समाजातील संतांना सनातन संस्था ‘आपली’ वाटते

अनुक्रमणिका

१. सनातनचे साधक आणि संत यांच्यातील अत्यल्प अहं,
शिकण्याची वृत्ती अन् प्रेमभाव यांमुळे समाजातील संतांना ते ‘आपले’ वाटणे

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘वर्ष १९९६ ते वर्ष २००५ पर्यंतच्या काळात मी सर्वत्र फिरून विविध संतांच्या भेटीगाठी घेत असे. मी अध्यात्माच्या विविध अंगांची माहिती मिळवण्यासाठी संतांना जिज्ञासेपोटी नम्रतेने भेटायचो आणि प्रश्न विचारायचो. मी त्यांच्याशी घरच्यांप्रमाणे वागायचो-बोलायचो. त्यामुळे माझी बर्‍याच संतांशी जवळीक झाली.

आता सनातनच्या साधकांची आणि संतांचीही समाजातील संतांशी जवळीक होते. याचे कारण म्हणजे, काही संप्रदायांचे साधक आणि संत यांच्याप्रमाणे सनातनचे साधक अन् संत यांच्यात अहंभाव नसल्याने, तसेच त्यांच्यात शिकण्याची वृत्ती आणि प्रेमभाव असल्याने ते संतांशी ज्या प्रकारे वागतात, त्यामुळे समाजातील संतांना ते ‘आपले’ वाटतात. अशा संतांपैकी बहुतांशी संत सनातनच्या कार्याशी जोडले जात आहेत आणि स्वतःहून सनातनच्या कार्याला साहाय्यही करत आहेत.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सद्यःस्थितीत अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी धर्मसंस्थापना आणि आध्यात्मिक दृष्टीकोनातून हिंदु राष्ट्राची स्थापना यांची आवश्यकता सांगून त्यासाठी अहर्निष कार्यरत असणारी विभूती म्हणजे, सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले ! संत म्हणजे साक्षात् धर्माचे आधार आणि रक्षक होत. धर्मसंस्थापना आणि हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी सकल संतांचे पाठबळ आवश्यक आहे, हे जाणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९९६ पासूनच या कार्यासाठी संतांना संघटित करण्यास आरंभ केला होता. परात्पर गुरु डॉक्टरांमधील संतांप्रतीचा भाव, शिकण्याची वृत्ती, नम्रता, प्रेमभाव इत्यादी गुणांमुळे त्यांची अनेक संतांशी जवळीक झाली आणि ते संत सनातन संस्थेच्या कार्याशी जोडले गेले.

पू. संदीप आळशी

पुढे परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करणारे सनातनचे अनेक संत अन् साधक घडले. ‘आपणासारिखे करिती तात्काळ । नाहीं काळवेळ तया लागी ।।’, असा गुरुमहिमा आहे. परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा आणि शिकवण यांमुळे त्यांच्यासारखेच गुण सनातनचे संत आणि साधक यांच्यातही निर्माण झाले आहेत. या गुणांमुळे आता त्यांचेही समाजातील संतांशी आपुलकीचे नातेबंध निर्माण होत आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांनी शिकवलेली योग्य साधना केल्यामुळे साधकांमध्ये निर्माण झालेले साधकत्व पाहून समाजातील संत प्रभावित होतात.

संकलक : पू. संदीप आळशी (सनातनच्या ग्रंथांचे संकलक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार
साधना केल्यामुळे सनातनच्या साधकांमध्ये साधकत्व निर्माण
झाल्याने समाजातील संतांना सनातन संस्थेविषयी आपुलकी वाटणे, याची उदाहरणे

२ अ. ‘श्रीसंस्थान हळदीपूर’चे मठाधिपती प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामीजी

प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामीजी
१. स्वामीजींच्या सेवेत साधकांकडून चूक झाल्याचे साधकांना कळल्यावर साधकांनी स्वामीजींची क्षमायाचना करणे आणि यावर स्वामीजी साधकांवर प्रसन्न होणे

‘मागे एकदा ‘श्रीसंस्थान हळदीपूर’चे मठाधिपती प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामीजी यांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. त्या वेळी आश्रमाचे व्यवस्थापन, साधक राबवत असलेली ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’, तसेच आश्रमातून होणारे धर्मप्रचाराचे समष्टी कार्य, हे सर्व त्यांना पुष्कळ आवडले. त्या वेळी स्वामीजींच्या समवेत आलेल्या त्यांच्या काही भक्तांनी साधकांकडून संतसेवेत झालेली एक चूक सांगितली. त्यावर साधकांनी त्वरित स्वामीजींची क्षमायाचना केली. साधकांमधील साधकत्व बघून स्वामीजी प्रसन्न झाले आणि त्यांच्या भक्तांना म्हणाले, ‘‘हे शिकणे महत्त्वाचे आहे. अन्य कुठेही असे आचरण करण्यास शिकवत नाहीत.’’

कर्नाटक राज्यातील प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामीजी (उजवीकडे) यांच्याशी संवाद साधतांना परात्पर गुरु डॉ. आठवले
२. स्वामीजींनी त्यांच्या भक्तांना सनातनच्या आश्रमात ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’ शिकण्यासाठी शिबिराला पाठवणे

स्वामीजींनी ‘आमचे काही भक्त रामनाथी आश्रमात राहून ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’ शिकू शकतात का ?’, असे साधकांना विनयपूर्वक विचारले. पुढे काही मासांनी यासंबंधी रामनाथी आश्रमात एका शिबिराचे आयोजन झाले. तेव्हा स्वामीजींनी त्यांच्या शिष्यांना या शिबिरात सहभागी होण्यासाठी पाठवले.’

 

२ आ. ‘भारत सेवाश्रम संघ (देहली)’चे प्रमुख व्यवस्थापक स्वामी आत्मज्ञानानंद महाराज

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

१. साधकांचा सेवाभाव आणि नम्रता यांमुळे स्वामी आत्मज्ञानानंद महाराज प्रभावित होणे

‘देहली येथील ‘उत्तर भारत हिंदू अधिवेशना’साठी साधकांनी ‘भारत सेवाश्रम संघा’चे सभागृह निश्चित केले होते. त्यामुळे देहलीतील साधक श्री. संजीव कुमार आणि कु. कृतिका खत्री हे ‘भारत सेवाश्रम संघा’चे प्रमुख व्यवस्थापक स्वामी आत्मज्ञानानंद महाराज यांच्या संपर्कात होते. महाराजांना अधूनमधून भेटून त्यांचे आशीर्वाद घेणे, त्यांना सनातन पंचांग देणे इत्यादींच्या निमित्ताने महाराजांशी संपर्क होत होता. पुढे ‘भारत सेवाश्रम संघा’त अधिवेशनाचे आयोजन चालू झाले. त्या वेळी तेथे सेवेसाठी येणार्‍या साधकांचा सेवाभाव, नम्रतापूर्वक वागणे-बोलणे, साधकांच्या वागण्यात असलेली सहजता आणि शांततेने चालू असलेल्या सेवा, यांमुळे स्वामीजी पुष्कळ प्रभावित झाले.

२. महाराजांनी सनातन संस्थेला केलेले साहाय्य

साधकांचे आचरण पाहिल्यावर महाराजांनी तेथील व्यवस्थापनाला सनातन संस्थेसाठी आरक्षित केलेल्या कक्षांपेक्षा अतिरिक्त कक्ष उपलब्ध करून द्यायला सांगितले.

३. महाराजांनी साधकांच्या गुणांचा केलेला सन्मान

अ. महाराजांनी त्यांच्या आश्रमातील काही संन्याशांना सनातनच्या साधकांकडून साधनेच्या अनुषंगाने शिकण्यास सांगितले.

आ. महाराज सनातनच्या साधकांना म्हणाले, ‘‘स्वामी प्रणवानंद यांचे (‘भारत सेवाश्रम संघा’चे संस्थापक-संत यांचे) खरे कार्य तुम्हीच करत आहात.’’

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती.

 

२ इ. भादरा (राजस्थान) येथील प.पू. त्र्यंबकेश्वर चैतन्य महाराज आणि प.पू. गुणप्रकाशजी महाराज

प.पू. त्र्यंबकेश्वर चैतन्य महाराज

१. सनातनच्या साधिका कु. पूनम चौधरी आणि अन्य साधक
यांचा सेवाभाव आणि सात्त्विक आचार यांमुळे त्यांनी महाराजांचे मन जिंकणे

भादरा (राजस्थान) येथील प.पू. त्र्यंबकेश्वर चैतन्य महाराज आणि प.पू. गुणप्रकाशजी महाराज यांचा सनातन संस्थेशी परिचय झाला. सनातनच्या साधिका कु. पूनम चौधरी आणि अन्य साधक यांचा सेवाभाव, सात्त्विक आचार-विचार पाहून दोन्ही महाराज प्रभावित झाले. ‘असे साधक घडवणारे गुरु आणि त्यांची ‘सनातन संस्था’ किती थोर आहे !’, असे त्यांनी अनेकदा बोलूनही दाखवले.

२. प.पू. गुणप्रकाशजी महाराज यांनी सनातनच्या साधकांवर टाकलेला विश्वास !

प.पू. गुणप्रकाशजी महाराज

प.पू. गुणप्रकाशजी महाराज माघ मेळा किंवा अन्य मोठा कार्यक्रम यांप्रसंगी तेथील व्यवस्था पहाण्यासाठी सनातनच्या साधकांना आवर्जून बोलावतात. उज्जैन कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या सेवेसाठी कु. पूनम चौधरी त्यांच्याकडे सेवेसाठी गेल्या होत्या. कु. पूनम यांचा सेवाभाव पाहून महाराजांनी त्यांच्या भांडारगृहाच्या चाव्यासुद्धा पूनम यांच्याकडे दिल्या.

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती.

सनातनच्या संतांना प्रार्थना आणि साधकांना सूचना !

धर्मप्रचाराची सेवा करणारे सनातनचे संत आणि साधक समाजातील विविध संतांच्या दर्शनासाठी किंवा त्यांच्या कार्यक्रमांसाठी जात असतात. अशांना समाजातील संतांविषयी वरील अनुभवांपेक्षा निराळ्या प्रकारचे अनुभव आले असल्यास त्यांनी ते रामनाथी आश्रमात [email protected] या संगणकीय पत्त्यावर पाठवावे.

पोस्टाचा पत्ता : सनातन आश्रम, २४ / बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. ४०३४०१
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment