आषाढी एकादशी – पंढरपूरला होणारा भागवतभक्तांचा महासंगम

Article also available in :

अनुक्रमणिका

नावीन्यपूर्ण आध्यात्मिक संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥’

या अभंगाची प्रचीती आज प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल भक्त घेत नित्यनेमाने घेत असतो. नव्हे, तर पंढरीचा विठ्ठल हा वारकर्‍यांचा श्‍वासच आहे. त्याच्या नामाविना त्यांचे कोणतेच कर्म होत नसते. अशा भगवद्भक्त असलेल्या वारकर्‍यांचा महासंगम पंढरपूर यात्रेच्या म्हणजेच वारीच्या निमित्ताने होत असतो; पण यंदाच्या वर्षी कोरोना महामारीचा प्रादुर्भाव होण्याच्या शक्यतेमुळे संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वरमाऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिकात्मक पालख्या निघाल्या. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने या दोन्ही संतांच्या पादुका श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी बसने नेण्यात येणार आहेत. याद्वारे भगवंत आणि भक्त यांची भेट होणार आहे. यंदाच्या वर्षी जरी पंढरपूरला जाता आले नाही, तरी प्रत्येक वारकरी मनातून विठ्ठलाला आळवत समष्टी कल्याणासाठी कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करत असेल, हेही निश्‍चित !

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्या समवेतच्या महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधक गटाने एका पंढरीच्या वारीचे आणि त्यात होणार्‍या रिंगणाचे चित्रीकरण केले. त्याची माहिती येथे पाहूया !

 

पंढरपूरच्या वारीत श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी अनुभवलेली
वारकर्‍यांची परमोच्च भावस्थिती आणि ज्ञानेश्‍वर माऊलींचा वात्सल्यमय कृपाशीर्वाद !

श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

१. अलौकिक, अद्भुत आणि टाळ-मृदुंगाच्या गजरात
हर्षभरे डोलणारा आसमंत, म्हणजे अविस्मरणीय अशी पंढरीची वारी !

१ अ. पंढरीची वारी म्हणजे जणू भक्तीचा महासागर !

‘देवासाठी तहान-भूक विसरून विठ्ठल दर्शनाचा एकच ध्यास ठेवून भाव-भक्तीने पंढरपूरच्या वाटेने निघालेले वारकरी, म्हणजे जणू देवाच्या भक्तीचा महासागरच ! भक्तीचा हा महासागर देवाच्या अमृतानंदात धुंद होऊन एकच गजर करतो, ‘अवघे गरजे पंढरपूर, चालला विठूनामाचा गजर, चालला विठूनामाचा गजर !’

२. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधकांनी पंढरीच्या
या वारीचे चित्रीकरण करतांना वारकर्‍यांचा अनुभवलेला भावानंद !

२ अ. पंढरीच्या वारीचे चित्रीकरण करणे, म्हणजे वारी करण्यासारखेच असणे

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्या समवेतच्या महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधक गटाने पंढरीच्या वारीचे आणि त्यात होणार्‍या रिंगणाचे चित्रीकरण संपूर्ण एक मास उन्हा-पावसात, घंटोन्-घंटे उभे राहून आणि अपार कष्ट घेऊन संग्रहित केले आहे. वारीमध्ये चित्रीकरणाची केलेली ती सेवा म्हणजे प्रत्यक्ष वारीलाच जाण्यासारखे होते. वारीच्या नुसत्या विचारानेही भावजागृती होते, तर ‘प्रत्यक्ष वारीचा अनुभव घेणार्‍या वारकर्‍यांची भावावस्था काय असेल ?’, याचा अंदाज लावणेही कठीण आहे.

२ आ. वारकर्‍यांची अनुभवलेली अनुपम विठ्ठलभक्ती !

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी वारीत चालत असलेल्या काही वारकर्‍यांचे मनोगत जाणून घेतले.

१. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी वारीमधील एका वृद्ध वारकर्‍याला विचारले, ‘‘आजोबा, तुम्ही केव्हापासून वारी करत आहात ?’’ त्यावर तो वारकरी म्हणाला, ‘‘मी माझ्या आईच्या पोटात होतो, तेव्हापासूनच मी वारी करत आहे.’’

२. दुसर्‍या एका वारकर्‍याला विचारले, ‘‘काका, तुम्ही या उन्हातान्हात किती दिवस असेच चालणार ? सतत उन्हात चालत राहून तुम्ही काळे नाही का होणार ?’’ त्यावर ते वारकरी म्हणाले, ‘‘जोवर आम्ही आमच्या ईट्टलावानी काळं व्हत न्हायी, तोवर असेच चालत र्‍हानार.’’ म्हणजे ‘जोपर्यंत आम्ही आमच्या विठ्ठलासारखे पूर्ण काळे होत नाही, म्हणजेच त्याच्याशी पूर्णतः एकरूप होत नाही, तोपर्यंत आम्ही देवासाठी असेच चालत रहाणार.’

वारकर्‍यांच्या या उत्तरातूनच त्यांचा विठ्ठलाप्रतीचा भाव आणि अनुपम भक्ती आम्हाला अनुभवता आली. देवाच्या ओढीने चाललेल्या या वारकर्‍यांच्या चरणांची धूळ आम्ही आमच्या मस्तकी लावली आणि या वारीमध्ये गुरुसेवा करण्यासाठी सिद्ध झालो.

३. पंढरपूरच्या वारीसाठी संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या
समाधी मंदिराचा डौल मिळाल्यावर वारीचे प्रस्थान होत असणे

आळंदीहून संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराचा कळस दैवी प्रेरणेने मानाचा डौल देतो, म्हणजेच डोलतो. (यालाच तेथील बोली भाषेत ‘डौल देणे’ म्हणतात.) मानाच्या डौलाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्‍वर माऊलीची वारीसाठी आज्ञा मिळाली की, त्यांची पालखी आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने प्रयाण करते.

४. वारीतील अश्‍वांचे अनुभवलेले दैवी रिंगण आणि उत्कट भावाची परमोच्च अवस्था !

पंढरीची वारी चालू असतांना मार्गात ‘रिंगण’ नावाचा एक सुंदर प्रकार पहाण्यास मिळतो. या दिव्य पंढरीच्या वारीमध्ये होणारे माऊलींच्या दैवी अश्‍वाचे रिंगण म्हणजे एक सुंदर आणि दिव्य अनुभवच आहे !

गोल रिंगण – वेळापूर (जि. सोलापूर) जवळील परंपरागत गोल रिंगण ! यांत धावणार्‍या दोन घोड्यांमधील १. दुसर्‍या घोड्याला ‘माऊलींचा अश्‍व’ म्हणतात. (गोलात मोठे करून दाखवले आहे.) या अश्‍वावर स्थुलातून कुणीही बसलेले नसतांना स्वत: ज्ञानेश्‍वर माऊली आरूढ असल्याची वारकर्‍यांची श्रद्धा आहे. जसा माऊलींचा अश्‍व पुढे जातो, तशी त्या वाटेवरची माती सर्वांगाला लावण्यासाठी उपस्थित वारकर्‍यांची झुंबड उडते.

अ. ‘या रिंगणात २ अश्‍व असतात, त्यापैकी एकावर स्वार, म्हणजेच विठुमाऊलीचा चोपदार बसलेला असतो आणि दुसरा अश्‍व हा संत ज्ञानेश्‍वरांचा अश्‍व असतो. त्यावर स्थुलातून कुणीही बसलेले नसते. स्वतः ज्ञानेश्‍वर माऊली त्या अश्‍वावर आरूढ आहेत आणि तेच तो अश्‍व हाकत आहेत’, असा सर्व वारकर्‍यांचा भाव असतो.

आ. रिंगणाच्या वेळी सर्व वारकरी एका पटांगणात एकत्र येऊन भजन-कीर्तन म्हणत टाळ-मृदुंगाचा गजर करत उभे रहातात. त्या पटांगणात एक गोलाकार वर्तुळ आखलेले असते. या वर्तुळात माऊलीचा अश्‍व आणि दुसरा अश्‍व एकत्र धावतात. यामध्ये स्वार असलेला अश्‍व पुढे धावत असतो. अकस्मात् माऊलींचा अश्‍व त्या स्वाराला मागे टाकत पुढे निघून जातो. त्या उत्कट क्षणी सर्व आसमंत ‘माऊली, माऊली’ गजराने दुमदुमून जातो.

इ. जसा माऊलींचा अश्‍व पुढे जातो, तसे वारकरी त्या वाटेवरची माती प्रसाद म्हणून उचलून घेतात. काही वारकरी त्या मातीत लोळतात. भावाच्या उच्चावस्थेमधील ते दैवी क्षण डोळ्यांत जतन करण्यासारखे असतात. वारकर्‍यांचे माऊलींवरील हे प्रेम पाहून आपलेही डोळे भरून येतात.

श्री गुरुकृपेने या दैवी रिंगणाचे चित्रीकरण करण्याची संधी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्या समवेतच्या साधकांना लाभली.

५. संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या अश्‍वाच्या माध्यमातून आलेल्या
अकल्पित दैवी अनुभूतीतून अनुभवलेली ज्ञानेश्‍वर माऊलींची वात्सल्यमय प्रीती !

रिंगण झाल्यावर श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या मनात एका क्षणासाठी विचार आला, ‘आपल्यालाही माऊलींच्या या दैवी अश्‍वाचे दर्शन मिळावेे’; पण नंतर त्या म्हणाल्या, ‘‘आपली प्रार्थना माऊलींच्या चरणापर्यंत देव नक्कीच पोचवेल.’’ असे बोलून त्या तेथून निघणार, तेवढ्यात त्यांना पाठीवर कशाचातरी स्पर्श जाणवला. त्यांनी मागे वळून पाहिले, तर रिंगणामधील ज्ञानेश्‍वर माऊलींचा अश्‍वच त्यांच्या मागे येऊन उभा होता आणि त्याने श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या पाठीवर मायेने त्याचे तोंड टेकवले होते, जणू ज्ञानेश्‍वर माऊलीच त्यांच्या पाठीवरून वात्सल्याने हात फिरवत होते.

६. हा दैवी चमत्कार पाहून श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची
पुष्कळ भावजागृती होणे आणि त्यांनी ‘प्रत्यक्ष ज्ञानेश्‍वर माऊलींनीच गुरुकार्यासाठी
आशीर्वाद दिला असून परात्पर गुरु डॉक्टरांंच्या दैवी कार्यामुळे अशा दैवी अनुभूती येत आहेत’, असे सांगणे

हा दैवी चमत्कार पाहून श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची पुष्कळ भावजागृती झाली. ‘संत ज्ञानेश्‍वरांनीच आपली प्रार्थना ऐकून आपल्याला गुरुकार्यासाठी आशीर्वाद दिला आहे’, असे त्यांना वाटले. त्यांनी खाली वाकून माऊलींच्या अश्‍वाला भावपूर्ण नमस्कार केला. ‘पटांगणावर रिंगणासाठी सहस्रोेंंच्या संख्येने वारकरी जमलेले असतांना या दैवी अश्‍वाने श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामागे नेमकेपणाने येऊन उभे रहाणे’, हा चमत्कारच नव्हे का ? या अश्‍वाच्या डोळ्यांत असलेले अत्यंत करूणामय भाव श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना अनुभवता आले. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या दैवी कार्यामुळेच अशा दैवी अनुभूती अनुभवण्याचे भाग्य आपल्याला मिळते’, असे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितले.

७. सनातन संस्थेच्या साधकांसाठी प्रत्येक दिवस हा ईश्‍वरप्राप्तीचे दैवी रिंगण
असून त्यात गुरुमाऊलीचा अश्‍व नेहमीच पुढे दौडत असणे आणि साधक त्यांच्या मागे असणे

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य हे ईश्‍वरी नियोजनच आहे’, हे अशा अनेक अनुभूतींमधून साधकांना अनुभवण्यास मिळते. असे म्हणतात, ‘आयुष्यात एकदा तरी वारी पहावी अनुभवून’; पण परात्पर गुरुदेवांनी साधकांचे संपूर्ण जीवनच वारीसारखे दैवी करून ठेवले आहे. त्यामुळे सनातन संस्थेच्या साधकांसाठी प्रत्येक दिवस हा ईश्‍वरप्राप्तीसाठीचे रिंगणच आहे. साधकांच्या या साधनाप्रवासाच्या रिंगणात गुरुमाऊलींचा अश्‍व नेहमीच पुढे असतो आणि साधक त्याच्या मागे ! हा गुरुदेवांचा अश्‍वच आपला मार्गदर्शक आहे, यात शंका नाही.’

– श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ
(संग्राहक : श्री. दिवाकर आगावणे, आळंदी, महाराष्ट्र. (१२.७.२०११))

Leave a Comment