सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना पंढरपूर येथील मंदिरात दर्शनाला गेल्यावर आशीर्वादरूपात मिळालेला विठ्ठलाच्या डोक्यावरील मोरपिसांचा अलंकार !

विठ्ठलाच्या समोर उभ्या असलेल्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि साधक; मागे उभे असलेले मंदिरातील पुजारी

 

१. पंढरपूर येथील श्री. अनंत बडवे यांनी
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना पंढरपुरात
येण्याचे निमंत्रण देऊन त्यांना विठ्ठलाने दिलेल्या आदेशाविषयी
सांगणे आणि एका संतांनी सद्गुरु (सौ.) गाडगीळ यांना पंढरपूरला जाण्यास सांगणे

‘२१.२.२०१९ या दिवशी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराचे पुजारी श्री. अनंत बडवेकाका यांचा भ्रमणभाष आला. ते म्हणाले, ‘‘सद्गुरु अंजलीताई, विठ्ठल तुमची आठवण काढत आहे. ‘तुम्ही पंढरपुरात लवकर येऊन पुरणपोळीचा नैवेद्य खाऊन जा. त्यामुळेच तुम्ही हातात घेतले कार्य पूर्णत्वाला जाईल’, असा विठ्ठलाने मला आदेश दिला आहे.’’ सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी एका संतांना हे बोलणे सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘विठ्ठलानेच श्री. बडवेकाकांच्या माध्यमातून तुमची आठवण काढली आहे. तुम्ही पंढरपूरला जाऊन या. आतापर्यंत संत आणि महर्षी सनातन संस्थेला मार्गदर्शन करत होते. आता साक्षात् देवच आपल्याला मार्गदर्शन करत आहे.’’

 

२. पंढरपूरला जाण्याचे नियोजन आणि दर्शनाची झालेली सोय !

१८.३.२०१९ या द्वादशीच्या दिवशी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पंढरपूरला जाण्याचे ठरवले. त्यांनी प्रथम विठ्ठलाचे दर्शन घेऊन नंतर श्री. अनंत बडवेकाका यांच्या घरी जाऊन ‘पुरणपोळीचा नैवेद्य स्वीकारायचा’, असे ठरवले. तेेथील विठ्ठल मंदिराचे आणखी एक पुजारी श्री. बाळासाहेब बडवे यांना श्री. अनंत बडवेकाकांकडून कळले की, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ १८ मार्चला विठ्ठलाच्या दर्शनाला येणार आहेत. तेव्हा त्यांनी त्यांच्या दर्शनाची सर्व व्यवस्था केली. त्यांनी मंदिर समितीला कळवले आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना मंदिरात घेऊन येण्यासाठी स्वतःच्या मुलाला पाठवले.

 

३. गाभार्‍यातील पुजार्‍यांकडे विठ्ठलाच्या
डोक्यावरील मोरपीस मागणे आणि पुजार्‍यांनी तीनही मोरपिसे देणे

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना मिळालेला विठ्ठलाच्या डोक्यावरील तीन मोरपिसांचा अलंकार

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मंदिरात आल्या. जेव्हा त्यांना लांबूनच विठ्ठलाचे दर्शन झाले, तेव्हा त्यांना विठ्ठलाच्या डोक्यावर मोरपिसांचा अलंकार घातलेला दिसला. विठ्ठलमूर्तीच्या जवळ गेल्यावर त्या तेथील पुजार्‍यांना म्हणाल्या, ‘‘आम्ही गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमातून आलो आहोत. आम्हाला पृथ्वीवर रामराज्य आणण्यासाठी बळ मिळावे; म्हणून विठ्ठलाच्या डोक्यावरील मोरपीस आशीर्वाद म्हणून द्याल का हो ?’’ तेव्हा पुजार्‍याने लगेच ‘हो’ म्हटले आणि विठ्ठलाच्या डोक्यावरील तीन मोरपिसांचा अलंकार काढला. पुजार्‍यांनी त्यातील एक मोरपीस काढण्याचा प्रयत्न केला; परंतु ते निघत नव्हते. तेव्हा त्यांनी तीनही मोरपिसे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना दिली. मागे सहस्रो भक्त दर्शनासाठी उभे होते. त्यांनाही या गोष्टीचे आश्‍चर्य वाटले. त्या वेळी त्यांच्यापैकी कोणीही दर्शनाची घाई करत नव्हते, हेही तेवढेच आश्‍चर्यचकित करणारे होते.

 

४. ‘तीन मोरपिसे म्हणजे ‘परात्पर गुरु डॉक्टर आणि सद्गुरुद्वयी’, असे वाटणे

प्रसाद म्हणून मिळालेल्या ३ मोरपिसांतील एक मोरपीस उंच होते आणि दोन मोरपिसे लहान; पण एकसारखी होती. त्या मोरपिसांकडे पाहिल्यावर ‘उंच मोरपीस म्हणजे परात्पर गुरु डॉक्टर आणि दोन सारखी असलेली मोरपिसे, म्हणजे सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचे प्रतीक आहे’, असे आम्हा सर्वांना वाटले.’

– श्री. विनायक शानभाग, चेन्नई, तमिळनाडू. (१८.३.२०१९)

 

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या
विठ्ठलप्रेमाचे त्यांच्या मैत्रिणीने सांगितलेले एक उदाहरण !

विठ्ठलाचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना त्यांची मैत्रीण सौ. माधुरी जोशी भेटायला आल्या. त्यांनी सांगितले, ‘‘मी आणि अंजली (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ) दोघीही कोल्हापूर येथील शिवाजी युनिव्हर्सिटीत एकत्र शिकत होतो. माझे घर पंढरपूरला असल्याने आम्ही कधी कधी येथे यायचो. त्या वेळी अंजली ‘विठ्ठलवेडी’ होती. तिने विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहिले, तरी तिच्या डोळ्यांतील अश्रू थांबायचे नाहीत. ती विठ्ठलाला पाहून ओक्साबोक्शी रडायची. अंजलीत आधीपासूनच विलक्षण असा भक्तीभाव होता.’’

– श्री. विनायक शानभाग, चेन्नई, तमिळनाडू.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment