निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर आणि अधिवक्ता सुरेश कुलकर्णी संतपदी विराजमान

गेली अनेक वर्षे सनातन संस्थेला विविध प्रकरणांत विनाकारण गोवण्यात आले आहे. अशा काळात सनातनच्या साधकांच्या पाठीशी अनेक जण खंबीरपणे उभे राहिले. ३ जून या अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी या न्यायालयीन संघर्षाचे योद्धे आणि कर्मयोग अन् भक्तीयोग यांचा अपूर्व संगम असलेले निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर (वय ७४ वर्षे) हे सनातनच्या ९७ व्या व्यष्टी संतपदी, तर अधिवक्ता सुरेश कुलकर्णी (वय ६० वर्षे) हे सनातनच्या ९८ व्या समष्टी संतपदी विराजमान झाले आहेत, अशी आनंददायी घोषणा सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केली.

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांचा सन्मान करताना सद्गुरु नंदकुमार जाधव

पू. सुधाकर चपळगावकर आणि पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांची एकाच वेळी ६० टक्के आध्यात्मिक पातळी घोषित करण्यात आली होती. पू. सुधाकर चपळगावकर आणि पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांनी संतपद गाठण्यापूर्वी सनातनचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे सूक्ष्म ज्ञान-प्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख यांनी त्यांना मिळालेल्या सूक्ष्मज्ञानाविषयी उपस्थित धर्मप्रेमींना अवगत केले. सन्मान झाल्यानंतर पू. सुधाकर चपळगावकर आणि पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांनी सद्गुरु नंदकुमार जाधव आणि धर्मप्रेमी यांना नम्रतापूर्वक वंदन केले. त्यानंतर पू. सुधाकर चपळगावकर आणि पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले, तर उपस्थित संत अन् साधक यांनी या दोन्ही संतद्वयींची गुणवैशिष्ट्ये सांगितली.

 

१. निवृत्त न्यायाधीश पू. सुधाकर चपळगावकर यांनी व्यक्त केलेले मनोगत

मला भगवान श्रीकृष्णाकडे जाण्याचा मार्ग मिळाला आहे !

‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळेच माझी आध्यात्मिक उन्नती झाली आहे. मला पुष्कळ पुढे जायचे आहे. माझ्या आयुष्यातील किती काळ शिल्लक राहिलेला आहे, हे मला ठाऊक नाही; मात्र मला कुठे जायचे आहे, एवढे ठाऊक आहे आणि वेळ फार अल्प आहे. अधिक पुढे जाण्याचा माझा प्रयत्न राहील. प्रारंभी न्यायालयीन सेवा करणे आणि संस्थेला न्यायालयीन सल्ला देणे, ही माझी सेवा होती. परात्पर गुरु डॉक्टरांनी वर्ष २०१० मध्ये मला गोवा येथे बोलावले. तेथे गेल्यावर माझी आध्यात्मिक पातळी ६० टक्के असल्याचे सांगितले. मी पुढे जात राहिलो. एक दिवस मी सनातनचे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळेकाका यांना दूरभाष करून सांगितले, ‘‘मी येथपर्यंत (६० टक्के आध्यात्मिक पातळीपर्यंत) आलो आहे; मात्र यापुढे मला कठीण वाटते.’’ त्यांनी मला काही गोष्टी समजावून सांगितल्या. त्यानंतर सद्गुरु जाधवकाका यांचे ३ वर्षे मार्गदर्शन लाभले. मी अगोदर बुद्धीच्या स्तरावर काम करायचो. ‘बुद्धीच्या स्तरावर एका मर्यादेपुढे मी जाऊ शकत नाही’, हे माझ्या लक्षात आले. महाभारतात द्रौपदीने काही प्रश्‍न उपस्थित केले होते. तिच्या प्रश्‍नांचे उत्तर कोणीच देऊ शकले नाही. त्या प्रश्‍नांची उत्तरे नंतर श्रीकृष्णाने दिली. बुद्धीचा स्तर ज्या ठिकाणी थांबतो, तेथून भावाचा आणि शरणागतीचा स्तर चालू होतो. गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर मी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया जाणून घेतली. त्यानंतर सद्गुरु जाधवकाका संभाजीनगर येथे आले असतांना मी त्यांना ‘मला माझ्यातील स्वभावदोष लक्षात येण्यासाठी काय करू ?’ असे विचारले. तेव्हा त्यांनी मला ‘गोव्यात आश्रमात गेल्यावर लक्षात येईल’, असे सांगितले. त्यानंतर मी प्रति २ मासांनी संभाजीनगरहून गोव्याच्या आश्रमात येत राहिलो. तेथे मला स्वतःचे स्वभावदोष लक्षात यायला लागले. त्यानंतर मी मन लावून स्वभावदोष निर्मूलनासाठी प्रयत्न केले. मी स्वतःचे आत्मपरीक्षण करायला लागलो. ‘आश्रमात मला जो कोणी साधक दिसायचा, तो साधक आपल्यापेक्षा साधनेत पुष्कळ पुढे आहे’, असे वाटायचे. काही साधकांना पाहून ‘मी यांच्यासारखा कधी बनूच शकणार नाही’, असे वाटायचे, तरीही मी प्रयत्न चालू ठेवले. ज्या लोकांकडून मला प्रेरणा मिळाली, त्यांचाही मी ऋणी आहे. मी आतापर्यंत भगवान श्रीकृष्णाकडे जाण्याचा मार्ग शोधत होतो, तो मार्ग आता मिळाला आहे.’

 

हिंदु धर्मावरील दृढ श्रद्धेच्या बळावर न्यायालयासारख्या रज-तमात्मक क्षेत्रातही
प्रामाणिकपणाने आणि निःस्पृहपणे कार्य करणारे निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर

‘सध्याच्या काळात अन्याय आणि अत्याचार यांनी परिसीमा गाठलेली असतांना न्यायालयासारख्या रज-तमात्मक क्षेत्रात प्रामाणिकपणाने अन् निःस्पृहपणे काम करणारे निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर (वय ७४ वर्षे) यांच्यासारखे व्यक्तीमत्त्व दुर्मिळच म्हणावे लागेल. पारदर्शकता आणि तत्त्वनिष्ठता असलेल्या चपळगावकर यांनी आपल्या वकिली पेशाचा, तसेच अनुभवाचा धर्मासाठी वापर केला.

सुधाकर चपळगावकर हे कर्ममार्गी असून प्रत्येक कर्म ‘सत्यं शिवं सुन्दरम् ।’ अशा प्रकारे व्हावे, यासाठी ते प्रयत्न करतात. ते प्रत्येक खटल्याची सिद्धता अगदी मनापासून करत. हिंदु धर्म आणि हिंदु धर्मग्रंथ यांचा सखोल अभ्यास करून न्यायदानाच्या कामकाजात त्या अभ्यासाचा चपखल वापर करणे, हे त्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. न्यायदान योग्य प्रकारे व्हावे; म्हणून सत्याची कास धरून लढणारे धर्मनिष्ठ अधिवक्ते म्हणजे सुधाकर चपळगावकर !

हिंदु धर्माला तुच्छ लेखणार्‍या धर्मद्रोह्यांप्रती त्यांच्या मनात अतीव चीड आहे. त्यांनी इतर संप्रदाय आणि पंथ यांचाही सखोल अभ्यास केला आहे. हिंदू अधिवक्त्यांचे संघटन व्हावे, ही तळमळ असल्याने ते अधिवक्त्यांच्या संघटनात्मक कार्यासाठी या अभ्यासाचा उपयोग करतात.

सहजता, अहं अल्प असणे आणि साधकांप्रती प्रेमभाव ही त्यांची अन्य वैशिष्ट्ये आहेत. या सर्व गुणांमुळे निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर यांची जलद गतीने प्रगती होत आहे. त्यांनी आता ७१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केली असून ते सनातनच्या ९७ व्या व्यष्टी संतपदावर आरूढ झाले आहेत.

‘पू. सुधाकर चपळगावकर यांची पुढील प्रगती अशीच जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

२. निवृत्त न्यायाधीश पू. सुधाकर चपळगावकर यांची संतांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

२ अ. धर्मकार्याची तीव्र तळमळ आणि उतारवयातही (वय ७४ वर्षे)
जिज्ञासू वृत्तीने साधनाप्रवास करणारे पू. सुधाकर चपळगावकर ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

सनातन संस्थेला धर्मकार्यामध्ये कायदेशीर साहाय्य करण्यासाठी पू. सुधाकर चपळगावकर नेहमी तत्पर असतात. वयोमानानुसार त्यांना धर्मप्रसारासाठी सतत प्रवास करणे शक्य होत नाही, तरीही ते त्यांना सुचलेली नवीन सूत्रे तत्परतेने सांगतात. संभाजीनगर येथे प्रत्येक मासाला (महिन्याला) होणार्‍या राष्ट्रीय हिंदु आंदोलनालाही ते उपस्थित रहातात.

पूर्वी ते सनातनच्या साधकांना कायदेशीर साहाय्य करायचे. वर्ष २०१० मध्ये त्यांनी साधना करायला आरंभ केला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेने त्यांनी साधनाप्रवास चालू केला. त्यांना येणार्‍या साधनाविषयक अडचणींवर वेळोवेळी त्यांनी संतांचे मार्गदर्शन घेतले आणि भावसत्संग ऐकले. गेल्या वर्षीपासून त्यांना नामजपातील आनंद अनुभवता येत आहे. न्यायालयासारख्या रज-तम वातावरणात कार्य करूनही ‘भक्ती आणि निःस्वार्थ कर्मयोग’ या माध्यमातून त्यांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली.

२ आ. अधिवक्ता संत तर अनेक झाले; परंतु न्यायाधीश संत असलेले
पू. सुधाकर चपळगावकर हे एकमेव उदाहरण आहेत ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

२ इ. प्रेमभाव, नम्रता, जिज्ञासा आदी गुण असणारे पू. चपळगावकरकाका !- सद्गुरु नंदकुमार जाधव

मी पू. चपळगावकरकाका यांना नामजप सांगितला. त्यानंतर त्यांनी नामजप करणे चालू केले. जेव्हा मी संभाजीनगरला जायचो, तेव्हा ते साधना किंवा दैनिक सनातन प्रभात यांच्याविषयी त्यांना आलेल्या शंकांचे निरसन करून घेत. यातून त्यांच्यामध्ये असलेली जिज्ञासा लक्षात येते. पू. काका संभाजीनगरच्या साधकांकडून सेवेत होणार्‍या चुका लक्षात आणून देतात, तसेच ‘काय योग्य असले पाहिजे’, हेही सांगतात. त्यांच्यात प्रेमभाव आहे. काही दिवसांपूर्वी संभाजीनगर येथे माझ्या पत्नीची शल्यचिकित्सा (ऑपरेशन) होती. त्या वळी पू. चपळगावकरकाकांनी मला ‘काही साहाय्य हवे का’, असे विचारले. काही दिवसांनी आधुनिक वैद्यांनी (डॉक्टरांनी) पत्नीला तपासण्यासाठी बोलावले होते; मात्र ते माझ्या लक्षात नव्हते. त्याचीही पू. चपळगावकरकाकांनी आठवण करून दिली.

संभाजीनगरला पू. चपळगावकरकाकांच्या घरी त्यांना भेटायला गेल्यावर ते म्हणत, ‘‘तुम्ही मला भेटायला येता, हे मला चांगले वाटत नाही. तुमच्या निवासाचे ठिकाण मला सांगत चला. मीच तुम्हाला भेटायला येईन.’’ त्यांच्यात असलेला प्रेमभाव, नम्रता, जिज्ञासा, अहं अल्प असणे आदी गुणवैशिष्ट्यांमुळे, तसेच ते करत असलेल्या साधनेमुळे आजचा हा दिवस आला आहे. (त्यांनी संतपद गाठले आहे.)

२ ई. ‘आपली क्षमता सनातन संस्थेच्या कामी आली पाहिजे’,
असे सांगणारे पू. सुधाकर चपळगावकर ! – पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

(पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी पू. सुधाकर चपळगावकर यांना ‘बाळासाहेब’ म्हणतात. त्यामुळे मनोगत व्यक्त करतांना त्यांनी पू. बाळासाहेब असा उल्लेख केला आहे. – संकलक)

मी आणि पू. बाळासाहेब संभाजीनगर खंडपिठामध्ये नेहमी एकत्र असायचो. त्यावेळी सनातनचे काही साधक माझ्याकडे यायचे. पू. बाळासाहेब मला विचारायचे, ‘‘हे कोण येतात तुझ्याकडे ?’’ तेव्हा मी त्यांना सांगायचो, ‘‘ते सनातनचे साधक आहेत. त्यांना धर्मकार्य करतांना पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून कायदेशीर अडचणी येतात. त्याविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी ते येतात.’’ काही दिवसांनी ते म्हणाले, ‘‘हे सगळे कायद्याचे काम मला दे आणि तू तुझी सेवा कर. तुला असे लढण्याचे काम जमणार नाही. तुझी तशी प्रकृती नाही. ते मला दे.’’ (पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांची प्रकृती शांत आणि संयमी असल्याने ते तसे म्हणाले होते. – संकलक)

त्यानंतर ते सनातनशी जोडले गेले. त्यांची आणि माझीही आध्यात्मिक पातळी ६० टक्के असल्याचे एकाच वेळी घोषित करण्यात आले. त्यानंतर ते म्हणाले, ‘‘सनातनने आता आपल्याला प्रशस्तीपत्रक दिले आहे, तर आपली क्षमता सनातन संस्थेच्या कामी आली पाहिजे.’’ आज पू. बाळासाहेब संत झाल्याने मला अत्यानंद होत आहे.

 

३. निवृत्त न्यायाधीश पू. सुधाकर चपळगावकर यांची साधकांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

३ अ. पू. चपळगावकर यांच्यामुळे सनातनच्या साधकांमध्ये
धैर्य निर्माण झाले ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

एका प्रकरणात पुणे, कोल्हापूर, सांगली यांसह अनेक ठिकाणी साधकांची चौकशी करण्यात आली. पोलीस ठाण्याची कधी पायरीही न चढलेल्या सनातनच्या साधकांना त्या वेळी पोलिसांशी किंवा न्यायालयात कसे बोलायचे ? असा प्रश्‍न पडायचा. त्या वेळी साधक पू. सुधाकर चपळगावकर यांचे मार्गदर्शन घ्यायचे. त्यामुळे साधकांना निडरपणे प्रसंगांना सामोरे जाता आले. आताही कोणत्याही कठीण प्रसंगांना सनातनचे साधक धैर्याने सामोरे जातात, याचे कारण हे संतद्वयी त्यांच्या पाठीशी असतात. एकदा राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या न्यायालयात एका प्रकरणाची शेवटची सुनावणी होती, तेव्हा पू. चपळगावकरकाका ७ दिवस न्यायालयात स्वत: उपस्थित राहून सनातन संस्थेच्या अधिवक्त्यांना न्यायालयीन युक्तीवादासाठी मार्गदर्शन करत होते. या प्रकरणात सनातनचे साधक निर्दोष सुटले त्यात प्रत्यक्ष युक्तीवाद करणार्‍या अधिवक्त्यांसह पू. चपळगावकर यांचाही तेवढाच सहभाग आहे.

३ आ. निरागस, प्रेमळ, तत्त्वनिष्ठ आणि जिज्ञासू वृत्तीचे
पू. सुधाकर चपळगावकर ! – कु. प्रियांका लोणे, संभाजीनगर जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

३ आ १. पू. चपळगावकर काका साधकांना तत्त्वनिष्ठपणे चुका सांगतात आणि तेवढेच प्रेमही देतात !

सनातनचे साधक किंवा हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते जेव्हा वृत्तवाहिन्यांमधील चर्चासत्रांत सहभागी होतात, तेव्हा पू. सुधाकर चपळगावकर सर्व चर्चासत्रे आवर्जून पहातात. त्यात साधकांनी भूमिका मांडतांना काही सुधारणा करणे अपेक्षित असल्यास ते आवर्जून तसे कळवतात. त्यांना कार्यक्रमांमध्ये ज्या काही त्रुटी किंवा चुका लक्षात येतात, त्या ते तत्त्वनिष्ठतेने सांगतात.

३ आ २. जिज्ञासा

स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेविषयीही ते नेहमी जिज्ञासेने जाणून घेतात.

३ आ ३. हिंदुत्वनिष्ठांना साहाय्य करण्याची वृत्ती

नगर किंवा संभाजीनगर येथे धर्महानीच्या विरोधात कार्य करतांना हिंदुत्वनिष्ठांना जेव्हा काही अडचणी येतात, तेव्हा ते हिंदुत्वनिष्ठांना कायदेशीर साहाय्य करतात. हिंदुत्वनिष्ठ त्यांच्याशी परिचित नसले, तरी ‘धर्मकार्य करणारा आपलाच आहे’, अशा भावाने ते साहाय्य करण्यासाठी तत्पर असतात.

३ आ ४. आपलेपणा

प्रत्येक वर्षी गुुरुपौर्णिमेला सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्‍या आणि ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीचा आढावा दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध होतो. तो आढावा पाहून ज्या साधकांची आध्यात्मिक पातळी तेवढीच राहिली असेल किंवा न्यून झाली असेल, त्यांच्याशी ते स्वतःहून भ्रमणभाष करून बोलतात आणि ‘प्रयत्न कुठे अल्प झाले ?’, याविषयी विचारपूस करतात. ‘सर्व साधकांची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, अशी त्यांना तळमळ आहे.

३ इ. पू. सुधाकर चपळगावकर यांची निरागसता !

संतसन्मान सोहळ्यानंतर जेव्हा पू. सुधाकर चपळगावकर आणि पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी व्यासपिठावरून खाली उतरले, तेव्हा सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पू. सुधाकर चपळगावकर यांना ‘तुम्हाला संत म्हणून घोषित केले जाईल, अशी कल्पना आली होती का ?’, असे विचारले. तेव्हा पू. सुधाकर चपळगावकरकाका म्हणाले, ‘‘आज संत म्हणून घोषित करतील, असे वाटले नव्हते.’’ काही क्षण थांबून ते पुढे म्हणाले, ‘‘मला गुरुपौर्णिमेच्या दिवशी संत म्हणून घोषित करतील’, असे वाटले होते.’’ त्यावर पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णीकाका यांनी ‘हीच यांची निरागसता आहे’, असे सांगितले.

 

४. पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांनी व्यक्त केलेले मनोगत

प्रतिदिन दैनिक सनातन प्रभातने मला शिकवले !

वर्ष २००३-२००४ मध्ये दैनिक सनातन प्रभातचा वाचक म्हणून माझा सनातनशी संपर्क आला. माझ्याकडे प्रतिदिन दैनिक सनातन प्रभात येते. दैनिक पूर्ण वाचल्याशिवाय मला चैन पडत नसे. संभाजीनगर येथे पू. रमेश गडकरीकाका यांच्या समवेत हिंदु जनजागृती समितीच्या आंदोलनांना जायचो. एक दिवस आंदोलनाला असलेल्या अल्प उपस्थितीविषयी मी पू. गडकरीकाकांशी बोललो. तेव्हा त्यांनी माझे शंकासमाधान केले. तेव्हापासून आजपर्यंत माझी संस्थेविषयी आणि गुरुदेवांविषयी श्रद्धा अधिक दृढ होत गेली.

प्रतिदिन दैनिक सनातन प्रभातने मला शिकवले. सनातनच्या प्रत्येक साधकाकडून मला विनम्रता आणि सेवा करण्याची तळमळ आदी सर्व शिकायला मिळाले. त्यामुळे सनातन संस्था, परात्पर गुरुदेव, सनातनचे संत, साधक यांच्या प्रती पुष्कळ कृतज्ञता वाटत आहे. हिंदु विधीज्ञ परिषदेचे माझे दोन सहकारी या प्रसंगी उपस्थित नाहीत. त्यांची मला कमतरता जाणवत आहे. महत्त्वाच्या क्षणी ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत. यावरून आपत्काळ किती जवळ आला आहे, हे लक्षात येते.

 

विनम्रता, तसेच क्षात्रतेज असलेले आणि धर्मावरील आघातांच्या विरोधात ठोस
कार्य करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांचे संघटन करणारे अधिवक्ता सुरेश कुलकर्णी

‘सनातनचे न्यायालयाशी संबंधित कामकाज दिवसेंदिवस वाढू लागले. आताचे अनेक अधिवक्ते धर्मभ्रष्ट असल्याने ‘ते हिंदुत्वनिष्ठांना काही साहाय्य करतील’, अशी आशा नसतांना निवृत्त न्यायाधीश पू. सुधाकर चपळगावकर यांच्यासह आणखी एक अधिवक्ते सनातनचे धर्मकार्य करू लागले, ते म्हणजे अधिवक्ता सुरेश कुलकर्णी !

पहिल्यापासूनच साधनेची आणि धार्मिकतेची आवड असलेले अधिवक्ता कुलकर्णी कर्ममार्गी अन् भक्तीमार्गी आहेत. त्यांच्यात ईश्‍वराला अपेक्षित असे कर्म करण्याची तळमळ आहे. त्यांचा स्वभाव अत्यंत विनम्र आणि प्रेमळ असून न्यायालयीन क्षेत्रात त्यांच्यासारखे व्यक्तीमत्त्व अभावानेच पहायला मिळते. असत्याची पराकोटीची चीड असल्याने न्यायालयात लढतांना मात्र त्यांच्यातील क्षात्रतेज जागृत होत असे. त्यामुळे एकाच वेळी विनम्रता आणि क्षात्रतेज यांचा अनोखा संगम त्यांच्या ठायी पहायला मिळतो.

धर्मावरील आघातांच्या विरोधात अधिवक्त्यांनी काहीतरी ठोस कृती करावी, या तळमळीपोटी त्यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसह अन्य राज्यांत जाऊन तेथील अधिवक्त्यांना राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांच्यामुळे हिंदुत्वनिष्ठ विचारांच्या अधिवक्त्यांचे संघटन होऊन अनेक ठिकाणी राष्ट्र आणि धर्म यांच्यावरील आघात रोखण्यासाठी अधिवक्ते पुढे येऊ लागले आहेत.

दैवी नियोजनानुसार अधिवक्ता सुरेश कुलकर्णी आणि पू. सुधाकर चपळगावकर दोघेही एकाच वेळी सनातनच्या संपर्कात आले अन् वर्ष २०१० मध्ये दोघांनी एकाच वेळी ६० टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केली. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे दोघांची प्रकृती भिन्न असूनही त्यांचा आतापर्यंतचा साधनेचा प्रवास समान गतीने झाला आहे आणि पू. सुधाकर चपळगावकर यांच्या पाठोपाठ अधिवक्ता सुरेश कुलकर्णी हेही आता संतपदावर विराजमान झाले आहेत. त्यांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केली असून ते सनातनच्या ९८ व्या समष्टी संतपदावर आरूढ झाले आहेत.

‘पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांची पुढील आध्यात्मिक प्रगती अशीच जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

५. पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांची संतांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

५ अ. सेवेची तळमळ असलेले आणि हिंदु राष्ट्रासाठी
अधिवक्त्यांचे संघटन करणारे पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य असलेले पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी हे सेवा करण्यासाठी तत्पर असतात आणि धर्मरक्षणाच्या कार्यातही सक्रीय असतात. त्यांच्या वकिली व्यवसायातून त्यांना मधे वेळ मिळाला की, ते विविध जिल्ह्यांतील अधिवक्त्यांचे संघटन करण्याचे कार्य करतात. प्रसन्न चित्त असलेले पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी प्रत्येकाशी जवळीक साधतात. कोणत्याही वयोगटातील साधकांशी ते मोकळेपणाने बोलू शकतात. पारिवारिक समस्या असूनही गुरुकार्य आणि सेवा करण्याच्या त्यांच्या तळमळीला तोड नाही. न्यायालयीन संग्राम आणि समष्टी स्तरावर अधिवक्त्यांचे केलेले संघटन, यांमुळे ते सनातनचे ९८ वे समष्टी संत बनले आहेत.

५ आ. अधिवक्त्यांच्या संघटनामध्ये पू. (अधिवक्ता) सुरेश
कुलकर्णी यांचा मोलाचा वाटा आहे ! – सद्गुरु नंदकुमार जाधव

‘पू. (अधिवक्ता) कुलकर्णीकाका कोणाशीही हात जोडूनच बोलतात. ते नेहमी हसतमुख असतात. जेव्हा त्यांना सुटी असते, तेव्हा ते त्यांच्या सेवांचे नियोजन करण्यासाठी मला दूरभाष करतात. अधिवक्त्यांच्या संघटनामध्ये पू. कुलकर्णीकाका यांचा मोलाचा वाटा आहे. एका जिल्ह्यात दोन धर्माभिमान्यांना प्रशासनाने तडीपारीची नोटीस दिली होती. पू. काकांनी प्रयत्न केल्यावर न्यायालयाने नोटीस रहित केली. याचे श्रेय पू. काकांनी प.पू. गुरुदेवांना दिले. त्यांचात अहं अतिशय अल्प आहे. संभाजीनगरमध्ये एका मोर्च्याला पू. कुलकर्णीकाका आले होते. तेव्हा त्यांनी अन्य साधकांप्रमाणे भगवा झेंडा आणि फलक हातात पकडला होता. त्या वेळी त्यांना ‘मी उच्च न्यायालयाचा अधिवक्ता आहे’, असा विचार आला नाही. दैनिक सनातन प्रभातचे वाचन झाल्यावर ते त्यांच्या भावाला देतात आणि त्यांनाही हा दैनिक इतरांना वाचायला देण्यास सांगतात. त्यांची परात्पर गुरु डॉक्टर यांच्यावर असीम श्रद्धा आहे. ‘मी हिंदुत्वासाठी न्यायालयात जातो; मात्र हे करतांना मला विरोधकांची भीती वाटत नाही’, असे ते सांगतात. त्यांच्यात श्रद्धा, सेवेची तळमळ आणि प्रेमभाव आहे. त्यामुळे आज त्यांची आध्यात्मिक प्रगती झाली आहे.’

५ इ. कुलकर्णी यांच्यामुळेच सनातनमध्ये येऊन संत झालो ! – पू. सुधाकर चपळगावकर

१. ‘कुलकर्णी (पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी) यांच्यामुळे आतापर्यंत माझ्या साधनेची वाटचाल चालू आहे आणि त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत पोचलो आहे. मी सनातनमध्ये जो काही आहे (सनातनमध्ये येऊन संत होणे), तो त्यांच्यामुळे आहे. या सर्व गोष्टींचे श्रेय मी त्यांना देतो. मी त्यांचा ऋणी आहे.

२. वर्ष १९९६ मध्ये न्यायाधीश पदावरून निवृत्त होऊन मी संभाजीनगर येथे आल्यावर कुलकर्णी (पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी) यांच्याशी ओळख आणि त्यानंतर मैत्री झाली. पुढे एकदा एका प्रसंगात आमच्यासमवेत असणार्‍या सहकार्‍याला मी सहजच म्हटले की, ‘मी सुरेश कुलकर्णी यांच्या झोळीत आहे.’ खरोखरच मी आतापर्यंत त्यांच्याच झोळीत आहे.

३. कुलकर्णी यांनी मला सनातनच्या गुरुपौर्णिमेला नेले होते. पुढे प्रत्येक वेळी त्यांनी जिथे नेले, तिथे मी जात राहिलो.’
(पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी हे पू. चपळगावकरकाका यांच्यापेक्षा १४ वर्षांनी लहान आहेत. असे असूनही पू. चपळगावकरकाका यांनी त्यांच्या साधनेतील वाटचालीतील यशाचे श्रेय पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांना दिले आणि ते त्यांचे ऐकतातही. यातून पू. चपळगावकरकाका यांच्यातील अल्प अहं आणि निरागसता लक्षात येते. – संकलक)

 

६. पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांची साधकांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

६ अ. भारतभरातील अधिवक्त्यांचे संघटन करणारे
पू. सुरेश कुलकर्णी एकमेव ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

१. ‘पू. कुलकर्णीकाका यांना ‘अधिवक्त्यांचे आणि हिंदूंचे संघटन व्हावे’, अशी तळमळ असते. त्यांना सुट्टी असेल, तेव्हा ते लगेचच फोन करून ‘कोणत्या जिल्ह्यात जाऊ’, असे विचारतात. महाराष्ट्र, उत्तर भारत, दक्षिण भारत, असे कुठेही जाण्याची त्यांची सिद्धता असते. भारतभरात अधिवक्त्यांच्या संघटनाचे कार्य करणारे हिंदु विधीज्ञ परिषदेचे ते एकमेव अधिवक्ता आहेत.

२. वर्ष २००८ मध्ये सनातन प्रभातचे माजी संपादक पू. पृथ्वीराज हजारे यांच्यावर मिरज आणि सातारा येथे काही जणांनी सनातन प्रभातमधील लिखाणावरून न्यायालयात खटला प्रविष्ट केला होता. त्या वेळी मुंबई उच्च न्यायालयात जाऊन खटल्याच्या संदर्भात कामकाज पाहू शकणारे पू. कुलकर्णीकाका हे एकमेव अधिवक्ता सनातनकडे होते. न्यायालयात सुनावणीसाठी पू. कुलकर्णीकाका स्वखर्चाने संभाजीनगरहून मुंबईला जात असत. त्यांनी विविध खटल्यांचे दायित्व घेऊन ते चांगल्या तर्‍हेने पार पाडल्यामुळेच सनातन प्रभात नियतकालिके चालू आहेत.’

६ आ. धर्माभिमान असलेले आणि धर्माचरण करणारे पू.
कुलकर्णीकाका ! – कु. प्रियांका लोणे, संभाजीनगर समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

१. पू. चपळगावकरकाका आणि पू. कुलकर्णीकाका यांची आध्यात्मिक प्रगती समवेतच झाली आहे. ‘दोघांचा संतसन्मानही एकाच वेळी होईल’, असे वाटले होते. गुरुदेवांमुळेच हा क्षण आम्हाला अनुभवायला मिळाला आहे.

२. पू. कुलकर्णीकाका न्यायालयात जातांना नेहमी नाम लावून जातात. न्यायालयातील अधिवक्ते त्यांना यावरून चिडवतात, तरीही ते नाम लावूनच जातात. ‘आपण धर्माचे कार्य करतो, तर धर्माचा अभिमान असायलाच हवा’, असे ते म्हणतात.

३. त्यांचा परात्पर गुरु डॉक्टरांप्रती पुष्कळ भाव आहे. तुळजापूर, शिर्डी येथे ते न्यायालयीन सेवेसाठी जातात, तेव्हा प.पू. डॉक्टर समवेत आहेत, असा त्यांचा भाव असतो. न्यायालयीन सेवेत यश मिळते तेव्हा ‘आपली पात्रता नसतांना प.पू. डॉक्टर आपल्यावर कृपा करत आहेत’, असा त्यांचा भाव असतो.

४. पू. कुलकर्णीकाका यांच्यात पुष्कळ भाव आणि नम्रता आहे. त्यांच्याशी बोलतांना फार पूर्वीपासून ओळख असल्याप्रमाणे वाटते.

Leave a Comment