सनातनच्या संतरत्न पू. (श्रीमती) सुमन नाईक यांचा साधनाप्रवास !

पू. (श्रीमती) सुमन नाईक

 

१. बालपण

‘पू. सुमनमावशी त्यांच्या आई-वडिलांच्या पुष्कळ लाडक्या होत्या. त्यांचे लहानपण आई-वडिलांसमवेत हसत-खेळत गेले. लहानपणी त्या त्यांच्या मामांकडे १४ वर्षे राहिल्या. मामांच्या कुटुंबात भावंडांसह ४० जण रहात असत.

१ अ. बालवाडीतच शाळा सोडणे

‘मी ८ वर्षांची असतांना आजीनेे मला शाळेत घातले. आजी माझे पुष्कळ लाड करायची. घरी मी एकटीच मुलगी होतेे. माझ्यानंतर १० वर्षांनी एक भाऊ झाला. शाळेत असतांना मी सारखी मामाच्या घरी जायचे; म्हणून मला तिकडेच (मामाच्या गावातच) शाळेत घातले. मी कधी शाळेत जात असे, तर कधी जायचे नाही. मी बालवाडीतच शाळा सोडली.

१ आ. आजी धार्मिक असल्याने तिने चांगले संस्कार करणे
आणि तिच्याकडून कर्मकांडानुसार साधना शिकायला मिळणे

माझी आजी पुष्कळ सात्त्विक होती. तिने मला झाडांवरील फुले काढायला आणि हार करायला शिकवले. आता आपल्याला सनातन संस्थेमध्ये ‘दैनंदिन कृतीमागील आध्यात्मिक शास्त्र’ सांगितले जाते; परंतु हेे शास्त्र आजीला ठाऊक नसूनही तिने मला त्या पद्धतीनेच (शास्त्रानुसारच) सर्व शिकवले आणि माझ्यावर धर्माचरणाचे संस्कार केले. माझ्या आजीची शिकवण पुष्कळ चांगली होती. ती मला ‘स्त्रियांनी केस मोकळे सोडायचे नाहीत. त्यांनी कपाळावर नेहमी कुंकू लावायचे’, इत्यादी गोष्टी करावयास सांगायची.

मी १४ वर्षे आजीकडे राहिले. तिच्याकडून मला ‘कर्मकांडानुसार साधना’ शिकायला मिळाली. आजी प्रतिदिन देवळात जायची. आजीची प्रत्येक गोष्ट सात्त्विक असायची. (तिचे सोवळे-ओवळेही पुष्कळ होते.) आजी हुब्बळीचे ‘सिद्धारूढ स्वामी’ यांची साधना करायची. माझ्या मामांकडे ४० जणांचे कुटुंब होते. तेथे मला खेळायला पुष्कळ मिळायचे. माझे बालपण पुष्कळ आनंदात गेले. मी नंतर माझ्या आई-वडिलांकडे आले. वयाच्या १९ व्या वर्षी माझा विवाह झाला.

 

२. वैवाहिक जीवन

२ अ. शेतात उन्हात कामे करावी लागणे आणि ऊन लागू नये; म्हणून सूर्यदेवतेला प्रार्थना करणे

विवाहानंतर त्यांचे जीवन कष्टाचे होते. त्यांना शेतामधे काम करायला लागायचे. तेव्हा प्रखर ऊन असायचे. त्या वेळी पू. मावशी सूर्यदेवतेला प्रार्थना करायच्या, ‘तुझी सावली आमच्यावर असू दे.’

२ आ. जळणासाठी लाकडे तोडायला रानात जाण्याचा असह्य त्रास होणे
आणि याविषयी देवाला सांगितल्यावर दुसर्‍या दिवसापासून घरच्यांनी रानात पाठवणे बंद करणे

बर्‍याच वेळा त्यांना जळणासाठी (सरपणासाठी) रानात जाऊन लाकडे तोडून आणावी लागायची. त्याचा त्यांना पुष्कळ त्रास व्हायचा. त्या ते यजमानांना सांगू शकत नव्हत्या. एकदा त्रास असह्य झाल्यावर त्या देवापाशी बसून रडून देवाला सांगत होत्या, ‘आता हा त्रास सहन होत नाही. मी काय करू ?’ दुसर्‍या दिवसापासून घरच्यांनी त्यांना लाकडे आणण्यासाठी रानात पाठवणे बंद केले.

२ इ. कुटुंबात होणारा त्रास निमूटपणे सहन करणे आणि त्रास असह्य झाल्यावर जीवन
संपवण्यासाठी रात्री तळ्यातल्या पाण्यात गेल्यावर शेजारील व्यक्तीने समजूत घालून घरी परत आणणे

पू. मावशींच्या कुटुंबात त्यांना पुष्कळ त्रास व्हायचा. नातेवाईक विनाकारण उलट-सुलट बोलायचे, जाणीवपूर्वक चुकीच्या कृती करून मावशींना दुखावेल असे ते करत होते ! पू. मावशी काहीही न बोलता हे सर्व निमूटपणे सहन करायच्या. तेव्हाही त्यांचा दृष्टीकोन ‘कुटुंबात कुणी चुकीचे वागतात; म्हणून आपण तसे वागायचे नाही’, असा होता. एक दिवस त्यांना हा त्रास असह्य झाला आणि रात्री ११.३० वाजता त्या आपले जीवन संपवायला तळ्याकडे निघाल्या. त्या तळ्याकडे रात्री ८.३० नंतर कोणीही जात नसे. पाण्यात उतरून पुढे-पुढे जातांना पाणी गळ्यापर्यंत आले आणि त्यांच्या शेजारी रहाणार्‍या एका व्यक्तीने त्यांना ‘सुमन’ अशी हाक मारली. त्यांना हटकले आणि समजूत घालून घरी परत आणले. या प्रसंगावर पू. मावशी म्हणतात, ‘‘देवाला माझ्याकडून साधना करवून घ्यायची होती; म्हणूनच देवाने मला वाचवले.’’ या प्रसंगानंतर मात्र मावशी काही वर्षे माहेरी राहिल्या.

२ ई. घराच्या ठिकाणी असलेले वारूळ स्वच्छ करूनही पुन्हा सिद्ध होणे आणि
श्री कपिलेश्‍वराला प्रार्थना करून तेथील विभूती वारूळाच्या स्थानावर टाकल्यावर वारूळ होणे बंद होणे

थोड्या दिवसांनी त्या यजमान आणि मुले यांसह एका पडक्या घरात राहू लागल्या. त्या ठिकाणी वारूळ होते. मावशींनी ते स्थान स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला, तरी १५ दिवसांनी पुन्हा तेथे वारूळ सिद्ध व्हायचे. तेव्हा मावशींनी घरासमोर असणार्‍या कपिलेश्‍वर मंदिरामधे जाऊन कपिलेश्‍वराला प्रार्थना केली, ‘देवा, आता तूच काय ते बघ !’ असे म्हणून त्यांनी मंदिरातील विभूती आणून वारूळ असणार्‍या स्थानावर टाकली. त्यानंतर तेथे पुन्हा वारूळ झाले नाही. तेव्हा शेजार्‍यांनाही आश्‍चर्य वाटले.

२ उ. मुलांवर चांगले संस्कार करणे

पू. मावशींची आर्थिक स्थिती पुष्कळ हलाखीची होती. मावशींचे शिक्षणही अल्प होते; परंतु त्यांनी मुलांना शिकवले, त्यांच्यावर चांगले संस्कार केले आणि चांगले घडवलेही ! त्या मुलांना नेहमी सांगायच्या, ‘‘कोणाचीही वस्तू घ्यायची नाही. कोणाच्या झाडाची फळे तोडायची नाहीत.’’ पू. मावशी शिकलेल्या नसतांनाही मुलांकडून अभ्यास करवून घ्यायच्या.

२ ऊ. पू. मावशींना काही दुःख किंवा त्रास असेल, तर त्या देवालाच सांगायच्या आणि देवाजवळच रडायच्या.

२ ए. कुटुंबातील व्यक्तीविषयी पूर्वग्रह न ठेवता त्यांची सेवा करणे

काही दिवसांनी कुटुंबातील व्यक्ती त्यांच्या घरी रहायला आल्या. तेव्हा मनामधे त्यांच्याविषयी कोणताही पूर्वग्रह न ठेवता पू. मावशी त्यांच्याशी प्रेमाने वागल्या आणि त्यांची सेवा केली.

 

३. सनातनच्या संपर्कात येण्यापूर्वी करत असलेली साधना !

३ अ. कडक उपवास करणे आणि कपिलेश्‍वरीच्या देवळात नियमित जाणे

मी पुष्कळ उपवास करायचे. माझ्या यजमानांना मासे पुष्कळ आवडायचे. त्यांना जेवणात मासे लागायचे; म्हणून मी उपवासाच्या दिवशी स्वयंपाक केल्यावर सर्व घर स्वच्छ करायचे आणि सकाळपासून काहीही न खाता सायंकाळी ५ वाजता पुन्हा अंघोळ करून केवळ चहा प्यायचे. श्रावण मासात तर मी प्रतिदिन कडक उपवास करत असे. श्रावण मासात यजमानांचे जेवण झाल्यावर मी चूल आणि भूमी (जमीन) स्वच्छ करायचे. त्यानंतर मी उपवासाचे पदार्थ बनवून ते खात असे. असे मी पुष्कळ वर्षे केले. मी प्रतिदिन कपिलेश्‍वरी देवळात जात असे.

 

४. सनातनशी संपर्क

४ अ. देवळात सनातनच्या सत्संगाला आलेल्यांची देवळाबाहेर
व्यवस्थित ठेवलेली पादत्राणे पाहून ‘हे पुष्कळ चांगले आहे’, असे वाटणे

बोरी येथील कपडे शिवणारा एक ब्राह्मण मला प्रतिदिन विठोबाच्या देवळात यायला सांगायचा; परंतु मी त्याला म्हणायचे, ‘‘मी पुष्कळ कर्मकांड करते. मी कशाला तिथे जाऊ ?’’ तरी तो मला बोलवायचा. तिथे लोक भजने म्हणत असत. ते माझ्या यजमानांना आवडत नव्हते. देवाचे कुठे काही असेल किंवा संतांचे प्रवचन कुठेही असले, तर मी जात असे. एकदा विठोबाच्या देवळात सत्संग चालू होता. ‘ते काय करतात ?’, हे पहाण्यासाठी मी त्या सत्संगाला गेले. त्या वेळी ‘देवळाच्या बाहेर व्यवस्थित लावलेली पादत्राणे पाहून मला ‘हे पुष्कळ चांगले आहे’, असे वाटले. तेव्हा श्री. विवेक पेंडसे सत्संग घेत होते. सत्संगात मला नामस्मरण करण्याविषयी कळले.

४ आ. सत्संगात म्हणत असलेली भजने आवडल्यामुळे भजनांच्या ओढीमुळे सत्संगाला जाणे

त्या सत्संगात श्री. विवेक पेंडसे यांनी मला १५ मिनिटे दत्ताचा नामजप करण्यास सांगितला. तेव्हाही मला वाटले, ‘मी पुष्कळ उपवास इत्यादी करते, तर मग मी नामजप का करू ?’ देवळात सत्संगात भजने म्हणत असत. त्याची मला ओढ लागली. भजनांच्या ओढीमुळे मी मंगळवारची वाट पाहू लागले. देवळात मंगळवारी सत्संग होत असे. माझे यजमान घरी येण्याच्या अगोदर मी घरी यायचे. त्यामुळे त्यांना हे ठाऊक नव्हते. एक दिवस मात्र मी त्यांना ‘‘मी भजनाला जाते आणि कामावरून येतांना तुम्ही मला न्यायला या’’, असे सांगितले. तेव्हापासून मी प्रत्येक मंगळवारी भजनाला जायचे. माझी सासू वारल्यावर माझे भजनाला जाणे बंद झाले.

 

५. संत भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या सोहळ्यानिमित्त इंदूरला जाणे

५ अ. आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे इंदूरला कार्यक्रमास जाण्यास नकार देणे

त्यानंतर काही दिवसांनंतर मी सत्संगाला गेले. तेव्हा साधकांनी माझे संत भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सवासाठी इंदूरला जाण्याचे नियोजन केले असल्याचे मला कळले. एक साधिका (सौ. ज्योती जोशी) मला म्हणाली, ‘‘मावशी, तू इंदूरला येणार ना?’’ मी तिला नकार दिला; कारण तेव्हा माझी आर्थिक स्थिती चांगली नव्हती. पती मला पैसे द्यायचे नाहीत. मी इंदूरला येण्यास नकार दिल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘मी तुम्हाला पैसे देते. तुम्ही मला नंतर द्या’’; पण ‘नंतर तरी मी पैसे कसे देणार ?’, असा विचार करून मी इंदूरला जाण्यास नकार दिला. त्या वेळी मला संत भक्तराज महाराज यांच्याविषयी फार काही ठाऊक नव्हते. नंतर मी माझ्या लहान मुलाला ‘मी मावस बहिणीसह इंदूरला जाते’, असे यजमानांना सांगायला सांगितले. तेव्हा यजमान म्हणाले, ‘‘तुझ्याकडे पैसे असतील, तर तू जा.’’

५ आ. आर्थिक अडचण सुटून आवश्यक तेवढे पैसे
मिळाल्याने इंदूरला जाणे आणि इंदूर येथे पुष्कळ आनंद मिळणे

मी नेहमी आमच्या घराच्या मागे असलेल्या जास्वंदीच्या झाडाशी बोलायचे. मी त्या झाडाला म्हटले, ‘मला इंदूरला जायचे आहे. तुला ९ फुले लागली, तर मी जाईन आणि ७ फुले आली, तर मी जाणार नाही.’ मी डोळे बंद करून फुले तोडत होते. असे मी ३ दिवस केले. एके दिवशी झाडाला ९ फुले आली आणि दोन दिवस ५ फुले आली. तेव्हा ‘मी इंदूरला जाणार’, याची मला निश्‍चिती वाटली; पण जाण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. माझे पती कंत्राटदारांना रेती पुरवायचे. त्याचे त्यांना एका माणसाकडून ३ सहस्र रुपये येणेे होते. इंदूरला जाण्याच्या ५ दिवस अगोदर त्या व्यक्तीने यजमानांना ३ सहस्र रुपये दिले. माझे यजमान मला म्हणाले, ‘‘तू इंदूरला केव्हा जाणार आहेस ?’’ तेव्हा ते ‘माझी थट्टा करत आहेत’, असे मला वाटले. ते म्हणाले, ‘‘मी तुला खरंच विचारत आहे.’’ मी त्यांच्याकडे १ सहस्र रुपये मागितले. मी इंदूरला जाताना यजमानांनी मला ३ सहस्र रुपये दिले. यापूर्वी मी कधी हातात ५०० रुपयेसुद्धा घेतलेले नव्हते. मला पुष्कळ आनंद झाला. ते वर्ष १९९५ होते. मी हा प्रसंग एका साधिकेला (डुंबरे वहिनींना) सांगितला. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘प.पू. बाबांनी (संत भक्तराज महाराज यांनी) तुमची सोय केली ना !’’

५ इ. इंदूरला गेल्यावर तीर्थयात्रेपेक्षा अधिक आनंद मिळणे

मला नातेवाइकांनी तीर्थयात्रेला नेल्यावरही जितका आनंद मिळाला नव्हता, तेवढा आनंद मला इंदूरला गेल्यावर मिळाला. तेथे गेल्यावर दिवस कसे जात होते, हे मला  कळत नव्हते. मला कोणाचीच आठवण येत नव्हती. मला इतर कसलेच भान उरले नव्हते.

 

६. इंदूरला आलेल्या अनुभूती

६ अ. माणसाच्या उंचीपेक्षा अधिक उंच भांड्यांचा ढीग पाहून  ‘ही सेवा
कशी जमणार ?’, असे वाटणे; पण दोन साधकांसह भजने म्हणत भांडी घासत असतांना
अवघ्या ३० मिनिटांच्या आत भांडी घासून पूर्ण होणे अन्  पुष्कळ भाज्याही अल्प वेळेत चिरून होणे

इंदूरला जाण्यापूर्वीच ‘तेथे गेल्यावर कोण काय सेवा करणार ?’, हे आम्हाला विचारलेे होते. मी माझे नाव भांडी घासण्याच्या सेवेत दिले होते. तेथे घासण्यासाठी भांडी पुष्कळ होती. १५ सहस्र वाट्या इत्यादी असे होते. तेथे पुष्कळ भक्त होते. जेवण झाल्यावर सर्व जण भांडी घासण्यासाठी आणून ठेवायचे. माणसाच्या उंचीपेक्षा अधिक उंच भांड्यांचा ढीग असायचा. तो बघून मला वाटले, ‘मी भांडी घासण्यासाठी नाव दिले आहे; पण आता कसे होईल ?’, तेव्हा नामजप नव्हता, तर भजने अधिक असायची. आम्ही केवळ तीनच साधक भजने म्हणत म्हणत ३० मिनिटांच्या आत एवढी सगळी भांडी घासायचो. भाज्या चिरतांनाही असेच व्हायचे. भजने म्हणत भाज्या चिरतांना ‘इतक्या भाज्या कधी चिरल्या गेल्या ?’, ते कळायचे नाही. इंदूरला मला आनंद आणि उत्साह मिळाला. तेथून येतांना मला पुष्कळ रडू आले.

६ आ. संत भक्तराज महाराज यांना एका व्यक्तीने चमत्कार करून
फूल अर्पण केल्यावर ते रागवणे तेव्हा ‘संत भक्तराज महाराज कुणीतरी महान संत आहेत’, असे वाटणे

मी प.पू. बाबा (संत भक्तराज महाराज) यांचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभी राहिले होते. सर्वजण दर्शन घेत असतांना प.पू. बाबा खाली बघत होते. बराच वेळ त्यांनी समोर पाहिले नाही. माझ्या पुढचा माणूस प.पू. बाबांचे दर्शन घेत असतांना त्या माणसाने हातातून (हात फिरवून चमत्कार केल्याप्रमाणे कृती करून) फूल काढले आणि तो ते फूल प.पू. बाबांना अर्पण करू लागला. तेव्हा प.पू. बाबा रागावून म्हणाले, ‘‘चमत्कार करतोस, तर इकडे कशाला आलास ?’’ हे पाहून माझ्या मनात आले, ‘प.पू. बाबा हे कोणीतरी महान संत आहेत.’

६ इ. ‘संत असूनही प.पू. बाबांनी भगवे कपडे
का घातले नाहीत ?’, असा विचार मनात आल्यावर स्वप्नात त्याचे उत्तर मिळणे

माझ्या मनात असाही विचार आला, ‘संत भगवे कपडे घालतात; परंतु यांनी (संत भक्तराज महाराज यांनी) भगवे कपडे का घातलेले नाहीत ?’ त्यानंतर ‘माझ्या मनात असा कसा विचार आला ?’, असे मला वाटले आणि मी याच विचारात रात्री झोपले. त्या रात्री मला एक स्वप्न पडले. स्वप्नात प.पू. बाबांच्या समवेत असलेली एक व्यक्ती आली आणि मला म्हणाली, ‘तुला प.पू. बाबांच्या विषयी काही ठाऊक नव्हते ना ? त्यामुळे तुझ्या मनात असा विचार आला. आता तू याविषयी काही विचार करू नकोस. विसरून जा.’

६ ई. सेवा करतांना चहा पिण्याची इच्छा होऊन ‘चहा मिळाला,तर बरे होईल’,
असे म्हणणे आणि वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच प.पू. बाबांनी पाठवलेल्या एका माणसाने चहा आणून देणे

इंदूरला आम्ही होतो, तेथे शेत होते. खाली चिखल होता. एके दिवशी भांडी धूत असतांना मला पुष्कळ थंडी वाजत होती. तेव्हा तेथे एक साधिका आली. मी त्या साधिकेला म्हणाले, ‘‘आपल्याला चहा मिळाला, तर बरे होईल.’’ माझे वाक्य पूर्ण होणार, तोच एक माणूस आला आणि म्हणाला, ‘‘प.पू. बाबांनी तुम्हाला चहा द्यायला सांगितले आहे.’’

६ उ.  इंदूरहून निघतांना प.पू. बाबांनी ‘येथे काय सोडून जाणार ?’,
असे विचारल्यावर यजमानांचे सिगारेट ओढण्याचे व्यसन आठवणे आणि
घरी गेल्यावर दोनच दिवसांनी यजमानांनी सिगारेट ओढतांना त्रास होत असल्याचे सांगणे

इंदूरहून निघतांना आम्ही प.पू. बाबांचे दर्शन घ्यायला गेलो. तेव्हा त्यांनी आम्हा सर्वांना एकेक नाणे दिले आणि सर्वांना विचारले, ‘‘तुम्ही इथे काय ठेवून जाणार ?’’ मी मनातल्या मनात म्हटले, ‘माझे यजमान सिगारेट ओढतात.’ घरी आल्यानंतर मला सिगारेट दिसली नाही; म्हणून मी यजमानांना विचारले, ‘‘तुम्ही सिगारेट सोडली का ?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘नाही. मी ओढतो.’’ त्यानंतर १ – २ दिवसांनी यजमान मला म्हणाले, ‘‘मला आता सिगारेट ओढल्यावर उलट्या होतात.’’

६ ऊ. यजमानांना स्वप्नात कोट आणि टोपी घातलेल्या वेशात प.पू. बाबांचे
(संत भक्तराज महाराज यांचे) दर्शन होणे, तेव्हापासून यजमानांचे सिगारेटचे व्यसन सुटणे
आणि पू. (श्रीमती) सुमनमावशींची सनातन संस्था आणि संत भक्तराज महाराज यांच्यावरील श्रद्धा वाढणे

एके रात्री यजमानांच्या स्वप्नात प.पू. बाबा आले. त्यांना वाटले, ‘त्यांचे वडील (माझे सासरे) आले.’ (यजमानांनी प.पू. बाबांना कधी पाहिलेे नव्हते.) त्यांनी मला सांगितले, ‘‘मला स्वप्नात कोट आणि टोपी घातलेली एक व्यक्ती दिसली. कदाचित ते माझे बाबाच असतील. ते आल्यापासून माझी सिगारेट सुटली.’’ मी त्यांना प.पू. बाबांचे छायाचित्र दाखवून ‘‘हेच होते का ?’’, असे विचारले. तेव्हा त्यांनी ‘‘हेच माझ्या स्वप्नात आले होते’’, असे सांगितले. तेव्हा माझी प.पू. बाबांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली. त्या वेळी मी ठरवले की, मला कोणी अगदी गाडी-बंगला दिला किंवा माझ्यावर कसलेही संकट आले, तरी मी सनातन संस्था आणि प.पू. बाबा यांना सोडणार नाही. मी श्री गणेशाला तसे वचनही दिले.

 

७. आतापर्यंत केलेल्या विविध सेवा

७ अ. गुरुपौर्णिमेला घरोघरी जाऊन प्रसार करणे

इंदूरहून आल्यानंतर मी नियमित सत्संगाला आणि सेवेलाही जाऊ लागले. त्या काळी गुरुपौर्णिमेसाठी अर्पण मागण्यास गेल्यावर समाजातील लोक ५ ते १० रुपये द्यायचे, तरीही मी प्रतिदिन सेवेला जायचे. त्या सेवेत मला पुष्कळ आनंद मिळायचा. ‘मला थकवा आला आणि मी सेवेला गेले नाही’, असे कधी झाल्याचे मला आठवत नाही. दुपारी ३ वाजता मी घराबाहेर पडून सेवा चालू करायचे आणि सायं. ७ वाजता घरी यायचे. त्या वेळी आमच्या घरी मिक्सर वगैरे अशी आधुनिक उपकरणे नव्हती. सर्व कामे हाताने करून आणि मुलांचे जेवण इत्यादी सर्व आवरून मी सेवेला जायचे. मला घरातून निघायला उशीर झाला, तर ‘कोणाचे जेवण कुठे ठेवले आहे ?’,  हे मी कागदावर लिहून ठेवत असे. अशा प्रकारे मी वर्ष १९९६ पासून २०१५ पर्यंत प्रसारसेवा केली.

७ आ. प्रसारासाठी गेल्यावर समाजातून होणार्‍या विरोधाला सकारात्मक राहून तोंड देणे

आम्ही प्रसारासाठी गेल्यावर काही घरांतून आम्हाला विरोध व्हायचा, तर काही ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळायचा. काही ठिकाणचे लोक आम्हाला ‘भीक मागायला आले’, असेही म्हणायचे. त्यामुळे पुढील वर्षी त्या ठिकाणी जातांना माझ्या समवेतचे साधक मला म्हणायचे, ‘‘मागील वर्षी या घरातील लोक आपल्याला ‘भीक मागायला आले’, असे म्हणाले होते; म्हणून या वेळी यांच्याकडे जायला नको.’’ त्या वेळी मी त्यांना सांगायचे, ‘‘ते लोक मागील वर्षी बोलले होते; परंतु या वर्षी आपल्याला तसे बोलतीलच, असे नाही’’ आणि खरोखरंच आम्ही त्या घरात गेल्यावर ते लोक अर्पण द्यायचे.

७ इ. सेवेचा कधीही कंटाळा न येणे आणि प्रसारावरून घरी आल्यावर
तत्परतेने दिवसभरातील सेवेचा आढावा दायित्व असलेल्या साधिकेला देणे

आजपर्यंत मला सेवेचा कधीच कंटाळा आला नाही. सेवा करतांना मी प्रत्येक घरात जाण्यापूर्वी जयघोष करायचे आणि सहसाधकांकडूनही करून घ्यायचे. मी सेवेचा आढावाही द्यायचे. माझ्या समवेतच्या साधकांना दूरभाष केल्यावर ते म्हणायचे, ‘‘मी आताच प्रसारावरून आल्याने थकले आहे किंवा झोपले आहे. ’’ मी प्रसार करून आल्यावर कधीच झोपायचे नाही. घरी आल्यावर प्रथम ‘किती घरी प्रसार केला ? किती पावतीपुस्तके पूर्ण झाली ?’, ते मोजायचे. आमचा आढावा घेणार्‍या साधिका सौ. अनुराधा पुरोहित मला म्हणायच्या, ‘‘मावशी, तुमचाच आढावा सर्वांत पहिला येतो.’’

 

८. अनुभूती

८ अ. ६० प्रतिशत आध्यात्मिक पातळी होण्याआधी आलेल्या अनुभूती

८ अ १. पूर्वी मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी पुष्कळ कर्मकांड करणे; पण सनातन संस्थेत आल्यानंतर सर्वकाही न मागताच मिळणे

गुरुदेवांनी माझ्या जन्माचे सार्थक केले. मला काहीच येत नव्हते. सनातन संस्थेत येण्यापूर्वी मला ‘अमुक मिळावे, तमुक मिळावे’, अशा व्यावहारिक इच्छापूर्तीसाठी मी पुष्कळ कर्मकांड केले; पण परात्पर गुरुदेव माझ्या जीवनात आले आणि मला कधी काहीच अल्प पडले नाही. पूर्वी माझी परिस्थिती इतकी कठीण होती की, मला पैसे ठाऊक नव्हते (पैसे कधी मिळत नव्हते) आणि नंतर मी कधीच काही मागितले नाही, तरी मला सर्वकाही मिळाले.

८ अ २. भ्रमणभाषचे पैसे भरण्याची परिस्थिती नसतांना आपोआप कुणीतरी पैसे भरल्याने तो चालू होणे

साधनेत आल्यानंतर भ्रमणभाषचे पैसे भरण्याएवढी माझी आर्थिक परिस्थिती नव्हती, तरीही सेवेचे नियोजन विचारण्यासाठी मी साधकांना पुष्कळ वेळा भ्रमणभाष करत असे. एक दिवस पैसे न भरल्याने माझा भ्रमणभाष बंद होता. त्यानंतर कुणीतरी ३०० रुपये भरले. मी यासंदर्भात सर्व साधकांना विचारले; पण कुणीच माझ्या भ्रमणभाषचे पैसे भरले नव्हते. तेव्हा ते पैसे देवानेच दिले होते, हे लक्षात येऊन मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. साधक मला कपडे किंवा अन्य वस्तूही द्यायचे. मला कुणी काही दिले की, मी ते परात्पर गुरुदेवांंच्या छायाचित्राजवळ ठेवत असे. तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटायची.

८ अ ३. परात्पर गुरु डॉॅ. आठवले यांच्या छायाचित्राच्या संदर्भात आलेली अनुभूती

माझ्याजवळ परात्पर गुरुदेवांचे एक छायाचित्र आहे. एक दिवस परात्पर गुरुदेवांच्या त्या छायाचित्राकडे पाहिल्यावर ‘ते माझ्याशी बोलत आहेत आणि त्यांचे डोळे हलत आहेत’, असे मला जाणवले. ते मला म्हणाले, ‘तू म्हणतेस ना की, भिंतीत देव आहे, झाडात देव आहे’, ते योग्यच आहे.’

८ अ ४. ‘नागीण’ व्याधी झाल्यामुळे कपड्यांचा स्पर्शही सहन न होणे आणि परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्रापुढे पोलके ठेवून नंतर ते घालून गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला गेल्यावर त्रास न होणे

वर्ष २००५ मध्ये मला नागीण (हर्पिस झोस्टर) झाली होती. त्या वेळी मला पुष्कळ त्रास होत होता. मी साधनेत नसते, तर मी देवालयाच्या तळ्यात आत्महत्या केली असती. मला कपड्यांचा स्पर्शसुद्धा सहन होत नव्हता. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होता. आमचा सत्संग घेणार्‍या सौ. मंगला मराठे यांनी मला कार्यक्रमाला बोलावले. त्यांनी मला साडी नेसून येण्यास सांगितले. ‘मला कपड्याचा स्पर्शही सहन होत नाही; तर मी पोलके (ब्लाऊज) कसे घालू ?’, असा मला प्रश्‍न पडला. मी परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्रापुढे पोलके ठेवले आणि नंतर ते घालून मंदिरात गेले. त्यानंतर मला हा त्रास झाला नाही.

८ अ ५. परात्पर गुरुदेवांच्या आठवणीने भावजागृती होणे आणि सूक्ष्मातून त्यांना सांगितल्यावर अडचणी सुटणे

या कालावधीत केवळ ‘परम पूज्य’, असे म्हटले, तरी माझी भावजागृती व्हायची. मला मायेत पुष्कळ त्रास व्हायचा. मी सूक्ष्मातून परात्पर गुरुदेवांना साधनेतील आणि मायेतीलही सर्व सांगत असे. मला वाटायचेे, ‘मी त्यांच्याविना कोणाला सांगू ?’ त्यांना सांगितल्यानंतर माझी प्रत्येक अडचण सुटायची. गुरूंच्या कृपेने मला कुठेच काही उणे पडले नाही किंवा मला कधी त्रासही झाला नाही. मी बसमध्ये चढले, तरी कोणीतरी लगेच उठून मला बसण्यासाठी जागा द्यायचे.

८ आ. ६० टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यानंतर आलेल्या अनुभूती

८ आ १. श्री गणपतीला प्रार्थना केल्यावर उंदराने देवघरातील फुले खाणे बंद करणे

त्या वेळी मी देवघरात देवाला वाहिलेली फुले उंदीर नेहमी खायचा. तेव्हा मी श्री गणपतीला प्रार्थना केली आणि तेव्हापासून उंदराने फुले खाणे बंद केले.

८ आ २. परात्पर गुरुदेवांनी साधकांना मार्गदर्शन करायला सांगितल्यावर बोलण्याचा सराव नसूनही सलग २ घंटे कोेेंकणी भाषेत बोलणे

१३-१४ वर्षांपूर्वी एक दिवस मी परात्पर गुरुदेवांना भेटायला गेले होते. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘तुम्ही आता गोव्यात सगळीकडे मार्गदर्शन करायला जा.’’ मी म्हणाले, ‘‘मी काय मार्गदर्शन करणार ? मला मराठी बोलताही येत नाही.’’ परात्पर गुरुदेव म्हणाले, ‘‘तुम्ही कोेंकणी भाषेत बोला आणि साधकांना मार्गदर्शन करतांना तुम्हाला आलेल्या अनुभूती सांगा.’’ त्यानंतर मी गोव्यातील सर्व केंद्रांत जाऊ लागले. त्यापूर्वी मी कधी ध्वनीक्षेपक (माईक) हातातही घेतला नव्हता. मी देवाला (गुरुदेवांना) प्रार्थना केली, ‘तुम्ही मला इथे पाठवले आहे. तेव्हा तुम्हीच आता काय ते बघा. तुम्हीच ध्वनीक्षेपक हातात घ्या.’ त्या वेळी मी २ घंटे कोेंकणीत कसे बोलले, हे मला कळलेही नाही. मार्गदर्शन संपल्यावर मला साधकांनी सांगितले, ‘‘आम्ही एका हातात ध्वनीक्षेपक घेतल्यावर थोड्या वेळाने तो दुसर्‍या हातात घेतो; पण तुम्ही ध्वनीक्षेपक हातात घेतल्यावर चुंबकाने एखादी वस्तू पकडल्याप्रमाणे धरला होता.’’

८ आ ३. मराठी भाषा मुळीच कळत नसून जोडशब्दही वाचता येत नसणे; परंतु गुरुदेवांच्या कृपेने मराठी बोलता येणे आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ही वाचता येणे

मला सेवेचा कधीच कंटाळा आला नाही. गुरुपौर्णिमा जवळ आली की, ‘अरे देवा, आता प्रसार सेवा संपणार’; या विचाराने मला वाईट वाटायचे. मी कवळे गावात ३ वर्षे सत्संग घेतले. मला शिकण्याची पुष्कळ इच्छा होती. त्या वेळी मला मराठी मुळीच कळत नव्हते आणि जोडशब्दही वाचता येत नव्हते; पण आता गुरुदेवांच्या कृपेने मला मराठी बोलता येऊ लागले आणि आता मी त्यांच्या कृपेने दैनिक ‘सनातन प्रभात’ही वाचू शकते. मला आता इंग्रजी आकडेही लक्षात येऊ लागले आहेत. आता मी भ्रमणभाषमधील इंग्रजी अक्षरेही लक्षात ठेवते. त्यातील शेवटचे क्रमांक आणि आरंभीचे अक्षर बघून ‘हा कुणाचा भ्रमणभाष आहे’, ते ओळखते.

 

९. संतपद घोषित होण्यापूर्वी

९ अ. समष्टीसाठी नामजप करणे

त्या वेळी मी प्रसारात सेवा करत नव्हते. तेव्हा माझ्या मनात विचार यायचे, ‘मी २ वर्षांपासून काही सेवा करत नाही’; परंतु परात्पर गुरुदेवांनी मला समष्टीसाठी नामजप करण्याची सेवा दिली.

९ आ. वर्ष २०१६ मध्ये तरुण मुलाचे निधन झाल्यानंतर मायेत अडकत असल्याची
जाणीव होणे आणि त्यातून बाहेर काढण्यासाठी गुरुदेवांना कळकळीने प्रार्थना करणे

वर्ष २०१६ मध्ये माझ्या तरुण मुलाचे निधन झाले. त्या वेळी मला ‘ही माया आहे आणि मी त्यात अडकत आहे. यात माझी सर्व साधना व्यय होणार’, असे वाटत असेे. मला त्याची खंत वाटत असे. एक दिवस मी परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राजवळ पुष्कळ रडले आणि गुरुदेवांना कळकळीने प्रार्थना केली, ‘हे गुरुदेवा, मला माया नको आणि नातीही नकोत. ही माया मला सोडत नाही. तुम्हीच मला यातून बाहेर काढा.’ आता माझे ‘सनातन’शीच श्रेष्ठ (खरे) नाते जोडलेले आहे. इथेच मला नात, बहिणी अशी सर्व नाती मिळाली आहेत. मला पुष्कळ नातेवाईक आहेत; पण असे प्रेम मला कुठेच मिळाले नाही. आता मला कुठल्याही प्रसंगात आनंदच वाटतो. नातेवाईक मला नावे ठेवायचे आणि म्हणायचे, ‘मुलगा गेला, पती गेला; तरीही ही सनातनमध्ये जाते’; परंतु आता मला त्याविषयी काही वाटत नाही.

 

१०. संतपद घोषित झाल्यानंतर केलेल्या सेवा

१० अ. गुरुदेवांच्या कृपेमुळे ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन
करण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, याविषयी साधकांना मार्गदर्शन करता येणे

वर्ष २०१६ मध्ये मी संत झाल्यानंतरही मला साधकांना मार्गदर्शन करण्यास सांगितले. तेव्हा ‘आपण आनंदी राहिलो, तर देवाच्या कृपेने सर्वच आनंदमय होते’, हे मला जाणवले. मला ‘आढावा कसा घ्यायचा ? काय बोलायचे ?’, हे कळत नव्हते. अशा वेळी मी गुरुदेवांना प्रार्थना करायचे. गुरुदेवांना सांगितल्यावर मला सर्व जमू लागले. ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होण्यासाठी प्रयत्न कसे करायचे ?’, हे मला साधकांना सांगता येऊ लागले. परात्पर गुरुदेवांनी मला इतक्या अनुभूती दिल्या आहेत की, मी त्या सर्व शब्दांत सांगू शकत नाही. त्यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता !

१० आ. ‘अहं घालवण्यासाठी प्रसार करण्याची सेवा मिळाली’, असा विचार येऊन कृतज्ञता वाटणे

मी प्रसारसेवेला जातांना मला कुणी काही टोचून बोलले, तर ‘देवा, तुम्ही माझा अहंभाव घालवण्यासाठी हे घडवत आहात. माझा अहं घालवण्यासाठी तुम्ही मला प्रसाराला पाठवले’, असे विचार येऊन मला गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटायची. कोणी मला काही बोलले किंवा ‘भीक मागायला आल्या’, असे म्हटले की, मला हसू यायचे.

१० इ. आश्रमातील साधकांसाठी नामजप करणे

आता मला रामनाथी आश्रमातील साधकांसाठी नामजपादी उपाय करायची सेवा दिली आहे. ती करतांनाही मला पुष्कळ आनंद मिळतो. गुरुदेवांच्या कृपेने या सेवेतही मला पुष्कळ अनुभूती आल्या.

अशा कृपाळू परात्पर गुरुदेवांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात