प्रतिकूल परिस्थितीतही आनंदी असणार्‍या आणि परात्पर गुरुदेवांप्रती अपार भाव असणार्‍या श्रीमती इंदिरा नगरकर !

पू. (श्रीमती) इंदिरा नगरकर

 

१. उत्साही आणि आनंदी

‘नगरकरआजी ८३ व्या वर्षीही उत्साही आणि आनंदी आहेत. त्यांच्याकडे पाहून प्रसन्न वाटते.’ – कु. दीपाली मतकर, सोलापूर

 

२. प्रेमभाव

अ. ‘आजींना कधीही भेटल्यावर त्या आम्हाला जवळ घेऊन पाठीवरून प्रेमाने हात फिरवतात.’ – कु. दीपाली मतकर

आ. ‘त्या भेटल्यावर मला मायेची ऊब मिळते आणि पुढील सेवा करायला शक्ती मिळते.

 

३. विचारण्याची वृत्ती

‘नामजप आणि प्रार्थना कोणत्या करायच्या ? स्वयंसूचना कशा बनवायच्या ?’, याविषयी त्या विचारतात.

 

४. परिपूर्ण साधना

गुरुमाऊलीने सांगितलेली व्यष्टी साधना त्या भावपूर्ण आणि परिपूर्ण करतात.

 

५. आध्यात्मिक उपाय करणे

उन्हात बसून नामजप करणे, मिठाच्या पाण्यात पाय ठेवून नामजप करणे, अत्तर आणि कापूर लावणे, देवतांची चित्रे लावणे आदी उपाय त्या काटेकोरपणे करतात.’ – सौ. मीना महादेव नकाते, सोलापूर

 

६. सेवेची तळमळ

अ. ‘त्या गुरुपौर्णिमेच्या काळात शेजारी रहाणार्‍या व्यक्ती आणि नातेवाईक यांच्याकडून अर्पण घेतात.’ – सौ. भारती पैलवान

आ. ‘मंदिरात ग्रंथप्रदर्शन किंवा स्वच्छता उपक्रम असल्यास, तसेच धर्मरथ आल्यास त्या तेथे येऊन नामजप करतात.’ – कु. दीपाली मतकर आणि सौ. भारती पैलवान

 

७. कर्तेपणा नसणे

‘साधक ज्या ठिकाणी सेवा करतात, तेथून काही अंतरावर आजी रहातात. एकदा आजी तेथे आल्यावर ‘साधकांसाठी ठेवलेला चिवडा मऊ झाला आहे’, असे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच ‘चिवडा गरम करून आणून देते’, असे सांगितले. त्यांना ‘तुम्हाला हे शक्य होईल का ?’, असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘मी कुठे करणार आहे ? गुरुदेवच माझ्याकडून करवून घेणार आहेत.’’

 

८. कठीण प्रसंगात स्थिर असणे

आजींच्या मुलाचे मूत्रपिंड निकामी झाल्याने निधन झाले. त्या वेळी आजी स्थिर होेत्या. त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या घराजवळील मंदिरात संक्रातीविषयी प्रवचन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी आजींनी मंदिरात बसून जप केला. तेव्हा त्यांच्या तोंडवळ्यावर घडलेल्या प्रसंगाविषयी काहीच जाणवत नव्हते.’ – सौ. भारती पैलवान

 

९. साक्षीभाव

‘मागील ६ मासांपासून त्यांचा मुलगा, सून आणि नातू रुग्णाईत आहेत. त्या गुरुमाऊलीला याविषयी सूक्ष्मातून सांगतात आणि प्रसंगाकडे साक्षीभावाने पहातात.

 

१०. साधकांची आध्यात्मिक उन्नती होण्याची तळमळ

त्या साधकांना ‘लवकर प्रयत्न करा’, असे सांगतात. ‘साधकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी’, यासाठी त्या देवाला प्रार्थना करतात.

 

११. भाव

अ. गुरुदेवांचे नाव घेतले, तरी त्यांच्या डोळ्यांतून पाणी येते. गुरुदेवांची प्रकृती ठीक नसतांना आजी त्यांच्यासाठी जप करायच्या. आजी प्रतिदिन गुरुदेवांसाठी प्रार्थना करतात. ‘दिवसा व्यष्टी आणि समष्टी साधना करण्यासाठी वेळ मिळावा’, यासाठी त्या पहाटे उठून परात्पर गुरुदेवांसाठी नामजप अन् प्रार्थना करतात.

आ. त्यांना शारीरिक त्रास आहे, तसेच त्यांच्या घरून साधनेला तीव्र विरोध आहे; पण त्याविषयी त्यांचे कधीच गार्‍हाणे नसते. ‘गुरु त्यातून तारतात’, असा त्यांचा भाव आहे.

इ. त्या एखादी लहान गोष्ट करण्यापूर्वीही ‘करू का ?’, असे विचारतात. त्या वेळी ‘मी गुरुमाऊलीला विचारत आहे’, असा त्यांचा भाव असतो.

 

१२. जाणवलेले पालट

अ. त्यांची त्वचा नितळ झाली असून तिच्यावर चकाकी आली आहे.

आ. त्यांचे ओठ गुलाबी झाले असून डोळ्यांत चमक आली आहे.

इ. त्यांच्या अवती-भोवती सुगंध येतो. त्या सुगंधाने मन आनंदी होते.’

– सौ. मीना महादेव नकाते

ई. ‘आजी संत झाल्या आहेत’, असे वाटते.’ – कु. दीपाली मतकर (एप्रिल २०१९)

(पू. नगरकरआजी या संत होण्याआधी ही गुणवैशिष्ट्ये लिहिली असल्याने त्यांच्या नावापुढे ‘पूज्य’ असा उल्लेख आलेला नाही.)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment