श्रद्धा अन् भक्ती यांद्वारे आजही वारीच्या परंपरेचा वसा चालू ठेवणारे वारकरी !

Article also available in :


 

१. प्राचीन काळापासून प्रतिष्ठित असलेले पंढरपूर

पद्मपुराण आणि स्कंदपुराण यांतील उल्लेखावरून ‘पंढरपूर हे देवस्थान प्राचीन काळापासून प्रतिष्ठित होते’, असे दिसते. तेव्हापासून लोक पंढरपूरला दर्शनासाठी येत होते.

 

२. भक्त पुंडलिकाने मागितलेला वर

‘भक्त पुंडलिकाने पांडुरंगाकडे ‘दर्शनास आलेल्या सर्वांची पापे नष्ट कर’, असा वर मागितला’, असा उल्लेख पद्मपुराणात आहे.

 

३. ‘रुसून गेलेल्या रुक्मिणीच्या शोधार्थ श्रीकृष्ण दिंडीरवनात (आजचे
पंढरपूर) आला आणि पुंडलिकासाठी तिथेच उभा राहिला’, अशी आख्यायिका असणे

एकदा रुक्मिणी श्रीकृष्णावर रुसून दिंडीरवनात गेली. श्रीकृष्ण तिला शोधत-शोधत दिंडीरवनात पुंडलिक जेथे आई-वडिलांची सेवा करत होता, तेथे आला. पुंडलिकाने दिलेल्या विटेवर श्रीकृष्ण तिथेच ‘अठ्ठावीस युगे’ उभा राहिला.

‘इति स्तुत्वा ततो देवं प्राह गद्गदया गिरा ।
अनेनैव स्वरूपेण त्वया स्थेयं ममान्तिके ॥
ज्ञानविज्ञानहीनानां मूढानां पापिनामपि ।
दर्शनान्ते भवेन्मोक्षः प्रार्थयामि पुनः पुनः ॥ – स्कन्दपुराण

अर्थ : त्यानंतर अशा प्रकारे स्तुती करून तो आनंदाने देवाला म्हणाला, ‘‘आपण याच रूपामध्ये माझ्याजवळ राहावे. आपल्या केवळ दर्शनाने मूढ, अज्ञानी आणि पापी लोकांनाही मुक्ती मिळावी’, अशी आपल्या चरणी मी पुनःपुन्हा प्रार्थना करतो.’’

 

४. इसवी सनाच्या आठव्या शतकात
आदिशंकराचार्यांनी ‘पांडुरंगाष्टक’ नावाने प्रासादिक लिहिलेले एक स्तोत्र

महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः ।
समागत्य निष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥
– आदिशंकराचार्य कृत पाण्डुरङ्गाष्टकम्

अर्थ : भीमा नदीच्या काठी असलेल्या महायोगपिठावर पुंडलिकाला वर देण्यासाठी मुनिश्रेष्ठांसह आलेल्या, आनंदाचा स्रोत असणार्‍या, परब्रह्मस्वरूप अशा पांडुरंगाची मी पूजा करतो.

 

५. वारकरी पंथाचा सरळसोपा मार्ग

‘भजन, नामस्मरण आणि कीर्तन यांच्या माध्यमातून परमेश्‍वराला प्राप्त करणे’, हा वारकरी पंथाचा सरळसोपा मार्ग आहे. भागवत संप्रदायात याला ‘नवविधा भक्ती’ म्हणतात.

प्रत्येकाचे कल्याण चिंतणे, कार्यात भगवंताला पहाणे, धर्मपूर्वक गृहस्थाश्रमाचे पालन करणे आणि भागवतधर्माचा मार्ग सुकर करणे हेच वारकऱ्यांचे भक्तीमय जीवन असते !

५ अ. नवविधा भक्ती

श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् ।
अर्चनं वन्दनं दास्यं सख्यम् आत्मनिवेदनम् ॥

अर्थ : भगवंताचे श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन या नऊ प्रकारच्या भक्ती आहेत.

५ आ. वारीचा मूळ गाभा

श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन या नऊ भक्ती एक ‘वारी’ केल्यास सिद्ध होतात अन् ‘याची देही याची डोळा’ माणसाचे जीवन कृतार्थ होते. हा वारीचा मूळ गाभा आहे.

 

६. प्रमुख संतांच्या निर्वाणानंतर त्यांच्या नावाने पालख्या आणि दिंड्या नेण्याचा प्रघात

या प्रमुख संतांच्या निर्वाणानंतर त्यांच्या नावाने पालख्या आणि दिंड्या नेण्याचा प्रघात हैबतबाबा अरफळकर यांनी चालू केला. हैबतबाबा हे ग्वाल्हेरच्या शिंद्यांच्या दरबारी सरदार होते. त्यांनी सर्वप्रथम ज्ञानेश्‍वरांच्या पादुका गळ्यात बांधून पायी दिंडी काढली. ते लष्करी शिस्तीचे होते. त्यांचे तत्कालीन राजे अन् सरदार यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याने त्यांनी संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीला एक भव्य दिव्य स्वरूप मिळवून दिले. हत्ती, घोडे, पालखी इत्यादी व्यवस्था त्यांनी माऊलींच्या पालखीला करवली. महाराष्ट्रातील प्रमुख संतांच्या पालख्या आजही मोठ्या दिमाखात आणि शिस्तीत आषाढी एकादशीला पंढरपुरात पोचतात.’

(संदर्भ : त्रैमासिक ‘सद्धर्म’, जुलै २०१७)

 

७. वारकर्‍यांनी पुढील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे !

अ. मी सदा सत्य बोलीन.

आ. मी परस्त्री मातेसमान मानीन.

इ. काही अपराध घडला, तर श्री विठ्ठलाचे चरणांवर हात ठेवून मी स्वीकृती देईन आणि क्षमेची याचना करीन.

ई. मी नित्य शुद्ध सात्त्विक आहार शाकाहार घेईन.

उ. मी वर्षातून एकदा पंढरी, देहू आणि आळंदीची वारी करीन.

ऊ. मी एकादशीचे व्रत करीन.

ए. मी ‘रामकृष्ण हरि’ या मंत्राचे प्रतिदिन १०८ वेळा पठण करीन.

ऐ. मी ‘ज्ञानेश्वरी’, ‘एकनाथी भागवत’ आणि ‘तुकारामांची गाथा’ हे तीन ग्रंथ नियमित वाचीन.

ओ. मी प्रतिदिन हरिपाठ करीन आणि त्याविना जेवणार नाही.

औ. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे ‘पसायदान’ म्हटल्याविना मी जेवणार नाही.

अं. मी नेमाने स्नान झाल्यावर गोपीचंदनाच्या मुद्रा लावीन.

क. मी कपाळी बुक्का लावल्याविना व्यवहार करणार नाही.

ख. प्रपंचातील वाट्याला आलेले कार्य श्री विठ्ठलाच्या साक्षीने प्रामाणिकपणे पार पाडले कि नाही, हे सांगण्यासाठी मी प्रतिवर्षी वारीला जाईन.

ग. पूर्वी एक म्हण होती, ‘वारकरी वारीत पहावा. वारीत न दिसला, तर विठ्ठल चरणी रुजू झाला’, असे समजावे. मी हे पाळीन.

घ. मी वारीला आल्यावर चंद्रभागेचे स्नान करून नगरप्रदक्षिणा करीन.

च. मी वारीला आल्यावर नामस्मरण, सेवा, प्रवचन, भजन, कीर्तन आणि श्रवण करीन.

छ. मी भजनात आणि नामस्मरणात काळ घालवीन.’

– कै. भागवताचार्य वा.ना. उत्पात, पंढरपूर

(साभार : ‘आध्यात्मिक ॐ चैतन्य’, दिवाळी विशेषांक २०१४)

Leave a Comment