श्रीलंकेतील पंच ईश्‍वर मंदिरांमधील केतीश्‍वरम् मंदिर !

रावणासुराच्या संहारानंतर श्रीराम पुष्पक विमानाने अयोध्येकडे जायला निघाल्यावर ‘विमानाच्या मागे एक काळा ढग मागून येत आहे’, असे त्याच्या लक्षात येते. तेव्हा शिव प्रकट होऊन श्रीरामाला सांगतो, ‘हा काळा ढग म्हणजे ‘ब्रह्महत्या दोषा’चे प्रतीक आहे.’ रावण हा ब्राह्मण असल्याने त्याच्या हत्येमुळे लागलेल्या दोषनिवारणासाठी भगवान शिव श्रीरामाला श्रीलंकेतील पंच ईश्‍वर असलेल्या ठिकाणी जाऊन शिवपूजा करायला सांगतो. श्रीराम भगवान शिवाचे आज्ञापालन करतो. केतीश्‍वरम्, तोंडीश्‍वरम्, मुन्नीश्‍वरम्, कोनेश्‍वरम् आणि नगुलेश्‍वरम् ही ती पंच ईश्‍वर मंदिरे आहेत. यातील तोंडीश्‍वरम् मंदिर पाण्याची पातळी वाढल्याने समुद्राच्या खाली गेले आहे.आपण या पंच ईश्‍वर मंदिरांमधील ‘केतीश्‍वरम्’ मंदिराविषयी जाणून घेऊया.

श्रीलंकेच्या मन्नार शहरानिकट असलेले प्रसिद्ध ‘केतीश्‍वरम्’ मंदिर ! त्रेतायुगात प्रभु श्रीरामाने येथील शिवलिंगाची पूजा केली होती.

 

१. ‘केतीश्‍वरम्’ मंदिराचा इतिहास

श्रीलंकेतील पंचशिव क्षेत्रांमध्ये ‘केतीश्‍वरम्’ हे पुष्कळ प्रसिद्ध आहे. ते उत्तर श्रीलंकेतील मन्नार जिल्ह्यातील मन्नार शहरापासून १० कि.मी. अंतरावर आहे. त्रेतायुगात लंकापुरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्रीलंकेतील या भागात ‘मंदै’ नावाच्या समुद्रकिनार्‍यावर ‘बंदर शहर’ होते. या शहरात मंदोदरीचे वडील ‘मयन महर्षि’ रहायचे. या ठिकाणी एका शिवलिंगाची स्थापना करून ते त्याची प्रतिदिन पूजा करायचे. पुढे महर्षि भृगु यांनी या ठिकाणी येऊन पूजा केली. त्यानंतर केतू ग्रहाने या ठिकाणी पूजा केलेली असल्याने या स्थानाला ‘केतीश्‍वरम्’ असे नाव पडले. जगातील २७५ मुख्य शिवक्षेत्रांमध्ये ‘केतीश्‍वरम्’ एक आहे. आता या क्षेत्राला ‘तिरुकेतीश्‍वरम्’ या नावाने ओळखले जाते. ‘तिरु’ म्हणजे ‘श्री’. स्कंदपुराणात लंकापुरी येथील केतीश्‍वरम् स्थानाविषयी माहिती आढळते. केतीश्‍वरम् येथून मन्नार आणि तेथून पुढे ३० कि.मी. दूर ‘रामसेतू’ आहे. केतीश्‍वरम् हे मंदिरही समुद्राच्या जवळ आहे. त्रेतायुगात श्रीरामाने रावण हत्येनंतर ब्रह्महत्या दोषाचे पातक दूर होण्यासाठी ‘केतीश्‍वरम्’ येथील शिवलिंगाची पूजा केली होती. ‘त्या वेळी या मंदिराच्या समोर असलेल्या ‘पल्लवी’ नावाच्या पुष्करणीत श्रीरामाने अंघोळ केली होती’, असे म्हटले जाते.

 

२. पोर्तुगिजांनी केतीश्‍वरम् मंदिरावर आक्रमण
करून येथील शिवलिंग आणि मंदिर परिसर उद्ध्वस्त
करणे अन् त्या मंदिराचे दगड किल्ले आणि चर्च बांधण्यासाठी वापरणे

वर्ष १५०५ मध्ये पोर्तुगिजांनी मन्नार शहरावर आक्रमण केले. मन्नार शहराच्या पंचक्रोशीत असलेली सर्व हिंदु मंदिरे त्यांनी उद्ध्वस्त केली. या वेळी त्यांनी ‘केतीश्‍वरम्’ येथील शिवलिंग आणि मंदिर परिसर उद्ध्वस्त केले. त्यानंतर पोर्तुगिजांनी ख्रिस्ती पंथाचा प्रसार चालू केला. वर्ष १५८९ मध्ये पोर्तुगिजांनी केतीश्‍वरम् मंदिराचे दगड मन्नार येथे एक किल्ला आणि चर्च, तसेच ‘केट्स’ नावाच्या गावात एक किल्ला बांधायला वापरले. यावरून ‘त्या काळी मंदिर किती मोठे होते’, याचा अंदाज येतो.

 

३. ब्रिटिशांनी केलेल्या उत्खननात मंदिराचे
मूळ स्थान अन् प्राचीन शिवलिंग सापडणे, श्रीलंकेतील
तमिळ युद्धाच्या वेळी श्रीलंकेच्या सैन्याने हे मंदिर कह्यात
घेऊन तेथे सैन्याचे तळ बनवणे, युद्धामुळे मंदिर नष्ट होणे आणि
भारत सरकारच्या साहाय्याने या मंदिराचे पुनर्निर्माण कार्य चालू असणे

‘वर्ष १५०५ ते १८९४ या काळात मंदिराचे मूळ स्थान कुठे आहे’, हेही कुणाला ठाऊक नव्हते. वर्ष १८९४ मध्ये ब्रिटिशांनी केलेल्या उत्खननात मंदिराचे मूळ स्थान, प्राचीन शिवलिंग आणि परिवार देवतांच्या मूर्ती सापडल्या. वर्ष १९१० मध्ये ‘अरुमुग नावल्र्’ नावाच्या स्थानिक हिंदु नेत्याच्या पुढाकाराने त्या ठिकाणी एक छोटे मंदिर बांधण्यात आले. वर्ष १९४८ मध्ये उत्तर श्रीलंकेतील हिंदूंंनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मोठे आंदोलन केल्याने श्रीलंका सरकारला येथे मंदिर बांधावे लागले. पुढे वर्ष १९९० मध्ये श्रीलंकेतील तमिळ युद्धाच्या वेळी श्रीलंकेच्या सैन्याने हे मंदिर कह्यात घेतले आणि तेथे सैन्याचे तळ बनवले. युद्धामुळे मंदिर नष्ट झाले. आता गेल्या ५ वर्षांपासून भारत सरकारच्या साहाय्याने या मंदिराचे पुनर्निर्माण कार्य चालू आहे.

 

४. हिंदु धर्मप्रेमी श्री. नटेसन्जी यांनी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
यांच्या मंदिर दर्शनाचे नियोजन करणे, मंदिराच्या विश्‍वस्तांनी मंदिराविषयी
सर्व माहिती देणे, बांधकाम चालू असलेल्या मंदिराचा भाग दाखवणे आणि ‘काही
सुधार करायचे असतील,  तर सांगा’, असे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना सांगणे

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मन्नार शहरात गेल्या असतांना तेथील हिंदु धर्मप्रेमी श्री. नटेसन्जी यांनी मंदिर दर्शनाचे नियोजन केले. जेव्हा सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मंदिरात पोहोचल्या, त्या वेळी मंदिराचे मुख्य पुजारी आणि मंदिराचे विश्‍वस्त उपस्थित होते. मंदिराचे विश्‍वस्त श्री. रामकृष्ण यांनी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना मंदिराचा इतिहास, मंदिराची सद्यःस्थिती, मंदिर बांधण्यात भारत सरकार करत असलेले साहाय्य, यांविषयी सर्व माहिती दिली, तसेच सध्या बांधकाम चालू असलेल्या मंदिराचा आतील सर्व भाग त्यांना दाखवला. या वेळी मंदिराच्या विश्‍वस्तांनी ‘काही सुधार करायचे असतील, तर सांगा’, असे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना सांगितले. नंतर त्यांनी मंदिराच्या स्थापत्याशी संबंधित जुने लिखाण आणि पुस्तक महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयासाठी भेट म्हणून दिले.

 

५. मंदिराचे पुनर्निर्माण करणारे चेन्नई येथील
श्री. सेल्वनाथन् यांनी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयासाठी
स्थापत्य शास्त्राविषयी कोणतीही माहिती देणार असल्याचे सांगणे

या वेळी मंदिराचे पुनर्निर्माण करणारे चेन्नई येथील श्री. सेल्वनाथन् भेटले आणि त्यांनी मंदिरासाठी लागणारे दगड अन् कामगार भारतातून आणले असल्याचे सांगितले. श्री. सेल्वनाथन् यांनी सांगितले, ‘‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयासाठी स्थापत्य शास्त्राविषयी कोणतीही माहिती हवी असल्यास मी ती देईन किंवा त्या विषयीचे जुने ग्रंथ देईन.’’ यावरून ‘केतीश्‍वरम्ला जाण्याचे नियोजन हे ईश्‍वरी नियोजन होते आणि गुरुकृपेमुळे श्री. सेल्वनाथन् यांची भेट झाली’, असे आमच्या लक्षात आले.’

– श्री. विनायक शानभाग, श्रीलंका (२२.६.२०१८)

Leave a Comment