बालपणी सुसंस्कार आणि सद्गुण यांचा लाभलेला ठेवा, तसेच सनातन संस्थेने सांगितलेली साधना यांमुळे ‘आंतरिक पालट कसा घडला’, हे सांगणारा जोधपूर, राजस्थान येथील सनातनच्या ६३ व्या संत पू. (सौ.) सुशीला मोदी यांचा साधनाप्रवास !

बालपण

१ अ. एकत्र कुटुंबपद्धत आणि धार्मिक वातावरण यांमुळे
बालपणीच सुसंस्कार अन् सद्गुण यांचा पाया रोवला जाणे

‘माझ्या बालपणी आमच्या घरी एकत्र कुटुंबपद्धत होती. माझ्या माहेरच्या सर्व व्यक्ती धार्मिक प्रवृत्तीच्या असल्याने घरात प्रतिदिन पूजापाठ, मंदिरात जाणे, स्तोत्रपठण करणे आदी गोष्टी केल्या जात. त्याचप्रमाणे कुलाचार, धार्मिक विधी करणे, धर्मशास्त्रानुसार उत्सव साजरे करणे, व्रते आणि उपवास करणे इत्यादी गोष्टीही श्रद्धापूर्वक केल्या जायच्या. आमची आई संध्याकाळच्या वेळी आम्हाला श्‍लोकपठण करण्यासाठी पाठवायची. लहानपणापासून धार्मिक वातावरणात वाढल्याने माझ्या मनावर तेच संस्कार झाले आणि हे संस्कार लहानपणीच अंतर्मनापर्यंत गेल्याने महाविद्यालयात गेल्यावरही माझे एकादशीचा उपवास करणे इत्यादी चालू राहिले. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे आमच्यावर पुष्कळ गोष्टींचे, उदा. इतरांंचा विचार करणे, दुसर्‍यांना साहाय्य करणे, सर्वांशी मिळून मिसळून रहाणे आणि सेवा करणे, असे संस्कार झाले.

 

२. वैवाहिक जीवन

२ अ. माहेर आणि सासर येथील परिस्थितींत विरोधाभास
असूनही मनात कोणत्याही प्रतिक्रिया अन् नकारात्मकता न येणे

माझे लग्न राजस्थानमधील एक छोटेसे गाव सोजत रोड येथेे झाले. पनवेल येथे माझे माहेर. माहेर आणि सासर येथील परिस्थितीमध्ये मोठा विरोधाभास होता. हवामान, वीज, पाणी, नोकर-चाकर, संस्कृती आदी सर्व परिस्थिती अगदी विपरीत होती, तरीही माझ्या मनात कधीच कोणत्याही प्रतिक्रिया आणि नकारात्मकताही आली नाही. त्या वेळी ‘दुसर्‍यांकडून अपेक्षा न ठेवता जेवढे साहाय्य करता येईल, तेवढे करूया’, असे विचार यायचे.

२ आ. सासरच्या सर्व व्यक्ती प्रेमळ असणे

सासरी दहा भाऊ-बहिणींचे एकत्रित कुटुंब होते. सर्व व्यक्ती प्रेमळ स्वभावाच्या होत्या. सासरचे लोक आर्य समाजाचे होते. ते कधी-कधी हवन विधी करायचे. त्या श्‍लोकांचे उच्चार करायला मला यायचे नाहीत. त्यामुळे मी माझी पहिली साधना चालू ठेवली.

२ इ. सासरी पडेल ती कामे करतांना कोणत्याही प्रतिक्रिया न येणे

सासरी भांडी घासण्यापासून कपडे धुण्यापर्यंत सर्व कामे हातांनीच करावी लागायची. मी माहेरी कधी शौचालय स्वच्छ करणे इत्यादी कामे केली नव्हती; पण सासरी तिसर्‍या दिवसापासून हे काम करावे लागले. त्या वेळी माझ्या मनात थोडीसुद्धा प्रतिक्रिया आली नाही. सासरी गेल्यावर मला माझ्या वडिलांनी सांगितलेली वाक्ये आठवायची, ‘‘आपल्या बोलण्याला नाही, तर कामाला किंमत असते.’’

२ ई. ‘ईश्‍वराने मला हे कुटुंब (सासर) दिले आहे’, असे वाटून
सर्वांची सेवा निष्काम भावाने आणि प्रेमाने करण्यात आनंद वाटणे

सासरी धार्मिक वातावरण असल्याने प्रतिदिन सासूबाई आणि जाऊबाई गल्लीत रहाणार्‍या स्त्रियांना भागवत किंवा अन्य आध्यात्मिक ग्रंथ वाचून दाखवत. कोठे भागवतकथांचा कार्यक्रम असल्यास त्या मला समवेत घेऊन जात. ‘ईश्‍वराने मला हे कुटुंब दिले आहे’, असे वाटून सर्वांची सेवा निष्काम भावाने आणि प्रेमाने करण्यात मला आनंद वाटायचा. माझ्या मनात ‘स्व’चे विचार अत्यल्प असायचे आणि मन नेहमी सकारात्मक स्थितीत असायचे. माझ्या मोठ्या सासूबाई आमच्या घरी रहायच्या. त्यांची सेवाही मी निष्काम भावाने केली. माझ्या सासूबाई अशिक्षित होत्या. घरातील सर्व लोक अल्प शिकलेले असूनही मी त्यांचे आज्ञापालन त्वरित करत असेे. परिस्थिती स्वीकारणे, आवड-नावड न ठेवणे, काटकसर, दुसर्‍यांचा विचार करणे, सकारात्मक रहाणे, आज्ञापालन करणे आदी गुण माझ्यात प्रथमपासूनच होते.

 

३. सनातन संस्थेने सांगितलेली साधना केल्यामुळे झालेले लाभ !

३ अ. सर्व भौतिक सुखे असूनही मन आसक्त न होणे

सनातन संस्थेने सांगितलेली साधना केल्यामुळे मला स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन, तसेच भावजागृती करणे यासंबंधीची महत्त्वपूर्ण सूत्रे शिकण्यास मिळाली. यामुळे माझ्यातील अपेक्षा करण्याचा भाग पुष्कळ न्यून झाला. सर्व भौतिक सुखे असूनही माझे मन त्यात आसक्त झाले नाही.

३ आ. सदगुरु आणि साधक यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळणे

साधक घरी येऊन माझे शंकानिरसन करत. मला त्यांच्याकडून पुष्कळ शिकायला मिळायचे. साधकांनी मला पुष्कळ प्रेम दिले. साधकांचा साधेपणा, परिस्थिती स्वीकारणे, साहाय्य करणे, स्थिर रहाणे, समयसूचकता, गांभीर्य, वेळेचे पालन करणे, व्यवस्थितपणा, अपेक्षा न ठेवणे, तत्परता, प्रतिक्रिया न देणे आदी सर्व मला सदगुरु (डॉ.) पिंगळेकाका, श्री. आनंद जाखोटिया, श्री. प्रणव मणेरीकर, तसेच श्री. कणगलेकरकाका यांच्याकडून शिकायला मिळाले. साधकांनी वेळोवेळी दिलेल्या दृष्टीकोनांमुळे माझा ‘अपेक्षा करणे’ हा स्वभावदोष न्यून होऊन माझा प्रतिक्रिया येण्याचा भागही उणावला. असे असले, तरी माझी शिकण्याची वृत्ती न्यून पडते.

३ इ. सेवा आणि साधना यांमुळे निर्भयता येेणे

नंतर मला सेवेचे महत्त्व कळले. तेव्हा साधक सांगतील तसे करण्याचा माझा प्रयत्न झाला. सेवा आणि साधना यांमुळे मला निर्भयता आली. प.पू. गुरुदेवांमुळेच माझ्या मनातील लोकांना भेटण्याचा संकोचही न्यून झाला.

३ ई. गुरुदेवांमुळे प्रत्येक व्यक्ती आणि प्रसंग यांकडे साक्षीभावाने पहाता येऊ लागणे

आरंभी माझ्या पतीचे आणि माझे विचार जुळत नसल्याने मी त्रस्त व्हायचे. त्यांच्या आणि माझ्या विचारांमध्ये दिवस अन् रात्र यांप्रमाणे अंतर असूनही आता मला त्याकडे साक्षीभावाने पहाता येऊ लागले आहे. अशाच प्रकारे घरातील प्रत्येक व्यक्ती आणि प्रसंग यांकडे ‘साक्षीभावाने कसे पहायचे ?’, हे गुरुदेवांनीच मला शिकवले.

 

४. परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाला जाण्याची
संधी मिळून त्यांच्या चरणांचे दर्शन व्हावे, ही लागलेली ओढ !

४ अ. पनवेलला (माहेरी) गेल्यावर परात्पर गुरु
डॉक्टरांच्या मार्गदर्शनाला जाण्याची संधी मिळणे

वर्ष २००० मध्ये सनातनशी संपर्क झाल्यावर मी नामजप करू लागले, तसेच सत्संगालाही जाऊ लागले. वर्ष २००१ मध्ये मी पनवेलला (माहेरी) गेले असता तेथील गोखले सभागृहात १९ जुलैला परात्पर गुरु डॉक्टरांचे साधकांना मार्गदर्शन होेते. मलाही तेथे जायचे होते; पण माझी कोणाशीच ओळख नव्हती. त्यामुळे ‘कोणाला विचारायचे ?’, असा विचार मनात येत होता. नंतर मला कळले, ‘आमच्याकडील उत्सवांमध्ये पूजा करण्यासाठी येणार्‍या पुरोहितांच्या मुलाच्या घरी (श्री. राजू जोशी यांच्या घरी) ते थांबणार आहेत.’ मी त्यांना मार्गदर्शनाला येण्याविषयी विचारले. त्यांच्या घरीच साधकांसाठी मार्गदर्शन होते. मला तेथे बसण्याची संधी मिळाली. मला तेथे प.पू. गुरुदेवांच्या चरणांना स्थुलातून स्पर्श करण्यास मिळाले नाही. साधक जसे सांगतील, तसेच मी करत होते. माझ्या मनात थोडी भीतीही होती; पण चरणस्पर्श करण्याचा विचार मनात येतच होता.

४ आ. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांचे दर्शन घ्यावे’, हा एकच विचार मनात असणे

नंतर परात्पर गुरु डॉक्टरांचे एका सभागृहात मार्गदर्शन होते. तेथेही मला त्यांच्या चरणांना स्पर्श करता आला नाही. मार्गदर्शन झाल्यावर प.पू. गुरुदेव मागील दाराने आपल्या स्थानी गेले’, असे मला समजले. हे कळूनही मी तेथेच थांबले. तेव्हा मनात एकच विचार होता की, ‘त्यांच्या चरणांचे दर्शन घ्यावे.’ मी तेथेच थांबून विचार केला, ‘आपण त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या चरणांना स्पर्श करूया.’ तोपर्यंत सभागृहात उद्घोषणा झाली, ‘‘परात्पर गुरु डॉक्टर येत आहेत. ते गाडीतून बाहेर जाणार असल्याने त्यांच्यासाठी रस्ता सोडावा.’’ हे ऐकून माझ्या मनाला आनंद झाला. मी तिथेच बाजूला उभी राहिले. ते जात असतांना मी त्यांना नमस्कार केला. ते माझ्याकडे पाहून म्हणाले, ‘‘अरे, राजस्थानहून आलात !’’ नंतर त्यांनी साधकांना सांगितले, ‘‘राजस्थानच्या साधकांसाठी खाऊ पाठवा.’’ त्या वेळी माझी मनोमन कृतज्ञता व्यक्त झाली.

 

५. जोधपूर जिल्ह्यातील बिलाड गावामध्ये
हिंदु धर्मजागृती सभेची सेवा करतांना आलेली अनुभूती

५ अ. सभेपूर्वी टाचेमध्ये तीव्र वेदना होत असणे आणि प्रसाराला आरंभ केल्याबरोबर वेदना थांबणे

वर्ष २००९ मध्ये जोधपूर जिल्ह्यातील बिलाड या गावी हिंदु धर्मजागृती सभा करण्याचे ठरले होते. तेव्हा तेथील प्रसार देवच माझ्याकडून करून घेत होता. या सभेच्या पूर्वी माझ्या टाचेत पुष्कळ वेदना होत होत्या. त्यामुळे ‘प्रसार कसा करायचा ?’, हे मला सुचत नव्हते. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे प्रसाराला आरंभ केल्याबरोबर माझ्या वेदना बंद झाल्या. त्या वेळी माझी परात्पर गुरु डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त झाली. मी प्रत्येक ठिकाणी प्रसाराला एकटीच जाते; पण तेथे भेटणार्‍या व्यक्ती मला सहजपणेे साहाय्य करतात आणि माझी अडचण दूर होते. ‘हे सगळे कसे होते ?’, हे मला ठाऊक नाही; पण जो विचार मनात येतो, त्याप्रमाणे त्वरित घडते. ‘हे गुरुमाऊली, तुझी कृपा अगाध आहे. ती मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील आहे.’ यांविषयी मी शब्दांत काहीच सांगू शकत नाही. मी परात्पर गुरु डॉक्टरांंच्या चरणांची दासी आहे. ‘त्यांचेच अस्तित्व माझ्या डोळ्यांमध्ये रहावे. मला एक क्षणही त्यांचा विसर पडू नये’, हीच त्यांच्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना आहे.

 

६. परात्पर गुरु डॉक्टरांची मिळालेली अनमोल शिकवण !

६ अ. गुरुदेवांनी दिलेल्या दृष्टीकोनामुळे अपेक्षांचे प्रमाण न्यून होऊन मन आनंदी राहू लागणे

एकदा मी रामनाथी आश्रमात आले असता मी गुरुदेवांना म्हटले, ‘‘मी सत्संग घेते; पण त्या सत्संगामध्ये कोणीच येत नाही.’’ गुरूदेवांनी कलियुगात सत्संगात येणार्‍या जिज्ञासूंचे प्रमाण सांगितले आणि मला विचारले, ‘‘तुम्ही लाखो जणांकडे गेला आहात का ?’’ मी म्हटले, ‘‘नाही.’’ ते म्हणाले, ‘‘सत्संगात कोणी येवो अथवा न येवो, तुमची सेवा होत आहे ना !’’ त्यांच्या सांगण्यामुळे माझ्या अपेक्षांचे प्रमाण न्यून झाले आणि मन आनंदात राहू लागले.

६ आ. ‘अध्यात्मात कपड्यांना महत्त्व नसल्या’चे परात्पर गुरुदेवांनी सांगणे

मी रामनाथी आश्रमात आले असतांना ‘१० मिनिटांत गुरुदेवांना भेटण्यासाठी जायचे आहे’, असा निरोप आम्हाला मिळाला. तेव्हा काहीजण स्वतःचे आवरून कपडेही पालटू लागले; पण मी स्वतःचे काहीच आवरले नाही. नंतर गुरुदेवांचा सत्संग संपल्यावर ते म्हणाले, ‘‘अध्यात्मात कपड्यांना कोणतेच महत्त्व नसते.’’

आज मी जी काय आहे, ती केवळ प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळेच आहे. ‘तेच माझ्याकडून सर्व प्रयत्न करून घेणार आहेत’, या भावाने आणि श्रद्धेने त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता ! प.पू. गुरुदेवांनी जे लिहून घेतले, तेच मी लिहिले. कृतज्ञता !’

– (पू.) सौ. सुशीला मोदी, जोधपूर  राजस्थान.

सनातनचे संत केवळ संत नाहीत, तर गुरुच आहेत !

‘गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. सनातनमध्ये ८० हून अधिक साधक संत झाले आहेत. आपण त्यांना ‘संत’ म्हणत असलो, तरी ते त्यांच्या संपर्कातील साधकांना साधनेसंदर्भात मार्गदर्शन करतात, अगदी देहत्याग होईपर्यंत करतात, म्हणजे त्यांचे कार्य गुरूंप्रमाणेच साधनेत मार्गदर्शन करण्याचे आहे; म्हणून गुरुपौर्णिमेला त्यांची माहिती सर्व साधकांना व्हावी आणि त्यांना संतांकडून काहीतरी शिकायला मिळावे, यासाठी त्यांची माहिती ‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित करत आहोत. त्या माहितीत त्यांच्या साधनेतील वाटचालीचीही माहिती दिली आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल जवळीक वाटायला साहाय्य होईल.

संतांची वैशिष्ट्ये केवळ वाचू नका, तर ती स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे या लेखमालेचे सार्थक होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गुरुपौर्णिमेनिमित्त ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांमध्ये सनातन संस्थेच्या संतांच्या
संदर्भात येत असलेल्या लेखांमुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ‘पुढे मी नसेन तेव्हा
साधकांना मार्गदर्शन कोण करणार ?’, ही काळजी पूर्णपणे दूर होऊन त्यांना आनंद होणे

‘गुरुपौर्णिमेनिमित्त ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांमध्ये ‘सनातनच्या संतांचे अद्वितीयत्व !’ या सदरात सनातन संस्थेच्या अनेक संतांच्या संदर्भात साधकांनी लिहिलेले लेख २७ जून या दिवसापासून प्रकाशित होत आहेत. त्यांत संत आणि साधक यांनी लिहिलेली संतांची गुणवैशिष्ट्ये, शिकवण, त्यांच्याबद्दल साधकांना आलेल्या अनुभूती इत्यादी विषय वाचून ‘पुढे मी नसेन तेव्हा साधकांना मार्गदर्शन कोण करणार ?’, ही माझी काळजी पूर्णपणे दूर झाली. उलट मला वाटले, ‘मी प्रकृती अस्वास्थ्यामुळे कुठेच जाऊन साधकांना भेटू शकत नाही. याउलट सनातनचे संत साधकांना नियमितपणे भेटतात. या भेटींमुळे साधकांची प्रगती जलद होत आहे, तसेच संस्थेचे कार्यही झपाट्याने वाढत आहे.’ यामुळे मला आनंद झाला !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment