वेदमूर्ती कोतवडेकर गुरुजी, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातन संस्था

सनातनच्या ध्वनीचित्र- चकत्यांचे प्रदर्शन पहातांना डावीकडून वेदमूर्ती गणेश कृष्णाजी जोशी कोतवडेकर गुरुजी आणि सनातनचे साधक श्री. रूपेश रेडकर (वर्ष २०१४)

 

१. वयाच्या ९४ व्या वर्षी वेदमूर्ती कोतवडेकर
गुरुजी यांनी सनातनच्या रामनाथी आश्रमाला दिलेली भेट !

‘१६.९.२०१४ या दिवशी वेदमूर्ती कोतवडेकर गुरुजी यांनी सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट दिली होती. त्या वेळी त्यांचे वय ९४ वर्षे असूनही त्यांनी जिज्ञासेने सनातनच्या आध्यात्मिक संशोधनाविषयीचे प्रदर्शन चाकाच्या आसंदीवर बसून आवर्जून पाहिले. प्रदर्शनातील देवतांची चित्रे आणि संतांची छायाचित्रे यांतील दैवी पालट त्यांच्या त्वरित लक्षात आले. सनातनच्या साधकांच्या समर्पणभावाचे त्यांनी कौतुक केले.

 

२. गुरुजींचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव !

त्या वेळी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेदमूर्ती गणेश कोतवडेकर गुरुजी यांची भेट घेतली. परात्पर गुरु डॉ. आठवले येतांना पाहून गुरुजींनी ‘वेदपुरुषाय नमः ।’ असे म्हणून त्यांना जागेवरूनच नमस्कार केला. परात्पर गुरु डॉक्टरांनीही वेदमूर्तींना वाकून नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले.

 

३. गुरुजींनी सनातन संस्थेविषयी काढलेले गौरवोद्गार आणि दिलेले आशीर्वाद !

या वेळी वेदमूर्ती कोतवडेकरगुरुजी परात्पर गुरु डॉक्टरांना म्हणाले, ‘‘सनातन आश्रमात आल्यावर मला शक्ती मिळाली. आपले धर्माच्या बाजूने फार मोठे कार्य चालले आहे. धर्मकार्यात येणारी संकटे, हा कलीचा प्रभाव आहे. जे प्रयत्न चालले आहेत, त्याला उत्तम फळ मिळेल.’’ हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या सनातनच्या कार्याला आशीर्वाद देतांना ते म्हणाले, ‘‘ज्या वेदपुरुषाची आम्ही सेवा करतो, त्या वेदपुरुषाचे आपल्या कार्याला आशीर्वाद आहेत.’’

 

४. शंभर वर्ष जगून वेदांची सेवा करायची इच्छा व्यक्त करणारे गुरुजी !

परात्पर गुरु डॉक्टरांचा निरोप घेतांना वेदमूर्ती कोतवडेकर गुरुजी त्यांचा मानस व्यक्त करतांना म्हणाले, ‘‘आता माझे वय९४ वर्षे आहे. शंभर वर्ष जगून मला वेदांची सेवा करायची आहे.’’ (१६.९.२०१४)

 

वेदमूर्ती कोतवडेकर गुरुजी यांनी सनातन
साधक-पुरोहित पाठशाळेतील विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन !

‘हे जग देवाच्या आधीन आहे. वैदिक मार्गात तुम्ही आला आहेत. याच मार्गात टिकून रहा.’ प्रात: आणि सायं संध्या करणे, पंचयज्ञ आणि स्वाध्याय (वेदाध्ययन) प्रतिदिन करायला हवे. ते एकही दिवस चुकवायचे नाही. सहा मासांत (महिन्यांत) तुम्हाला त्याचा लाभ दिसून येईल. वैदिक मार्गात राहिल्याने सिद्धी प्राप्त होतात. आज केलेली इच्छा उद्या पूर्ण झाल्याची तुम्हाला अनुभूती येईल.

आज धर्मरक्षणासाठी प्रयत्न करणारे अल्प संख्येत आहेत. सनातन संस्थेने वेदरक्षणाच्या दृष्टीने उचललेले पाऊल अतिशय योग्य आहे. या कार्याला माझे सदैव आशीर्वाद आहेत. ‘वेदपुरुषांच्या कृपेने पाठशाळेचे कार्य दिवसेंदिवस वृद्धींगत होवो’, ही ईश्‍वरचरणी प्रार्थना !’

– वेदमूर्ती गणेश कृष्णाजी जोशी कोतवडेकर गुरुजी, पुणे (१६.९.२०१४)

 

पुणे येथील वेदमूर्ती कै. गणेश कृष्णाजी जोशी कोतवडेकर गुरुजी !

वेदांचा प्रसार आणि प्रचार करण्याची तळमळ असणारे अन् प्रत्येक
कृती शास्त्रशुद्ध होण्याकडे कटाक्षाने लक्ष देणारे ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व !

९.१.२०१८ या दिवशी पुणे येथील वेदमूर्ती गणेश कृष्णाजी जोशी कोतवडेकर गुरुजी यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९७ वर्षे होते. २१.१.२०१८ या दिवशी त्यांचा निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या वैदिक जीवनाचा परिचय, त्यांना मिळालेले विविध पुरस्कार, तसेच पुणे येथील साधिका सौ. विजया भिडे यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

वेदमूर्ती गणेश कृष्णाजी जोशी कोतवडेकर गुरुजी

१. वैदिक जीवनाचा परिचय

‘पुणे येथील वेदमूर्ती गणेश कृष्णाजी जोशी कोतवडेकर गुरुजी यांचा जन्म २४.२.१९२१ या दिवशी झाला. त्यांच्या वैदिक घराण्याची परंपरा गेल्या पाच पिढ्यांपासून अखंड चालू आहे. हे दशग्रंथी वैदिक ब्राह्मण होते. त्यांचे वेदाध्ययन त्यांचे वडील कृष्णाजी जोशी कोतवडेकर आणि प्रसिद्ध घनपाठी वेदाचार्य फाटक, तसेच वेदमूर्ती भा.बा. करंबेळकर यांच्याकडे झाले. त्यांनी ‘गर्गे गुरु विद्यापीठ पंढरपूर धारूरकर पाठशाळा’ येथे शाखा आणि पंचग्रंथ यांची परीक्षा देऊन पदवी संपादन केली होती.

त्यांचे ‘क्रम, जटा, घन (वैदिक शिक्षणाचा अभ्यास)’, असे शिक्षण झाले होते. गुरुजी नुसते घनपाठी नाही, तर दशग्रंथ घनपाठी होते.

त्यांनी पुणे येथील ‘वेद विकृती लेखन संस्थे’त ‘क्रम आणि जटा’ या विकृतीचे लेखन केले. ‘वेद शास्त्रोत्तेजक सभे’च्या पदापर्यंतच्या परीक्षा उत्तीर्ण झाले होते. गुरुजींनी जवळजवळ ४० वर्षांहून अधिक काळ त्यांनी पुणे वेदपाठशाळेत वेदांच्या अध्यापनाची सेवा केली. ते ‘पुणे वेदपाठशाळे’त ऋग्वेद विभागात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते.

पूर्वी मौखिक स्वरूपात विद्या असल्याने ‘पुढील पिढीला ग्रंथ अभ्यासण्यासाठी लिखित स्वरूपात ग्रंथ उपलब्ध व्हावेत’, यासाठी क्रमान्त वैदिक भालचंद्र करंबेळकर गुरुजी यांच्या समवेत त्यांनी ४ अष्टक क्रमाचा ग्रंथ लिहिला. त्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले.

२. मिळालेले पुरस्कार आणि झालेले सत्कार

अ. वर्ष १९७३ मध्ये देहली येथील अखिल भारतीय वेदविद्या संमेलनात सत्कार

आ. वर्ष १९८६ मध्ये पुणे विद्यापिठातील संस्कृत संमेलनात सत्कार

इ. वर्ष १९८७ मध्ये द्वारका-शारदापिठाच्या पूज्य आचार्यांच्या हस्ते ‘वेदभूषण’ या पुरस्काराने सन्मान

ई. वर्ष १९९१ मध्ये निष्ठेने वेदपरंपरेतून केलेल्या अध्यापनानिमित्त नगर येथील दत्त संस्थान, अंबिकानगर यांच्याकडून जरीची शाल आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार

उ. संभाजीनगर येथे श्रीमत् जगद्गुरु शंकराचार्य विद्याशंकर भारती यांच्या हस्ते सत्कार

ऊ. नाशिक येथे कैलास महाधिपती स्वामी संविदानंद सरस्वती यांच्या हस्ते सत्कार

ए. रायपूर (मध्यप्रदेश) येथील क्षेत्रीय वैदिक संमेलनात सत्कार

ऐ. श्रीप्रसाद महाराज अंमळनेकर यांच्याकडून सत्कार आणि मानचिन्ह

ओ. सातारा येथे वैदिक संमेलनात सत्कार

औ. डिसेंबर १९९८ मध्ये देहली येथे झालेल्या विश्‍व वेद संमेलनात ऋग्वेदाचे प्रतीक म्हणून अंबारीवरून वेद प्रतिनिधित्वाचा सन्मान (हत्तीवरून त्यांची मिरवणूक काढण्यात आली होती.)

अं. ‘वेदमूर्ती महाबळेश्‍वरकर गुरुजी वेदपाठशाळे’च्या वतीने सत्कार

क. १४.८.२००३ या दिवशी देहली येथे ‘वेद-वेदांग पुरस्कार’ प्रदान

ख. २८.८.२००३ या दिवशी पुणे येथे ‘वेद शास्त्रोत्तेजक सभा’ यांच्याकडून सत्कार

ग. २५.१.२००४, गणेश जयंतीच्या या दिवशी पुणे येथे ‘श्रीमंत नानासाहेब पेशवा धार्मिक आणि आध्यात्मिक पुरस्कार’

घ. १.१२.२००४ या दिवशी मंगेशी (गोवा) येथे वैदिक संमेलनात सत्कार

च. २२.१.२००५ या दिवशी नाशिक येथे ‘श्री गुरु गंगेश्‍वर वेद-वेदांग राष्ट्रीय पुरस्कार’ प्राप्त

छ. वर्ष २००६ मध्ये कोल्हापूर येथे स्वामी जगद्गुरु शंकराचार्य पीठ, करवीर यांच्या वतीने सत्कार

ज. वर्ष २०१० मध्ये सांगली येथे ‘पुरुषोत्तम पुरस्कार’ आणि पुणे येथील ‘चिंचवड देवस्थान’च्यावतीने सत्कार

झ. २४.१२.२०११ या दिवशी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने ‘समाज भूषण पुरस्कार’

ट. १२.७.२०१४ या दिवशी पुणे वेदपाठशाळेच्या वतीने वर्ष १९७८ पासून तीन तपे केलेल्या अध्यापनाविषयी सन्मानपत्र

३. गुरुजींची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये

३ अ. त्यांची राहणी अत्यंत साधी होती.

३ आ. ते अत्यंत नम्र आणि निःस्वार्थी होते.

३ इ. इतरांचा विचार करणे

९.३.२००७ या दिवशी आम्ही भागवताचे पारायण करण्यासाठी आगगाडीने पुण्याहून देहलीला जात होतो. त्या वेळी प्रवासात गुरुजी आमच्या समवेत होते. त्या वेळी त्यांचेे वय ८७ वर्षे होते, तरीही त्यांनी देहलीपर्यंतचा प्रवास विमानाने न करता आगगाडीने केला. ते म्हणाले, ‘‘सर्व भागवतप्रेमी आगगाडीने येणार असल्याने मी एकट्याने विमानाने जाणे योग्य नाही.’’

३ ई. प्रवासातही धर्माचरणात खंड पडू न देणे

आगगाडीने प्रवास करतांना सर्व भागवतप्रेमी अल्पाहार आणि जेवण करत होतो. गुरुजींना बाहेरचे खाल्लेले चालत नव्हते. त्यांनी २ दिवस केवळ दूध घेतले.

गुरुजींनी प्रवासातही त्यांच्या नित्य उपासनेत खंड पडू दिला नाही. पहाटे ५ वाजता भोपाळ येथे गाडी थांबली असता त्यांनी स्थानकावर थंड पाण्याने अंघोळ केली. ‘ऋक्संहितेच्या अध्यायाचे पठण केल्याविना त्यांचा दिनक्रम चालू होत नाही’, हे प्रवासातही आम्हाला अनुभवायला मिळाले. ते त्यांच्या नित्य स्वाध्यायात प्रतिदिन दशग्रंथ पदक्रमाची आवृत्ती करत असत.

३ उ. सेवाभाव

गुरुजी भागवत सप्ताहासाठी २ वेळा शुकतालला आणि उडुपी (कर्नाटक) अन् कवळे (गोवा) येथे प्रत्येकी एकदा भागवताच्या पारायणासाठी गेले होते. तिथे त्यांचा दिनक्रम व्यस्त असायचा. गुरुजी पहाटे उठून स्वतःची सेवा आणि साधना म्हणून ऋग्वेदसंहिता वाचायचे आणि त्यानंतर भागवताचेही पारायण करायचे. एवढे करूनही गुरुजींच्या तोंडवळ्यावर कधीही त्रासिक भाव किंवा चिडचिड जाणवली नाही. ते सर्वकाही शांतपणे स्वीकारत होते.

३ ऊ. अहं अल्प असणे

उत्तरप्रदेशातील मेरठमधील शुकताल येथे (शुकमुनींनी परीक्षित राजाला येथील वटवृक्षाखाली भागवत सांगितले होते. त्यामुळे लोक तेथे भागवताचे पारायण करायला जातात.) गुरुजींचा ‘भागवतप्रेमी मंडळा’च्या वतीने सत्कार करण्यात आला. त्या वेळी गुरुजींमध्ये अहंचा लवलेशही जाणवला नाही.

३ ए. जिज्ञासा

प्रवासात असतांना आम्ही गुरुजींना दैनिक आणि साप्ताहिक सनातन प्रभात वाचायला दिले होते. त्यांनी त्याचे अभ्यासपूर्ण वाचन केले. आम्ही त्यांना सनातनचे ग्रंथही दिले होते. त्यांनी तेही वाचले.

३ ऐ. ऋग्वेदाचे १ सहस्रहून अधिक स्वाहाकार करणे आणि ऋग्वेदाची अगणित पारायणे करणे

त्यांनी ऋग्वेदाचे १ सहस्रहून अधिक स्वाहाकार केले आहेत. त्यांनी ऋग्वेदाची अगणित पारायणे केली आहेत. भारतातील अनेक ठिकाणाहून दशग्रंथ पारायण आणि ऋग्वेद स्वाहाकार यांसाठी त्यांना आवर्जून बोलावले जात असे. एक ऋषीतुल्य व्यक्तीमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. धायरी येथील संतसहवास पाठशाळा, पुणे वेदपाठशाळा, निगमागम वेदशास्त्र विद्यालय (समर्थ गुरुकुल) अशा अनेक वेदपाठशाळांमध्ये त्यांनी ऋग्वेदाचे स्वाहाकार केले आहेत.

प्रत्येक वर्षी स्वाहाकारामध्ये त्यांच्याकडे ब्रह्मापद असे. ब्रह्मापदाची दायित्व घेणार्‍या व्यक्तींना वेदांचे पूर्ण ज्ञान असावे लागते. त्याच व्यक्ती हे पद सांभाळू शकतात. सकाळी हवन चालू झाल्यापासून ते संपेपर्यंत त्या व्यक्तीने उठायचेही नसते. गुरुजी ते दायित्व आनंदाने पेलायचे.

३ ओ. शास्त्रशुद्ध कृती होण्याकडे कटाक्षाने लक्ष देणे

हवन करतांना काही वेळा हवनातील ज्वाळा येणे थांबल्यास ते ज्वाळा प्रज्वलित झाल्यानंतर आहुती द्यायला आरंभ करायचे. ‘उपस्थान’ या ठिकाणी उभे राहूनच प्रार्थना म्हणायची’, असा त्यांचा कटाक्ष होता. त्यांनी कधीच नियमांचे उल्लंघन केले नाही.

त्यांनी द्रव्याकडे बघून कधीच कुठले आमंत्रण स्वीकारले नाही. जी दक्षिणा मिळे, ती ते ईश्‍वरेच्छा म्हणून स्वीकारत. ते प्रत्येक विधी आस्थेने आणि परिपूर्ण करत.

३ औ. विद्यार्थ्यांच्या आध्यात्मिक प्रगतीची तळमळ

त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले आहेत आणि अनेक पाठशाळांतून विद्यार्थ्यांचे परीक्षण करण्यासाठी त्यांना बोलावले जात असे. ‘शिकायला येणार्‍या विद्यार्थ्यांची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, यासाठी त्यांनी प्रतिदिन वेदपठण (नित्य स्वाध्याय) करायला पाहिजे’, असा त्यांचा नेहमी आग्रह असायचा.

३ अं. समष्टी कार्याची तळमळ

९.६.२००७ या दिवशी पुणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेचे गुरुजींना निमंत्रण दिले. तेव्हा ते उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘‘मी सभेला येणारच आहे. आपण सर्वानी मिळून हे कार्य करायचे आहे.’’ त्यांनी सभेच्या प्रारंभी आणि शेवटी वेदमंत्रपठण करण्याची सेवाही आनंदाने केली.

३ क. सनातन प्रभात वाचून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटण्याची उत्सुकता निर्माण होणे आणि त्यांना भेटण्यासाठी दोन वेळा रामनाथी आश्रमात येणे

गुरुजी नियमितपणे साप्ताहिक सनातन प्रभात वाचतात. सनातन प्रभात वाचून त्यांच्यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटण्याची उत्सुकता निर्माण झाली. ते त्यांना भेटण्यासाठी या वयातही पुण्याहून गोवा येथे गेले. त्यांनी रामनाथी आश्रमाला दोन वेळा (वर्ष २००७ आणि वर्ष २०१४ मध्ये) भेट दिली.

४. गुरुजींच्या मृत्यूपूर्वी जाणवलेली सूत्रे

४ अ. मृत्यूपूर्वी १५ दिवस त्यांनी अन्न आणि पाणी यांचा त्याग केला होता.

४ आ. विद्यार्थ्यांच्या संहितावाचनाकडे लक्ष असणे

पारखी गुरुजींच्या पाठशाळेतील विद्यार्थी संहिता म्हणून दाखवायला यायचे. गुरुजींचे निधन होण्याच्या पूर्वी एक दिवस संहितावाचन चालू असतांना त्यातील एक शब्द चुकल्याचे गुरुजींनी त्या विद्यार्थ्याच्या लक्षात आणून दिले.

५. गुरुजींच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

५ अ. धायरी येथील ‘संतसहवास पाठशाळे’त स्वाहाकाराच्या शेवटच्या दिवशी पाऊस पडल्याने मांडवाची दुर्दशा होणे, ‘पाऊस पडल्यास काय होईल ?’, याची आयोजकांना काळजी वाटणे, गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी पाऊस न पडणे आणि कार्यक्रम नियोजनाप्रमाणे पार पडणे

धायरी येथील ‘संतसहवास पाठशाळे’त प्रतिवर्षी पाठशाळेच्या वर्धापनदिनानिमित्त संहिता स्वाहाकार असायचा. असे ६ – ७ वर्षे स्वाहाकार झाले. त्या स्वाहाकाराच्या मुख्य ब्रह्मापदाचे दायित्व गुरुजींकडे असायचे.

वर्ष २००७ मध्ये स्वाहाकाराच्या शेवटच्या दिवशी पूर्णाहुती झाल्यानंतर सायंकाळी बर्‍याच जणांना प्रसादासाठी बोलावले होते आणि प्रवचनाचा कार्यक्रमही होता. त्याच्या आदल्या दिवशी पाऊस पडल्याने मांडवाची दुर्दशा झाली. तेव्हा ‘संतसहवास पाठशाळे’चे संचालक श्री. आणि सौ. वझे यांना ‘काय करावे ?’, ते समजेना. त्यांनी गुरुजींना प्रार्थना केली आणि विचारले, ‘‘असा पाऊस पडल्यास उद्याचा कार्यक्रम कसा होणार ?’’ तेव्हा गुरुजींनी त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही निश्‍चिंत रहा. उद्या पाऊस पडणार नाही.’’ खरोखरच त्या दिवशी पाऊस पडला नाही. कार्यक्रम नियोजनाप्रमाणे पार पडला.

५ आ. गुरुजींनी पर्जन्यसूक्त म्हटल्यावर पाऊस पडणे

‘संतसहवास पाठशाळे’च्या सौ. शुभदा वझे यांनी सांगितले, ‘‘गुरुजींचा आम्हाला आधार वाटायचा. गुरुजी ज्या वेळी पर्जन्यसूक्त म्हणायचे, तेव्हा नेहमी पाऊस पडायचा. इतर ठिकाणी पाऊस नसला, तरी पाठशाळेच्या परिसरात नेहमी पाऊस पडायचा.’’ एवढे त्यांच्या मंत्रपठणात सामर्थ्य होते.

प.पू. गुरुमाऊलींनी गुरुजींविषयीची सूत्रे लक्षात आणून दिली आणि ती लिहून घेतली, यासाठी त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’

– सौ. विजया मिलिंद भिडे, पुणे (१७.१.२०१८)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी कोतवडेकर गुरुजी यांनी काढलेले गौरवोद्गार !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले समर्थ रामदासस्वामी यांच्याप्रमाणे कार्य करत आहेत !’

– वेदमूर्ती गणेश कृष्णाजी जोशी कोतवडेकर गुरुजी, पुणे (२७.६.२००७)

वेदांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेणारे कोतवडेकर गुरुजी !

‘वयाच्या नव्वदीतही गुरुजींना वेदांचा प्रचार आणि प्रसार करण्याची तळमळ होती. ते सतत अध्ययन करत असत. वेदांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर प्रवास केला होता. अनेक मान-सन्मान मिळवूनही त्यांना वृथा अभिमान नव्हता. मित आहार आणि स्वावलंबन हे त्यांचे वैशिष्ट्य होते. अशा माझ्या दादांचा, त्यांच्या बंधूप्रेमाचा मला अभिमान वाटतो.’

– श्री. द.कृ. जोशी (वेदमूर्ती कोतवडेकर गुरुजी यांचे धाकटे बंधू), पुणे

 

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment