सीतामातेच्या वास्तव्याने पावन झालेले श्रीलंकेतील ‘सीता कोटुवा’ हे स्थान !

Article also available in :

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली
गाडगीळ आणि विद्यार्थी-साधक यांनी केलेला श्रीलंकेचा रामायणाशी संबंधित अभ्यास दौरा !

रामायणात ज्या भूभागाला ‘लंका’ किंवा ‘लंकापुरी’ म्हटले आहे, ते स्थान म्हणजे आताचा श्रीलंका देश आहे. त्रेतायुगात श्रीमहाविष्णूने श्रीरामावतार धारण केला आणि लंकापुरीला जाऊन रावणादी असुरांचा नाश केला. आता तेथील ७० टक्के लोक बौद्ध आहेत. असे असले, तरी श्रीलंकेत श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्याशी संबंधित अनेक स्थाने आहेत. श्रीराम, सीता, हनुमंत, लक्ष्मण, रावण आणि मंदोदरी यांच्याशी संबंधित अनेक स्थाने, तीर्थे, गुहा, पर्वत आणि मंदिरे श्रीलंकेत आहेत. ‘या सर्व स्थानांची माहिती मिळावी आणि जगभरातील सर्व हिंदूंना ती सांगता यावी’, यासाठी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्या समवेत ४ विद्यार्थी-साधकांनी १ मास (महिना) श्रीलंकेचा दौरा केला.

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

श्रीलंकेतील ‘गुरुलूपोथा’ येथे रावणाची पत्नी मंदोदरी हिच्या महालाच्या अवशेषांची छायाचित्रे !

 

‘श्रीलंकेत प्रभु श्रीराम, देवी सीता आणि लक्ष्मण यांच्याशी संबंधित अनेक स्थाने आहेत. वाल्मीकि रामायणात महर्षि वाल्मीकींनी जे लिहिले, त्यानुसार प्रसंग घडले असल्याचे अनेक पुरावे आढळतात. या पुराव्यांपैकीच एक म्हणजे श्रीलंकेतील ‘सीता कोटुवा’ हे स्थान ! श्रीलंकेतील ‘उवा’ या प्रांतामधील घनदाट जंगलामधील ‘गुरुलूपोथा’ या गावात ‘सीता कोटुवा’ हे स्थान आहे.

 

१. रामायणाच्या काळात रावणाकडे असलेल्या विमानतळांपैकी
‘गुरुलूपोथा’ या ठिकाणी महाराणी मंदोदरी हिचा महाल असणे

महर्षि भारद्वाज यांनी लिहिलेल्या विमाननिर्मिती शास्त्राप्रमाणे रावणाने वेगवेगळ्या विमानांची निर्मिती केली होती. असे म्हटले जाते की, रावणाकडे मयुर विमान, पुष्पक विमान आदी १८ प्रकारची विमाने होती. या विमानांसाठी रावणाकडे वेरगन्तोटा, थोडूपोल कान्डा, उस्सन्गोडा, वरियपोला, वातरियपोला आणि गुरुलूपोथा ही ६ विमानतळे होती. यांतील ‘गुरुलूपोथा’ या ठिकाणी रावणाची पत्नी महाराणी मंदोदरी हिचा भव्य महाल होता.

 

२. वनवासाच्या कालावधीत रावणाने सीतामातेचे अपहरण
करून तिला लंकेत आणल्यावर महाराणी मंदोदरीच्या महालात ठेवणे

सीतामातेचे अपहरण करून विमानाने श्रीलंकेत आल्यावर ‘सीतेला कुठे ठेवायचे ?’, असा प्रश्‍न रावणाला पडतो. तेव्हा ‘सीतामातेला महाराणी मंदोदरीच्या महालात ठेवायचे’, असे रावण ठरवतो. महाराणी मंदोदरी तिच्या दासींच्या समवेत नदीकाठी असलेल्या या महालामध्ये रहात असे. सीतामातेला घेऊन रावण मंदोदरीच्या महालात गेल्यावर पतीव्रता मंदोदरी रावणाला म्हणते, ‘‘स्वामी, ही तर स्वयं महालक्ष्मी आहे. परस्त्रीकडे पहाणेही महापाप आहे. तुम्ही तर सीतेला तिचे स्वामी प्रभु श्रीराम यांच्याकडून कपटाने आणले आहे. सीता लंकेत राहिली, तर लंकेचा विनाश अटळ आहे. त्यामुळे तुम्ही सीतेला सन्मानाने तिच्या स्वामींकडे परत सोडून द्यावे आणि त्यांची क्षमायाचना करावी. करुणासागर श्रीराम तुम्हाला क्षमा करतील.’’ त्यावर क्रोधित होऊन रावण म्हणतो, ‘‘मंदोदरी, मी लंकापती रावण तिन्ही लोकांचा स्वामी आहे. स्वर्गातील देवही मला पाहून भयभीत होतात. राम तर केवळ एक सामान्य मनुष्य आहे. त्यामुळे तू सीतेला तुझ्या महालात ठेवून घे. तिला काही न्यून पडू देऊ नकोस. काही दिवसांनी ती रामाला विसरेल. तेव्हा तू तिला माझ्याविषयी सांगून तिचे मनपरिवर्तन कर आणि तिला माझ्याशी लग्न करायला सांग.’’ असे सांगून रावण तेथून निघून जातो. पुढे अशोक वाटिकेमध्ये जाईपर्यंत देवी सीता महाराणी मंदोदरीच्या या महालात रहाते.

 

३. गुरुलूपोथा या गावी महाराणी मंदोदरीच्या महालाचे
अवशेष आणि त्याखाली असलेली नदी यांचे आजही अस्तित्व असणे

गुरुलूपोथा या गावापासून दीड किलोमीटर आत जंगलामध्ये महाराणी मंदोेदरीचा हा महाल आहे. या महालाच्या चारही बाजूंना घनदाट जंगल आहे. महालाच्या दक्षिणेला ५० पायर्‍या असून या पायर्‍या उतरून खाली गेल्यावर एक छोटीशी नदी आहे. या नदीत सीतामाता प्रतिदिन अंघोळ करत असे. आता महाराणी मंदोदरीच्या या महालाचे अवशेष आणि त्याच्या खाली असलेली नदी येथे पहायला मिळते. स्थानिक लोक महाराणी मंदोदरीच्या महालाला ‘सीता कोटुवा’ असे म्हणतात. कोटुवा म्हणजे किल्ला. हे स्थान जंगलाच्या आत असल्याने येथे कुणीही जात नाही.

 

४. अनुभूती

४ अ. सद्गुरु (सौ.) गाडगीळ सीताकोटूवा या ठिकाणी जाण्यासाठी स्थानिक रहिवाशांकडे मार्गाविषयी विचारपूस
करण्याविषयी सांगत असतांनाच तेथे एक व्यक्ती येणे आणि तिने स्वतः साधकांना सीताकोटुवा येथे घेऊन जाणे

आम्ही गुरुलूपोथा या गावात पोहोचल्यावर सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकू यांनी आम्हाला सांगितले, ‘‘या गावात रहाणार्‍या माणसांना सीता कोटुवा येथे जाण्याच्या मार्गाविषयी विचारूया. सद्गुरु काकू हे सांगत असतांनाच तेथे एक व्यक्ती आली आणि ती आम्हाला सीता कोटुवा येथे घेऊन जाण्यास सिद्धही झाली. घनदाट अरण्यात घसरगुंडीप्रमाणे असणार्‍या त्या छोट्याशा मार्गावरून आम्ही त्या व्यक्तीच्या पाठीमागे चालत गेलो.

४ आ. सीता कोटुवा येथे पोहोचल्यावर भावजागृती होणे आणि
‘अनाहतचक्राच्या ठिकाणी आनंदाचे कारंजे उडत आहेत’, असे जाणवणे

सीता कोटुवा या स्थानी पोहोचल्यावर आम्हा सर्वांची भावजागृती झाली. तेथील वातावरण अशोक वाटिकेसारखे आल्हाददायक आणि चैतन्यमय होते. त्या वेळी ‘आम्हा सर्व साधकांच्या अनाहतचक्राच्या ठिकाणी आनंदाचे कारंजे उडत आहे’, असे आम्हाला वाटत होते. त्यानंतर श्रीमन्नारायणाचा सातवा अवतार असलेल्या प्रभु श्रीरामाच्या हृदयात सतत विराजमान असणार्‍या सीतामातेच्या चरणी सनातनच्या सर्व साधकांच्या वतीने आम्ही वंदन केले. प्रभु श्रीराम आणि देवी सीता यांचे स्मरण करून तेथील पवित्र माती आम्ही मस्तकावर लावली.

 

५. घनदाट जंगलातील ‘सीता कोटुवा’ या ठिकाणी
जाता आल्याविषयी साधकाने व्यक्त केलेली कृतज्ञता !

‘गुरुलूपोथासारख्या घनदाट जंगलात सीता कोटुवाजवळ जाता येईल’, असे आम्हाला वाटले नव्हते. हे केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कृपाशीर्वाद आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकू यांची चैतन्यमय उपस्थिती यांमुळे शक्य झाले. यासाठी दौर्‍यातील आम्ही साधक परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहोत.’

Leave a Comment