आषाढी एकादशी

आषाढी एकादशी म्हटले की, डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी ! वर्षभरातील २४ एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. आषाढी एकादशी या व्रतामागील इतिहास आणि तिचे महत्त्व खालील लेखातून जाणून घेऊया.

 

विठ्ठल Vitthal

श्री विठ्ठल

 

१. प्रकार

आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला ‘देवशयनी (देवांच्या निद्रेची)’ आणि वद्य पक्षातील एकादशीला ‘कामिका एकादशी’, असे म्हणतात.

 

२. इतिहास

‘पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, विष्णु, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव त्रिकुट पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढी एकादशीला उपवास करावा लागला. पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या सर्वांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला ठार मारले. ही जी शक्तीदेवी, तीच एकादशी देवता आहे.

 

३. महत्त्व

अ. आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते.

आ. कामिका एकादशी ही मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आहे. ही पुत्रदायी एकादशी आहे.

 

४. व्रत करण्याची पद्धत

आदल्या दिवशी दशमीला एकभुक्त रहायचे. एकादशीला प्रातःस्नान करायचे. तुलसी वाहून विष्णुपूजन करायचे. हा संपूर्ण दिवस उपवास करायचा, रात्री हरिभजन करत जागरण करायचे. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची आणि पारणे सोडायचे. या दोन्ही दिवशी ‘श्रीधर’ या नावाने श्रीविष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात.

 

५. पंढरपूरची वारी

अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर ! वैकुंठभुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले. त्यामुळे पृथ्वीवरील सर्वांत पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो. त्यासंदर्भात एक ओवी आहे, आधी रचिली पंढरी, नंतर वैकुंठ नगरी । संत नामदेव महाराजही आपल्या अभंगात सांगतात, जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर ! पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्रे नाश न पावणारी आहेत. एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर, कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्त्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णु यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केला आहे. काशीमध्ये शंकराचे आणि पंढरपूरमध्ये विष्णूचे स्थूल रूपात अस्तित्व आहे; म्हणूनच प्रत्येक हिंदू इहलोकाची यात्रा संपवण्यापूर्वी एकदा तरी काशीस अथवा पंढरपूरला जावे, अशी इच्छा बाळगून असतो. सप्तपुर्‍यांपेक्षाही थोरवी प्राप्त झालेले हे पंढरपूर आहे.

श्रीविष्णूचे कलियुगातील सगुण रूप म्हणजे साक्षात पंढरपूरची विठ्ठल मूर्ती !

हे व्रत आषाढ शुद्ध एकादशीपासून आरंभ करतात. वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. या संप्रदायात वार्षिक, सहामाह याप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेल, तशी वारी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते, असे समजले जाते.

पंढरपूरच्या वारीचा प्रारंभ

संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरी या ग्रंथाची निर्मिती करून समाजात भागवत धर्माची स्थापना केली आणि समाजात भागवत धर्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी नामदिंडीची, अर्थात् पंढरीच्या वारीची प्रथा चालू केली.
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

 

पंढरपूरच्या वारीचे आध्यात्मिक महत्त्व !

विठुरायाच्या नामगजरात निघणार्‍या वारीला नामदिंडीचे स्वरूप प्राप्त होते. पंढरपूरच्या वारीत सहभागी झालेल्या व्यक्तींचे तन, मन आणि धन सर्वकाही देवाच्या चरणी अर्पण होत असते. भगवंताच्या भेटीच्या ओढीने जो प्रवास केला जातो, त्यात मनाची निर्मळता असते आणि स्थूलदेहही चंदनाप्रमाणे झिजतो. त्यामुळे पंढरीला जाणारे वारकरी वारीच्या रूपाने तीर्थयात्रेलाच निघालेले असतात. – कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.७.२०१६)

भगवान श्रीविष्णूचे कलियुगातील सगुण रूपातील अस्तित्व म्हणजे पंढरीनाथाची दगडी काळी मूर्ती होय. ती केवळ साधी मूर्ती नाही, तर श्रीविष्णूचा सगुण देह आहे. पृथ्वीवरील सगुणातील भक्ती करणारे सर्व जीव या मूर्तीकडे आपोआपच आकर्षित होतात. कोणाचेही निमंत्रण नसतांना लक्षावधी भाविक येथे येतात आणि अत्यानंदाने न्हाऊन निघतात. थकून भागून येणारा जीव जेव्हा पंढरीत दाखल होतो, तेव्हा काही काळासाठी त्या जिवाची उन्मनी अवस्था झालेली असते. पंढरीच्या वारीचे हेच आध्यात्मिक रहस्य आहे. – श्री. श्रीकांत भट, अकोला.

पाच वेळा काशीला आणि
तीन वेळा द्वारकेला जाऊन जेवढे पुण्य
मिळते, तेवढेच पुण्य एका पंढरपूरच्या वारीने मिळते !

पृथ्वीवरी तीर्थे असती अपार । परी पंढरीची सर । एकाही नाही ॥ असा दाखला संत नामदेव महाराज देतात, तर न करी आळस । जाय पंढरीशी । अवघी सुखराशी । तेथे आहे ॥, असे संत चोखामेळा यांनी म्हटले आहे. काशीच्या पाच यात्रा, द्वारकेला तीन वेळा जाणे, या दोन्ही यात्रांनी जेवढे पुण्य मिळते, तेवढेच पुण्य एका पंढरपूरच्या वारीने मिळते. सर्व सुखाचे आगर आणि संत मंडळींचे माहेरघर असल्यानेच अवघी दुमदुमली पंढरी । भगव्या पताका खांद्यावरी । तुळशी वृंदावन डोक्यावरी । भाव भुकेल्यांची ही वारी ।, असे म्हटले जाते.

वारकर्‍यांच्या तळमळीमुळे विठ्ठलाला पंढरपुरात यावेच लागते !

संत ज्ञानेश्‍वरांनी वारी या व्रताचा प्रारंभ केला. तेव्हापासून चालू असलेल्या वारीमुळे पंढरपुरातील श्री विठ्ठलाची मूर्ती जागृतावस्थेत आली आहे. वारकरी राम कृष्ण हरी । असे नामसंकीर्तन सतत करत पंढरीस जातात. कलियुगात ईश्‍वराची कृपा संपादन करणार्‍या एका व्यक्तीपेक्षा सर्व मिळून जेव्हा कृपा संपादनाचा प्रयत्न करतात, तेव्हा ती समष्टी साधना होते. वारीमध्ये व्यष्टीसह समष्टी साधनाही होते आणि सर्व जिवांच्या उद्धारासाठी विठ्ठलाला पंढरपुरात भूतलावर यावेच लागते. या तीर्थाचा महिमाच असा आहे. येथील भक्तांच्या तळमळीमुळे विठ्ठलाला पंढरपुरात यावेेच लागते. पंढरपूरच्या वारीने आपल्या जीवनात भक्तीचा अखंड झरा पाझरू लागतो. भावभक्तीचे बीज प्रत्येकाच्या अंतर्मनात रुजवणारी ही वारी पृथ्वीच्या अंतापर्यंत अशीच चालू रहाणार आहे.

देव भावाचा भुकेला आहे, याची प्रचीती पंढरपूरला येते !

भक्तांच्या संकटसमयी धावून येण्यासाठी, आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी विठ्ठल पंढरपुरात उभा आहे. देव भावाचा भुकेला आहे, याची प्रचीती घ्यायची असल्यास पंढरपूरला जावे.

वारकर्‍यांनो, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील धार्मिक विधी, नियमितची पूजा, मंत्रपठण, मंदिरातील परंपरा यांवर घाला घालणार्‍या मंदिर समितीवरच आता वार करण्याची आणि विठ्ठल मंदिराचे संरक्षण करण्याची प्रतिज्ञा या आषाढी एकादशीला करून विठ्ठलाची कृपा संपादन करा !

– श्री. श्रीकांत भट, अकोला.

 

पंढरपूरची वारी म्हणजे हिंदू कुटुंब
आणि समाज यांच्यातील एकोपा वाढवणारे व्रत !

पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्राचे दैवत आहे. प्रत्येक आषाढी एकादशीला पंढरपूरला वारकरी वारी घेऊन जातात. गेल्या आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून ही वारी चालू आहे, असे वारकरी संप्रदायाच्या जडण-घडणीविषयी संत सांगतात,

‘संतकृपा झाली इमारत फळा आली ।

ज्ञानदेवे रचिला पाया ।

उभारीले देवालया ।।

नामा तयाचा हा किंकर ।

तेणे केला हा विस्तार ।

जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत ।।

तुका झालासे कळस ।

भजन करा सावकाश ।।’

येथे ‘ज्ञानदेवे रचिला पाया ।’ याचा अर्थ संत ज्ञानेश्वरांनी या संप्रदायाला तत्त्वज्ञानाची बैठक दिली, असा आहे. पंढरपूरच्या वारीने हिंदू कुटुंब आणि समाज यांत एकोपा वाढण्यास हातभार लावला आहे. व्रतांचे हे सामाजिक महत्त्व झाले. प्राध्यापक न. र. फाटक म्हणतात, ‘महाराष्ट्रातील देव-धर्म संप्रदायांच्या रूपाने जी संघटना ज्ञानेश्वरांपासूनच्या काळात अस्तित्वात होती, तिचे शैथिल्य, कर्त्या पुरुषांच्या अभावी संघटनेला आलेले दैन्य एकनाथांच्या शिकवणीने नाहीसे झाले. लोकांमध्ये देव आणि धर्म यांच्या अभिमानाचा उल्हास संचारला अन् यालाच पुढे पन्नास वर्षांनी स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांचे फळ येऊन त्याचा परिपाक महाराष्ट्रातील जनतेला अनुभवायला मिळाला.’

 

पूर्वीच्या काळी संत एकत्र आले की,
एकमेकांच्या चरणांवर डोके ठेवून आदर व्यक्त करत

पूर्वीच्या काळी संत एकत्र आले की, प्रत्येक जणच भगवत्‌स्वरूप झालेला असल्याने एकमेकांच्या चरणांवर डोके ठेवून एकमेकांप्रती आदर व्यक्त करत. (पायांवर डोके ठेवण्याने अनेक लाभ होतात, उदा. दोहोंमधील चैतन्य एक होऊन दोहोंचेही तेज वाढण्यास साहाय्य होते. ‘मी’पणा, ताठा, अहंकार न्यून होतो. ‘सगळीकडे ईश्वर भरलेला आहे’, ही भावना बळावते.) आपले अनुभव सांगत, नवीन रचना (अभंग, भजने, ओव्या) म्हणून दाखवत. प्रसाराच्या नवीन कल्पना सांगत. इतरांना मार्गदर्शन करत. प्रत्येक जण या मेळाव्यात उपस्थित असल्याचे इतरांना समजावे, यासाठी पताका बाळगत असे. तोच प्रघात आजतागायत चालू आहे. थोडक्यात म्हणजे कार्तिकी एकादशीपासून आषाढी एकादशीपर्यंतच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचा आढावा देण्याचा अन् पुढील मार्गदर्शन घेण्याचा हा दिवस असल्याने या एकादशीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले.’

 

एकादशीचे व्रत कसे करावे ?

परात्पर गुरु पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

परात्पर गुरु पांडे महाराज

‘एकावर एक ११ म्हणजे एकादशी. याचा अर्थ एकत्व सोडू नये. या दिवशी लंघन करणे, उपवास करणे, याचा उद्देश आहे, लक्ष तिकडे न जाता भगवंताकडे रहावे. मात्र आता हा अर्थ गौण झाला आहे आणि उपवास प्रधान झाला आहे ! या दिवशीचे तत्त्व साधना करण्याला अनुकूल असते. एकादशी प्रतिदिनच केली पाहिजे; मात्र एक दिवस योग्य तर्‍हेने केल्यास त्याचा प्रभाव १५ दिवस टिकतो; म्हणून एका मासात २ एकादशी असतात.’

– (परात्पर गुरु) परशराम पांडे (महाराज), सनातन आश्रम, देवद, पनवेल

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

1 thought on “आषाढी एकादशी”

  1. खूप सुंदर माहिती.प्रत्यकाने संग्रही ठेवावी.

    Reply

Leave a Comment