अयोध्येमध्ये श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतले प्रभु श्रीरामाची कुलदेवी श्री देवकालीमातेचे आशीर्वाद !

Article also available in :

‘सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सप्तर्षींनी ‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ३१ जुलै या दिवशी अयोध्येला जावे, २ ऑगस्ट या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जन्मनक्षत्र (उत्तराषाढा नक्षत्र) असतांना श्रीरामाची कुलदेवी श्री देवकालीमातेच्या मंदिरात दर्शनाला जावे आणि ३ ऑगस्टला उत्तराषाढा नक्षत्र संपून श्रीविष्णूच्या श्रवण नक्षत्राला आरंभ झाल्यावर त्यांनी श्रीरामजन्मभूमीत जाऊन श्रीरामाच्या मूर्तीचे दर्शन घ्यावे’, असा आदेश दिला होता. त्याप्रमाणे श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी २ ऑगस्ट या दिवशी श्रीरामाची कुलदेवी श्री देवकालीदेवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले, तसेच ३ ऑगस्टला बालकरूपातील श्रीरामाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

 

सूर्यवंशी राजांची कुलदेवी श्री देवकालीदेवी आणि
‘अयोध्येची देवी’ म्हणून प्रचलित असलेली श्री देवकालीदेवी

श्री देवकालीदेवी (डावीकडून श्री महाकाली, मध्यभागी श्री महालक्ष्मी आणि उजवीकडे श्री महासरस्वतीदेवीचे मुख आहे.)

अयोध्यानगरी ही सूर्यवंशी राजांची राजधानी होय. त्यांची कुलदेवी श्री देवकालीदेवी आहे. त्रेतायुगात सूर्यवंशी दशरथ राजाच्या घरी श्रीरामाचा जन्म झाला. श्रीरामजन्माच्या पूर्वीपासूनच अयोध्येत देवकालीदेवी विराजमान आहे. आजही लोक या देवीला ‘अयोध्येची देवी’ असे मानतात. कौटुंबिक शुभकर्म, लहान मुलांचे चौलकर्म आदी संस्कार या मंदिरात करण्यात येतात. श्री देवकालीदेवीच्या मूर्तीमध्ये तीन देवींचा समावेश आहे. डावीकडून श्री महाकाली, मध्यभागी श्री महालक्ष्मी आणि शेवटी श्री महासरस्वती या देवी आहेत. या देवीला स्थानिक लोक ‘बडी देवकाली’ असे म्हणतात. विवाहानंतर अयोध्येत येतांना सीतामाता तिची माहेरची कुलदेवी असलेल्या श्री गिरिजादेवीची मूर्ती घेऊन आली होती. त्या देवीचेही अयोध्येत मंदिर आहे. त्या देवीला स्थानिक लोक ‘छोटी देवकाली’ असे म्हणतात.

 

श्री देवकाली मंदिरात गेल्यावर आलेल्या अनुभूती आणि मिळालेले ईश्वरी संकेत

श्री देवकालीमातेला भावपूर्ण नमस्कार करतांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

 

१. श्री काळभैरवाचे दर्शन होण्याच्या संदर्भात घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घटना

१ अ. श्वानाच्या रूपात श्री काळभैरवाने दर्शन देणे

श्री देवकाली मंदिरात प्रवेश करताच श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समोर एक काळा कुत्रा आला. या वेळी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी त्या कुत्र्याला भावपूर्ण नमस्कार केला. काळ्या कुत्र्याला श्री काळभैरवाचे प्रतीक मानले जाते.

श्री देवकाली मंदिराच्या परिसरात काळभैरवाचे प्रतीक असलेल्या श्वानाला नमस्कार करतांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

१ आ. मंदिरातील पुजार्‍यांनी स्वतःहून श्री काळभैरवाच्या मंदिरात घेऊन जाणे

पृथ्वीवर जेवढी शक्तिपीठे आहेत, त्या प्रत्येक आदिशक्ति जगदंबेच्या मंदिराबाहेर श्री काळभैरवाचे मंदिर असतेच. असे म्हटले जाते की, देवीच्या स्थानांच्या रक्षणासाठी त्या ठिकाणी काळभैरव असतोच. श्री देवकालीचे दर्शन झाल्यावर तेथील पुजारी गाभार्‍यातून बाहेर आले आणि स्वतःहूनच श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना मंदिर परिसरात असलेल्या ‘श्री काळभैरवा’च्या मंदिरात घेऊन गेले.

–   श्री. विनायक शानभाग, अयोध्या, उत्तरप्रदेश. (४.८.२०२०)

 

निद्राधीन असलेल्या बालकरूपातील श्रीरामाच्या लोभस मूर्तीचे दर्शन

पुजारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना श्रीरामाच्या बालकरूपातील मंदिरात दर्शनाला घेऊन गेले. या मंदिराचे विशेष म्हणजे येथे श्रीरामाची मूर्ती बालक रूपात आणि झोपाळ्यावर झोपलेल्या मुद्रेत आहे. ही मूर्ती पाहून श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची भावजागृती झाली. त्या मूर्तीकडे पाहून असे वाटत होते की, जणू बालकरूपात प्रभु श्रीराम प्रत्यक्षच तेथे झोपले आहेत. श्री देवकालीदेवी ही कुलदेवी आहे, म्हणजे ती सर्वांची आई आहे. श्रीरामाच्या मूर्तीला पाहून असे वाटते की, ‘साक्षात् भगवंतही येथे आईच्या कुशीत झोपला आहे.’

कोरोनामुळे उद्भवलेल्या कठीण परिस्थितीतही केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आम्हाला हे दर्शन घेण्याचे भाग्य लाभत आहे. श्रीरामजन्मभूमीवरील श्रीराममंदिराच्या भूमीपूजन सोहळ्याच्या निमित्ताने या देवतांचे दर्शन घेऊन रामराज्याच्या स्थापनेसाठी प्रार्थना करता आली. त्यासाठी प्रभु श्रीराम, महर्षि आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment