सनातनचे संत पू. रमेश गडकरी यांचा साधनाप्रवास !

बालपणापासूनच जगावेगळे कोणीतरी व्हावे, अशी इच्छा असलेले
आणि प.पू. गुरुदेवांच्या अपार कृपेने संत पहावया गेलो आणि संतची
होऊन गेलो, अशी अनुभूती घेणारे सनातनचे संत पू. रमेश गडकरी

माझ्या साधनेच्या प्रवासाविषयी नेमके काय लिहायचे ?, हे मला समजत नव्हते; मात्र गुरुदेवच लिहून घेतील, असे वाटले. त्यानुसार लहानपणापासूनचा एक एक घटनाक्रम आठवत गेला. सनातन संस्थेमध्ये येण्यापूर्वीचे प्रसंग आणि माहिती लिहीत असतांना गुरुदेवांनीच माझा कसा सांभाळ केला ?, याची जाणीव होऊन माझा कृतज्ञताभाव वाढला. मी संस्थेत आल्यावर परात्पर गुरूंनी माझी काळजी घेतली, असे नव्हे, तर लहानपणापासून आणि त्या पूर्वीच्या जन्मांतही तेच माझी काळजी घेत होते, याची प्रचीती मला पूर्वीचे प्रसंग लिहीत असतांना आली.
मला आठवलेले प्रसंग आणि हा साधनाप्रवास, म्हणजे हिमनगाचे केवळ टोक आहे. प्रत्यक्षात गुरुदेवांनी मला स्थुलातून आणि सूक्ष्मातून तळहातावरील फोडाप्रमाणे सांभाळले आहे. प्रत्येक चांगल्या-वाईट प्रसंगाच्या वेळी माझ्याकडून साधना करवून घेऊन माझी प्रगती केली आणि मला नेहमी आनंदच दिला आहे. श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टर यांच्यामुळेच माझी प्रगती होऊ शकली. यासाठी मी त्यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.

१. बालपण

१ अ. अवांतर वाचनाची आवड असल्याने भरपूर वाचनामुळे वैचारिक बैठक निर्माण होणे

माझा जन्म ३०.७.१९५७ या दिवशी कोल्हापूर येथे झाला. मला लहानपणापासून अवांतर वाचनाची आवड होती. मला रहस्यमय कादंबर्‍या वाचायला फार आवडत. मे मासाच्या सुट्टीत कोल्हापूरला मामांच्या घरी गेल्यावर त्यांच्या संग्रहातील ऐतिहासिक, सामाजिक आणि पौराणिक ग्रंथ अन् कादंबर्‍या यांचे मी वाचन करत असे. यामुळे माझ्यावर त्याच प्रकारचे संस्कार होत गेले. त्यातून मला वेगवेगळ्या विषयांतील ज्ञान मिळाले आणि देवाच्या कृपेने वैचारिक बैठक प्राप्त झाली.

१ आ. जुन्या साहित्यापासून नवीन गोष्टी सिद्ध करण्याची आवड निर्माण होणे

मी जुन्या साहित्यापासून वेगवेगळी यंत्रे बनवायचो. माझ्या मामांचे घड्याळाचे दुकान असल्याने मी साहित्याची जमवाजमव करून आणि यंत्रांची जोडणी करून चित्रपटाचा एक लहान प्रोजेक्टर बनवला होता. माझे वडील विद्युत जोडणीची खाजगी कामे करत असत. मी ५ वी – ६ वीत असल्यापासून त्यांच्यासमवेत साहाय्य करण्यासाठी जात असे. यामुळे देवाच्या दयेने मला नवनवीन गोष्टी सिद्ध करण्याची आवड निर्माण झाली. पुढे सनातन संस्थेत आल्यावर प्रसार आणि आश्रमात लागणार्‍या वस्तूंचे आरेखन (ड्रॉईंग) आणि रचना मला गुरुकृपेने सहजपणे करता आल्या.

१ इ. लहानपणापासून राष्ट्रप्रेमाने बाळकडू मिळणे

मी नियमित संघाच्या शाखेत जात असे. वर्ष १९७१ च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी सैन्यात जाऊन मर्दुमकी गाजवावी, असे मला वाटायचे. अशा प्रकारे देवाच्या कृपेनेच मला लहानपणापासून राष्ट्रप्रेमाने बाळकडू मिळाले, असे वाटते.

लहानपणापासून मला सतत वाटायचे की, मला साधेसुधे जीवन जगायचे नाही. मला जगावेगळे कोणीतरी व्हायचे आहे; पण नेमके कोण व्हायचे आहे ?, ते ठाऊक नव्हते.

१ ई. अभिनय आणि संगीत कलेशी संबंध !

१ ई १. नाटकांत लहान-मोठ्या भूमिका करणे

पाचवीत असतांना मी रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकात बाल राजाराम ही भूमिका केली होती. नंतर मोठेपणी रसायनी (जि. रायगड) येथे कला क्रीडा मंडळाच्या वतीने होणार्‍या नाटकांमघ्ये मला लहान-मोठ्या भूमिका करण्याची संधी मिळाली, उदा. कवडीचुंबक, कोलंबस, काळोख देतो हुंकार इत्यादी.

१ ई २. गाण्याची आवड

आईने माझ्यासाठी गाण्याची शिकवणी लावली होती. त्यामुळे मला गाण्याचीही आवड निर्माण झाली.

१ ई ३. मामांमुळे मान्यवर व्यक्तींशी संपर्क होणे

माझ्या मामांचा मित्रपरिवार मोठा असल्याने कोल्हापूरमधील चित्रपटसृष्टीतील कलाकार, प्राध्यापक, समाजश्रेष्ठी, तसेच धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती यांच्याशी माझा संपर्क आला.

२. शालेय शिक्षण

२ अ. शालेय जीवनापासून सायकलवरून भ्रमंती करण्याची आवड निर्माण होणे

मी पायी चालत जाऊन पहिली ते सहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. नंतर सातवी ते अकरावीपर्यंत हिंदुस्तान ऑरगॅनिक केमिकल्सच्या शाळेत शिकून ६० टक्के गुण मिळवून अकरावी (एस्.एस्.सी.) ची परीक्षा उत्तीर्ण झालो. मला शालेय जीवनात सायकलवरून भ्रमंती करण्याची आवड निर्माण झाली. वर्षातून एकदा मी सायकलवरून महाड, पालीचा गणपति, तसेच रामबाग (अलीबाग) येथे फिरायला जात होतो. काही ठिकाणी मी पदभ्रमंतीही करत होतो.

२ आ. महाविद्यालयीन शिक्षण

१९७८ या वर्षी मी विद्युत अभियांत्रिकीची पदविका प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो. महाविद्यालयात असतांना मी ठरवले होते की, नोकरीला लागल्यावर लगेच लग्न करायचे. २ मुलांना जन्म द्यायचा आणि वयाच्या ४५ व्या वर्षी नोकरी किंवा व्यवसाय जे काही असेल, ते बंद करून समाज, राष्ट्र किंवा धर्म यांपैकी एका कार्याला वाहून घ्यायचे. नंतर याप्रमाणेच काही काही होत गेले.

 

३. कौटुंबिक वातावरण आणि देव-धर्म आदींची आवड !

३ अ. घरच्यांची नवनाथांच्या पोथीवर श्रद्धा
असल्याने प्रतिदिन त्या ग्रंथातील काही ओव्या वाचाव्या लागणे

आमच्या घरी धार्मिक वातावरण होते. सकाळची देवाची पूजा पुरुषांनी करायची, असा दंडक असल्याने बहुदा घरची पूजाअर्चा मला करावी लागत असे. ही पूजा मला ओलेत्याने करावी लागे. घरच्यांची नवनाथांच्या पोथीवर श्रद्धा असल्याने प्रतिदिन त्या ग्रंथातील काही ओव्या वाचाव्या लागत. कोणत्याही महत्त्वाच्या कामाला जातांना नवनाथांच्या पोथीला सांगून गेले की, इच्छित कार्य होते, अशी सर्वांची श्रद्धा होती.

३ आ. आजोबांनी सोनारकाम सोडून समाजासाठी पौरोहित्य करणे

माझे आजोबा (वडिलांचे वडील) सोनारकाम करायचे; पण समाजबांधवांच्या एका मेळाव्यात दैवज्ञ समाजासाठी पौरोहित्य करणारे कुणी नाही, असा प्रश्‍न उपस्थित झाल्याने माझ्या आजोबांनी चांगला चालणारा सोनाराचा व्यवसाय सोडून समाजासाठी पौरोहित्य शिकून घेतले आणि ते पौरोहित्य करू लागले.

३ इ. आजी जागृत मारुतीची उपासक असल्यामुळे गावातील लोकांनी आध्यात्मिक त्रास
झाल्यास नामजपादी उपायांसाठी आजीकडे येणे आणि तिच्या उपायांनी त्यांना गुणही येणे

माझी आजी (वडिलांची आई) सांगली जवळील तुंग या गावातील जागृत मारुतीची उपासक होती. वर्ष १९३३ च्या प्लेगच्या साथीमध्ये संपूर्ण गाव साथीच्या भीतीने घरे सोडून बाहेर गेला होता; पण आजी देवाच्या उपासनेसाठी गावातच राहिली. आजीला प्लेगची गाठ आली असतांनाही तिने उपासना सोडली नाही. प्रत्यक्ष मारुतिरायाने मला वाचवले, अशी तिची श्रद्धा होती. तिला मारुति प्रसन्न झाला होता, अशी गावकर्‍यांची श्रद्धा होती. गावात कोणाला काही आध्यात्मिक त्रास झाल्यास ते नामजपादी उपायांसाठी माझ्या आजीकडे येत असत. तिच्या उपायांनी त्यांना गुण येत असे.

३ ई. लहानपणापासून समष्टी कार्याचा, आध्यात्मिक
आणि धार्मिक सेवेचा आजी-आजोबांकडून वारसा मिळणे

शनिवारी आणि नवरात्रीच्या कालावधीत आजीच्या अंगात संचार होत असे. त्या वेळी तिच्या तोंडातून मारुतीच्या भुःभुःकारासारखा आवाज यायचा. घरी धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरण होते, तरीसुद्धा माझ्यावर आधुनिक शिक्षण, तसेच तथाकथित पुरोगामित्व यांचा पगडा असल्याने मला ते सर्व खोटे वाटायचे. आजीच्या नामजपादी उपायांनी इतरांना होणारे लाभ मला योगायोगच वाटायचा. काही धर्मद्रोही लोक आता जशी परीक्षा घेतात, तसे आम्ही करायचो. लोकांच्या अंगात संचार झाल्यास, त्या वेळी साप आला, असे म्हणून आम्ही हूल द्यायचो. त्या वेळी ढोंग करणारे भगत तेथून पळ काढायचे; मात्र आजी तेथेच थांबायची. तिच्यावर याचा कोणताच परिणाम होत नसे. यावरून तिला सूक्ष्मातील कळत होते. आध्यात्मिक उपाय सांगण्यासाठी लागणारे आत्मबळ तिच्यात होते आणि देव तिच्या माध्यमातून अनेक दुःखीकष्टी लोकांची कामे करून देत होता, असे मला आता वाटते.

अशा प्रकारे मला लहानपणापासून माझ्या आजी-आजोबांकडून समष्टी कार्य, तसेच आध्यात्मिक आणि धार्मिक सेवा यांचा वारसा मिळाला. मी व्यावसायिक असल्याने माझी देवावर श्रद्धा होती; पण समाज, तसेच नातेवाईक यांच्यातील देवधर्म करणार्‍यांचे बोलणे अन् कृती यांतील भेद माझ्या लक्षात यायची. त्यामुळे मी देवाचे काही करत नव्हतो.

 

४. नोकरी आणि विद्युत क्षेत्रातील ठेकेदारीचा व्यवसाय !

वर्ष १९७८ – १९७९ या काळात मी साहाय्यक विद्युत निरीक्षक (इलेक्ट्रीकल इन्स्पेक्टर) या पदावर मुंबईत नोकरी करत होतो; मात्र तेथील भ्रष्टाचारी जीवनाला कंटाळून मी नोकरी सोडली. वर्ष १९७९ – १९८० मध्ये देवगड (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे जीवन प्राधिकरणमध्ये मी कनिष्ठ विद्युत अभियंता पदावर नोकरी करत होतो. मुंबईपेक्षा कोकण ही भूमी सात्त्विक, निसर्ग सौंदर्याने युक्त आणि संतांची पुण्यभूमी असल्याने देवानेच मला देवगड येथे नोकरी लावून दिली. वर्ष १९८१ ते २००३ पर्यंत माझा उमेश इलेक्ट्रीकल्स या नावाने विद्युत क्षेत्रातील ठेकेदारीचा व्यवसाय होता. माझ्याकडे ४० कायमस्वरूपी कामगार आणि १०० रोजंदारीचे कामगार होते. या व्यवसायात मला चांगला नफा होत होता.

 

५. दासबोधात सांगितल्याप्रमाणे साधना करण्यासाठी केलेले प्रयत्न

५ अ. व्यवसायातील आर्थिक ताणतणाव आणि त्या
अनुषंगाने घरातील ताणतणाव यांमुळे घरातून निघून जाणे

वर्ष १९८४ मध्ये व्यवसायातील आर्थिक ताणतणाव आणि त्या अनुषंगाने घरात निर्माण झालेले ताणतणाव यांमुळे मी घरातून निघून जायचे ठरवले. मी घरातून निघून गेलो; पण जातांना वाचनासाठी मित्राकडून आणलेला दासबोध माझ्या समवेत होता. मी कुठे जायचे ?, याविषयी काहीच ठरवले नव्हते. माझ्यासोबत दुचाकी वाहन आणि थोडी रोख रक्कम होती. जेथे दोन रस्ते समोर यायचे, तेथे उजव्या बाजूच्या रस्त्याला दुचाकी वळवायची. असे करत मी गोव्याच्या रस्त्यावर आलो.

५ आ. शिवथर घळ येथे गेल्यावर दासबोधाचे वाचन करणे आणि तेथील आजींनी
तू घरी सांगून आला आहेस ना, असे विचारून चुकीची जाणीव करून देऊन घरी जाण्यास सांगणे

महाड येथे येईपर्यंत दुचाकी वाहनातील इंधन संपले आणि रात्रही झाली; म्हणून मी एका विश्रामगृहात थांबलो. रात्री दासबोध वाचायला घेतला. तेव्हा प्रस्तावना वाचतांना महाड येथील शिवथर घळ हे दासबोधाचे जन्मस्थान असल्याचे मला कळले. तेथे भेट देऊन आपले नवीन जीवन चालू करायचे, असे ठरवून मी सकाळी शिवथर घळ येथे गेलो. तेथे एक वृद्ध दांपत्य सेवेला होते. मी त्यांना मला दासबोध वाचायचा आहे, असे सांगितले आणि तेथे राहिलो. मी पहाटे ४ वाजता उठून थंड पाण्याने स्नान करून दिवसभर कोणाशीही न बोलता दासबोध वाचत असे. दोन दिवस झाल्यावर तेथील आजींनी मला विचारले, तू कोणाशीही बोलत नाहीस. तू घरी सांगून आला आहेस ना ! मी त्यांना सत्य स्थिती सांगितली. तेव्हा त्या आजींनी मला माझ्या चुकीची जाणीव करून दिली आणि लगेच घरी जाण्यास सांगितले.

५ इ. दासबोध वाचल्यामुळे संसार सोडून जाणे, हा भ्याडपणा आहे, हे लक्षात येऊन घरी परतणे

दासबोध वाचतांना ताणतणावांना घाबरून संसार सोडून जाणे, हा भ्याडपणा आहे, हे माझ्या लक्षात आले होते. दुसर्‍या दिवशी मी आजींना माझे दासबोधाचे पारायण पूर्ण होत आहे. मी घरी परत जाईन, असे सांगितले. दुसर्‍या दिवशी मी घरी परत आलो. या ३ दिवसांत घरच्यांनी बर्‍याच ठिकाणी शोधाशोध करून देव पाण्यात घालून ठेवले होते.

५ ई. दासबोधात सांगितल्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केल्यावर
बाह्यतः वागणे चांगले झाले, तरी स्वतःला आंतरिक पालट न जाणवणे

यानंतर मी प्रती वर्षी शिवथर घळीत दासबोध नवमीच्या उत्सवाला जाऊ लागलो. शिवथर घळीच्या जीर्णोद्धारासाठी मी घरोघरी जाऊन अर्पण गोळा केले. पुढे जवळजवळ २ वर्षे मी दासबोधात सांगितल्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला. यामुळे माझे बाह्यतः वागणे चांगले झाले, तरी मला स्वतःला आंतरिक पालट जाणवत नव्हता, तसेच माझ्या व्यवसायामुळे खोटे बोलू नये, दुसर्‍याला दुखवू नये, यांसारख्या साध्यासाध्या गोष्टीही आचरणात आणणे मला पुष्कळ कठीण जात होते. त्यामुळे माझ्या जिवाची तगमग होत असे. अशा प्रकारे पुढे २ वर्षे साधनेचे प्रयत्न करूनही मला अपेक्षित असा आनंद मिळाला नाही.

 

६. सनातनशी संपर्क !

६ अ. प्रवचन ऐकल्यावर व्यावसायिक आणि प्रापंचिक समस्या म्हणजे मंद प्रारब्ध आहे,
हे लक्षात येणे आणि नामजप करायला आरंभ केल्यावर ८ दिवसांतच व्यावहारिक अडचणी न्यून होणे

मी एका रविवारी रसायनी, पनवेल येथे बाजारात गेलो असतांना मला बस थांब्याजवळ एक कापडी फलक दिसला. त्याच्यावर चांगला साधक कसे बनायचे ?, असे लिहिले होते. मी दासबोध वाचला असल्यामुळे साधक, साधना या शब्दांशी माझी जवळीक होती. तेव्हा या प्रवचनात काय सांगतात, ते पाहूया, असे ठरवून मी त्या प्रवचनाला गेलो. तेथे नागोठण्याचे श्री. बापू रावकर यांनी प्रवचन घेतले. त्यातील शास्त्रीय विवेचन हे दासबोधाशी जुळणारे होते. तेथे नामजपाविषयी, तसेच मंद, मध्यम आणि तीव्र प्रारब्ध, यांविषयी सांगितले. तेव्हा माझ्या व्यावसायिक आणि प्रापंचिक समस्या म्हणजे माझे मंद प्रारब्ध आहे, हे माझ्या लक्षात आले. या समस्या केवळ कुलदेवतेचा ६ माळा आणि दत्ताचा ९ माळा जप यांच्या नामस्मरणाने सुटतील, हे कळले. मी ॐ ऐं र्‍हीं क्लीं चामुंडाएै विच्चै । हा कुलदेवतेचा मंत्रजप सहस्रो माळा केला होता. त्यामुळे मला ६ माळा आणि ९ माळा जप एकदमच सोपा वाटला. मी त्याप्रमाणे जप केला आणि ८ दिवसांतच माझ्या व्यावहारिक अडचणी न्यून झाल्या.

६ आ. एक वर्ष साधना करूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अभ्यासवर्गाला न जाणे
आणि या वेळचा अभ्यासवर्ग हा शेवटचा अभ्यासवर्ग आहे, असे कळल्यावर त्या वर्गाला जाणे

त्यानंतर श्री. नाना वर्तक, वैद्य विनय भावे (आताचे पू. विनय भावे), आदी साधकांची प्रवचने ऐकून मी सनातनने सांगितल्याप्रमाणे गुरुकृपायोगानुसार साधना करू लागलो. त्यामुळे मला इतके दिवस न मिळणारा आनंद मिळू लागला. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले प्रत्येक मासाला पनवेल येथे येऊन स्वतः अध्यात्मशास्त्राचे अभ्यासवर्ग घेत असत. मला या वर्गाला येण्याविषयी श्री. बापू रावकर सांगत; पण कोणत्याही बाबाच्या नादी लागायचे नाही, असे मी ठरवले असल्याने एक वर्ष साधना करूनही मी या वर्गाला गेलो नाही. एकदा श्री. बापू रावकरांनी सांगितले, या वेळचा अभ्यासवर्ग हा शेवटचा अभ्यासवर्ग असून यानंतर प.पू. गुरुदेव वर्ग घेणार नाहीत. तेव्हा मी त्या रविवारी अध्यात्म इतक्या चांगल्या शास्त्रीय भाषेत समजावणार्‍यांना पाहूया, या विचाराने वर्गाला गेलो.

६ इ. संत कसे असतात ?, अशी जिज्ञासा असणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या
कृपेने संतदर्शनाचे, तसेच संत होऊन संतांच्या मांदियाळीत रहाण्याचे भाग्य लाभणे

नोकरीवर असतांना माझ्या मनात विचार यायचे, सध्याच्या काळात खरोखरंच संत असतील का ? याविषयी मी एकदा माझ्या मामांशी बोलत असतांना त्यांनी मला पिंगुळी, कुडाळ येथील संत राऊळ महाराज यांचे नाव सांगितले होते. तेव्हा संत कसे असतात ?, या जिज्ञासेने मी पिंगुळी, कुडाळ येथे अनेक वेळा गेलो; मात्र आश्‍चर्य म्हणजे मला राऊळ महाराजांचे एकदाही दर्शन झाले नाही. त्या वेळी मी साधनेत न्यून पडलो, असे मला आता वाटते. वर्ष १९९३ मध्ये सनातन संस्थेत आल्यावर माझी ही इच्छा प.पू. गुरुदेवांनी पूर्ण केली. त्या वेळी प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मला प.पू. भक्तराज महाराज, घाटकोपरचे प.पू. जोशीबाबा, सावंतवाडीचे प.पू. भाऊ मसूरकर, प.पू. रामानंद महाराज इत्यादी संताचे दर्शन आणि सत्संग मिळाला. पुढे प्रसाराला गेल्यावर मला गुरुकृपेने अनेक संतांचा सत्संग मिळाला. त्यांच्याच कृपेने मला सनातनच्या आश्रमात रहाण्याचे आणि सनातनच्या संतांच्या मांदियाळीत रहाण्याचे भाग्य लाभले. संत तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे, देव पहावया गेलो आणि देवची होऊन गेलो । तसेच प.पू. गुरुदेवांच्या अपार कृपेने संत पहावया गेलो आणि संतची होऊन गेलो, अशी मोठी अनुभूती मला गुरुदेवांनी दिली.

 

७. पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय

७ अ. पूर्णवेळ साधना करण्यासाठी ठेकेदारीचा व्यवसाय बंद करतांना दुसर्‍या ठेकेदाराने
सर्व देण्या-घेण्यासह दायित्व घेणे आणि यावरून संतांची संकल्पशक्ती कार्य करते, याची प्रचीती येणे

संतांनी व्यवसाय बंद करून पूर्णवेळ साधना करण्यास सांगितले. तेव्हा मी आज्ञापालन म्हणून आणि कशाचाही विचार न करता व्यवसाय बंद करण्याचे ठरवले. प्रत्यक्षात ठेकेदारीचा व्यवसाय बंद करायचे म्हटले, तर ४० कायमस्वरूपी कामगारांची देणी देण्यासाठी मला माझ्याकडील सर्व मिळकत संपवून घरदारही विकावे लागले असते; मात्र गुरुदेवांच्या कृपेने माझी ठेकेदारी दुसर्‍या ठेकेदाराने कामगार आणि सर्व देण्या-घेण्याचे दायित्व घेऊन विकत घेतली. त्यामुळे गुरुदेवांच्या कृपेने मला वयाच्या ४५ व्या वर्षी स्वतःचा चांगला चाललेला व्यवसाय बंद करून पूर्णवेळ राष्ट्र आणि धर्म कार्याशी वाहून घेता आले. यावरून संत जेव्हा अशा प्रकारचा मोठा निर्णय घ्यायला लावतात, तेव्हा त्यांची संकल्पशक्ती कार्य करत असते आणि त्याप्रमाणे सर्व घडत जाते, याची मला अनुभूती आली.

७ आ. पूर्णवेळ साधना करतांना कुटुंबाचे दायित्व असूनही त्याची काळजी
न वाटणे आणि गुरुदेवांच्या कृपेने सर्व सांसारिक कर्तव्ये व्यवस्थित पार पाडता येणे

मी व्यवसाय बंद करून पूर्णवेळ साधना करू लागलो. त्या वेळी माझ्या ३ मुली (रसिका, राधिका आणि रमणी) शिकत होत्या. पुढे मी रहाते घरही विकले. त्या वेळी उत्पन्नाचे ठोस साधन नव्हते; मात्र पत्नी (सौ. नीला) आणि मुली यांचे दायित्व होते. असे असतांनाही माझ्या मनात संसार कसा चालेल ?, मुलींची लग्ने कशी होतील ?, याविषयी प्रश्‍न किंवा काळजी नव्हती. ही केवळ गुरुदेवांचीच कृपा होती. त्यांच्याच कृपेने तिन्ही मुलींची लग्ने झाली. गुरुदेवांनी साधक म्हणून माझीच काळजी घेतली, असे नाही, तर माझी पत्नी, मुली, त्यांचे पती, माझे भाऊ, आई या सर्वांचीच काळजी घेऊन त्यांच्याकडून साधनाही करवून घेतली.

माणसाकडे कितीही पैसे आणि साधने असली, तरी माझ्या आनंदी आध्यात्मिक कुटुंबियांपेक्षा अधिक चांगले, आदर्श आणि सुखी कुटुंब असू शकत नाही अन् हे केवळ गुरुदेवांच्या कृपेनेच होऊ शकते, असे मला वाटते.

 

८. विविध सेवांच्या अनुषंगाने झालेली साधनेची वाटचाल !

८ अ. प्रसार करून सत्संग आणि प्रवचने घेणे

रायगड जिल्ह्यात सत्संगांचा प्रसार करणे, सत्संग घेणे इत्यादी सेवा माझ्याकडून झाल्या. माझा पिंड काहीतरी कृती करण्याचा होता. प्रवचने आणि सत्संग घेणे, तसेच अध्यात्मप्रसार करणे, हे माझ्यासाठी अशक्य होते; मात्र गुरुदेवांनी हे सर्व करवून घेतले. रायगड जिल्ह्यात पाऊस पुष्कळ असतो. अशा पावसातही मी दुचाकीवरून जात असे; मात्र आम्हाला पावसाचा त्रास कधीही झाला नाही कि देवाने आमचे अंग कधी भिजू दिले नाही. प्रवचनाचा प्रसार केला, तरीही कधी कधी काही जणच प्रवचनाला यायचे. गुरुदेवांच्या आज्ञेने आम्ही त्यांच्यासाठीही प्रवचन घेतले आहे.

८ आ. रायगड जिल्हासेवक म्हणून दायित्व सांभाळणे आणि नंतर प्रसारासाठी अन्य जिल्ह्यांत जाणे

ग्रंथसाठा सांभाळणे, हिशोब करणे, लेखासेवा, रसायनी येथे संतांच्या भंडार्‍याच्या आयोजनाची सेवा इत्यादी सेवा केल्यावर गुरुदेवांनी मला रायगड जिल्हासेवक म्हणून दायित्व मिळाले. पुढे मला प्रसारासाठी पंढरपूर, सोलापूर, नंदुरबार, संभाजीनगर, जळगाव इत्यादी जिल्ह्यांत पाठवून गुरुदेवांनी माझ्याकडून सेवा करून घेतली.

८ इ. गुरुदेवांनी अनेक स्तरांवर दिशा देऊन सभा, धर्मरथ, प्रदर्शने,
तसेच कमानी यांसाठी लागणार्‍या साहित्याची निर्मिती करवून घेऊन या सेवांतून आनंद देणे

गुरुदेवांनी सभा, धर्मरथ, प्रदर्शने, कमानी आदींसाठी लागणार्‍या साहित्याची निर्मिती करवून घेतली. त्या काळात सनातन संस्थेच्या वतीने परात्पर गुरु डॉक्टरांच्या सभा आयोजित केल्या जायच्या, तसेच मोठ्या प्रमाणात ग्रंथ प्रदर्शनेही लावली जायची. त्यासाठी लागणारे साहित्य विकत न आणता गुरुदेव ते साधकांकडून सिद्ध करवून घेत. मित व्ययात नवीन साहित्याची निर्मिती कशी करता येईल ? प्रत्येक साहित्यात चैतन्य कसे येईल ? त्याची वाहतूक सुलभ पद्धतीने कशी करता येईल ? आदी सर्व स्तरांवर विचार करून ते आम्हाला साहित्य तयार करण्याची प्रेरणा देत. गुरुदेवांनी मला या सेवेची संधी देऊन आनंद दिला. जत्रेमध्ये, तसेच ग्रंथ विक्री केंद्रासाठी लागणार्‍या लोखंडी कमानी सिद्ध (तयार) करण्याची सेवा मला गुरुकृपेने मिळाली.

८ ई. अशी झाली धर्मरथाची निर्मिती !

८ ई १. गुरुदेवांनी व्यासपीठ, कनात लावण्यासाठी विशिष्ट
प्रकारच्या पहारी (स्पाईक), तसेच विद्युतयंत्रणा, ध्वनीक्षेपण यंत्रणा
यांचा आराखडा काढण्यापासून ते निर्मिती करण्यापर्यंतची सेवा करवून घेणे

नंतर मोठ्या सभागृहात सभा घेण्याऐवजी मैदानावर सभा घ्यायचे नियोजन चालू झाले. त्यासाठी व्यासपीठ, कनाती, प्रकाश आणि ध्वनी यंत्रणा भाड्याने घेणे अत्यंत खर्चाचे होते, तसेच आपल्याला हवे तसे साहित्य मिळणेही कठीण होते. त्यामुळे सभांसाठी आपलाच १ संच असावा, असे ठरले. वेगवेगळ्या जिल्ह्यांत सभा असल्याने सर्व साहित्य एका ट्रकमध्ये घालून नेता येईल, असे नियोजन करायचे होते. त्यानुसार गुरुदेवांनी व्यासपीठ, कनात लावण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या पहारी (स्पाईक), विद्युतयंत्रणा, ध्वनीक्षेपण यंत्रणा यांचा आराखडा काढण्यापासून ते निर्मिती करण्यापर्यंतची सेवा माझ्याकडून करवून घेतली.

८ ई २. सभांच्या आयोजनासाठी लागणारे अवजड आणि पुष्कळ साहित्य धर्मरथात
मावण्यासाठी त्याची विशिष्ट रचना करावी लागणे, त्यामुळे सर्व साहित्य व्यवस्थित ठेवता
येऊन त्याची ने-आण करणे, तसेच ते सभास्थळी काढणे अन् भरणे अल्प वेळेत होऊ लागणे

यानंतर सभा झाल्यावर सर्व साहित्य काढणे आणि ते ट्रकमध्ये भरणे अल्प वेळेत होऊ लागले. प्रत्यक्ष मैदानावर सर्व साहित्य प्रचंड मोठ्या आकाराचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे दिसत असे; मात्र ते गुंडाळून योग्य क्रमाने भरले जायचे. हे सर्व साहित्य एका ट्रकमध्ये मावत असल्याने आम्हाला पुष्कळ आश्‍चर्य वाटायचे. त्या वेळी बाहेरचे लोकही एका ट्रकमध्ये एवढे साहित्य कसे मावते ?, हे पहाण्यासाठी थांबत असत. साहित्य सिद्ध करतांना अशक्य अशा सर्व गोष्टी गुरुकृपेने सहज शक्य झाल्या. पावसाळ्यात मैदानावर सभा घेता येत नव्हत्या. त्यामुळे गणेशोत्सव आणि चातुर्मास या काळात सभेचे साहित्य ट्रकमधून काढून रिकाम्या ट्रकचा उपयोग ग्रंथप्रदर्शन लावण्यासाठी करण्यात येऊ लागला. हा धर्मरथ सिद्ध करण्यासाठी त्यामध्ये मांडण्या, वीजव्यवस्था करावी लागली. हे सर्व साहित्य पुढे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या शेकडो सभांसाठी वापरले गेले.

 

९. देवद, पनवेल येथील आश्रमाच्या उभारणीची सेवा !

९ अ. विद्युत यांत्रिकी विभागातील अनुभवी अभियंता असूनही
देवाने देवद येथील चैतन्यमय आश्रमाच्या बांधकामाची सेवा करवून घेणे

वर्ष १९९९ मध्ये देवद आश्रमाचा आराखडा केल्यानंतर मला बांधकाम विभागात सेवा मिळाली. त्या वेळी श्री. दिलीप आठलेकर, श्री. संजय नाणोसकर इत्यादी साधक होते. गुरुदेवांच्या आज्ञेनुसार आश्रम बांधतांना प्रत्येक गोष्ट अर्पणातून कशी मिळेल ?, यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. त्या वेळी आश्रम बांधण्यासाठी पैशाची व्यवस्था करून नंतर बांधकाम चालू केले, असे नव्हते, उदा. पाया भरण्यासाठी लागणारे लोखंड, सिमेंट, रेती, खडी आदी वस्तू किती लागणार ?, हे काढले जायचे; मात्र ते कसे आणि कोठून आणायचे ?, हे ठाऊक नसायचे अन् रोख पैसे देऊन आणायचे नियोजनही नसायचे. असे असतांनाही प्रत्येक वेळी गुरुदेवांच्या कृपेने आम्हाला पाहिजे ते अधिकाधिक साहित्य अर्पण म्हणून किंवा अर्पणाच्या पैशातून वेळेवर मिळायचे. बरेच सिमेंट लागणार होते; मात्र दुसर्‍या दिवशी कोणीतरी एवढी रक्कम अर्पण दिली. याच प्रकारे लोखंड, सेंटरींगचे साहित्य, रंग, जहाजावरील दारे इत्यादी सर्व साहित्य वेळच्या वेळी मिळत गेले आणि बांधकाम थांबले नाही. त्या वेळी साधकांनी बांधकामाच्या साहित्याची ने-आण केली. गुरुदेवांच्या कृपेने या चैतन्यमय आश्रमाच्या बांधकामाच्या सेवेत मला आरंभापासून ते आश्रम पूर्ण होईपर्यंत सेवा मिळाली. मी विद्युत यांत्रिकी विभागातील अनुभवी अभियंता होतो, तरीही देवाने माझ्याकडून बांधकामाची सेवा करून घेतली.

 

१०. अनुभूती

१० अ. भंडार्‍याला १२ सहस्र रुपये व्यय होणे, तेथे ठेवलेल्या अर्पण पेटीतील
रक्कम परात्पर गुरु डॉक्टरांना अर्पण करायची, असे ठरवल्यावर त्यांनी ते पैसे
भंडार्‍याचा खर्च म्हणून वापरण्यास सांगणे आणि अर्पण पेटीत १२ सहस्र रुपये मिळणे

एकदा रसायनी येथील दुर्गादेवीच्या मंदिरात साधकांसाठी भंडारा होता. यासाठी घाटकोपर, मुंबई येथील संत प.पू. जोशीबाबा आले होते. या वेळी बाहेरगावचे १५० साधक आले होते. भंडार्‍यासाठी १२,००० रुपयांचा व्यय (खर्च) आला आणि मी तो माझा त्याग म्हणून केला. भंडार्‍यामध्ये एक अर्पणपेटी ठेवली होती. त्या पेटीतील पैसे आम्ही नंतर गुरुदेवांना देणार होतो. याविषयी गुरुदेवांना विचारल्यावर ते म्हणाले, तुम्हाला पुष्कळ खर्च आला असेल. या अर्पण पेटीतील पैसे त्यासाठी वापरा ! गुर्वाज्ञा म्हणून आम्ही अर्पण पेटीतील पैसे काढून मोजले आणि त्यात १२,००० रुपये मिळाले. माझा जेवढा व्यय (खर्च) झाला होता, तेवढीच रक्कम त्यातून मिळाली, याचे आम्हाला आश्‍चर्य वाटले.

११. सनातन आणि परात्पर गुरु डॉक्टर
यांच्यावरील श्रद्धा वाढण्यासाठी घडलेले प्रसंग !

११ अ. संतांनी समष्टी साधनेसाठी वेळ द्या, असे सांगितल्यावर अधिकाधिक वेळ
प्रसारासाठी देणे आणि प्रसाराच्या काळात ठेका चालू असलेल्या आस्थापनांमधून बोलावणे न येणे

माझा विद्युत ठेकेदारीचा व्यवसाय (खाजगी आस्थापनांचे ठेके घेणे) मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे मला स्वतःला प्रत्यक्ष कामावर उपस्थित रहावे लागायचे. मला घरच्यांसाठीही वेळ देणे जमत नव्हते. साधनेत आल्यावर संतांनी समष्टी साधनेसाठी वेळ द्या, असे सांगितल्यावर मी ठेक्याच्या ठिकाणी जाण्याऐवजी अधिकाधिक वेळ प्रसारासाठी देऊ लागलो. तेव्हा प्रसाराच्या काळात ठेका चालू असलेल्या आस्थापनांमधून मला एकदाही बोलावणे आले नाही.

११ आ. अनेक मास प्रसारासाठी बाहेर जाऊनही त्याचा ठेकेदारीवर परिणाम न होणे

मी अनेक मास प्रसारासाठी बाहेर गेलो, तरी त्याचा माझ्या ठेकेदारीवर कोणताही परिणाम झाला नाही, तसेच मला कोणती आर्थिक अडचणही आली नाही. याउलट मी जेव्हा ठेकेदारीला अधिक वेळ द्यायचो, तेव्हा मला ठेका पूर्ण करतांना पुष्कळ आर्थिक अडचणी यायच्या.

११ इ. साधनेमुळे मंद प्रारब्ध फिटल्याने सर्व कर्जे
फिटणे आणि नंतर कोणतीही आर्थिक अडचण न येणे

साधनेत येण्यापूर्वी व्यवसायातील आर्थिक अडचणींमुळे माझ्यावर पुष्कळ खासगी कर्जे होती. त्यांचे व्याज फेडण्यातच माझी सर्व कमाई जात होती; पण साधनेमुळे माझे मंद प्रारब्ध फिटल्याने माझी कर्जे तर फिटलीच; पण नंतर मला कोणती आर्थिक अडचणही आली नाही. यामुळे गुरुदेवांच्या शिकवणीवर माझी श्रद्धा बसली.

११ ई. प.पू. गुरुदेवांच्या संकल्पामुळे रिलायन्स
इंडस्ट्रीजचे सोडलेले ठेकेदारीचे काम परत मिळणे

११ ई १. पूर्णवेळ सेवा करावी, असे वाटल्याने रिलायन्स इंडस्ट्रीजला ठेकेदारी न करण्याविषयीचे पत्र देणे आणि संतांनी ठेका पुन्हा चालू करायला सांगणे

पूर्णवेळ साधना करायची, असे ठरल्यावर मी ठेकेदारी करत असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज या आस्थापनाला मी यापुढे आपल्याकडे ठेकेदारी करू शकणार नाही, असे पत्र दिले. याविषयी मी संतांना सांगितल्यावर ते म्हणाले, तुम्ही आताच ठेकेदारी बंद करू नका. वेळ आली की, मी सांगेन. तेव्हा मी त्यांना म्हणालो, मी अगोदरच आस्थापनाला कळवले आहे. त्यामुळे परत तो ठेका मिळणे कठीण आहे. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही जा. तो ठेका तुम्हाला परत मिळेल ! या सगळ्यात १५ दिवसांचा काळ गेला होता आणि रिलायन्स आस्थापनाने तो ठेका दुसर्‍याला दिला होता.

११ ई २. एवढ्या मोठ्या आस्थापनात एकदा सोडलेला ठेका पुन्हा मिळणेे कठीण असतांना केवळ गुरुकृपा आणि संतांचा संकल्प यांमुळेच तो पुन्हा मिळणे

श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे मी तेथील व्यवस्थापकांना भेटलो आणि त्यांना सांगितले, मला माझा ठेका पुन्हा चालू ठेवायचा आहे. ते मला म्हणाले, तुम्हाला ठेका चालू ठेवायचा होता, तर तुम्ही आम्हाला तो बंद करायचे पत्र का दिले ? तेव्हा मी त्यांना खरे कारण सांगितले. ते ऐकल्यावर त्यांनी मला आस्थापनाच्या व्हाईस प्रेसिडेंटकडे नेले. त्यांना मी सर्व परिस्थिती सांगितली. मी बराच काळ तेथे ठेकेदारी करत असल्यामुळे त्यांनी माझी विनंती मान्य करून मला पुन्हा ठेका दिला. एवढ्या मोठ्या आस्थापनाचा एकदा सोडलेला ठेका पुन्हा मिळणे हे केवळ गुरुकृपा आणि संतांचा संकल्प यांमुळेच शक्य झाले, याची मला प्रचीती आली.

 

१२. साधनेला आरंभ केल्यावर स्वतःत जाणवलेले पालट

१२ अ. रागीटपणा न्यून होणे

पूर्वी माझा स्वभाव तापट होता. मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडल्यास मला त्वरित राग येत असे. साधनेला आरंभ केल्यावर मी विशेष कोणतेच प्रयत्न केले नाहीत; पण कुटुंबियांनी मला विचारले, तुमचा रागीटपणा कसा काय न्यून झाला ? याविषयी मला काहीच सांगता आले नाही; कारण हे केवळ गुरुदेवांच्या कृपेने झाले होते.

१२ आ. स्वयंशिस्त !

स्वतःच्या गोष्टी स्वतः करण्याऐवजी दुसर्‍यांनी मला साहाय्य करावे आणि मी आरामात रहावे, असे मला वाटायचे, उदा. कपड्यांच्या नीटनेटकेपणाने घड्या घालून ठेवणे, घेतलेली वस्तू जागेवर ठेवणे इत्यादी. साधनेमुळे मला याची जाणीव झाली आणि माझ्यातील स्वयंशिस्त वाढीस लागली.

१२ इ. स्वचे विचार न्यून होणे

पूर्वी मी इतरांचा विचार न करता माझ्या कोशात रहायचो. माझ्या व्यवसायामुळे दुसर्‍यांच्या दृष्टीकोनातून विचार करण्याऐवजी याचा मला कसा लाभ होईल ?, असा विचार मी अधिक करायचो; मात्र साधनेमुळे मी स्वतःतील प्रेमभाव वाढवण्याचा विचार करू लागलो. स्वचे विचार न्यून झाल्याने मला आनंद मिळू लागला.

१२ ई. अहंभाव न्यून होऊन विचारून सेवा करण्याचा संस्कार होणे

माझ्या व्यवसायात मीच मालक असल्याने सर्वांनी मला विचारून केले पाहिजे, माझे आज्ञापालन केले पाहिजे, मला कोणाला विचारायची काही आवश्यकता नाही, अशी माझी विचारसरणी होती; मात्र साधनेत आल्यावर गुरुदेवांच्या कृपेने विचारून सेवा करणे, ही साधना आहे, हा संस्कार माझ्यावर झाला.

– (पू.) श्री. रमेश गडकरी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.७.२०१८)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment