एकादशी (हरिदिनी)

 

एकादशीच्या दिवशी सर्व प्राणिमात्रांची सात्त्विकता वाढत असल्याने या दिवशी व्रत केल्याने त्याचा अधिक लाभ होतो. शैव आणि वैष्णव अशा दोन्ही संप्रदायांत एकादशीचे व्रत केले जाते. या व्रताचे महत्त्व आणि त्याचे प्रकार यांविषयीचे विवेचन या लेखात केले आहे.

१. देवता

एकादशी या व्रताची देवता श्रीविष्णु आहे .

श्रीविष्णु
श्रीविष्णु

२. प्रकार

एकादशीचे स्मार्त आणि भागवत असे दोन प्रकार आहेत. ज्या वेळी एका पक्षात हे दोन भेद संभवतील, त्या वेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त आणि दुसर्‍या दिवशी भागवत एकादशी असे लिहिलेले असते. शैव लोक स्मार्त एकादशी, तर वैष्णव लोक भागवत एकादशी पाळतात. वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. या संप्रदायात वार्षिक, सहामाह याप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेल, तशी वारी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते, असे समजले जाते. प्रत्येक मासात दोन, याप्रमाणे वर्षात चोवीस एकादश्या येतात. त्या पुढीलप्रमाणे आहेत.

मासातील दोन्ही एकादश्या करणे उत्तम; पण ते शक्य नसल्यास निदान शुद्ध एकादशी तरी करावी.

 

मास

शुक्ल पक्ष

कृष्ण पक्ष

चैत्र कामदा वरूथिनी
वैशाख मोहिनी अपरा
ज्येष्ठ निर्जला योगिनी
आषाढ शयनी कामिका
श्रावण पुत्रदा अजा
भाद्रपद परिवर्तिनी इंदिरा
आश्विन पाशांकुशा रमा
कार्तिक प्रबोधिनी फलदा
मार्गशीर्ष मोक्षदा सफला
पौष प्रजावर्धिनी षट्‌तिला
माघ जयदा विजया
फाल्गुन आमलकी पापमोचनी

 

३. वैशिष्ट्ये

अ. सर्व व्रतांतील हे एक मूलभूत व्रत आहे.

आ. इतर व्रतांप्रमाणे हे व्रत संकल्पाने विधीपूर्वक चालू करावे लागत नाही.

इ. काळानुसार प्रत्येकातील सत्त्व, रज आणि तम गुणांचे प्रमाण पालटत असते. एकादशीच्या दिवशी सर्व प्राणिमात्रांची सात्त्विकता सर्वाधिक असते. त्यामुळे या वेळी साधना केल्यास त्याचा जास्त लाभ होतो.

४. व्रत करण्याची पद्धत

एकादशीला काहीएक न खाता केवळ पाणी आणि सुंठसाखर घेतल्यास ते सर्वोत्तम होय. ते शक्य नसल्यास उपवासाचे पदार्थ खावे. एकादशीला उपवास करून दुसर्‍या दिवशी पारणे करतात.

अ. आषाढी एकादशी

आषाढी एकादशी म्हटले की, डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी ! २४ एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते, असेही म्हणतात.

याविषयीचे अधिक विवेचन वाचण्यासाठी येथे क्लिक करा !

 

इ. निर्जला एकादशी (भीमसेनी एकादशी)

१. तिथी : ज्येष्ठ शुद्ध एकादशी

२. इतिहास : ‘पांडवांतील भीमाचा आहार विलक्षण. भीमाला सर्व एकादश्यांना उपवास करणे शक्य नव्हते; म्हणून त्याने व्यासांच्या उपदेशानुसार ज्येष्ठ शुद्ध एकादशीला पाणीही न पिता उपवास केला आणि सर्व एकादश्यांच्या उपवासाचे पुण्य जोडले.’

३. महत्त्व : निर्जला एकादशीचे व्रत विधीपूर्वक केल्यास वर्षात दुसरी कोणतीही एकादशी न करताही सर्व एकादश्यांचे पुण्य मिळते.

ई. कामदा एकादशी

‘ललिताने कामदा एकादशीचा उपवास करून प्रार्थना करताच पती ललितचे पाप नष्ट झाले. त्याचा राक्षसभाव निघून जाऊन त्याने दिव्य देह धारण केला आणि तो पुन्हा गंधर्व बनला.’ – ऋषी प्रसाद (एप्रिल २०११)

५. एकादशी व्रताचे महत्त्व

अ. पद्मपुराणामध्ये एकादशी व्रताचे पुढीलप्रमाणे महत्त्व सांगितले आहे.

 

अश्वमेधसहस्त्राणि राजसूयशतानि च ।

एकादश्युपवासस्य कलां नार्हन्ति षोडशीम् ।। – पद्मपुराण

अर्थ : अनेक सहस्र अश्वमेध यज्ञ आणि शेकडो राजसूय यज्ञ यांना एकादशीच्या उपवासाच्या सोळाव्या कलेइतकेही, म्हणजे ६ १/४ प्रतिशत इतकेही महत्त्व नाही.

आ. ‘एकादशीच्या दिवशी ब्रह्मांडात कार्यरत असणार्‍या विष्णुतत्त्वामुळे वायूमंडल विष्णुतत्त्वयुक्त लहरींनी भारित असते. त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळस विष्णुतत्त्वाच्या लहरी जास्त प्रमाणात ग्रहण करते आणि त्यामुळे तिची आध्यात्मिक स्तरावर कार्य करण्याची क्षमता वाढते.’ – कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

६. एकादशीचा उपवास

‘पंधरा दिवसांतून एक दिवस संपूर्ण उपवास केल्यास तो शरिराच्या दोषांना जाळून टाकतो आणि १४ दिवसांत आहाराचा जो रस बनतो, त्याचे ओजात रूपांतर होते; म्हणूनच एकादशीच्या उपवासाचा महिमा आहे. एरवी गृहस्थाश्रमींनी मासातील केवळ शुक्लपक्षातील एकादशीचा उपवास करावा, असे आहे; परंतु चातुर्मासात दोन्ही पक्षांतील एकादशीचे व्रत करावे.’ – ‘मासिक ऋषीप्रसाद’, ऑगस्ट २००८

 

७. एकादशीचे लाभ

‘पद्मपुराणा’मध्ये एकादशीचे पुढीलप्रमाणे लाभ सांगितले आहेत.

 

स्वर्गमोक्षप्रदा ह्येषा शरीरारोग्यदायिनी ।

सुकलत्रप्रदा ह्येषा जीवत्पुत्रप्रदायिनी ।

न गंगा न गया भूप न काशी न च पुष्करम् ।

न चापि वैष्णवं क्षेत्रं तुल्यं हरिदिनेन च । – पद्मपुराण आदिखंड

अर्थ : एकादशी ही स्वर्ग, मोक्ष, आरोग्य, चांगली भार्या आणि चांगला पुत्र देणारी आहे. गंगा, गया, काशी, पुष्कर, वैष्णव क्षेत्र यांपैकी कोणालाही एकादशीची बरोबरी करता येणार नाही. एकादशीला ‘हरिदिन’ म्हणजे विष्णूचा दिवस, असे संबोधतात.

 

८. एकादशीला आणि इतर दिवशी तुळस पाहणे

 

इतर दिवशी तुळस पाहणे

एकादशीला तुळस पाहणे

१. चैतन्याचे प्रक्षेपण अल्प अधिक
२. विष्णुतत्त्व
२ अ. स्तर अकार्यरत-कार्यरत कार्यरत-अकार्यरत
२ आ. परिणाम व्यक्ती आणि वायूमंडल यांवर थोड्या प्रमाणात परिणाम होणे व्यक्ती आणि वायूमंडल यांवर जास्त परिणाम होणे
३. आनंद आणि शांती यांचे प्रमाण अल्प अधिक
४. सुगंधाचे प्रमाण अल्प अधिक
५. उपाय करण्याचे सामर्थ्य अल्प अधिक
६. वाईट शक्तींचे आक्रमण झेलण्याची आणि परतवण्याची क्षमता अल्प, भुवलोकातील आक्रमण झेलण्याची आणि परतवण्याची क्षमता असणे अधिक, भुवलोक ते दुसर्‍या पाताळापर्यंतचे आक्रमण झेलण्याची आणि परतवण्याची क्षमता असणे

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

Leave a Comment