श्रीलंकेतील हिंदूंच्या सर्वांत मोठ्या मुन्नीश्‍वरम् मंदिरातील शिवलिंग आणि मानावरी येथील वाळूचे शिवलिंग !

१. मुन्नीश्‍वरम् मंदिराचा इतिहास

१. मुन्नीश्‍वरम् मंदिरातील शिवलिंग ! त्रेतायुगात प्रभु श्रीराम येण्याच्याही आधीपासून जो येथे होता, तो म्हणजे ‘मुन्नीश्‍वरम्’, असे म्हटले जाते.

१ अ. ‘मुन्नीश्‍वरम् मंदिर’ श्रीलंकेतील सर्वांत मोठे हिंदु मंदिर असणे

श्रीराम तोंडीश्‍वरम्, कोनेश्‍वरम्, नगुलेश्‍वरम्, केतीश्‍वरम् या ठिकाणी जाऊन मुन्नीश्‍वरम् या ठिकाणी येतो. मुन्नीश्‍वरम् हे गाव श्रीलंकेतील पुत्तलम् जिल्ह्यात आहे. तमिळ भाषेत ‘मुन्न’ म्हणजे ‘आदि’ आणि ‘ईश्‍वर’ म्हणजे ‘शिव’. ‘जो श्रीराम येण्याच्याही आधीपासून येथे होता, तो म्हणजे ‘मुन्नीश्‍वरम्’, असे म्हटले जाते. या गावात तमिळ हिंदू आणि सिंहला भाषा बोलणारे बौद्ध यांची संख्या समान आहे. या गावातील सर्व लोकांचा मुन्नीश्‍वरम् देवावर विश्‍वास आहे. हे श्रीलंकेतील सर्वांत मोठे हिंदु मंदिर आहे. येथे असलेल्या शिवाचे नाव ‘मुन्नैनाथ स्वामी’ आणि देवी पार्वतीचे नाव ‘वडिवांबिगा देवी’ असे आहे.

२. हिंदूंचे श्रीलंकेतील सर्वांत मोठे असलेले मुन्नीश्‍वरम् मंदिर ! या मंदिरातील शिवलिंगाची स्वत: प्रभु श्रीरामाने पूजा केली होती.

१ आ. पोर्तुगिजांनी मंदिरावर आक्रमण करून मंदिराचा परिसर
नष्ट करणे, त्यानंतर सिंहल राजा कीर्तीश्री राजसिंघे यांनी या मंदिराचे
पुनर्निर्माण करणे, आताचे मंदिर एक भक्त श्री. कुमारस्वामी गुरुजी यांनी बांधलेले असणे
आणि मंदिरात होणार्‍या उत्सवांच्या दिवशी श्रीलंकेतील कानाकोपर्‍यांतून भक्त दर्शनाला येत असणे

वर्ष १५७८ मध्ये पोर्तुगिजांनी मुन्नीश्‍वरम् मंदिरावर आक्रमण केले. त्यांनी मुन्नीश्‍वरम् मंदिराचा परिसर नष्ट केला; पण मंदिराचा पाया तसाच ठेवला. पोर्तुगिजांनी मंदिराच्या पायावर चर्च बांधले. त्यानंतर त्यांंनी ख्रिस्ती धर्माचा प्रसार चालू केला आणि वर्ष १६४० पर्यंत मुन्नीश्‍वरम् गावातील ५०० लोकांना ख्रिस्ती बनवले. पोर्तुगिजांनी मंदिरावर आक्रमण करण्याच्या आधी ईश्‍वराच्या कृपेने मंदिराच्या पुजार्‍यांनी मंदिरातील शिवलिंग आणि अन्य देवतांच्या मूर्ती तेथून हलवल्या होत्या. वर्ष १७५३ मध्ये कँडी येथील सिंहल राजा कीर्तीश्री राजसिंघे यांनी या मंदिराचे पुनर्निर्माण आणि कुंभाभिषेकही केला. ‘त्या राजाने मंदिराच्या नावे भूमी दान देऊन प्रतिदिन मंदिरातील देवतांच्या पूजा-अर्चनेची सोय केली होती’, असा उल्लेख आढळतो. आताचे मंदिर कोलंबो येथील एक भक्त श्री. कुमारस्वामी गुरुजी यांनी वर्ष १८७५ मध्ये बांधले आहे. या मंदिरात होणार्‍या उत्सवांच्या दिवशी श्रीलंकेतील कानाकोपर्‍यांतून भक्त श्री मुन्नीश्‍वरम् देवाच्या दर्शनाला येतात.

३. मंदिरातील पुजार्‍यांना तमिळ सनातन पंचांग भेट देतांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, समवेत श्री. विनायक शानभाग

१ इ. पुजार्‍यांनी मंदिर दाखवणे आणि रामराज्यासाठी विशेष प्रार्थना अन् पूजा करणे

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मंदिरात आल्या असता मंदिरातील मुख्य पुजार्‍यांनी एका पुजार्‍यांना आमच्या समवेत देऊन आम्हाला मंदिर दाखवले. पुजार्‍यांनी रामराज्यासाठी विशेष प्रार्थना आणि पूजा केली. या वेळी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पुजार्‍यांना तमिळ भाषेतील सनातन पंचांग भेट दिले.

 

२. मानावरी येथे श्रीरामाने स्थापिलेले वाळूचे शिवलिंग

१. मुन्नीश्‍वरम्जवळ असलेले मानावरी या समुद्रकाठी वसलेल्या गावातील शिवमंदिर !

२ अ. रावणाशी युद्ध करण्यापूर्वी श्रीरामाने मानावरी येथे वाळूचे शिवलिंग स्थापून त्याची पूजा करणे

मुन्नीश्‍वरम् गावापासून १० कि.मी. अंतरावर ‘मानावरी’ हे गाव आहे. रावणाशी युद्ध करण्यासाठी लंकेला जाण्याच्या वेळी श्रीरामाने रामेश्‍वरम् येथे वाळूच्या शिवलिंगाची स्थापना करून त्याची पूजा केली. पुढे श्रीराम रामेश्‍वरम् येथून ‘रामसेतू’च्या मार्गे श्रीलंकेतील मन्नार येथे जातो. युद्धाच्या आधी श्रीराम मुन्नीश्‍वरम्जवळ असलेल्या समुद्रकाठी येतो. ते हे मानावरी गाव. या ठिकाणी श्रीराम वाळूच्या शिवलिंगाची स्थापना करून त्याची पूजा करतो. श्रीरामाने संपूर्ण पृथ्वीवर स्थापिलेली दोनच शिवलिंगे आहेत. त्यांतील एक भारतातील रामेश्‍वरम् येथे आणि दुसरे श्रीलंकेतील मानावरी येथे आहे. रामेश्‍वरम् येथील मंदिराचे प्रवेशद्वार समुद्राच्या दिशेने आहे आणि मानावरी येथील मंदिराच्या मागे समुद्र आहे.

२. मानावरी येथे स्वत: प्रभु श्रीरामाने स्थापन केलेले वाळूचे शिवलिंग !

२ आ. मंदिरातील पुजार्‍याने भावपूर्ण पूजा करून रामराज्यासाठी प्रार्थना करणे, ‘पृथ्वीवर
रामराज्य येणारच’, असे त्यांनी सांगणे आणि या मंदिरात चैतन्य अन् शांती यांची अनुभूती येणे

आम्ही सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत या मंदिरात गेल्यावर तेथील पुजार्‍याने ‘तुम्ही कोण आहात आणि कशासाठी आला आहात ?’, अशी आमची विचारपूस केली. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितले, ‘‘आम्ही भारतातून आलो आहोत. आम्ही साधना करतो. तुम्ही देवाकडे आमच्या वतीने ‘पृथ्वीवर लवकरात लवकर पुन्हा रामराज्य यावे’, अशी प्रार्थना करावी.’’ पुजार्‍याने लगेच भावपूर्ण पूजा केली. त्यांनी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना प्रसाद दिला आणि ते म्हणाले, ‘‘माताजी, तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार. पृथ्वीवर रामराज्य येणारच.’’ हे ऐकून आम्हा सर्वांची भावजागृती झाली. जणूकाही त्या व्यक्तीच्या माध्यमातून श्रीराम बोलत होता. आम्हाला या मंदिरात विलक्षण चैतन्य आणि शांती यांची अनुभूती आली.

३. पुजार्‍याने शिवलिंगाची भावपूर्ण पूजा केल्यावर सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना उद्देशून ‘माताजी, तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार. पृथ्वीवर रामराज्य येणारच’, असे म्हटले आणि त्यांना प्रसाद दिला !

 

३. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या
कृपेमुळे ‘श्रीरामाची लीला घडलेले प्रत्येक ठिकाण, म्हणजे तीर्थक्षेत्र आहे’, याची अनुभूती येणे

‘श्रीरामाची लीला पृथ्वीवर ज्या ज्या ठिकाणी घडली, ते प्रत्येक स्थान म्हणजे एक तीर्थक्षेत्र आहे’, हे आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने अनुभवता आले. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामुळे आम्हाला ‘प्रत्येक मंदिरात जातांना भाव कसा ठेवायचा ? कोणती प्रार्थना करायची आणि तेथे काय शिकायचे ?’, हे समजले. यासाठी दौर्‍यातील आम्ही सर्व साधक परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. विनायक शानभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.६.२०१८)

Leave a Comment