सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याशी बोलतांना साधनेविषयीची सूत्रे ऐकून सिंगापूरसारख्या महागड्या देशातील टॅक्सीचालकाने निवासाच्या ठिकाणी पोहोचवण्याचे पैसे न घेणे

संतांना जिज्ञासेने प्रश्‍न विचारणारा आणि त्यांच्याकडून
भाडे न आकारणारा टॅक्सीचालक भारतात कुणाला भेटला आहे का ?

१. टॅक्सीचालक जिज्ञासू असणे आणि त्याने
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना साधनेविषयी काही प्रश्‍न विचारणे

‘सिंगापूर हा जगातल्या सर्वांत श्रीमंत देशांपैकी एक देश आहे. येथील दैनंदिन सुविधा आणि सर्वच गोष्टी महागड्या आहेत. एका ठिकाणची सेवा संपवून आम्ही ज्या ठिकाणी रहाणार होतो, त्या हॉटेलवर जाण्यासाठी टॅक्सी बोलावली. त्या टॅक्सीचा चालक बौद्ध होता. त्याच्या बोलण्यातून कळले की, तो शुद्ध शाकाहारी आहे. त्याने त्याच्या मुलांनाही शाकाहाराचे वळण लावले आहे. आम्हीही त्याला आमच्या सेवेची संपूर्ण माहिती दिली. ही माहिती ऐकून त्याला पुष्कळ आनंद झाला. त्याने जिज्ञासेने साधनेविषयी काही प्रश्‍न सद्गुरु काकूंना विचारले.

२. सद्गुरु (सौ.) गाडगीळ यांनी साध्या-सोप्या भाषेत टॅक्सीचालकाला
अध्यात्म समजावून सांगणे आणि त्यांनी दिलेली प्रश्‍नांची उत्तरे ऐकून टॅक्सीचालक प्रभावित होणे

त्याने सद्गुरु काकूंना विचारले, ‘‘आपण गुरु आहात. तुम्हाला कुणाच्या भविष्याविषयी सांगता येते का ?’’ सद्गुरु काकू त्याला म्हणाल्या, ‘‘आपले वर्तमान हेच आपले भविष्य आहे. आपले भविष्य घडवणे, हे आपल्याच हातात आहे. वर्तमानात साधना केली, तर भविष्य उज्ज्वलच असते. त्यामुळे कुणाचे भविष्य जाणून घेण्यापेक्षा वर्तमानात साधनेवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे वेगळे भविष्य जाणून घेण्याची आवश्यकता नसते. खरे गुरु कुणाचे भविष्य सांगण्याला तेवढे महत्त्व देत नाहीत. ते तुम्हाला साधनेकडे वळवतात. ‘एखाद्याकडून साधना कशी करवून घेता येईल’, याकडेच त्यांचे लक्ष असते. कर्माप्रमाणे आपल्याला गती मिळते. त्यासाठी केवळ खाण्यापुरते शाकाहारी न बनता सात्त्विक विचारांनीही शुद्ध शाकाहारी बनायला हवे. आहाराच्या समवेतच मनातील विचारांकडे लक्ष द्यायला हवे.’’ सद्गुरु काकूंनी अशा सुंदर, साध्या, सोप्या आणि त्या व्यक्तीला सहज समजेल, अशा भाषेत त्याला अध्यात्म समजावून सांगितले. सद्गुरु काकूंनी दिलेली उत्तरे ऐकून तो अधिकच प्रभावित झाला. सद्गुरु काकूंना तो आदराने ‘गुरु, गुरु…’ असे संबोधत होता.

डावीकडून श्री. दिवाकर आगावणे, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, टॅक्सीचालक, श्री. विनायक शानभाग आणि श्री. सत्यकाम कणगलेकर

३. ‘तुम्ही करत असलेले कार्य महान आहे’, असे सांगून कृतज्ञता म्हणून टॅक्सीचालकाने टॅक्सीचे भाडे न घेणे

त्या टॅक्सीचालकाशी बोलतांना शेवटी सद्गुरु काकूंनी त्याला सांगितले, ‘‘आम्ही कुणी नोकरी करत नाही. आम्ही आमचे सर्व आयुष्य ईश्‍वरी सेवेसाठी अर्पण केेले आहे. आपणही आमच्या आश्रमात यावे.’’ हे सर्व ऐकून तो म्हणाला, ‘‘गुरु, आपण पुष्कळ हुशार आहात.’’ यावर सद्गुरु काकूंनी ‘आपल्या सर्वांपेक्षा देवच हुशार आहे’, असे उत्तर दिले. त्या वेळी टॅक्सीचालक म्हणाला, ‘‘मला पुष्कळ आनंद होत आहे. गुरु, आपण करत असलेले कार्य महान आहे. माझा आपणा सर्वांना नमस्कार आहे.’’ गाडीतून उतरल्यावर त्यांनी आमच्याकडून पैसे घेतले नाहीत. टॅक्सीचे भाडे भारतीय चलनाप्रमाणे साधारण १ सहस्र २५० रुपये झाले होते. सिंगापूरसारख्या देशात पहिल्याच भेटीत कुणी असे करणे, हे पुष्कळच आश्‍चर्यकारक होते. ‘तुमच्यासारख्यांकडून पैसे न घेणे, ही माझ्याकडून तुमच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासारखे आहे’, असे तो म्हणाला. यावर सद्गुरु काकू म्हणाल्या, ‘‘‘देवानेच आपली भेट घडवून आणली. ‘एवढ्या अल्प वेळेत कुणाला, कुठे आणि काय द्यायचे ?’, हे देवालाच ठाऊक असते.’’ ‘तुम्हाला आमच्या सिंगापूर येथील साधकांचीही भेट घडवून देऊ’, असे आम्ही त्याला सांगितल्यावर त्याला पुष्कळ आनंद झाला.’

– श्री. दिवाकर आगावणे, सिंगापूर

Leave a Comment