सनातन संस्थेचे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचा साधनाप्रवास !

सद्गुरु राजेंद्र शिंदे

सनातन संस्थेचे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या विहंगम साधनाप्रवासाचा प्रारंभ आणि परात्पर गुरु डॉक्टरांकडून त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे पाहूया.

१. जन्मदिनांक : भाद्रपद शुक्ल पक्ष पष्ठी (५.९.१९६२)

२. संत आणि सद्गुरुपदी विराजमान : २८.१०.२०१० या दिवशी संत झाले आणि १९.७.२०१६ या दिवशी सद्गुरु झाले.

 

१. प्रसारातील चुकांतून मिळालेली शिकवण

१ अ. ‘समष्टीमध्ये होत असलेली चूक तत्परतेने दुरुस्त
न केल्यास समष्टीची हानी झाल्यामुळे स्वतःच्या साधनेचीही हानी होऊ शकते !

१ अ १. धर्मजागृती सभेच्या नियोजनासाठी गेल्यावर उत्तरदायी साधकांनी सेवेत सहभागी होऊ न देणे आणि या प्रसंगी चुकीचा दृष्टीकोन असल्याने जमेल तशी सेवा करणे

कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील साधकांना अल्प अनुभव असल्यामुळे मला हिंदु धर्मजागृती सभेच्या नियोजनासाठी तेथे जाण्यासाठी संधी मिळाली होती; मात्र तेथील उत्तरदायी साधकांनी सभेतील सेवेत मला फारसे सहभागी करून घेतले नाही. मला ते अधिक काही सांगत नसत आणि विचारतही नसत. त्यामुळे मी बराच वेळ निवासाच्या ठिकाणी थांबायचो. मी ‘सभागृहात येऊन एखादी सेवा करू का ? कुणाची रंगीत तालीम घेऊ का ?’, असे विचारत असे; मात्र तेथील साधक मला एखादी छोटीशी सेवा देऊन त्यात गुंतवून ठेवत. साधारण अशाच प्रकारच्या काही चुका बेंगळुरू येथील सभेच्या वेळीही माझ्या लक्षात आल्या होत्या; पण त्या वेळी माझा दृष्टीकोन ‘देव ज्या स्थितीत ठेवेल, तसे राहिले पाहिजे’, असा चुकीचा होता. त्यामुळे मी ही गोष्ट गांभीर्याने न घेता जेवढे जमेल, तेवढे करत राहिलो.

१ अ २. ‘उत्तरदायी साधकांनी वरील दृष्टीकोन समष्टी साधनेच्या दृष्टीने अयोग्य आहे’, याची जाणीव करून देणे

नंतर ही चूक उत्तरदायी साधकांना समजली. त्यांनी मला निरोप पाठवला, ‘‘तुमचा हा दृष्टीकोन व्यष्टी साधनेच्या दृष्टीने योग्य आहे; मात्र समष्टी साधनेच्या दृष्टीने अयोग्य आहे. समष्टीमध्ये काही चुकीचे घडत असेल, तर ते दुरुस्त होण्यासाठी आपल्याकडून लगेच प्रयत्न व्हायला हवेत. तसे केले नाही आणि समष्टीची हानी झाली, तर आपल्या साधनेचीही हानी होऊ शकते.’’ तेव्हा मला व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या दृष्टीकोनातील भेद लक्षात आला.

१ अ ३. कोणत्याही चुकीकडे दुर्लक्ष करू नये !

कर्नाटकातील उत्तरदायी साधकांनी केलेली चूक गंभीर होती. त्या चुकीमुळे त्या साधकांची आध्यात्मिक पातळी ४ – ५ टक्क्यांनी खाली घसरली. माझ्याकडून या गंभीर चुकीकडे दुर्लक्ष केले गेले. त्या वेळी ‘कोणत्याही चुकीकडे दुर्लक्ष करू नये’, हे मला शिकायला मिळाले.

 

२. परात्पर गुरु डॉक्टरांकडून शिकायला मिळालेली सूत्रे

२ अ. चुकीविषयी गांभीर्य निर्माण होईपर्यंत परात्पर गुरु डॉक्टरांनी
त्याविषयी सांगणे आणि चुकीचे चिंतन होऊन प्रायश्‍चित घेतल्यावर त्यांनी पुन्हा त्याविषयी न विचारणे

पूर्वी एकदा मिरज येथे साधकांसाठी एक शिबिर असतांना त्यात एका साधकाचे नाव घ्यायचे राहिले. त्या साधकाकडे प्रसारसेवा होती. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निरोप पाठवून ही चूक आमच्या लक्षात आणून दिली होती. नंतर ते निरोप पाठवून कळवायचे, ‘‘त्या साधकाचे नाव शिबिरासाठी घेतले नाही’, ही आपल्याकडून पुष्कळ मोठी चूक झाली ना !’’ असे प्रसंग ४ – ५ वेळा झाल्यावर ‘प्रत्येक वेळी ते चूक सांगतील’, याची मला भीती वाटू लागली. नंतर चिंतन केल्यावर असे लक्षात आले, ‘एवढी मोठी चूक झाल्यावरही मला त्याची खंत वाटली नव्हती. माझ्याकडून क्षमायाचना केली गेली नव्हती किंवा मी प्रायश्‍चितही घेतले नव्हते. नंतर मी पुष्कळ वेळा गुरुदेवांची मानस क्षमायाचना केली आणि प्रायश्‍चित घेतले. त्यानंतर गुरुदेवांंनी मला त्या चुकीविषयी पुन्हा कधीच विचारले नाही. अन्य प्रसंगांतूनही असेच लक्षात आले. एखादी गंभीर चूक झाली आणि त्या चुकीविषयीचे गांभीर्य माझ्यात नसले, तर गुरुदेव मला त्या चुकांविषयी पुनःपुन्हा सांगत. यावरून ‘देवाला चुका केलेले आवडत नाही आणि ‘चूक झाल्यावर क्षमायाचना करून प्रायश्‍चित घेतले’, तर देव आपल्याला लगेच क्षमा करतो’, हे माझ्या लक्षात आले.

२ आ. साधकांचे चुकांप्रती गांभीर्य वाढण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी घडवलेली प्रक्रिया !

२ आ १. ‘पुनःपुन्हा चुका करणार्‍या साधकाचे पाप वाढू नये’, यासाठी गुरुदेवांनी त्याला प्रायश्‍चित्त घ्यायला किंवा व्यष्टी साधना करायला सांगणे

साधक जेव्हा पुनःपुन्हा चुका करायचे, तेव्हा गुरुदेव सांगायचे, ‘‘त्या साधकाला प्रायश्‍चित्त घ्यायला सांगा, तरीही तो सुधारत नसेल, तर त्याला व्यष्टी साधना करायला सांगा.’’ यामागे ‘त्या साधकाने सुधारावे, त्याचे चुकांविषयीचे गांभीर्य वाढावे आणि त्याच्याकडून पुनःपुन्हा चुका होऊन त्याचे पाप वाढू नये’, असा गुरुदेवांचा उदात्त हेतू असायचा. काही वेळा मी भावनेच्या स्तरावर राहिल्याने माझ्या मनात ‘साधकांना पुढच्या पुढच्या टप्प्याचे  प्रायश्‍चित्त घ्यायला कसे सांगायचे त्यांना व्यष्टी साधनेसाठी कसेे सांगायचे ?’, असे विचार यायचे आणि नेमके त्याच वेळी गुरुदेव उत्तरदायी साधकांच्या माध्यमातून माझ्या मनाची सिद्धता करून घ्यायचे.

२ आ २. गंभीर चुका करूनही साधकांना त्याचे गांभीर्य अल्प असल्याने स्वभावदोष निर्मूलन सत्संग घ्यायला संधी मिळणे

माझा कर्नाटक राज्याचा प्रसार चालू होता. तेव्हा मुल्की आणि मंगळुरू सेवाकेंद्रांत रहातांना तेथील काही चुका माझ्या लक्षात आल्या. याविषयी मी उत्तरदायी साधकांना कळवल्यावर त्यांनी मला चुका करणार्‍या साधकांचे स्वभावदोष निर्मूलन सत्संग घ्यायला सांगितले. ‘साधकांकडून पुष्कळ गंभीर चुका होऊनही ‘त्यांना त्याविषयी गांभीर्य अल्प आहे’, हे त्या सत्संगाच्या वेळी माझ्या लक्षात आले. त्यामुळे उत्तरदायी साधकांनी मला त्यांचे सलग स्वभावदोष निर्मूलन सत्संग घ्यायला सांगितले. त्या वेळी जवळ जवळ ३ – ४ मास तेथील साधकांचे अधूनमधून सत्संग होत होते. यापूर्वी मला आश्रम किंवा सेवाकेंद्रे या ठिकाणच्या कार्यपद्धती ठाऊक नव्हत्या आणि तेथे रहाणार्‍या साधकांचे स्वभावदोष निर्मूलन सत्संग घेण्याचा अनुभवही नव्हता. ‘साधकांची साधनेत हानी होऊ नये, यासाठी त्यांचे स्वभावदोष निर्मूलन सत्संग का घ्यायचेे ?’, याविषयी उत्तरदायी साधक मला सांगायचे.

२ आ ३. कन्नड साप्ताहिकामध्ये सर्व चुका प्रसिद्ध झाल्यानंतर साधकांमध्ये चुकांविषयी गांभीर्य निर्माण होऊ लागणे

‘स्वभावदोष निर्मूलन सत्संगानंतर सर्व चुका कन्नड साप्ताहिकात छापा’, असा निरोप मिळाला. त्यानंतर सलग ७ – ८ आठवडे कन्नड साप्ताहिकमध्ये साधकांच्या चुका प्रसिद्ध होत होत्या. परिणामी तेथील साधकांमध्ये चुकांविषयी गांभीर्य निर्माण झाले. या प्रक्रियेतून मला ‘आपण चुकांकडे किती गांभीर्याने पाहिले पाहिजे ? पाठपुरावा कसा करायला हवा ? चुका पुन्हा होऊ नयेत; म्हणून कोणती उपाययोजना केली पाहिजे ?’ इत्यादी पुष्कळ गोष्टी शिकायला मिळाल्या.

२ आ ४. स्वभावदोष आणि अहं निर्मूलनासाठी साधकांचे सत्संग घेण्याचे महत्त्व गुरुदेवांनी मनावर बिंबवणे अन् कर्नाटक राज्यात सर्व ठिकाणी जाऊन स्वभावदोष निर्मूलन सत्संग घ्यायला जाण्याची संधी मिळणे

साधकांमध्ये स्वभावदोष असतात आणि त्यामुळे पुनःपुन्हा चुका होत रहातात. यासाठी ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी त्यांच्या सातत्याने स्वभावदोष निर्मूलन सत्संग घ्यायला पाहिजेत’, याचे गांभीर्य गुरुदेवांच्या कृपेने अनेक प्रसंगातून मला मनावर बिंबवता आले. यानंतर मला कर्नाटक राज्यात सर्व ठिकाणी जाऊन स्वभावदोष निर्मूलन सत्संग घेण्याची मला संधी मिळाली. एकेक जिल्हा आणि त्यातील केंद्रे असे करत सलग २ – ३ मास मी सत्संग घेतले.

२ आ ४ अ. स्वभावदोष निर्मूलन सत्संग घेतल्यामुळे झालेले सकारात्मक परिणाम आणि कर्नाटक राज्यात निर्माण झालेली सांघिक भावना !

या सत्सगांतून अनेक गंभीर चुका लक्षात आल्या. साधकांच्या मनात अनेक विकल्प होते. साधकांच्या काही अडचणी होत्या; मात्र उत्तरदायी साधक त्याकडे दुर्लक्ष करत होते. ‘आपण पुढे काही सांगितले, तर लाभ होईल’, असा विश्‍वास साधकांमध्ये नव्हता. स्वभावदोष निर्मूलन सत्संगामध्ये बर्‍याच साधकांनी त्यांच्या मनातील विचार मनमोकळेपणाने मांडले. दोन्ही बाजूंना त्यांचे विचार मांडण्याची संधी मिळाली. त्यामुळे साधकांची मने मोकळी झाली आणि त्यांच्यात एकमेकांविषयी असलेली कटूता न्यून झाली. त्यानंतर आवश्यक त्या उपाययोजना काढण्यात आल्या. परिणामी साधकांत उत्साह निर्माण होऊन साधक साधनेत क्रियाशिल होण्यास साहाय्य झाले. राज्यात सांघिक भावना निर्माण होऊन पुष्कळ चांगले वाटायला लागले. राज्यातील प्रसाराला गती मिळाली. यावरून ‘स्वभावदोष निर्मूलन  प्रक्रिया सातत्याने केली पाहिजे आणि ती न केल्यास साधकांच्या व्यष्टी अन् समष्टी साधनेची हानी होते’, हे लक्षात आले.

प.पू. गुरुदेवांनी हे सर्व माझ्याकडून करून घेतले, यासाठी त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’

 

३. परात्पर गुरु डॉक्टरांचे आज्ञापालन म्हणून सद्गुरु
राजेंद्र शिंदे यांनी इंग्रजी भाषा शिकण्यासाठी केलेले प्रयत्न आणि इंग्रजी,
गुजराती अन् हिंदी भाषा शिकल्याने प्रसारकार्य करतांना भाषेच्या दूर झालेल्या अडचणी !

‘मी कर्नाटक राज्यातून आंध्रप्रदेश राज्यात प्रसारासाठी जात असतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी मला निरोप पाठवून इंग्रजी भाषा शिकून घेण्यास सुचवले. कर्नाटक येथील साधकांना, तसेच समाजातील लोकांना विशेष इंग्रजी येत नाही. ते कन्नड भाषेतूनच सर्व प्रसारसेवा करतात. असे असल्याने त्या वेळी इंग्रजी भाषा शिकण्याचे प्रयोजन माझ्या लक्षात येत नव्हते; मात्र गुरुदेवांचे आज्ञापालन म्हणून मी इंग्रजी भाषा शिकण्यास आरंभ केला. त्या वेळी मला इंग्रजी लिहिता-वाचता येत होते; परंतु माझे शिक्षण मराठी माध्यमातून झाल्याने मला इंग्रजी व्यवस्थित बोलता येत नव्हते.

३ अ. इंग्रजी भाषा शिकणे

३ अ १. इंग्रजी भाषा शिकण्यासाठी केलेले प्रयत्न
३ अ १ अ. इंग्रजी मासिक ‘सनातन प्रभात’ वाचायला आरंभ करणे

‘टाइम्स ऑफ इंडिया’चे वाचन थांबवून मी इंग्रजी ‘मासिक सनातन प्रभात’ वाचायला आरंभ केला. मी अगोदरच मराठी ‘सनातन प्रभात’मधील बातम्या वाचल्यामुळे इंग्रजी मासिकातील त्याच बातम्या वाचायला मला सोपे जाऊ लागले. त्यातूनही जे शब्द कळत नव्हते, ते शब्दकोशातून काढून मी समजून घेतले. व्यावहारिक शिक्षणात धर्म आणि अध्यात्म यांविषयीचे शब्दप्रयोग वापरात नसल्याने ते सगळे नव्याने समजून घ्यावे लागले.

३ अ १ आ. सहसाधकासह इंग्रजीत बोलण्याचा सराव केल्याने थोडेफार इंग्रजी बोलता येऊ लागणे

माझे केवळ इंग्रजी वाचणे होत होते; मात्र मला गुरुदेवांनी ‘इंग्रजी बोलणे’ही शिकून घ्यायला सुचवले होते. माझ्या समवेत श्री. विनायक शानभाग हे साधक होते. त्यांना इंग्रजी चांगल्या प्रकारे बोलता येत असल्याने मी त्यांच्याशी इंग्रजीत बोलण्याचा सराव करू लागलो. आरंभी माझ्या बर्‍याच चुका होत होत्या; पण त्यांच्याशी बोलत राहिल्याने मला थोडेफार इंग्रजी बोलता येऊ लागले.

३ अ २. चेन्नई येथे गेल्यावर ‘गुरुदेवांनी इंग्रजी भाषा शिकण्यास का सुचवले ?’, याचा उलगडा होणे

त्यानंतर चेन्नई येथे गेल्यावर मला कळले की, तेथील १ – २ साधक सोडले, तर इतरांना हिंदी येत नाही. त्यांना केवळ तमिळ आणि इंग्रजी याच भाषा येतात. याउलट मला तमिळ येत नसून केवळ हिंदी येत असल्याने ‘गुरुदेवांनी इंग्रजी भाषा शिकून घेण्यास का सुचवले होते ?’, याचा मला उलगडा झाला.

३ अ ३. साधकांशी संवाद साधतांना पुष्कळ अडचणी आल्याने इंग्रजीतून बोलण्याविना पर्याय न रहाणे

आरंभी सत्संगात साधकांशी संवाद साधतांना मला पुष्कळ अडचणी आल्या. मी हिंदीतून बोलत असे आणि श्री. विनायक शानभाग त्याचे इंग्रजी भाषांतर करून साधकांना सांगत असत. काही वेळा सौ. उमाक्कांना (आताच्या पू. (सौ.) उमा रवीचंद्रन यांना) थोडे हिंदी समजायचे. त्या हिंदीतून समजून घेऊन साधकांना तमिळमध्ये सांगत; पण असे करण्यात पुष्कळ वेळ जात असे. त्यामुळे मी जसे येईल, तसे इंग्रजीतून बोलण्यास चालू केले आणि देवाच्या कृपेने मला ते हळूहळू जमू लागले.

३ अ ४. परात्पर गुरु डॉक्टरांचा ‘इंग्रजी शिका’ यामागील दूरदृष्टीपणा लक्षात येणे

परात्पर गुरु डॉक्टरांनी मला इंग्रजी शिकायला कळवणे आणि केवळ २ मासांत मला इंग्रजी मोठ्या प्रमाणात बोलावे लागले. हे केवळ गुरुदेवांच्या कृपेनेच शक्य झाले. यातून गुरुदेवांचा दूरदृष्टीपणा माझ्या लक्षात आला.

३ अ ५. ‘गुरुकृपेने कोणतीही भाषा शिकणे सोपे आहे’, याविषयी आलेली अनुभूती !

एकदा चेन्नई येथील एका शाळेत हिंदुत्वनिष्ठांची मोठी बैठक होती. त्या बैठकीमध्ये मी ‘हिंदु धर्मजागृती सभेचा उद्देश, सभेतील विषय, सभेमुळे लोक, समाज आणि राष्ट्र यांना कसा लाभ होणार आहे ?’ इत्यादी विषयांवर सलग १ घंटा इंग्रजीतून बोलू शकलो. त्या वेळी ‘भगवंतच आपल्या मुखातून बोलत असल्यामुळे आपल्याला ताण घेण्याची आवश्यकता नाही आणि गुरुकृपेने कोणतीही भाषा शिकणे सोपे आहे’, हे मला शिकायला मिळाले.

३ अ ६. विदेशातील प्रसारसेवा करणार्‍या साधकांच्या सेवेत इंग्रजी भाषा अत्यावश्यक असणे

त्यानंतर उत्तरदायी साधकांनी मला विदेशातील प्रसारसेवा करणार्‍या साधकांच्या सेवेत सहभागी होण्यास सांगितले होते. विदेशातील बहुतेक साधकांशी संपर्क करण्यासाठी इंग्रजी भाषाच आवश्यक होती. गुरुदेवांच्या कृपेने मला त्यांच्या अडचणी समजून घेणे, त्या सोडवणे, साधनेविषयी मार्गदर्शन करणे, तसेच त्यांचे सत्संग घेणे, हे सर्व इंग्रजीतून करणे जमू लागले.

३ अ ७. विदेशी साधकांशी इंग्रजी भाषेत संवाद साधतांना अडचणी आल्यावर गुरूंना शरण गेल्यावर अडचणी न्यून होणे

नंतर मला रामनाथी आश्रमात विदेशातील साधकांना मार्गदर्शन करण्याची सेवा मिळाली.

३ अ ७ अ. विदेशी साधकांच्या उच्चारामुळे त्यांच्या बोलण्याचे आकलन न होणे आणि ‘प्रार्थना’ अन् ‘गुरूंना शरण जाणे’, यांमुळे बोलता येणे

सत्संगाच्या पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात मी काहीच बोललो नाही; कारण काही विदेशी साधकांच्या उच्चारांमुळे मला त्यांच्या बोलण्याचे आकलन होत नव्हते. त्यामुळे माझा आत्मविश्‍वास डळमळीत होऊन माझ्या मनात प्रतिमेचे विचार येऊ लागले. सत्संगाच्या दुसर्‍या सत्रानंतर मला ‘प्रार्थना करणे’ आणि ‘गुरूंना शरण जाणे’, यांमुळे बोलायला जमू लागले, तसेच त्यांची विदेशी उच्चार असलेली भाषाही (काही विदेशी साधक तोंडातल्या तोंडात काही शब्द उच्चारतात) मला समजू लागली.

३ अ ७ आ. विदेशी साधकांसमोर इंग्रजीतून २ घंटे विषय मांडता येणे

एक दिवस अकस्मात् मला सत्संगात ‘कर्नाटक राज्यात प्रसार कसा केला ?’ हा विषय सांगण्यास सांगितले. आदल्या रात्री या विषयाची १० – १२ पाने इंग्रजीतून लिहून मी गुरुकृपेने हा विषय विदेशी साधकांसमोर २ घंटे इंग्रजीतून मांडू शकलो. या वेळी ‘गुरुदेवच परीक्षा घेतात आणि तेच उत्तीर्ण करतात’, हे माझ्या लक्षात आले.

३ आ. कन्नड भाषा समजू लागणे

दक्षिण भारताच्या प्रसार दौर्‍यामध्ये मला गुरुदेवांच्याच कृपेने कन्नड भाषा बर्‍याच प्रमाणात समजू लागली आणि काही वाक्ये बोलताही येऊ लागली. त्यामुळे भाषेमुळे येणार्‍या अडचणी बर्‍याच प्रमाणात सुटल्या.

३ इ. नवीन भाषा शिकायची आवड असणे

मला नवीन भाषा शिकायची आवड आहे. नोकरीमध्ये असतांना मी बंगाली शिकण्यासाठी वर्गाला गेलो होतो. एक – दीड मासातच मी बंगाली भाषा काही प्रमाणात बोलायला, वाचायला आणि लिहायचा प्रयत्न केला होता.

३ ई. गुजराती भाषा शिकणे

मला पुष्कळ दिवसांपासून ‘गुजराती भाषा शिकावी’, असे वाटत होते. गुजरातला गेल्यावर मी गुजराती शिकण्याचा प्रयत्न केला. गुरुदेवांच्या कृपेने मला गुजराती भाषाही समजायला लागली. त्या वेळी पत्रकार परिषदेसाठी लागणारे गुजराती भाषेतील प्रसिद्धीपत्रक वाचून मी त्यातील चुका श्री. संतोष आळशी यांना सांगू शकलो.

३ उ. हिंदी भाषा चांगल्या प्रकारे बोलता येऊ लागणे

उत्तर भारताच्या प्रसारदौर्‍यात ठिकठिकाणी असलेल्या हिंदु धर्मजागृती सभांच्या निमित्ताने मला शुद्ध हिंदी भाषेत (शब्दांची सरमिसळ न करता) बोलता येऊ लागले.

गुरुदेवांच्या कृपेनेच मला प्रसाराची संधी मिळाली, तेथील भाषा तेच मला  शिकवतात, याची मला आलेली ही मोठी अनुभूती आहे.

‘गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’

‘इदं न मम । (हे लिखाण मी लिहिलेले नाही, तर भगवंतानेच लिहून घेतले आहे.)

॥ श्रीकृष्णचरणार्पणमस्तु ॥’

– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

 

पू. राजेंद्र शिंदे यांच्याविषयी संतांनी आणि परात्पर गुरूंनी काढलेले गौरवोद्गार !

१. पू. राजेंद्र शिंदे राबवत असलेली अद्वितीय स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया !

‘२००३ या वर्षी मी सनातन संस्थेत स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवली. तेव्हा स्वभावदोष आणि अहं अधिक असल्यामुळे समष्टीची हानी करणार्‍या बहुतेक साधकांकडे असलेले विविध सेवांचे दायित्व अन्य साधकांना दिले आणि बहुतेकांना व्यष्टी साधना करण्यास सांगितले.

आता पू. राजेंद्र शिंदे ही प्रक्रिया राबवत आहेत. त्यात ते माझ्यापेक्षा अनेक पावले पुढे आहेत. ते स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया अशा तर्‍हेने राबवत आहेत की, काही महिन्यांतच साधक पूर्वीप्रमाणे उत्तरदायित्व स्वीकारून सेवा चालू करतात. एवढेच नव्हे, तर ते इतरांनाही स्वतःप्रमाणे सिद्ध करतात.

पू. राजेंद्र यांच्या या अद्वितीय प्रसार कार्यामुळे ‘मी साधकांना घडवतो’, हा माझा अहंभाव न्यून व्हायला साहाय्य झाले !’

२. अनेकातून एकात आल्यावर क्षमता वाढत असल्याचे सिद्ध करणारे पू. राजेंद्र शिंदे !

‘अनेकातून एकात येणे’ हा अध्यात्मातील एक मूलभूत सिद्धांत आहे. अनेकातून एकात आल्यावर, म्हणजे ‘मायेतील अनेक गोष्टींकडून एका ब्रह्माकडे आल्यावर सर्वव्यापकता, सर्वज्ञता आणि सर्वशक्तीमानता कशी येते ?’, याचे एक छोटेसे उदाहरण पू. राजेंद्रदादा यांच्या प्रसाराकडे पाहिले की, लक्षात येते. पूर्वी ते अनेक ठिकाणी जात. आता ते फक्त देवद आश्रमात असतात. असे असले, तरी पूर्वी भारतात सर्वत्र जाऊन त्यांनी साधकांत जेवढे साधकत्व निर्माण केले, त्याच्या अनंत पटींनी आता फक्त एके ठिकाणी, म्हणजे देवद आश्रमात राहून करत आहेत.’

३. ‘तळमळ’ या गुणाचे मूर्तीमंत रूप असलेले पू. राजेंद्र शिंदे सद्गुरुपदी विराजमान !

‘नियोजनकौशल्य आणि नेतृत्व गुण असलेल्या पू. राजेंद्र शिंदे यांनी मुंबई अन् कर्नाटक येथील प्रसारकार्य वाढवण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले. शरीर अस्वास्थ्यामुळे काही वर्षांपासून ते देवद आश्रमात वास्तव्याला असून तेथील साधकांना व्यष्टी साधनेसाठी मार्गदर्शन करतात. तीव्र तळमळ असल्यास स्थूलदेहाच्या मर्यादा ओलांडून अखंड सेवारत रहाता येते, याचा मोठा आदर्श त्यांनी साधकांसमोर ठेवला आहे. यातूनच अध्यात्मात ‘तळमळ’ हा गुण का सर्वश्रेष्ठ समजला जातो, हेही लक्षात येते.

त्यांच्या या गुणांमुळेच ते आज सद्गुरुपदी विराजमान झाले आहेत. वर्ष २०१० मध्ये संतपद प्राप्त केलेल्या पू. राजेंद्र शिंदे यांनी केवळ ६ वर्षांत हा मोठा टप्पा पार केला आहे.

त्यांची उत्तरोत्तर आध्यात्मिक उन्नती होऊ दे, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’

– परात्पर गुरु डॉ. आठवले

१. धर्मसंस्थापनेच्या कार्याच्या पायातील एक दगड म्हणजे
संसाराचा त्याग केलेले आणि समर्पित जीवन जगणारे त्यागमूर्ती पू. राजेंद्र शिंदे !

‘ईश्‍वराने धर्मसंस्थापनेच्या इमारतीचा (कार्याचा) जो पाया रचला आहे, त्या पायातील एक दगड म्हणजे संसाराचा त्याग केलेले आणि समर्पित जीवन जगणारे पू. राजेंद्र शिंदे हे आहेत. धर्मसंस्थापना सामान्याचे काम नाही. त्यासाठी भगवंताला यावे लागते. भगवंत अवतार घेतो, त्या वेळी विविध देवताही त्याच्यासमवेत येतात. हे साधक म्हणजे देवच आहेत आणि त्यांना भगवंताने ओळखले आहे, हे भगवंताचे महत्त्व आहे.’’

२. ध्येयाचा तीव्र ध्यास आणि गुरूंवरील श्रद्धा या
द्विगुणांमुळे समष्टीत प्रत्येक टप्प्यावर क्रांती घडवणारे पू. राजेंद्र शिंदे

२ अ. प.पू. पांडे महाराजांनी पू. राजेंद्रदादांची उलगडलेली वैशिष्ट्ये
२ अ १. गुरूंचे समष्टी कार्य वेगाने पुढे नेणारे उत्कृष्ट संघटनकौशल्य आणि आदर्श नियोजनपद्धत !

‘गेल्या ८ वर्षांपासून मी पू. राजेंद्रदादांच्या संपर्कात आहे. त्यांच्याशी माझा पहिला संपर्क झाला, तेव्हा मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांची सेेवा ते करत होते. त्यांच्यातील नियोजन कौशल्यामुळे त्यांनी या जिल्ह्यांतील सेवांचे उत्कृष्ट नियोजन केले होते. मी या जिल्ह्यांत जात असतांना ते तेथील केंद्रसेवकाकडून आधीच सर्व नियोजन करून घेत असत. ते नियोजन परिपूर्ण असल्यामुळे त्यांना तेथे स्वतः जायची कधी आवश्यकताच पडली नाही. उत्कृष्ट संघटनकौशल्य, आदर्श नियोजनपद्धत, साधकांशी जवळीक साधून त्यांच्याकडून सहजतेने सेवा करवून घेणे आणि साधकांना अचूक हेरणे या गुणांमुळे ते गुरूंचे अध्यात्मप्रसाराचे समष्टी कार्य वेगाने पुढे नेत आहेत.

२ अ २. सनातन संस्थेच्या कार्याला पूर्णवेळ वाहून घेण्याची त्यागमय वृत्ती !

रेल्वेमध्ये अधिकारी पदावर नोकरी करतांना (सेवानिवृत्त व्हायला पुष्कळ अवधी असतांनासुद्धा) त्यांनी ईश्‍वरप्राप्तीच्या ध्येयासाठी नोकरीचा त्याग करून सनातन संस्थेच्या कार्याला पूर्णवेळ वाहून घेतले. त्यानंतर ते ठाणे सेवाकेंद्रात रहात होते. तेव्हा ते सेवेत एवढे व्यस्त असायचे की, ठाणे शहरातच त्यांचे घर असतांनासुद्धा ते घरी क्वचित्च जात असत.

२ अ ३. ‘प.पू. डॉक्टरांनी आरंभलेले अध्यात्मप्रसाराचे कार्य निश्‍चितच परिपूर्ण करणार !’ असा साधकांचा विश्‍वास संपादन करणे

एखाद्या कार्यक्रम जिल्ह्यात किंवा देवद आश्रमात असो, प्रसारकार्य असो पू. राजेंद्र शिंदे यांच्या नियोजनामुळेच या सर्व गोष्टी यशस्वी झाल्या आहेत. प.पू. डॉक्टरांनी आरंभलेले अध्यात्मप्रसाराचे कार्य निश्‍चित परिपूर्ण करणारच, असा साधकांचा विश्‍वास त्यांनी संपादन केला आहे.

२ अ ४. दक्षिण भारतातील साधकांचे प्रयत्न अल्प असतांना पू. दादांनी तळमळीने मार्गदर्शन करून त्यांची साधना आणि तेथील प्रसारकार्य यांत वाढ करणे

पू. राजेंद्रदादा यांच्यातील वरील गुणांमुळे उत्तरदायी साधकांनी व्यापक स्तरावर समष्टी कार्य करण्यासाठी त्यांची निवड केली. त्यांना दक्षिण भारतात प्रसारसेवेसाठी पाठवले. त्या वेळी तिकडच्या साधकांचे प्रयत्न अल्प होते. असे असतांनाही त्यांनी साधकांना मार्गदर्शन करून त्यांच्या प्रयत्नांत वाढ केली आणि साधकांच्या साधनेसह तेथील प्रसारकार्यही वाढवले. त्यामुळे एकदा प.पू. डॉक्टरांनीही त्यांचे कौतुक केले होते.

ते दक्षिण भारतात प्रसारसेवेसाठी गेले, तेव्हा त्यांची मुलगी दहावीत होती. तिच्या परीक्षेच्या वेळीही त्यांनी घरी न येता सेवेलाच प्राधान्य दिले.

२ अ ५. गुरुकृपायोगामुळे केवळ १२ वर्षांत (१ तपात) संतपद गाठणे

साधक ते संत अशी वाटचालही त्यांनी गुरुकृपेमुळे केवळ १२ वर्षांत साध्य केली. त्यांच्यातील आज्ञापालन, गुरूंवरील श्रद्धा, सतत भगवत् अनुसंधान ठेवून कार्य करण्याची वृत्ती, चिकाटी, तळमळ, जिद्द, समर्पण वृत्ती या गुणांमुळे ते लवकर संत झाले.

२ अ ६. प्रकृतीअस्वास्थ्य असतांनाही ‘संगणकीय प्रणाली’द्वारे साधकांना मार्गदर्शन करणे, तसेच देवद आश्रमात स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया चालू करणे अन् त्यांच्यामुळे देवद आश्रमात चैतन्य आणि उत्साह वाढणे

प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते सध्या १ वर्षापासून देवद आश्रमात आहेत. अशा स्थितीतही (पुष्कळ वेळा मानेच्या त्रासामुळे पलंगावर आडवे पडूनच त्यांना सत्संग घ्याव्ये लागत.) त्यांनी संगणकीय प्रणालीद्वारे साधकांना मार्गदर्शन करायला आरंभ केला. त्यांच्या या मार्गदर्शनामुळे प्रसारातील साधकांमध्ये उत्साह निर्माण झाला. देवद आश्रमात त्यांनी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया चालू केल्यामुळे आश्रमातील साधकांनी ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्याच्या प्रक्रियेलाही वेग आला. त्यांच्याच कार्यकालात देवद आश्रमातील १७ साधकांनी ६० टक्के आणि त्याहून अधिक पातळी गाठली. यामध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी ११ साधकांनी ६० टक्के आणि त्याहून अधिक पातळी गाठल्याच्या सोहळ्यात प.पू. डॉक्टरांनीही आनंद व्यक्त करून त्यांचे कौतुक केले होते. देवद आश्रमात त्यांच्या वास्तव्यामुळे आता चैतन्य आणि उत्साह वाढला आहे.

२ अ ७. प.पू. डॉक्टरांनी सांगितलेल्या गुरुकृपायोगाद्वारे सिद्ध झालेले संत आणि साधक यांच्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची निश्‍चिती होणे

प.पू. डॉक्टरांना अपेक्षित असे धर्मप्रसाराचे कार्य त्यांच्याकडून होत असल्यामुळे प.पू. डॉक्टरांकडून त्यांना पुष्कळ शक्ती मिळत आहे. त्यांच्या कृपाप्रसादामुळे पू. राजेंद्रदादांच्या माध्यमातून साधकांचीही वेगाने प्रगती होऊ शकते, हे लक्षात येते. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजनिष्ठ आणि धर्मनिष्ठ अशा मावळ्यांची निवड करून यवनांच्या दुष्ट पातशाह्यांना पराजित केले. त्यांनी कठीण काळातही अल्पावधीत हिंदवी स्वराज्य स्थापन केले, त्याप्रमाणेच आता कलियुगातील दुष्कृत्यांनी परिसीमा गाठलेल्या या कठीण काळातसुद्धा प.पू. डॉक्टरांनी सांगितलेल्या गुरुकृपायोगाद्वारे सिद्ध झालेले पू. राजेंद्रदादा आणि त्यांच्यासारखे इतर संत यांच्याकडून, तसेच निवडक अशा साधकांकडून हिंदु राष्ट्राची स्थापनेचे ध्येय अल्पावधीतच पूर्ण होणार आहे, याची निश्‍चिती झाली आहे.

लवकरच अशा संतांकडून हिंदु राष्ट्राची स्थापना होवो, ही श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’

 – परात्पर गुरु पांडे महाराज

१. साधकांना माता-पित्यापेक्षाही अधिक प्रेम देणारे आणि त्यांच्या
प्रगतीसाठी झटणार्‍या पू. राजेंद्रदादांविषयी पू. नंदकुमार जाधव यांना जाणवलेली सूत्रे

१ अ. मुलीला अपघात झाल्यावर आणि नंतर वेदना होत असतांना तिला पू. राजेंद्रदादांची तीव्रतेने आठवण येणे

‘निज भाद्रपद कृष्ण पक्ष १४ (१४.१०.२०१२) या दिवशी माझी मुलगी कु. अनुराधा हिचा मला भ्रमणभाष आला होता. तेव्हा तिने मला सांगितले, ‘‘मागच्या आठवड्यात परिवहन मंडळाच्या बसमधून जात असतांना आणि दुचाकी चालवत असतांना २ वेळा माझा अपघात झाला.’’ तिला या दोन्ही प्रसंगांमध्ये पू. राजेंद्रदादांची आठवण आली.

मुका मार लागल्यामुळे २ – ३ दिवस तिचे दंड अन् गुडघे दुखून तिला रडू आले. त्या वेळीही तिला पू. राजेंद्रदादांची आठवण आली आणि आणखी रडू आले. अपघात घडल्याचे तिने प्रथम पू. राजेंद्रदादांनाच सांगितले आणि नंतर मला सांगितले. त्यानंतर तिने मला विचारले, ‘‘मी दिवाळीला देवद आश्रमात जाऊ का ?’’ त्यावर मी म्हणालो, ‘‘जा; पण पू. राजेंद्रदादांना विचारून घे.’’

१ आ. साधकांमध्ये पालट व्हावा, या आत्यंतिक तळमळीपोटी पू. दादा साधकांंना कठोर शब्दांत जाणीव करून देऊ शकणे

अकोला आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये नुकतेच स्वभावदोष निर्मूलन सत्संग झाले. त्या सत्संगांमध्ये पू. राजेंद्रदादांना अतिशय कठोर शब्दांत साधकांना जाणीव करून देत होते. साधकांप्रती असणारा प्रेमभाव आणि त्यांच्यात पालट व्हावा, ही तळमळ यांमुळेच ते एवढ्या कठोर शब्दांत बोलू शकतात. तसेच ते ‘तुम्ही प्रयत्न करा, देव तुम्हाला क्षमा करील, ईश्‍वर तुम्हाला साहाय्य करील’, असे बोलून आधारही देतात.

हे श्रीकृष्णा, पू. राजेंद्रदादांप्रमाणे आमच्यामध्ये साधकांच्या प्रगतीची तळमळ आणि साधकांप्रतीचा प्रेमभाव वाढू दे, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’

–  सद्गुरु नंदकुमार जाधव

कर्म, ज्ञान, ध्यान आणि भक्ती हे योग साधून ‘गुरुकृपायोग’ साधणारे
अन् त्याद्वारे आपल्यातील अफाट सामर्थ्याची प्रचीती सर्वांना घडवणारे पू. राजेंद्रदादा !

‘पू. राजेंद्रदादांनी आतापर्यंत प्रसार आणि देवद आश्रममधील साधकांची साधनेची घडी बसवली. त्यांनी कुशलतेने परिपूर्ण कार्य करून ‘कर्मयोग’ साध्य केला आहे. ही सर्व धुरा सांभाळतांना त्यांनी अनेक साधकांना साधनेचे उच्च दृष्टीकोन देऊन ईश्‍वरप्राप्तीचे ज्ञान दिले, म्हणजेच ‘ज्ञानयोग’ही साध्य केला. पू. राजेंद्रदादा एकाग्रतेने आणि तल्लीन होऊन सेवा करतात. यावरून त्यांनी ‘ध्यानयोग’ही साध्य केला असल्याचे लक्षात येते. पू. राजेंद्रदादांचा भक्तीयोग अनुभवण्याची संधी आतापर्यंत मिळाली नव्हती.

अधिक भाद्रपद कृ. त्रयोदशी (२९.८.२०१२) या दिवशी छापून आलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’मधील ‘देवद आश्रमातील साधकांमध्ये पालट घडवण्याचे शिवधनुष्य’ हा लेख वाचल्यावर त्यांच्यातील ईश्‍वराविषयीचा कृतज्ञता आणि शरणागत भाव या दोन्हीचेही दर्शन घडले. ‘पू. दादांची भक्ती किती उच्च प्रतीची आहे’, हे त्यांनी केलेल्या लिखाणातून लक्षात येते. अर्थात् पू. दादांना ‘भक्तीयोग’ही साध्य झालेला आहेच.

गुरुकृपायोग म्हणजे कर्म, ज्ञान, ध्यान आणि भक्ती या योगांचा सुरेख संगम आहे. पू. राजेंद्रदादांनी गुरुकृपायोग साध्य केल्यामुळेच त्यांच्यातील अफाट सामर्थ्याची अनुभूती सर्व साधक अनुभवत आहेत.’

 – पू. (सौ.) अश्‍विनी पवार

 

सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे यांनी अन्यायाच्या विरोधात केलेले कार्य !

अ. ‘नोकरीच्या कालावधीत मी लेखा विभागात शिवसेनेच्या ‘स्थानीय लोकाधिकार समिती’ची स्थापना करण्यासाठी पुढाकार घेतला होता.

आ. ‘ऑल इंडिया रेल्वे अकाऊंट्स् फेडरेशन’ या लेखा विभागातील कर्मचार्‍यांच्या हक्कासाठी कार्य करणार्‍या संघटनेत ‘डेप्युटी सेक्रेटरी’ या पदावर २ वर्षे काम केले होते.

इ. विक्रीमूल्यापेक्षा अधिक पैसे घेणार्‍या दुकानदारांना मी याविषयी नेहमी खडसावत असे.

एकंदरीत अन्याय पाहून मला चीड यायची आणि ‘अन्यायाच्या विरोधात काहीतरी करावे’, असे वाटायचे.’

– सद्गुरु राजेंद्र शिंदे (१६.९.२०१८)

 

पूर्णवेळ साधनेला आरंभ झाल्यावर प्रसाराची सेवा करण्याची मिळालेली संधी !

अ. वर्ष २००३ : ‘मध्ये मला उत्तरदायी साधकांनी ठाणे जिल्ह्यासह मुंबई जिल्ह्याची सेवा पहाण्यास सांगितले आणि वर्ष २००४ मध्ये मला रायगड जिल्ह्याचीही सेवा पहाण्यास सांगण्यात आले.

आ. वर्ष २००५ : मध्ये वरील ३ जिल्ह्यांसह मला नाशिक आणि संभाजीनगर येथे जाऊन प्रसार करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार मी त्या जिल्ह्यांतही प्रसारास जाऊ लागलो.

इ. वर्ष २००७ : महाराष्ट्रात हिंदु धर्मजागृती सभा चालू झाल्या. वर्ष २००७ – २००८ मध्ये सभांच्या नियोजनासाठी माझा महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांचा दौरा झाला.

ई. सप्टेंबर ते डिसेंबर २००८ : या कालावधीत उत्तर भारतातील गुजरात, राजस्थान, हरियाणा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि झारखंड या राज्यांतील दौरे झाले.

उ. वर्ष २००९ – २०१० : या काळात मला गुरुदेवांच्या कृपेने दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आणि आंध्रप्रदेश या राज्यांतील प्रसारसेवेत सहभागी होता आले.

ऊ. वर्ष २०१० – २०११ : ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या वतीने विदेशात प्रसार करणार्‍या साधकांच्या सेवेत सहभागी होता आले.

अशा प्रकारे मला प्रसाराची सेवा मिळून मला व्यापक होण्याची संधी मिळाली आणि गुरुदेवांनी माझ्यावर अनंत अनंत उपकार केले. यामुळे सर्वांशी जवळीक करणे, विविध प्रकृतींचा अभ्यास करणे, त्यांच्याशी जुळवून घेणे, तसेच साधकांकडून शिकणे, असे साधनेसाठी आवश्यक असलेले अनेक गुण मला शिकता आले.

यावरून असे लक्षात येते की, साधकांमध्ये व्यापकता यावी आणि त्यांची आध्यात्मिक उन्नती व्हावी, यांसाठी गुरुदेवांच्या कृपेमुळे साधकांना अनेक जिल्ह्यांत जाण्याची संधी मिळते.’

– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment