परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याला नाथ संप्रदायाचे साहाय्य !

Article also available in :

अनुक्रमणिका

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य जणू अवतारीच आहे. असे म्हणतात की, अवताराने कार्यासाठी जन्म घेतला की, त्याच्या त्या कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी त्याचे देवतागणही जन्म घेतात. याचीच प्रचीती परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या अवतारी कार्यामध्ये साधकांना येत आहे. त्यांना विविध ईश्वरी स्त्रोतांकडून या कार्यात आपणहून साहाय्य लाभत आहे. त्यांतीलच एक आहे नाथ संप्रदाय. वर्ष १९९७ पासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याला नाथ संप्रदाय साहाय्य करत असल्याची अनुभूती बरेच साधक घेत आहेत. या संप्रदायाने आतापर्यंत कसे साहाय्य केले आहे, याची माहिती या लेखात दिली आहे.’

– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था

 

१. वर्ष १९९७ मध्ये एका नाथ सांप्रदायिक
गुरूंनी त्यांच्या शिष्यांना आदेश झाल्यानंतर
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्यात सहभागी होण्यास सांगणे

‘ऑक्टोबर १९९७ मध्ये सांगली जिल्ह्यातील मिरजवळील मालगावचे एक रुग्ण माझ्याकडे आले होते. ते म्हणाले, ‘‘मी एस्.टी. बसमध्ये बसल्यापासून मला लहरी ओढत होत्या; म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. तुमचे ‘गुरुकृपायोग’ हे पुस्तक मला हवे आहे.’’ त्या वेळी मला त्यांचे म्हणणे व्यवस्थित कळले नाही आणि त्यानंतर ते पुन्हा आले नाहीत. फेब्रुवारी १९९८ मधे ते पत्ता शोधत सनातनच्या साधिका कु. शशिकला आचार्य यांच्याकडे आले. कु. शशिकला यांना त्यांनी विचारले, ‘‘डॉ. आठवले यांचे प्रवचन या भागात केव्हा आहे ?’’ त्या वेळी प्रवचनांचे दिनांक नक्की व्हायचे होते. त्यामुळे कु. शशिकला यांनी ‘फेब्रुवारीच्या शेवटी अथवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात असेल’, असे त्यांना सांगितले. दोन दिवसांनी ते पुन्हा आले आणि म्हणाले, ‘‘तुमचे काहीतरी चुकते आहे. आमचे गुरु आम्हाला ध्यानातून सांगताहेत की, पुढील महिन्यात सर्वांत मोठा दिवस आहे. त्या दिवशी डॉ. आठवले येणार आहेत. डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे मोठे कार्य करायचे आहे. त्यांचा आदेश झाला की, आम्ही कार्यात येणार.’’ ते नाथपंथी होते. नंतर २२ मार्च हा दिनांक कोल्हापूरच्या सभेसाठी ठरला. २२ मार्च या दिवसापासून दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते.’

– पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, मिरज, जिल्हा सांगली.

(टीप : १९९८ मध्ये सनातनचे साधक असलेले पू. डॉ. चारुदत्त पिंगळे हे वर्ष २०१२ मध्ये सनातन संस्थेचे २२ वे संत झाले. सध्या ते हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक आहेत.)

१ अ. वर्ष २००८ मधील सांगली येथील हिंदु धर्मजागृती सभेच्या वेळी नाथपंथीय साधूंनी
‘भविष्यात आम्ही तुमच्या कार्यात सहभागी होणार आहोत’, असे सांगितलेले खरे ठरणे

१ अ १. दोन नाथपंथीय नागा साधूंनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेणे आणि त्यानंतर धर्मजागृती सभेसाठी पटांगण उपलब्ध करून देणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगणे

‘१०.२.२००८ या दिवशी सांगली येथील ‘तरुण भारत स्टेडियम’वर ‘सनातन संस्थे’ने ‘जाहीर हिंदु धर्मजागृती सभा’ आयोजित केली होती. ६.२.२००८ या रात्री मिरज येथील तहसिलदार सौ. वैशाली चव्हाण यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने २० वर्षांपासून थकित असलेल्या ५० लाख रुपये रकमेच्या वसुलीसाठी ‘तरुण भारत स्टेडियम’ला ताळे ठोकले (सील केले) होते. त्यामुळे दुसर्‍या दिवशी दुपारी ४ वाजता आम्ही सनातनचे साधक जिल्हाधिकार्‍यांना भेटण्यासाठी गेलो. त्याच वेळी दोन नागा साधू जिल्हाधिकार्‍यांना भेटायला आले होते. ते वेशभूषेवरून नाथपंथीय वाटत होते. ते भेटल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी त्यांना आदराने नमस्कार केला. ते साधू भेटून गेल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांना भेटण्यासाठी साधक आत गेले. तेव्हा जिल्हाधिकारीच म्हणाले, ‘‘तुमचा कार्यक्रम पूर्वनियोजित असल्याने वसुली झाली नाही, तरीही तुम्हाला स्टेडियममधील पटांगणाचा मार्ग मोकळा करून देणार आहोत. काही काळजी करू नका.’’

१ अ २. ११ वर्षानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकाला ‘नाथपंथीय साधूंनी भविष्यात आम्ही तुमच्या कार्यात सहभागी होणार आहोत’, असे सांगितल्याची आठवण करून देणे

वर्ष १९९७ मध्ये महाराष्ट्रातील तीन वेगवेगळ्या ठिकाणच्या सत्संगांत वेगवेगळ्या नाथपंथियांनी सांगितले होते, ‘भविष्यात आम्ही तुमच्या कार्यात सहभागी होणार आहोत.’ तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले मला म्हणाले, ‘‘एकच सूत्र तीन वेगवेगळ्या जणांनी सांगणे, ही आध्यात्मिक अनुभूती आहे.’’

पुढे मी ती अनुभूती विसरलो; मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातील हा प्रसंग २००८ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितला, तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्हाला आणि अकोला येथील साधक श्री. श्रीकांत भट यांना काही वर्षांपूर्वी काही नाथपंथीय साधूंनी सांगितले होते ना की, आम्ही तुमच्या कार्यात सहभागी होणार आहोत. त्याचीच ही अनुभूती नाही का ?’’

– (पू.) डॉ. चारुदत्त पिंगळे, सनातन आश्रम, मिरज, जिल्हा सांगली. (२००८)

 

२. श्री हालसिद्धनाथ यांनी ‘रामनाथी (गोवा) येथील
सनातनचा आश्रम हे नाथांचेच स्थान आहे’, असे सांगणे
आणि त्या आश्रमात भाकणूक करून सनातनला आशीर्वाद देणे

श्री हालसिद्धनाथ यांना नवनाथांपैकी गहिणीनाथ किंवा रेवणनाथ यांचा अवतार समजले जाते. कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यात श्री क्षेत्र आप्पाची वाडी आणि कुर्ली येथे श्री हालसिद्धनाथांचे अत्यंत जागृत आणि पवित्र स्थान आहे. तेथील श्री हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ‘भाकणूक’ ! भाकणूक म्हणजे आगामी काळात घडणार्‍या गोष्टी किंवा घटना गेय स्वरूपात सांगणे. सध्या या मंदिरात आप्पाची वाडी येथील श्री भगवान आप्पाजी डोणे (पुजारी) महाराज यांच्या माध्यमातून भाकणूक सांगण्यात येते. त्यांना सनातनच्या साधकांनी ‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात भाकणूक करणार का ?’, असे विचारल्यानंतर त्यांनी सांगितले, ‘‘रामनाथी आश्रम हे नाथांचेच स्थान असल्याने तेथे भाकणूक करायला देवाने मला अनुमती दिली आहे.’’ खरेतर त्यांनी आतापर्यंत ‘आप्पाची वाडी’ हे स्थान सोडून इतर कुठेही भाकणूक केली नव्हती. श्री हालसिद्धनाथांनी त्यांना रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात भाकणूक करण्याची अनुमती देऊन एकप्रकारे सनातनला आशीर्वादच दिला.

२ अ. १६.७.२०१२ या दिवशी रामनाथी आश्रमात झालेल्या भाकणुकीमध्ये
श्री हालसिद्धनाथ यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना आणि त्यांच्या कार्याला दिलेले आशीर्वाद !

१. सनातनच्या डॉक्टरांना (सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना) माझा आशीर्वाद आहे.

२. सनातनच्या साधकांना माझा आशीर्वाद आहे. मी सनातनच्या कार्यकर्त्यांच्या (साधकांच्या) हातात भगवा झेंडा (धर्मध्वज) देऊन हिंदु धर्माचे जागरण करून धर्माची स्थापना करीन.

३. सनातनच्या आश्रमात (साधकांची) भेट घ्यायला आलो आहे. येथील इडा-पिडा दूर करीन. या जागेत रिद्धि-सिद्धि नांदवीन. गोरगरिबांचे कल्याण करीन.

४. ही (रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रम) धर्माची गादी आहे. धर्माच्या गादीला रामराम करावा.

२ आ. श्री हालसिद्धनाथ यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

श्री भगवान डोणे महाराज यांच्या माध्यमातून श्री हालसिद्धनाथ यांनी भाकणूक सांगतांना ‘मी येथे (सनातनच्या आश्रमात) एक दिवसाच्या विसाव्याला आलो आहे’, असे सांगितले. याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्री हालसिद्धनाथ देवाला विचारले, ‘‘देव एक दिवसाच्या विसाव्यासाठी आला आहे म्हणजे काय ?’’ तेव्हा श्री हालसिद्धनाथ यांनी सांगितले, ‘‘विसावा म्हणजे तुम्ही (परात्पर गुरु डॉ. आठवले) देवाला जवळचे वाटता; म्हणून हक्काने देव तुमच्याकडे विसाव्याला आला आहे.’’ त्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्री देव हालसिद्धनाथ यांना विचारले, ‘‘तुम्ही (देव) आम्हाला हक्काचे आहात ना ?’’ तेव्हा श्री हालसिद्धनाथ यांनी ‘‘हो, तुम्ही माझ्याकडे कधीही येऊ शकता’’, असे सांगितले.

२ इ. श्री हालसिद्धनाथ यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले करत
असलेल्या हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्याविषयी केलेली भाकिते !

१. वर्ष २०२२ मध्ये (हिंदुत्ववाद्यांच्या) युतीचे शासन येईल !

२. (मी) देशात भगवा फडकवणार ! (हिंदु राष्ट्र येणार !)

 

३. नाथ संप्रदायाचे प.पू. अण्णा (वसंत) कर्वे यांनी
कठीण काळातून तरून जाण्यासाठी सांगितलेले उपाय

वर्ष २०११ पासून सनातनच्या संत पू. (सौ.) अंजली गाडगीळ या भारतभर भ्रमण करून ठिकठिकाणचे संत आणि अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती यांना सनातनच्या कार्याशी जोडत आहेत. या भ्रमंतीमध्येच वर्ष २०१२ मध्ये त्यांची पुण्याचे नाथ संप्रदायातील अधिकारी व्यक्ती प.पू. अण्णा (वसंत) कर्वे यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर सनातनवर जेव्हा केव्हा बंदीचे संकट आले, विनाकारण आरोप झाले किंवा साधकांना करणीसारखे त्रास झाले, त्या प्रत्येक वेळी प.पू. अण्णा कर्वे यांना त्याविषयी सांगितल्यानंतर ते लगेच पुण्याजवळील पर्वतावर असणार्‍या श्री कानिफनाथांच्या स्थानी जाऊन उपासना करायचे, श्री कानिफनाथांना तळमळीने प्रार्थना करायचे, तसेच तेथील प्रसाद पाठवायचे. २२.१०.२०१५ या दिवशी नव्वदाव्या वर्षी देहत्याग करेपर्यंत त्यांनी अशा प्रकारे सनातनला साहाय्य केले आणि सनातनलाही प्रत्येक वेळी संकटांचे निवारण झाल्याची प्रचीती आली. ९० व्या वर्षीही ते सनातनसाठी परिश्रम घेत होते.

 

४. नाथ संप्रदायातील थोर साधूंनी दिलेले आशीर्वाद

४ अ. ‘हिमालयवासी नाथपंथीय प.पू. बृहस्पतीनाथजी यांनी ‘आम्ही तुमच्या प्रत्येक कार्यात आहोत’, असे पुणे येथील प.पू. गणेशनाथजी यांच्या माध्यमातून कळवले आहे.’ – (पू.) सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (२०.६.२०१४)

४ आ. नाथ संप्रदायाचे पू. प्रा. अशोकराव नेवासकर यांना त्यांच्या गुरूंनी सनातनच्या आश्रमामध्ये जाण्याचा सूक्ष्मातून आदेश दिल्यावर ते आश्रमभेटीसाठी येणे 

‘नगर (महाराष्ट्र) येथील नाथ संप्रदायाचे गाढे अभ्यासक आणि ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित पू. प्रा. अशोकराव नेवासकर (वय ७२ वर्षे) यांना त्यांचे गुरु प.पू. सद्गुरु देवेंद्रनाथ महाराज यांनी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमामध्ये जाण्याचा सूक्ष्मातून आदेश दिला होता. त्यानुसार ते आश्रमभेटीसाठी आले.’ (दैनिक सनातन प्रभात, १२.३.२०१५)

 

५. महर्षींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे रक्षण नवनाथ करत असल्याचे सांगणे

‘परम गुरुजींच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) रक्षणार्थ त्यांच्या जवळपास नवनाथ सदैव सिद्ध असतात. मागच्या जन्मी तुमचे गुरु गोरक्षनाथ होते; म्हणून नवनाथ तुमच्या रक्षणासाठी येथे आले आहेत.’ (सप्तर्षि जीवनाडीपट्टीत महर्षींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी सांगितलेले सूत्र) – (पू.) सौ. अंजली गाडगीळ (२१.४.२०१६)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याला विविध संतांनी केलेले साहाय्य’

Leave a Comment