पांडुरंगाच्या ओढीने वारीत आनंदाने वाटचाल करणारे वारकरी !

 

१. वर्षभर पुरेल, इतका आनंद देण्याचे
सामर्थ्य वारीत असल्याचे वारकऱ्यांना जाणवणे

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आणि निरनिराळ्या ठिकाणांहून प्रतिवर्षी लाखो वारकरी आषाढी अन् कार्तिकी एकादशीला पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात. ते हरिनामाच्या गजरांत, टाळ-मृदंगाच्या साथीने अनुमाने दोनशे मैल (३२२ कि.मी.) चालत जातात. अशा वेळी त्यांना ना थकवा असतो, ना कशाची काळजी असते ! त्यांना ही प्रेरणा त्यांच्या पांडुरंगावर असलेल्या श्रद्धेमुळेच मिळत असते. त्यांच्या या श्रद्धेला ‘अंधश्रद्धा’ म्हणता येणार नाही. समाजाच्या सर्व स्तरांतून बायाबापड्या, मुले, तरुण, वृद्ध आपल्या दुर्दम्य इच्छेने या भक्तीप्रवाहात सामील होतात. यात भाविकता आहे. जीवनाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी आहे. वारकऱ्यांना पुढील वर्षभर पुरेल, इतका आनंद देण्याचे सामर्थ्य या वारीत आहे.

परात्पर गुरु परशराम माधव पांडे

 

२. पांडुरंगाच्या वास्तव्याने भूमीवरील वैकुंठच
झालेल्या पंढरपुराला जात असल्याने वारकऱ्यांना आनंद होणे

वारकरी इतक्या आत्मीयतेने पांडुरंगाकडे का ओढले जातात आणि त्यांना इतका आनंद का होतो ? याविषयी सांगतांना संत तुकाराम महाराज म्हणतात,

नातुडे जो कवणे परी । उभा केला विटेवरी ।। १ ।।
भला भला पुंडलिका । मानलासी जनलोकां ।। ध्रु. ।।
कोण्या काळें सुखा । ऐशा कोण पावता ।। २ ।।
अवघा आणिला परिवार । गोपी गोपाळांचा भार ।। ३ ।।
तुका म्हणे धन्य जालें । भूमी वैकुंठ आणिले ।। ४।।

– संत तुकाराम गाथा, अभंग २०८९

संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘अरे पुंडलिका ! तू खरोखरच धन्य आहेस; कारण तू येथील भूतलावरील लोकांना सुख देण्याकरता या वैकुंठीच्या पांडुरंगाला पंढरपूरला आणून त्याला या विटेवर उभे केले आहेस. यावरून तुझे सामर्थ्य आणि तुझ्या तपस्येचा अंदाज येतो. एवढेच नव्हे, तर तू भगवान श्रीकृष्णाचा द्वापरयुगातील गोपी गोपाळांचा परिवार या कलियुगातील पंढरपूरला आणून संत आणि भक्त यांच्याद्वारे येथेही रासक्रीडेचा आनंद सर्वांना देत आहेस. तुझ्यामुळे जग धन्य झाले. तू वैकुंठच पृथ्वीवर आणलेस.’

त्यामुळे वारकऱ्यांना पृथ्वीवरील या वैकुंठाला जातांना अतीव आनंद होत असतो.

 

३. भक्तीमय वातावरणात वाटचाल करणारे वारकरी !

वारीत ‘तृण आणि पाषाण तेही जीव मानावे’, असे मानणाऱ्या संतांच्या भूमिकेत राहून (ते जीव दुखवू नयेत; म्हणून) अनवाणी चालणारे हे वारकरी भगव्या पताका घेऊन अस्सल मराठमोळ्या रंगाची उधळण करत; चिपळ्या, टाळ आणि मृदंग यांच्या नादात मोठ्या आनंदाने नाचत हरिपाठ म्हणत जात असतात. त्यामुळे सभोवतालचे सर्व वातावरण भक्तीमय होऊन जाते. सर्वांचा अहंकार नाहीसा होऊन ते आनंदात डुंबून जातात. भक्ती हा भारतीय समाजाचा गाभा आहे. महाराष्ट्र आणि अन्य ठिकाणच्या कानाकोपऱ्यातून येणारे वारकरी अन् भाविक वर्षभर जमवलेला पै-पैसा व्यय (खर्च) करून वारीला येतात. ते अत्यल्प सामान घेऊन, हातांत टाळ आणि मुखात ‘माऊली’च्या नामाचा गजर करत अत्यंत आनंदात वाटचाल करत असतात.

या आनंदाच्या आस्वादनामुळे बहिणाबाई आपले चरित्र लिहू शकली आणि चोखामेळा पांडुरंगाशी एकरूप होऊ शकला.

 

४. भगवंताला कोणते भक्त (वारकरी) आवडतात ?

संत एकनाथ महाराज यांनी ‘एकनाथी भागवता’मधील ११ व्या अध्यायात
भक्ताविषयी पुढीलप्रमाणे प्रतिपादन केले आहे. (ओवी ११७६ ते ११८०) (संदर्भ : सार्थ श्री एकनाथी भागवत)

४ अ. भगवंताला भोळ्या भक्तांची ओढ असणे : भगवान श्रीकृष्ण भागवतात म्हणतात, ‘मला भोळ्या भक्तांची अतिशय आवड आहे. ती गोडी तुला काय सांगू ? ते नसतील, तर कुणी कितीही सुखाचे उपचार केले, तरी ते मला आवडत नाहीत. अशा भोळ्या भक्तांना मी उत्तम ‘भागवत’, म्हणजे ‘भक्त’ समजतो. मी भगवंत असूनही त्यांचे पाय धरतो. अशा भक्तांच्या भेटीसाठी मी निःसंशय अत्यंत उत्कंठित असतो. असा भक्त सावधचित्त असतो. असा हा माझा निष्कपट आणि भाव असलेला भोळा भक्त कुठेही असला, तरी मी त्याच्याकडे धाव घेतो. असा भक्त दुर्लभ असतो. उद्धवा, तुला काय सांगू ! मी अशा भोळ्या भक्ताला स्वतः विकला जातो आणि त्याला आपलासा करून टाकतो. मला माझ्याहूनही माझ्या भक्तांचे मोल अधिक आहे; म्हणून तर मी त्यांना वश राहून कधीही त्यांच्या शब्दाचे उल्लंघन करत नाही.’

(‘परात्पर गुरु डॉ. आठवले हेसुद्धा साधकांवर असेच अपार प्रेम करतात. साधकांचे त्रास दूर होऊन त्यांची आध्यात्मिक उन्नती व्हावी, यासाठी ते अपार कष्ट घेत आहेत.’ – परात्पर गुरु पांडे महाराज)

४ आ. भाव तेथे देव

४ आ.१. ‘जेथे भाव आहे, तेथे देव प्रकट होतो’, हा भगवंताचा स्वभाव आहे. (संदर्भ : सार्थ श्री एकनाथी भागवत, ओवी ११८३)
४ आ.२. ‘माझ्या प्रतिमांचे दर्शन घेण्यासाठी माझा भक्त प्रेमाने धावत येतो.’ (संदर्भ : सार्थ श्री एकनाथी भागवत, ओवी ११९०)

४ इ. भक्त जेथे ‘रामनामा’चा निरंतर जप करत असतो, तेथे सर्व पातके दूर होतात आणि कलि तेथे उभा रहात नाही.’ 

(संदर्भ : सार्थ श्री एकनाथी भागवत, ओवी १२१९)

 

५. भगवद्भेटीसाठी भक्ताची धारणा कशी असावी ?

भक्तानेसुद्धा भगवंताला (पांडुरंगाला) ज्यामुळे आनंद होईल, असे वर्तन करणे आवश्यक आहे. यासाठी त्याने भावावस्थेत राहून प्रत्येक कर्म करायला हवे. भगवंतभेटीसाठी वारकरी उत्सुक असल्याने ते तसे करतात. ते पांडुरंगाचे नाम घेत पायी प्रवास करत आनंदाने त्याच्या भेटीला जात असतांना मार्गात त्यांना अनेक संकटांतून जावे लागते; परंतु पांडुरंगाच्या भेटीच्या उत्सुकतेमुळे वारकऱ्यांना त्यांचे (संकटांचे) काहीच वाटत नाही. भगवंतही त्यांच्यातील भाव ओळखून त्यांच्या भेटीसाठी उत्सुक असतो.

ज्याप्रमाणे कमलपत्र पाण्यावर विसावूनही पाणी त्याला स्पर्श करत नाही, त्याचप्रमाणे प्रत्येक कर्म करतांना शाश्वत अशा चैतन्याच्या सतत सान्निध्यात राहिल्यास तो जीव मायेच्या भौतिक सुखाच्या भवबंधनातून तरून जाऊन सतत आनंदात रममाण होतो. अशा प्रकारचा भक्त भगवंताला प्रिय असतो.

– परात्पर गुरु (कै.) परशराम माधव पांडे

संदर्भ : पंढरीचा पहिला वारकरी (पांडुरंग) (पांडुरंगाचे माहात्म्य अन् पंढरीच्या वारीची वैशिष्ट्ये यांसह)

Leave a Comment