परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याला विविध संतांनी केलेले साहाय्य

Article also available in :

अनुक्रमणिका

सनातन धर्माच्या पुनरुत्थानासाठी आणि त्याची अवघ्या विश्वात प्रस्थापना करण्यासाठी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आरंभलेले कार्य वेगाने सातासमुद्रापार पसरू लागले आहे. या कार्यात ईश्वरी कृपेने अनेक संतांनी बहुमोल वाटा उचलला किंवा त्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, यासाठी हा लेख आहे.

 

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना गुरुप्राप्तीपूर्वी आणि
गुरुप्राप्तीनंतर काही वर्षे अध्यात्म अन् साधना शिकवणारे विविध संत

१ अ. पू. नाना दाते, मालाड, मुंबई

‘वर्ष १९८४ मध्ये अध्यात्माविषयी जिज्ञासा निर्माण झाल्यावर मला वर्षभर पू. नाना दाते यांनी अध्यात्मातील तात्त्विक आणि विशेषतः प्रायोगिक भागाची माहिती शिकवली.

१ आ. श्री मलंगशहाबाबा, मुंबई

वर्ष १९८५ मध्ये श्री मलंगशहाबाबा यांनी भूत, करणी, पूर्वजांचे सूक्ष्मदेह इत्यादी त्रासदायक शक्तींच्या संदर्भात प्रायोगिक भाग शिकवला.
(श्री मलंगशहाबाबा यांच्या अध्यात्मातील अलौकिक कार्याची समाजाला ओळख व्हावी आणि त्यांच्या भक्तांची श्रद्धा वाढावी, यासाठी त्यांचे चरित्र त्या वेळी मी संकलित केले होते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले)

१ इ. स्वामी विद्यानंद, अघोरी संप्रदाय, मुंबई

वर्ष १९८६ आणि १९८७ मध्ये स्वामी विद्यानंद यांनी माझ्या घरी येऊन ‘अध्यात्म हा विषय शास्त्रीय दृष्टीकोनातून कसा मांडायचा’, ते शिकवले.

१ ई. प.पू. अण्णा करंदीकर, डहाणू, ठाणे

वर्ष १९८७ मध्ये प.पू. अण्णा करंदीकर यांनी अध्यात्माचा तात्त्विक आणि प्रायोगिक भाग शिकवला. ‘अध्यात्मात प्रत्येक गोष्ट स्वतः अनुभवली पाहिजे’, असे ते सांगायचे. त्यांनीच मला प.पू. भक्तराज महाराजांच्या चरणी आणले.

१ उ. प.पू. काणे महाराज, नारायणगाव, पुणे

वर्ष १९८९ ते १९९३ मध्ये प.पू. काणे महाराज यांनी अध्यात्माची बरीच तात्त्विक माहिती दिली, ती सनातनच्या ग्रंथांत दिली आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले

 

२. गुरूंच्या देहत्यागानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले
यांना विविध संतांनी केलेले अध्यात्माविषयी मार्गदर्शन आणि साहाय्य !

२ अ. प.पू. रामानंद महाराज (प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी), इंदूर, मध्यप्रदेश

‘प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज (इंदूर, मध्यप्रदेश) हे मला गुरुस्थानीच होते. बर्‍याचदा त्यांचे माझ्याशी होणारे सहज बोलणेही आशीर्वादात्मक आणि मला शिकवणारे असायचे. प.पू. रामानंद महाराज पूर्वी संघाचे स्वयंसेवक असल्याने त्यांचे मला राष्ट्र आणि धर्म कार्याविषयीही मार्गदर्शन मिळायचे. याचे एक उदाहरण पुढे दिले आहे.

२ अ १. प.पू. रामानंद महाराज यांनी व्यष्टी त्रासांकडे साक्षीभावाने आणि समष्टीतील कार्याकडे ‘दिसेल ते कर्तव्य’ या दृष्टीने पहाण्यास सांगणे

‘२७.१०.२०११ या दिवशी प.पू. रामानंद महाराज यांच्याशी बोलतांना मी म्हणालो, ‘‘आता मी पुष्कळ थकलो आहे. बाबांच्या (प.पू. भक्तराज महाराज यांच्या) चरणी जाण्याची ओढ लागली आहे.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘मलाही पुष्कळ त्रास आहेत, थकवा आहे; पण त्यांच्याकडे आपण साक्षीभावाने पहायचे.’’ त्यावर मी म्हणालो, ‘‘त्रासांकडे साक्षीभावाने पहायचे तसे आता राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याकडेही पाहीन.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘तुमचे अद्याप बरेच कार्य शेष आहे. आता जायचा विचार करायचा नाही.’’ त्यातून मला शिकायला मिळाले की, व्यष्टी त्रासांकडे साक्षीभावाने आणि समष्टीतील कार्याकडे ‘दिसेल ते कर्तव्य’ या दृष्टीने पहाणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२८.१०.२०११)

२ आ. प.पू. गगनगिरी महाराज, खोपोली, जिल्हा रायगड

‘प.पू. गगनगिरी महाराज यांचे माझ्यावर, तसेच सनातनच्या साधकांवर पुष्कळ प्रेम होते. ४.२.२००८ या दिवशी त्यांनी देहत्याग केला. आम्हाला होणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणासाठी ते नेहमी उपाय सांगायचे. राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील समष्टी कार्याच्या दृष्टीने ‘अतिरेक्यांपासून रक्षण करण्यासाठी किनारपट्टीतील कार्य वाढवा’, अशासारख्या सूचना ते करायचे. ‘कार्यासाठी आवश्यक असणारे आध्यात्मिक बळ माझे शिष्य पुरवतील’, असेही ते नेहमी सांगायचे. त्याची आज प्रचीती येत आहे. प.पू. आबानंद महाराज, प.पू. उल्हासगिरी महाराज इत्यादी प.पू. गगनगिरी महाराज यांचे अनेक शिष्य सनातन संस्थेला साहाय्य करत आहेत.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले

२ आ १. वर्ष २००१ मध्ये प.पू. गगनगिरी महाराज यांनी त्यांच्या कोल्हापूर येथील भक्तांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी चालू केलेल्या सनातन संस्थेच्या सत्संगात जाण्याविषयी सांगणे

कोल्हापूर येथील भक्तांना मार्गदर्शन करतांना प.पू. गगनगिरी महाराज म्हणाले, ‘‘प.पू. डॉ. आठवले यांनी चालू केलेले सनातन संस्थेचे सत्संग सर्वत्र चालतात. तेथे तुम्ही जायला पाहिजे. मी तुम्हाला (भक्तांना) येथे भेटलो तरी थोडा वेळ. तेव्हा एवढ्या अल्प वेळेत सर्व मार्गदर्शन करणे शक्य नाही. सत्संगात तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल ! तेथे जाऊन पायरी पायरीने अध्यात्म शिकले पाहिजे. सनातनच्या सत्संगात ‘आपली संस्कृती काय आहे’, हे शिकवले जाते. त्यातून धर्म समजतो. आपण धर्माचे रक्षण केले, तर धर्म आपले रक्षण करील ! येथे प्रत्येक जण पैसा खर्च करून येतो, म्हणून येथून एक-एक चांगला गुण घेऊन जायला पाहिजे. ‘तो गुण कसा घ्यायचा’, हे समजण्यासाठी सनातन संस्थेचे सत्संग चालतात तेथे जायला पाहिजे ! सनातन संस्थेच्या सत्संगात शिकण्यासाठी पैसा खर्च करावा लागत नाही आणि येथेही गुण घेण्यासाठी पैसा खर्च करावा लागत नाही. मात्र आधी तेथे शिकून या !’’ (वर्ष २००१)

२ इ. प.पू. दादा महाराज झुरळे, डोंबिवली, जिल्हा ठाणे

‘१९८३ या वर्षी अध्यात्माबद्दल जिज्ञासा निर्माण झाल्यानंतर मी अनेक संतांकडे ‘अध्यात्म’ हा विषय समजून घेण्यासाठी जात असे. त्यांतील एक म्हणजे प.पू. दादा महाराज झुरळे. त्यांना मी ‘दादा’ म्हणायचो. मी दादांकडे अध्यात्म शिकण्यासाठी जवळ जवळ १ वर्ष आठवड्यातून एकदा जात होतो. दादांची अध्यात्म शिकवण्याची हातोटी विलक्षण होती. दादा उदाहरणे देऊन सोप्या भाषेत विषय जसा मांडायचे, तशा तर्‍हेने मांडणारे दुसरे संत मी पाहिले नाहीत. दादांची वाणी वात्सल्यपूर्ण होती.

२ ई. प.पू. बेजन देसाई, नाशिक, महाराष्ट्र

२ ई १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेल्या अध्यात्मातील वेगवेगळ्या विषयांवरील दहा ग्रंथांचे प.पू. देसाईकाका यांनी मुद्रितशोधन करतांना ग्रंथांवर प्रोत्साहन देणार्‍या टीपण्या लिहिणे

‘प.पू. बाबांच्या देहत्यागानंतर आम्ही प.पू. देसाईकाका यांना बाबांच्या स्थानी पहायचो. त्यांनी आम्हाला वेळोवेळी साधनेविषयी प्रेमाने मार्गदर्शन केले. मी आणि माझी पत्नी सौ. कुंदा, आम्ही संकलित केलेले ग्रंथ मी त्यांना आदरपूर्वक अर्पण केले. त्यांच्यावर एक दृष्टी फिरवून त्यांनी सांगितले की, ते इंग्रजी भाषेत भाषांतरित केले, तर ते स्वतः त्यांचे मुद्रितशोधन करतील; कारण आध्यात्मिक पुस्तकांमध्ये मूलग्रंथ अन् व्याकरण यांच्या संदर्भात चुका असणे अयोग्य असते. आम्ही प्रकाशित केलेल्या अध्यात्मातील वेगवेगळ्या विषयांवरील दहा ग्रंथांतील प्रत्येक ओळ प.पू. देसाई यांनी ‘एखाद्या चांगल्या शिक्षकाप्रमाणे पडताळून त्यांतील चुका दुरुस्त केल्या. त्यांनी त्यांवर ‘चांगले, उत्तम, अत्युत्कृष्ट’ इत्यादी टिपण्या मार्जिनमध्ये लिहून आम्हाला प्रोत्साहनही दिले. अत्यंत व्यस्त, शरीरप्रकृती अस्वस्थ आणि डोळ्यांतील मोतीबिंदूंनी त्रस्त असूनही त्यांनी आमच्या नवीन भाषांतरित केलेल्या ग्रंथांचे वाचन करून शाब्दिक अथवा अन्य मार्गाने आम्हाला मार्गदर्शन केले. पूर्वी सनातनच्या प्रत्येक ग्रंथात संकलक म्हणून आमची जी ओळख छापलेली आहे, ती त्यांनीच लिहिली होती.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले

२ उ. गुरुदेव डॉ. नारायणानंदनाथ काटेस्वामीजी, वडाळा महादेव, जिल्हा नगर, महाराष्ट्र

‘हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व सांगणार्‍या आणि धर्मरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लेखणी झिजवणार्‍या मोजक्या संतांपैकी एक म्हणजे वडाळा महादेव (जिल्हा नगर) येथील गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी ! माझा महामृत्यूयोग टाळण्यासाठी आणि सनातनच्या धर्मप्रसारकार्यातील अडथळे दूर होण्यासाठी त्यांनी देहत्यागापर्यंत वेळोवेळी जप, हवन, सप्तशतीपाठ इत्यादी केले. राष्ट्र अन् धर्म यांविषयीचे त्यांचे विपुल ओजस्वी लिखाण त्यांनी सनातनला सदासाठीच उपलब्ध करून दिले आहे. हे लिखाण त्यांच्या अनेक वर्षांच्या तपश्चर्येने समृद्ध आणि पुढील अनेक पिढ्यांना आदर्श जीवन जगण्यासाठी उपयोगी असे आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले (१०.६.२०१२)

२ ऊ. योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन, कल्याण, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र

‘ॐ आनंदं हिमालयं’ या संप्रदायाचे संस्थापक योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन (कल्याण, जिल्हा ठाणे) हे आमच्यासाठी मोठा आधारस्तंभच आहेत. वर्ष २००२ पासून माझ्यावरील महामृत्यूयोगाचे संकट टाळण्यासाठी, तसेच सनातनच्या धर्मप्रसारकार्यातील अडथळे दूर होण्यासाठी जप, अनुष्ठाने आदी उपासना योगतज्ञ दादाजी करत आहेत.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले (१०.६.२०१२)

२ ए. प.पू. भाऊ मसूरकर, सावंतवाडी, सिंधुदुर्ग

२ ए १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अभ्यासवर्गासाठी जागा उपलब्ध करून देणे

‘वर्ष १९९१ मध्ये सावंतवाडी येथे अध्यात्माविषयीचा अभ्यासवर्ग घेण्यासाठी प.पू. भाऊंनी त्यांचे सभागृह आम्हाला विनामूल्य उपलब्ध करून दिले. तसेच त्यांनी त्यांच्या विश्रामगृहावर (लॉजवर) आमच्या निवासाची विनामूल्य सोय केली होती.

२ ए २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना संख्याशास्त्र शिकवणे

प.पू. भाऊंच्या विश्रामगृहावर (लॉजवर) निवासासाठी थांबू लागल्यावर त्यांच्याकडून संख्याशास्त्र शिकायला मिळाले. भाऊंकडून ५-६ वेळा संख्याशास्त्र शिकण्याचा योग आला. त्या वेळी लिहून काढलेल्या टाचणांमुळे नंतर ‘संख्याशास्त्रानुसार साधना’ हा ग्रंथ संकलित करता आला.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१.५.२०००)

 

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्यासाठी आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करणारे संत

३ अ. संत दादाजी महाराज, उत्तर भारत

वर्ष १९८५ मध्ये उत्तर भारतातील संत दादाजी महाराज मुंबईला आले होते. त्यांच्या दर्शनाला मी गेलो असता नमस्कार केल्यावर त्यांनी मला रुपयाचे एक नाणे दिले आणि सांगितले, ‘‘हे पैशाच्या पेटीत ठेव. पुढे अध्यात्माचे भरपूर कार्य करायचे आहे. त्याला पैसा अपुरा पडणार नाही.’’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

३ आ. प.पू. परुळेकर महाराज, सिंधुदुर्ग

प.पू. परुळेकर महाराज म्हणतात, ‘‘मी प्रतिदिन ‘माझे चिंतन आणि ईश्वरस्मरण यांचा लाभ परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मिळावा, तसेच या महान कार्यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभावे’, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.’’

३ इ. प.पू. अण्णा राऊळ महाराज, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग

प.पू. अण्णा राऊळ महाराज यांचे नेहमीच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याला साहाय्य असते. वर्ष २००२ मध्ये प.पू. अण्णा राऊळ महाराज यांनी स्वतः सनातनच्या कुडाळ येथील सेवाकेंद्रात पाण्यासाठी ‘बोअरींग’ कुठे करायचे, याचे स्थान सांगितले. एवढेच नव्हे, तर ‘बोअरींग’ करतांना ते स्वतः उपस्थित राहिले. तेथे भरपूर पाणी लागले.

३ ई. प.पू. दास महाराज, बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग

‘प.पू. दास महाराज वर्ष २००२ पासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याशी जोडले गेले. त्यांनी सनातन संस्थेसाठी विविध राज्यांत ३७ पंचमुखी हनुमत्कवच यज्ञ केले. त्यांच्यावर अनेक वेळा अनिष्ट शक्तींनी आक्रमणे केली, तसेच त्यांचा मोठा अपघातही झाला. असे असूनही ते आपल्या ध्येयापासून तसूभरही ढळलेले नाहीत. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याला आध्यात्मिक बळ लाभावे, यासाठी त्यांनी प.पू. श्रीधरस्वामी यांच्या आज्ञेनुसार १ वर्षासाठी मौनव्रत धारण करून श्रीरामनामाचा जप केला.

३ उ. प.पू. परशराम पांडे महाराज, अकोला

वर्ष २००५ मध्ये प.पू. पांडे महाराज देवद, पनवेल (महाराष्ट्र) येथील सनातन आश्रमात रहाण्यासाठी आले. तेव्हापासून मार्च २०१९ पर्यंत ते आश्रमाच्या सुव्यवस्थापनासाठी प्रयत्न करणे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ग्रंथांच्या संकलनासाठी साहाय्य करणे, साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करणे, आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर उपाय करणे इत्यादी करत होते. ज्याप्रमाणे लक्ष्मण प्रभु श्रीरामचंद्रांची सतत पाठराखण करत असे, त्याप्रमाणे प.पू. पांडे महाराज १४ वर्षे सनातनच्या देवद येथील आश्रमात राहून हिंदु राष्ट्र-स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी साधना करून जणूकाही प.पू. डॉ. आठवले यांची पाठराखणच करत होते.’ – श्री. चेतन राजहंस, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

३ ऊ. प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

ईश्वरी प्रेरणेने समाजाला ज्योतिषाविषयी मार्गदर्शन करणारे ज्योतिषाचे अभ्यासक प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या धर्मकार्यातील अडथळ्यांचे निवारण, साधकांचे अनिष्ट शक्तींच्या त्रासांपासून रक्षण, सुराज्य-स्थापना आदींसाठी आध्यात्मिक स्तरावर कार्यरत आहेत.

३ ऊ १. सनातन संस्थेला कार्यासाठी धन उपलब्ध व्हावे; म्हणून कृती करणारे प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी ! :

‘११.६.२०१५ या दिवशी प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी यांनी माझ्या खोलीत देवपूजा केली. दुसर्‍या दिवशी सकाळी मला देवघरात ५०० रुपयांच्या दोन नोटा मिळाल्या. मी त्यांना विचारले, ‘‘मी तुम्हाला अर्पण देण्याऐवजी तुम्ही असे काय केले ? त्या नोटा मी परत पाठवतो.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘नोटा तुमच्याकडे ठेवा. या धनामुळे तुमच्या संस्थेच्या संपत्तीत वाढ होईल.’’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१२.६.२०१५)

३ ए. अश्वमेधयाजी प.पू. नारायण (नाना) काळेगुरुजी, बार्शी, जिल्हा सोलापूर

वर्ष २०१३ मध्ये प.पू. काळेगुरुजी (वय ८२ वर्षे) यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभावे; म्हणून त्यांच्यासाठी ६ वेळा आयुष्कामेष्टी यज्ञ केला आहे.

३ ए १. हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी २ वेळा अश्वमेध यज्ञ करणारे अश्वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य व्हावे, यासाठी त्यांनी २४ एप्रिल २०१३ ते १५ जुलै २०१४ या कालावधीत ‘साग्निचित् अश्वमेध सोमयाग’ केला. हा यज्ञ अनुमाने १,६०० वर्षांनी पृथ्वीवर करण्यात आला. ‘८.४.२०१६ या दिवशी प.पू. नाना काळेगुरुजी यांचा दूरध्वनी आला. ते म्हणाले, ‘‘आज पहाटे मला प.पू. गुळवणी महाराजांनी (प.पू. नानांच्या दीक्षागुरूंनी) स्वप्नदृष्टांत दिला आणि सांगितले की, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आणखी एका अश्वमेध यज्ञाची आवश्यकता आहे. प.पू. गुळवणी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आता प.पू. डॉ. आठवले यांच्या हातून आपल्याला या यज्ञाचा संकल्प करवून घ्यावयाचा आहे.’’ त्याप्रमाणे त्यांनी लगेच तो १४.४.२०१६ या दिवशी प.पू. डॉ. आठवले यांच्या हातून संकल्पविधी करून घेतलाही.

३ ऐ. प.पू. आबा उपाध्ये, पुणे

प.पू. नरसिंह उपाख्य आबा उपाध्ये यांच्या माध्यमातून त्यांचे गुरु सत्यलोकनिवासी श्री श्री श्री सदानंदीस्वामी (वय साडेतीन सहस्र वर्षे) प्रगट होऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या धर्मकार्यातील अडथळ्यांचे निवारण आणि साधकांचे अनिष्ट शक्तींच्या त्रासांपासून रक्षण यांसाठी अनेक वर्षे मार्गदर्शन करत होते.

३ ओ. योगऋषी रामदेवबाबा, हरिद्वार, उत्तराखंड

२८.१.२०१४ या दिवशी योगऋषी रामदेवबाबा यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट घेण्यासाठी सनातनच्या रामनाथी आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना होत असलेले विविध शारीरिक त्रास जाणून घेऊन त्यांना पुढील आयुर्वेदीय उपचार आणि प्रकृतीस्वास्थासाठी पथ्ये सांगितली.

३ अं. पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी , थिरुवण्णामलई, तमिळनाडू

लाखो वर्षांपूर्वी सप्तर्षींनी जीवनाडीपट्टीत केलेले लिखाण सूक्ष्मातून जाणून विविध घटनांचे तंतोतंत भविष्य सांगणार्‍या दुर्मिळ व्यक्तींपैकी पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी हे एक आहेत. ते सप्तर्षींच्या आज्ञेने हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी सप्तर्षी जीवनाडीचे वाचन अन् अनुष्ठाने, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रकृतीस्वास्थ उत्तम रहावे आणि साधकांचे संकटांपासून रक्षण व्हावे, यांसाठी आध्यात्मिक मार्गदर्शन करत आहेत. हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी आवश्यक भूमीची शुद्धी करण्यासाठी सनातनच्या संत पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून ते विविध विधी अन् अनुष्ठाने करवून घेत आहेत.

३ क. प.पू. रामभाऊस्वामी, तंजावूर, तमिळनाडू

श्री गणेश उपासक आणि समर्थ रामदासस्वामींच्या परंपरेतील असलेले प.पू. रामभाऊस्वामी (वय ७६ वर्षे) हे अग्नियोगी आहेत. १५ ते १७ जानेवारी २०१६ या कालावधीत त्यांनी रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ‘उच्छिष्ट गणपति यज्ञ’ केला. त्यानंतर ते म्हणाले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्राणशक्ती अल्प असते. त्यामुळे त्यांना चालणेही कठीण होते. मी त्यांच्यासाठी यज्ञ करणार आहे. मी यापुढे ज्या ज्या ठिकाणी यज्ञ करीन, त्या प्रत्येक यज्ञाच्या वेळी सनातनसाठी प्रार्थना करीन.’’

३ ख. पू. इंद्रवदन शुक्लजी, वापी, गुजरात

वापी, गुजरात येथील विठ्ठलभक्त असलेले पू. इंद्रवदन शुक्लजी स्वतःची साधना म्हणून इच्छुकांना ज्योतिष आणि आयुर्वेदीय उपचार सांगतात. ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आयुरारोग्य चांगले रहाण्यासाठी आध्यात्मिक उपाय सांगतात आणि स्वतःही करतात. ते हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी प्रार्थनाही करतात.

 

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा
महामृत्यूयोग टाळण्यासाठी विविध संतांनी केलेले साहाय्य

ज्योतिषशास्त्रानुसार वर्ष १९९८ पासून आजपर्यंत परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जीवनात अनेक महामृत्यूयोग आले. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी त्यांचे देहधारी अस्तित्व आवश्यक असल्याने त्यांचा महामृत्यूयोग टाळण्यासाठी स्वतःहून विविध संत आध्यात्मिक साहाय्य करत आहेत. याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी १८.१०.२०१५ या दिवशी लिहिले की, ‘व्यक्ती मृत झाल्यावर तिला घरून स्मशानात नेतात, तर संत मृतवत अवस्थेतील मला गेली १५ वर्षे स्मशानातून आश्रमात आणत आहेत !’

याविषयीची सविस्तर माहिती लवकरच प्रकाशित होणार्‍या ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे महामृत्यूयोग आणि त्यांचे निवारण’ या ग्रंथमालिकेत देण्यात येणार आहे.

 

५. संतांनी इतरांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याची ओळख करून देणे

५ अ. पुरी पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वतीजी

५ अ १. ‘साधना आणि राष्ट्ररक्षण’ शिबिरात स्वतः सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याविषयी माहिती करून देणे

‘ओंकारेश्वर (मध्यप्रदेश) येथे श्री अन्नपूर्णा आश्रमात पुरी पिठाचे जगद्गुरु श्री शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वतीजी यांच्या मार्गदर्शनाखाली चौदाव्या ‘साधना आणि राष्ट्ररक्षण’ या शिबिराचा २६.४.२०१३ या दिवशी आरंभ झाला. या शिबिरात शंकराचार्यांनी उपस्थितांना स्वतः सनातन संस्था, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अद्वितीय कार्याची ओळख करून दिली. त्यांनी सनातन संस्थेच्या संतांची ओळख करून देऊन त्यांना बोलण्यास सांगितले.’

५ अ २. प्रयाग माघमेळा आणि गंगासागर यात्रा या ठिकाणी स्वतःच्या मंडपात सनातन संस्थेला धर्मजागृतीपर प्रदर्शन लावण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे

सनातनचे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांविषयीचे कार्य पाहिल्यानंतर पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वतीजी महाराज यांनी वर्ष २०१४ मध्ये प्रयाग येथे झालेल्या माघमेळ्यात त्यांच्या मंडपातच सनातन संस्थेला प्रदर्शनासाठी जागा उपलब्ध करून दिली, तसेच सेवेसाठी आलेल्या साधकांची भोजन आणि निवास व्यवस्थाही केली. त्याच वर्षी बंगालमधील गंगासागर येथील यात्रेच्या वेळीही त्यांनी सनातनचे प्रदर्शन लावण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली.

५ आ. प.पू. राम बालकदासजी महाराज, पाटेश्वर धाम, छत्तीसगड

५ आ १. सनातन संस्थेने लावलेले धर्मजागृतीचे प्रदर्शन पहाण्यासाठी स्वतःहून अन्य साधू-संतांना आमंत्रण देणे

‘वर्ष २०१३ च्या प्रयाग येथील कुंभमेळ्यात प.पू. राम बालकदासजी महाराज यांची सनातनच्या कार्याशी ओळख झाली. ते सनातन संस्थेने लावलेले धर्मजागृतीचे प्रदर्शन पाहून प्रभावीत झाले होते. त्यामुळे ते स्वतःहून सदर प्रदर्शन पहाण्यासाठी अन्य साधू-संतांना आमंत्रण द्यायचे. जून २०१३ मध्ये ते गोवा येथील सनातन आश्रमात आले होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य पाहून त्यांची कार्याप्रती आत्मियता वाढली. प्रतिवर्षी महाशिवरात्रीच्या कालावधीत छत्तीसगडमधील राजिम जिल्ह्यात ते पवित्र नद्यांच्या संगमावर ‘राजीम कुंभ’चे आयोजन करतात. या स्थानीय कुंभमेळ्यात ते २०१३ पासून प्रतिवर्षी स्वतःहून सनातन संस्थेच्या प्रदर्शनासाठी स्थान आरक्षित करणे, साधकांची निवासाची सोय आदी कृती करतात. त्यांनी नाशिक (२०१५) आणि उज्जैन (२०१६) या कुंभमेळ्यांमध्ये सनातन संस्थेने लावलेले प्रदर्शन पहाण्यासाठी स्वतःहून अन्य साधू-संतांना आमंत्रित केले. नाशिक येथील कुंभमेळ्यात संत बैठकांचे आयोजन करण्यासाठी स्वतःचा मंडप उपलब्ध करून दिला.’ – श्री. चेतन राजहंस, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्यात जीवन
समर्पित करण्याची सिद्धता करणारे धर्मदास नरेंद्रबुवा हाटे महाराज !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना त्यांच्या राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृतीच्या कार्यासाठी जीव समर्पण करण्याची सिद्धता दर्शवणारे पत्र राष्ट्रीय कीर्तनकार आणि तपोधाम, जिल्हा रत्नागिरी येथील कीर्तनशाळेचे संस्थापक धर्मदास नरेंद्रबुवा हाटे यांनी पाठवले होते. ते पत्र पुढे दिले आहे.

तपोधाम, रत्नागिरी
प.पू. डॉ. आठवले यांस,

आपण जी संस्था उभी केली आहे, ते एक ज्वलंत आंदोलन आहे. हिंदु समाजासाठी आवश्यक अशी ही ऊर्ध्वदिशा आहे. या आंदोलनातील प्रत्येक विषय आम्ही कीर्तन-प्रवचनातून समाजापुढे मांडला आहे. धर्म आणि राष्ट्र यांच्या समस्या समाजापुढे ठेवून जनजागरण केले आहे. त्याचे चांगले-वाईट अनुभव आमच्या गाठीशी आहेत. आमच्यासारख्या एकांड्या शिलेदाराच्या मागून असली आंदोलने छेडण्यासाठी कोण येणार ? आता आपल्या या आंदोलनात आम्हीच आपल्याबरोबर वाटचाल करू, जेणेकरून आयुष्याच्या संध्याकाळी धर्म अन् राष्ट्र यांकरिता जीव समर्पण केल्याचे समाधान होईल. आपण माझ्यावर जी कामगिरी सोपवाल, ती माझ्या तपोधामच्या कार्यपूर्तीनंतर अवश्य करीन किंबहुना माझीच म्हणून पूर्ण करीन.

– ह.भ.प. नरेंद्रबुवा हाटे, रत्नागिरी (वर्ष २००२)

(धर्मदास नरेंद्रबुवा हाटे, रत्नागिरी यांनी त्यांचा १९.७.२००४ या दिवशी देहत्याग होण्यापूर्वी त्यांच्या कीर्तनशाळेच्या स्थानी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या धर्मकार्याला पूरक असे कार्य व्हावे, यासाठी त्या स्थानाचे व्यवस्थापन सांभाळण्याचे दायित्व सनातन संस्थेवर सोपवले. अशा प्रकारे देहत्यागानंतरही ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या धर्मकार्यातील एक अंग बनले. – संकलक)

 

७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याला संतांनी
स्वत:हून साहाय्य करणे, ही संतांच्या निरपेक्षतेची प्रचीती !

‘हे सर्व संत ‘किती निरपेक्षभावाने कार्य करत आहेत’, याची प्रचीती पुढील काही सूत्रांवरून येईल.

१. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी आणि योगतज्ञ दादाजी वैशंपायन हे सनातनच्या साधकांशी ओळख होण्याच्या पूर्वीपासून वाईट शक्तींकडून होणार्‍या त्रासाच्या निवारणासाठी कार्य करत होते.

२. एक संत सनातनला साहाय्य करण्यासाठी नियमितपणे यज्ञ आणि अन्य विधी करत असतात; पण त्यांनी ‘मी करत असलेल्या साहाय्याला कुठेही प्रसिद्धी देऊ नका’, असे सांगितले आहे.

३. वाईट शक्तींच्या निवारणार्थ विधी केल्यानंतर विधी करणार्‍या संतांनाही त्रास होतात, तरीही ते सातत्याने विधी करतात.

४. संतांच्या दृष्टीने राष्ट्र आणि धर्म हे विषयसुद्धा मायाच असते, तरीही ते सनातनच्या कार्याला साहाय्य करत असतात.

अनेक त्रास सहन करून, स्वखर्चाने, स्वत:हून आणि निरपेक्षपणे कार्य करणार्‍या संतांच्या या उदाहरणांवरून संतांचे मोठेपण लक्षात येते. संतांनी देवाचे एकदा नाव घेणे, म्हणजे साधकांनी जवळजवळ १० सहस्र वेळा नाम घेणे, असे असते. आपण केवळ जिवंत रहावे; म्हणून ते कित्येक कोटी नामजप करत आहेत. असे घरची व्यक्ती तरी कोणी करेल का ? खरे प्रेम करावे ते संतांनीच !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याला विविध संतांनी केलेले साहाय्य’

Leave a Comment