रावणवधानंतर ‘ब्रह्महत्येचे पातक दूर व्हावे’, यासाठी प्रभु श्रीरामाने पूजलेले श्रीलंकेतील नगुलेश्‍वरम् मंदिरातील शिवलिंग !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
आणि विद्यार्थी-साधक यांनी केलेला श्रीलंकेचा रामायणाशी संबंधित अभ्यास दौरा !

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
रामायणात ज्या भूभागाला ‘लंका’ किंवा ‘लंकापुरी’ म्हटले आहे, ते स्थान म्हणजे आताचा श्रीलंका देश आहे. त्रेतायुगात श्रीमहाविष्णूने श्रीरामावतार धारण केला आणि लंकापुरीला जाऊन रावणादी असुरांचा नाश केला. आता तेथील ७० टक्के लोक बौद्ध आहेत. असे असले, तरी श्रीलंकेत श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्याशी संबंधित अनेक स्थाने आहेत. श्रीराम, सीता, हनुमंत, लक्ष्मण, रावण आणि मंदोदरी यांच्याशी संबंधित अनेक स्थाने, तीर्थे, गुहा, पर्वत आणि मंदिरे श्रीलंकेत आहेत. ‘या सर्व स्थानांची माहिती मिळावी आणि जगभरातील सर्व हिंदूंना ती सांगता यावी’, यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्या समवेत ४ विद्यार्थी-साधकांनी १ मास (महिना) श्रीलंकेचा दौरा केला.
श्री. विनायक शानभाग

१. ‘कीरीमलै’ गाव आणि ‘कीरीमलै’ झरा

‘कीरीमलै’ गावातील समुद्राला लागून असलेला गोड्या पाण्याचा ‘कीरीमलै’ झरा !

‘श्रीलंकेतील हिंदू अधिक करून उत्तर श्रीलंकेत रहातात. यांतील बहुसंख्य हिंदू तमिळ भाषिक आहेत. उत्तर श्रीलंकेतील हिंदु संस्कृतीशी संबंधित महत्त्वाचे शहर म्हणजे ‘जाफ्ना’. या शहरापासून ३० कि.मी. अंतरावर ‘कीरीमलै’ नावाचे एक छोटे गाव आहे. हे गाव अगदी समुद्राच्या काठावर वसले आहे. तमिळ भाषेत ‘कीरी’ म्हणजे ‘मुंगूस’ आणि मलै म्हणजे ‘पर्वत’. प्राचीन काळी या ठिकाणी एक छोटी टेकडी होती. त्या टेकडीवर असलेल्या गुहेत अनेक मुंगसे रहायची. त्यामुळे या गावाला ‘कीरीमलै’ असे नाव पडले. या ठिकाणी समुद्राला लागूनच गोड्या पाण्याचा एक झरा आहे. या झर्‍याला ‘कीरीमलै झरा’ असे म्हटले जाते.

२. एका शापामुळे नगुलऋषींचा तोंडवळा मुंगसासारखा होणे, शिवाच्या
आज्ञेने त्यांनी ‘कीरीमलै’ झर्‍यात स्नान केल्यावर त्यांना मनुष्यरूप प्राप्त होणे
आणि शिवाच्या चरणी कृतज्ञता म्हणून त्यांनी या ठिकाणी शिवलिंग स्थापन करणे

एका शापामुळे नगुलऋषींचा तोंडवळा मुंगसासारखा होणे, शिवाच्या आज्ञेने त्यांनी ‘कीरीमलै’ झर्‍यात स्नान केल्यावर त्यांना मनुष्यरूप प्राप्त होणे आणि शिवाच्या चरणी कृतज्ञता म्हणून त्यांनी या ठिकाणी शिवलिंग स्थापन करणे

सहस्रो वर्षांपूर्वी नगुल नावाचे ऋषि या ठिकाणी आले होते. एका शापामुळे त्यांचा तोंडवळा मुंगसासारखा झाला होता. नगुल ऋषींना भगवान शिव सांगतो, ‘लंकापुरीतील ‘कीरीमलै’ या ठिकाणी असलेल्या झर्‍यात (तलावात) अंघोळ केल्यास तुम्ही या शापापासून मुक्त व्हाल.’ तेव्हा नगुलऋषि ‘कीरीमलै’ तलावात अंघोळ करतात आणि त्यांना मनुष्यरूप प्राप्त होते. भगवान शिवाच्या चरणी कृतज्ञता म्हणून नगुलऋषि या ठिकाणी एका शिवलिंगाची स्थापना करून त्याची पूजा करतात. नगुलऋषींनी अंघोळ केलेल्या त्या ‘कीरीमलै’ तलावात आजही शेकडो लोक चर्मरोग दूर होण्यासाठी अंघोळ करतात.

३. ‘ब्रह्महत्येचे पातक दूर व्हावे’, यासाठी प्रभु श्रीरामाने
‘कीरीमलै’ येथील झर्‍यात स्नान करून शिवपूजा करणे

त्रेतायुगात श्रीरामाने ब्रह्महत्या दोषाचे पातक दूर व्हावे’, यासाठी ‘कीरीमलै’ तलावात अंघोळ करून नगुलेश्‍वरम् येथील मंदिरात शिवलिंगाची पूजा केली होती. ‘द्वापरयुगात अर्जुनानेही येथे शिवपूजा केली होती’, असे म्हटले जाते.

४. ३ सहस्र वर्षांपूर्वी तमिळनाडूतून आलेले संत आणि
भक्त यांनी नगुलेश्‍वर देवावर अनेक भक्तीगीते म्हटलेली असणे

त्यानंतर ३ सहस्र वर्षांपूर्वी तमिळनाडूतून शैव सिद्धांताचा प्रसार करणार्‍यांसाठी आलेले अनेक संत आणि भक्त यांनी या स्थानी नगुलेश्‍वरम् देवाविषयी अनेक भक्तीगीते म्हटलेली आहेत. पुढे ६ व्या शतकात वंग देशातील राजा विजया याने या मंदिराचा जीर्णोद्धार केला.

५. १६ व्या शतकात पोर्तुगिजांनी आणि नंतर वर्ष १९९३ मध्ये तमिळ हिंदू अन्
श्रीलंकेचे सैन्य यांच्यामध्ये झालेल्या युद्धात श्रीलंकेच्या सैन्याने हे मंदिर उद्ध्वस्त करणे
आणि त्यानंतर वर्ष २०१२ मध्ये भारत सरकारच्या साहाय्याने या मंदिराचे पुनर्निर्माण केले जाणे

१६ व्या शतकात श्रीलंकेत आलेल्या पोर्तुगिजांनी ख्रिस्ती धर्मप्रसारकांच्या सांगण्यावरून नगुलेश्‍वरम् मंदिराचा विध्वंस केला. पुढे वर्ष १८९४ मध्ये जाफ्ना येथील स्थानिक राजाने या मंदिराचे पुनर्निर्माण केले. वर्ष १९८३ मध्ये श्रीलंकेचे सैन्य आणि तमिळ लोक यांमध्ये चालू झालेल्या युद्धाच्या वेळी श्रीलंकेच्या सैन्याने हे मंदिर आपल्या कह्यात घेतले होते. वर्ष १९९३ मध्ये युद्ध जोरात चालू असतांना श्रीलंकेच्या वायूदलाने या मंदिरावर विमानातून बॉम्ब टाकून मंदिर उद्ध्वस्त केले होते. वर्ष २०१२ मध्ये भारत सरकार, श्रीलंकेचे सैन्य आणि स्थानिक हिंदू यांच्या साहाय्याने या मंदिराचे पुनर्निर्माण करण्यात आले. वर्ष १९९२ ते वर्ष २०१२ या काळात मंदिरात पूजा झाली नाही. वर्ष २०१५ मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या श्रीलंका भेटीच्या वेळी या मंदिरात जाऊन शिवलिंगाला अभिषेक केला होता.

६. नगुलेश्‍वर मंदिराच्या विश्‍वस्तांनी सद्गुरु (सौ.) अंजली
गाडगीळ यांचा सन्मान करून नगुलेश्‍वर देवाला प्रार्थना करण्यास
सांगणे आणि ‘पृथ्वीवर रामराज्य येणारच’ असे सांगून आश्‍वस्त करणे

नगुलेश्‍वरम् मंदिराचे मुख्य पुजारी ९२ वर्षीय शिवश्री नगुलेश्‍वर गुरुजी (बसलेले) यांची भेट घेतांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि (१) श्री. विनायक शानभाग

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ नगुलेश्‍वरम् मंदिरात दर्शनासाठी गेल्या असतांना तेथील ९२ वर्षांचे मुख्य पुजारी आणि विश्‍वस्त शिवश्री नगुलेश्‍वर गुरुजी यांनी त्यांचा सन्मान केला अन् नगुलेश्‍वरम् मंदिराचा इतिहास सांगणारा ५०० पानांचा ग्रंथ त्यांना भेट दिला. या वेळी शिवश्री नगुलेश्‍वर गुरुजी यांनी ‘पृथ्वीवर रामराज्य येणारच’, असे सांगून सद्गुरु काकूंना नगुलेश्‍वर देवाला प्रार्थना करण्यास सांगितली.

७. प्रभु श्रीरामाच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या मातीला अन्
शिवलिंगाला भावपूर्ण नमस्कार करतांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांची
भावजागृती होणे आणि त्या भावावस्थेत त्यांनी समुद्रदेवतेलाही भावपूर्ण नमस्कार करणे

समुद्रदेवतेला भावपूर्ण नमस्कार करतांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

श्रीरामाने जन्म घेतलेल्या भारतभूमीतून लंकेला आलेल्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांची या ठिकाणी सारखी भावजागृती होत होती आणि त्यांनी श्रीरामाच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या त्या मातीला अन् श्रीरामाने पूजा केलेल्या त्या शिवलिंगाला भावपूर्ण नमस्कार केला. त्याच भावावस्थेत मंदिरातून बाहेर आल्यावर त्यांनी समोर असलेल्या समुद्राकडे पहात समुद्रदेवतेलाही भावपूर्ण नमस्कार केला. सद्गुरु काकूंचा भाव पाहून आम्हा सर्व साधकांचीही भावजागृती झाली.

– श्री. विनायक शानभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.६.२०१८)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment