‘परात्पर गुरु डॉक्टरांचे आज्ञापालन’ असा भाव ठेवून सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी इंग्रजी भाषा शिकण्यासाठी केलेले प्रयत्न आणि इंग्रजी, गुजराती अन् हिंदी भाषा शिकल्याने प्रसारकार्य करतांना भाषेच्या दूर झालेल्या अडचणी !

अनुक्रमणिका

‘फेब्रुवारी २००९ मध्ये मी कर्नाटक राज्यातून आंध्रप्रदेश राज्यात प्रसारासाठी जात असतांना मला इंग्रजी भाषा शिकून घेण्यास सांगण्यात आले. कर्नाटक येथील साधकांना, तसेच समाजातील लोकांना विशेष इंग्रजी येत नाही. ते कन्नड भाषेतूनच सर्व प्रसारसेवा करतात. असे असल्याने त्या वेळी इंग्रजी भाषा शिकण्याचे प्रयोजन माझ्या लक्षात येत नव्हते; मात्र आज्ञापालन म्हणून मी इंग्रजी भाषा शिकण्यास आरंभ केला. त्या वेळी मला इंग्रजी लिहिता-वाचता येत होते; परंतु माझे शिक्षण मराठी माध्यमातून झाल्याने मला इंग्रजी व्यवस्थित बोलता येत नव्हते.

१. इंग्रजी भाषा शिकणे

१ अ. इंग्रजी भाषा शिकण्यासाठी केलेले प्रयत्न

१ अ १. ‘टाईम्स ऑफ इंडिया’चे वाचन चालू केल्यावर त्यातील शब्द आणि वाक्ये न कळल्याने वाचन बंद करणे

मी प्रथम ‘टाईम्स ऑफ इंडिया’ हे इंग्रजी दैनिक विकत घेऊन वाचण्यास आरंभ केला. वाचतांना जे लिखाण मला कळत नव्हते, ते मी अधोरेखित करत होतो. अधोरेखित केलेले शब्द आणि वाक्ये पुष्कळ असल्याने मला त्या बातम्यांमधील आशयच समजत नसे. त्यामुळे ५ – ६ दिवसानंतर मी तेे वाचन बंद केले.

१ अ २. इंग्रजी ‘मासिक सनातन प्रभात’ वाचायला आरंभ करणे

‘टाईम्स ऑफ इंडिया’चे वाचन थांबवून मी इंग्रजी ‘मासिक सनातन प्रभात’ वाचायला आरंभ केला. मी अगोदरच मराठी सनातन प्रभातमधील बातम्या वाचल्यामुळे इंग्रजी मासिकातील त्याच बातम्या वाचायला मला सोपे जाऊ लागले. त्यातूनही जे शब्द कळत नव्हते, ते शब्दकोशातून काढून मी समजून घेतले. व्यावहारिक शिक्षणात धर्म आणि अध्यात्म यांविषयीचे शब्दप्रयोग वापरात नसल्याने ते सगळे नव्याने समजून घ्यावे लागले.

१ अ ३. सहसाधकासह इंग्रजीत बोलण्याचा सराव केल्याने थोडेफार इंग्रजी बोलता येऊ लागणे

तेव्हा माझे केवळ इंग्रजी वाचणे होत होते; मात्र मला ‘इंग्रजी बोलणे’ही शिकून घ्यायला सांगितले होते. माझ्या समवेत श्री. विनायक शानभाग हे साधक होते. त्यांना इंग्रजी चांगल्या प्रकारे बोलता येत असल्याने मी त्यांच्याशी इंग्रजीत बोलण्याचा सराव करू लागलो. आरंभी माझ्या बर्‍याच चुका होत होत्या; पण त्यांच्याशी बोलत राहिल्याने मला थोडेफार इंग्रजी बोलता येऊ लागले.

१ आ. चेन्नई येथे गेल्यावर ‘गुरुदेवांनी इंग्रजी भाषा शिकण्यास का सांगितले ?’, याचा उलगडा होणे

त्यानंतर चेन्नई येथे गेल्यावर मला कळले की, तेथील १ – २ साधक सोडले, तर इतरांना हिंदी येत नाही. त्यांना केवळ तमिळ आणि इंग्रजी याच भाषा येतात. याउलट मला तमिळ येत नसून केवळ हिंदी येत असल्याने ‘इंग्रजी भाषा शिकून घेण्यास का सांगितले होतेे ?’, याचा मला उलगडा झाला.

१ इ. साधकांशी संवाद साधतांना पुष्कळ अडचणी आल्याने इंग्रजीतून बोलण्याविना पर्याय न रहाणे

आरंभी बैठकीत साधकांशी संवाद साधतांना मला पुष्कळ अडचणी आल्या. मी हिंदीतून बोलत असे आणि श्री. शानभाग त्याचे इंग्रजी भाषांतर करून साधकांना सांगत असत. काही वेळा सौ. उमाक्कांना (आताच्या पू. (सौ.) उमा रवीचंद्रन यांना) थोडे हिंदी समजायचे. त्या हिंदीतून समजून घेऊन साधकांना तमिळमध्ये सांगत; पण असे करण्यात पुष्कळ वेळ जात असे. त्यामुळे मी जसे येईल, तसे इंग्रजीतून बोलण्यास चालू केले आणि देवाच्या कृपेने मला ते हळूहळू जमू लागले.

१ ई. ‘गुरुकृपेने कोणतीही भाषा शिकणे सोपे आहे’, याविषयी आलेली अनुभूती !

एकदा चेन्नई येथील एका शाळेत हिंदुत्वनिष्ठांची मोठी बैठक होती. त्या बैठकीमध्ये मी ‘हिंदु धर्मजागृती सभेचा उद्देश, सभेतील विषय, सभेमुळे लोक, समाज आणि राष्ट्र यांना कसा लाभ होणार आहे ?’ इत्यादी विषयांवर सलग १ घंटा इंग्रजीतून बोलू शकलो. त्या वेळी ‘भगवंतच आपल्या मुखातून बोलत असल्यामुळे आपल्याला ताण घेण्याची आवश्यकता नाही आणि गुरुकृपेने कोणतीही भाषा शिकणे सोपे आहे’, हे मला शिकायला मिळाले.

१ उ. विदेशातील प्रसारसेवेत इंग्रजी भाषा अत्यावश्यक असणे

वर्ष २०१० मध्ये माझा विदेशातील साधकांशी संपर्क आला. विदेशातील बहुतेक साधकांशी संपर्क करण्यासाठी इंग्रजी भाषाच आवश्यक होती. गुरुदेवांच्या कृपेने मला त्यांच्या अडचणी समजून घेणे, त्या सोडवणे, साधनेविषयी मार्गदर्शन करणे, तसेच त्यांच्या बैठका घेणे, हे सर्व इंग्रजीतून करणे जमू लागले.

१ ऊ. विदेशी साधकांच्या कार्यशाळेत इंग्रजी भाषेत
संवाद साधतांना अडचणी आल्यावर गुरूंना शरण गेल्यावर अडचणी न्यून होणे

नंतर वर्ष २०११ मध्ये मला रामनाथी आश्रमात विदेशातील साधकांच्या कार्यशाळेत सेवा मिळाली.

१ ऊ १. विदेशी साधकांच्या उच्चारामुळे त्यांच्या बोलण्याचे आकलन न होणे आणि ‘प्रार्थना’ अन् ‘गुरूंना शरण जाणे’, यांमुळे बोलता येणे

कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात मी काहीच बोललो नाही; कारण काही विदेशी साधकांच्या उच्चारांमुळे मला त्यांच्या बोलण्याचे आकलन होत नव्हते. त्यामुळे माझा आत्मविश्‍वास डळमळीत होऊन माझ्या मनात प्रतिमेचे विचार येऊ लागले. दुसर्‍या सत्रानंतर मला ‘प्रार्थना करणे’ आणि ‘गुरूंना शरण जाणे’, यांमुळे बोलायला जमू लागले, तसेच त्यांची विदेशी उच्चार असलेली भाषाही (काही विदेशी साधक तोंडातल्या तोंडात काही शब्द उच्चारतात) मला समजू लागली.

१ ऊ २. विदेशी साधकांसमोर इंग्रजीतून २ घंटे विषय मांडता येणे

एक दिवस अकस्मात मला कार्यशाळेत ‘कर्नाटक राज्यात प्रसार कसा केला ?’ हा विषय मांडण्यास सांगितले. आदल्या रात्री या विषयाची १० – १२ पाने इंग्रजीतून लिहून मी गुरुकृपेने हा विषय विदेशी साधकांसमोर २ घंटे इंग्रजीतून मांडू शकलो. या वेळी ‘गुरुदेवच परीक्षा घेतात आणि तेच उत्तीर्ण करतात’, हे माझ्या लक्षात आले.

 

२. कन्नड भाषा समजू लागणे

दक्षिण भारताच्या प्रसार दौर्‍यामध्ये मला गुरुदेवांच्याच कृपेने कन्नड भाषा बर्‍याच प्रमाणात समजू लागली आणि काही वाक्ये बोलताही येऊ लागली. त्यामुळे भाषेमुळे येणार्‍या अडचणी बर्‍याच प्रमाणात सुटल्या.

 

३. नवीन भाषा शिकायची आवड असणे

मला पूर्वीपासूनच नवीन भाषा शिकायची आवड आहे. नोकरीमध्ये असतांना मी बंगाली शिकण्यासाठी वर्गाला गेलो होतो. एक – दीड मासातच मी बंगाली भाषा काही प्रमाणात बोलायला, वाचायला आणि लिहायचा प्रयत्न केला होता.

 

४. गुजराती भाषा शिकणे

मला पुष्कळ दिवसांपासून ‘गुजराती भाषा शिकावी’, असे वाटत होते. गुजरातला गेल्यावर मी गुजराती शिकण्याचा प्रयत्न केला. गुरुदेवांच्या कृपेने मला गुजराती भाषाही समजायला लागली. त्या वेळी पत्रकार परिषदेसाठी लागणारे गुजराती भाषेतील प्रसिद्धीपत्रक वाचून मी त्यातील चुका श्री. संतोष आळशी यांना सांगू शकलो.

 

५. हिंदी भाषा चांगल्या प्रकारे बोलता येऊ लागणे

उत्तर भारताच्या प्रसारदौर्‍यात ठिकठिकाणी असलेल्या हिंदु धर्मजागृती सभांच्या निमित्ताने मला शुद्ध हिंदी भाषेत (शब्दांची सरमिसळ न करता) बोलता येऊ लागले.

गुरुदेवांच्या कृपेने प्रसारासाठी जेथे जावे लागले, तेथील भाषा गुरुदेवच अल्पकालावधीतच शिकवतात, याची मला आलेली ही मोठी अनुभूती आहे.

‘गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’

‘इदं न मम । (हे लिखाण मी लिहिलेले नाही, तर भगवंतानेच लिहून घेतले आहे.)

॥ श्रीकृष्णचरणार्पणमस्तु ॥’

– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (जुलै २०१८)

Leave a Comment