लक्षावधी वर्षांचा इतिहास लाभलेला आणि भारतापासून श्रीलंकेतील तलैमन्नार या टोकापर्यंत असलेला रामसेतु : श्रीरामाशी अनुसंधान साधणारा भावबंध !

Article also available in :

‘श्रीराम आणि श्रीलंका या दोन्हींचा संबंध लक्षात घेतल्यावर ‘रामसेतू’विषयी मनात विचार येतो. श्रीरामावतार त्रेतायुगात म्हणजे न्यूनतम १७ लक्ष वर्षांपूर्वी झाला. रामायणात वर्णिल्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी श्रीरामाचे आगमन झाले, त्या त्या ठिकाणी नवीन तीर्थ, दिव्य क्षेत्र आणि मंदिर आज आपल्याला पहायला मिळते. १०० कोटी हिंदूंच्या भावना श्रीरामाच्या ज्या चिन्हाशी निगडित आहे, ते म्हणजे ‘रामसेतु !’ महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि ४ विद्यार्थी-साधक जानेवारी २०१८ मध्ये श्रीलंकेच्या अभ्यास दौर्‍याच्या निमित्ताने रामसेतूच्या श्रीलंकेतील टोकाकडे जाऊन आले.

प्रभु श्रीरामचंद्रांच्या पावन चरणांचा स्पर्श झालेल्या रामसेतूचे अत्यंत भावपूर्ण दर्शन घेतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ

 

१. ऑक्टोबर २०१८ मध्ये दुसर्‍यांदा केलेला श्रीलंकेचा दौरा !

१ अ. रामसेतू दर्शनाची अनुमती मिळण्यासाठी प्रतिष्ठित व्यक्तींनी केलेले अनमोल साहाय्य !

ऑक्टोबर २०१८ मध्ये आम्हाला पुन्हा श्रीलंकेच्या दौर्‍यावर जाण्याची संधी लाभली. तेव्हा श्रीलंकेच्या बाजूला असलेल्या श्रीरामसेतूला जाण्यासाठी आम्ही कागदपत्रांची सिद्धता करायला आरंभ केला. या श्रीरामसेतूचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा २ – ३ कि.मी.चा भाग भूभागाशी संलग्न आहे, तर भारताच्या बाजूने असलेल्या रामसेतूचा बहुतांश भाग पाण्याखाली आहे. आम्ही आवश्यक ती कागदपत्रे श्रीलंकेतील भारतीय दूतावासात पाठवली; मात्र त्यांनी आम्हाला नकार दिला. त्यामुळे आम्ही श्रीलंकेच्या रक्षामंत्रालयाला निवेदन दिले. त्यांनी लगेचच आम्हाला होकार दिला. श्रीलंकेच्या रक्षा मंत्रालयालयात जाऊन रक्षासचिवांना निवेदन देण्यासाठी प्रतिष्ठित व्यक्तींनी आम्हाला सर्व साहाय्य केले.

१ आ. रामसेतू दर्शनाला जातांना आलेल्या अडचणी

१ आ १. समुद्रात वादळ आल्याने रामसेतूपर्यंत जाण्यात अडचणी निर्माण होणे : रामसेतूला जाण्यासाठी आवश्यक अनुमती मिळूनही आम्हाला तिकडे जाता येत नव्हते; कारण त्या वेळी श्रीलंकेच्या उत्तर किनारपट्टीवरील समुद्रात वादळ आले होते. रामसेतूकडे जायला दोन मार्ग आहेत.

एक म्हणजे मच्छिमारांच्या बोटीतून जाणे आणि दुसरा मार्ग म्हणजे वाळू आणि पाणी यांतून ४ कि.मी.चे अंतर चालत जाणे. हे दोन्ही मार्ग कठीण आहेत. वादळ आल्यामुळे मच्छिमारांना समुद्रात जाण्याची अनुमती नव्हती. वादळ असल्याने श्रीलंकेच्या नौदलाने धोक्याची सूचना (‘रेड अलर्ट’) दिली होती आणि ‘नागरिकांनी किनारपट्टीवर येऊ नये, आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल’, अशी चेतावणी दिली होती.

१ आ २. प्रतिष्ठित व्यक्तींनी त्यांच्याशी संबंधित असणार्‍या अन्य व्यक्तींना सर्व साहाय्य करण्यास सांगणे, त्याप्रमाणे किनार्‍यावरील सर्व नौसैनिकांना सूचना दिल्या जाणे; पण नौदलाने ‘वादळ कमी झाल्याशिवाय किनार्‍यावर जाऊ देऊ शकत नाही’, असे सांगणे आणि आश्‍चर्य म्हणजे १ घंट्यातच वादळाचा जोर न्यून होऊन त्याने दिशा पालटणे : आम्ही प्रतिष्ठित व्यक्तींना संपर्क केला. त्यांनी संबंधित प्रमुखांना आम्हाला साहाय्य करण्यास सांगितले. किनारपट्टीवर १०० ते १५० ‘टेहळणी मनोरे’ (वॉच टॉवर्स) होते. प्रत्येक ‘टेहळणी मनोर्‍यामध्ये २ – ३ नौसैनिक होते. त्या सर्वांना सांगण्यात आले, ‘‘भारतातून एक ‘माताजी’ आल्या आहेत. त्या रामसेतूचे दर्शन घेऊन येईपर्यंत कुणीही त्यांना अडवू नये’’; मात्र नौदलाने आम्हाला सांगितले, ‘‘वादळ कमी होत नाही, तोपर्यंत आम्ही तुम्हाला किनार्‍यावर जाऊ देऊ शकत नाही.’’ गुरुदेवांच्या कृपेने १ घंट्यातच वादळाचा जोर न्यून होऊन त्याने त्याची दिशा पालटली ! जसे पुराणांमध्ये ऐकले होते, तसेच हे सर्व घडत होते.

खडतर प्रवास करून रामसेतूच्या दर्शनासाठी ‘टॅ्रक्टर ट्रॉली’मधून जातांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ आणि त्यांच्या समवेत असणारे साधक अन् स्थानिक व्यक्ती

१ आ ३. रामसेतूच्या पहिल्या द्विपाला जाण्यासाठी वाळू आणि समुद्राचे पाणी यांतून ४ कि.मी. अंतर जावे लागणे अन् त्यासाठी तेथील मच्छिमारांनी ‘ट्रॅक्टर ट्रॉली’ उपलब्ध करून देणे : रामसेतू ३२ कि.मी. लांब आहे. आता मध्ये मध्ये समुद्राचे पाणी आल्याने हा सेतू सलग दिसत नाही, तर एका रांगेत १६ द्वीप असल्याप्रमाणे दिसतो. त्यातील ८ द्वीप भारतीय नौसेनेकडे आणि उर्वरित ८ द्वीप श्रीलंकेच्या नौसेनेकडे आहेत. श्रीलंकेच्या बाजूला असलेल्या श्रीरामसेतूच्या पहिल्या द्विपाला जाण्यासाठी वाळू आणि समुद्राचे पाणी यांतून जायला ४ कि.मी.चे अंतर चालून जावे लागते. तेथे आम्ही स्थानिक मच्छिमारांशी बोललो. बहुतांश मच्छिमार ख्रिस्ती होते. त्यांनी एका व्यक्तीला दूरभाष केला. त्याने त्याची ‘ट्रॅक्टर ट्रॉली’ आणली. विशेष म्हणजे त्या व्यक्तीचे नाव ‘हनुमान’ होते !

१ आ ४. वादळ येऊन गेल्यामुळे पाऊस पडू लागणे, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘आता रामसेतूकडे जाऊया, श्रीरामच आपल्याला घेऊन जाईल’, असे म्हणणे आणि त्याची प्रचीती येणे : गाडी जाऊ शकते, तेथपर्यंत आम्ही गाडीने प्रवास केला. तेथून पुढे आम्हाला रामसेतूपर्यंत ‘ट्रॅक्टर ट्रॉली’मधून जावे लागणार होते. नुकतेच वादळ येऊन गेल्यामुळे पाऊस पडायला लागला. पाऊस पडू लागल्यावर ‘पुढे कसे होईल ?’, असा विचार मनात आला. तेव्हा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ म्हणाल्या, ‘‘आपण पुढे जाऊया. श्रीरामाच्या मनात आहे, तर तोच आपल्याला रामसेतूपर्यंत घेऊन  जाईल !’’ त्याप्रमाणे आम्ही सर्व जण ‘ट्रॅक्टर ट्रॉली’मध्ये बसून निघालो.

काही अंतर गेल्यावर आमच्या लक्षात आले, ‘रामसेतूचा परिसर सोडून अन्य सगळीकडे पाऊस पडत आहे.’ तेव्हा ‘हे सर्व श्रीरामाचे नियोजन आहे’, असे आमच्या लक्षात आले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राची पूजा केल्यानंतर वाळूमध्ये ‘श्रीराम’ हे अक्षर लिहितांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ

१ इ १. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र वाळूवर ठेवून त्याला उदबत्ती ओवाळून भावपूर्ण प्रार्थना करणे, तेव्हा क्षणार्धात समुद्राचे पाणी जवळ येऊन त्याने छायाचित्राला स्पर्श करणे : त्यानंतर ‘ट्रॅक्टर ट्रॉली’ थांबली, तेथून श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ काही अंतर चालत गेल्या. एके ठिकाणी वाळूवर त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र ठेवले आणि त्याला उदबत्तीने ओवाळून दोन्ही हात जोडून प्रार्थना केली. तेव्हा १०० फूट दूर असलेले समुद्राचे पाणी अकस्मात् गुरुदेवांच्या छायाचित्रापर्यंत आले. गुरुदेवांचे छायाचित्र आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ उभ्या होत्या, तेवढाच परिसर समुद्राच्या पाण्याने ओला झाला. हे सर्व क्षणार्धात घडले. एवढ्या मोठ्या किनारपट्टीवर अन्यत्र कुठेही असे समुद्राचे पाणी आत आल्याच्या खुणा नव्हत्या. जणू काही समुद्रदेवच गुरुदेवांना स्पर्श करण्यासाठी आतुर झाल्यासारखा त्यांच्या जवळ आला होता !

रामसेतूच्या दर्शनाला गेल्यानंतर समुद्राच्या लाटांपासून दूर असूनही एका लाटेने अचानक पुढे येत श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणांना स्पर्श केला, जणू समुद्रदेवतेनेच चरणस्पर्श केले !

 

२. रामसेतूचे संशोधक श्री. कल्याणरामन् यांनी सांगितलेली माहिती

१. भारताचा भूभाग (डावीकडे) आणि श्रीलंकेचा भूभाग (उजवीकडे) यांना जोडणारा रामसेतु (गोलात दाखवल्याप्रमाणे) (उपग्रह चित्र)

२ अ. नलाच्या अधिपत्याखाली आणि नीलाच्या साहाय्याने १० लक्ष वानरांनी
अवघ्या २५ दिवसांत रामसेतु बांधलेला असणे आणि रामसेतूचा रक्षक हनुमंत असणे

रामसेतूचे संशोधक श्री. कल्याणरामन् यांनी आम्हाला सांगितले, ‘‘रामसेतूचे आधीचे नाव ‘नलसेतु’ असे आहे. रामायणातही याला ‘नलसेतु’ याच नावाने संबोधिले आहे. रामेश्‍वरम् येथे समुद्र जेव्हा श्रीरामाला वाट देत नाही, तेव्हा श्रीराम क्रोधित होतो. वरुणदेव स्वयं प्रकट होतो आणि श्रीरामाला शांत करतो. वरुण म्हणतो, ‘हे श्रीरामा, तुझ्या वानरसेनेमध्ये विश्‍वकर्म्याचे नल आणि नील नावाचे वानर आहेत. ते तुला समुद्रावरून सेतु बांधायला साहाय्य करतील.’ नलाच्या अधिपत्याखाली आणि नीलाच्या साहाय्याने १० लक्ष वानरांनी अवघ्या २५ दिवसांत हा सेतु बांधला. पहिल्या पाच दिवसांतच मोठे वृक्ष आणि पर्वतांचे दगड वापरून सेतूचा पाया बांधला गेला. हा सेतु भारताच्या पंबन् द्विपाच्या धनुष्कोडी या टोकापासून श्रीलंकेच्या मन्नार द्विपावरील तलैमन्नार या टोकापर्यंत आहे. सेतु अनुमाने ३२ कि.मी. लांबीचा असावा. रामसेतूचा रक्षक हनुमंत आहे आणि हनुमंत चिरंजीव असल्याने तो सेतूच्या रक्षणासाठी सतत उभा आहे.

२. तलैमन्नार येथे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्री. विनायक शानभाग यांना रामसेतूविषयी माहिती सांगतांना स्थानिक नागरिक

२ आ. मन्नार द्वीपावरील तलैमन्नार येथील शेवटच्या
टोकापासून २ कि.मी. चालत गेल्यावर रामसेतूचे दर्शन होणे

उत्तर श्रीलंकेतील पश्‍चिम समुद्रतटावर मन्नार जिल्हा आहे. मन्नार शहर मन्नार द्वीपावर आहे. मन्नार शहरापासून ३५ कि.मी. दूर तलैमन्नार नावाचे टोक आहे. येथे श्रीलंका नौकादलाचे मोठे केंद्र आहे. तलैमन्नार येथील शेवटच्या टोकापासून २ कि.मी. चालत गेल्यावर रामसेतूचे दर्शन होते. रामसेतु वरून पाहिल्यास १६ लहान द्विपे एकत्र असल्याप्रमाणे (द्वीपसमुहासारखे) दिसते. यांतील ८ द्विपे भारताच्या सरहद्दीत आणि ८ द्विपे श्रीलंकेच्या सरहद्दीत आहेत. दोन्ही राष्ट्रांकडून रामसेतु येथे जायला मनाई आहे. सेतूच्या सभोवतीच्या परिसरात केवळ मच्छिमारांना जायला अनुमती आहे.

भारत आणि श्रीलंका या राष्ट्रांना जोडणारा आणि लक्षावधी वर्षे प्राचीन असलेला रामायण काळातील ‘रामसेतु’ ! (गोलात दाखवला आहे.) (उपग्रह चित्र)

 

रामसेतु येथील वाळूची भावपूर्ण पूजा करून तिला नमस्कार करतांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

 

३. रामसेतु येथील वैशिष्ट्यपूर्ण वाळू

येथील वाळू स्वच्छ पांढरी आहे. वाळू हातात घेतल्यावर भावजागृती होते आणि ‘ती शरिराला लावावी’, असे वाटते. अन्य ठिकाणची वाळू आणि रामसेतु येथील वाळू, यांच्यात भेद आहे. येथील वाळूत अणुबॉम्ब बनवणार्‍या अणुभट्टीसाठी (‘न्यूक्लीयर रिअ‍ॅक्टर’साठी) लागणार्‍या ‘थोरियम’चा समावेश आहे.

रामसेतू येथील दैवी वाळू हातात घेतलेल्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ

 

४. रामसेतूच्या जवळ जातांना साधकांची भावजागृती होणे

रामसेतूच्या जवळ जातांना सर्व साधकांची भावजागृती होत होती आणि ‘हा केवळ सेतु नसून श्रीरामाशी जोडणारा भावसेतु आहे’, असे सर्वांना वाटले. रामसेतूच्या भागात एक वेगळेच चैतन्य अनुभवायला मिळते. त्याचे शब्दांत वर्णन करू शकत नाही.

 

५. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी रामसेतूची भावपूर्ण पूजा करणे

५ अ. वाळूवर पुष्प अर्पण करून नमस्कार करणे आणि तेथील वाळू कपाळाला लावणे

श्रीलंकेतील तलैमन्नारच्या समुद्रतटापासून रामसेतु जेथून आरंभ होतो, तेथे आम्ही स्थानिक लोकांच्या साहाय्याने पोहोचलो. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासह आम्ही २ कि.मी. चाललो. सद्गुरु काकूंनी रामसेतूची भावपूर्ण पूजा केली. त्यांनी तेथे वाळूवर पुष्प अर्पण करून नमस्कार केला आणि तेथील वाळू कपाळाला लावली.

५ आ. सद्गुरु काकू म्हणाल्या, ‘‘रामावतार होऊन लक्षावधी वर्षे उलटून गेली असली, तरी रामसेतु अजूनही ‘राम, राम’, असा जप करत आहे. या वाळूतूनही जप ऐकू येत आहे.’’

 

६. कृतज्ञता

श्रीरामाशी अनुसंधान असणार्‍या या भावबंधाची (‘रामसेतू’ची) अनुभूती आम्हाला केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळे मिळाली. यासाठी त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’

– श्री. विनायक शानभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.६.२०१८)

Leave a Comment