सनातनचे ग्रंथप्रदर्शनातील कार्य आमच्यासारख्या लोकांनी यापूर्वीच चालू करायला हवे होते ! – महामंडलेश्‍वर श्री स्वामी रुद्रदेवानंद महाराज, वृंदावन, उत्तरप्रदेश

१. महामंडलेश्‍वर श्री स्वामी रुद्रदेवानंद महाराज यांना ग्रंथप्रदर्शनाची माहिती देतांना श्री. आनंद जाखोटिया (सर्वांत उजवीकडे)

प्रयागराज (कुंभनगरी), १३ फेब्रुवारी (वार्ता.) – सनातनचे प्रदर्शन पाहिल्यानंतर माझे मन पुष्कळ प्रसन्न झाले. आमच्यासारख्या लोकांनी हे कार्य यापूर्वीच चालू करायला हवे होते. तुम्ही हे कार्य केले, ते पुष्कळ चांगले झाले. आम्ही तन, मन आणि धन यांनी तुमच्यासमवेत आहोत. या कार्याला अधिकाधिक पुढे नेले पाहिजे. आम्ही प्रचार करत असून यापुढेही आमचे प्रचार करण्याचे दायित्व असून आम्ही अधिकाधिक प्रचार करणार आहोत. हिंदु राष्ट्राला (भारताला) ‘हिंदु राष्ट्र’ बनवणार आहोत, असे प्रतिपादन वृंदावन (उत्तरप्रदेश) येथील ‘श्री योगानंद आश्रम’ आणि ‘श्री स्वामी गिरिजानंद चॅरिटेबल ट्रस्ट’ यांचे अध्यक्ष महामंडलेश्‍वर श्री स्वामी रुद्रदेवानंद महाराज यांनी येथे केले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथे लावण्यात आलेल्या ग्रंथ अन् धर्मशिक्षण फलक प्रदर्शनांना भेट दिल्यानंतर ते बोलत होते. या वेळी त्यांच्या समवेत श्री महंत आंबिका भारती (काशी), महंत श्री देवानंद महाराज, श्री. संतोष पुजारी आणि श्री. पावस जैस्वाल उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी या सर्वांना ग्रंथप्रदर्शनाची माहिती दिली. त्यानंतर समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी महामंडलेश्‍वर श्री स्वामी रुद्रदेवानंद महाराज आणि महंत श्री देवानंद महाराज यांचा सन्मान केला. सनातनच्या साधिका कु. कृतिका खत्री यांनी श्री महंत आंबिका भारती यांचा सन्मान केला. या वेळी महामंडलेश्‍वर श्री स्वामी रुद्रदेवानंद महाराज यांनी आनंदाने त्यांच्या गळ्यातील पुष्पहार पू. नीलेश सिंगबाळ यांच्या गळ्यात घातला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment