श्रीलंकेच्या जाफना शहराजवळ असलेल्या नैनातीवू बेटावरील आणि ५१ शक्तीपिठांमधील एक असलेले नागपुषाणी देवीचे प्रसिद्ध मंदिर !

Article also available in :

१. शक्तीपिठांची निर्मिती

उत्तर श्रीलंकेतील जाफना या शहराजवळ असलेल्या नैनातीवू (नागद्विप) या द्विपावर असलेले नागपुषाणी देवीचे मंदिर ! ५१ शक्ती पिठांमधील हे एक शक्तीपीठ आहे.

सत्ययुगात भगवान शिवाची शक्ती ‘सतीदेवी’ हिचे मृत शरीर उचलून भगवान शिव तांडव नृत्य करत असतांना संपूर्ण जगाचे कार्य संपुष्टात आले. देवतांनी भगवान शिवाला शांत करण्यासाठी भगवान विष्णूचे साहाय्य मागितले. तेव्हा भगवान विष्णूने सुदर्शनचक्र सोडल्याने ‘सतीदेवी’च्या शरिराचे ५१ तुकडे झाले आणि पृथ्वीवर पडले. त्यानंतर भगवान शिव शांत झाला. ज्या ठिकाणी सतीदेवीच्या शरिराचे तुकडे पडले, त्या स्थानांना ‘शक्तीपीठ’ म्हटले जाते. त्यांतील ४२ शक्तीपिठे भारतात, ४ बांगलादेशात, २ नेपाळमध्ये, १ श्रीलंकेत (नैनातीवू), १ चीनमध्ये (मानस) आणि १ पाकिस्तानमध्ये (हिंगुलाजमाता) आहे. सतीच्या पायातील घुंगरू श्रीलंकेच्या उत्तर भागात असलेल्या जाफना या शहराजवळ असणार्‍या ‘नैनातीवू’ या द्विपावर पडले.

 

२. नैनातीवू म्हणजेच नागद्वीप !

श्रीलंकेच्या अभ्यासदौर्‍यात नैनातीवू येथे पोहोचल्यावर नागपुषाणी देवीच्या मंदिराकडे जातांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि विद्यार्थी-साधक !

प्राचीन काळात ‘नैनातीवू’ला ‘नागद्वीप’ या नावाने ओळखले जात असे. येथील शक्तीपिठाच्या स्थानी देवीचे एक मंदिर आहे. त्या देवीचे नाव ‘नागपुषाणी देवी’ असे आहे. स्थानिक लोक बोलीभाषेत देवीला ‘नैनादेवी’ या नावाने संबोधत असत. त्यामुळे नागद्विपाला पुढे ‘नैनाद्वीप’ असे नाव पडले. कलियुगात श्रीलंका बेटावर तमिळ भाषेचा प्रभाव वाढल्यामुळे ‘नैनाद्विपा’चे रूपांतर ‘नैनातीवू’ असे झाले. तमिळ भाषेत ‘तीवू’ म्हणजे ‘द्वीप.’

नागपुषाणी देवीच्या मूळ मूर्तीची पूजा करतांना पुजारी !
नागपुषाणी देवीच्या मंदिरासमोर उभे असलेले सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, विद्यार्थी साधक आणि १. अन्य २. श्रीलंकेतील धर्माभिमानी

 

३. नैनातीवू येथील नागपुषाणी देवीचे मंदिर

३ अ. नैनातीवू द्विपावर बोटीने जातांना लांबूनही मंदिराच्या राजगोपुराचे दर्शन होणे

पृथ्वीवरील ५१ शक्तीपिठांपैकी एक असलेल्या नैनातीवू येथील नागपुषाणी देवीचे मंदिर हे नैनातीवू नावाच्या द्विपावर आहे. उत्तर श्रीलंकेतील जाफना शहरापासून ३३ कि.मी. दूर असलेल्या ‘कुरिकडूवान’ नावाच्या गावापर्यंत मार्ग असून तेथून पुढे २० मिनिटे बोटीने प्रवास करून आपण ‘नैनातीवू’ या द्विपावर पोहोचतो. नैनातीवू द्विपावर बोटीने जातांना सभोवती हिंदी महासागर आहे. बोटीने जातांना लांबूनही मंदिराच्या राजगोपुराचे दर्शन होते.

३ आ. ‘नागपुषाणी देवी’च्या मंदिराचा इतिहास

या मंदिराच्या निर्मितीमागेही इतिहास आहे. महाभारत काळापासून नाग आणि गरुड यांच्यामध्ये वैषम्य आहेे. प्राचीन काळात नैनातीवू येथील देवीला बाजूच्या ‘पुळीयंतीवू’ या द्विपावर रहाणारा नाग प्रतिदिन एक फूल तोंडात घेऊन जाऊन अर्पण करत असे. एके दिवशी गरुड त्या ठिकाणी येतो. तो नागाच्या वाटेत समुद्राच्या मध्यभागी एका दगडावर बसतो. तो नागाला जायला वाट देत नाही. थोड्या दूरवर दुसर्‍या एका दगडावर नागही ‘गरुड कधी जाणार ?’, याची वाट बघत बसतो. काही काळानंतर तमिळनाडूतील चोळ राज्यातून देवीकडे जाणारा एक व्यापारी भक्त समुद्रात नाग आणि गरुड यांचे हे वैषम्य बघतो. तो व्यापारी गरुडाला विनंती करतो. त्यावर गरुड व्यापार्‍याला म्हणतो, ‘‘तू या ठिकाणी नागपुषाणी देवीसाठी मंदिर बांधण्याचे वचन दिल्यास मी येथून निघून जातो.’’ त्यावर व्यापारी मंदिर बांधायचे वचन देतो आणि गरुड नागाची क्षमायाचना करून निघून जातो. पुढे तो व्यापारी त्या ठिकाणी देवीसाठी मोठे मंदिर बांधतो. तेच आताचे ‘नागपुषाणी देवी’चे मंदिर आहे. वर्ष १६२० मध्ये पोर्तुगिजांनी केलेल्या आक्रमणात मंदिराचा काही भाग नष्ट झाला. त्याचे वर्ष १७८८ मध्ये नवनिर्माण करण्यात आले.

 

४. श्रीलंकेतील धर्माभिमानी श्री. मरवनपुलावू सच्चितानंदन यांनी मंदिरदर्शनाची सोय करणे

श्रीलंकेतील धर्माभिमानी श्री. मरवनपुलावू सच्चितानंदन यांनी त्यांच्या दोन कार्यकर्त्यांना आमच्या समवेत पाठवले. त्या दोन कार्यकर्त्यांनी आमची समुद्रातून बोटीने जाण्याची, मंदिरदर्शन आणि नैनातीवू द्विपावर प्रवास करण्यासाठी गाडीची व्यवस्था केली.

 

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने २९ शक्तीपिठांचे दर्शन होणे

हे सर्व परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेनेच झाले. ‘परात्पर गुरु डॉक्टर, तुमच्या कृपेमुळेच आतापर्यंत आम्हाला सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत भारत, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांतील २९ शक्तीपिठांचे दर्शन झाले.

 

६. कृतज्ञता

सद्गुरु काकूंची चैतन्यमय वाणी, त्यांची उपस्थिती, ईश्‍वरी मार्गदर्शन आणि आध्यात्मिक ऊर्जा यांमुळे आम्हाला कधीही कोणताही त्रास झाला नाही. आमचा प्रवास आनंददायी होतो. परात्पर गुरु डॉक्टर, तुम्हीच आम्हाला शक्तीस्वरूपिणी अशा सद्गुरु गाडगीळकाकू दिल्याबद्दल आम्ही सर्व साधक तुमच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. विनायक शानभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.७.२०१८)

Leave a Comment