गोव्यातील पू. प्रेमा कुवेलकरआजी ‘सद्गुरु’पदी विराजमान ।

  • पुत्र श्री. नागराज कुवेलकर यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !
  • पुत्र श्री. मनोज कुवेलकर यांची आध्यात्मिक पातळी ६४ टक्क्यांवरून ६६ टक्के झाल्याचे घोषित !

रामनाथी – गुरुपौर्णिमेचा कालावधी जवळ येऊ लागला असतांना ‘या काळात श्रीकृष्ण आम्हाला कोणती सुवार्ता देणार’, याकडे साधकांचे लक्ष लागले आहे. ३० जून हा दिवस सनातनच्या इतिहासातील सुवर्णदिन ठरला ! गोव्यातील पू. (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी साधनेत गरुडझेप घेत ‘सद्गुरु’पदी विराजमान झाल्याची घोषणा करत श्रीकृष्णाने साधकांवर पुन्हा एकदा आनंदाचा वर्षाव केला ! त्याचसह सद्गुरु कुवेलकरआजींचे कनिष्ठ पुत्र श्री. नागराज आणि ज्येष्ठ पुत्र श्री. मनोज यांचीही जलद आध्यात्मिक उन्नती होत असल्याचे घोषित करण्यात आले. एका परिवारातील तिघांची आध्यात्मिक उन्नती झाल्याचे एकाच दिवशी घोषित होणे, ही एक दुर्मिळ घटना आहे. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्री. नागराज कुवेलकर (वय ४८ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे, तर श्री. मनोज कुवेलकर (वय ४९ वर्षे) यांची आध्यात्मिक पातळी २ टक्क्यांनी वाढल्याचे, म्हणजेच ६४ टक्क्यांवरून ६६ टक्के झाल्याचे घोषित केले. यानंतर पू. प्रेमा कुवेलकरआजी (वय ८४ वर्षे) सद्गुरुपदी आरूढ झाल्याची आनंदवार्ता त्यांनी सर्वांना सांगितली.

डावीकडून उभे श्री. मनोज कुवेलकर (ज्येष्ठ पुत्र), श्री. नागराज कुवेलकर (कनिष्ठ पुत्र), सौ. रूपा कुवेलकर (धाकटी सून) आणि बसलेल्या सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी

सद्गुरु सत्यवान कदम यांच्या हस्ते सर्वश्री नागराज आणि मनोज कुवेलकर यांचा सत्कार करण्यात आला. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी सद्गुरु कुवेलकर आजींना पुष्पहार अर्पण केला, तसेच श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला.

या सोहळ्याला सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव, सद्गुरु सत्यवान कदम, पू. अशोक पात्रीकर, पू. नीलेश सिंगबाळ, पू. रमानंद गौडा, सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, तसेच पू. (सौ.) संगीता जाधव यांची वंदनीय उपस्थिती लाभली. १० संत आणि सद्गुरु यांच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा सनातनच्या इतिहासातील पहिलाच संतसोहळा ठरला !

 

मनोगत

अ. श्री. नागराज कुवेलकर यांनी ‘माझा राग पूर्वीपेक्षा अल्प झाला आहे. काही मासांपासून मला पुष्कळ शांत वाटत होते’, असे सांगितले.

आ. श्री. मनोज कुवेलकर म्हणाले, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरच सर्वांची काळजी घेत आहेत. आम्ही केवळ समर्पभावाने सेवा करत आहोत.’’

इ. सद्गुरु कुवेलकरआजी म्हणाल्या, ‘‘आज सकाळपासून मला पुष्कळ शांत वाटत होते. आज काहीतरी चांगले घडणार आहे. घरी कुणीतरी येणार’, असे वाटत होते.’’

कुवेलकर परिवार सर्वांसाठी आदर्श आहे !  – सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

श्री. मनोज कुवेलकर यांनी शीव सेवाकेंद्रात राहून साधनेला आरंभ केला. मागील २४ वर्षांपासून ते पूर्णवेळ साधना करत आहेत. श्री. नागराज यांनी संपूर्ण घराचे दायित्व स्वीकारले असून त्यांच्या मनोजकडून (भावाकडून) कोणत्याच अपेक्षा नसल्यामुळेच आज मनोज पूर्णवेळ साधना करू शकत आहेत.

श्री. नागराज आणि श्री. मनोज आईचे, म्हणजे सद्गुरु कुवेलकरआजींचे साधनेसाठी मार्गदर्शन घेतात, तसेच त्यांचे आज्ञापालनही करतात. कलियुगात अशी मुले लाभणे, हे फार दुर्लभ आहे. सद्गुरु मातेच्या दिशादर्शनामुळेच दोघांचीही जलद आध्यात्मिक उन्नती झाली आहे.

श्री. नागराज यांच्या पत्नीच्या (सौ. रूपा कुवेलकर यांच्या) तोंडवळ्यात पूर्वीपेक्षा पालट आहे. त्यांचीही प्रगतीच्या दिशेने वाटचाल चालू आहे. हा परिवार सर्वांसाठी आदर्श आहे !

उपस्थित संतांनी सांगितलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

१. ‘श्री. नागराज यांच्याकडे पाहून प्रसन्न वाटले. ते परात्पर गुरूंविषयी बोलत असतांना त्यांच्या बोलण्यात भाव जाणवतो.

२. श्री. मनोज कुवेलकर पूर्वीपेक्षा अंतर्मुख झाले आहेत. त्यांच्यातील चंचलता अल्प झाली असून त्यांच्याकडे पाहून समाधान वाटले. त्यांच्यामध्ये पुष्कळ आंतरिक पालट झाल्याचे जाणवले.’ – (सद्गुरु) श्री. सत्यवान कदम

३. ‘सद्गुरु आजी साधकांची विचारपूस करत असतांना त्यांच्या बोलण्यात पुष्कळ आत्मीयता वाटत होती. ‘आजी सनातनशी एकरूप झाल्या असून त्या ‘सनातनच्या व्यापक आई’ आहेत’, असे वाटले.’ – (पू.) सौ. संगीता जाधव

संत आणि सद्गुरु यांना मिळालेल्या पूर्वसूचना

१. ‘पू. कुवेलकरआजींकडे जाण्याचा निरोप मिळाल्यावर ‘त्या सद्गुरु झाल्या असाव्यात’, असा विचार मनात आला.’ – (सद्गुरु) कु. स्वाती खाडये

२. ‘आजींच्या घरी गेल्यानंतर लगेचच ‘त्या सद्गुरु झाल्या आहेत’, असा विचार मनात आला.’ – (पू.) श्री. रमानंद गौडा

 

क्षणचित्रे

१. सर्व साधक, संत आणि सद्गुरु आजींच्या घरी गेल्यावर त्यांना पाहून आजी म्हणाल्या, ‘‘आज घर पावन झाले !’’

२. सद्गुरु बिंदाताईंनी सद्गुरु कुवेलकरआजींना आलेल्या सर्व अनुभूती लिहून देण्यास सांगितल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘गुरुदेवांनी माझ्या जन्माचे सार्थक केले आहे. त्यामुळे आता लिहून देण्यासारखे काही शेषच नाही.’’ हे सांगितल्यावर सद्गुरु आजींची भावजागृती झाली.

 

उपस्थित संत आणि साधक यांना आलेल्या अनुभूती

१. आजींच्या घरी दिवाळीप्रमाणे लख्ख
प्रकाश दिसणे आणि वातावरणात पुष्कळ थंडावा जाणवणे

‘आम्ही २ दिवसांपूर्वीही सद्गुरु आजींच्या घरी गेलो होतो. तेव्हापेक्षा आज घर अधिक प्रकाशमान वाटत होते. घरात प्रवेश केल्यावर पणत्या लावल्याप्रमाणे लख्ख प्रकाश दिसत होता. त्यामुळे आम्ही जून मासातच दिवाळी अनुभवली.

आजींच्या घरातील वातावरण प्रफुल्लित आणि उत्साही होते. वातावरणात गारा पडल्याप्रमाणे थंडावा होता. आजींच्या खोलीच्या कक्षा रूंदावल्याचे जाणवत होते. त्यांची खोली व्यापक दिसत होती. त्यांच्या सान्निध्यात ध्यानावस्था अनुभवता आली, तसेच मनही निर्विचार झाले.’ – (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ

२. ‘आजींचे बोलणे ऐकतच रहावे’, असे वाटणे

‘वातावरणात पुष्कळ उत्साह, आनंद आणि चैतन्य जाणवत होते. आजींकडे पाहिल्यावर शांत वाटून मन निर्विचार झाले. लहान मुलाप्रमाणे आजींकडे आकर्षिले गेल्यासारखे वाटत होते. ‘आजींचे बोलणे ऐकतच रहावे. ते संपू नये. आजींच्या घरातून जाऊच नये’, असे वाटत होते. या सन्मान सोहळ्याच्या वेळी कुवेलकर कुटुंबीय कृतज्ञतेच्या भावात होते. ‘गुरुदेवांचे सर्व साधकांवर किती प्रेम आहे. ते सर्वांच्या कुटुंबियांचा कसा उद्धार करतात’, हे अनुभवायला मिळाले. ‘गुरूंचा सत्संग लाभला, तर काय काय होऊ शकते’, याची प्रचीती आली.’ – (सद्गुरु) श्री. सत्यवान कदम

३. आजींच्या सन्मान सोहळ्याच्या वेळी देवता आजींवर पुष्पवृष्टी करत असल्याचे जाणवणे

‘सद्गुरु आजींच्या घरी गेल्यावर वातावरण दिवाळीसारखे प्रकाशमान वाटत होते. ‘या सोहळ्याला सूक्ष्मातून अनेक ऋषि, संत उपस्थित असून देवता आजींवर पुष्पवृष्टी करत आहेत’, असे जाणवत होते. वातावरणात दैवी कण दिसत होते. सद्गुरु आजींच्या चरणांतून निळा प्रकाश प्रक्षेपित होत होता. परात्पर गुरूंचे अस्तित्व अखंड जाणवत होते. ‘आजी मंदिरातच बसल्या आहेत’, असे वाटत होते.’

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, (सद्गुरु) कु. अनुराधा वाडेकर आणि (सद्गुरु) कु. स्वाती खाडये

४. आजींच्या मागे परात्पर गुरु डॉक्टर उभे असल्याचे दिसणे

‘सद्गुरु आजी जेथे बसल्या होत्या, त्या खोलीत पुष्कळ प्रकाश जाणवत होता. ‘त्यांच्या मागे परात्पर गुरु डॉ. आठवले उभे आहेत’, असे जाणवले. आजींचा तोंडवळा तेजस्वी आणि त्वचा मऊ झाल्याचे जाणवले.’ – (सद्गुरु) श्री. नंदकुमार जाधव

‘सद्गुरु आजींच्या घरी असतांना परात्पर गुरूंच्याच खोलीत बसलो आहोत’, असे जाणवत होते. आजी पुष्कळ तरुण वाटत होत्या.’ – (सद्गुरु) कु. स्वाती खाडये

‘आजींच्या भोवती पांढर्‍या रंगाची प्रभावळ दिसत होती. त्यांचा तोंडवळा गुरुदेवांसारखा दिसत होता.’ – (पू.) श्री. नीलेश सिंगबाळ

‘आजींमध्ये लहान मुलांप्रमाणे निरागसभाव जाणवला. ‘त्या सतत अनुसंधानात आणि ध्यानावस्थेत आहेत’, असे जाणवत होते.’ – (पू.) श्री. रमानंद गौडा

‘वातावरणात पुष्कळ चैतन्य जाणवत होते. ते चैतन्य सहस्रारातून शरिरात जात होते.’ – (पू.) श्री. अशोक पात्रीकर

आजींच्या घराजवळून जात असतांना घरी पुष्कळ
प्रकाश दिसणे आणि पाय आपोआप त्यांच्या घराकडे ओढले जाणे

‘मी आज सद्गुरु कुवेलकरआजींच्या घराजवळून जात असतांना त्यांच्या घरी बरेच पाहुणे आल्याचे दिसले. एरव्ही त्यांच्या घरी कुणी पाहुणे आल्यास मी त्यांच्या घरी जात नाही. आज मात्र माझे पाय आपोआप त्यांच्या घराकडे ओढले गेले. त्यांच्या घरी प्रकाश दिसत होता. ‘येथून पुढे जाऊच नये’, असे मला वाटत होते. सद्गुरु आजी माझ्या साधनेतील मार्गदर्शक आहेत. त्यामुळेच त्यांचा सन्मान सोहळा पहाण्याचे भाग्य मला लाभले.’ – श्री. प्रदीप नाईक, कवळे, फोंडा, गोवा.

(‘श्री. नाईक हे सनातन प्रभातचे कृतीशील वाचक असून त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे नुकतेच घोषित करण्यात आले. ते सद्गुरु कुवेलकरआजींकडून साधनेविषयी मार्गदर्शन घेतात. या सन्मान सोहळ्याविषयी त्यांना काहीही ठाऊक नव्हते. ते आजींच्या घराजवळून जात असतांना अकस्मात् त्यांना घरात येण्याची इच्छा झाली. त्याच वेळी सोहळा चालू असल्याने त्यांना सोहळ्याला उपस्थित रहाता आले. त्या वेळी त्यांची भावजागृती होत होती. या अपूर्व सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भगवंतानेच त्यांना तेथे आणले.’ – (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ)

साधनेची तीव्र तळमळ असल्याने एकलव्याप्रमाणे साधना करून वयाच्या ८४ व्या वर्षी ‘सद्गुरु’पद प्राप्त करणार्‍या कवळे, फोंडा, गोवा येथील श्रीमती प्रेमा कुवेलकरआजी !

‘खरेतर वयापरत्वे व्यक्तीची स्मरणशक्ती न्यून होत जाते; परंतु सद्गुरु आजींचे मात्र अगदी उलट आहे. या वयातही त्यांची स्मरणशक्ती उत्तम असून हे केवळ त्यांच्या आंतरिक साधनेमुळेच शक्य झाले आहे. त्यांची ‘शिकण्याची वृत्ती’ आणि ‘जिज्ञासा’ वाखाणण्यासारखी आहे. यामुळेच कोणताही बाह्य सत्संग वा मार्गदर्शन नसतांना आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे सेवा करणे अशक्य असतांना त्यांनी अध्यात्मातील उच्च स्थिती प्राप्त करून घेतली आहे. त्यांच्यात ‘साधनेचे पुढचे मार्गदर्शन मिळावे’, अशी तळमळ असल्याने देवच त्यांना आतून मार्गदर्शन करत आहे.

आजींना येणार्‍या अनेक सुंदर अनुभूती या त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीच्या दर्शक असून त्या त्यांचे विश्‍लेषण अगदी अचूक आणि भावाच्या स्तरावर करतात. आजींच्या देहातही अनेक पालट होत असून त्यांची त्वचा नितळ, पारदर्शक होऊन त्यांची कांती अधिक गौरवर्णी झाली आहे. नम्रता, अल्प अहं, भगवंतावरील दृढ श्रद्धा आणि व्यापकत्व या गुणांच्या बळावर आजींची आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होत आहे. आजींनी एकलव्याप्रमाणे साधना करून ‘सद्गुरु’पद प्राप्त केले आणि सर्वच साधकांसमोर मोठा आदर्श ठेवला आहे. आजी समष्टीसाठी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी नामजप करतात. एरव्ही त्या श्रीकृष्णाचा नामजप करतात, तरी अधिकांश वेळ त्यांचा आतूनच ‘ॐ’ कार चालू असतो. त्यांची वाटचाल सगुणाकडून निर्गुणाकडे झपाट्याने होत आहे. सद्गुरु आजी नेहमी सहजावस्थेत आणि आनंदावस्थेत असतात. त्यांनी कुटुंबावरच साधनेचे संस्कार केल्यामुळे त्यांचे पूर्ण कुटुंब साधनारत असून सर्वांची आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होत आहे.

‘सद्गुरु आजींची पुढील प्रगती अशीच जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

सद्गुरु कुवेलकरआजींची सद्गुरु
(सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितलेली भाववैशिष्ट्ये

प्रीतीस्वरूप सद्गुरुद्वयींमधील संवाद (डावीकडून सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (श्रीमती) कुवेलकरआजी )

१. अभ्यासपूर्वक दैनिक वाचणे

‘सद्गुरु कुवेलकरआजी दैनिक सनातन प्रभात नियमितपणे आणि अभ्यासपूर्वक वाचतात. साधक आणि संत यांच्याविषयी आलेले लिखाण वाचून साधक भेटल्यावर त्या त्याविषयी आठवणीने सांगतात. आजी इतक्या एकरूपतेने दैनिक वाचतात की, त्यांची साधकांशी अंतरातूनच जवळीक होते. आजी एखाद्या साधकाला पूर्वी कधी भेटल्या नसल्या, तरी त्याच्याशी पूर्वीपासून परिचय असल्याप्रमाणे अगदी आपलेपणाने बोलतात. त्यांना सर्वांशी लगेचच जवळीक साधता येते.

२. उत्तम स्मरणशक्ती

आजींची स्मरणशक्ती उत्तम असून त्यांना सर्व प्रसंग, साधक आणि त्यांची नावे अचूक आठवतात. कोणत्या साधकाने कधी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली होती, त्याच्याशी पूर्वी कधी भेट झाली होती, हे त्या अचूकपणे सांगतात. साधनेमुळे त्यांची प्रतिभा जागृत झाली आहे.

३. साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीची तळमळ !

सद्गुरु आजी म्हणाल्या, ‘‘येत्या गुरुपौर्णिमेला पुष्कळ साधकांची आध्यात्मिक उन्नती झाल्याची वार्ता ऐकायला मिळावी’, असे वाटते. साधकांची आध्यात्मिक पातळी न्यून झाल्याचे समजल्यावर मला फार वाईट वाटते.’’ यावरून आजींचा समष्टी भाव आणि व्यापकत्व लक्षात येते.

४. गुरूंशी एकरूपता

सद्गुरु कुवेलकरआजींची परात्पर गुरूंवर अपार श्रद्धा आहे. आजी प्रतिदिन सूक्ष्मातून परात्पर गुरूंशी संवाद साधतात. त्या सतत अनुसंधानात असतात. परात्पर गुरुदेव मार्गदर्शन करत असल्याचे त्यांना सतत जाणवते. गुरुदेवांनी सुचवलेले त्यांना सर्वकाही ग्रहण होते.

५. अनुभूतींचे भावपूर्ण वर्णन करणे

आजींना सुंदर अनुभूती येतात. त्या त्यांचे विश्‍लेषण भावपूर्ण आणि सुंदररित्या करतात. त्यामुळे तो प्रसंग जसाचा तसा डोळ्यांसमोर उभा राहून त्यातील अवीट आनंद अनुभवता येतो.

६. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता आणि साक्षीभाव

त्यांनी सन्मान सोहळ्यापूर्वीच श्री. नागराज यांची ६० टक्के, तर श्री. मनोज यांची ६६ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे ओळखले होते. स्वतःची आध्यात्मिक पातळी ७८ टक्क्यांवरून ८० टक्के झाल्याचेही त्यांना सूक्ष्मातून आधीच समजले होते. यातून सूक्ष्मातील जाणण्याची त्यांची अफाट क्षमता लक्षात येते. दोन्ही मुलांची आध्यात्मिक पातळी अचूक ओळखणे, हे त्यांनी सद्गुरुपद प्राप्त केल्याचेच निदर्शक आहे. त्यांनी स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीकडेही साक्षीभावाने पाहिल्याचे लक्षात येते.

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ

Leave a Comment