेल्या या साधनेमुळे माझ्याही कार्याला पुष्टी आणि बळ मिळेल.’

प.पू. दादांच्या आणि प.पू. आजींच्या कठोर साधनेचे अन् अपार कष्टाचे हे फळ या पत्राद्वारे श्री गुरूंनी दिले होते.

२ ई. गुरुकृपेने भगवान परशुरामाचे दर्शन होणे

गजानन महाराजांनी शिवपुरी, अक्कलकोट येथे सोमयाग केला होता. सोमयाग झाल्यानंतर एकदा दिवसभराच्या सेवा आटोपल्यानंतर सर्व जण जेवण करून आणि आवरून बसले होते. गजानन महाराज, त्यांची पत्नी, तसेच सर्व भक्तमंडळी गप्पा-गोष्टी करत बसले होते. तेवढ्यात सडपातळ देहाची आणि तेजस्वी तोंडवळा असलेली एक व्यक्ती तेथे आली आणि म्हणाली, ‘‘शेराचा भात हवा आहे.’’ तेव्हा सर्व जेवण संपले होते. महाराजांनी त्या व्यक्तीसाठी अन्नप्रसाद बनवण्यास सांगितले. जेवण बनवेपर्यंत ती व्यक्ती औदुंबराच्या झाडाखाली बसून होती. प.पू. आजींनी शेरभर म्हणजे दोन किलोचा भात केला आणि पिठले-भाताचे जेवण बनवून तिला दिले. ते सर्व जेवण तिने संपवले. जेवण झाल्यावर औदुंबराच्या झाडाखालीच तिने विश्रांती घेतली. तोपर्यंत गजानन महाराजांना ‘समोर असलेली व्यक्ती कुणी साधारण मनुष्य नसून प्रत्यक्ष भगवान परशुरामच आहेत’, असे अंतर्ज्ञानाने लक्षात आले होते.

पहाटे काकड आरतीच्या वेळी पाहिले, तर तेथे कुणीच नव्हते आणि सर्वत्र कड्या-कुलूपे लावलेली होती. ‘ती व्यक्ती कुठे आणि कशी गुप्त झाली ?’, हे कुणालाच कळलेच नाही. नंतर महाराजांनी सांगितले, ‘‘ते भगवान परशुराम होते.’’

२ उ. गुरुसेवेतील एका चुकीसाठी गेल्या ३५ वर्षांपासून प्रायश्चित्त घेत असलेल्या प.पू. आजी !

गजानन महाराज ‘अळणी सोमवार’चे (म्हणजे मीठ न घातलेले अन्न ग्रहण करणे) व्रत करत असत. व्रताच्या दिवशी ते एकदाच अन्न ग्रहण करत. त्यांना गोव्याची आमसुलाची कढी पुष्कळ आवडत असे. एकदा प.पू. आजींनी त्यांच्यासाठी मीठ नसलेला स्वयंपाक केला. आमसुलाच्या कढीमध्येही त्यांनी मीठ घातले नाही; परंतु ‘आमसुलाला आतून मीठ लागलेले असते’, हे त्या विसरल्या. महाराज जेवायला बसले आणि ते प्रथम आमसुलाची कढीच प्यायले. एक घोट घेताच ते थांबले आणि त्यांनी प.पू. आजींना मिठाविषयी सांगितले. प.पू. आजींनी त्यांना प्रार्थना केली, ‘‘आपण दुसरे अन्न तरी कृपा करून ग्रहण करावे’’; पण ते तसेच उपाशी उठले.

प.पू. आजींच्या मनाला हे पुष्कळ लागले. ‘आपल्या चुकीमुळे आज गुरूंना उपाशी रहावे लागले आहे’, याची खंत त्यांना लागून राहिली. प.पू. आजी त्या दिवशी पुष्कळ रडल्या. तेव्हापासून ‘या चुकीची जाणीव सतत माझ्या मनाला रहावी’, प्रायश्चित्त म्हणून गेल्या ३५ वर्षांपासून प.पू. आजी ‘अळणी सोमवार’ हे व्रत करतात. त्यांनी त्यांच्या जेवणात मिठाचा त्याग केला आहे. (‘साधकांना ‘प्रायश्चित्त घ्या’, असे सांगणारे उत्तरदायी साधक किंवा संत तरी असतात; परंतु त्या वेळी ‘प्रायश्चित्त घ्या’, असे प.पू. आजींना सांगणारेही कुणी नव्हते, तरीही त्यांनी ते घेतले आणि आजतागायत त्या ते पाळतही आहेत. केवढी ही आंतरिक तळमळ ! ‘प्रत्येक चुकीसाठी असे प्रायश्चित्त घेण्याची आंतरिक तळमळ आपल्यात आहे का ?’, याचा प्रत्येक साधकानेच अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. ‘प्रायश्चित्त हे केवळ वरवर देहाला जाणीव करून देणारे नको, तर त्यातून साधना व्हायला हवी’, हे प.पू. आजींकडून शिकायला मिळते.’ – संकलक)

 

३. प.पू. सुशीला आपटेआजी यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

३ अ. ‘सनातन प्रभात’चे नियमित वाचन करणे

या वयातही प.पू. आजी दैनिक ‘सनातन प्रभात’चे नियमित वाचन करतात.

३ आ. समाजात घडणार्‍या राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या घडामोडींच्या संदर्भात जागरूक असणे

कोणतीही अयोग्य घटना घडली की, त्याविषयीच्या परखड बोलण्यातून त्यांची अन्यायाच्या विरोधात प्रतिकार करण्याची वृत्ती दिसून येते. भगवान परशुरामांचे क्षात्रतेज आजही प.पू. आजींच्या माध्यमातून दिसून येते.

३ इ. ‘मुख्यमंत्री, आधुनिक वैद्य आदींनी दळणवळण बंदीच्या काळात जे काम केले,
त्याबद्दल त्यांचे अभिनंदन !’, हे वृत्तपत्रातील वृत्त वाचून प.पू. आजींनी व्यक्त केलेले विचार

प.पू. आजी म्हणाल्या, ‘‘मी म्हणते, ही भूमी कुणाची आहे ? परशुरामांची ना ? गोव्याच्या भूमीला भगवान परशुरामांचे रक्षण कवच आहे, मग त्यांचे अभिनंदन का करत नाहीत ? लोकांना मुख्यमंत्री, आधुनिक वैद्य आणि पोलीस दिसतात; पण त्यांच्यामागे कार्य करणारी देवाची शक्ती दिसत नाही का ? या सर्वांनी नक्कीच प्रयत्न केले आहेत; पण या प्रयत्नांना शक्ती देणार्‍या देवाला विसरून कसे चालेल ? तुम्हाला लोकांनी जरी निवडून दिले असले, तरी देवाची भूमी सांभाळण्याचे भाग्य ईश्वराच्या कृपेनेच तुम्हाला मिळालेले आहे. त्यामुळे त्या देवाला कधीच विसरू नका. सर्वांत प्रथम देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करा.’’

३ ई. ‘प.पू. आजी हसतमुख आणि आनंदी असतात.’ – श्रीमती कुंदा सामंत, म्हापसा, गोवा.

३ उ. ‘प.पू. आजींचे रहाणीमान पुष्कळ साधे आहे. त्या कुणाकडून
कसलीच अपेक्षा ठेवत नाहीत.’ – सौ. शर्वाणी आगरवाडेकर, शिवोली, म्हापसा, गोवा.

(‘संतांचा हा संदेश केवळ गोव्यापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण देशाला लागू होतो. देवाचे कृपाछत्र आणि संतभूमी असलेल्या भारताचे प्रतिनिधित्व करणार्‍यांनी लक्षात घ्यावे, ‘आज सार्‍या विश्वात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झाला आहे आणि प्रगत विज्ञानाचे कौतुक करणार्‍यांना अजूनही या विषाणूंपासून बचावाची लस मिळाली नाही. आज अवाढव्य लोकसंख्या असणार्‍या भारतात या विषाणूंचे संक्रमण इतर देशांच्या तुलनेत अतिशय अल्प आहे. माणसाने जे प्रयत्न केले आहेत, त्यांमागील संत आणि देवता यांच्या कृपेला डावलून चालणार नाही. अशा महाभयंकर संकटाच्या वेळी केवळ ईश्वरच मनुष्याचे रक्षण करू शकतो आणि ‘त्याला संपूर्ण शरण जाऊन कृतज्ञ रहाणे’, हे आपले कर्तव्य आहे !’ – संकलक)

संग्राहक : श्री. दिवाकर आगावणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.४.२०२०)

Leave a Comment