कुठे मानसिक स्तरावर देवतांना टोपण नावे देऊन त्यांची विटंबना करणारे सध्याचे जन्महिंदू, तर कुठे देवालयांसह माणसांनाही देवतांची नावे देऊन सतत ईश्‍वरी अनुसंधान साधणारे हिंदूंचे पूर्वज !

Article also available in :

१. आधुनिक विज्ञानाच्या आधारावर मिळणारे सुख
अनुभवत असतांना मानवाला देव, धर्म आणि संस्कृती यांचा विसर पडलेला असणे

पालटणार्‍या काळाप्रमाणे मानवाने पुष्कळ प्रगती केल्याचे आपण ऐकतो. शास्त्रज्ञांनी विविध क्षेत्रांमध्ये नवनवीन शोध लावले. मनुष्य चंद्राच्याही पलीकडील ग्रहांवर जाण्यास सक्षम होत आहे. अशा अनेक वार्ता आपण प्रतिदिन ऐकतो आणि वाचतो; परंतु खरोखरच ही आपली प्रगतीची वाटचाल आहे का ? ‘आधुनिक विज्ञानाच्या आधारावर मिळणारे सुख अनुभवत असतांना आज आपण देव, धर्म आणि संस्कृती यांना विसरत चाललो आहोत’, हे दुर्दैव आहे.

२. ईश्‍वराच्या अनुसंधानात रहाण्यासाठी पूर्वजांनी
मुलांना देवतांची नावे ठेवणे आणि मुलांना त्याच नावांनी हाक मारणे

आपल्या महान हिंदु संस्कृतीची सर्वोच्च देण, म्हणजे ईश्‍वराशी एकरूपता, म्हणजेच मोक्षप्राप्ती. हे साध्य करण्यासाठी ईश्‍वराच्या अनुसंधानात रहाणे आवश्यक आहे. अनुसंधान साधण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे ईश्‍वराचा अखंड नामजप करणे. देवतेच्या अनेक नामांपैकी केवळ एकाच नामावर आपले मन, बुद्धी आणि चित्त एकाग्र करून त्याचे स्मरण केल्याने अनुसंधान साधता येते. हे साध्य करण्यासाठी पूर्वीच्या काळी मुलांना ‘केशव, माधव, पांडुरंग, राधा, सीता, गौरी’, अशी देवतांची नावे ठेवली जात आणि त्याच नावाने त्यांना हाक मारली जात असे.

३. सध्या मुलांची अर्थहीन नावे ठेवण्यात येणे,
नावांचे विकृतीकरण करून त्यांना हाक मारली जाणे आणि त्यामुळे
स्वतःसह मुलांनाही देवतांच्या स्पंदनांपासून वंचित ठेवून पापाचे धनी बनणे

सध्या आई-वडील आपल्या मुलांची नावे शास्त्रानुसार न ठेवता ‘चिंटू, पिंकी, मिंटू’ अशी अर्थहीन नावे ठेवतात. इतकेच नव्हे, तर चांगल्या नावांचे विकृतीकरण करून त्यांना संबोधले जाते, उदा. एखाद्याचे नाव अनिरुद्ध किंवा पांडुरंग असेल, तर त्याला ‘अन्या, पंड्या, पांडू’, अशा चुकीच्या पद्धतीने हाक मारली जाते. देवतांच्या नावांचेसुद्धा असेच होत आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातच चिमण्या किंवा पत्र्या गणपति, खुन्या मारुति, एक खांबी गणपति, अशा प्रकारे देवतांच्या नावांना विशेषणे जोडली आहेत. हे एक प्रकारे देवतांच्या नावांचे विडंबनच आहे. देवतेच्या नामाचे विडंबन केल्यामुळे त्या देवतेची स्पंदने मिळण्यापासून आपण वंचित रहातो. अगदी तसेच एखाद्या व्यक्तीच्या नावाचे विडंबन केल्यामुळे त्याला देवतेची किंवा नावाची स्पंदने मिळत नाहीत. त्यामुळे व्यक्तीच्या नावाचे विडंबन करून एका अर्थी आपण पापाचे धनीच बनतो.

४. हिंदूंच्या पूर्वजांनी बाळांची, राजांची आणि मंदिरांची नावे शास्त्रानुसार
ठेवलेली पाहून ‘आध्यात्मिकता’ हे त्यांच्या जीवनाचे अंग असल्याचे लक्षात येणे

पूर्वजांच्या आध्यात्मिकतेचे प्रतीक म्हणजे इंडोनेशियातील परब्रह्मन् (प्रंबनन) मंदिर

४ अ. पूर्वजांनी बाळाचे नाव ठेवण्यामागचे शास्त्र समजून त्याचा जीवनात अंगिकार करणे

एखादे मूल जन्माला आल्यावर त्याच्या जन्माचे नक्षत्र, वेळ इत्यादींचा सखोल अभ्यास करून ‘कोणत्या अक्षराने आरंभ होणारे नाव बाळाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी पूरक आहे ?’, हे ठरवले जाते. त्याप्रमाणे त्या अक्षराने चालू होणारे नाव ठेवून बाळाचा नामकरण विधी शास्त्रोक्त पद्धतीने करण्याची हिंदु संस्कृती आहे. अशा प्रकारे नामकरण केल्यामुळे बाळाला त्याच्या नावातून आध्यात्मिक स्पंदने मिळतात. आपल्या पूर्वजांनी हे शास्त्र ओळखले, त्याचा अभ्यास केला आणि त्याचा जीवनात संपूर्ण अंगिकार केला असल्याचे लक्षात येते.

४ आ. राजांच्या शास्त्रानुसार ठेवलेल्या नावांमुळे क्षात्रवृत्ती जागृत होणे

पूर्वीच्या काळी राजांची नावेसुद्धा अशाच प्रकारची असल्याचे पुरावे इतिहासात पहायला मिळतात, उदा. यशोवर्मन, जयवर्मन, राजेंद्रवर्मन, उदयादित्यवर्मन इत्यादी. अशा नावांतून देवतेच्या नामस्मरणासह क्षात्रवृत्तीसुद्धा जागृत होत असे.

४ इ. मंदिरांना ‘परब्रह्मन्’, ‘परम विष्णुलोक’, ‘श्री त्रिभुवनेश्‍वर’ अशी नावे असणे

मंदिरांनासुद्धा देवतांची नावे असल्याचे पुरावे इतिहासातून पाहायला मिळतात. इंडोनेशियातील ‘प्रंबनन’ या मंदिराचे नाव प्रत्यक्षात ‘परब्रह्मन्’ असे होते. येथे ब्रह्मा, विष्णु आणि महेश (शिव) यांची मंदिरे आहेत. कंबोडियामध्ये ९ व्या शतकात राजा यशोवर्मन याने स्थापन केलेल्या नगराचे नाव यशोधरपूर असे होते. येथे राजा यशोवर्मनच्या आज्ञेने बांधलेल्या मंदिराचे नाव ‘परम विष्णुलोक’ असे होते. आज त्याचा अपभ्रंश होत ‘अंगकोर वाट’, असे म्हटले जाते. श्री त्रिभुवनेश्‍वर, हरिहरालय इत्यादी नावे आजसुद्धा पहायला मिळतात.

५. ‘पूर्वजांनी दिलेल्या संज्ञांचे पालन करणे’, ही आपली साधना आहे !

या सर्व गोष्टींतून पूर्वीच्या काळी आध्यात्मिकता हे जीवनाचे अंग असल्याचे लक्षात येते. त्यामुळे सर्वत्र समृद्धी होती. आपल्या महान ऋषिमुनींनी त्यांच्या तपःसामर्थ्यातून देवतांची तत्त्वे ओळखली आणि त्यांना तशी संज्ञा दिली. ‘या संज्ञांचे पालन करणे’, हे आपले कतर्र्व्य आणि आपली साधना आहे. ‘त्या योगे आपल्याला सर्व स्तरांवर लाभ होणार आहे’, हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. हे लक्षात येण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे आणि धर्मशिक्षण मिळण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही.’

– श्री. सत्यकाम कणगलेकर, सीम रीप, कंबोडिया.

 

खमेर साम्राज्यावरील परकीय आक्रमणांचे निर्देशक असलेले
बंदुकीच्या गोळ्या लागलेले कंबोडियातील ‘अंकोर वाट’ येथील शिल्प !

‘आतापर्यंत कंबोडियावर अनेक साम्राज्यांनी आक्रमणे केली आहेत. कंबोडियाच्या बाजूला असलेले ‘श्याम देश’ (आताचे थायलँड) आणि ‘चंपा देश’ (आताचे व्हिएतनाम) यांनी खमेर राजांचा अहंकार अन् आंतरिक कलह यांचा लाभ घेऊन अनेक वेळा खमेर साम्राज्यावर आक्रमणे केली आहेत. १५ व्या शतकात हे साम्राज्य नष्ट झाले. १२ व्या शतकापासून १५ व्या शतकापर्यंत अंकोर वाट येथील शिल्पांनीही बरीच आक्रमणे झेलली आहेत. याचे एक उदाहरण म्हणजे अंकोर वाट येथील मंदिरातील बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा असलेले अप्सरेचे शिल्प.’

– श्री. विनायक शानभाग, कंबोडिया.

Leave a Comment