श्रीचित्‌शक्ति् (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या अयोध्या दौर्‍याच्या संदर्भाने घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी आणि मिळालेले ईश्‍वरी संकेत !

श्रीचित्‌शक्ति् (सौ.) अंजली गाडगीळ

 

१. सप्तर्षींच्या आज्ञेने जयपूरहून अयोध्याकडे प्रस्थान !

‘श्रीचित्‌शक्ति् (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ३१.७.२०२० या दिवशी अयोध्येला जावे. या वेळी त्यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या वतीने श्रीराममंदिराच्या भूमीपूजनासाठी दान द्यावे’, अशी आज्ञा सप्तर्षींनी सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून केली होती. या आज्ञेनुसार श्रीचित्‌शक्ति् (सौ.) अंजली गाडगीळ ३१.७.२०२० या दिवशी जयपूरहून ७०० किलोमीटर प्रवास करून अयोध्येला पोचल्या.

 

२. शिवक्षेत्राशी निगडित माती आणि जल
श्रीराममंदिरासाठी अर्पण करणे, हा ‘हरिहर संगम’ !

श्रीचित्‌शक्ति् (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्रीराममंदिराच्या भूमीपूजनासाठी प्रत्यक्ष शिवाचे निवासस्थान असलेल्या कैलास पर्वताची माती, कैलास चरणस्पर्शाची माती, कैलास गौरीकुंडाची माती आणि मानस सरोवराचे जल अर्पण केले. या वेळी श्रीचित्‌शक्ति् (सौ.) अंजली गाडगीळ म्हणाल्या, ‘‘कैलास पर्वतावरील माती आणि मानस सरोवराचे जल श्रीराममंदिराच्या भूमीपूजनासाठी पोचणे, हा एक प्रकारे ‘हरिहर संगम’ आहे. श्रीराम (हरि) सतत शिवाचे स्मरण करतो आणि भगवान शिव (हर) श्रीरामाचा जप करतो. हरि आणि हर हे एकच आहेत. हरि आणि हराचा हा संगम  सनातन संस्थेसाठी आशीर्वाद आहे.’’

आतापर्यंत अनेक तीर्थक्षेत्रांची माती अयोध्येत आली आहे; मात्र कैलास पर्वतावरील माती अद्याप येथे आलेली नाही. याविषयी श्रीचित्‌शक्ति् (सौ.) अंजली गाडगीळ म्हणाल्या की, ‘शिवानेच मला माध्यम बनवून कैलास पर्वतावरील माती येथे पोचवली.’

२ अ. श्रीचित्‌शक्ति् (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या अयोध्या दौर्‍याविषयी आणि कैलास
पर्वतावरील माती अर्पण करण्याविषयी जयपूर (राजस्थान) येथील शिवभक्त श्री. वारिद सोनी यांना स्वप्तदृष्टांत

वर्ष २०१९ मध्ये जयपूर (राजस्थान) येथील शिवभक्त श्री. वारिद सोनी यांच्या मार्गदर्शनानुसार श्रीचित्‌शक्ति् (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्या समवेत काही साधकांनी कैलास-मानस सरोवर यात्रा केली होती. श्री. वारिद सोनीजी हे गेल्या अनेक वर्षांपासून कैलास-मानस सरोवर यात्रा करत आहेत. २८.७.२०२० या दिवशी श्री. वारिद सोनी यांना स्वप्न दृष्टांत झाला की, ‘श्रीचित्‌शक्ति् (सौ.) अंजली गाडगीळ अयोध्येला जातील. त्यांना राममंदिराच्या भूमीपूजनासाठी अर्पण करण्यासाठी कैलास पर्वतावरील माती देऊया.’ त्यानुसार त्यांनी कैलास पर्वतावरील माती आणि मानस सरोवराचे जल ३०.७.२०२० या दिवशी जयपूर येथे श्रीचित्‌शक्ति् (सौ.) अंजली गाडगीळ यांना आणून दिले.

 

३. शरयू नदीच्या आरतीच्या वेळी घडलेल्या दैवी घटना !

शरयू नदीच्या घाटावर प्रतिदिन सायंकाळी ७ ते ७.१५ या वेळेत नदीची आरती करण्यात येते. अयोध्येतील हिंदुत्वनिष्ठ वैद्य रामप्रकाश पांडे यांनी श्रीचित्‌शक्ति् (सौ.) अंजली गाडगीळ यांना या आरतीसाठी उपस्थित रहाण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार श्रीचित्‌शक्ति् (सौ.) अंजली गाडगीळ यांनी शरयू नदीच्या आरतीमध्ये सहभागी घेतला.

३ अ. श्‍वान जवळ येण्याच्या प्रसंगातून गुरुतत्त्व समवेत असल्याची अनुभूती !

शरयू नदीच्या आरतीसाठी श्रीचित्‌शक्ति् (सौ.) अंजली गाडगीळ घाटावर गेल्या असता त्यांच्याजवळ एक कुत्रा येऊन उभा राहिला. त्या वेळी तो कुत्रा इतक्या जवळ उभा राहिल्याचे पाहून उपस्थित सर्वांनाच आश्‍चर्य वाटले. श्रीचित्‌शक्ति् (सौ.) अंजली गाडगीळ यांना हा कुत्रा हे दत्तगुरूंचे श्‍वान असल्याचे जाणवले. ‘गुरुतत्त्व सतत आपल्या समवेत असल्याची ही अनुभूती आहे’, असे त्या म्हणाल्या.

३ आ. पुजार्‍याने श्रीचित्‌शक्ति् (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या हातात दीप देऊन आरती करण्यास सांगणे

अनेक पुजारी चौथर्‍यावर उभे राहून शरयू नदीची आरती करत होते. आरती पूर्ण होतांनाच श्रीचित्‌शक्ति् (सौ.) अंजली गाडगीळ जेथे उभे होत्या, तेथे असलेल्या पुजार्‍याने त्यांना बोलवले आणि आरतीचा दीप त्यांच्या हातात दिला. पुजारी म्हणाले, ‘‘माताजी, आप भी शरयूजी की आरती किजीए.’’ त्या वेळी श्रीचित्‌शक्ति् (सौ.) अंजली गाडगीळ यांची भावजागृती झाली. त्यांनी भावावस्थेत शरयू नदीची आरती केली.

३ इ. श्रीचित्‌शक्ति् (सौ.) अंजली गाडगीळ आरती करत
असतांना शरयूच्या पाण्याची पातळी वाढणे, हा शुभसंकेत !

विशेष म्हणजे या वेळी शरयूतील पाण्याची पातळी वाढली होती. काही घंट्यांनी नदीकाठच्या काही परिसरांत पूर येण्याची स्थिती असल्याचे सरकारने घोषित केले. याविषयी सप्तर्षींना कळवल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘श्रीराममंदिरासाठी भूमीपूजन होत असल्याने शरयू नदीला आनंद झाला आहे. शरयूचे पाणी वाढणे, हा शुभसंकेत आहे.’’

– श्री. विनायक शानभाग, अयोध्या (१.८.२०२०)

 

कृतज्ञता !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले सर्वत्र रामराज्य, म्हणजेच हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याचे कार्य करत असतांना श्रीरामजन्मभूमीचा प्रश्‍न मार्गी लागणे, श्रीराममंदिराच्या उभारणीचे कार्य चालू होणे, हे दैवी नियोजन आहे. मागे श्रीरामजन्मभूमीच्या खटल्याचा निकाल लागल्यानंतरही महर्षींनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति् (सौ.) अंजली गाडगीळ यांना अयोध्या येथे जाऊन श्रीरामजन्मभूमीवरील रामललाचे दर्शन घेण्याची आज्ञा दिली होती. आताही महर्षींनीच हे अर्पण देण्याची आज्ञा केली आणि त्यासाठी शिवक्षेत्रातील माती अन् जलही ईश्‍वरी नियोजनानुसारच उपलब्ध झाले ! या ऐतिहासिक आणि दैवी क्षणांच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ अयोध्येत उपस्थित असणे, हाही एक दैवी योगच आहे ! परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील विष्णुतत्त्वाची ही प्रचीती आहे ! त्यासाठी आम्ही प्रभु श्रीराम, महर्षि, परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति् (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’

– श्री. विनायक शानभाग
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment