धर्मशिक्षण प्रदर्शनातून हिंदु धर्माचे संवर्धन होण्यास साहाय्य होणार आहे ! – महामंडलेश्‍वर श्री गणेशानंदगिरी महाराज

महामंडलेश्‍वर श्री गणेशानंदगिरी महाराज यांना पुष्पहार घालून त्यांना ग्रंथ भेट देतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

प्रयागराज (कुंभनगरी), ५ फेब्रुवारी (वार्ता.) – धर्मशिक्षण प्रदर्शनातून हिंदु धर्माचे संवर्धन होण्यास साहाय्य होणार आहे, असे प्रतिपादन त्र्यंबकेश्‍वर येथील महामंडलेश्‍वर श्री गणेशानंदगिरी महाराज यांनी ३० जानेवारी या दिवशी येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंंभनगरी येथे लावण्यात आलेल्या अनुक्रमे ग्रंथ प्रदर्शन अन् धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना भेट दिल्यानंतर ते बोलत होते.

या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी त्यांचा पुष्पहार घालून सन्मान केला. या वेळी समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवटही उपस्थित होते. श्री. घनवट यांनी त्यांना धर्मशिक्षण फलक प्रदर्शन दाखवले.

महामंडलेश्‍वर श्री गणेशानंदगिरी महाराज पुढे म्हणाले की, हे प्रदर्शन पाहून मनात उल्हास निर्माण झाला. धर्मरक्षणासाठी सनातन संस्थेचे हे प्रदर्शन आहे. हा कुंभमेळा यासाठीच आहे. कुंभमेळ्यात आलेल्या भाविकांनी हे प्रदर्शन पाहिल्यास त्यांच्या जीवनातही नक्की पालट घडेल. यामुळे लोक पाश्‍चात्त्य संस्कृतीकडून भारतीय संस्कृतीकडे वळतील.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment